Saturday, January 16, 2021
मूर्ती मालिका - २५
Friday, January 15, 2021
भूपेंद्रसिंग ‘मान’ न मान ...
उरूस, 15 जानेवारी 2021
माजी खासदार भारतीय किसान युनियन चे अध्यक्ष भुपेंद्रसिंग मान यांनी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत काम करण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयाने आंदोलनाचे समर्थक आणि मान यांना कालपर्यंत भाजपचे पिद्दू समजणारे यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत.
एक तर भुपेंद्रसिंग मान यांनी कसलेही वैचारिक कारण दिले नाही. पंजाबमध्ये या प्रश्नावर प्रचंड दहशतवाद उफाळून आला आहे. हा दहशतवाद प्रत्यक्ष आहे आणि वैचारिकही आहे. वैचारिक म्हणजे कसलाही विचार न करता विरोध करण्याचा. आणि प्रत्यक्ष दहशतवादाचा तर पंजाबचा इतिहासच आहे.
कॉंग्रेस, अकाली दल, आम आदमी पार्टी या सर्वच पक्षांना पंजाबातील आंदोलनकर्त्यांच्या दहशतवादापुढे झुकावे लागले आहे. अकाली दल आणि आम आदमी पार्टी यांनी अगदी आत्ता आत्ता पर्यंत या कृषी विधेयकाच्या बाजूची भूमिका घेतली होती. अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल या तर मोदी सरकार मध्ये मंत्री होत्या. मंत्रीमंडळाची बैठक असो किंवा प्रत्यक्षात कायदे मंजूर होताना झालेले मतदान असो त्यात त्या सहभागी होत्या. आम आदमी पक्षाने तर हे कायदे आपल्या राज्यात म्हणजे दिल्लीत लागूही केले होते. कॉंग्रेस बाबत तर काही बोलायची गरजच नाही. त्यांच्या जाहिरनाम्यात याच कायद्यांचा उल्लेख असतानाही त्यांनी आता राजकीय कारणांसाठी विरोध सुरू केला आहे.
माजी खा. भुपेंद्रसिंग मान यांनी अगदी उघडपणे या कायद्यांना पाठिंबा दिला होता. भारतीय किसान युनियन एक दोन नव्हे तर तब्बल 35 वर्षे शरद जोशींच्या शेतकरी संघटनेसोबत राहून आंदोलन करत आली आहे. सातत्याने शेतकरी स्वातंत्र्याच्या बाजूची भूमिका या भारतीय किसान युनियनने घेतली होती. असं असताना अचानक भुपेंद्रसिंग मान समितीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात यातच या आंदालनाची सर्व प्रकारची दहशत दिसून येते.
खरं तर विरोध करायचा असेलच तर त्यासाठी समितीत राहणे हेच जास्त योग्य ठरले असते. समितीचा अहवाल तसा देता आला असता. मान साहेब आणि बाकी सर्व आंदोलनकर्ते आपली भूमिका इतर सदस्यांना पटवून देवू शकले असते. पण तसे काहीच न करता आंदोलनकर्त्यांनी जी आडमुठी भूमिका घेतली त्याला मान साहेबांनी मुक संमतीच दिली आहे.
कसलाही वैचारिक आधार न देता, कसलीही चर्चा न करता ‘कनून वापस लो’ अशी जरी भूमिका असेल तर हे सरकार किंवा न्यायालय या सर्वांनाच अतिशय सोयीचे आहे. न्यायालयाचा एक साधा नियम आहे की जो कुणी वारंवार सुचना देवूनही न्यायालयासमोर आला नाही तर निकाल जो हजर आहे त्याच्या बाजूने एकतर्फी दिला जातो.
सरकारी पक्ष तर अशी भूमिका आंदोलक जोपर्यंत घेत आहेत तोपर्यंत निवांतच राहील. कारण त्यांच्या सोयीचेच हे सगळे घडत आहे. न्यायालयात प्रकरण जाणे म्हणजेच वेळकाढूपणा होणार. तेंव्हा आंदोलन जास्त न ताणता काही एक मुद्द्यांवर विशेषत: किमान आधारभूत किंमतीची लेखी हमी (कायदा करता येत नाही) व कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त न करण्याची खात्री या मुद्द्यांवर आंदोलन संपवता आले असते. तसे झाले असते तर आंदोलन अधिक बळकट झाले असते. पण आता आंदोलन रेंगाळत गेले आहे.
भूपेंद्रसिंग मान यांचा शरद पवार होवून बसला आहे. कॉंग्रेसची बाजू घ्यायची की विरोध करायचा हे 1978 पासून आत्तापर्यंत शरद पवारांना ठरवता आले नाही. मान साहेबांना शरद जोशी हयात होते तो पर्यंत ठामपणे शेतकरी स्वातंत्र्याची बाजू घेता आली. पण मुळातला त्यांचा वैचारिक दुबळेपणा शरद जोशी यांच्या माघारी पाच वर्षांतच उघडा पडला. सरकारी नियोजनाची समाजवादी व्यवस्था जीला आत्तापर्यंत विरोध केला तोच गुंडाळून आता याच नेहरूनीतीच्या पायाशी जावून बसावे अशी विचित्र भूमिका मान साहेबांना घ्यावी लागली आहे. जसे की शरद पवारांना चारच महिन्यांत सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाला असलेला विरोध गुंडाळून कॉंग्रेस सोबत सत्तेसाठी युती स्वीकारावी लागली होती.
1999 ला कॉंग्रेसशी सत्तेसाठी जवळीक केल्यानंतर आत्तापर्यंत कधीच राष्ट्रवादीला स्वत:च्या पायावर उभं राहता आलं नाही. तसेच आता भुपेंद्रसिंग मान यांच्या भारतीय किसान युनियनचे होवून बसेल. एकदा का नेहरूप्रणीत समाजवादी आर्थिक नियोजनाचे धोरण पत्करले की त्यात आधीपासून असलेल्या डाव्यांच्या पंगतीत जावून बसावे लागते. आणि ते मग तूम्हाला कधीच सरकारी जोखडातून बाहेर येवू देत नाहीत.
आता आंदोलनात बसलेले शेतकरी (जर ते शेतकरी असतील तर) जेंव्हा कधी उठून आपल्या गावात जातील तेंव्हा त्यांच्या लक्षात येईल की किमान हमी भावाप्रमाणे असणारी सरकारी खरेदी संपून गेली आहे आणि आता आपल्याला अपरिहार्यपणे त्याच अडत्यांचे खासगी खरेदीसाठी पाय धरावे लागतील. हे अडते आता अडून पाहणारच. कारण त्यांनीच या आंदोलनात प्रचंड पैसा ओतला होता. ते आता हा पैसा याच शेतकर्यांकडून वसूल करणार. कागदोपत्री एमएसपी प्रमाणे भाव दाखवून प्रत्यक्षात कमी भावाने त्यांच्याकडून ही गहू आणि तांदळाची खरेदी होणार. जशी की महाराष्ट्रात 2016-17 मध्ये तुरीची झाली होती.
भुपेंद्रसिंग मान यांचे नेतृत्व 1984 ला यामुळे झळाळून उठले होते की पंजाब अस्वस्थ असतानाही हजारो लाखो शेतकरी चंदीगढच्या राजभवनला घेराव घालून शांतपणे बसून त्यांनी आंदोलन यशस्वी करून दाखवले होते. तेंव्हाही गव्हाचे अतिरिक्त उत्पादन हाच विषय होता. 2008 सालीही खासगी व्यापार्यांना गव्हाची खरेदी करू द्या. सरकार पेक्षा आम्हाला बाहेरच जास्त भाव मिळतो हे सांगणारे हेच भुपेंद्रसिंग मान होते. कारण तेंव्हा त्यांच्या आंदोलनाला शरद जोशींच्या वैचारिक मांडणीचा भक्कम आधार होता. देशभरच्या शेतर्यांचा प्रचंड पाठिंबा या आंदोलनाला होता.
आज जे आंदोलन चालू आहे त्याला पंजाब शिवाय कुठल्याच राज्यातील शेतकर्यांचा पाठिंबा नाही. पंजाबातीलही काहीच शेतकरी आंदोलन करत आहेत. बहुतांश शेतकरी अजूनही आपल्या गावात शेतातच आहेत. अगदी प्रतिक म्हणून का असेना देशभर या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला नाही. ज्या राज्यांमध्ये एमएसपी नाही किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच अस्तित्वात नाही त्या राज्यांत तर आंदोलनाची साधी कुणकुणही नाही. मध्यप्रदेश आणि बिहारमधील शेतकर्यांनी या संधीचा फायदा घेवून सरकारी खरेदीत हमी भावाप्रमाणे आपला गहू विकून फायदा करून घेतला आहे. कारण सध्या जगभर गव्हाचे भाव पडलेले आहेत. उत्पन्न प्रचंड झालेले आहे. नेमके अशा काळात आंदोलन नको तेवढे ताणण्याची चुक पंजाबी शेतकर्यांनी केली आहे. आंदोलन कधी करावे, किती काळ करावे, कधी मागे घ्यावे याचेही एक तंत्र असते. शरद जोशी यांना हे तंत्र अतिशय चांगले समजत होते. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाना शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळायचा.
भुपेंद्रसिंग मान यांनी हा सगळा अनुभव घेतला होता. प्रत्यक्षात या आंदोलनातील ते बिनीचे शिपाई राहिले होते. महात्मा गांधींनी आपले सर्वोत्तम शिष्य म्हणून विनोबा भावेंना संबोधावे त्यांची वैयक्तिक सत्याग्रहासाठी निवड करावी आणि त्याच विनोबांनी आणिबाणी काळाला ‘अनुशासन पर्व’ म्हणूत मौन बाळगावे तसे भुपेंद्रसिंग मान यांचे होवून बसले आहे. चुक मान यांची नाही. शरद जोशी तुमचीच निवड चुकली. 1990 ला राज्यसभेवर तूम्ही दुसर्या कुणा सहकार्याचे नाव विश्वनाथ प्रताप सिंह यांना सुचवायचे होते. पंजाबात तूम्ही दुसरा कुणी सक्षम शेतकरी नेता सहकारी म्हणून निवडायचा होता. हे तूमचे मडके कच्चे निघाले. याचा तोटा पंजाबातील शेतकर्यांना होणार आहे.
-श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
Thursday, January 14, 2021
पैठणच्या नाथसागरावर सुचलेली कविता
Wednesday, January 13, 2021
कृषी आंदोलन- जोर का झटका धिरे से लगे
Tuesday, January 12, 2021
मराठवाड्यातील उपेक्षीत प्राचीन मंदिरे
दै. लोकमत 10 जानेवारी 2021 (वर्धापन दिन पुरवणी)
मराठवाड्यातील पर्यटनाचा शिल्पांचा प्राचीन वारश्याचा विषय समोर आला की अजिंठा वेरूळ बिबी का मकबरा इथपर्यंत विचार होतो आणि विषय संपून जातो. धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही नावं उच्चारली की मुद्दा संपून जातो. या शिवाय मराठवाड्यात चालूक्यांच्या यादवांच्या काळातील अप्रतिम अशी मंदिरे आहेत, त्यावरील शिल्पाविष्कार चकित करणारा आहे हे लक्षातच घेतले जात नाही.
पर्यटन, अभ्यास, स्थानिक सहलींसाठी स्थळे असा विचार केल्यास मराठवाड्यातील काही प्राचीन मंदिरांचा विचार अग्रक्रमाने झाला पाहिजे. (या ठिकाणी विषयाच्या जागेच्या मर्यादेमुळे केवळ मंदिरांचा विचार केला आहे. लेण्या, किल्ले, दर्गे, कबरी, मकबरे यांचा समावेश यात विस्तारभयास्तव नाही. हे विषय स्वतंत्रपणे मांडल्या गेले पाहिजेत.)
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई वडगांव, रहिमाबाद व पिशोर (सर्वांचा ता.सिल्लोड) येथील मंदिरे प्राचीन आहेत. तिन्ही ठिकाणी स्थानिक लोकांनी मंदिराचा जिर्णाद्धार केला आहे. शिवुर बंगला (ता. वैजापूर) येथे रावणेश्वराचे मंदिर आहे. परिसराचा विकासही केला आहे. पण याची माहिती बाहेरच्या पर्यटकांना अभ्यासकांना होत नाही. औरंगाबाद शहरात सातारा परिसरांत खंडोबा मंदिर आहे. पण त्याची ख्याती धार्मिक स्थळ इतकीच आहे. मराठेशाहीतील वास्तुशिल्पाचा हा एक उत्तम नमुना आहेे हे लक्षातच घेतले जात नाही. वेरूळला घृष्णेश्वर मंदिराच्या अगदी जवळ मुख्य रस्त्याला लागूनच अहिल्याबाईंनी बांधलेली अप्रतिम अशी बारव आहे. या बारवेत 8 छोटी मंदिरं आहेत. या ठिकाणी पर्यटक भेट देत नाहीत.
पैठणला सातवाहन कालीन स्तंभ हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मानाचे पान आहे. त्या परिसरांचा विकास पुरातत्त्व खात्याकडून करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पर्यटक पोचत नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यातील या मंदिरांसोबतच पैठणच्या गोदावरी काठचे घाट मोठे सुंदर आहे. या घाटांवर विविध उत्सव प्रसंगी दिव्यांची आरास करून पर्यटकांना इथे आकर्षित करून घेता येवू शकते.
जालना : भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील महादेव मंदिर 12 व्या शतकातील अतिशय उत्कृष्ठ असा स्थापत्य अविष्कार आहे. या मंदिरावरील विष्णुच्या शक्तिरूपातील मुर्ती भारतभरच्या अभ्यासकांचे आकर्षण ठरलेल्या आहेत. अतिशय भव्य आणि उंच पीठावर हे मंदिर स्थापित आहे. पुरातत्त्व खात्याने मंदिराचा जिर्णाद्धार चांगल्या पद्धतीने केला आहे. पण तिथपर्यंत जाताना कुठलाही माहिती फलक उभारलेला नाही. मंदिराच्या भोवताली बकाल वस्ती आहे. ग्रामस्वच्छता अभियानात या परिसराची स्वच्छता का झाली नाही हे कळत नाही.
अंबड तालुक्यात जामखेड येथील खडकेश्वर मंदिर हे अतिशय एक महत्त्वाचे प्राचीन मंदिर. गावकर्यांनी चांगल्या पद्धतीने याचा जिर्णाद्धार केला आहे. अंबड शहरातील मत्सोदरी मंदिर सर्वपरिचित आहे. पण याच शहरांत अहिल्याबाईंच्या काळातील सुंदर पुष्करणी बारव आहे. त्यात एक शिवमंदिरही आहे. या परिसराचा नगर पालिकेच्या वतीने विकासही करण्यात आला आहे. पण तिथपर्यंत पोचणारा रस्ता, बाहेरच्या परिसरांतील आक्रमणे, नाला यांनी हे ठिकाण दूर्लक्षित राहिले आहे. अंबड शहरांतच खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम आजही संपूर्ण शाबूत उत्तम अवस्थेत आहे.
अंबड तालुक्यातच चिंचखेड येथील खंडोबा मंदिरही प्राचीन काळातील आहे. या परिसराची स्वच्छता आणि डागडुजी गावकर्यांनी उत्तम केली आहे. मंठा तालुक्यात हेलस येथे प्राचीन मंदिर आहे.
उस्मानाबाद : भूम तालुक्यातील प्राचीन माणकेश्वर मंदिर महाराष्ट्रातील मोजक्या अप्रतिम मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरांवरी शिल्पे अभ्यासकांना कायम आकर्षित करत आलेली आहेत. सात द्वारशाखा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर. चालुक्यांच्या काळातील अतिशय उत्कृष्ठ अशा कोरीव कामांनी येथील स्तंभ सजलेले आहेत.
उमरगा येथील शिव मंदिर अतिशय चांगल्या स्वरूपात आहे. स्थानिकांची मंदिराचा जिर्णाद्धार केलेला असून परिसरही उत्कृष्ठ राखला आहे.
लातुर : निलंगा येथील शिवमंदिर आणि पानगांव येथील विठ्ठल मंदिर ही दोन मंदिरे लातुर जिल्ह्यातील प्राचीन मंदिरांपैकी सगळ्यात सुस्थितीत असलेली मंदिरे आहेत. निलंगा मंदिरातील हरगौरीचे शिल्प अप्रतिम आहे. मंदिरावरील भैरव शिल्पे किंवा केवल शिवाची शिल्पे विशेष आहेत.
पानगावच्या विठ्ठल मंदिराकडे खुपसे दुर्लक्ष पर्यटकांकडून झाले आहे. या मंदिर परिसराचा विकास, तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता याचा विचार झाला पाहिजे. हे मराठवाड्यातील प्राचीन काळातील महत्त्वाचे मंदिर आहे.
नांदेड : होट्टल (जि. देगलुर) हे आख्खे गावच शिल्पांनी समृद्ध असे गांव आहे. मंदिरांचे गाव म्हणूनच या परिसराची ओळख आहे. दोन मंदिरांचा जिर्णाद्धार झालेला आहे. आता उर्वरीत मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार होणे गरजेचे आहे. होट्टलच्या मंदिरावरील नृत्य गणेशाची मृर्ती आणि येथील सुरसुंदरींच्या मृर्ती विशेष आहेत.
1. पुरातत्त्व खात्यातर्फे त्यांच्या अखत्यारीतील पुरातत्त्वीय स्थळांचा विकास केला जावू शकतो. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.
2. सामाजिक कृतज्ञता निधी (सी.एस.आर.) या माध्यमांतून काही निधी इतर स्थळांसाठी वापरला जावू शकतो. मराठवाड्यातील औद्योगीक क्षेत्रात काम करणार्या संघटना व्यक्ती आस्थापना यांनी यात लक्ष घालून आपल्या निधीतील काही रक्कम या कामासाठी वळवली पाहिजे.
3. स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करूनही काही कामं होवू शकतात. हतनुर (ता.सेलू जि. परभणी) येथील ग्रामस्थांनी आपल्या परिसरांतील शेतमालाच्या विक्रीतून 1 कोटी इतकी विक्रमी रक्कम पाच वर्षांत गोळा केली. गावातील प्राचीन शिव मंदिर आणि बारव यांची दुरूस्ती केली. जवळच मंगल कार्यालय उभारले. हा एक आदर्श या परिसरांतील लोकांनी उचलला पाहिजे.
या लेखात केवळ मंदिरांचा विचार केला आहे. पण किल्ले, दर्गे, मकबरे, कबरी यांचा विचार केल्यास किमान 50 स्थळे अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने पर्यटकांसाठी म्हणून सहज विकसित करता येवू शकतात. त्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. याच परिसरांत प्राचीन वाडे आहेत. त्यांची डागडुजी करून पर्यटकांना राहण्याची पण वेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी व्यवस्था करता येवू शकते. उंडणगांव (ता.सिल्लोड जि. औरंगाबाद) अशी चाचपणी आम्ही केली आहे. परदेशी पर्यटक येथे राहून गेले आहेत. शाश्वत पर्यटनाचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे.
मराठवाड्यात प्राचीन वारसा जतन व संवर्धनाची चळवळ आता सुरू झाली आहे. त्याला सगळ्यांनी मिळून गती देण्याची गरज आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575