उरूस, 16 मे 2021
सलग पन्नास दिवस ‘उसंतवाणी’ लिहिली. रोज एक अभंग लिहित गेलो. पन्नाशी झाल्यावर एक आभार व्यक्त करणारा अभंग लिहिला आणि रोज लिहिणं शक्य नाही ही प्रमाणिक भावनाही मांडली. पण राजकिय परिस्थितीच अशी आहे की रोज काही तरी समोर येते आहे. आणि मग त्यावर प्रतिक्रिया उमटतेच. आताही महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळ बैठकीतील खडाजंगीचे प्रकरण समोर आले आणि मला विषय सापडला. सर्व रसिकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक अभार.
उसंतवाणी- 49
(इस्त्रायल आणि पॅलिस्टीन यांच्यात परत एकदा संघर्ष सुरू झाला आहे. यावर आपले पुरोगामी सेव्ह गाझा म्हणत छाती बडवून घेत आहेत. दहशहवाद आणि इस्लाम यांचा अतुट संबंध आहे हे कसे दुर्लक्ष करणार? गेली 1 हजार वर्षे भारताने इस्लामी आक्रमणं सहन केली आहेत. त्याविरूद्ध आवाज उठवणार की नाही? )
मध्यपुर्वेमध्ये । पेटे गाझा पट्टी ।
पुरोगामी शिट्टी । भारतात ॥
चालला संघर्ष । ज्यू-मुसलमान ।
कापताती मान । सौहार्दाची ॥
इस्लामी जिहाद । चुकवितो ठोका ।
सर्व धर्म धोका । जगभर ॥
बामियाना बुद्ध । फोडियल्या मुर्ती ।
टॉवर वरती । हल्ला केला ॥
हजारो मंदिरे । हिंदूंची तोडली ।
सभ्यता गाडली । हिंसेखाली ॥
इस्लामी देशात । कुठे लोकशाही? ।
उत्तर ना काही । देते कुणी ॥
कट्टर पंथ्यांना । कठोर शासन ।
घालावी वेसण । कांत म्हणे ॥
(14 मे 2021)
उसंतवाणी- 50
(रोज एक अभंग असा 50 दिवस हा उपक्रम चालू आहे. आज याची पन्नाशी होते आहे. त्या निमित्ताने लिहिलेला हा अभंग. या पुढे रोज तर शक्य नाही पण नियमितपणे उसंतवाणी लिहिण्याचा मानस आहे.)
‘उसंतवाणी’ने । गाठली पन्नाशी ।
तूमचा पाठिशी । आशिर्वाद ॥
ज्ञाना नामा तुका । पायी लावू हात ।
केली सुरूवात । रचनेला ॥
जनमानसाचा । ओळखोनी भाव ।
शब्दांचा हा गाव । वसविला ॥
तुकोबा वर्णिती । तैसा मी हमाल ।
पल्याड मजाल । फार नाही ॥
करावे कौतुक । किंवा करा टिका ।
भाव आहे निका । मनातला ॥
लोकधारे मध्ये । सोडीले अभंग ।
भिजो त्यांचे अंग । जनप्रेमे ॥
कांत म्हणे लिहू । जेवढे सोसल ।
मिडिया सोशल । हाची बरा ॥
(15 मे 2021)
उसंतवाणी- 51
(मंत्री मंडळाच्या बैठकीत जयंत पाटील आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यात काही खडाजंगी झाल्याचे बाहेर आले. शिवसेना प्रवक्ते संजय राउत यांनी भांड्याला भांडे लागणारच. पण ही भांडी मजबूत स्टिलची आहेत असं पत्रकारांना सांगितलं. त्यावरून काही एक खडाजंगी परत घडली. )
कॅबिनेटमध्ये । भांडी वाजतात ।
बोल गाजतात । प्रवक्त्याचे ॥
वाझेच्या हप्त्याची । थांबता मलई ।
उडाली कल्हई । भांड्याची या ॥
काही भांडी राठ । ‘बारा’च्या मातीची ।
खेळती जातीची । कुटनीती ॥
मुख्य भांडे आहे । बसुनिया घरी ।
जणू अंड्यावरी । कोंबडी ही ॥
इटलीची काही । भांडी ही ठिसूळ ।
मोडती समूळ । सत्तेविना ॥
ताटा भोवतीला । वाट्या पेले तांब्या ।
अपक्ष हा ठोंब्या । तैसा असे ॥
कांत परमवीरे । उघडला कट ।
आदळ आपट । त्याचमुळे ॥
(16 मे 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575