Thursday, August 20, 2020

समाधी छोटी गोष्ट मोठी !


उरूस, 20 ऑगस्ट 2020 

 सोबतच्या छायाचित्रात दिसते आहे ही एक घडीव दगडाची छोटी साधी देखणी समाधी. वृंदावनाच्या आकारात कोरलेल्या दगडांत वरती एक शिवलिंग आहे. त्याला वाहिलेले पाणी निघून जाण्यासाठी छोटीशी खोबण दगडांतच कोरलेली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालूक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध चारठाणा गावाजवळ धानोरा हे गांव आहे. जवळच्या वाघी गावामुळे याला वाघी धानोरा असेच संबोधले जाते. 

या गावात एकोणविसाच्या शतकाच्या उत्तरार्धात अद्वैयानंद नावाचे एक सन्यासी सत्पुरूष वास्तव्यास आले. वाशिम जवळच्या एका गावाहून कायंदे कुळातील हे सत्पुरूष धानोर्‍यात चालत आले. उर्वरीत आयुष्य त्यांनी याच गावात व्यतित केले. 1920 च्या दरम्यान त्यांचे देहावसान झाले. गावातील वतनदानर देशपांडे धानोरकरांनी आपल्या गढीवजा वाड्याच्या परिसरात या सत्पुरूषाची ही समाधी उभारली. या जागेला देवघर या नावाने ओळखले जाते.

समाधीची पुजा, समाधीस्थळी भजन किर्तन नियमित होत असायचे. मधुकरराव धानोरकर यांनी या समाधीची नित्यपूजा फार काळ केली. जिंतूरचे नरहर गुरू जिंतूरकर यांनी 35 वर्षे भागवताचे पारायण या जागी केले. पुढे काळाच्या ओघात वतनदार देशपांडे स्थलांतरीत झाले. गढी ढासळली. समाधीची जागाही बेवारस बनत गेली. तिथे मोकाट जनावरांचा वावर सुरू झाला. 

2010 मध्ये येथील सुप्रसिद्ध किर्तनकार व्यंकटराव धानोरकर गुरूजी यांचे निधन झाले. त्यांनी आपल्या आयुष्यातील पहिले किर्तन 1955 सालादरम्यान याच समाधी स्थळी केले होते. याची आठवण ठेवून त्यांचे सुपुत्र माझे मित्र जयंत देशपांडे धानोरकर यांना प्रमाणिकपणे असे वाटले की वडिलांची स्मृती म्हणून आपण या समाधीचा जिर्णोद्धार केला पाहिजे. त्यांनी आपले किर्तनकार बंधू भालचंद्र आणि पडद्यामागचा सुत्रधार संजय या तिघांनी भाउबंदकिला विचारले. सगळ्यांनी एकमताने समाधीचा कायापालट करण्याचे ठरवले. आपल्या गढीवजा वाड्याचा चांगल्या अवस्थेत असलेला जो माळवदाचा (लाकडी छताचा, आताच्या पिढीला हा शब्द माहित नसतो) भाग उचलून घेतला. शिल्लक मजबूत खांब आणि भक्कम तळखडे यांचा वापर करून समाधी भोवती चांगले छत उभारले. समाधी समोर छोटेसे अंगण मोकळे ठेवले. चारीबाजूंनी चांगली बांधबंदिस्ती केली. मोकाट जनावरे येवू नये म्हणून जागेला दरवाजा बसवला. त्याला कडी घातली. 

खरं तर ही तशी साधीच गोष्ट होती. पण यापुढे जयंत देशपांडे यांनी जे केले ते मात्र अतिशय महत्वाचे होते. तीच खरी मोठी गोष्ट मला वाटते. त्यांनी या जागेला कुलूप घातले नाही. जागा चांगली करून गावकर्‍यांच्या स्वाधीन केली. सगळ्यांसाठी हे समाधीस्थळ कधीही उघडे असावे अशी व्यवस्था केली. गावकर्‍यांवर विश्वास ठेवून त्यांनाच सर्व व्यवस्था पाहण्यास सांगितले. रोज एक म्हातारी आजी येवून ही जागा साफसुफ करून जाते. समाधीजवळ कोनाड्यात दिवा पेटवते. महादेवाला पाणी घालून चार फुले वाहते. 

जवळपास उकिरडा बनलेली ही जागा आता परत माणसांनी गजबजून गेली आहे. प्रवचनं किर्तनं इथे आता होतात. सामान्य माणसांच्या श्रद्धेने या जागेला परत एकदा जिवंतपणा प्रदान केला आहे. 

समाधीच्या बाजूला देशपंाडे धानोरकरांच्या पडलेल्या वाड्याचा मोठा परिसर आहे. ती सगळी जागा समतल करून तिथे साफ सफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी खेळायची जागा बगीचा करण्याचा मनोदयही जयंत देशपांडे यांनी सांगितला. 

परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या परिसरांत (इतरत्रही हीच स्थिती आहे) छोट्या गावांमध्ये वतनदारांचे जूने वाडे, गढ्या उद्ध्वस्त झालेल्या आढळून येतात. त्या जागा अगदी बेवारस बनल्या आहेत. तिथे कुणाचाही वावर नाही. काही ठिकाणी मालकिचे वाद चालू आहेत. अशी परिस्थिती असताना जयंत देशपांडे सारखा एक वतनदार आपल्या कृतीने एक आगळा वेगळा आदर्श लोकांसमोर ठेवतो. आपल्या वाडवडिलांच्या जागेचा सद्उपयोग नविन काळात गावकर्‍यांना व्हावा अशी दृष्टी बाळगतो ही फार मोठी गोष्ट आहे. 

खेड्यांमधल्या असे जूने वाडे, गढ्या ज्या बर्‍यापैकी अवस्थेत आहेत त्यांची दूरूस्ती बांधबंदिस्ती केली गेली पाहिजे. ही ठिकाणं एका अर्थाने ऐतिहासिक पुरातत्वीय दृृष्ट्या महत्त्वाची आहेत. इथे किमान रहायची सोय झाली तर परदेशी पर्यटक येथे येण्यास उत्सूक आहेत. जानेवारी महिन्यात चारठाण (ता. जिंतूर जि. परभणी) येथील देशपांडे यांचा वाडा आणि  होट्टल (जि. नांदेड, ता. देगलूर) येथील देशमुखाची गढी व्हिन्सेंट पास्किलीनी या फ्रेंच मित्राला आम्ही दाखवली. त्याने हीची दूरूस्ती आणि जतन करण्याबाबत तळमळ व्यक्त केली.  

चारठाणा येथील काही वाडे बर्‍यापैकी अवस्थेत आहेत. पैठण उंडणगाव गंगापूर माजलगाव  येथेही जूने भव्य वाडे आहेत. अशा खुप जून्या वास्तू आहेत. या शिवाय ज्या जागा पूर्णत: पडलेल्या आहेत तिथे जयंत देशपांडे यांनी केलेल्या कृती प्रमाणे काही एक उपाय करता येईल. ही जागा साफसुफ करणे. तिला संरक्षक भिंत उभारणे. त्यासाठी दगड तिथेच असतात. झाडे लावणे. हा परिसर गावकर्‍यांना वापरासाठी उपलब्ध करून देणे. जागा मूळ मालकाच्याच नावावर राहणार असल्याने मालकीचे वाद उदभवणार नाहीत. हा सगळा विश्वासाचा प्रश्‍न आहे. सध्या उद्ध्वस्त असलेल्या जागेचे रूपांतर सुंदर बगीच्यात झाले तर त्याचा फायदा गावकर्‍यांसाठी आणि पर्यटकांसाठी होणार आहे. 

याच परिसरांतील संत समर्थ रामदास यांनी ‘क्रियेवणी वाचाळता व्यर्थ आहे’ असे  सांगून ठेवले आहे. जयंत देशपांडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे. तेंव्हा आता इतरांनी आपल्या आपल्या गावची परिस्थिती जाणून त्या प्रमाणे काही एक कार्यवाही केली पाहिजे. ही अतिशय साधी सहज होऊ शकणारी गोष्ट आहे. 

सातवाहनापासून वाकाटक राष्ट्रकुट ते देवगिरीच्या यादवांपर्यंत महान सम्राटांचा हा प्रदेश. आपल्या या पुरातन वारश्याची जाण ठेवून आपण त्या प्रमाणे आपल्या परिसरांतील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करत असताना आपल्या घराण्याच्या पडक्या जागाही चांगल्या करण्याचे व्रत हाती घेवू या.        


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, August 14, 2020

भेटेन नऊ महिन्यांनी !


काव्यतरंग, शुक्रवार 14 ऑगस्ट 2020 दै. दिव्यमराठी


भटेन नऊ महिन्यांनी 


मनि धीर धरी शोक आवरी जननी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥

या न्यायाची रीत मानवी असते । खरी ठरते केव्हा चुकते

किति दुर्दैवी प्राणी असतिल असले । जे अपराधाविण मेले

लाडका बाळ एकुलता

फांशीची शिक्षा होतां

कवटाळुनि त्याला माता

अति आक्रोशे, रडते केविलवाणी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥


तुज सोडुनि मी. जाइन कां गे इथुन । परि देह परस्वाधीन

बघ बोलति हे, बोल मुक्या भावाचे । मम दोरखंड दंडाचे

अन्नपाणि सेवुनि जिथले

हे शरीर म्यां पोशियले

परदास्यिं देश तो लोळे

स्वातंत्र्य मला, मिळेल मग कोठोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥


लाभते जया, वीर मरण भाग्याचे । वैकुंठपदी तो नाचे

दे जन्म मला, मातृभूमिचे पोटी । पुन:पुन्हा मरण्यासाठी

मागेन हेंच श्रीहरिला

मातृभूमि उद्धरण्याला

स्वातंत्र्यरणी लढण्याला

तव शुभ उदरी, जन्म पुन्हा घेवोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥


-कुंजविहारी (गीतगुंजारव, पृ.54, प्रकाशक गीतगुंजारव मंडळ सोलापुर, आ.1947)


15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध स्वातंत्र्यगीते वाजवली जातात. काही कवितांची आठवण या निमित्ताने काढली जाते. कुसुमाग्रजांच्या ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ सारख्या कवितांप्रमाणेच तेंव्हाची अतिशय लोकप्रिय असलेली कवी कुंजविहारी यांची कविता म्हणजे ‘भेटेन नऊ महिन्यांनी’.

कवी कुंजविहारी यांचे संपूर्ण नाव हरिहर गुरुनाथ कुलकर्णी-सलगरकर (जन्म 10 नोव्हेंबर 1896 मृत्यू 1 नोव्हेंबर 1978). सोलापूर ही त्यांची कर्मभूमी. स्वातंत्र्यलढ्यात अतिशय सक्रिय असलेले कुंजविहारी यांना सोलापूरच्या मार्शल लॉच्या वेळी 1 वर्षाचा तुरूंगवासही भोगावा लागला. 

देशासाठी लढणार्‍या एकुलत्या एक मुलाला फांशीची शिक्षा होते. त्याला पोलिस ओढून नेत असताना त्याची आई आक्रोश करते. या आईला समजावून सांगताना तो स्वातंत्र्यवीर जे बोलतो आहे त्याचीच ही कविता बनली आहे. सोलापुरचे स्वातंत्र्यवीर मल्लप्पा धनशेट्टी यांना फासावर चढविण्यात आले. त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती. मल्लप्पा धनशेट्टी यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी त्यांच्या पत्नींस पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे नाव शंकरअप्पा धनशेट्टी. हा स्थानिक संदर्भही कुंजविहारींच्या कवितेला आहे. 

कुंजविहारींनी भारतीय सनातन तत्त्वज्ञानातील पुनर्जन्माची संकल्पना अतिशय उत्कटपणे कवितेत आणली आहे.  आत्ता जरी मला हे सरकार फासावर चढवत असले तरी तूझ्या उदरी मी परत नऊ महिन्यांनी जन्म घेईन. मूळ कविता 13 कडव्यांची आहे. (कुंजविहारींची स्वाक्षरी असलेली त्यांच्या पुस्तकाची प्रत मला औरंगाबादच्या जीवन विकास ग्रंथालयात सापडली. त्याचे छायाचित्र सोबत जोडले आहे. हे पुस्तक त्यांनी 1962 मध्ये तेंव्हाच्या शिक्षणाधिकारी शकुंतलाबाई वाघमारे यांना सप्रेम भेट दिलेले आहे.)  

भारतीयांची ही जी मानसिकता आहे हीच त्यांनी मोठी ताकद आहे. अगदी आत्ता जून महिन्यात गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांसोबत हातापायी होवून 20 सैनिक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या सोबतच्या इतर सैनिकांना जेंव्हा पत्रकारांनी विचारले तेंव्हा त्यांनी ‘आम्हाला परत आघाडीवर पाठवा’ अशीच भावना व्यक्त केली. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही आपली भारतीय मानसिकता समजून घेण्याची गरज आहे. 

देशासाठी शहिद होणार्‍या कित्येकांची तर नोंदही नाही. कुसुमाग्रजांनी ‘अनामवीरा’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे

अनामवीरा जिथे जाहला तुझा जिवनांत

स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली ना वात

जरी न गातील भाट डफावर तूझे यशोगान

सफल जाहले तूझेच हे रे तूझेच बलिदान

भारतीयांच्या मनांमनांत शहिदांसाठी अतिशय सन्मानाची आदराची भावना नेहमीच राहिली आहे. कुंजविहारींनी हेच ओळखून या कवितेची रचना केली. कवितेचा आशय अतिशय सोपा सरळ आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी भक्कम अध्यात्मिक अशी पार्श्वभूमी आहे. संत साहित्यातून, शिवाजी सारख्या महान राज्यकर्त्यांपासून एक प्रेरणा सतत आपल्याला मिळत आली आहे. तुरूंगात असतांना कुंजविहारी यांच्यावर संत साहित्याचा परिणाम झाल्याची नोंद त्यांच्यावर लिहीताना वा.शि. आपटे यांनी करून ठेवली आहे. 

याच कुंजविहारींनी शिवरायांची आरती लिहीताना स्वातंत्र्यलढ्याला इतिहासाशी जोडत आपली प्रेरणा स्पष्ट केली आहे,

जेव्हा जगी धर्मध्वज होतो पदभ्रष्ट

जेव्हां मांडिती तांडव अरिदानव दुष्ट

जेंव्हा साधूसज्जन सहतिल अति कष्ट

शिवसंभव तव होइल भगवद्वच स्पष्ट ॥

राष्ट्रीयत्वाची भावना लोकांमध्ये जागृत करण्यासाठी महाभारतातील युद्ध, परकियांची आक्रमणे यांचा धागा इंग्रजांविरूद्धच्या लाढ्याशी र्जोडणारी कविता त्या काळात लिहीली गेली.

आजही स्वातंत्र्यलढ्यातील कवितां का लोकप्रिय आहेत? ही गाणी आजही परत त्याच उत्साहात का गायली जातात? त्याचे कारण म्हणजे भारतीयांच्या मनात या भूमीबद्दल एक विलक्षण अशी आत्मियता आहे. हा केवळ जमिनीचा तुकडा नसून आमच्या कणाकणांत हे भारतीयत्व समावलेले आहे. आजही विपरीत सामाजिक परिस्थिती उद्भवते, दंगे होतात, दंग्यांत बळी पडलेला मुलगा 100 वर्षांपूर्वी जसे आईला म्हणत होता, ‘भेटेन नऊ महिन्यांनी’ तोच आजच्या आईला म्हणतो 

आई दाराबाहेर पाऊल ठेवताना

कधी येशील? विचारू नको

वापस यायची निश्चित वेळ व खात्री द्यावी

इतकं हे शहर साधं सरळ उरलेलं नाही


इंग्रजांविरूद्ध लढलेल्या 

भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचे भाग्य

आमच्या वाट्याला येणार नाही  

आपल्याच लोकांनी पाठीमागुन केलेल्या वारांनी

ते बाटल्या शिवाय राहणार नाही

भागतसिंग सुखदेव राजगुरू 

तर आम्ही ठरणार नाहीतच

पण तूझं काळीज मात्र

भगतसिंगाच्या आईचे असू दे.

कुंजविहारी यांनी भारतीय मानसिकता ओळखून काळावर मात करणारी कविता लिहीली. आजचाही कवी हीच भावना आपल्या शब्दांत मांडतो तेंव्हा या कविची प्रतिभा लक्षात येते.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Monday, August 10, 2020

ऐतिहासिक स्थळांबाबत अनास्थेचा रोग !


उरूस, 10 ऑगस्ट 2020 

 औरंगाबाद परिसरांतील एका पुरातन बारवेचा फोटो काल फेसबुकवर टाकला. हे ठिक़ाण कोणते ओळखा? असा प्रश्‍न विचारला. शंभर जणांनी तो फोटोला लाईक केले, 16 जणांनी कॉमेंट केल्या. पण कुणालाच ती जागा ओळखता आली नाही. केवळ दोन जणांना नेमके त्याच दिवशी तेही आमच्या मागेपुढे तिथे गेले होते म्हणून ओळखता आले. 

एखादी जागा परिचित नाही हे पण एकवेळ आपण समजू शकतो. पण सोबत दुसरा एक अनुभव फार खंत वाटावी असा होता. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मागच्या बाजूला एक मजबुत दगडी महाल आहे. त्या ठिकाणाची दुरवस्था पाहून मन हेलावून गेले. त्यामुळे ऐतिहासिक वास्तुंबाबत काही एक अनास्थेचा रोग आपल्याला जडला आहे की काय असे वाटायला लागले. वर्षाच्या सुरवातीलाच चारठाण गावात एक ‘हेरिटेज वॉक’ आम्ही  डॉ. दुलारी गुप्ते कुरेशी आणि डॉ. प्रभाकर देव यांच्या उपस्थितीत व त्या परिसराचे अभ्यासक लक्ष्मीकांत सोनवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली  केला होता. त्याच महिन्यात नांदेड जिल्ह्यात देगलुर जवळ होट्टल येथे होट्टल महोत्सवा निमित्त जाणं झालं होतं. तेंव्हाही तिथे असल्या मातीत गाडल्या गेलेल्या मंदिराची अवस्था पाहून मन हेलावले. मंदिराच्या जिर्णोद्धाराचे इंटॅकने तिथे चालू केलेले काम प्रा. डॉ. सुरेश जोंधळे यांनी निदर्शनास आणून दिले होते. 

औरंगाबाद पासून दौलताबाद कडे जाताना देवगिरी किल्ल्यासाठी वळताना अगदी अलिकडेच मुख्य रस्ता सोडून डावीकडे एक वाट कमनीतून गावात शिरते. त्या वाटेने  केसापुरी रस्त्याला पुढे जाताना फतियाबाद नावाचे एक छोटे गाव लागते. या गावाच्या पाटीपाशीच मुख्य रस्त्यापासून जेमतेम 200 मिटर अंतरावर शेतात वर छायाचित्र दाखवले आहे ती दगडी बारव आहे. या बारवेला ‘खुफिया बावडी’ असे म्हणतात. डॉ.दुलारी गुप्ते कुरेशी यांच्या ‘दौलताबाद फोर्ट’ या इंग्रजी पुस्तकात हीचा उल्लेख आहे. त्या भागात बोली भाषेत या बारवेला ‘चोर बावडी’ असे म्हणतात. हीची रचना संपूर्णपणे जमिनीच्या आतच असल्याने हीचे कसलेच अस्तित्व दुरून ओळखू येत नाही. दगडी पायर्‍या उतरून आत उतरतो तेंव्हा पाताळात उतरतो आहोत असेच भासते. अर्ध्या पायर्‍यांवर आल्यावर दोन्ही बाजूच्या ओवर्‍यांवर कडे जाणार्‍या दोन दिशांच्या पायर्‍या लागतात. आणि मुख्य पायर्‍या खाली पाण्याकडे उतरत जातात. बारवेच्या तिन्ही बाजूला तीन कमानींच्या भक्कम सुंदर ओवर्‍या आहेत. पाण्यात उतरणार्‍या पायर्‍यांच्या विरूद्ध दिशेला ज्या तिन ओवर्‍या आहेत त्या कमानी बाकी दोन पेक्षा जास्त मोठ्या आहेत. त्यामुळे त्या भागात कमानंींचा एक टुमदार छोटा महालच तयार झाला आहे. 

बारवेचे सगळे बांधकाम भक्कम आहे. भरपूर पाण्याने ही बारव भरलेली आहे. बारवेच्या काठावर सुगरणीचे सुंदर खोपे आहेत. आम्ही जेंव्हा ही बारव पाहण्यास गेलो होतो, (रविवार 9 ऑगस्ट 2020) तेंव्हा सुगरण पक्षाचा  गोड किलबिलाट विहीरीत भरून राहिला होता. (फोटो .सौजन्य:आकाश धुमणे, व्हिन्सेंट पास्किलीनी) खुफिया बावडी ही जागा सोमनाथ मुळे आणि स्वप्नील चक्रे यांच्यामुळे आमच्या दृष्टीपथात आली.   

केसापुरी रस्त्याला लागताना सुरवातील देवगिरी किल्ल्याची मजबुत तटबंदी आणि भक्कम दरवाजा ओलांडला की डाव्या बाजूला दोन जून्या इमारती व संरक्षक भिंतीची रस्त्याकडेची बाजू दिसायला लागते. 

यातील एक इमारत म्हणजे हाथीमहाल. म्हणजेच हत्ती बांधायची जागा. ही इमारत संपूर्ण मजबूत अवस्थेत आजही उभी आहे. रस्त्याच्या बाजूने तिची भक्कम दगडी भिंत दिसते. त्यात भरीव अशा तीन कमानी दिसतात. आतल्या बाजूला इमारतीचे भव्य प्रवेशद्वार आहे. हा भाग झाडींनी संपूर्ण वेढलेला आहे. अगदी दरवाज्या समोरही दाट झाडी आहे. आत शिरायचा प्रयत्न केला तर काटे ओरबाडून घेत जावू लागते. आत भव्य अशी रूंदीच्या तिप्पट लांबी असलेला महाल आहे. हत्ती बांधता याव्यात अशा लोखंडी कड्या भिंतीत आहेत. जमिनला फरशी केलेली नाही. एरव्ही अशा मोठ्या भक्कम इमारतींना उंचावरचे जोते आणि जमिनीला घडीव दगडाची फरसबंदी असतेच. इमारतीच्या पूर्वेकडच्या भिंतीतून गच्चीवर जाण्यासाठी भक्कम दगडी जिना आहे. महालाच्या पश्चिमेला मोठी कमानेदार खिडकी किंवा छोटा दरवाजाच शोभावा अशी रचना आहे. (हाती महालाचा फोटो सोबतच आहे.)

याच हाथी महालाच्या पूर्वेला काटकोनात मुसाफिरखाना किंवा रंगमहाल नावाची वास्तु उभी आहे. तिच्या पहिल्या मजल्याची संपूर्ण पडझड झालेली आहे. पण तळमजला मात्र भक्कम आहे. तळमजल्याला केवळ दोनच दरवाजे आहेत. आणि तेही छोटे. तेंव्हा हा भाग धान्य साठवणुकीसाठी, स्वयंपाकघरासाठी, नौकरांच्या राहण्यासाठी असावा. 

हाथी महाल, रंगमहाल हा सगळा परिसर बेवारश्यासारखा आहे. मोकाट जनावरांचा वावर, बेफाम वाढलेल्या जंगली काटेरी वनस्पती, वटवाघळांनी केलेली घाण, गायी म्हशींच्या शेणांनी इमारतींत झालेली दलदल, चिखल पाहून मन सुन्न होते. या महत्त्वाच्या वास्तुंची डागडुजी आपण जेंव्हा करू तेंव्हा करू. पण जागेची किमान साफसफाई, तारांचे संरक्षक कुंपण, देखभालीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने एखाद्या कर्मचार्‍यांची नेमणुक या साध्या गोष्टी का केल्या जात नाहीत? 

15 ऑगस्टला आपण 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देवगिरीचा पराभव झाला आणि आपल्या देशावर परकियांचे हल्ले सुरू झाले. आणि तेथपासून पराभवाची एक मालिकाच  सुरू झाली. 15 ऑगस्टला आपण निर्णायकरित्या  स्वांतत्र्य मिळवले. आपल्या पराभवाची देवगिरी ही खुण होती जी आपण 15 ऑगस्टला बदलून टाकली. मग या परिसरांत किमान साफसफाई आणि सौंदर्यदृष्ट्या काही एक रचना बाग बगीचा करण्याचे आपल्याला 15 ऑगस्टच्या निमित्ताने का सुचत नाही? 

याच परिसरांत पुढे केसापुर तांडा या गावाजवळ सुंदर असा धबधबा आहे. निसर्ग संपन्न, ऐतिहासिक महत्त्व असलेला हा सगळा परिसर पाहण्यासारखा आहे. 

शासकीय पातळीवर जे काही करता येण्यासारखे आहे त्यासाठी आपण दबाव निर्माण केला पाहिजे. पण त्या सोबतच आधी स्थानिक पातळीवरील पर्यटन प्रेमी, इतिहास प्रेमी, निसर्ग प्रेमी यांनी एकत्र येवून जनजागृती केली पाहिजे. स्थानिक प्रशासनाला विनंती करून किमान सोयी साफसुफ येणार्‍या पर्यटकांसाठी चहा नाश्ता याची सोय कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. महिलांसाठी स्वच्छतागृहे फार आवश्यक आहेत. स्थानिक लोकांना आम्ही बोललो तेंव्हा त्यांनी यासाठी सगळे सहकार्य देण्याची तयारी दर्शवली. व्हिन्सेंट हा आमचा फ्रेंच मित्र अश्या फारश्या परिचित नसलेल्या ठिकाणाबाबत सदैव उत्सुक असतो. त्याचा उत्साह बघून मला स्वतःलाच लाज वाटत राहते. कारण त्यामानाने आपण आपल्याच अश्या ऐतिहासिक सांस्कृतिक वारश्याबाबत जागरूक नसतो. 

15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूची जी ऐतिहासिक स्थळे असतील त्यांची किमान माहिती घेवू. तिथे भेटी देवू. सगळ्यांनी मिळून कोरोना सोबतच ऐतिहिासिक स्थळांबाबतची ‘अनास्था’ या संसर्गजन्य रोगाच्या निवारणासाठी काम करण्याची शपथ घेवू.     

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    


Friday, August 7, 2020

माझे मग ते फुल कोणते कसे ओळखू सांग ?


काव्यतरंग, शुक्रवार 7 ऑगस्ट  2020 दै. दिव्यमराठी


थांब जरासा बाळ || धृ० || 

सुंदर खाशा प्रभातकाळी
चहूंकडे ही फुले उमलली
बाग हांसते वाटे सगळी
शीतल वारा या जलधारा कारंज्याच्या छान ॥ १ ||

रम्य तडागी निर्मळ पाणी
गाति पांखरे गोजिरवाणी
आनंदाची बसली ठाणी
खरे असे रे तरी नको मारू लाडक्या धांव ॥ २ ||

तर्‍हेतर्‍हेची फुले विकसली
रंगीबेरंगी ही सगळी
तूंही शिरता त्यांच्या मेळी
माझे मग ते फुल कोणते कसे ओळखू सांग?॥ ३ ||

फूलपाखरे ही स्वच्छंदी
तूंही त्यांच्यासम आनंदी
क्षणांत पडशिल त्यांच्या फंदी
त्यांच्या संगे त्यांचे रंगे जाशिल उडूनी दूर ॥ ४ ||

बालरवीचे किरण कोवळे
कारंज्यावर पडति मोकळे
रंग खेळती हिरवे पिवळे
धरावयाची, त्या रंगासी जाशिल बाळा खास ॥ ५ ||

-गोविंदाग्रज (वाग्वैजयंती, पृ.224  प्रकाशक बा.म.नेर्लेकर पुणे, आ.1962)

राम गणेश गडकरी असे नांव उच्चारले तर बहुतांश मराठी वाचकांना ते ओळखीचे वाटते. ‘एकच प्याला’ सारखी त्यांची नाटके माहित असतात. पण तेच ‘गोविंदाग्रज’ असे नाव घेतले तर मात्र ओळखीचे वाटत नाही. गडकर्‍यांनी ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने कविता लिहील्या. ‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा’ हे महाराष्ट्र गीत आपल्या ओठंावर असते पण ही रचना गोविंदाग्रजांची आहे हे माहित नसते. ‘राजहंस माझा निजला’ ही पण त्यांची एक त्या काळात अतिशय गाजलेली कविता. ही कविता ते गाउन सादर करायचे. ‘कृष्णाकांठी कुंडल आतां पहिले उरले नाही’ याही कवितेचा उल्लेख बर्‍याचदा होतो.

‘थांब जरासा बाळ’ ही कविता पूर्वीच्या काळी अभ्यासक्रमात होती. निसर्गाचे आणि त्यात रमलेल्या लहान मुलाचे या कवितेतील वर्णन अतिशय गोड असे आहे. ज्याला विशुद्ध कला/साहित्य म्हणतात अशी ही कविता. यात कुठलाही बोध नाही. फार अवजड शब्द उपमा आलेल्या नाहीत. 

पहाटे बागेत लहान मुलाला आई घेवून गेली आहे. नुकतेच चालणे शिकलेले हे छोटं मुलं गवतावरून दूडू दूडू धावत आहे. आणि आईला त्याच्याबद्दल आनंद अभिमान तर आहेच पण या सगळ्यात आपलं बाळ गुडूप होईल की काय अशी एक गंमतशीर भिती वाटत आहे. 

पहाटेचं वातावरण आहे. लहान मुल म्हणजे जीवनाची सुंदर पहाट. असाही एक अर्थ यातून काढता येतो. दिवसाचा हा प्रहर सगळ्यात प्रसन्न असतो. या लहान मुलाच्या आयुष्याची ही पहाट आहे. ती पण अशीच सुंदर आहे. सगळीकडे फुले उमलली आहेत. कारंज्यातून जलधारा उडत आहेत. 

एकीकडे फुलपांखरे उडत आहेत. त्यांच्या सोबत बागडणारे हे लहान मुलही त्या फुलपाखरांसारखेच भासते आहे. तिसर्‍या कडव्यांत एक अतिशय गोड कल्पना आलेली आहे. या सगळ्यांत आपले मुल हरवून गेले तर त्या आईला प्रश्‍न पडतो, ‘माझे मग ते फुल कोणते कसे ओळखू सांग?’

बागेत उडणार्‍या कारंज्यांचे वर्णन यात आलेलं आहे. मोगलांनी उभारलेल्या कित्येक वास्तुमध्ये कारज्यांची रचना आवर्जून केलेली दिसते. कारण ते वाळवंटी प्रदेशांतून आलेले असल्याने त्यांना पाण्याचे फार कौतूक होते असे सांगितले जाते. ते खरेही असेल पण आपल्या जून्या साहित्यातही कारंज्याची वर्णनं आहेत. कालिदासाच्या ऋतूसंहार या निसर्गवर्णनपर काव्यात जलयंत्रांचा उल्लेख आहे. उडणार्‍या पाण्याला चैतन्याचे प्रतिक समजल्या जाते. त्या अर्थाने हे वर्णन येथे आलेले आहे. या बागेत तळे आहे. अशा वाटिकांचा उल्लेख अगदी पुराणांतदेखील आलेला आहे. 

फुलं, फुलपाखरं, कारंंज्यातून उडणार्‍या जलधारा, पहाटेची कोवळी सुर्यकिरणं या सगळ्यांत ते लहानमुल हरखून जाते. रविंद्रनाथ टागोरांनी निसर्गाच्या सान्नीध्यातील शिक्षणाची ‘शांतीनिकेतन’ ची संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात राबवून दाखवली.  निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना शिकवलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आज नेमकं हेच होताना दिसत नाही. शाळेच्या नावाखाली कोंदट खोल्यांमध्ये मुलांना डांबले जात आहे. 

1910 च्या दरम्यान कधीतरी ही कविता गोविंदाग्रजांनी लिहीली. जेंव्हा आपण आधुनिक म्हणतो अशी शिक्षण पद्धती सुरूही झाली नव्हती. आज शंभर वर्षानंतर काय परिस्थिती आहे? आजही आपण निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना जावू द्यायला तयार नाहीत.

नुकतेच चालणे शिकलेल्या मुलाला गवतावर चालू द्या, त्याच्या कानावर पाखरांचे आवाज पडू द्या, त्याच्या डोळ्यांत कारंज्यावर पडणार्‍या सुर्यकिरणांमुळे उठलेले रंगाचे इंद्रधनुष्य साठवू द्या. हा संस्कार फार महत्त्वाचा आहे. अन्यथा आपण त्या मुलाच्या नैसर्गिक वाढीत बाधा आणतो आहोत. 
 
लॉकडाउनच्या काळात सर्वत्र पसरलेली शांतता अगदी शहरांतदेखील आपल्याला अनुभवायाला मिळाली. पाखरांचे आवाज कानावर येवू लागले. हवा स्वच्छ  होवून सभोवतालची दृष्ये स्पष्ट दिसू लागली. दुरवरचे डोंगर जवळ वाटायला लागले. ही ताकद निसर्गाची आहे. 

मेळघाट अभयारण्यात इ.स. 2000 साली कोलकाज येथे नदीच्या काठावर अगदी पहाटे माझ्या एक वर्षाच्या लहान मुलाला मी मांडीवर घेवून बसलो होतो तो प्रसंग मला आठवतो. त्याची हालचाल जराही जाणवत नसल्याने तो गाढ झोपला असेल असे मी गृहीत धरले. काही वेळाने त्याच्याकडे लक्ष गेले तर त्याचे डोळे टक्क उघडे होते. निसर्गाच्या त्या अद्भूत सान्निध्यात नदीच्या पाण्याच्या खळखळ आवाजात पाखरांच्या किलबिलाटात त्याचेही ध्यान लागले होते. ही खरी निसर्गाची किमया. अजून सगळ्या संवेदना पूर्णत: विकसित न झालेल्या मुलावर एक संस्कार निसर्गाकडून केला जात होता.

उपदेशाची भाषा न वापरता निसर्गाकडे जाण्याचा एक सुंदर संदेश ही कविता देत आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, August 6, 2020

बाबरा प्राण (ओवैसीचा) तळमळला !


उरूस, 6 ऑगस्ट 2020 
 
दिनांक 5 ऑगस्ट (श्रावण कृष्ण द्वितीया शके 1942, उत्तर भारतात पौर्णिमेनंतर महिना सुरू होतो तेंव्हा त्यांच्या पंचांगाप्रमाणे हा भाद्रपद महिन्यातील दुसरा दिवस) 2020 दुपारी 12 वा.44 मि. 8 सेकंद हा  महूर्त होता राममंदिराच्या भूमिपुजनाचा.  हा भूमिपुजन सोहळा संपन्न होत असताना असदुद्दीन ओवैसी आणि तमाम पुरोगामी यांच्या तोंडी एकच गाणे होते ‘बाबरा प्राण तळमळला!’

एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ओवैसी आणि इतर पुरोगामी दाबून टाकत आहेत. 1977-78 मध्ये पुरातत्व विभागाने या ठिकाणी उत्खनन करून काही एक अहवाल शासनाला सादर केला होता. डॉ. लाल यांच्या नेतृत्वाखालील या तुकडीमध्ये सामील असलेले त्यांचे सहकारी के. के. मोहम्मद यांनी याबाबत सविस्तर माहिती लिहून ठेवली आहे. तसेच हा वाद न्यायालयात पोचल्यावर न्यायालयाच्या देखरेखीखाली काही उत्खनन करण्यात आले. त्याचेही अहवाल देण्यात आले आहेत.

न्यायालयाचा निकाल आल्यावर ही जागा अधिकृतरित्य रामजन्मभुमी न्यास तयार करून त्यांना हस्तांतरित करण्यात आली मंदिराच्या बांधकामासाठी. तेंव्हा बांधकाम सुरू करताना असलेले दगड मातीचे ढिगारे साफ करतानाही हिंदू मंदिराचे अवशेष सापडले. त्याचाही एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.

आत्ता कालपासून भूमिपुजन झाल्यावर पायासाठी म्हणून जे खोदकाम सुरू होते आहे तेंव्हाही शक्यता आहे की अजून काही अवशेष सापडू शकतील. शक्यता तर अशी पण आहे की भव्य अशा मंदिराचे अवशेष सापडले तर ही जागा पुरातत्त्व संशोधनासाठी राखीव ठेवून लगतच्या दुसर्‍या जागी नविन मंदिराचे बांधकाम करावे लागेल. 

पण याकडे कुठलाच पुरोगामी लक्ष द्यायला तयार नाही. रोमिला थापर यांच्यासारख्या इतिहास तज्ज्ञांनी शपथपत्र दिले होते की बाबरी मस्जिद ही समतल भुमीवर उभी आहे. मग या खोट्या शपथपत्रासाठी त्यांना आता काय शिक्षा केली जाणार आहे? वारंवार मंदिराचे पुरावे मागणारे लोक आता कुठे गायब झाले आहेत? मस्जिद मंदिर पाडून बांधली नव्हती याचा काय पुरावा आहे? असा प्रश्‍न रोमिला थापर यांना का नाही विचारला गेला? 

के. के. मोहम्मद सारखा पुरातत्त्व अभ्यासक तज्ज्ञ आजही अशा इतर स्थळांबाबत (उदा. कुतूबमिनार) अहवाल देतो आहे. हे पुरोगामी त्याची दखल घेण्यास का तयार नाहीत? 

ओवैसी सारखे मुसलमान असं सातत्याने सांगतात की आम्ही पण इथल्याच मातीतले आहोत. खरं तर हे सगळे पूर्वाश्रमीचे हिंदूच आहेत. मग यांना परकीय आक्रमक अशा बाबराचे कौतूक कशासाठी आहे? ज्याला बाबरी मस्जिद म्हणतात ती एका व्यक्तीच्या नावे कशी काय? इस्लाममध्ये तर व्यक्तीपुजनाला संपूर्ण बंदी आहे. एखादी व्यक्ती मृत्यू पावली आणि ती जर बडी हस्ती/सम्राट/बादशहा/सरदार असेल तर त्याला जिथे पुरले जाते तिथे मकबरा उभारला जातो. मस्जिद नाही. मस्जिद म्हणजे तिथे केवळ आणि केवळ अल्लाची प्रार्थना करायीच असते. इस्लाममध्ये परमेश्वर निर्गुण निराकार मानल्या गेल्याने मस्जिदमध्ये जावून प्रार्थना केली पाहिजे असेही नाही. नमाज कुठेही पढता येतो. 

मुळात इस्लामला प्रतिकेच मंजूर नाहीत. अगदी मोहम्मद पैगंबर यांच्या नावानेही काही मागितलेले चालत नाही. कारण जे काही मागायचे ते केवळ अल्लाकडेच. केवळ ‘भर दे झोली मेरी या मुहम्मद’ असे शब्द कव्वालीत वापरल्याने कराचीचे कव्वाल अमजद साबरी यांची हत्या करण्यात आली. पैगंबरांची जयंती ‘ईद-ए-मिलाप’ मोठ्या प्रमाणात साजरी केली जात नाही कारण ती कुणा एका व्यक्तीची जयंती आहे. ही व्यक्ती महान मोहम्मद पैगंबर असले तरी काय झाले. अशी इस्लामची धारणा आहे. मग अशावेळी एका बाबराच्या नावाने असलेल्या वास्तुसाठी इतका आटापिटा का? 

आता तर अधिकृतरित्या सर्वौच्च न्यायालयाने ही जागा धर्मदाय संस्था तयार करून तिच्या सुपूर्त केली आहे. मग असे असताना असदुद्दीन ओवैसी किंवा मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड ‘बाबरी मस्जिद थी, बाबरी मस्जिद है, बाबरी मस्जिद रहेगी’ असं म्हणतात याचा अर्थ काय? हा तर घटनाद्रोह आहे. संविधान विरोध आहे.

खुद्द ओवैसी यांच्या हैदराबाद शहरात निजामाचा एक तरी पुतळा आहे का? कारण इस्लामला प्रतिके प्रतिमा मंजूर नाही. एक तरी मस्जिद कुणा व्यक्तीच्या नावाने आहे का? मग हा सगळा अट्टाहास बाबरी मस्जिदच्या नावाने का? आता तर दुसरी एक मस्जिद अयोध्येत बांधून तिला बाबरी मस्जिद नाव द्या असं चालू आहे. हा अतिरेक कशासाठी? 

पाकिस्तान, भारत, बांग्लादेश म्हणजेच पूर्वीचा जो भारतीय उपखंड आहे इथे जितके दर्गे आहेत, अप्रतिम शिल्पकाम केलेले स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले मकबरे आहेत तसे जगात कुठे आहेत? म्हणजे या उपखंडातील इस्लाम हा वेगळा आहे. इथले रितीरिवाज वेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि ते इथल्य जनतेने जतन केले आहेत. ही बाब ओवैसी तर सोडाच पण त्यांच्या सुरात सुर मिसळणारे मुसलमान नसणारे इतर पुरोगामी लक्षात का घेत नाहीत? 

2014 च्या पराभवापासून पुरोगामी काही शिकले नाहीत त्याचा परिणाम म्हणजे 2019 चा अजून मोठा पराभव त्यांच्या वाट्याला आला. तसेच रामजन्मभुमी प्रकरणी ओवैसी आणि पुरोगामी काही शिकणार नसतील तर निश्चितच काशी, मथुरा आणि गावोगाच्या मस्जिदींची प्रकरणे चव्हाट्यावर येतील. 

शहागडला शहामुनींची समाधी, श्रीगोंद्याला शेख महंमद समाधी, विजापूरला इब्राहीम अदिलशहाने बांधलेले सरस्वती मंदिर, देवगिरी किल्ल्यासमोरची चांद बोधलेंची समाधी अशी कितीतरी स्थळे हिंदूंची धार्मिक स्थळे म्हणून वाढत जातील. आम्हाला दर्गापूजन मंजूर नाही म्हणणारे कट्टरपंथी मुसलमान बाजूला पडून हे सगळं मंजूर असणारे भारतीय मुसलमान स्वत:ला वेगळं समजतील आणि यातून इस्लामच्याच दुहीची बीजं पेरली जातील.

तसेही ओवैसी किंवा इतर दक्षिण भारतीय मुलसमानांना कट्टरपंथी मुसलमान समजतच नाहीत. पूर्वी हैदराबादच्या निजामाच्या दरबारात स्थानिक मुलसमान विरूद्ध उत्तर प्रदेशातील गोमती नदीच्या किनार्‍यावरील मुसलमान यांच्यात गटबाजी असायची. हैदराबादच्या नदीचे नाव आहे मुसा. आणि हैदराबादच्या दखनी भाषेत डासांना डासच म्हणतात. मच्छर म्हणत नाहीत. त्यावरून एक म्हण तेंव्हाची फार प्रसिद्ध आहे

मुसां के डासां भौत है मगर 
गोमती के मच्छर नक्कुच नक्कु 

स्वत: ओवैसी शेरवानी आणि मुसलमानी टोपी घालून मिश्या छाटून दाढी वाढवत धार्मिक पोशाख करून वावरत असतात. त्यांच्या पक्षाचे नावही धार्मिकच आहे आणि ते मात्र इतरांना सेक्युरिझमचा शहाणपण शिकवतात. 

इथल्या बहुसंख्य हिंदूंच्या भावभावनांचा विचार करून त्यांचा आदर करूनच इथे राहण्यात मुसलमानांचे हित आहे. परकिय आक्रमक असलेल्या बाबरासाठी तूमचा प्राण कितीही तळमळला तरी त्याचा फायदा इथल्या बहुतांश भारतीय मुसलमानांना काहीच होणार नाही. तेंव्हा ओवैसी ‘बाबरा प्राण तळमळला’ हे गाणं सोडा. समर्थ रामदासांनी करुणाष्टके लिहीली आहेत. त्यातील एकच ओठावर ठेवा. तूमच्या आणि तूमच्या सर्व धर्मबांधवांचे कल्याण होईल. आणि यासाठी तूम्ही जे मुळचे हिंदू अहात ते परत होण्याचीही गरज नाही. कुठल्याही धर्माच्या माणसाचे कल्याण आमचा राम करतो.

अनुदिनि अनुतापे तापलो रामराया ।
परम दिन-दयाळा नीरसी मोह-माया ।
अचपळ मन माझे नावरे आवरीतां ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ 

(शीर्षकाचे श्रेय, पत्रकार मित्र संकेत कुलकर्णी)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

Wednesday, August 5, 2020

राममंदिराच्या धामधुमीत सीतामंदिराचे विस्मरण !


उरूस, 5 ऑगस्ट 2020 
 
सीतेची एक दंतकथा सांगीतली जाते. गरोदर असताना वनवासी सीता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात रावेरी येथे आली होती. तीने लापशीसाठी पसाभर गहू गावात मागीतले. पण गावात कुणीच तीला गहू दिले नाही. सीतेने गावाला शाप दिला की या परिसरात इथून पुढे गहूच पीकणार नाहीत. 

अशा दंतकथांचा खरेखोटेपणा कसा तपासणार? पण दोन गोष्टी अगदी प्राचीन काळापासून या गावात घडल्या. एक तर खरेच या परिसरांत गहू पीकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीतेचे एक प्राचीन मंदिर इथे आहे. पुढे गावकर्‍यांनी इ.स. 2001 मध्ये देवीची ओटी भरली माफी मागीतली. मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे कबुल केले व मगच गहु पेरायला सुरवात केली. त्याला कारण घडले ते शेतकरी संघटनेचे महिला आंदोलन.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे विदर्भात दौर्‍यावर असताना त्यांना ही कथा समजली. त्या गावात ते गेले. स्त्री शक्तीचे प्रतिक म्हणून देवी सीतेचे मंदिर आहे. तेंव्हा या मंदिराचा जिर्णाद्धार झाला पाहिजे. शेतकरी महिला आघाडीचे मोठे अधिवेशन 1986 ला चांदवड येथे संपन्न झाले होते. एकाचवेळी इतक्या महिला गोळा होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. 

रावेरी या गावी नोव्हेंबर 2001 मध्ये विशेष महिला अधिवेशन शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात आले. याच वेळी रावेरी येथील सीतामंदिराचा जिर्णाद्धार करण्याचा ठराव करण्यात आला. मा. शरद जोशी यांनी या मंदिरासाठी 10 लाखाची देणगी दिली. गावकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वेच्छानिधीतून बाकी रक्कम गोळा केली.
2 ऑक्टोबर 2010 ला शरद जोशींच्या 75 च्या निमित्त एक मोठा महिला मेळावा रावेरी येथेच घेण्यात आला. तेंव्हा सीता मंदिराचे काम पूर्ण झाले नव्हते. मंदिराचे काम पूर्ण झाल्याशिवाय मी गावात पाय ठेवणार नाही असे शरद जोशींनी सांगितले. त्यांची ही भावना लक्षात घेवून कार्यकर्त्ये/गावकरी मोठ्या जबाबदारीने कामाला लागले. वर्षभरातच गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2011 ला या सीतामंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला. शरद जोशी यांच्याच हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

आज राममंदिराची धामधुम सुरू झाली आहे. पण या सीतामंदिराची मात्र फारशी कुणाला आठवण नाही. विदर्भातील बायाबापड्या मात्र या रावेरीच्या सीतामाईला विसरल्या नाहीत. आजही या बायाबापड्या या मंदिराला आवर्जून भेट देतात.  आयोध्येतील भव्य राममंदिराचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होवून भाविकांचा सागर तेथे लोटेल. अपेक्षा आहे की रामा बाबत ज्या ज्या पवित्र स्थळांचा संदर्भ यात्रेसाठी घेतला जातो त्यात रावेरीचाही समावेश करण्यात यावा. या गावाला जाणार्‍या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. तसेच मंदिरापर्यंत जाणारा चांगला मोठा रस्ता तयार करण्यात यावा. 

सीता ही केवळ रामाची पत्नी होते असे नाही तर ती भूमीकन्या होती. त्यामुळे सीता ही केवळ पुराणातील एक व्यक्तिरेखा उरत नसून कृषीप्रधान देशात तीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.

गीतरामायणात गदिमांनी ‘आकाशाशी जडले नाते धरती मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे’ असे शब्द वापरले आहेत ते संयुक्तीक आहेत. आभाळातील पाऊस आणि धरती माता यांच्या संयोगातून शेतीला सुरवात झाली. मारून खाणारा शिकारी मानव पेरून खाणारा बनला. आणि इथून मानवी संस्कृतीची सुरवात झाली. तेंव्हा सीतेचे हे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. आजही शेतीत सर्वात जास्त मेहनत शेतकर्‍याची बायकोच करते. 

जात्यावरच्या ओव्यांमधूनही सीतेची वेदना तिची झालेली उपेक्षा हजारो वर्षांपासून आयाबायांनी स्पष्टपणे मांडून ठेवली आहे. 

राम म्हणून राम नाही सीतेच्या तोलाचा
सीतामाई हीरकणी राम हलक्या दिलाचा

अशी एक ओवीच आहे. डॉ. ना.गो. नांदापूरकरांनी गोदाकाठी जात्यावरच्या ओव्या गोळाकरून संपूर्ण रामकथाच तयार  सिद्ध करून दाखवली आहे. जगातील हे एकमेव महाकाव्य आहे की जे संपूर्णपणे लोकसाहित्यातून गोळा करत सिद्ध केल्या गेले. या स्त्रीरचित रामकथेत सीतेबाबत एक मोठी सुंदर ओवी आहे

धनुष्याचा घोडा जनकीने केला
जनका अंगणी असा खेळविला

ज्या धनुष्याला बाण लावणे मुश्किल असे धनुष्य सीता लहानपणी घोडा घोडा म्हणून जनकाच्या अंगणी खेळवीत होती. सीतेची उपेक्षा जन्मापासून झाली. अगदी रामराज्य सुरू झाल्यावरही सीतेला वनवास भोगावा लागला. आणि शेवटी भूमीच्या पोटात ती गडप झाली. भूमीतूनच आली आणि भूमीतच समाविष्ट झाली. सीता ही उपेक्षा झेलून कुटूंब सावरून धरणार्‍या भारतीय स्त्रीचे प्रतिक आहे. पंढरपुरलाही विठ्ठलाची मुर्ती एकटीच आहे. रूक्मिणी बाजूला नाही. 

बाईची उपेक्षा बायकांनी जात्यावरच्या ओव्यांत आर्तपणे मांडली आहे

बाईचा जलम जसा गांजराचा वाफा
येड्या तूम्ही मायबापा जल्मा घालून काय नफा
बाईचा जलम कुनी घातला येड्यानं
परायच्या घरी बैल राबतो भाड्यानं
बाईचा जलम जशी फुटणारी लाही
खाणारा म्हनतो कशी भाजलीच नाही

अशा खुप ओव्या आहेत. इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या परिसरांतील अशा काही ओव्या गोळा केल्या आहेत.त्यात हे स्त्रीजन्माचे दु:ख प्रकट झाले आहे.

आज राममंदिराच्या उभारणीची सुरवात होते आहे. या मुहूर्तावर सीतेच्या उपेक्षेचा म्हणजेच भारतीय स्त्रीच्या उपेक्षेचा अंत व्हावा ही अपेक्षा. महाराष्ट्रातील लोकांनी विनंती यवतमाळच्या निसर्गसंपन्न अशा डोंगराळ भागातील सीतामाईच्या रावेरी येथील मंदिराला जरूर भेट द्या.

(रावेरी सीतामंदिर छायाचित्र : सौजन्य अविनाश दुधे यांचा लेख दै. दिव्य मराठी दि. 5 ऑगस्ट 2020)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

Sunday, August 2, 2020

कुणासाठी अबोल फुलणं म्हणजे मैत्र !

                                              (विमलाबाई बीडकर- शांताबाई मानवतकर)

उरूस, 2 ऑगस्ट 2020

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभर ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा होतो.  मला माझ्या नकळत अनुभवाला आलेली एक मैत्री फार आगळी वेगळी होती. माझी आजी आईची आई विमलाबाई तुकारामपंत बीडकर ही मोठी धीराची चळवळी सामाजिक कार्यात सदा पुढे असलेली कुटूंबात सर्वांना आधार वाटणारी अशी व्यक्ती होती. माझं हे आजोळचे घर परभणीच्या वडगल्लीत होते (आजही आहे. पण तिथे कुणी आता रहात नाही). वडाचा एक प्रचंड मोठा वृक्ष इथे आहे. त्यावरूनच या भागाला ‘वडगल्ली’ असे नाव पडले. या महावृक्षाची प्रचंड मोठी सावलीही खाली पसरलेली असायची. अशीच मायेची सावली इथल्या माणसांची मला लहानपणापासून अनुभवाला मिळाली. या झाडाला पंचमीला मोठा झोका टांगून उंच उंच झोके घेण्याची स्पर्धा चालायची. इतका उंच झोका आजतागायत माझ्या पाहण्यात आला नाही. त्या झोक्याची उंची पाहूनच लहानग्या पोरांचा उर दडपायचा.

या वडाच्या सावलीत जबरेश्वर महादेवाचे मंदिर आहे. परिसरांत सापडलेली अतिशय देखणी अशी दगडी मुर्ती अजूनही  मंदिरात काचेमध्ये ठेवलेली आहे. वडाच्या आणि जबरेश्वराच्या सावलीतून पुढे सरकले की रस्ता अरूंद होतो आणि त्या बोळीत जरा पुढे गेल्यावर माझ्या आजोळच्या घराची दगडी भिंत लागते. उंच जोत्यावर घराचा दगडी चौकटीत बंदिस्त लाकडी दरवाजा आहे. आत शिरलं की उजव्या बाजूला स्वयंपाकघर. पहाटे स्तोत्रासारखा आजीचा आवाज या स्वयंपाकघरातून कानावर पडायचा.

जेवून खावून पहाटेची कामं आटोपून जराशी दुपार होत असताना आजी मला हाताशी धरून शेजारच्याच गल्लीत म्हणजे सुभाष रोडला असलेल्या दुसर्‍या आजीच्या घरी घेवून जायची. ही आजी म्हणजे शांताबाई शंकरराव मानवतकर. तिला आम्ही ‘मानवतकर माई’ असं म्हणायचो. आमच्या आजीला ‘माई’ म्हणायचो. त्यांच्या घरात आमच्या आजीला ‘बीडकर माई’ म्हणायचे.

आजीच्या काळ्या दगडी भिंतीच्या पार्श्वभूमीवर या दुसर्‍या आजीच्या घराची दर्शनी भिंत पांढर्‍या चुन्यानं रंगवलेली होती. या पांढर्‍या भिंतीत हिरव्या रंगाचा दरवाजा होता. हा घराच्या वापराचा लहान दरवाजा. याच दरवाज्याला लागून जराशा अंतरावर ओटा आणि एक मोठा दरवाजा होता. हा मोठा दरवाजा आजोबांच्या (ऍड. शंकरराव मानवतकर) कार्यालयाचा होता. ते मोठे नामंकित वकिल होते. त्यांना सगळे बाबा म्हणायचे. त्या खोलीच्या वाट्याला आम्ही कधी जायचो नाही.

छोट्या दरवाज्यातून आत गेलो की बसक्या इमारतीच्या समोर मोकळे अंगण होते. यात विविध झाडे लावलेली होती.  ही बसकी इमारत मला विलक्षण जवळची वाटायची. एखादी उंच जोत्यावरची टोलेजंग इमारत आपली छाती दडपून टाकते. या बसक्या इमारतीत समोर ओसरी होती. तिला लागून डाव्या बाजूला स्वयंपाकघराची आडवी खोली होती.ओसरी मागे एक परत अंगण होते. अशी एक मोकळी ढोकळी रचना या घराची होती.

आजीच्या हाताला धरून मी या दुसर्‍या आजीच्या घरात जायचो तेंव्हा माझ्याशी खेळायला माझ्या वयाचे तिथे कुणी नव्हते. सगळ्यात लहान मामा (डॉ. रविंद्र मानवतकर) हाही माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठा. याचा एक वेगळाच फायदा म्हणजे सगळेच माझे विविध पद्धतीने लाड करायचे.

या घरात सर्वत्र स्वच्छंद बागडणे हाच माझा आडीचा कार्यक्रम. अगदी क्वचित का होईना आजोबांच्या कार्यालयातील खोलीत गेलो की तेथील उंच उंच कपाटात बंदिस्त मोठ मोठी पुस्तके नजरेला पडायची. एरव्ही कुणाला त्याचा धाक वाटत असेल पण मला ते दृष्य ओळखीचे होते. कारण माझे वडिल वकिल असल्या कारणाने असली पुस्तकांची टोलेजंग कपाटे माझ्या दृश्य परिचयाची होती. मोठ्या भिंगाचा चष्मा घातलेले करारी उग्र वाटणारे मानवतकर बाबा मला मात्र तसे कधी वाटले नाहीत. कदाचित नातवंडांना आजोबाचा एक वेगळा पैलू वाट्याला येत असल्यामुळे असेल.

मानवतकर माई हे एक अतिशय वेगळे रसायन. घरातले सणवार करताना सोवळे ओवळे पाळताना मी तिला पहात आलो तसेच सामाजिक पातळीवर निवडणुक लढवताना महिला मंडळात काम करत असतानाही पहात आलो. गंमत म्हणजे माझी आजी कॉंग्रेसमध्ये तर मानवतकर माई सामजवादी पक्षात होत्या. (माझे सख्खे मोठे काका कॉंग्रेसमध्ये तर वडिल मानवतकर बाबांसोबत डाव्या पक्षांत). विरोधी पक्षात असूनही त्यांच्या दाट मैत्रीवर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. त्यावर स्वतंत्रपणे लिहावे लागेल. माईं तशा सरळ आमच्या नात्यात नव्हत्या. पण त्या काळात घराची आख्ख्या घराशीच मैत्री असायची. माईंची सर्व मुले मुली आमच्यासाठी मावशी मामाच असायचे. पुढे सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना या बायकांनी त्या काळात किती मोठी कामगिरी पार पाडली ते मला तीव्रतेनं जाणवलं. त्यांनी घरेच्या घरे जोडली होती. आणि यासाठी आपण सामाजिक काम करत आहोत असा कुठलाही आव आणला नाही. दहा पंधरा वर्षे नगरसेविका राहिलेली माझी आज्जी आणि मानवतकर माई या रूढ अर्थाने राजकारणी कधीच नव्हत्या. आपल्या घरसंसारा सोबतच त्यांनी समाजाचा संसार सांभाळला. मी मोठा नातू असल्याने या आज्ज्या त्यांच्या कर्तबगारीच्या वयात आम्हाला पहायला मिळाल्या.

माईंचा आवाज अतिशय गोड होता. त्याकाळची भावगीतं त्या म्हणायच्या त्याचा एक सुरेल संस्कार माझ्यावर नकळत झाला. माझ्या आजीला गाण्याची विशेष अशी काही गोडी नव्हती. ती कधी गाताना मी ऐकलंही नाही. पण मानवतकर माईंकडे गेल्यावर मात्र ती माईंना काहीतरी गाण्याचा आग्रह करायची. मानवतकर माईंही सहजपणे ‘बोला अमृत बोला’, ‘राधे तूझा सैल अंबाडा’, ‘कबीराचे विणतो शेले’ अशा काही रचना गायच्या. माणिक वर्मा, माणिक भिडे, ज्योत्स्ना भो़ळे अशा तेंव्हाच्या लोकप्रिय गायीकांची ती गाणी असायची.

‘फ्रेंडशीप डे’ साजरा होत असताना माझ्या अचानक लक्षात आले की आपल्या आजीची ही तेंव्हाची मैत्रिणच होती. आणि आपण जे काही अनुभवले तो मैत्रीचाच अविष्कार होता. माझी आजी आणि मानवतकर माई यांच्या या गोड नात्यावर मला कविता सुचली. ती कविता म्हणजेच ‘मैत्र’. ही कविता लिहीली तेंव्हा त्या दोघीही हयात होत्या. त्यांना वाचून दाखली तेंव्हा दोघीही गालातल्या गालात मस्त हसल्या. माझ्या कवितेला मिळालेले हे सगळ्यात मोठे पारितोषक.

आज जागतिक मैत्र दिना निमित्त सर्व रसिकांना ही कविता सादर..

मैत्र

कामानं उतू जाणारी पहाट
चुलीवरून उतरवून
रेंगाळणारी वामकुक्षी
चटकन उरकून
एखाद्या रित्या दुपारी
आजी निघायची
मला हाताशी घेऊन
दुसर्‍या आजीच्या घरी

दार उघडल्यावर
डोळ्यांच्या कोपर्‍यातून
ती मऊ हसायची
अंगणासकट सगळं घरच
उबदार दुलई भासायची

माजघरात चटईवर
काळीज उसवत
दोघीही विसावायच्या सैल
माझ्यासाठी वाटीत खाऊ
संक्रांतीची बोळकी, पोळ्याचे बैल

अंगणात फुलपाखरामागे धावताना
हळूच मागे भिरभिरत यायचे
माजघरातून तिच्या गाण्याचे सूर
ओंजळभर गाण्याचा
पुरता बुडून जावा मी
इतका दाटून यायचा पूर

काहीच न सुचून
मी तोडू लागायचो
गाणं एैकत फुलू पाहणार्‍या
काटेकोरांटीच्या टपोर कळ्या
ती ओवून घ्यायची दोर्‍यात सगळ्या
आजीच्या अंबाड्यावर माळून द्यायची गजरा

परतताना
आजीच्या फुललेल्या चेहर्‍याकडे बघून
मी विचारायचो न राहवून
‘ती ग तूझी कोण?’
आजी म्हणायची ‘मैत्रिण !’

माझ्या चिमुकल्या मेंदूत
आता उलगडतंय सूत्र
कुणासाठी अबोल फुलणं म्हणजे मैत्र.

0

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575