उरूस, 10 मार्च 2021
पाच विधानसभांच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. एक्झिट पोल विविध संस्थांच्याद्वारे घेतले जात आहे. त्याचे आकडे आता समोर आले आहेत. टाईम्स नाऊ आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या निवडणुक पूर्व सर्वेक्षणात पाचही राज्यांत कॉंग्रेसची अवस्था दयनीय दिसून येते आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा चर्चेला समोर येतो आहे.
तीन वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेचे निकाल जाहिर झाले होते. एच.डि.कुमारस्वामी यांच्या पक्षाला कॉंग्रेसच्या अर्ध्याच जागा मिळाल्या होत्या तरी त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला. कॉंग्रेसने ते पुरवला कारण कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून दूर राखायचे होते. तेंव्हा जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात देशभरांतील भाजपेतर विरोधी पक्ष नेते एकमेकांच्या हातात हात घालून उभे असलेले दिसून आले.
या महागठबंधनाची खुप तारीफ तेंव्हा पुरोगामी पत्रकार विचारवंत यांनी केली होती. त्या सगळ्यांना साक्षात्कार झाला होता की भाजपला अतिशय सबळ असा राजकीय पर्याय उभा राहिला आहे. त्याचे नेतृत्व कॉंग्रेस पक्ष करत आहे. आणि अर्थातच कॉंग्रेसचे नेते राहूल गांधी हेच देशाचे पुढचे पंतप्रधान असणार आहेत.
ही सगळी राजकीय कवायत 2019 च्या लोकसभा निवडणुकांसाठी चालू होती. साहजिकच कुणाचीही अशी अपेक्षा होती की किमान त्या निवडणुकीआधीच्या विधानसभांच्या निवडणुका तरी महागठबंधन म्हणून लढवल्या जातील.
याला पहिला अपशकुन स्वत: कॉंग्रेसनेच केला. 2018 च्या डिसेंबर मध्ये होवू घातलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब या निवडणुकांत मायावती यांचा बसपा आणि मुलायम यांचा सपा यांचा सफाया स्वत: कॉंग्रेसनेच केला. पुढे प्रत्यक्ष निकाल लागले आणि कॉंग्रेसला पंजाब, छत्तीसगढ मध्ये स्पष्ट बहुमत भेटलेही. मध्यप्रदेशांत अगदी दोन जागांनी बहुमत हुकले. राजस्थानातही असेच अगदी काठावर बहुमत मिळाले. तिथे मायावती यांचा बसपा कॉंग्रेस सोबत जाण्यास तयार होता. पण कॉंग्रेसने तो पक्षच फोडला. आणि सर्व 6 आमदार आपल्या पक्षात सामील करून घेतले. कर्नाटकांत मायावतींच्या आमदाराने कुमारस्वामी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मध्यप्रदेशांत समाजवादी पक्षा सोबत कॉंग्रेसचा खटका उडाला. या सगळ्याचा परिणाम लगेच दिसून आला. लोकसभा निवडणुकांत महागठबंधन नावाने कसलीच मोठी आघाडी उभी राहू शकली नाही. कर्नाटक आणि मध्यप्रदेशांतील कॉंग्रेसची सत्ताही त्यांच्याच आमदारांमुळे गेली.
आता ज्या पाच विधानसभांच्या निवडणुकां होत आहेत ती सर्व राज्ये महागठबंधन मधील पक्षांसाठी महत्त्वाची राज्ये आहेत. कॉंग्रेसची असम मध्ये 2016 पर्यंत सत्ता होती. पुद्दुचेरी मध्ये चालू विधानसभेत कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होता. कॉंग्रेसच्याच आमदारांनी राजीनामे दिले आणि ते सरकार निवडणुकीच्या तोंडावर पडले.
केरळात दर पाच वर्षांनी सत्तांतर होत आले आहे. गेल्या 45 वर्षांतला हाच पायंडा आहे. त्यानुसार डाव्यांचा पराभव होवून कॉंग्रेसची सत्ता येण्याची जास्त शक्यता होती.
आता या पार्श्वभूमीवर टाईम्स नाउ आणि सी व्होटर यांनी निवडणुक पूर्व सर्वेक्षणाचे जे आकडे समोर आणले आहेत ते कॉंग्रेससाठी निराशाजनक आहेत.
असममध्ये भाजपचीच सत्ता कायम राहण्याचे संकेत आहेत. तिथे कॉंग्रेसचे तरूण गोगाई 2016 पर्यंत मुख्यमंत्री होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जो पराभव झाला तो 2016 च्या विधानसभेत टाळण्यासाठी काय करावे लागेल हे सांगण्याचा हेमंत बिस्व शर्मा हे नेते आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांना राहूल गांधी यांनी साधी भेटही नाकारली. आणि जेंव्हा भेट मिळाली तेंव्हा राहूल गांधी आपल्या कुत्र्याला बिस्कीटं भरवत राहिले पण यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. याचा परिणाम काय झाला? तर हेमंत बिस्व शर्मा तिथून उठले आणि सरळ भाजपमध्ये सामील झाले. 2016 मध्ये तर कॉंग्रेसची सत्ता गेलीच पण आताही ती येण्याची शक्यता दिसत नाही.
पश्चिम बंगाल मध्ये डाव्यांच्या दुप्पट जागा घेवून कॉंग्रेस विधान सभेतील प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. शिवाय लोकसभेत दोन खासदार पण निवडु न आले होते. स्वाभाविकच कॉंग्रेसचे राजकीय आव्हान तगडे असायला हवे होते. पश्चिम बंगालचे खासदार अधीर रंजन चौधरी हेच कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते पण आहेत.
एक्झिट पोल मध्ये कॉंग्रेस डावे आणि पीर जादा आब्बास सिद्दीकी यांच्या आघाडीची अगदी किरकोळ मध्ये वासलात काढण्यात आली आहे. ममतांचे बहुमत घटेल पण त्यांचीच सत्ता राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. सट्टाबाजार मध्ये भाजपचे बाजूने कौल देण्यात आला आहे. याती कुणीही खरे ठरो पण कॉंग्रेसला कुणीच मोजायला तयार नाही ही कॉंग्रेसच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. तीन जागा असलेला भाजप सत्तेसाठी दावेदारी करतो आहे. त्याला किमान 100 तरी जागा मिळतील अशी शक्यता आहे. आणि 44 जागा असलेल्या कॉंग्रेसचे राजकीय आव्हान संपूष्टात आलेले दिसत आहे ही मोठी आश्चर्याची बाब आहे.
तामिळनाडूत कॉंग्रेस ज्या पक्षा सोबत आहे त्या एम.के. स्टालिन यांचा डि.एम.के. सत्तेवर येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागच्यावेळीसही कॉंग्रेस डि.एम.के. सोबतच आघाडीत होता. कॉंग्रेसने 41 जागा लढवून 8 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे यावेळेस डि.एम.के. ने त्यांची मुळ मागणी फेटाळून 25 जागांवर तडजोड करण्यास भाग पाडले आहे. तामिळनाडूत पुश अप्स काढून शाळकरी मुलांचे रंजन करणारे राहूल गांधी राजकीय पुश अप्स कधी काढणार? त्यांचा शरिरीक फिटनेस चांगला असल्याचे पुरावे ते देत आहेत पण कॉंग्रेस पक्षाचा राजकीय फिटनेस कसा सिद्ध करणार?
केरळात आश्चर्य म्हणजे परत डाव्यांचीच सत्ता येईल असे सर्वेक्षणातील आकडे सांगत आहेत. मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या काळात सोन्याच्या तस्करीसारखे गंभीर मुद्दे समोर आले आहेत. अशावेळी अपेक्षा अशी असते की याचा फायदा घेत विरोधी पक्षाने रान उठवत सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. आणि तशी संधी कॉंग्रेसला आहेही. पण केरळात जावून राहूल गांधी माच्छीमारांसोबत समुद्रात डुबक्या मारण्यात गुंग आहेत. पक्ष राजकीय पाण्यात बुडतो आहे त्याची त्यांना काळजी दिसत नाही. त्यांच्याच वायनाड लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस पदाधिकार्यांनी राजीनामे देत पक्षातून बाहेर जाणे पसंद केले आहे. आणि हे मात्र भाषणांत उत्तरेपेक्षा दक्षिणेतील मतदार कसे प्रगल्भ आहेत, उत्तरेतील राजकारण कसे वरवरचे उथळ झाले आहे अशी ग्वाही देत आहेत. मग याच दक्षिणेतील प्रगल्भ मतदारांनी तुम्हाला नाकारले तर तूम्ही काय उत्तर देणार? उत्तरेच्या उथळ लोकांनी तर तूम्हाला आधीच नाकारले आहे.
पुद्दुचेरीमध्येही कॉंग्रेसचा पराभव होवून भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तिथे राहूल गांधी यांनी नुकतीच भेट दिली होती. मच्छीमारांशी बातचीत करताना या क्षेत्रासाठी वेगळे मंत्रालय असण्याची गरज व्यक्त केली होती. 17 वर्षे खासदार असलेल्या या ज्येष्ठ नेत्याला (ते जरी स्वत:ला तरूण म्हणवून घेत असले तरी) सरकारी मंत्रालयांची रचना कशी आहे हे माहित नसू नये? 2019 मध्येच मच्छीमारांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन झाले आहे. गिरीराज किशोर त्याचे मंत्री आहेत. याच मंत्रालयासंदर्भात एक प्रश्न राहूल गांधी यांनीच लोकसभेत 2 फेब्रुवारीला विचारला होता अशीही माहिती त्यांनी देत राहूल गांधीना उघडे पाडले. आता पुरोगामी पत्रकार राहूल गांधींना विचारणार का की तूम्ही असले धादांत खोटे का बोलता ते? याचा परिणाम मतदारांवर होतो. त्यानंतरच्या सर्वेत कॉंग्रेसची पुद्दुचेरीतील सत्ता जाण्याचे अंदाज समोर आले आहेत.
त्याच भेटीतील एक खोटेपणाही समोर आला आहे. एक महिला मुख्यमंत्री नारायण सामी यांनी वादळाच्या भयानक आपत्तीत आपल्याला किंवा कुणालाच कशी मदत केली नाही हे संतापून सांगत होती. तामिळ भाषा न कळल्याने राहूल गांधींनी मुख्यमंत्री नारायण सामींना विचारले ती काय बोलत आहे? नारायण सामींनी नेमके उलटा अर्थ सांगितला. आपण कशी त्यांना मदत केली आणि त्यासाठी ती आपल्याला धन्यवाद देत आहे. आता हे सर्व समाज माध्यमांत समोर आले आणि कॉंग्रेसची इज्जत गेली.
कॉंग्रेस शिवायचे महगठबंधनातील भाजपेतर पक्ष आपल्या आपल्या दृष्टीने राजकीय मेहनत करत आहेत. त्याचे फळ त्यांना मिळत असल्याचे या एक्झिट पोल मधून समोर आले आहे. पश्चिम बंगालात ममता, तामिळनाडून स्टालिन आणि केरळात डावे सत्तेवर येण्याची चिन्हे आहेत. पण कॉंग्रेस कुठे आहे? खुद्द कॉंग्रेसच्या नेत्यांनाच आपल्या पक्षाचा भरवसा वाटत नाही. याचा एक पुरावा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष विधानसभेचे माजी सभापती नाना पटोले यांनी दिला आहे. त्यांचा पक्ष डावे आणि पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या सोबत प.बंगालात लढतो आहे. आणि हे असे वक्तव्य करत आहेत की प. बंगालात ममता दिदींचे सरकार निश्चित येणार आहे. आता या मानसिकतेला काय म्हणणार?
भारतात सक्षम विरोधी पक्ष उभा राहताना दिसतो आहे पण तो पुरोगामी विचारवंत पत्रकारांच्या अपेक्षेप्रमाणे कॉंग्रेस मात्र नाही. ममता, तेजस्वी यादव, अखिलेश यादव, स्टालिन, केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन अशी एक भाजपविरोधी आघाडी सशक्त होते आहे. यांच्या सशक्त होण्यातच कॉंग्रेसच्या विनाशाची बीजे दडलेली आहेत. कारण हे पक्ष कॉंग्रेसची जागा घेत त्यांचीच मतपेढी बळकावत पुढे सरकत आहेत.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575