Wednesday, August 5, 2020

राममंदिराच्या धामधुमीत सीतामंदिराचे विस्मरण !


उरूस, 5 ऑगस्ट 2020 
 
सीतेची एक दंतकथा सांगीतली जाते. गरोदर असताना वनवासी सीता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात रावेरी येथे आली होती. तीने लापशीसाठी पसाभर गहू गावात मागीतले. पण गावात कुणीच तीला गहू दिले नाही. सीतेने गावाला शाप दिला की या परिसरात इथून पुढे गहूच पीकणार नाहीत. 

अशा दंतकथांचा खरेखोटेपणा कसा तपासणार? पण दोन गोष्टी अगदी प्राचीन काळापासून या गावात घडल्या. एक तर खरेच या परिसरांत गहू पीकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीतेचे एक प्राचीन मंदिर इथे आहे. पुढे गावकर्‍यांनी इ.स. 2001 मध्ये देवीची ओटी भरली माफी मागीतली. मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे कबुल केले व मगच गहु पेरायला सुरवात केली. त्याला कारण घडले ते शेतकरी संघटनेचे महिला आंदोलन.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे विदर्भात दौर्‍यावर असताना त्यांना ही कथा समजली. त्या गावात ते गेले. स्त्री शक्तीचे प्रतिक म्हणून देवी सीतेचे मंदिर आहे. तेंव्हा या मंदिराचा जिर्णाद्धार झाला पाहिजे. शेतकरी महिला आघाडीचे मोठे अधिवेशन 1986 ला चांदवड येथे संपन्न झाले होते. एकाचवेळी इतक्या महिला गोळा होण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ. 

रावेरी या गावी नोव्हेंबर 2001 मध्ये विशेष महिला अधिवेशन शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात आले. याच वेळी रावेरी येथील सीतामंदिराचा जिर्णाद्धार करण्याचा ठराव करण्यात आला. मा. शरद जोशी यांनी या मंदिरासाठी 10 लाखाची देणगी दिली. गावकरी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वेच्छानिधीतून बाकी रक्कम गोळा केली.
2 ऑक्टोबर 2010 ला शरद जोशींच्या 75 च्या निमित्त एक मोठा महिला मेळावा रावेरी येथेच घेण्यात आला. तेंव्हा सीता मंदिराचे काम पूर्ण झाले नव्हते. मंदिराचे काम पूर्ण झाल्याशिवाय मी गावात पाय ठेवणार नाही असे शरद जोशींनी सांगितले. त्यांची ही भावना लक्षात घेवून कार्यकर्त्ये/गावकरी मोठ्या जबाबदारीने कामाला लागले. वर्षभरातच गांधी जयंतीच्या निमित्ताने 2 ऑक्टोबर 2011 ला या सीतामंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला. शरद जोशी यांच्याच हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

आज राममंदिराची धामधुम सुरू झाली आहे. पण या सीतामंदिराची मात्र फारशी कुणाला आठवण नाही. विदर्भातील बायाबापड्या मात्र या रावेरीच्या सीतामाईला विसरल्या नाहीत. आजही या बायाबापड्या या मंदिराला आवर्जून भेट देतात.  आयोध्येतील भव्य राममंदिराचे काम सुरू झाले आहे. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होवून भाविकांचा सागर तेथे लोटेल. अपेक्षा आहे की रामा बाबत ज्या ज्या पवित्र स्थळांचा संदर्भ यात्रेसाठी घेतला जातो त्यात रावेरीचाही समावेश करण्यात यावा. या गावाला जाणार्‍या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. तसेच मंदिरापर्यंत जाणारा चांगला मोठा रस्ता तयार करण्यात यावा. 

सीता ही केवळ रामाची पत्नी होते असे नाही तर ती भूमीकन्या होती. त्यामुळे सीता ही केवळ पुराणातील एक व्यक्तिरेखा उरत नसून कृषीप्रधान देशात तीला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.

गीतरामायणात गदिमांनी ‘आकाशाशी जडले नाते धरती मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे’ असे शब्द वापरले आहेत ते संयुक्तीक आहेत. आभाळातील पाऊस आणि धरती माता यांच्या संयोगातून शेतीला सुरवात झाली. मारून खाणारा शिकारी मानव पेरून खाणारा बनला. आणि इथून मानवी संस्कृतीची सुरवात झाली. तेंव्हा सीतेचे हे महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. आजही शेतीत सर्वात जास्त मेहनत शेतकर्‍याची बायकोच करते. 

जात्यावरच्या ओव्यांमधूनही सीतेची वेदना तिची झालेली उपेक्षा हजारो वर्षांपासून आयाबायांनी स्पष्टपणे मांडून ठेवली आहे. 

राम म्हणून राम नाही सीतेच्या तोलाचा
सीतामाई हीरकणी राम हलक्या दिलाचा

अशी एक ओवीच आहे. डॉ. ना.गो. नांदापूरकरांनी गोदाकाठी जात्यावरच्या ओव्या गोळाकरून संपूर्ण रामकथाच तयार  सिद्ध करून दाखवली आहे. जगातील हे एकमेव महाकाव्य आहे की जे संपूर्णपणे लोकसाहित्यातून गोळा करत सिद्ध केल्या गेले. या स्त्रीरचित रामकथेत सीतेबाबत एक मोठी सुंदर ओवी आहे

धनुष्याचा घोडा जनकीने केला
जनका अंगणी असा खेळविला

ज्या धनुष्याला बाण लावणे मुश्किल असे धनुष्य सीता लहानपणी घोडा घोडा म्हणून जनकाच्या अंगणी खेळवीत होती. सीतेची उपेक्षा जन्मापासून झाली. अगदी रामराज्य सुरू झाल्यावरही सीतेला वनवास भोगावा लागला. आणि शेवटी भूमीच्या पोटात ती गडप झाली. भूमीतूनच आली आणि भूमीतच समाविष्ट झाली. सीता ही उपेक्षा झेलून कुटूंब सावरून धरणार्‍या भारतीय स्त्रीचे प्रतिक आहे. पंढरपुरलाही विठ्ठलाची मुर्ती एकटीच आहे. रूक्मिणी बाजूला नाही. 

बाईची उपेक्षा बायकांनी जात्यावरच्या ओव्यांत आर्तपणे मांडली आहे

बाईचा जलम जसा गांजराचा वाफा
येड्या तूम्ही मायबापा जल्मा घालून काय नफा
बाईचा जलम कुनी घातला येड्यानं
परायच्या घरी बैल राबतो भाड्यानं
बाईचा जलम जशी फुटणारी लाही
खाणारा म्हनतो कशी भाजलीच नाही

अशा खुप ओव्या आहेत. इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या परिसरांतील अशा काही ओव्या गोळा केल्या आहेत.त्यात हे स्त्रीजन्माचे दु:ख प्रकट झाले आहे.

आज राममंदिराच्या उभारणीची सुरवात होते आहे. या मुहूर्तावर सीतेच्या उपेक्षेचा म्हणजेच भारतीय स्त्रीच्या उपेक्षेचा अंत व्हावा ही अपेक्षा. महाराष्ट्रातील लोकांनी विनंती यवतमाळच्या निसर्गसंपन्न अशा डोंगराळ भागातील सीतामाईच्या रावेरी येथील मंदिराला जरूर भेट द्या.

(रावेरी सीतामंदिर छायाचित्र : सौजन्य अविनाश दुधे यांचा लेख दै. दिव्य मराठी दि. 5 ऑगस्ट 2020)

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

Sunday, August 2, 2020

कुणासाठी अबोल फुलणं म्हणजे मैत्र !

                                              (विमलाबाई बीडकर- शांताबाई मानवतकर)

उरूस, 2 ऑगस्ट 2020

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार जगभर ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून साजरा होतो.  मला माझ्या नकळत अनुभवाला आलेली एक मैत्री फार आगळी वेगळी होती. माझी आजी आईची आई विमलाबाई तुकारामपंत बीडकर ही मोठी धीराची चळवळी सामाजिक कार्यात सदा पुढे असलेली कुटूंबात सर्वांना आधार वाटणारी अशी व्यक्ती होती. माझं हे आजोळचे घर परभणीच्या वडगल्लीत होते (आजही आहे. पण तिथे कुणी आता रहात नाही). वडाचा एक प्रचंड मोठा वृक्ष इथे आहे. त्यावरूनच या भागाला ‘वडगल्ली’ असे नाव पडले. या महावृक्षाची प्रचंड मोठी सावलीही खाली पसरलेली असायची. अशीच मायेची सावली इथल्या माणसांची मला लहानपणापासून अनुभवाला मिळाली. या झाडाला पंचमीला मोठा झोका टांगून उंच उंच झोके घेण्याची स्पर्धा चालायची. इतका उंच झोका आजतागायत माझ्या पाहण्यात आला नाही. त्या झोक्याची उंची पाहूनच लहानग्या पोरांचा उर दडपायचा.

या वडाच्या सावलीत जबरेश्वर महादेवाचे मंदिर आहे. परिसरांत सापडलेली अतिशय देखणी अशी दगडी मुर्ती अजूनही  मंदिरात काचेमध्ये ठेवलेली आहे. वडाच्या आणि जबरेश्वराच्या सावलीतून पुढे सरकले की रस्ता अरूंद होतो आणि त्या बोळीत जरा पुढे गेल्यावर माझ्या आजोळच्या घराची दगडी भिंत लागते. उंच जोत्यावर घराचा दगडी चौकटीत बंदिस्त लाकडी दरवाजा आहे. आत शिरलं की उजव्या बाजूला स्वयंपाकघर. पहाटे स्तोत्रासारखा आजीचा आवाज या स्वयंपाकघरातून कानावर पडायचा.

जेवून खावून पहाटेची कामं आटोपून जराशी दुपार होत असताना आजी मला हाताशी धरून शेजारच्याच गल्लीत म्हणजे सुभाष रोडला असलेल्या दुसर्‍या आजीच्या घरी घेवून जायची. ही आजी म्हणजे शांताबाई शंकरराव मानवतकर. तिला आम्ही ‘मानवतकर माई’ असं म्हणायचो. आमच्या आजीला ‘माई’ म्हणायचो. त्यांच्या घरात आमच्या आजीला ‘बीडकर माई’ म्हणायचे.

आजीच्या काळ्या दगडी भिंतीच्या पार्श्वभूमीवर या दुसर्‍या आजीच्या घराची दर्शनी भिंत पांढर्‍या चुन्यानं रंगवलेली होती. या पांढर्‍या भिंतीत हिरव्या रंगाचा दरवाजा होता. हा घराच्या वापराचा लहान दरवाजा. याच दरवाज्याला लागून जराशा अंतरावर ओटा आणि एक मोठा दरवाजा होता. हा मोठा दरवाजा आजोबांच्या (ऍड. शंकरराव मानवतकर) कार्यालयाचा होता. ते मोठे नामंकित वकिल होते. त्यांना सगळे बाबा म्हणायचे. त्या खोलीच्या वाट्याला आम्ही कधी जायचो नाही.

छोट्या दरवाज्यातून आत गेलो की बसक्या इमारतीच्या समोर मोकळे अंगण होते. यात विविध झाडे लावलेली होती.  ही बसकी इमारत मला विलक्षण जवळची वाटायची. एखादी उंच जोत्यावरची टोलेजंग इमारत आपली छाती दडपून टाकते. या बसक्या इमारतीत समोर ओसरी होती. तिला लागून डाव्या बाजूला स्वयंपाकघराची आडवी खोली होती.ओसरी मागे एक परत अंगण होते. अशी एक मोकळी ढोकळी रचना या घराची होती.

आजीच्या हाताला धरून मी या दुसर्‍या आजीच्या घरात जायचो तेंव्हा माझ्याशी खेळायला माझ्या वयाचे तिथे कुणी नव्हते. सगळ्यात लहान मामा (डॉ. रविंद्र मानवतकर) हाही माझ्यापेक्षा दहा पंधरा वर्षांनी मोठा. याचा एक वेगळाच फायदा म्हणजे सगळेच माझे विविध पद्धतीने लाड करायचे.

या घरात सर्वत्र स्वच्छंद बागडणे हाच माझा आडीचा कार्यक्रम. अगदी क्वचित का होईना आजोबांच्या कार्यालयातील खोलीत गेलो की तेथील उंच उंच कपाटात बंदिस्त मोठ मोठी पुस्तके नजरेला पडायची. एरव्ही कुणाला त्याचा धाक वाटत असेल पण मला ते दृष्य ओळखीचे होते. कारण माझे वडिल वकिल असल्या कारणाने असली पुस्तकांची टोलेजंग कपाटे माझ्या दृश्य परिचयाची होती. मोठ्या भिंगाचा चष्मा घातलेले करारी उग्र वाटणारे मानवतकर बाबा मला मात्र तसे कधी वाटले नाहीत. कदाचित नातवंडांना आजोबाचा एक वेगळा पैलू वाट्याला येत असल्यामुळे असेल.

मानवतकर माई हे एक अतिशय वेगळे रसायन. घरातले सणवार करताना सोवळे ओवळे पाळताना मी तिला पहात आलो तसेच सामाजिक पातळीवर निवडणुक लढवताना महिला मंडळात काम करत असतानाही पहात आलो. गंमत म्हणजे माझी आजी कॉंग्रेसमध्ये तर मानवतकर माई सामजवादी पक्षात होत्या. (माझे सख्खे मोठे काका कॉंग्रेसमध्ये तर वडिल मानवतकर बाबांसोबत डाव्या पक्षांत). विरोधी पक्षात असूनही त्यांच्या दाट मैत्रीवर त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. त्यावर स्वतंत्रपणे लिहावे लागेल. माईं तशा सरळ आमच्या नात्यात नव्हत्या. पण त्या काळात घराची आख्ख्या घराशीच मैत्री असायची. माईंची सर्व मुले मुली आमच्यासाठी मावशी मामाच असायचे. पुढे सार्वजनिक क्षेत्रात काम करत असताना या बायकांनी त्या काळात किती मोठी कामगिरी पार पाडली ते मला तीव्रतेनं जाणवलं. त्यांनी घरेच्या घरे जोडली होती. आणि यासाठी आपण सामाजिक काम करत आहोत असा कुठलाही आव आणला नाही. दहा पंधरा वर्षे नगरसेविका राहिलेली माझी आज्जी आणि मानवतकर माई या रूढ अर्थाने राजकारणी कधीच नव्हत्या. आपल्या घरसंसारा सोबतच त्यांनी समाजाचा संसार सांभाळला. मी मोठा नातू असल्याने या आज्ज्या त्यांच्या कर्तबगारीच्या वयात आम्हाला पहायला मिळाल्या.

माईंचा आवाज अतिशय गोड होता. त्याकाळची भावगीतं त्या म्हणायच्या त्याचा एक सुरेल संस्कार माझ्यावर नकळत झाला. माझ्या आजीला गाण्याची विशेष अशी काही गोडी नव्हती. ती कधी गाताना मी ऐकलंही नाही. पण मानवतकर माईंकडे गेल्यावर मात्र ती माईंना काहीतरी गाण्याचा आग्रह करायची. मानवतकर माईंही सहजपणे ‘बोला अमृत बोला’, ‘राधे तूझा सैल अंबाडा’, ‘कबीराचे विणतो शेले’ अशा काही रचना गायच्या. माणिक वर्मा, माणिक भिडे, ज्योत्स्ना भो़ळे अशा तेंव्हाच्या लोकप्रिय गायीकांची ती गाणी असायची.

‘फ्रेंडशीप डे’ साजरा होत असताना माझ्या अचानक लक्षात आले की आपल्या आजीची ही तेंव्हाची मैत्रिणच होती. आणि आपण जे काही अनुभवले तो मैत्रीचाच अविष्कार होता. माझी आजी आणि मानवतकर माई यांच्या या गोड नात्यावर मला कविता सुचली. ती कविता म्हणजेच ‘मैत्र’. ही कविता लिहीली तेंव्हा त्या दोघीही हयात होत्या. त्यांना वाचून दाखली तेंव्हा दोघीही गालातल्या गालात मस्त हसल्या. माझ्या कवितेला मिळालेले हे सगळ्यात मोठे पारितोषक.

आज जागतिक मैत्र दिना निमित्त सर्व रसिकांना ही कविता सादर..

मैत्र

कामानं उतू जाणारी पहाट
चुलीवरून उतरवून
रेंगाळणारी वामकुक्षी
चटकन उरकून
एखाद्या रित्या दुपारी
आजी निघायची
मला हाताशी घेऊन
दुसर्‍या आजीच्या घरी

दार उघडल्यावर
डोळ्यांच्या कोपर्‍यातून
ती मऊ हसायची
अंगणासकट सगळं घरच
उबदार दुलई भासायची

माजघरात चटईवर
काळीज उसवत
दोघीही विसावायच्या सैल
माझ्यासाठी वाटीत खाऊ
संक्रांतीची बोळकी, पोळ्याचे बैल

अंगणात फुलपाखरामागे धावताना
हळूच मागे भिरभिरत यायचे
माजघरातून तिच्या गाण्याचे सूर
ओंजळभर गाण्याचा
पुरता बुडून जावा मी
इतका दाटून यायचा पूर

काहीच न सुचून
मी तोडू लागायचो
गाणं एैकत फुलू पाहणार्‍या
काटेकोरांटीच्या टपोर कळ्या
ती ओवून घ्यायची दोर्‍यात सगळ्या
आजीच्या अंबाड्यावर माळून द्यायची गजरा

परतताना
आजीच्या फुललेल्या चेहर्‍याकडे बघून
मी विचारायचो न राहवून
‘ती ग तूझी कोण?’
आजी म्हणायची ‘मैत्रिण !’

माझ्या चिमुकल्या मेंदूत
आता उलगडतंय सूत्र
कुणासाठी अबोल फुलणं म्हणजे मैत्र.

0

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Saturday, August 1, 2020

टिळक पुण्यतिथी आणि टरफलाचा ढीग


उरूस, 1 ऑगस्ट 2020

आज 50 पेक्षा जास्त ज्यांचे वय असेल त्यांना 1 ऑगस्टचे वैशिष्ट्य एकदम लक्षात येईल. जूनमध्ये प्रवेशाची गडबड संपून शाळा जूलै महिन्यात स्थिरावलेल्या असायच्या. पहिल्या घटक चाचणीला अजून वेळ असायचा. अशा मोकळ्या दिवसांत, श्रावणाच्या प्रसन्न वातावरणात टिळक जयंती यायची. टिळक जयंती म्हणजे वादविवाद, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा यांचा सुळसुळाट असायचा. 1 ऑगस्टला यापैकी एखादी स्पर्धा घेतली नाही तर त्या शाळेची मंजूरी काढून घ्यावी असा काही अलिखित जीआर होता की काय कळायला मार्ग नाही.

टिळकांवर भाषण करताना काही ठराविक मुद्दे पोथीतल्या सारखे वारंवार सांगितले जायचे. चिखलातून कमळ उगवावे तसे चिखली या गावी बाळ गंगाधर टिळक नावाचे कमळ जन्मले, संत हा शब्द टिळकांनी कसा तीन प्रकारे लिहून दाखवला आणि मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही. या तीन भोज्यांना शिवल्याशिवाय टिळक जयंतीच्या भाषणाची गाडी पुढे सरकतच नसे.

खरं तर अपेक्षा अशी होती की या निमित्ताने मुलांनी टिळकांचे काही वाचावे. पुढे चालून मोठ्या वर्गांना या निमित्ताने विविध विषय वादविवाद/वक्तृत्व स्पर्धेसाठी दिले जायचे. त्यातही अपेक्षा हीच की त्या विषयाबाबत काही तरी वाचन या विद्यार्थ्यांनी करावे. आणि नेमकं घडायचं असं की वेगळं काहीच न वाचता घोकंपट्टी करून मुलं यायची. तीच तीच भाषणं त्याच शैलीत चालत रहायची.

मी बाल विद्या मंदिर परभणी या शाळेत शिकलो. आम्ही सातवीत असताना आमच्या वर्गशिक्षकांनी एकदा आमची फिरकीच घेतली. टिळक जयंती निमित्त एक भित्तीपत्रक काढायचे ठरवले. त्यासाठी चांगलं अक्षर असणारे शुद्धलेखन चांगले असणारे सोबतची चार पाच मित्र मैत्रिण निवडल्या गेले. पुढे त्यांनी त्यांचे काम चांगलं पार पाडलेही. पण या अंकासाठी मजकूर तयार करून द्यायची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यासाठी शाळेचे ग्रंथालय आणि आमच्या गावचे अतिशय प्रसिद्ध गणेश वाचनालय इथे जावून मी ते पार पाडावे असे सरांनी सांगितले. घरच्यांची परवानगीच काय पण त्यांचे प्रोत्साहनच असायचे अशा कामासाठी. शिवाय वडिल गणेश वाचनालयाच्या कार्यकारी मंडळावर.

तिथे जावून पुस्तकं शोधताना न.र.फाटकांचे ‘लोकमान्य’ आणि न.चि.केळकरांच्या ‘टिळक चरित्राचे’ तीन खंड माझ्या हाती लागले. त्यातून काही एक मजकूर वाचून शाळेच्या हस्तलिखितासाठी आम्ही जमवा जमव केली. मजकुराचा दर्जा कसा होता सांगता यायचे नाही पण अंक चांगला तयार झाला. त्याला बक्षिसही मिळाले. वस्तूत: फार काही आम्ही केलं असं नाही पण निदान मुळ पुस्तके शोधून चाळली तरी. अंकाच्या देखणेपणाबद्दलच प्रतिक्रिया आल्या. मजकुराबाबत आमचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक, दोन चार इतर जाणकार शिक्षक आणि दोन चार सजग पालक वगळता कुणी फारसं काही बोललं नाही.

 35 वर्षांनी पुढे औरंगाबादला एक नामंकित शाळेत 1 ऑगस्टला वादविाद स्पर्धेसाठी मला परिक्षक म्हणून बोलविण्यात आले होते. ज्यांना बक्षिसं मिळाली त्यांच्यासोबत अल्पोपहार करत गप्पा मारताना मी उत्सुकतेने विचारले की तूम्ही टिळकांचे/टिळकांवरचे काय वाचले? त्या मुलांनी एकमेकांच्या तोंडाकडे पहायला सुरवात केली. त्यांना त्यांच्या शिक्षकांनी आणि घरी आई वडिल मोठा भाउ बहिण यांनी जी काही तयारी करून दिली होती तेवढीच. त्यांनी स्वतंत्रपणे काहीच वाचले नव्हते. त्यांना मी वाचन करण्याचा सल्ला दिला. किमान वर्तमानपत्रे तरी वाचा असे सांगितले.

पण मला खरा झटका पुढे महाविद्यालयीन पताळीवरील विद्यार्थ्यांनी दिला. एका महाविद्यालयात मराठवाड्यातील मोठ्या नावाजलेल्या स्पर्धेसाठी मला परिक्षक म्हणून आमंत्रित केले. तेथे वक्त्यांचा दर्जा पाहून मी प्रचंड नाराज झालो. बक्षिस मिळालेल्यांसोबत चर्चा करताना त्यांचेही वाचन अतिशय तोकडे असल्याचे लक्षात आले. निदान शाळेतली मुले काहीशी निरागस होती. साधेपणा त्यांच्या बोलण्यात होता. पण महाविद्यालयीन मुलं परिक्षकांना काय आवडतं त्या प्रमाणे आपले वक्तृत्व बेतावे, ठरवून काही कवितांच्या ओळी वापराव्या, शब्दांचे खेळ करावेत अशी इरसाल बनली होती. हे तर अजूनच धोकादायक. म्हणजे स्पर्धा स्पर्धा असा खेळच काही वक्त्यांच्या बाबतीत होवून बसला असल्याचे मला लक्षात आले.

मला स्वत:ला सातवीत असताना माझ्या शिक्षक/पालक यांच्यामुळे जाणीव झाली की मुळ पुस्तके शोधली पाहिजेत. हे काही कुणा अभ्यासकाच्या दृष्टीने नाही सांगत. किमान सजग वाचक म्हणून आपण मुलांकडून काही एक वाचून घेतले पाहिजे. त्यांच्यापैकी ज्यांना गोडी आहे त्यांना पोषक वातावरण तयार केले पाहिजे.
मी ही केवळ कोरडी सुचना करतो आहे असे नाही. पार्थ बावस्कर हा माझ्या लहान मुलाचा वर्गमित्र त्याला आवडीच्या विषय अभ्यासाकडे वळताना मी पाहिले आहे. माझ्या स्वत:च्या लहान मुलाला अश्विन उमरीकर याला आवडीची संगीतावरची, नामंकित कायदेतज्ज्ञांची चरित्रे आत्मचरित्रे विकत घेवून वाचण्याची सवय लागलेली मी पाहिले आहे. माझी लहान मुलगी अवनी हीला संत नामदेवांचा अभंग ‘जैसे वृक्ष नेणे मान अपमान’ अभ्यासक्रमाला (इ. 9 वी मराठी) आहे. मी तिच्या हातात नामदेवांची सटीप गाथाच ठेवली. आणि त्यातून अर्थ शोधून काढायला सांगितलं. असं आपण जर प्रोत्साहन देत असू तर किमान ज्याला गोडी आहे त्याची तर वाढ होवू शकेल.

पण या ऐवजी आपण नुसते पोपट तयार करणार असू तर त्याचा काय फायदा? कुठल्याही चांगल्या वक्त्याला शालेय महाविद्यालयीन पातळीवर चांगली पुस्तके उपलब्ध करून त्याला वाचनाकडे अभ्यासाकडे वळवले पाहिजे.

मला माझ्या शालेय अनुभवाच्या अधीचे फारसे काही माहित नाही. पण इ.स. 1983 पासून ते इ.स. 2017 पर्यंत असा जवळपास 35 वर्षांचा माझा अनुभव आहे आपण 1 ऑगस्टच्या निमित्ताने भरपूर कचरा निर्माण केला आहे. शेंगा कुठे हरवून गेल्या कळत नाही नुसती टरफलंच ढीगानं गोळा झाली आहेत.

(टिळकांचे छायाचित्र निवडताना पुस्तकांसोबतचे घेतले आहे )


          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, July 30, 2020

‘उसवलेले दिवस’- बाबा आमटेंवर काही प्रश्‍न


उरूस, 30 जूलै 2020

दैनिक लोकसत्तामधून बाबा आमटेंच्या आनंदवनवर दोन भागाची लेखमाला प्रसिद्ध झाली. त्यावर आता बर्‍याच प्रतिक्रिया उमटत आहेत. परत एकदा सामाजिक चळवळींची चिकित्सा केली जात आहे.

शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी अंतर्नादच्या दिवाळी अंकात, ‘बस करा हे समाजसेवेचे ढोंग’ हा लेख (अंतर्नाद दिवाळी 1999) लिहीला होता. त्यावरही तेंव्हा बरेच वादंग उठले होते.

यातले दोन उल्लेख इथे नमुनादाखल देतो आहे. शरद जोशी लिहीतात, ‘.. दुसर्‍याचा उद्धार करणयातली झिंग ही काही और असते. बर्‍याच स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांमध्ये मला एक आत्मकौतुकी भावना आढळते. स्वत:वरच ते कमालीचे खूश असतात. वरवर जरी त्यांनी आपण हे सर्व इतरांसाठी करतो असा आव आणला तरी प्रत्यक्षात मात्र आपल्या तोजोवलयात इतरांना सामील करून घ्यायची त्यांची अजीबात तयारी नसते. सामाजिहितापेक्षा आपल्या संस्थेची महती, प्रॉपर्टी व एकूण स्थान कसे उंचावेल याच्यावरतीच त्यांचे जास्त लक्ष असते. तुम्ही त्यांच्या विविध संस्थांची ट्रस्ट डिड एकवार बघा. यातल्या बहुतेक जणांनी विश्‍वस्त म्हणून आपणच तहहयात राहू याची तजवीज करून ठेवलेली असते. बाहेर यांनी लोकशाही मुल्यांचा कितीही गवगवा केला तरी स्वत:च्या संस्था मात्र ते ‘हम करे सो कायदा’ याच भूमिकेतून चालवीत असतात.’ (अंगारमळा, पृ. 167, प्रकाशक-जनशक्ती वाचक चळवळ)

शरद जोशींनी यांचे हे विचार इतर सामाजिक चळवळींना लागू पडतात. पण प्रत्यक्षात कुष्ठरोग निर्मुलनाला साठी लिहीलेले बघा, ‘,,, एकेकाळी कुष्ठरोग ही एक महाभयंकर समस्या होती. महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचे काम सुरू केले. त्यातून अनेकांनी स्फुर्ती घेली. आपापले आश्रम, नगरे, वन स्थापली. उदंड सरकारी आणि खाजगी निधी मिळवले. पण कुष्ठरोग मुळातून नष्ट करण्यासाठी लागणारे संशोधनाचे कार्य कोणी हाती घेतले नाही. कोण्या अनामिक संशोकाने ते केले, त्यामुळे कुष्ठरोग आता साध्य बनला. त्याची किळसही फारशी राहिली नाही; पण तरी त्यांच्या सेवेचे व्रत घेतलेल्या महात्म्यांच्या धुपारत्या शेजारत्या चालूच आहेत. कुष्ठरोग संपला तर दुसर्‍या कोणाच्या सेवेचे काम घेऊ. कोणा दुष्टाने हा कुष्ठरोग संपवला कोण जाणे. पण त्यामुळे आमच्या विभुतीतील ‘ज्वाला आणि फुले’ संपली नाहीत, असा त्यांचा निर्धार आहे.’ (अंगारमळा, पृ. 175) 

शाहू पाटोळे हे तरूणपणी बाबा आमटेंच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी शाहू पाटोळे यांचे वय 23 वर्षाचे होते. (शाहू पाटोळे सध्या नागालँड मध्ये कोहिमा आकाशवाणीच्या वृत्त विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. नुकतीच मुंबई दूरदर्शन येथे त्यांची बदली झाली आहे)

भारत जोडो यात्रेच्या काळात त्यांना समाजवादी चळवळीबद्दल प्रश्‍न पडायला लागले. त्याची मर्यादा जाणवायला लागली. त्यांनी हे प्रश्‍न समोर मांडले तर त्यांना हळू हळू बेदखल करण्यात आले. नंतर तर त्यांना या संपूर्ण चळवळीतूनच बाहेरचा रस्ता दाखवला गेला. दुसर्‍या यात्रेत त्यांना सहभागी करून घेण्यात आले नाही.

या चळवळीबद्दल त्यांनी तेंव्हाही लेखन केले होते. लातूरच्या दै. राजधर्म शिवाय कुणीच त्यांचे हे परखड लिखाण छापले नाही. ‘जयकारा’ या पंजाबी साप्ताहिकानं, मराठी ब्लिट्झने, कोलकोत्याहून प्रकाशीत होणार्‍या हिदंीतील ‘रविवार’ या साप्ताहिकाने शाहू पाटोळे यांचे लेख तेंव्हा प्रकाशीत केले.

शाहू पाटोळे यांची तेंव्हाची भारत जोडो आंदोलनाची डायरी समाजवादी चळवळीत जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली. हीची दूसरी प्रत डॉ. प्रदीप आवटे यांच्याकडे होती. त्यांचा मुलगा लेखक प्रा. श्रीरंजन आवटे याने घरातील जून्या सामानातून ही डायरी शोधून पाटोळे यांना आणून दिली.

‘भारत जोडो’ चा रौप्य महोत्सव साजरा होत असताना त्या निमित्ताने यावर वैचारिक चर्चा झाली पाहिजे हे जाणून आम्ही हे पुस्तक रूपाने प्रकाशीत करण्याचा निर्णय घेतला.  10 फेब्रुवारी 2012 मध्ये या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली. अल्पावधीतच दुसरी आवृत्ती 2015 मध्ये (शाहू यांच्या ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या दुसर्‍या पुस्तकासोबत’) प्रकाशीत झाली.

बाबा आमटेंवर लिहीताना शाहू पाटोळे यांनी आपल्या मनोगतात एक अतिशय प्रमाणीक भावना बोलून दाखवली आहे,

‘... बाबाही माणस होते. कधी-कधी बाबानंा वैचारिक बेस आहे की नहाी अशी शंका यायची. बाबांना असामान्य समजणारे बाबा सामान्य बोलल्यावरही कौतूक करायचे ! निव्वळ शब्दांचे बुडबुडे फोडण्यापेक्षा बाबा आनंदवनातच राहिले असते तर बरं झालं असतं. त्यांची किंमत कमी झाली नसती. बाबांनी भारत जोडो यात्रा काढायला भरीला पाडणारांनी बाबांना ‘स्वस्त’ करून टाकलं. त्याचं लगेचचं उदाहरण म्हणजे बाबांचा नर्मदा बचाव आंदोलनातील सहभाग होय. जलसमाधीची जाहीर घोषणा करणारे बाबा शेवटी आनंदवनातच परतले ना!’

स्वत: शाहू पाटोळे यांनी समाजमाध्यमांवर लोकसत्तातील लेखावर एक पोस्ट लिहीली. या पुस्तकाबद्दल वाचकांना उत्सुकता निर्माण झाली. हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध आहे. खालील क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा. पुस्तक पाठविण्याची सोय केली जाईल. या निमित्ताने सविस्तर सखोल वैचारिक चर्चा व्हावी हा शुद्ध प्रमाणीक हेतू आहे.

          श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, July 27, 2020

वाङ्मयीन नियतकालिके : 'छापील' नव्हे 'डिजिटल'चे दिवस


दै. सामना सोमवार 27 जूलै 2020 विशेष पुरवणी

साधारणत: 2010 नंतर समाज माध्यमांचा (सोशल मिडिया)  बोलबाला वाढायला लागला तस तसे छापिल नियतकालिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, दिवाळी अंक यांच्यावर गंडांतर यायला सुरवात झाली. मुळात संपूर्णत: व्यवसायिक असलेल्या वृत्तपत्रांचीच परिस्थिती गंभीर बनत चालली होती. त्यामुळे वाङ्मयिन/वैचारिक नियतकालिके यांच्याबाबत तर काही बोलायलाच नको. हा सगळा कारभार मुळातच हौशी पद्धतीनं महाराष्ट्रात चालत आलेला होता.

त्यातही परत आपण नको तेवढे सार्वजनिक वाचनालयांवर अवलंबून असलेलो. वैयक्तिक पातळीवरचा ग्राहक महाराष्ट्रात फार कमी. जो काही आहे तो प्रामुख्याने सार्वजनिक ग्रंथालये हाच. आणि यांचा प्राणवायू म्हणजे शासकिय अनुदान.

या सगळ्यांचा फटका 2010 नंतर बसायला लागला. या नियतकालिकांच्या वाटपाचा मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. सर्वच नियतकालिकांचा कारभार सरकारी पोस्ट खात्यावर अवलंबून होता. पण पोस्टाची व्यवस्था ढिसाळ बनली आणि त्याचाही एक मोठा फटका या नियतकालिकांना बसला.

आता कोरोनाच्या प्रचंड मोठ्या जागतिक आपत्तीत तर शेवटचा घाव बसावा आणि झाड कोसळून पडावे अशी अवस्था मराठी नियतकालिकांची झालेली आहे. ही आपत्ती दुसरीकडून एका मोठ्या संधीला जन्म देते आहे.
ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून ही नियतकालिके नविन आकर्षक स्वरूपात समोर येवू लागली आहेत. आता हाच एक योग्य पर्याय दिसतो आहे. ‘साधना’ साप्ताहिकाने आपला अंक ऑनलाईन देण्यास सुरवात केली आहे. पिडीएफ स्वरूपातील हा अंक मोबाईलवर सहज उपलब्ध आहे.

‘अक्षरनामा’ सारखे एक चांगले नियतकालिक ऑनलाईन चालवले जाते. त्याची मांडणी अतिशय चांगली आहे. मजकूर तपासलेला व्याकरणाच्या किमान चुका असलेला असतो.

ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हा अंक ऍण्ड्रॉईड मोबाईल असलेल्या कुणाही माणसापर्यंत तूम्ही ताबडतोब पोचवू शकता. लेखांची संख्या किंवा शब्दसंख्या यावरही कसले बंधन नाही. आधी ज्या प्रमाणे ठराविक तारखेला अंक निघायचा. म्हणूनच त्याला नियतकालिक संबांधले जायचे. तसंही आता करण्याची गरज उरलेली नाही. यावर कधीही कितीही मजकूर टाकता येवू शकतो.

आधीच्या व्यवस्थेत वाचकांचा प्रतिसाद कळायला वेळ लागायचा. बर्‍याचदा तर हा प्रतिसाद कळायचाही नाही. पण आता तो तातडीने मिळू शकतो. काही डिजिटल पोर्टलवर मोठ्या गंभीर मजकूरावरही लोक सविस्तर प्रतिसाद देतात. टीका केली जाते. समर्थन करतानाही सविस्तर केले जाते. हा एक फारच मोठा फायदा या नविन माध्यमाचा आहे. पूर्वीची माध्यमे एकतर्फा होती. पण आता ही नविन माध्यमे म्हणजे खर्‍या अर्थाने संवादी बनली आहेत.

विविध नियतकालिके जशी डिजिटल स्वरूपात येतात तसाच दुसरा पण एक प्रकार पहायला मिळतो आहे. वैयक्तिक पातळीवर काही लेखक आपले ब्लॉग तयार करत आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसादही अतिशय चांगला आहे. भाउ तोरेसकर सारख्या पत्रकाराच्या ब्लॉगला एक कोटी पेक्षा जास्त दर्शकसंख्या लाभते ही एक मराठी वाचन विश्वात आगळी वेगळी घटना आहे. प्रवीण बर्दापुरकर यांच्यासारखे पत्रकारही नियमित ब्लॉग चालवत आहेत. संजय सोनावणी, हरि नरके यांच्या ब्लॉगला नियमित वाचक लाभलेला दिसतो आहे. (मी स्वत:  गेली 10 वर्षे मराठी ब्लॉग लेखन करतो आहे. आणि वाचक संख्या अडीच लाखांपर्यंत पोचली आहे.)

अजून एक प्रकार आपल्याला पहायला मिळतो आहे तो म्हणजे फेसबुकवरील लिखाण. कविता, छोटे लेख, रसग्रहण. अतिशय चांगले परिणामकारक लिखाण समाज माध्यमांवर नियमित नाही पण अधून मधून काहीजण करत असतात. त्यांना प्रतिसाद देणार्‍यांचीही संख्या मोठी आहे. मी हे सगळं विवेचन समाज माध्यमांचा गांभिर्याने वापर करणार्‍यांना गृहीत धरूनच करतो आहे. या माध्यमांचा उठवळपणे वापर करणार्‍यांसाठी हे विवेचन नाही. शिवाय वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, घराचा वास्तु, स्वत:चे कुठले फोटो, कुठल्या कुठल्या नियुक्त्यांसाठीचे पुरस्कारांसाठीचे अभिनंदन या सगळ्या जवळपास 80 टक्के असणार्‍या पोस्टचा इथे विचार करत नाहीये. गलिच्छ असभ्य भाषा वापरणार्‍यांचाही इथे विचार केलेला नाही. त्यांना टाळूनच आपण विचार करूया.

कोरोना आपत्तीनंतर समोर येणारं वाङ्मयिन नियतकालिकांचे डिजिटल जग हे आकर्षक, सुटसुटीत, संवादी, सर्वस्पर्शी तळागाळापर्यंत पोचणारे असेल याची खात्री पटते आहे. पूर्वीची माध्यमे आपल्या मर्यादांमुळे जास्त पोचू शकत नव्हती. पण आताच्या नविन माध्यमांनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कुठलीही कुंपणे त्यांना रोकू शकत नाहीत. मी स्वत: माझ्या ब्लॉगवर आत्तापर्यंत एकूण प्रतिसादापैकी 28 टक्के देशाबाहेरील वाचकांचा अनुभवला आहे. ही एक मोठी उपलब्धी या नविन माध्यमाची आहे.

पूर्वी नियताकलिकांची निर्मिती मर्यादीत ठिकाणांहून होत होती. पण आता नविन माध्यमांनी हे कृत्रिम बंधन उडवून लावले आहे. कुठेही बसून आता डिजिटल स्वरूपातील अंक प्रकाशित होवू शकतो. आणि कुठूनही निघाला तरी तो वाचकांपर्यंत पोचण्यात कसलाही अडथळा येत नाही. हा एक प्रकारे मोठाच क्रांतिकारी बदल आता झालेला आहे. अन्यथा आधिच्या प्रकारांत मक्तेदारी निर्माण होवून काही एक विकृती तयार झाल्या होत्या. आणि त्यात बर्‍याच प्रतिभावंतांचे बळी गेले होते. पण नविन माध्यमांत अशा अन्यायाला जागा शिल्लक राहिलेली नाही.

नविन माध्यमांना दृकश्राव्य जोड पण देता येवू शकते. काही चांगल्या कवितांचे प्रभावी वाचनाचे प्रयोग होत आहेत. त्याचे व्हिडिओ सर्वत्र सहजपणाने फिरत आहेत. इंद्रजीत भालेराव यांच्या कविता मोठ्या प्रमाणात यु ट्यूब वर उपलब्ध आहेत. या नविन माध्यमांच्या महसुल व्यवस्थेची वाढ निकोप पद्धतीने झाली पाहिजे. यात काम करणार्‍यांना पुरेसा आणि योग्य मोबदला मिळाल पाहिजे. नसता केवळ फुकटा फुकटी ही माध्यमे आहे त्या स्वरूपात जास्त काळ चालू शकणार नाहीत. भविष्य काळात ही समस्याही सुटेल याची आशा वाटते.

श्रीकांत अनंत उमरीकर
जनशक्ती वाचक चळवळ
औरंगाबाद मो. 9422878575

Sunday, July 26, 2020

राजस्थान कॉंग्रेस- ‘नवरा मेला तरी हरकत नाही सवत ... झाली पाहिजे!’


उरूस, 26 जूलै 2020 

राजस्थानमध्ये जे सत्तानाट्य रंगले आहे त्याची चर्चा केवळ दोनच पैलूंनी केली जात आहे. एक असं गृहीत धरलं जात आहे की अशोक गेहलोत काहीही करून आपली खुर्ची वाचवतील. दुसरी बाजू अशी आहे की भाजप सचिन पायलटच्या निमित्ताने हे सरकार पाडेल. गेहलोत यांची खुर्ची गोत्यात येईल.  न्यायालयात हे प्रकरण गेलं आहेच. ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा मागे लावून गेहलोत यांना जेरीस आणले जाईल.

यात एक महत्त्वाचा पैलू मागे पडत आहे. कॉंग्रेस पक्ष आणि एकूणच भाजपेतर स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे पक्ष आहेत त्यांच्या राजकारणाची एक मर्यादा या निमित्ताने स्पष्टपणे पुढे येत चालली आहे.

1989 ला विश्वनाथप्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे सरकार दिल्लीत सत्तेवर आले त्याला एका बाजूने भाजप आणि दुसर्‍या बाजूने डाव्या पक्षांनी पाठिंबा दिला होता. आता ज्या राजस्थानात राजकीय संकट घोंगावत आहे त्याच राजस्थानात भाजपचे भैरौसिंह शेखावत हे मुख्यमंत्री बनले होते. पण त्यांना पाठिंबा कुणाचा होता?

सोबतच बाजूच्या गुजरातमध्ये जनता दलाचे चिमणभाई पटेल हे मुख्यमंत्री बनले होते. त्यांना पाठिंबा कुणाचा होता? दिल्लीत सुषमा स्वराज आणि मध्यप्रदेशात सुंदरलाल पटवा हे भाजपचे मुख्यमंत्री बनले होते स्वत:च्या ताकदीवर. पण राजस्थान, गुजरात मध्ये भाजप आणि जनता दल यांनी आपसात तडजोड करून मुख्यमंत्री पद पटकावले. कारण कॉंग्रेसला सत्तेवरून हटवायचे होते.

पुढे 30 वर्षांतला इतिहास असे सांगतो की ज्या गुजरातमध्ये कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले चिमणभाई पटेल जनता दलाचे मुख्यमंत्री बनले होते भाजपच्या पाठिंब्यावर त्या राज्यातून जनता दल नेस्तनाबूत झाले. कॉंग्रेसची पण सत्ता काही दिवसांतच संपून गेली आणि तिथे भाजपने सगळी राजकीय जागा व्यापून टाकली. पण तिथे निदान अजूनही कॉंग्रेस विरोधात तरी शिल्लक आहे. आणि विरोधाभास म्हणजे या कॉंग्रेसचे नेतृत्व अगदी आत्ता आत्तापर्यंत भाजपमधूनच बंड करून बाहेर पडलेले शंकरसिंग वाघेला हे करत होते.

राजस्थानमध्ये जनता दलाची पार वाट लागली. कॉंग्रेसला आपली राजकीय स्थिती सुधारता आली. भाजप आणि कॉंग्रेस याच दोन प्रमुख राजकीय शक्ती शिल्लक राहिल्या.

आताच्या सचिन पायलट यांच्या बंडानंतर एक मोठा गंभीर प्रश्‍न समोर येतो आहे. गेहलोत जरी सत्ता राखण्यात यशस्वी झाले तरी पायलट यांचे राजकीय आव्हान शिल्लक राहणारच आहे. त्यांनी भाजपत न जाता एखादा प्रादेशीक पक्ष काढला आणि भाजप विरोधी असलेली राजकीय पोकळी भरून काढली तर कॉंग्रेसचे राजकीय भवितव्य काय?

पश्चिम बंगाल मध्ये असेच घडले होते. ममता बॅनर्जी कॉंग्रेसच्या दिल्लीस्थित दरबारी राजकारणाला कंटाळल्या. त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. पुढचा इतिहास सर्वांसमोर आहे. शरद पवार यांच्याही बाबत हेच आहे. 1999 ला शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडले त्याला कारण सोनिया गांधींचे विदेशीपण असे जरी वरवर दिसत असले तरी खरे कारण सर्वच विश्लेषक सोयीस्करपणे विसरतात.

1999 ला वाजपेयींचे सरकार एक मताने कोसळले तेंव्हा पर्याय म्हणून राष्ट्रपतींकडे विरोधी पक्ष सत्ता स्थापनेचा दावा घेवून गेला होता. स्वाभाविकच कुणीही असे समजेल की तेंव्हा विरोधी पक्षाचा नेता हा प्रस्ताव घेवून गेला असेल. पण तसे घडले नाही. शरद पवार कॉंग्रेसचे नेते म्हणून लोकसभेत विरोधी पक्ष नेते होते. जे शिष्टमंडळ सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपतींकडे गेले त्यात शरद पवार यांना का टाळल्या गेले?

लोकनेत्याला बाजूला टाकणे हे सोनिया कॉंग्रेसचे धोरण राहिले आहे. त्याचे दुष्परिणाम आत्ता राजस्थानात पहायला मिळत आहेत.

सोनिया गांधींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्विकारल्यावर लगेच दाखवून दिले होते की आपल्याला लोकनेत्याची किंमत नाही. जेंव्हा की 1998 ला महाराष्ट्रातून कॉंग्रेसला सर्वात मोठे यश पवारांनी मिळवून दिले होते. 48 पैकी 38 खासदार कॉंग्रेस व मित्रपक्षाचे (कॉंग्रेस 33, रिपाई 4, शेकाप 1) पवारांनी निवडून आणले होते.

याच्या पुढचे ठळक उदाहरण 2004 चे आहे. कॉंग्रेसला डाव्यांनी पाठिंबा दिल्यानंतर सोनिया गांधींनी एकाही लोकनेत्याची निवड न करता डॉ. मनमोहनसिंग यांना काय म्हणून पंतप्रधानपदावर बसवले? त्यांची विद्वत्ता जरी गृहीत धरली तरी त्यासाठी त्यांना पंतप्रधान करण्याची काय गरज होती? त्यांना आर्थिक सल्लागार किंवा अर्थमंत्रीच करता आले असते.  आपल्या आख्ख्या दहा वर्षांच्या कारकीर्दीत एक नेता म्हणून त्यांची काय चमकदार कामगिरी करून दाखवली? भाजप नको या हट्टापोटी डाव्यांनी पाठिंबा दिला म्हणून हे सरकार अस्तित्वात आले नसता कॉंग्रेसचा पंतप्रधान होणेच मुश्किल होते.

परत 2009 मध्ये जनाधार नसलेल्या मनमोहन सिंग यांनाच पंतप्रधान बनवण्यात आले. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकांतून निवडून न गेलेला राज्यसभेवरचा खासदार इतकी वर्षे पंतप्रधान पदावर बसला. पण याचे कुणीही राजकीय दृष्टीने विश्लेषण करत नाही. लोकनेत्यांना बाजूला ठेवून दरबारी राजकारणाला प्रोत्साहन देण्याचे हे सोनिया गांधींचे धोरण राहिलेले आहे. आणि हे दरबारी राजकारणाचे धोरणच आता कॉंग्रेसच्या राजकीय नाशाला कारणीभूत ठरत आहे.

गेली पंधरा दिवस राजस्थानात घमासान चालू आहे. पण सोनिया, राहूल, प्रियंका कुठेही समोर आलेल्या नाहीत. एकही वक्तव्य यांच्याकडून दिले गेले नाही. यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात किंवा अगदी राजीव गांधींच्या काळात दिल्लीहून पक्षाचे प्रतिनिधी पाठवले जायचे तेंव्हा त्यांच्या शब्दाला एक मोठी किंमत होती. कारण त्यांच्या पाठिशी दिल्लीतील भक्कम श्रेष्ठी आहेत हा स्पष्ट संदेश असायचा. आता दिल्लीहून रणदीप सुरजेवाला, अजय माकन, अविनाश पांडे (हे गृहस्थ महाराष्ट्राचे आहेत. ते आपल्या मतदारसंघातून नगरसेवक तरी निवडुन आणू शकतात का?) हे प्रतिनिधी पाठवले गेले होते. राजस्थानचे संपर्क प्रमुख के. वेणुगोपाळ हे कधी लोकसभेवर निवडून आले? यांच्यापैकी एक तरी लोकनेता आहे का? किंवा यांच्या पाठिशी जे दिल्लीतील श्रेष्ठी असल्याचे सांगितले जाते त्यांचा जरा तरी प्रभाव प्रदेश कॉंग्रेसवर आहे का?

देशातील एकमेव मोठे राज्य असे राजस्थान हे कॉंग्रेससाठी राजकीय नंदनवन होते. पण त्याचा विसर खुद्द कॉंग्रेस श्रेष्ठींनाच पडला. नसता 2019 च्या लोकसभा निवडणुकांत सर्व 25 जागी हार पदरी पडल्यावर कॉंग्रेसमध्ये नेतृत्व बदल व्हायला हवा होता. जर अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद संपणारच नव्हता तर या दोघांनाही बाजूला ठेवून तिसरा पर्याय पुढे आणायला हवा होता. कदाचित तो नेताही कॉंग्रेसच्या दृष्टीने भविष्यात काही एक आशा निर्माण करणारा ठरला असता. बिहार मध्ये चंद्रशेखर आणि विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या वादात दोघांचेही उमेदवार बाजूला पडून लालू प्रसाद यादव यांचे नाव तडजोडीचे नाव म्हणून पुढे आले होते. लालूंनी पुढे 25 वर्षे राजकारण गाजवले हे सर्वांसमोर आहे.

याच पद्धतीनं एखादा तिसराच पर्याय राजस्थानात कॉंग्रेसचे भवितव्य ठरू शकला असता. आता कुणीही मुख्यमंत्री पदी राहो कॉंग्रेस पक्षाला त्याचा तोटाच होणार. गेहलोत राहिले तर पायलट आणि पायलट बनले तर गेहलोत त्यांच्यावर राजकीय हल्ले करत राहणार. यात तोटा होणार तो कॉंग्रेस पक्षाचाच. पायलट पक्षा बाहेर गेले तर मग राजस्थानात कॉंग्रेसचे भवितव्य पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा यांच्याच वाटेने जाणार. कॉंग्रेसच्या ट्विटरग्रस्त युवा नेतृत्वाला हे कोण समजावून सांगणार?

सत्यजीत राय यांचा हिंदी सिनेमा ‘शतरंज के खिलाडी’ आजच्या कॉंग्रेसच्या स्थितीला अगदी नेमका लागू पडतो. संजीव कुमार आणि सईद जाफरी हे हरलेले नवाब सरदार शेवटी आपसांतच मारामारी करतात. तसं यांचं चालू आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तिन्ही प्रदेशांतील कॉंग्रेस पक्षात एक साम्य आहे की यांच्या गटातटांचे आपसांतच प्रचंड मतभेद आहेत. इतके टोकाचे की ‘नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत रंडकी झाली पाहिजे’ या अस्सल इरसाल ग्रामीण भागांतील म्हणीसारखं यांचे झाले आहे. सत्ता गेली तरी हरकत नाही पण पायलटला धडा शिकवेनच. आणि तिकडे पायलट शांत बसून गेहलोत याची खुर्ची घालवेनच अशा खेळी करत आहेत. 

         श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, July 24, 2020

गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या !


काव्यतरंग, शुक्रवार 24 जूलै 2020 दै. दिव्यमराठी

गायी पाण्यावर काय म्हणुनि आल्या?
कां ग गंगायमुनाहि या मिळाल्या?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला?

उष्ण वारे वाहती नासिकांत
गुलाबांला सुकविती कश्मिरांत
नंदनांतिल हलविती वल्लरीला
कोण माझ्या बोलले छबेलीला?

पंकसपर्के कमळ का भिकारी?
धूलिसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी
कशी तूंही मग मजमुळे भिकारी?

देव देतो सद्गुणी बालकांना!
काय म्हणूनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावांस जाउनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसोनीया

‘‘गांवी जातो’’ ऐकतां त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टी गेली
गळां घालुनि करपाश रेशमाचा
वदे ‘‘येते मी’’ पोर अज्ञवाचा!

-बी. (फुलांची ओंजळ- ‘बी’ कवींची समग्र कविता, पृ. 58  प्रकाशक कॉन्टिनेन्टल प्रकाशन, आ.1986)

शाळा बंद असल्याने सध्या ऑनलाईन शिक्षण चालू आहे. मुलांना त्यासाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर, मोबाईल अशा सुविधा हव्या आहेत. मुख्यत: नेट कनेक्शनची आवश्यकता आहे. जिथे हे नाही तिथे शिक्षणाची मोठी हेळसंाड चालू आहे. अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला लॅपटॉप घेवून देता आला नाही म्हणून शेतकरी बापाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

ही कविता साधारणत: 1920 च्या सुमारास लिहील्या गेली. आज 100 वर्षांनी विद्यार्थ्यांत आर्थिक असमतोल दिसून त्यातून समस्या उत्पन्न होत आहेत. तेंव्हा काय वातावरण असेल?

आपल्या सोबत शिकणार्‍या इतर मुली चांगले कपडे दागिने घालून शाळेत येतात. या मुलीच्या अंगावर अगदी साधे कपडे असतात. हीला गरिब म्हणून भिकारी म्हणून त्या चिडवतात आणि या मुलीला रडू येते. तिचे हमसून हमसून रडणे पाहून बापाला कळत नाही काय करावे. गरिबी हा काही तिचा दोष नाही. दोन्ही डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत असल्याने ‘गंगा यमुना’ असा शब्द वापरला आहे. नाकांतून उष्ण श्‍वास वाहत आहेत. त्यामुळे गुलाबासारखे ओठ सुकून गेले आहेत.

कवितेचा आशय खुप साधा आहे. हा गरिब बाप मुलीला धुळीत सापडले म्हणून रत्न भिकारी नसते, चिखलात उगवले म्हणून कमळ भिकारी होते का? असे सांगत माझ्या गरिबाच्या पोटी जन्माला आली असली तरी तू एक रत्न आहे हे आपल्या लाडकीला समजावून सांगतो. शेवटी अशी सद्गुणी गोड बालके आमच्या सारख्यांच्या पोटी का जन्माला घालतोस? आम्हाला त्यांचे लाड पुरवता येत नाहीत अशी तक्रार देवाकडे करतो. आणि मुलीला सांगतो की मी देवाकडे जावून हा जाब देवाला विचारतो.

देवाच्या ‘गावाकडे’ जाण्याची गोष्ट काढताच ती मुलगी एकदम दचकते. आपले रडणे थांबवून बापाच्या गळ्याभोवती आपल्या रेशमी हाताचा विळखा घालते. मी पण तूमच्यासोबत येते असे अज्ञपणे बापाला सांगते. असा कवितेचा गोड शेवट आहे. मूळ 25 कडव्यांची असलेली ही कविता. यातील केवळ 5 कडवेच इथे घेतले आहेत.

बाप आणि मुलगी असा नातेबंध आपल्याकडे कवितेत फारसा विचारात घेतला गेलेला नाही. 1920 साली शिकणारी मुलगी आणि तिचा बाप यावर लिहीणे म्हणजे खरेच कमाल आहे. तेंव्हा मुळात शिक्षणाचाच फारसा प्रसार झाला नव्हता. आणि मुलींचे शिक्षण तर अजूनच दूर. अशा काळातही एक कवी या विषयावर गोड कविता लिहीतो.

बरं यात कुठेही मुलींचे शिक्षण, त्याचे महत्त्व असा आव आणत पांडित्य सांगितलेले नाही. गरिब बाप मुलीचे लाड पुरवू शकत नाही पण तिला शिकवतो ही एक छोटी पण महत्त्वाची बाब कवितेतून सौंदर्यपूर्ण रित्या आली आहे.
‘बी. रघुनाथ’ ज्यांच्या नावाचा गोंधळ नेहमी कवी ‘बी’ यांच्याशी केला जातो त्यांनीही एक फार गोड कविता मुलीवर लिहीली आहे.

चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली
पंढरी ही ओसरीची आज ओस झाली
कोनाड्यात उमडून पडे घरकुल
आज सत्य कळो येई दाटीमुटीतील
काही दिसे भरलेले रित्या बोळक्यात
गवसले आजवर जे न रांजणात

अंगणात बागडणारी, ओसरीत खेळणारी मुलगी सासरी निघून गेली आहे. तिचे खेळणे रक्तचंदनाची बाहुली म्हणजेच विठोबाची मुर्ती एकटी पडून आहे. तिच्या खेळण्यातल्या संक्रांतीच्या बोळक्यात खाउ शिल्लक आहे. असे एक गोड वर्णन बी. रघुनाथ यांनी केले आहे. या शिवाय बाप मुलगी या नात्यांवर फारसे त्या काळात आले नाही. आई मुलगा यांच्यावर आले आहे.

कवी ‘बी’ यांचे पूर्ण नाव नारायण मुरलीधर गुप्ते. यांचा जन्म 1872 साली बुलढाणा जिल्ह्यात मलकापुरला झाला. गुप्ते यांचे वडिल यवतमाळ येथे वकिल होते. वडिलांच्या निधनानंतर शालेय शिक्षण अर्धवट सोडून कवी बी यांनी सरकारी खात्यात कारकुनीची नौकरी सुरू केली. वाशीम, मूर्तिजापूर, अकोला येथे त्यांना या निमित्त रहावे लागले. आपले बहुतांश आयुष्य बी कवींनी अकोला येथेच व्यतित केले. 

30 ऑगस्ट 1947 ला या कवीचे निधन झाले. त्यांच्या कवितांचा संग्रह ‘फुलांची ओंजळ’ नावाने 1934 मध्ये प्रकाशीत झाला होता. त्याला आचार्य प्र.के.अत्रे यांनी सुंदर सविस्तर प्रस्तावना लिहीली आहे. कमळा नावाने बी यांनी थोरांतांच्या मुलीवर एक सुंदर कविता लिहीली. शिवकालीन घटनेवरील ही कविता अतियश सुंदर अशी आहे. शिवाय बी कवींचे ‘चाफा बोलेना’ हे गाणे अतिशय गाजलेले आहे. त्यांची ‘डंका’ नावाची कविता पूर्वी अभ्यासाला होती. आचार्य अत्रे यांनी बी यांच्यावर लिहीताना असं म्हटलं आहे,

‘.. बी कवींची कविता ही सोन्याच्या साखळ्या पायांत घालून संगमरवरी जिन्यावरून उतरणारी एखाद्या  राजघराण्यांतील तेजस्वी राजकन्या आहे..’

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575