उरूस, 25 ऑक्टोबर 2021
उसंतवाणी- 211
(राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे या एनसीबी च्या अधिकार्याला उघड धमकी दिली की तुला एका वर्षांत तुरूंगात पाठवतो. )
मंत्रीपदे बसे । नवाब-ए-गांजा ।
वाजवतो झांजा । मग्रुरीचा ॥
अधिकार्याला दे । धमकी जोरात ।
तुला तुरूंगात । घालीन मी ॥
आई बाप त्याचे । सारे उद्धरीले ।
बोल जहरिले । असभ्य ते ॥
वैधानिक पदी । बसविले ज्याला ।
उन्मत्त तो झाला । सत्ता मदे ॥
ड्रग्ज व्यापाराचे । जाळे जागतिक ।
त्यात अगतिक । अडकले ॥
प्रश्न विचारता । उठतो भडका ।
शब्दांचा तडका । फडफड ॥
मारी वानखडे । अचुक हे खडे ।
मंत्री तडफडे । कांत म्हणे ॥
(23 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी- 212
(दिवाळीच्या काळात जश्न-ए-रिवाज या नावाने एक कलेक्शन फॅब इंडियाने काढले. शिवाय काही जाहिरात दारांनी आपल्या दिवाळी जाहिरातीतून कुंकू नसलेली स्त्री प्रतिमा दाखवली. यावर शेफाली वैद्य यांनी नो बिंदी नो हॅशटॅग अशी एक मोहिम सुरू केली. बघता बघता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग अपरिहार्यपणे जाहिरातदारांना बदलावे लागले. आपल्या जाहिरातीत कुंकू/टिकली/बिंदी लावणारी स्त्री दाखवावी लागली.)
दिवाळीला म्हणे । जश्न-ए-रिवाज ।
पुजेला नमाज । म्हणतील ॥
हिंदुंच्या सणाला । श्रद्धेवरी घाव ।
पुरोगामी आव । फुकटाचा ॥
बाईच्या कपाळी । नको म्हणे कुंकू ।
लिब्रांडू हे भुंकू । लागलेत ॥
सणांच्या भोवती । फिरे अर्थचक्र ।
तरी दृष्टी वक्र । हिंदुंवर ॥
आमचे उत्सव । सण समारंभ ।
आनंदाचा कुंभ । आम्हासाठी ॥
जनक्षोभापायी । ऍड बदलली ।
लढाई जिंकली । अर्थ-शस्त्रे ॥
कांत श्रद्धेला या । लावील जो धक्का ।
बंदोबस्त पक्का । करू त्याचा ॥
(24 ऑक्टोबर 2021)
उसंतवाणी-213
(आर्यन खान अटक प्रकरणांत अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात मंत्री नवाब मलिक यांनी आघाडीच उघडल्याने मोठा गुंता झाला. मंत्री विरूद्ध अधिकारी ही प्रशासनातील सावळा गोंधळाची प्रतिमा झाली.)
आर्यन केसचा । झाला फार गुंता ।
हबके जनता । पाहताना ॥
राज्यातला मंत्री । केंद्र अधिकारी ।
करी मारामारी । आपसांत ॥
राहिला ना घट्ट । ‘सैल’ साक्षीदार ।
शब्दांची माघार । घेत असे ॥
लाचेसाठी घेतो । नाव वानखेडे ।
उठे ओरखडे । कामावर ॥
ड्रग्ज रॅकेटची । खोल खोल मुळे ।
विषारी ही फळे । लगडती ॥
ड्रग्ज किंवा सत्ता । नशा भयंकर ।
अवैधाचा ज्वर । चढलेला ॥
कांत उंच उठो । सत्याचा आवाज ।
असत्याचा माज । उतरो हा ॥
(25 ऑक्टोबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575