उरूस, 27 जून 2020
फोर्ड या प्रसिद्ध कंपनीच्या मोटारी सुरवातीला फक्त काळ्याच रंगात होत्या. त्याचा मालक हेन्री फोर्ड म्हणायचा मी माझ्या ग्राहकाला मोटारीचा रंग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. अट इतकीच की तो रंग काळाच असला पाहिजे.
याच प्रमाणे कॉंग्रेस कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना पक्ष अध्यक्ष निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण अट इतकीच की ते नाव राहूल गांधी हेच असले पाहिजे.
कॉंग्रेसचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते संजय झा यांनी आपल्याच पक्षाने आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करणारा लेख टाईम्स ऑफ इंडिया या मोठ्या प्रतिष्ठीत इंग्रजी दैनिकांत लिहीला. नेहरू यांनीही कसे आपल्यावर टीका करणारा लेख आपणच लिहून प्रसिद्ध केला होता हे उदाहरणही झा यांनी दिले. शिवाय पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांमध्ये/ कार्यकर्त्यांमध्ये कशी अस्वस्थता आहे याचीही नोंद केली. आपण सर्वांशी बोललो. पण कुणीच या अस्वस्थतेला तोंड फोडायला तयार नाही. मग आपणच ही जबाबदारी स्वीकारून हा लेख कसा लिहीला वगैरे वगैरे त्यांनी संागितले.
अपेक्षा होती तसेच घडले. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सहीने संजय झा यांचे पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करणारे पत्र प्रसिद्धीला देण्यात आले.
म्हणजे संजय झा यांचा जो मुळ उद्देश होता की पक्षाच्या पराभवाबद्दल वर्तमान स्थितीबद्दल चर्चा व्हावी तो राहिला बाजूला उलट आता त्यांनाच सांगण्यात आले, ‘संजय झा, कॉंग्रेसमधून बाहेर जा!’
पक्षातील मतभेदांचे पडसाद नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतही उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवरील टीका करू नये असा आग्रह आर.पी.एन. सिंह यांच्यासारख्या नेत्यांनी घेतली. त्या बाजूने बहुतांश ज्येष्ठ नेते यांनी विचार मांडले. पण प्रियंका गांधी यांनी मात्र आपल्या भावाची बाजू घेत, ‘एकटे राहूल गांधीच मोदींवर टीका करण्याचे धाडस करतात. बाकी नेते कसे काय चुप बसून असतात?’ असा सूर लावला.
मग स्वाभाविकच सर्वांचे धाबे दणाणले. आणि सर्वांनीच राहूल गांधी यांच्या ‘मोदी मुझसे डरते है’ सारख्या तथ्यहीन सूरात मिसळून सूर लावला. काही तसांतच सर्वच प्रमुख कॉंग्रेंस नेत्यांच्या ट्विटरवर एकाच पद्धतीचे व्हिडिओ प्रसारीत झाले.
ज्या विषयांची चर्चा अपेक्षीत होती ती झालीच नाही. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांत पक्षाचे 5 उमेदवार पराभूत झाले. त्यावर चर्चा व्हायला हवी होती. राजस्थानात पक्षात जी बेदिली माजली आहे त्यावर काही एक निर्णय व्हायला हवा होता. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी धोरण आखण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार बाबत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत ज्याची तक्रार कॉंग्रेस नेत्यांनीच केली होती. त्या बाबत काही एक निर्णय अपेक्षीत होता.
पण हे काहीच घडले नाही. लद्दाखमधील चीनी आक्रमणाबाबत राहूल गांधींची निर्बुद्ध देश विघातक भाषाच पक्षाचे अधिकृत धोरकण म्हणून मांडावी असा दबाव सर्वांवर आला.
याच आठवड्यात ‘राजीव गांधी फाउंडेशन’ला मिळालेल्या चीनी देणग्या, पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून फाउंडेशनकडे वळविण्यात आलेला निधी आदी बाबत गंभीर आरोप भाजपने केले आहेत. यावर काही एक चर्चा कॉंग्रेस कार्यकारिणीत होणे अपेक्षीत होते. चीनी कम्युनिस्ट पक्षासोबत 2008 मध्ये कॉंग्रेस पक्षाने केलेल्या कराराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. सर्वौच्च न्यायालयात यावर एक याचिका ऍड. महेश जेठमलानी यांनी दाखल केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय झा यांचे लिखाण बघितले असता हे लक्षात येते की त्यांनी वापरलेली आत्मपरीक्षणाची गरज कॉंग्रेस पक्षाला किती आणि कशी आहे.
संजय झा, आरपीएन सिंह यांनी पक्षात एक वेगळी चर्चा सुरू करण्याची गरज मांडली असताना विद्वान पत्रकार राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी नेमके याच काळात सा. साधनात एक लेख लिहून एक नवेच वाढण पक्षासमोर आणून ठेवले आहे. 20 जूनच्या आपल्या ‘कॉंग्रेस विरोध म्हणजे नेहरू विचार विरोध’ या लेखात केतकरांनी भाजप सोबतच इतर पुरोगामी पक्षही कसे नेहरू विचारांचे विरोधक आहेत हे ठासून सांगितले आहे.
आता हे केतकरांना कुणी सांगावे की आज भाजपविरूद्ध लढताना इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसची गरज आहे या पेक्षा जास्त गरज आपल्या अस्तित्वासाठी कॉंग्रेसलाच या इतर विरोधी पक्षांची आहे. अशावेळी त्यांच्यावर वैचारिक लाथा झाडण्याचे काहीही औचित्य नव्हते. पण ऐकतील ते केतकर कसले.
पी.व्हि. नरसिंहराव सरकारच्या काळात मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून जागतिकीकरणाला अनुकूल अशी आर्थिक धोरणे राबविली. हे केतकर आताच्या काळात लपवून काय मिळवत आहेत? त्याने पक्षाला या आधुनिक काळात कसा फायदा मिळणार आहे? मनरेगा, अन्नसुरक्षा सारख्या भीकमाग्या योजना राबविण्यापेक्षा आधुनिक काळात नविन पद्धतीनं गरिबांचे सबलीकरण करता येते याचा पाया मनमोहन सिंग यांनीच घालून दिला होता. हेच केतकर लोहिया प्रणित समाजवादी नेत्यांवर टीका करतात, जयप्रकाश नारायण यांच्यावर तर इंदिरा सरकार कोसळण्यासाठी आखलेल्या आंतराष्ट्रीय कटाचा हिस्सा असल्याचा गंभीर आरोप करतात आणि मनरेगा अन्नसुरक्षा या समाजवादी योजना पक्षाने राबवाव्या या सोनिया गांधींच्या धोरणांचा उदो उदो करतात. कॉंग्रेसचा वैचारिक आघाडीवर पराभव करण्याचा मक्ता केतकरांनी घेतला आहे का? केतकर कॉंग्रेसचे वैचारिक राहूल गांधी होवू पहात आहेत का?
उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू ही लोकसभा सदस्य संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी असलेली राज्ये आहेत. या राज्यांत (तामिळनाडू वगळता) एकेकाळी कॉंग्रेस हा एकमेव बळकट मोठा पक्ष होता. आज या सर्वच राज्यांतून कॉंग्रेस पक्ष स्वत:च्या जीवावर संपूर्ण जागासुद्धा लढू शकत नाही. मणिपुरमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांत पक्षाचा उमेदवार तर हारलाच पण राज्य सरकार उलथून टाकण्याची खेळीही उलटली. याची कसलीही चर्चा करण्याची गरज कॉंग्रेस कार्यकारिणीला वाटलेली नाही.
राहूल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसांनिमित्त पक्षाने त्यांना परत अध्यक्षपदाचे ‘गिफ्ट’ देण्याचे ठरवलेले दिसत आहे. पण मुळात त्यांनी राजीनामा का दिला? याची चर्चा का नाही केल्या गेली? हा राजीनामा देवून आता 1 वर्ष उलटून गेले. पक्षाच्या लोकसभा निवडणुकीचा पराभव का झाला यासाठी कुठली समिती स्थापन करून एव्हाना त्याचा अहवाल यायला हवा होता. पण हे काहीच न करता आत्मपरिक्षणाची गरज व्यक्त करणार्या संजय झा यांची हकालपट्टी हा एकमेव साधा सोपा उपाय कॉंग्रेस पक्षाने अवलंबिला आहे.
किटकशास्त्रात अभ्यास करणार्या एका शास्त्रज्ञाने एका किड्याचा पाय कापला आणि त्याला चालण्याची आज्ञा दिली. तो किडा चालत राहिला. मग दुसरा पाय कापला. तरी तो चालत राहिला. असे करत करत त्याचे सर्व आठही पाय कापून टाकले. आणि त्याला चालण्याची आज्ञा दिली. तेंव्हा मात्र तो किडा गुपचुप पडून राहिला. या शास्त्रज्ञाने आपला निष्कर्ष असा काढला की, ‘किड्याचे सर्व पाय कापले असता त्याला ऐकू येत नाही.’
कॉंग्रेस पक्षाची अवस्था सध्या अशीच झाली आहे. सगळे होयबा जमा झालेले राहूल-प्रियंका यांच्या दबावात ‘किड्याचे सर्व पाय कापल्यावर त्याला ऐकू येत नाही’ असा निष्कर्ष काढण्यासाठी मजबूर आहेत. त्यांच्याकडून बाकी काय अपेक्षा करणार? संजय झा तूमची अपेक्षा चुक आहे. तूम्हीच योग्य तो इशारा ओळखा आणि तूम्हाला आता पक्षातून हाकलून देण्याआधी तूम्हीच पक्षाचा राजीनामा देवून बाहेर या.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575