Sunday, December 13, 2020
औरंगाबाद डोंगरमाथ्यावरच्या बाभळीची कविता...
Thursday, December 10, 2020
कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरेगांव शहिदांचे स्मरण
बरोबर 34 वर्षांपूर्वी म्हणजेच 10 डिसेंबर 1986 रोजी कापसाच्या आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. हिंगोली जिल्ह्यातील सुरेगांव पाटी येथे तीन शेतकरी या गोळीबारात शहिद झाले.
आज नेमके असेच शेतकरी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर आंदोलन करत बसून आहेत. आज तरी सरकार शेतकर्यांशी बोलणी करत आहे. तेंव्हा कसलीच बोलणी करायला सरकार तयार नव्हते. शेतकर्यांची काय मागणी होती? कापुस एकाधिकार योजनेत शेतकर्याची लूट होत होती. कापसाला भाव वाढून मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कापसाला चांगली किंमत मिळत होती आणि इकडे भारत सरकार मात्र आपल्याच शेतकर्यांचे शोषण करत होते.
आज जे डावे समाजवादी पर्यावरणवादी बुद्धीजीवी सरकारी हस्तक्षेप सरकारी खरेदी यांचे जोरदार समर्थन करत आहेत, एमएसपी प्रमाणे सर्वच खरेदी व्हावी असा आग्रह धरत आहेत त्यांनी याचे उत्तर द्यावे की 34 वर्षांपूर्वी सर्व काही सरकारी असताना हेच शेतकरी आंदोलन का करत होते?
आज जे शेतकरी आंदोलन करत आहेत ते गहू आणि तांदूळ ही पीके घेणारे आहेत. ही पीकं बागायती आहेत म्हणजेच पाण्यावर येणारी पीके आहेत. तेंव्हा जे शेतकरी आंदोलन करत होते ते कापसाचे म्हणजेच कोरडवाहू पीकाचे होते. मग हे डावे ज्यांना बडे शेतकरी बागायतदार शेतकरी म्हणून हिणवायचे त्यांचा उपहास करायचे त्यांच्या आंदोलनाला हे पाठिंबा कसा काय देत आहेत? आणि बरोबर 34 वर्षांपूर्वी जे कोरडवाहू पीकांच्या आंदोलनात रस्त्यावर उतरले होते त्या शेतकर्यांना यांचा विरोध कसा काय होता?
10 डिसेंबर 1986 ही तारीख महाराष्ट्रात अजून एका कारणाने लक्षात ठेवेल. आज जे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत त्यात कोण कोणते पक्ष आहेत? सगळ्यात प्रमुख आहे राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष. याच पक्षाचे 1986 ला पंतप्रधान होते राजीव गांधी. राजीव गांधी यांच्या कृत्रिम धाग्यांना पाठिंबा देण्याच्या धोरणाने कापसाची माती केली होती. याच पक्षाचे मुख्यमंत्री होते मा. ना. शंकरराव चव्हाण. त्यांचेच सुपुत्र माजी मुख्यमंत्री आणि आजचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड जवळच हे आंदोलन तेंव्हा झाले होते. या शेतकर्यांना गोळीबार करण्याचा आदेश देणारे शंकरराव चव्हाणच होते.
अजून एक नाव या संबंधात लक्षात घ्यावे लागेल. देशाचे सलग सर्वात जास्त काळ कृषी मंत्री राहिलेले मा. शरद पवार हे तेंव्हा समाजवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते होते. याच वर्षी म्हणजेच 1986 ला एकीकडे कापूस शेतकर्यांचे आंदोलन पेट घेत होते त्याच काळात अगदी त्याच वेळी नोव्हेंबर महिन्यात याच परिसरांत औरंगाबाद शहरात आमखास मैदानावर मोठा मेळावा भरला होता. हा मेळावा म्हणजे मा. शरद पवार यांचा कॉंग्रेस पक्षातील प्रवेश सोहळा होता. त्याला पंतप्रधान राजीव गांधी आणि जम्मु कश्मिरचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रिय मंत्री आणि आताचे गुपकार गटाचे प्रमुख मा. फारुख अब्दूला हजर होते. एकीकडे शेतकरी कापसाच्या आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला होता. तीन शेतकरी भाउ पोलिसांच्या गोळीबाराला बळी पडले होते. त्या रक्ताने माखलेल्या भूमीवर आज आंदोलनाचे समर्थन करणारे आपले राजकारण सार्थ करत होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मा. शरद पवार आणि कॉंग्रेसचे सर्वच नेते यांना कुणीतरी पत्रकाराने हा प्रश्न विचारायला पाहिजे होता की 34 वर्षांपूर्वी कोरडवाहू कापुस शेतकर्यांच्या आंदोलनाला तूम्ही का विरोध केला होता? आणि आजच्या बागायती पीकांच्या शेतकर्यांच्या आंदोलनाला का पाठिंबा देत आहात? तेंव्हा सरकारी खरेदी च्या विरोधात शेतकर्यांत असंतोष होता. आज या जोखडातून शेतकरी मोकळा होउ पहात आहेत. कृषी कायद्याने शेतकर्याच्या स्वातंत्र्याच्या दिशेने पाउल उचलले आहे. ते पाउल मागे घ्या म्हणून डावे आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रचाराला पंजाबातील काही शेतकरी बळी पडले आहेत. यांना हे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाले कोणत्या तोंडाने पाठिंबा देत आहेत?
शेतकरी संघटनेने 1980 पासून शेतकरी स्वातंत्र्याची मागणी केली. कुठलाही वैचारिक गोंधळ न ठेवता अतिशय स्पष्टपणे सरकारी हस्तक्षेप उठवून लावण्याची मागणी लावून धरली. आजचे शेतकरी आंदोलन नेमक्या त्याच्या उलट सरकारने किमान हमी भाव देवून खरेदी करावी असा आग्रह धरत आहेत. कालची मागणी आमची सुटका करा, तूम्हाला सुटका करता येत नसेल तर बाजूला व्हा आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवतो. पिंजर्याचे दार उघडा नसता आम्ही पिंजरा तोडतो अशी होती. फक्त तूम्ही पिंजर्याला बाहेरून कुलूप लावू नका. अशी होती.
आजची मागणी मात्र पिंजरा चांगला कसा करा, त्याला रंग कसा द्या इतकंच नाही तर पिंजरा सोन्याचा करा, पेरूच रोज न देता डाळिंबाचे दाणे द्या, फळांमध्ये विविधता कशी येवू द्या, पिंजरा कधी घरात कधी गॅलरीत कधी बागेत नेवून कसा ठेवा अशी आहे. चुकूनही पिंजर्याचे दार उघडा अशी मागणी नाही.
कोरडवाहू पिकासाठी आंदोलन करताना आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणत शेतकरी शहिद झाले. आणि याच्या उलट आज बागायती पिकाचे, मोठ्या प्रमाणात संरक्षण असलेले, सरकारी खरेदीची कवच कुंडले लाभलेले पंजाबातील शेतकरीही सरकारच्या गळ्यात पडून आम्हाला वाचवा म्हणून गळा काढत आहेत.
कालपर्यंत शेतकर्याच्या विरोधात उभे असलेले मेधा पाटकर, योगेंद्र यादव आणि सगळेच पर्यावरणवादी समाजवादी डावे आज शेतकर्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसून येत आहेत. यातूनच या आंदोलनाचे वैचारिक पितळ उघड पडताना दिसत आहे.
निवृत्ती कर्हाळे, परसराम कर्हाळे आणि ग्यानदेव टोंपे या शेतकर्यांचे बळी सरकारी हस्तक्षेपाच्या धोरणाने घेतले. त्यांचे आत्मे आज स्वर्गात हळहळत असतील की आज पंजाबचे शेतकरी आपल्या मागणीच्या नेमक्या उलट्या मागणीसाठी आंदोलन करताना दिसत आहेत.
दोन दिवसांनी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी युगात्मा शरद जोशी यांची पुण्यतिथी आहे. त्यांनी शेतकर्याला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. सरकारी पिंजरा तोडायची दिशा दाखवली. त्यांच्या या खडतर मार्गावर चालताना 23 शेतकरी भाउ शहिद झाले. शेतकरी आंदोलनातील 23 हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेला लाल रंगाचा बिल्ला शेतकरी विचाराचा पाईक सतत आपल्या छातीवर अभिमानाने लावत असतो. तेंव्हा या सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, शरद जोशींना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यासाठी आपण सर्व शेतकरी स्वातंत्र्याची शपथ घेवू या. आताच्या भीकमाग्या शेतकरी आंदोलनाचा संपूर्ण पराभव होईल यासाठी प्रयत्न करू या.
कृषी कायद्याने शेतकरी स्वातंत्र्याची पहाट होताना दिसत आहेत. आपण त्याचे स्वागत करू.
यूं खूं की महक है के लबे यार की खुशबू
किस राह की जानिब से सबा आती है देखो!
गुलशन मे बहार आई के जिंदा हुवा आबाद?
किस सिम्त से नग्मों की सदा आती है देखो !
(हा रक्ताचा दरवळ आहे की प्रियेच्या ओठांचा सुगंध? हा पूर्वेकडून येणार्या पहाटवारा कोणत्या वाटेने येत आहे ते पहा. वसंत ऋतु फुलला आहे की तुरूंग गजबजला आहे. कोणत्या दिशेने गाण्याचे स्वर ऐकू येत आहेत- सुरेश भट यांनी आपल्या एल्गार कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत या ओळींचा उल्लेख केला आहे.)
शेतकरी आंदोलनातील सर्व शहिदांना आणि मा. शरद जोशी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
शेतकरी स्वातंत्र्याचा विजय असो! इडा पीडा टळणार आहे बळीचे राज येणार आहे !!
(छायाचित्रातील शहिदांचे पुतळे गावकर्यांनी पै पै गोळा करून पदरचे पैसे खर्चूृन खासगी देणगी मिळालेल्या जमिनीवर उभारले आहेत. सरकारी जमिनीवर नेत्यांची स्मारकं सरकारी खर्चाने उभे करणार्यांनी याची नोंद घ्यावी. या शेतकरी भावांची माय बहिणींची नियत साफ आहे. हीच शेतकरी चळवळीची शरद जोशींची पुण्याई आहे.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
Wednesday, December 9, 2020
मूर्ती मालिका - १५
येरगी येथील काळम्मा
Tuesday, December 8, 2020
गर्द हिरवाईत सुचलेली कविता ...
Monday, December 7, 2020
मूर्ती मालिका -१४
Sunday, December 6, 2020
मराठी लेखक शेती स्वातंत्र्याच्या विरोधात
दिल्लीत चालू असलेल्या पंजाबातील शेतकर्यांच्या आंदोलनास मराठी लेखकांनी पाठिंबा जाहिर केला आहे. समाज माध्यमांत आणि प्रस्थापित वर्तमानपत्रादी माध्यमांतून तशा बातम्या झळकल्या आहेत.
मुळात सध्या चालू असलेले शेती आंदोलन जरा बाजूला ठेवू. महाराष्ट्रात 40 वर्षांपूर्वी शरद जोशींनी शेतकरी आंदोलनाची मुहर्तमेढ रोवली. हे सर्व मराठी लेखक तेंव्हा या चळवळीशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधीत होते. केवळ आंदोलन उभं केलं असे नव्हे तर शेती प्रश्नाची साधार सविस्तर अर्थशास्त्रीय मांडणी शरद जोशींनी करून दाखवली. दोन चार वर्षांतच म्हणजे 1982 पासून पंजाब आणि इतर प्रदेशांत शरद जोशी यांच्या आंदोलनाचा वैचारिक दबदबा पसरला. उत्तर प्रदेशात महेंद्रसिंह टिकैत किंवा कर्नाटकांत नंजूडा स्वामी यांनी उभारलेल्या आंदोलनास कधीच वैचारिक आधार नव्हता. उलट शरद जोशी यांच्या मांडणीला भारतभरांतून पाठिंबा मिळत गेला.
हे सर्व मराठी लेखक ज्यांच्या प्रदेशांतील एक शेतकरी नेता किंबहुना शेती प्रश्नाची मांडणी करणारा विचारवंत अनुभवत होते. त्याचे लिखाण वाचत होते. बंगाली लेखकांच्या कादंबर्यांत 1985 पासूनच शरद जोशी यांची मांडणी आणि आंदोलनाची दखल यायला सुरवात झाली होती (तिस्तेकाठचा वृत्तांत). खुद्द या लेखकांनीही त्या काळात आपल्या कथा कविता कादंबर्यांत शेतकरी आंदोलनाची वैचारिक मांडणी कलात्मक पद्धतीने मांडली होती. आज पत्रक काढणार्या पाच प्रातिनिधीक लेखकांच्या कलाकृतींचेच उदाहरण आपण येथे पाहूया.
पहिला लेखक आहे इंद्रजीत भालेराव. त्यांच्या ‘काबाडाचे धनी’ या दीर्घकाव्यात आडतीवर कापूस विक्रिचे वर्णन आलेले आहे. कापसाला न मिळालेल्या भावाची वेदना त्यांनी शब्दांत मांडली आहे. ती वाचून शरद जोशींनी असे लिहीले की ‘शंभर भाषणं करून आकडेवारी मांडून जे सांगता येणार नाही ते इंद्रजीतने चार ओळीत मांडले आहे.’
भावामधी काट्यामधी पस्तोरीत उणीपूरी
ज्यानं त्यानं जिथं तिथं देल्या हातावर तुरी
पट्टी घेवून येतानी त्याचा उतरला नूर
जनू वाहून गेलाय उभ्या झाडावून पूर
कापसाची सरकारी खरेदी व्यवस्था आपल्या बापाला लुटते हे लिहीणारे इंद्रजीत भालेराव आज शेतकर्यांच्या गळ्या भोवती सरकारी धोरणाचा पाश आवळणारी मागणी करणार्या आंदोलनास पाठिंबा का देत आहेत? ही कापुस एकाधिकार योजना कधीच कापसाला पुरेसा भाव देवू शकलेली नाही हा त्यांच्या आजूबाजूचा अनुभव नाही का? परभणी आणि परिसरांतील सर्व प्रदेश काळ्या मातीचा म्हणजेच कापसाचा प्रदेश आहे.
दुसरे लेखक कवी अकोल्याचे नारायण कुलकर्णी कवठेकर यांनी आपल्या ‘मागील पानावरून पुढे चालू’ या कविता संग्रहात अशी ओळ लिहीली आहे
अस्मानीतून सुटशील
तर सुलतानीत अडकशील
टाकांच्या निभांनी
तूझी कणसं खुडतील
म्हणजे सरकारी धोरण शेतकर्याला मारते याची पूर्ण कल्पना नारायण कुलकर्णी कवठेकर यांना आहे. शरद जोशी ‘सरकार समस्या क्या सुलझाये सरकार खुद समस्या आहे’ ही घोषणा आधीपासून देत आले होते. इतकंच नाही तर ‘शेतकर्याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशीही मांडणी करत होते याचीही कल्पना अनुभव या मराठी लेखकांना येत होता आणि त्याचे त्यांच्या साहित्यकृतीत प्रतिबिंब दिसून येते.
या पत्रकावर सही करणारे कथाकार भास्कर चंदनशीव यांनीही आपल्या ‘लाल चिखल’ या कथेत भाव न मिळाल्याने टमाटे रस्त्यावर ओतून परतणार्या शेतकर्याचे दु:ख मांडले होते. म्हणजे कृषी उत्पन्न बाजार व्यवस्था आपल्या बळीराजाला न्याय देवू शकत नाही याची पूर्ण कल्पना भास्कर चंदनशीव यांना होती.
राजन गवस यांनी आपल्या अकादमी पुरस्कारप्राप्त ‘तणकट’ कादंबरीत गावातील पतपेढीचे राजकारण रंगवताना डबकं बनलेल्या गावगाड्यातील अर्थप्रवाहाचे वर्णन केले आहे. ही सहकारी सरकार आश्रीत व्यवस्था बळीराजावर अन्याय करते हे नीट माहित आहे.
आसाराम लोमटे यांच्या इडा पीडा टळो या कथासंग्रहात भर दिवाळीत बलीप्रतिपदा म्हणजे शेतकरी विरोधी सण आहे तेंव्हा तो साजरा करायचा नाही या शेतकरी संघटनेच्या मांडणीचा पाठपुरावा करणार्या महिलेची कथा आहे. कथा वाङमयीन दृष्ट्या अतिशय दर्जेदार आहे. वर्षोनुवर्षे सत्ताधारी मग ते कुठल्याही काळातील कसे असो शेतकर्याला लुटतात हे सत्य कलात्मक रित्या मांडता येते. मग त्याच आसाराम लोमटे यांना आजचे सरकारी धोरण पोषक आंदोलन शेतकर्यांच्या हिताचे कसे काय वाटते?
हे जर यांच्या कलाकृतीतून स्पष्टपणे दिसून येते तर मग आता यांची नेमकी भूमिका बदलण्याचे कारण काय? आताचे शेतकरी आंदोलन हे पूर्णत: डाव्यांच्या प्रभावातील मागण्या पुढे करत आहे. सरकारशाही बळकट करत आहे. शेतकर्या हाती वाडगा घेवून भीकवादी बनवत आहे. सरकारी खाटीकखान्याकडे शेतीप्रश्नाची गाय घेवून जात आहे. मग हे मराठी लेखक त्या गायीच्या गळ्यात हार घालण्यासाठी, तिला कुंकूम तिलक लावण्यासाठी, पुरणाचा गोग्रास भरविण्यासाठी पुढे का निघाले आहेत?
शेतकर्यांचे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयास होतो आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. असे या लेखकांनी म्हटले आहे. कुठलेच आंदोलन दडपून टाकू नये. त्यावर वाद करण्याचे कारणच नाही. पण या शेतकर्यांनी त्यांच्या मागण्याासाठी अवैध पद्धतीने रस्ता अडवून ठेवावा याचे समर्थन ही लेखक मंडळी का करत आहेत? सर्वोच्च न्यायालयाने शाहिनबाग प्रकरणांत आंदोलन करताना इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे हे यांना माहित नाही का? का हे सर्व लेखक न्यायालयाच्या विरोधात जाणार आहेत?
शरद जोशींनी केलेले सर्व लिखाण मराठीतून उपलब्ध आहे. त्यात विविध आकडेवारीही वेळोवेळीची दिलेली आहे. सरकारी पातळीवर विश्वनाथ प्रतापसिंह आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील दोन अहवाल उपलब्ध आहेत. आणि तरीही हे काहीच न वाचता ही लेखक मंडळी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. ही कमाल आहे.
आसाराम लोमटे यांनी आजच (रविवार 6 डिसेंबर 2020) लोकसत्तामध्ये ‘भूमी आणि भूमिका’ असा लेख लिहीला आहे. संपूर्ण लेखात एकाही ठिकाणी या कायद्यांतील शेतकर्यांवर अन्याय करणारे कलम कोणते? हे सांगितलेले नाही. नेमका विरोध कोणत्या कारणासाठी पंजाबचे शेतकरी करीत आहेत याचाही उल्लेख लोमटे करत नाहीत. याला काय म्हणावे?
डंकेल प्रस्तावाच्या वेळी पंतप्रधान नरसिंहराव आणि अर्थमंत्री मनमोहनसिंग यांना असाच कडवा विरोध समाजवादी चळवळीच्या प्रभावातील शेतकरी नेत्यांनी केला होता. तेंव्हाही काही लेखक त्याला बळी पडले होते.
शेतकर्याचा पोरगा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर अधिकारी बनून गेला की धोरणाच्या केसाने बापाचा गळा कापायला कमी करत नाही असे शरद जोशींनी लिहून ठेवले होते. तसेच आज शेतकर्याचा पोरगा लेखक झाला की बापाचा गळा आवळणारी धोरणं राबविण्यासाठी आग्रह धरणार्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याशिवाय रहात नाही असेच दूर्दैवाने म्हणावे लागेल. शरद जोशींनी शेतकर्यांच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले. तशी संपूर्ण वैचारिक मांडणी करून ठेवली. आणि त्याच शरद जोशींच्या प्रदेशातील त्यांच्याच मराठी भाषेत लिहीणारे लेखक याच शेतकर्यांला भीकारी बनविणार्या आंदोलनाची पालखी वहात आहेत.
शेतकर्यांसाठी संपूर्ण स्वातंत्र्याची अतिशय स्वच्छ मागणी शरद जोशींनी केलेली होती. बाजार स्वातंत्र्य, तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि शेतीविरोधी कायद्यांपासून मुक्ती या त्रिसुत्रीशिवाय शेतकर्यांचे भले होणे शक्य नाही. हे जर मराठी लेखकांना समजूनच घ्यायचे नसेल तर त्यांना समजावून सांगणे मुश्किल आहे.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, 9422878575
Saturday, December 5, 2020
डोंगरमाथा बाभुळझाड । होतच नाही नजरेआड ॥
उरूस, 1 डिसेंबर 2020
औरंगाबाद शहराला टेकड्यांनी वेढलेले आहे. दक्षिणेकडच्या म्हणजेच सातारा परिसरांतल टेकडीवर एक सुरेख झाड आहे. टेकडीवरील हे एकटेच झाड कुठूनही उठून दिसते. ही टेकडी ‘वन ट्री हील’ म्हणूनच ओळखली जाते. हे झाड जवळून पाहण्याची फार दिवसांची इच्छा होती.
पर्यावरणप्रेमी तरूणांच्या एका गटाने पावसाळ्यात तिथे वृक्षारोपण केले. दोन तीन दिवांपूर्वी वणव्यात ही सर्व झाडे होरपळली. जी वाचू शकतील अशा झाडांना पाणी देवू या, त्यांच्या मुळाशी पाण्याच्या बाटल्या ठेवून ठिबकच्या माध्यमातून तेथे ओल जपली जाईल. या झाडांना वाचविण्यासाठी आज शनिवार 5 डिसेंबर 2020 रोजी पहाटे सुर्योदय होताना उत्साही तरूण तरूणींच्या गटासोबत मी या टेकडीवर पोचलो.
ज्या झाडाला जवळून पहायची ईच्छा होती ते दृष्टीपथास पडल्यावर आश्चर्य वाटलं, आनंद झाला. आश्चर्य यासाठी की बाकी काहीच त्या बोडक्या डोंगरावर टिकू शकले नाही पण हे झाड मात्र तग धरून चिवटपणे टिकून आहे. आणि आनंद यासाठी की हे तर एक साधं आपलं गावठी बाभळीचे झाड आहे. नेहमी आढळणारी अशी ही आपल्या जवळची बाभूळ इथे इतक्या उंचावर औरंगाबाद शहराच्या माथ्यावर अभिमानाने तुर्यासारखी डौलात उभी आहे.
झाडांना पाणी द्यायचे काम थोडावेळ करून नविन आलेल्या उत्साही गटाच्या हाती सोपवले आणि झाडाजवळ येवून बसलो. कधीपासून हे झाड आपल्याकडे खेचून घेत होतं. गर्द हिरवी पाने, त्यावरची पिवळी सुंदर फुले, काळे अस्सल भक्कम खोड मला बापटांची कविता आठवली
अस्सल लाकुड भक्कम गांठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात बाभुळझाड उभेच आहे
देहा फुटले बारा फांटे
अंगावरचे पिकले कांटे
आभाळात खुपसून बोटे बाभुळझाड उभेच आहे
अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली बाभुळझाड उभेच आहे
बापटांच्या कवितेत या झाडाचा टणकपणा स्पष्टपणे आला आहे. इथे बाकी कुठलेच झाड टिक़ले नाही. आहेत ती झुडूपे. नविन लावलेली झाडे जगविण्यासाठी पर्यावरणप्रेमी धडपडत आहेत.
बापटांच्या कवितेपेक्षा काहीतरी अजून वेगळे या झाडात आहे असे मला वाटले. भोवती फिरून पाहताना झाडावर पडलेले कोवळे ऊन, पिवळ्या फुलांची आकर्षक झळाळी, काळ्या फांद्यांच्या जाळीतून पलीकडे दिसणारे शहराचे सुंदर चित्र हे मला ‘माथ्यावरची हळद विटली’ या ओळीशी विसंगत वाटायला लागले.
मार्गशीर्षातली पहाट आहे. शिसवी शिल्पासारखे खोड, कोवळ्या उन्हात पिवळ्या फुलांची झळाळी उठून दिसते आहे, फांद्यांच्या जाळीतून पलीकडचे शहर खुप सुंदर दिसते आहे. मला इंदिरा संतांची कविता आठवली. हे झाडही इंदिरा संतांच्या कवितेतील बाभळीसारखे गावाबाहेर एकटे उभे आहे. त्यांनी बांधावर म्हटले इथे हे डोंगरावर आहे.
लवलव हिरवी गार पालवी
काट्यांशी वर मोहक जाळी
घमघम करती लोलक पिवळे
फांदी तर काळोखी काळी
झिलमिल करती शेंगा नाजूक
वेलांटीची वळणे वळणे
या सार्यांतून झिरमिर झरती
रंग नभाचे लोभसवाणे
अंगावरती खेळवी राघू
लाघट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होउनिया मन
रमते तेथे सांज सकाळी
संध्याकाळी येते परतून
लेउन हिरवे नाजुक लेणे
अंगावरती माखुन अवघ्या
धुंद सुवासिक पिवळे उटणे
कुसर कलाकृती अशी बाभळी
तिला न ठावी नागररीती
दूर कुठेतरी बांधावरती
झुकुन जराशी उभी एकटी
औरंगाबाद शहराचा मानाचा तुरा असणारी अशी बाभळी. ही टेकडी म्हणजे बाभुळ टेकडी असेच म्हणायला पाहिजे. जशी गोगाबाबा टेकडी आहे, हनुमान टेकडी आहे तशीच ही बाभुळ टेकडी. हे झाड नजरेआड होताच नव्हते. म्हणून मला ओळ सुचली "डोंगरमाथा बाभूळ झाड | होताच नाही नजरेआड ||"
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575