उरूस, 21 सप्टेंबर 2020
माजलगांव शहराच्या पश्चिमेला अगदी लागूनच केसापुरी गावात उत्तर बाजूला तळ्याच्या काठी शिवारात जीर्ण मंदिराचे अवशेष दिसून येतात. हे मंदिर आहे अकराव्या शतकांतील एकेकाळी शिल्पसौंदर्यदृष्ट्या अप्रतिम असे प्राचीन केशव मंदिर. मंदिरापर्यंत जाण्यासाठी साधा रस्ताही आता शिल्लक नाही. जंगली झाडोर्याने परिसर वेढला गेला आहे. गुप्तधनाच्या मोहात मंदिरात खोदाखोद केल्याने कोरीव दगडी चिरे ढासळले आहेत.
मंदिराचा मुख्य मंडप अजून बर्यापैकी शिल्लक आहे. मंडपाच्या छताला चौरसाकृती चौंकटीत कोरीव दगडांत नरसिंहाची मुर्ती कोरलेली आहे. त्याच्या बाजूलाच शिव गणेश कार्तिकेय यांच्या मुर्ती आहेत.
मंदिराच्या बाह्य अंगावर अतिशय सुंदर अशा सुरसुंदरिंच्या मुर्ती होत्या. त्यातील दोन अजूनही शिल्लक आहेत. इतरत्रही कुठे परिसरांत शोध घेतल्यास या मुर्ती विखुरलेल्या मातीत आढळून येतीलही. मंदिराचे कोरीव खांब सुंदर आहेत. सध्या शिल्लक जे खांब आहेत त्यांच्यावरची नक्षी उत्तम अवस्थेत आहे. गाभारा पूर्णत: ढासळलेला आहे.
बाराव्या शतकात मंदिर शैली विकसित होवून त्रिदल पद्धतीची (तीन गाभारे असलेली) मंदिरे बांधली गेली. लक्षणीय अशी सहा मंदिरे मराठवाड्यात आहेत. केशव मंदिर हे त्यातीलच एक.
या मंदिरात विष्णुची अतिशय देखणी अशी मूर्ती होती. दीडएकशे वर्षांपूर्वी ही मुर्ती गुराख्यांना सापडली. मुर्ती आता गावातील केशवराज मंदिरात विराजमान आहे. हे मंदिरही अहिल्याबाईंच्या काळातील उत्तम दगडी बांधणीचे भक्कम कमानींचे असे आहे. मुळ मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखा उचलून इथे नव्याने दरवाजाला लावण्यात आल्या आहेत. मुळ मंदिराचे खांबही काही नविन मंदिरात बसवण्यात आले आहेत. ब्रह्मदेवाचीही एक अतिशय सुरेख मुर्ती विष्णुच्या मुर्तीशेजारीच ठेवण्यात आली आहे.
महादेव मंदिराच्या गाभार्याबाहेर गोमुख असते. त्यातून अभिषेकाचे पाणी बाहेर येते. त्याप्रमाणे विष्णुचे जे अवतार आहेत त्या मंदिरांच्या गाभार्यांतून पाणी बाहेर जाण्यासाठी मकर प्रणाली कोरल्या जातात. केसापुरीच्या मंदिराला अतिशय देखणी अशी मकर प्रणाली आहे. ही आता नविन मंदिरात प्रवेशद्वाराजवळच्या ओट्याला बसवली आहे.
आज केसापुरीचे मुळ केशव मंदिर अतिशय वाईट अवस्थेत आहे. स्थानिक प्रशासनातील लोकप्रतिनिधींनी या परिसरांची दुरूस्ती करण्याची तयारी दर्शविली आहे. नविन मंदिराच्या विश्वस्तांनी सर्व सहकार्य करण्यास हात पुढे केला आहे.
आता गरज आहे इतिहासप्रेमी, पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक/ विद्यार्थी यांनी पुढे येवून या मंदिराचा जिर्णाद्धार कसा होवू शकतो यासाठी प्रयत्न करण्याची. अशा मंदिरांचा जिर्णाद्धार शास्त्रशुद्ध पद्धतीने होट्टल येथे करण्यात आला आहे. ते एक अतिशय चांगले उदाहरण समोर आहे. विदर्भातील मार्कंडा मंदिराचा जिर्णाद्धार अशाच पद्धतीनं पुरातत्त्व खात्याच्या वतीने चालू आहे. सर्वच कामे पुरातत्त्व विभागाकडून होतील असे नाही. होट्टलचे काम इंटॅक या संस्थेने केले आहे. आता केसापुरीच्या कामासाठी इतर संस्था व्यक्तींनी पुढाकार घ्यावा.
गोदावरी खोर्यात विष्णुमुर्ती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मंदिरे पडली आणि मुर्ती मात्र शिल्लक असाही प्रकार दिसून येतो. गोदावरीला काठावरच पार्थपुरी येथे भगवान पुरूषोत्तमाचे म्हणजेच विष्णुचे मंदिर आहे. आता अधिक मासात तिथे मोठी जत्रा भरते. सध्या कोरोनामुळे हे मंदिर बंद आहे.
महाविष्णु शेळगांव (ता. सोनपेठ, जि. परभणी) हे गांवच विष्णुमंदिरामुळे ओळखले जाते. धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिर अकराव्या शतकांतील अतिशय महत्त्वाचे असे मंदिर आहे. या मंदिरात पूर्वी असलेली विष्णुमूर्ती आता गावातच दुसर्या मंदिरात विराजमान आहे. सेलू जवळ ढेंगळी पिंपळगांव येथेही हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. आश्वर्य म्हणजे गावातच दुसर्या मंदिरात बालाजीची अशीच प्राचीन देखणी मुर्ती आहे. परभणीला वडगल्लीच्या जबरेश्वर महादेव मंदिरात विष्णुच्या दोन प्राचीन मुर्ती नंदीजवळ ठेवलेल्या आहेत.
गोदावरी काठी गंगाखेड या प्रसिद्ध तीर्थस्थळी बालाजीचे मंदिर आहे. चारठाणा येथील नृसिंह तीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्या मंदिरात नृसिंहाची मुर्ती नाही. ती गावात देवीच्या मंदिरात एका भिंतीवर आढळते. जिंतूरला नृसिंह मंदिर आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठी राहेर येथील नृसिंह मंदिर तेराव्या शतकांतील अतिशय चांगल्या अवस्थेत आहे. पोखर्णी (जि. परभणी) येथे नृसिंह मंदिर आहे.
खामनदीच्या काठी शेंदूरवादा (ता. बीडकीन जि. औरंगाबाद) येथे शिवकालीन सुंदर विठ्ठल मुर्ती आहे. विठ्ठलाला विष्णुचा अवतार मानला गेला आहे. पानगांव (ता. परळी जि. बीड) येथील विठ्ठल मंदिर अकराव्या शतकांतील प्रसिद्ध असे मंदिर आहे. ही विठ्ठलाची मुर्तीही देखणी आहे. औंढा नागनाथ या ज्यांतिर्लिंग मंदिरात तळ्यात सापडलेली अप्रतिम अशी विष्णुमूर्ती काचेत ठेवलेली आढळून येते. मराठावाड्यात अशा पद्धतीनं विष्णुमुर्ती आढळून येतात.
पूर्वीच्या काळी आक्रमणाच्या भितीने मंदिरातील मुर्ती तळ्यात विहिरीत लादणींत लपवून ठेवल्या गेल्या. मग कालांतराने भिती ओसरल्यावर संकट टळल्यावर या मंदिरात घडविण्यास सोपी म्हणून महादेवाची पिंड ठेवल्या गेली. अभ्यासकांनी अशी मंदिरे शोधून त्यावरच्या मुर्तींचा अभ्यास करून माहिती लिहून ठेवली आहे. अजून बर्याच मंदिरांचा अभ्यास होण्याची गरज आहे.
मुळात सगळ्यात पहिल्यांदा सामान्य माणसांची प्राचीन मंदिरं- बारवा-लेण्या-गढ्या-किल्ले-दर्गे यांच्याबाबतची अनास्था दूर होण्याची नितांत आवश्यकता आहे. मगच हा विषय ऐरणीवर येईल आणि काहीतरी मार्ग सापडेल.(जून्या दर्ग्यांचा मकबर्यांचा विषय निघाला की काही जण झटकून टाकतात. याचा आपला काहीच संबंध नाही असे म्हणतात. पण या वास्तू भारतीय परंपरेतील आहेत याचा त्यांना विसर पडतो. मूळात समाधी स्थळे बांधणे आणि त्यांची पूजा करणे ही आपलीच परंपरा आहे).
देवगिरी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही संस्कृती जागृती अभियान राबवितो आहोत. तूमच्या परिसरांतील जूनी मंदिरे, मुर्ती, जून्या वास्तू, गढी, वाडे, दर्गे-मकबरे यांची माहिती जरूर कळवा. व्हॉटसअप वर त्याचे फोटो पाठवा. स्थानिक सहकार्य करू इच्छिणार्यांची नावेही पाठवा.
चारठाणा येथे संस्कृती संवर्धनाच्या अभियानात स्थानिक लोकांनी मोठी चळवळ चालवली आहे. त्यांनी एक आदर्श मराठवाड्यात आपल्या कृतीने समोर ठेवला आहे.याप्रमाणे इतरत्रही काम सुरू झाले पाहिजे.
(या विषयात रस आसणार्यांसाठी खाली मंदिरांची यादी परत एकदा देत आहे.)
(इ.स. 1000 ते इ.स. 1100 काळातील मराठवाड्यातील सुंदर मंदिरे - 1. खडकेश्वर मंदिर जामखेड, ता. अंबड जि. जालना, 2. केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, ता, अंबाजोगाई जि. बीड, 3. सिद्धेश्वर मंदिर होट्टल, ता. देगलूर जि. नांदेड, 4. सोमेश्वर मंदिर, होट्टल 5. विठ्ठल मंदिर पानगांव, ता. परळी, जि. बीड 6. नागनाथ मंदिर, औंढा, जि. हिंगोली 7. गुप्तेश्वर मंदिर, धारासूर ता. गंगाखेड, जि. परभणी.8. अन्वा शिव मंदिर ता. भोकरदन जि. जालना.)
(इ.स. 1100 ते 1200 या काळातील त्रिदल मंदिरे 1. निळकंठेश्वर मंदिर निलंगा, जि. लातूर, 2. कंकाळेश्वर मंदिर बीड, 3. शिवमंदिर उमरगा, जि. उस्मानाबाद 4. महादेव मंदिर माणकेश्वर, ता. परंडा, जि. उस्मानाबाद 5. वडेश्वर मंदिर, अंभई, ता.सिल्लोड, जि. औरंगाबाद 6. केशव मंदिर, केसापुरी ता. माजलगांव जि. बीड)
(इ.स. 1200 ते 1300 या काळातील उत्तर यादव कालीन मंदिरे. 1. अमलेश्वर मंदिर 2. सकलेश्वर मंदिर 3. खोलेश्वर मंदिर -तिन्ही मंदिरे अंबाजोगाई येथील 4. नरसिंह मंदिर राहेर जि. नांदेड 5. शिवमंदिर येळूंब जि. बीड 6. नरसिंह मंदिर-चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी (येथे अजूनही 5 मंदिरे आहेत) 7. नागनाथ मंदिर-पाली जि. बीड)
(या लेखासाठी डॉ. प्रभाकर देव यांच्या ‘मराठवाड्यातील प्राचीन मंदिर स्थापत्य शिल्पाविष्कार’- अनुवाद सौ. कल्पना रायरीकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे).
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575