उरूस, 7 मे 2021
उसंतवाणी- 40
(प.बंगाल निवडणुकांच निकाल लागल्यावर तिथे हिंसाचाराचा आगडोंब उसळला. विरोधी पक्षांचे शिरकाण करण्याचे तृणमुलच्या गुंडांची ही भयानक खेळी अंगावर काटा आणणारी आहे. )
विजयाची निघे । इथे अंत्ययात्रा ।
बंगाली ही ‘जात्रा’ । विचित्रच ॥
दारी उभारून । विजयी मांडव ।
हिंसेचे तांडव । चालविती ॥
सत्तेचा उन्माद । पेटविती घरे ।
‘ममतेचे’ झरे । आटलेले ॥
पुरोगामी ढोंगी । बोलेना मुखाने ।
पाहती सुखाने । जाळपोळ ॥
नवरा मरू दे । सवत रंडकी ।
खुशीत ढोलकी । लिब्रांडुंची ॥
नंदीग्राम हार । लागते जिव्हारी ।
सुरू मारामारी । आयोगाशी ॥
मतदारे दिली । अपात्राला खुर्ची ।
छातीमध्ये बर्ची । कांत म्हणे ॥
(5 मे 2021)
उसंतवाणी- 41
(सर्वौच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षणाचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द ठरवला. गेली 5 वर्षे मराठा तरूणांना भडकावण्याचे जे राजकारण मराठा नेतृत्वाने केले त्याला मोठी फटकार बसली आहे. शेतकरी चळवळीने सातत्याने शेतमालाचा भाव हाच मराठा समाजासाठी कळीचा मुद्द असल्याचे सांगितले होते. )
कोर्टाने रोखता । कायद्याचे शिंग ।
आरक्षण बिंग । फुटतसे ॥
मराठा नेतृत्व । झाले असे भोंदू ।
कुजविला मेंदू । तरूणांचा ॥
कुणब्याची मोठा । शेतमाल भाव ।
आरक्षण हाव । कुचकामी ॥
खरे हकदार । दलित दुबळे ।
पिडीत सगळे । शतकाचे ॥
पैसा शिष्यवृत्ती । द्यावे अनुदान ।
साधते कल्याण । इतरांचे ॥
आरक्षण नाही । त्यावरी उपाय ।
होतसे अपाय । सामाजिक ॥
कांत आरक्षण । आहे खुळखुळा ।
बनवते बुळा । सक्षमासी ॥
(6 मे 2021)
उसंतवाणी- 42
(प.बंगालात ममता बॅनर्जी यांचा जो विजय झाला त्यामागे शरद पवारांचा हात असल्याचे उपहासात्मक वक्तव्य भाजपचे बंगाल प्रभारी कैलास विजय वर्गीय यांनी केले होते. त्याचा आधार घेवून महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते, पुरोगामी आणि पत्रकार यांनी शरद पवारांचे गुणगान सुरू केले. प्रत्यक्षात पंढरपुर विधानसभा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. म्हणजे आपली साधी आमदारकीची जागा राखता येत नाही आणि चालले ममतांच्या विजयाचे श्रेय घ्यायला.)
बंगाली विजय । पवारांचा हात ।
मारितसे बात । पुरोगामी ॥
पार नाही कधी । सत्तरीचा टप्पा ।
बहुमत गप्पा । मारताती ॥
युपीए अध्यक्ष । संजय उवाच ।
बोलतो उगाच । काही बाही ॥
खासदार नाही । दोन आकड्यांत ।
खेळी वाकड्यांत । सदोदीत ॥
ममताने सत्ता । आणली खेचून ।
कॉंग्रेस त्यागून । स्वाभिमाने ॥
शरद चांदणे । कधी लाडीगोडी ।
कधी करी तोडी । कॉंग्रेसशी ॥
कांत कुटनीती । ऐसी ‘बारा’मती ।
कैसी सद्गती । लाभणार ॥
(7 मे 2021)