उरूस, 2 एप्रिल 2021
प.बंगाल मध्ये विधानसभेची निवडणुक चालू आहे. दुसर्या टप्प्याचे मतदान 1 एप्रिलला पार पडले. यात ममता दिदी उभ्या आहेत तो नंदीग्राम विधानसभा मतदारसंघही होता. ममतांनी शेवटचे तीन दिवस प्रत्यक्ष त्याच मतदार संघात ठिय्या देवून होत्या. अगदी मतदान चालू होते तेंव्हाही त्या एका बुथवर बसून होत्या. मतदान चालू असतानाच त्यांनी आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी कांगावा करायला सुरवात केली. त्यातला पहिला आरोप होता की आमच्या माणसांना मतदानच करू दिले गेले नाही.
हा आरोप खोटा होता हे काही वेळातच हाती आलेल्या आकडेवारीने सिद्ध केले. मागील निवडणुकीत मतदाराची आकडेवारी 79.45 % अशी होती. यावेळी जो अंतिम आकडा निवडणुक आयोगा कडून आला आहे तो आहे 84.54 %. या वेळेला एकूण मतदारांत वाढ झालेली होती. शिवाय हा आकडा सरासरीतही 5 % नी वाढलेला आहे. म्हणजेच मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदरांनी मतदान केले. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की ममता दिदी कुणाला मतदान करू दिले गेले नाही म्हणून ओरड करत आहेत?
रोहिंग्या मुसलमानांना मतदान करू दिले गेले नाही, बांग्लादेशी घुसखोरांना मतदान करू दिले गेले नाही, खोटे ओळखपत्र ज्यांच्या जवळ होते त्यांना मतदान करू दिले गेले नाही म्हणून तक्रार आहे का? तसे असेल तर खरंच भारतातील पुरोगाम्यांची लोकशाही धोक्यात आली आहे. आम्हाला बोगस मतदानही करण्याचे स्वातंत्र्य नाही. तेंव्हा खरंच ममता म्हणतात तसा अन्याय या परदेशी घुसखोरांवर झालेला आहेच.
दुसरा आरोप दिदींनी केला की युपी बिहारचे गुंडे भाजपने इकडे आणले आहेत. ते यांच्या मतदरांना त्रास देत आहेत. धरात घुसून धमकावत आहेत. सीआरपीएफ चे जवान आमच्या मतदारांना धमकावत आहेत. भाजपला मतदान करण्यास भाग पाडत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा आहे ते त्याच्या कपड्यांवरून टोपीवरून गळ्यातील रूमालावरून झेंड्यावरून ओळखू येते. पण मतदार कोणाचा आहे हे कसे ओळखणार? मग ममतांच्या या आरोपाची शाहनिशा कशी करायची? यांचा हा आरोप तेंव्हाच खोटा ठरला जेंव्हा याचे कुठले फुटेज उपलब्ध आहे का असे पत्रकारांनी विचारायला सुरवात केली. आणि ममता किंवा तृणमुलच्या प्रवक्ते नेते कार्यकर्ते कुणालाच त्याचा पुरावा देता येईना. उलट पत्रकारांवर यांच्या कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला इंडिया टिव्हीवर प्रत्यक्ष दाखवला गेला. त्या पत्रकाराने स्वत:ला जखम झालेली असतानाही रिपोर्टिंग केले. कारच्या काचेवर झालेली दगडफेक दाखवली. तृणमुलच्या कार्यकर्त्यांना कुणी धमकावले त्यांच्यावर हल्ला केला याचा एकही दृश्य पुरावा कालच्या दिवसभरात समोर आला नाही.
मोदी काल मदुराई मंदिरात गेले त्याचे फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यावरून एक मोठा गदारोळ झाला. खरं तर तामिळनाडूत मोदिंच्या मंदिर भेटीने मतदारांवर परिणाम होईल अशी शक्यता नाही. मग हा आरोप ममता आणि तमाम पुरोगाम्यांनी करायचे काय कारण? याच वेळी ममता मंचावरून चंडीपाठ करत आहेत, आपले गोत्र सांगत आहेत, देवी कवच म्हणत आहेत. मग यावर हे पुरोगामी काही टिका करत आहेत का? बंगालच्या निवडणुका चालू झाल्या आणि याच काळात तेथील सर्वात मोठ्या फुर्फुरा शरिफ दर्ग्याचा उरूस भरला (6 ते 8 मार्च). तिथे सगळ्या पुरोगाम्यांनी जावून दर्ग्यावर चादर चढवली. तिथले मौलाना पीरजादा आब्बास सिद्दीकी आयएसएफ नावाचा पक्ष स्थापून कॉंग्रेस आणि डाव्यांसोबत निवडणुक लढवत आहेत. त्यावर कुण्या पुरोगाम्याने टिका केल्याचे एकही उदाहरण समोर आले नाही.
वास्तविक कसलाच आक्रस्ताळेपणा न करता शांतपणे ममता दिदींनी प्रचार चालवला असता तर त्यांच्या पक्षाची जिंकण्याची सगळ्यात जास्त शक्यता होती. तसेच अंदाज निवडणुकपूर्व सर्वेक्षणांतून समोर आलेही होते. पण ममतांनी आपला तोल ढासळल्याचे पुरावे दिले आणि त्याचा एक विपरीत परिणाम आता होताना दिसतो आहे.
इंडिया टिव्हीच्या पत्रकारांनी काही गावांत लोकांना मतदानापासून कसे वंचित ठेवल्या जात आहे. केंद्रिय राखीव दलाचे जवान (सी.आर.पी.एफ.) आल्यावरच त्यांना हिंमत झाली आणि हे लोक मतदानाला आले ही बातमी सविस्तर दाखवली. मग याच्या उलट तृणमुलवर होणारा अन्याय यांच्या कुणा कार्यकर्त्यांनी का दाखवून दिला नाही? हे इतरांवर अत्याचार करत आहेत त्याचेच पुरावे समोर आले आहेत.
तृणमुलची होत असलेली घसरण आणि त्यातून ममतांची दिसून येणारी अस्वस्थता सत्य सांगते आहे. ही स्थिती ममतांनी स्वत: होवून करून घेतली आहे. उद्या निकालात ममतांचा पक्ष सत्तेपासून परावृत्त राहिला तर त्याचे मोठे श्रेय भाजपच्या धोरणापेक्षा ममतांच्या या आक्रस्ताळेपणालाच असेल. हातात आलेली सत्ता त्यांनी गमावली असाच त्याचा अर्थ निघेल.
सलग दोन टप्प्यांत मतदानाचे पूर्वीचे विक्रम मोडत समोर आलेल्या सामान्य बंगाली मतदाराचे अभिनंदन केले पाहिजे. याच साध्या लोकांनी लोकशाही टिकवून ठेवली आहे. याही टप्प्यात हिंसाचाराच्या अतिशय तुरळक घटना घडल्या. या सोबतच असम मध्येही मोठ्या प्रमाणात मतदान झाले. लोक उत्सहात मतदानाला बाहेर पडले. तेथील आकडेवारीही (78.04 %) उत्साहवर्धक आहे. पूर्वीपेक्षाही हा आकडा 4 % नी जास्त आहे.
निवडणुकीच्या आकडेवारीसाठी निवडणुक आयोगाने ‘व्होटर टर्नओव्हर’ नावाचे फार चांगले ऍप तयार केले आहे. दर दोन तासांनी त्यावर ताजी आकडेवारी मतदान चालू असताना मिळत असते. सगळ्यात शेवटची आकडेवारी दुसर्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत उपलब्ध होते. या पुढील मतदानाच्या टप्प्यांसाठी इच्छुकांनी अभ्यासकांनी याचा वापर जरूर करावा. म्हणजे ममता किंवा कुणीही राजकीय कार्यकर्ता नेता प्रवक्ता मतदाना विषयी किती खरं बालतो खोटं बोलतो याची शहानिशा लगेच होउन जाईल.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575