Saturday, June 27, 2020

संजय झा, कॉंग्रेसमधून बाहेर जा !


उरूस, 27 जून 2020 

फोर्ड या प्रसिद्ध कंपनीच्या मोटारी सुरवातीला फक्त काळ्याच रंगात होत्या. त्याचा मालक हेन्री फोर्ड म्हणायचा मी माझ्या ग्राहकाला मोटारीचा रंग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. अट इतकीच की तो रंग काळाच असला पाहिजे.

याच प्रमाणे कॉंग्रेस कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना पक्ष अध्यक्ष निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण अट इतकीच की ते नाव राहूल गांधी हेच असले पाहिजे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते ज्येष्ठ नेते संजय झा यांनी आपल्याच पक्षाने आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करणारा लेख टाईम्स ऑफ इंडिया या मोठ्या प्रतिष्ठीत इंग्रजी दैनिकांत लिहीला. नेहरू यांनीही कसे आपल्यावर टीका करणारा लेख आपणच लिहून प्रसिद्ध केला होता हे उदाहरणही झा यांनी दिले. शिवाय पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांमध्ये/ कार्यकर्त्यांमध्ये कशी अस्वस्थता आहे याचीही नोंद केली. आपण सर्वांशी बोललो. पण कुणीच या अस्वस्थतेला तोंड फोडायला तयार नाही. मग आपणच ही जबाबदारी स्वीकारून हा लेख कसा लिहीला वगैरे वगैरे त्यांनी संागितले.

अपेक्षा होती तसेच घडले. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सहीने संजय झा यांचे पक्ष प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करणारे पत्र प्रसिद्धीला देण्यात आले.

म्हणजे संजय झा यांचा जो मुळ उद्देश होता की पक्षाच्या पराभवाबद्दल वर्तमान स्थितीबद्दल चर्चा व्हावी तो राहिला बाजूला उलट आता त्यांनाच सांगण्यात आले, ‘संजय झा, कॉंग्रेसमधून बाहेर जा!’

पक्षातील मतभेदांचे पडसाद नुकत्याच पार पडलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतही उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवरील टीका करू नये असा आग्रह आर.पी.एन. सिंह यांच्यासारख्या नेत्यांनी घेतली. त्या बाजूने बहुतांश ज्येष्ठ नेते यांनी विचार मांडले. पण प्रियंका गांधी यांनी मात्र आपल्या भावाची बाजू घेत, ‘एकटे राहूल गांधीच मोदींवर टीका करण्याचे धाडस करतात. बाकी नेते कसे काय चुप बसून असतात?’ असा सूर लावला.

मग स्वाभाविकच सर्वांचे धाबे दणाणले. आणि सर्वांनीच राहूल गांधी यांच्या ‘मोदी मुझसे डरते है’ सारख्या तथ्यहीन सूरात मिसळून सूर लावला. काही तसांतच सर्वच प्रमुख कॉंग्रेंस नेत्यांच्या ट्विटरवर एकाच पद्धतीचे व्हिडिओ प्रसारीत झाले.

ज्या विषयांची चर्चा अपेक्षीत होती ती झालीच नाही. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकांत पक्षाचे 5 उमेदवार पराभूत झाले. त्यावर चर्चा व्हायला हवी होती. राजस्थानात पक्षात जी बेदिली माजली आहे त्यावर काही एक निर्णय व्हायला हवा होता. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी धोरण आखण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार बाबत गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत ज्याची तक्रार कॉंग्रेस नेत्यांनीच केली होती. त्या बाबत काही एक निर्णय अपेक्षीत होता.

पण हे काहीच घडले नाही. लद्दाखमधील चीनी आक्रमणाबाबत राहूल गांधींची निर्बुद्ध देश विघातक भाषाच पक्षाचे अधिकृत धोरकण म्हणून मांडावी असा दबाव सर्वांवर आला.

याच आठवड्यात ‘राजीव गांधी फाउंडेशन’ला मिळालेल्या चीनी देणग्या, पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून फाउंडेशनकडे वळविण्यात आलेला निधी आदी बाबत गंभीर आरोप भाजपने केले आहेत. यावर काही एक चर्चा कॉंग्रेस कार्यकारिणीत होणे अपेक्षीत होते. चीनी कम्युनिस्ट पक्षासोबत 2008 मध्ये कॉंग्रेस पक्षाने केलेल्या कराराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. सर्वौच्च न्यायालयात यावर एक याचिका ऍड. महेश जेठमलानी यांनी दाखल केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय झा यांचे लिखाण बघितले असता हे लक्षात येते की त्यांनी वापरलेली आत्मपरीक्षणाची गरज कॉंग्रेस पक्षाला किती आणि कशी आहे.

संजय झा, आरपीएन सिंह यांनी पक्षात एक वेगळी चर्चा सुरू करण्याची गरज मांडली असताना विद्वान पत्रकार राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी नेमके याच काळात सा. साधनात  एक लेख लिहून एक नवेच वाढण पक्षासमोर आणून ठेवले आहे. 20 जूनच्या आपल्या ‘कॉंग्रेस विरोध म्हणजे नेहरू विचार विरोध’ या लेखात केतकरांनी भाजप सोबतच इतर पुरोगामी पक्षही कसे नेहरू विचारांचे विरोधक आहेत हे ठासून सांगितले आहे.

आता हे केतकरांना कुणी सांगावे की आज भाजपविरूद्ध लढताना इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसची गरज आहे या पेक्षा जास्त गरज आपल्या अस्तित्वासाठी कॉंग्रेसलाच या इतर विरोधी पक्षांची आहे. अशावेळी त्यांच्यावर वैचारिक लाथा झाडण्याचे काहीही औचित्य नव्हते. पण ऐकतील ते केतकर कसले.

पी.व्हि. नरसिंहराव सरकारच्या काळात मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून जागतिकीकरणाला अनुकूल अशी आर्थिक धोरणे राबविली. हे केतकर आताच्या काळात लपवून काय मिळवत आहेत? त्याने पक्षाला या आधुनिक काळात कसा फायदा मिळणार आहे? मनरेगा, अन्नसुरक्षा सारख्या भीकमाग्या योजना राबविण्यापेक्षा आधुनिक काळात नविन पद्धतीनं गरिबांचे सबलीकरण करता येते याचा पाया मनमोहन सिंग यांनीच घालून दिला होता. हेच केतकर लोहिया प्रणित समाजवादी नेत्यांवर टीका करतात, जयप्रकाश नारायण यांच्यावर तर इंदिरा सरकार कोसळण्यासाठी आखलेल्या आंतराष्ट्रीय कटाचा हिस्सा असल्याचा गंभीर आरोप करतात आणि  मनरेगा अन्नसुरक्षा या समाजवादी योजना पक्षाने राबवाव्या या सोनिया गांधींच्या धोरणांचा उदो उदो करतात. कॉंग्रेसचा वैचारिक आघाडीवर पराभव करण्याचा मक्ता केतकरांनी घेतला आहे का? केतकर कॉंग्रेसचे वैचारिक राहूल गांधी होवू पहात आहेत का?

उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू ही लोकसभा सदस्य संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी असलेली राज्ये आहेत. या राज्यांत (तामिळनाडू वगळता) एकेकाळी कॉंग्रेस हा एकमेव बळकट मोठा पक्ष होता. आज या सर्वच राज्यांतून कॉंग्रेस पक्ष स्वत:च्या जीवावर संपूर्ण जागासुद्धा लढू शकत नाही. मणिपुरमध्ये नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकांत पक्षाचा उमेदवार तर हारलाच पण राज्य सरकार उलथून टाकण्याची खेळीही उलटली. याची कसलीही चर्चा करण्याची गरज कॉंग्रेस कार्यकारिणीला वाटलेली नाही.

राहूल गांधी यांच्या 50 व्या वाढदिवसांनिमित्त पक्षाने त्यांना परत अध्यक्षपदाचे ‘गिफ्ट’ देण्याचे ठरवलेले दिसत आहे. पण मुळात त्यांनी राजीनामा का दिला? याची चर्चा का नाही केल्या गेली? हा राजीनामा देवून आता 1 वर्ष उलटून गेले. पक्षाच्या लोकसभा निवडणुकीचा पराभव का झाला यासाठी कुठली समिती स्थापन करून एव्हाना त्याचा अहवाल यायला हवा होता. पण हे काहीच न करता आत्मपरिक्षणाची गरज व्यक्त करणार्‍या संजय झा यांची हकालपट्टी हा एकमेव साधा सोपा उपाय कॉंग्रेस पक्षाने अवलंबिला आहे.

किटकशास्त्रात अभ्यास करणार्‍या एका शास्त्रज्ञाने एका किड्याचा पाय कापला आणि त्याला चालण्याची आज्ञा दिली. तो किडा चालत राहिला. मग दुसरा पाय कापला. तरी तो चालत राहिला. असे करत करत त्याचे सर्व आठही पाय कापून टाकले. आणि त्याला चालण्याची आज्ञा दिली. तेंव्हा मात्र तो किडा गुपचुप पडून राहिला. या शास्त्रज्ञाने आपला निष्कर्ष असा काढला की, ‘किड्याचे सर्व पाय कापले असता त्याला ऐकू येत नाही.’
कॉंग्रेस पक्षाची अवस्था सध्या अशीच झाली आहे. सगळे होयबा जमा झालेले राहूल-प्रियंका यांच्या दबावात ‘किड्याचे सर्व पाय कापल्यावर त्याला ऐकू येत नाही’ असा निष्कर्ष काढण्यासाठी मजबूर आहेत. त्यांच्याकडून बाकी काय अपेक्षा करणार? संजय झा तूमची अपेक्षा चुक आहे. तूम्हीच योग्य तो इशारा ओळखा आणि तूम्हाला आता पक्षातून हाकलून देण्याआधी तूम्हीच पक्षाचा राजीनामा देवून बाहेर या.

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, June 26, 2020

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग ऽऽ !



काव्यतरंग, शुक्रवार 26 जून  2020 दै. दिव्यमराठी

नदीकिनारी

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी ग ऽ

अवतीभवती नव्हते कोणी
नचत होत्या राजसवाणी
निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी ग ऽ

जरा निळ्या अन् जरा काजळी
ढगांत होती सांज पांगली
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी ग ऽ !

दुसरे तिसरे नव्हते कोणी
तुझेच हसले डोळे दोन्ही
अवखळ बिजली भरली माझ्या उरांत सारी ग ऽ !

सळसळली, ग ऽ हिरवी साडी
तिनेच केली तुझी चहाडी
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी ग ऽ !

वहात होते पिसाट वारे
तशांत मी उडविले फवारे
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी ग ऽ !

कुजबुजली भवताली राने
रात्र म्हणाली चंचल गाणे
गुडघाभर पाण्यांत दिवाणे दोन फरारी ग ऽ !

-ना.घ.देशपांडे, (शीळ, पृ. 59, मौज प्रकाशन गृह, 4 आ.)

या कवितेला आता जवळपास 90 वर्षे होत आली. ना.घ. यांचा कविता संग्रह प्रकाशीत झाला 1954 ला. पण शीळ या गाण्याची ध्वनीमुद्रीका निघाली होती 1932 ला. म्हणजे त्याच्या जवळपासच ही कविता लिहील्या गेली. आज ही कविता वाचणार्‍याला कुणाही सामान्य रसिकाला यात नेमके काय वेगळेपण आहे हे चटकन लक्षात येणार नाही. पण 80 च्या पुढच्या वयाचे जे हयात असतील त्यांना ही कविता वाचताच/आठवताच त्यांच्या मनावर मोरपिस फिरल्याचा भास होईल.

त्या काळातील इतर कवितांमधून ही कविता शुद्ध प्रेमाच्या आविष्कारामुळे उठून दिसते. म.वि.राजाध्यक्ष यांनी ना.घ.च्या कवितेबद्दल इतकं सुंदर आणि नेमकं लिहून ठेवलं आहे, ‘... तिच्या स्त्रीत्वाला कोणताच आगंतुक गुण चिकटविलेला नसल्यामुळे तिच्याविषयीचे प्रेम ‘शुद्ध’ आहे-म्हणजे ते फक्त प्रेम आहे. त्यात दया, सहानुभूती, उद्धार इत्यादी ‘सामाजिक’ लचांडे नाहीत. या प्रेमात जगाची बाधा नाही तसा अध्यात्माचाही नेहमीचा एखादा आव नाही. अलौकित उत्कटतेचे हे प्रेम सर्वस्वी लौकित आहे; शारीर आहे. त्याला सांकेतिक आडपडदा नाही. कवीला प्रीतीतून मुक्ती नको; प्रीती हीच त्याची मुक्ती.’ (शीळ कविता संग्रहाची प्रस्तावना)

ना.घ. देशपांडे यांच्या कविता भावगीत बनुन गायल्या गेल्या. त्यांना अतिशय लोकप्रियता लाभली. ही कविता आजच्याही तरूण तरूणींच्या प्रेमाचा उत्कट अविष्कार म्हणून शोभून दिसू शकते. ना.घ. यांच्या कवितेतील हे विशुद्ध प्रेम पुढे बी. रघुनाथ, बोरकर, पाडगांवकर, महानोर यांच्या कवितेतही अनुभवास आले.

विंदा करंदीकरांच्या एका कवितेत,

हिरवे हिरवे माळ मोकळे,
ढवळ्या ढवळ्या त्यावर गायी,
प्रेम करावे अशा ठिकाणी,
विसरून भिती विसरून घाई

असे मुक्त विशुद्ध प्रेमाचे चित्र उमटले आहे. पुढच्या या सर्व कविंच्या मुक्त प्रेम अविष्काराची वाट ना.घं.नी प्रशस्त करून ठेवली आहे.

या कवितेत प्रेमासोबत जलरंगातील एक निसर्गचित्रही समोर येते. प्रेमाचा ताजा टवटवीत रंग आपल्याला अनुभवाला मिळतो. ‘जरा निळ्या नि जरा पांढर्‍या’ या कडव्यांत हे निसर्गचित्र फार सुंदर उतरलं आहे.

अजून एका कडव्यांत ‘सळसळी, ग हिरवी साडी’ यात रंगांचा उल्लेख येतो. आता हा जो साडीचा हिरवा रंग आहे तो सळसळणारा आहे कारण माळावर पसरलेल्या हिरव्या पोपटी गवतातून वारा वाहतो तेंव्हा ही सळसळ आपल्याला  अनुभवायला येते. ही रसरशीत सळसळ चितारण्यासाठी हिरवाच रंग हवा. इथे दूसरा रंग चालला नसता.पहिल्याच कडव्यात ‘निळ्या जळावर सोनसळीच्या’ असाच रंगांचा उत्सव समोर येतो. ही कविता म्हणणूनच एक तरल निसर्गचित्र बनून समोर येते.

कवितेच्या शेवटी ‘गुढघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, गऽ ऽ’ असं वर्णन येतं. गुन्हा केल्यावर जो शिक्षेसाठी पात्र आहे आणि आता सापडत नाही तो ‘फरार’. तसं प्रेमाच्या गुन्ह्यात आपण ‘फरार’ आहोत अशी मोक़ळी स्पष्ट कबुली इथे दिलेली आहे. बरं हे पाणी काही गळाभर नाही. गुढघाभरच आहे. प्रेमात बुडून मेलो वगैरे असं काहीच म्हणत नाहीत. तर आपण त्यात कसे डुंबत आहोत, हे सांगितलं आहे. गुढघाभर पाण्यातच आपण कसे आकंठ बुडालो आहोत याचा प्रत्यय कवी वाचकाला देतो. रहिमचा एक दोहा फार प्रसिद्ध आहे

रहिमन नदीया प्रेम की उलटी जिसकी धार
पार हुआ वो डूब गया, डुबा हुआ वो पार

ना.घं.च्या कवितेत उत्कट प्रेमाचा रंग त्यांच्या शेवटच्या शेवटच्या कवितांतूनही दिसून येतो. ते रहायचे त्या मेहकर गावांत एक कंचनीचा महाल आहे. या कंचनीच्या प्रेमावर एक सुंदर असे खंडकाव्य त्यांनी लिहीलं.

ना.घं.वरती दासू वैद्यने फार सुंदर कविता लिहीली आहे. त्याचा शेवट करताना त्यानं लिहीलं आहे

जोपर्यंत कुणाला तरी कुणाची
प्राणातून याद येते
तोपर्यंत उगवत राहील
तुझ्या शब्दांतून पोपटी गवत

दासूने ‘पोपटी’ हा जो रंगाचा उल्लेख केला आहे तो अतिशय समर्पक आहे. तो गवतासाठी केला असल्याने त्यात वेगळं काय कारण गवत पोपटीच असतं असं कुणालाही वाटेल. पण भारतीय रससिद्धांतात विविध रसांसाठी विविध रंग सांगितलेले आहेत. त्यात शृंगार रसाचा रंग हा आपण समजतो किंवा पाश्चात्यांच्या संकेतानुसार वापरतो तो गुलाबी नाहीये. शृंगारासाठी भरताच्या नाट्यशास्त्रात पोपटी रंग सांगितला आहे. पोपटी रंग रसरशीत प्रेमाचे प्रतिक आहे. ना.घं.ची कविता अशीच रसरशीत प्रेमाचे प्रतिक आहे.

ना.घ.च्या कवितांचा अप्रतिम कार्यक्रम ‘अंतरिच्या गुढगर्भी’ जालन्याचे कै. बलवंत धोंगडे यांच्या कल्पनेतून तयार झाला. त्याला अभय अग्निहोत्री यांनी फार सुरेख चाली दिल्या आहेत. हा कार्यक्रम आम्ही परभणीला बी. रघुनाथ सभागृहात घेतला होता.

1995 च्या परभणी येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात ना.घ.देशपांडे यांचा मुख्य सत्कार आम्ही केला होता. त्याचे आमंत्रण देण्यासाठी इंद्रजीत भालेराव सोबत मी नाघंना भेटायला मेहकरला गेलो होतो. त्यांनी जिच्यावर कविता लिहीली तो नदीकाठचा कंचनीचा महाल आम्ही बघितला.  तब्येतीमुळे ते बाहेर पडत नसत. पण आमच्या आग्रहाने ना.घ. आवर्जून आले. कुठलेही भाषण करणे त्यांना शक्य नव्हते. कविता म्हणायचा त्यांना आग्रह केल्यावर ‘कुठली म्हणू?’ असं त्यांनी बोळक्या झालेल्या तोंडाने विचारलं. तेंव्हा महानोरांनी त्यांना ‘नदीकिनारी नदीकिनारी’ म्हणा असा आग्रह केला.‘हात्तीच्या !!’  म्हणून निरागस हसत डोक्यावर हात मारून घेतला होता.
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Thursday, June 25, 2020

आठवण आणीबाणीची । ओरड अघोषित आणीबाणीची



उरूस, 25 जून 2020 

आज 25 जून. बरोबर 45 वर्षांपूर्वी याच दिवशी आणीबाणीची घोषणा करण्यात आली. भारतीय लोकशाहीच्या स्वच्छ चारित्र्यावर लागलेल्या या काळ्या कुट्ट्या धब्ब्याची सगळ्यांनाच आठवण येते. तेंव्हाची परिस्थिती काय आणि कशी होती याबाबत अजूनही जागजागो लिहील्या जाते.

पण गेल्या काही दिवसांपासून म्हणजे नेमके सांगायचे तर 2014 पासून देशांत अषोघित आणीबाणी आलेली आहे, लोकशाही धोक्यात आहे, हुकुमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे असा आरोप जमात-ए-पुरोगामी करताना दिसतात.

अगदी आत्ताही काही पत्रकारांनी लेख लिहून देशात 75 च्या आणीबाणी पेक्षाही कशी वाईट परिस्थिती आहे याचे आपल्या परिने वर्णन करून भडक चित्र रंगवले आहे. विचारांचा लढा विचारांनी लढता येतो पण अविचारांशी कसे लढणार? वगैरे वगैरे विचार मांडले आहेत.

हे विचार मांडणारे जमात ए पुरोगामी यांचा हेतू प्रमाणिक असला असता तर तो समजून घेता तरी आला असता. पण ज्या कॉंग्रेस पक्षाने आणीबाणी लादली तो पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे. ज्याने आणीबाणीला पाठिंबा दिला त्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे. ज्या पक्षाचे नेते स्वत: आणीबाणी काळात कॉंग्रेस मंत्रिमंडळात होते तो राष्ट्रवादीही सत्तेत आहे. इतकंच काय पण या सरकारचे सर्वेसर्वा शरद पवारच आहेत. आणि असं असताना सध्या देशात अघोषित आणीबाणी आहे असा दावा करणारे महाराष्ट्रातील सरकारवर काहीच न बोलता ज्यांच्या सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांनी आणीबाणीत तुरूंगवास भोगला त्या भाजपच्या केंद्रातील सत्तेवर टीका करत आहेत.

बुद्धिभ्रम पसरवायचा असेल तर शाब्दिक खेळ खुप करता येतात. पण त्या फंदात न पडता सामान्य माणसांच्या दृष्टीने आपण ढोबळमानाने तपासू की 75 ची आणीबाणी आणि आत्ताची परिस्थिती यात काही साम्य आहे का.
1975 ला आणीबाणी लागू झाली तेंव्हा त्या वेळची माध्यमे म्हणजेच वृत्तपत्रे यांच्यावर संपूर्ण बंधने आणली गेली. अगदी वृत्तपत्रांच्या संपादकीय विभागात सरकारी अधिकारी बसून एक एक बातमी तपासायचे. काही मोठ्या वृत्तपत्रांचा विद्यूत पुरवठा खंडित करण्यात आला. वृत्तपत्रांना पुरवण्यात येणारा कागद रोकला गेला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सरळ सरळ दिसेल अशी गळचेपी करण्यात आली. ‘दिसेल अशी’ यासाठी म्हणतो की दै. मराठवाडा ने तर अग्रलेखाची जागाच कोरी सोडून द्यायला सुरवात केली. बातम्यांत शब्द गाळले जावून तिथे रिकाम्या जागा दिसायला लागल्या.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांना उचलून सरळ सरळ तुरूंगातच टाकण्यात आले. त्या विरोधात कसलीही तक्रार कुठेच करण्यासाठी जागा ठेवण्यात आली नव्हती.

तिसरी आणीबाणीची ठळक खुण म्हणजे सामान्य लोकांच्या मनात तयार करण्यात आलेली सत्तेसंबंधातील जरब. यामुळे लोकांना राग आला. लोकांच्या मनात राग आहे हे प्रत्यक्ष सिद्ध करता येत नाहीत. पण हे आजचे पुरोगामी आणीबाणीबाबत असं म्हणतात की सामान्य लोकांनी आणीबाणी उठल्यानंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारूण पराभव करून दाखवला (दारूण म्हणावा असा पराभव झालेला नव्हता. चांगल्या 189 जागा इंदिरा कॉंग्रेसच्या निवडुन आल्या होत्या). हा निवडणुकीतील पराभव म्हणजेच लोकांच्या मनात जो राग होता त्याचा पुरावा.

आता आपण या तिनही गोष्टी आजच्या काळात तपासून घेवू. आज वृत्तपत्र किंवा सध्या असलेली इतर माध्यमे यांच्यावर असली कोणती बंधने आहेत? ‘मोदी सरकार आता माझी नौकरीपण आता घालवेल’ असा आरोप करत 2015 मध्ये गळा काढणारे रविशकुमार आजही एनडिटिव्हीत नौकरी करत आहेत. वृत्तत्रपे, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, सामाजिक माध्यमे यांद्वारे लोक वाट्टेल तसे व्यक्त होत आहेत. (वाट्टेल तसे म्हणण्याचे कारण फेक खाती उघडून करण्यात येत असलेली बदनामी, वापरण्यात येत असलेली असभ्य भाषा) कुणाचीही गळचेपी झाल्याचा सकृतदर्शनी पुरावा नाही. ज्यांच्यावर गुन्हे नोंदवले अशी ओरड हे पुरोगामी करत आहेत त्यांनी देशविरोधी चुकीचे लिखाण केले म्हणून खटले दाखल झाले आहेत. शिवाय त्यांना उचलून तुरूंगात टाकलेले नाही. दाद मागण्यासाठी सर्व न्यायालयीन पर्याय त्यांना खुले आहेत.

दुसरी बाब म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांच्या तेंव्हा झालेल्या अटका. आज म्हणजे 2014 पासून किती राजकीय कार्यकर्त्यांना विनाचौकशी तुरूंगात टाकण्यात आले? एकही ठळक उदाहरण देता येत नाही. ज्या राजकीय नेत्यांच्या मागे सक्त वसुली संचालनालयाच्या चौकश्या लावण्यात आल्या आहेत त्या आर्थिक स्वरूपांतील गंभीर गुन्ह्यांबाबत आहेत. त्यांहीसाठी त्या राजकीय नेत्यांना न्यायाची दाद मागण्याचे सर्व पर्याय खुले आहेत. पी. चिदंबरमसारख्यांना तर विक्रमी वेळा जामिन मिळाला आहे. आताही ते जामिनावर सुटून बाहेर आले आहेत. सफुरा झरगर हीच्या बाबत जी ओरड याच पुरोगाम्यांनी केली होती तिलाही जामिन नुकताच मंजूर झाला आहे. आज अघोषित आणीबाणीची ओरड करणार्‍या पत्रकारांनी हे तरी एकदा प्रमाणिकपणे सांगावे 1975 ला इतके राजकीय कार्यकर्ते तुरूंगात गेले मग त्यामानाने किती पत्रकार लेखक तेंव्हा तरी तुरूंगात गेले होते? ज्येष्ठ पत्रकार अनंत भालेराव, लेखक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर ही दोनच नावे ठळक आहेत. नरहर कुरूंदकर आणि दुर्गाबाई भागवत यांनी जोरदार भूमिका आणीबाणी विरोधात घेतली. पण त्यांना अटक झाली नव्हती. आज ओरड करणारे पत्रकार-कलावंत-लेखक तेंव्हाही कातडी बचावत होते हे लक्षात घ्या.

तिसरी बाब म्हणजे सामान्य लोकांमध्ये असलेली सत्ताधार्‍यांबाबतची चीड संताप मतपेटीद्वारे व्यक्त होतो आहे का? 2014 पेक्षा जास्त टक्केवारी मतांनी आणि जागांनी भाजपला लोकांनी 2019 मध्ये निवडुन दिले आहे. मग सामान्य लोकांमध्ये या सरकारविरोधी संतापाची भावना आहे याचा कसला पुरावा ग्राह्य मानायचा?
मग एक प्रश्‍न निर्माण होतो की 2014 नंतर वारंवार जमात ए पुरोगामी असली भूमिका का मांडत आहेत?
1980 नंतर फार मोठ्या प्रमाणावर डाव्या विशेषत: समाजवादी चळवळीतील पक्षांची राजकीय पिछेहाट झाली. जवळपास त्यांची राजकीय कारकीर्दच संपून गेली. हे सगळे डावे कार्यकर्ते नेते विविध सामाजिक संस्था उपक्रमांत स्वत:ला व्यग्र ठेवायला लागले. या सामाजिक संस्थांना (एन.जी.ओ.) मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे सरकारी धोरण आखण्यात आले. बघता बघता डाव्या राजकीय चळवळीचेच एनजीओकरण झाले. त्यांच्यातील राजकीय संघर्षाची वृत्ती संपून गेली. सरकारी निघी तसेच मोठ्या प्रमाणांतील देशी विदेशी देणग्या यातून यांचा कारभार हळू हळू सरकारी कामासारखा होवून बसला. सामान्य लोकांच्या खर्‍या प्रश्‍नांपासूनही हे दूर जात राहिले.

2014 पर्यंत या सर्व डाव्या चळवळीच्या एनजीओना भक्कम सरकारी आश्रय उपलब्ध होता. 2014 नंतर मात्र मोदी सरकारने या संस्थांच्या गैरकारभाराची बारीक चौकशी सुरू केली, आर्थिक घोटाळे पकडण्यात आले (उदा. तिस्ता सेटलवाड यांची संस्था), सरकारी निधी आटला, परदेशी निधीवर बंधने आली. आणि यातूनच यांच्यात एक अस्वस्थता सुरू झाली.

लिखित माध्यमं होती तोपर्यंत डाव्यांची त्यावर प्रचंड हुकुमत होती. नव्हे जवळपास एकाधिकारशाहीच होती. पण 1995 नंतर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं, 2010 नंतर समाज माध्यमं यांचे वर्चस्व वाढू लागले. आणि माध्यमांतूनही डाव्यांचा प्रभाव संपून गेला.

म्हणजे 1980 नंतर राजकीय कारकीर्द मर्यादीत झाली, एनजीओचे महत्व संपले, माध्यमांत प्रभाव राहिला नाही. यातून जमात ए पुरोगामींची विफलता आता वारंवार ‘अघोषित आणीबाणी’ आली असं म्हणते आहे.
2014 पासूनचे भाजप मोदींचे आव्हान परतवण्यासाठी काही एक राजकीय सामाजिक संघटन उभे करणे त्यासाठी मेहनत घेण्याासाठी मात्र हे कुणी तयार नाहीत.

ज्या कॉंग्रेस विरोधात आणीबाणीत लढा दिला त्याच कॉंग्रेसचा पदर धरून ही मंडळी भाजप मोदींच्या ‘अघोषित आणीबाणी’ विरोधात लढू पहात आहेत.  खरं तर कॉंग्रेस हाच पुरोगाम्यांच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. त्यातही गांधी वाड्रा घराणे हीच मोठी अडचण आहे. कुमार केतकरांनी साप्ताहिक साधनात एक लेख लिहून भाजप सोबतच या डाव्यांना तडाखे लगावले आहेत. (‘कॉंग्रेस विरोधाचे मुख्य कारण नेहरूविरोध आहे’ - सा. साधना दि. 20 जून 2020)  त्यातून योग्य तो बोध घेवून भाजप विरोधात एक भक्कम आघाडी पुरोगाम्यांनी तयार करावी. त्यात गांधी वाड्रा परिवार वगळून कॉंग्रेसला सहभागी करून घ्यावे. तरच यांना काही भवितव्य आहे.
नसता अजून पाच वर्षांनी 2025 मध्ये आणीबाणीचा ‘सुवर्णमहोत्सव’ येईल, भाजप तिसर्‍यांदा सत्तेवर आलेला असेल आणि हे परत असलेच ‘अघोषित आणीबाणी’चे लेख लिहीत बसतील.

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Tuesday, June 23, 2020

लोकसत्ताचे ‘चीनेश’ सरलष्कर!


उरूस, 23 जून 2020   

दै. लोकसत्तात दर सोमवारी संपादकीय पानावर ‘लालकिल्ला’ हे सदर प्रसिद्ध होते. नावावरून कुणाही वाचकांचा असा समज होईल की हे सदर दिल्लीतील घडामोडींबाबत आहे. ते तसे आहेही. पण याचे लेखक महेश सरलष्कर यांचा कदाचित असा समज झाला असावा की हे सदर लाल ‘चीन’च्या किल्ल्यावरून असे आहे. निदान 22 जूनचा त्यांचा लेख वाचल्यावर हा लेख ‘चीनेश’ सरलष्कर यांनी चीनची भलामण करण्यासाठीच लिहीला असावा याची खात्री पटते.

प्रस्थापित अमेरिकेन माध्यमांना गेल्या 4 वर्षांत 19 मिलियन डॉलर इतकी प्रचंड रक्कम चीनने वाटली असल्याची माहिती नुकतीच बाहेर आली आहे. (60 लाख डॉलर वॉल स्ट्रीट जर्नल, 46 लाख डॉलर वॉशिंग्टन पोस्ट, 24 लाख डॉलर फॉरेन पॉलिसी मॅगझीन, 55 हजार डॉलर न्युयॉर्क टाईम्स, व इतर). शिवाय 11 मिलियन डॉलर इतकी रक्कम छोट्या छोट्या वृत्तपत्रांना वाटली आहे. भारतात अशी किती रक्कम आली याचा अजून खुलासा झाला नाही. त्यामुळे मराठीत कुणाला किती मिळाले हेही माहित नाही. पण मराठीत यासाठी सर्वाधिक पात्र उमेदवार ‘लोकसत्ता’च असेल यात काही शंका नाही.

‘चीनेश’ सरलष्कर असं लिहीतात, ‘... पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ‘चीनवर बहिष्कार’ या भाजपपुरस्कृत भावनिक आवाहनाचेही कौतुक केले! मग, बाकी राजकीय पक्षांनी नांगी टाकली तर नवल नव्हे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी मात्र केंद्र सरकारच्या चीन प्रकरणाच्या हाताळणीबाबत प्रश्‍न उपस्थित केले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने घुसखोरी केली नसल्याची ‘ग्वाही’ दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. त्यामुळे संभाव्य एकमुखी पाठिंब्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा तर उडालाच वर नाहक स्पष्टीकरण देण्याची वेळ पंतप्रधान कार्यालयावर आली.’

आता ही बैठक करोडो भारतीयांनी ऐकली/ पाहिली. बैठकीचा फज्जा उडाला असे ‘चीनेश’ सरलष्कर कशाच्या आधाराने लिहीतात? याच ‘चीनेश’ सरलष्कर यांच्या लोकसत्ताने दुसर्‍याच दिवशी 23 जून 2020 मंगळवारी पहिल्याच पानावर चीनच्या अधिकार्‍यांचा हवाला देवून अशी बातमी छापली आहे की आपला अधिकारी ठार झाल्याची कबुली चीनने दिली आहे. म्हणजे कालच तूम्ही पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा उडाल्याचे सांगता. चीनचे 43 सैनिक मारल्या गेल्याची बातमी खोटी असल्याचे लिहीता. भारतीय 20 जवानांच्या शहिद होण्याची टिंगल करता. आणि दुसर्‍याच दिवशी चीनने आपल्या नामुष्कीची कबुली दिलेली तुम्हाला पहिल्या पानावर छापावे लागते.

‘चीनेश’ सरलष्कर दोघांच्या लिखाणाचा संदर्भ आपल्या लेखात वापरतात. एक म्हणजे अजय शुक्ला. हे अगदी 2013 मध्येही असे लिहीत होते की गलवान व्हॅली हा चीनचा भाग आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एल.ए.सी.) बाबत सातत्याने धुळफेक करणारे लिखाण अजय शुक्ला करत आले आहेत. दुसरे आहेत मे.ज.(निवृत्त) एस.एच. पनाग. माध्यमांमधून चीनची बाजू घेत सातत्याने भारतीयांचा बुद्धिभेद करणारी ही काही नावं. यांचे जूने लेख, ट्विट काढून तपासा. ही माणसं सतत खोट्या बातम्या, खोटी माहिती पसरवत आहेत. आणि ‘चीनेश’ सारखे यांच्या लेखांचा संदर्भ घेत भारतविरोधी मांडणी करत आहेत.

पाकिस्तान विरोधी घोषणा करत कश्मिरातील कारवाईने देशात मुस्लिम विरोधी मानसिकता तयार करून त्याचा उपयोग निवडणुकांत भाजपकडून केला जातो असा हिणकस आरोप ‘चीनेश’ आपल्या लेखात करत आहेत. आणि वर ‘... पाकिस्तानला युद्धात हरवल्याने आपण जेते आहोतच. पण यातील एकही गोष्ट चीन विरोधात लागू पडत नाही. 1962 मध्ये चीनने भारतावर मात केली. अक्साई चीन ताब्यात घेतला. पाकिस्तानला बळ दिले. संयुक्त राष्ट्रात कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू दिले नाही. चीन सतत वरचढ राहिल्यामुळे चीनविरोधात भाजपला देशांतर्गत राजकीय लाभासाठी ‘राष्ट्रवादा’चा वापर करता येत नाही. उलट गलवान खोर्‍यातील चीनच्या दृष्टीने क्ष्ाुल्लक असणार्‍या संघर्षातून भाजपच्या आक्रमकवादाला खिंडार पाडले गेल्याची परिस्थिती आहे.’...   ‘चीनेश’ सरलष्कर यांचे हे शब्द म्हणजेच चीनमधून काहीतरी मलिदा मिळाल्याचा पुरावा आहे.

याच वृत्तपत्राला दुसर्‍याच दिवशी चीनी नामुष्कीच्या बातम्या पहिल्या पानावर छापाव्या लागल्या आहेत. आताही जगभरची माध्यमे आणि चीनमधूनही आपल्या मृत जवानांची माहिती का दिली नाही म्हणून आवाज उठत आहे. भारतात शहिदांना सन्मान मिळतो आणि आपल्याकडे मृत जवानांची हाडं डब्यात बंद करून चुपचाप चोरी छुपे घरी पाठवली जातात याबद्दल चीनमध्ये संताप उठत आहे. आणि इकडे मात्र ‘चीनेश’ यांना भारताची नामुष्की झाल्याची दिवास्वप्ने पडत आहेत.

 ‘छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभानअल्ला’ असा या लेखावरचा अग्रलेखातील मजकुर आहे. आपल्या सवयीप्रमाणे गिरीश कुबेर यांनी डोनाल्ड ट्रंप यांना तडाखे लगावताना भारतासाठी चीन अधिक धोकादायक असे वर वर सांगत शेवटी काय लिहीलंय ते बघा, ‘... आपले दावे काहीही असोत, पण गलवान खोर्‍यात आपल्याला चीनने झटका दिला हे निश्चित. 2018 साली मोदी आणि जिनपिंग यांच्यात वुहान येथे सुरू झालेला दोस्ताना 2019 साली महाबलीपुरम येथे शहाळ्याच्या स्वादात अधिक वृद्धिंगत झाला असल्याचे सांगितले गेले. 2014 साली मोदी यांच्या राज्यारोहणानंतर साबरमती आश्रमात सूत कातण्यास जिनपिंग येण्याआधी चिनी सैन्याची आपल्या देशातील घुसखोरी वाढली आणि 2019 च्या महाबलीपुरम महाबैठकीनंतर वर्षभरात चीनने किमान 600 वेळा सीमा मर्यादाभंग केल्याचे प्रकार नोंदले.’

मोदिंचा आंधळा द्वेष करता करता देशहितही कळत नाही यांना? 2019 मध्ये 600 वेळा सीमा मर्यादाभंग केल्याचे सर्रास खोटे कशाच्या आधारावर कुबेर लिहून जातात? सैन्याच्या वतीने अधिकृतरित्या अशा आक्रमणाची माहिती दिली जाते. स्वत: कुबेरांच्या वृत्तपत्राने कितीवेळा 2019 मध्ये या बातम्या दिल्या? आणि आता अचानक अग्रलेखात हा 600 चा आकडा येतो कुठून?

भाजप मोदी यांचा विरोध लोकशाहीत आपण समजू शकतो. पण ही नीच देशविरोधी वृत्ती कशी काय समजून घ्यायची हेच माझ्यासारख्याला कळत नाहीये. मुंबईत 11 बॉंब स्फोट झाले असताना शरद पवार असे म्हणाले की 12 बॉंम्ब स्फोट झाले. शरद पवार खोटे बोलले कारण की सामाजिक स्वास्थ्य टिकून रहावे म्हणून 12 वा बॉंम्ब स्फोट मस्जिदमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व महान पत्रकारांनी चुकूनही कधी आपल्या नागरिकांना सांगितले नाही. स्वत: शरद पवारांनीच आपल्या मुलाखतीत सांगितल्यावर हे खोटं बाहेर आले. कारण काय तर देशहित.

आणि इथे पंतप्रधान, सुरक्षामंत्री, परराष्ट्र मंत्री, सैन्याचे अधिकारी, काही जबाबदार पत्रकार सर्व जी काही सत्य परिस्थिती सांगत असताना देशहित गाडून चीनहित डोळ्यासमोर ठेवून हे कुबेर, चीनेश, सोनिया, राहूल, सीताराम येचुरी व समस्त डावे, चिदंबरम, अजय शुक्ला, मे.ज.(नि.) पनाग सारखे ‘चीन-चुन-चु’ देशद्रोही मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.

कधी वाटतं असल्या देशद्रोह्यांची दखल घेत आपण कशाला इतका विचार करतो लिहीतो ? सामान्य माणसे कशी राग आली की आई बहिणीवरून सणसणीत शिवी देवून आपल्या संतापाला वाट करून देतात तसे करता आले तर बरं होईल. कारण ही देशद्रोही वृत्ती जाणीवपूर्वक असे करते आहे. एकच आशा आहे. प्रमाणिक भारतीय नागरिक ज्याचे आपल्या देशावर नितांत प्रेम आहे, हजारो वर्षांची आक्रमणे त्याने पचवली आहेत. त्याच्या पर्यंत आपण सत्य पोचवू. आणि सत्याची ताकद इतकी असते की अंतिमत: त्याचाच विजय होतो. आपण सत्याच्याच बाजूने लढू. 
   
    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Sunday, June 21, 2020

सफुराच्या बचावासाठी आंतरराष्ट्रीय दबाव!


उरूस, 21 जून 2020 

लदाखच्या गलवाल व्हॅलीतील चिनी सैन्याच्या धुसफुशीत एक बातमी काहीशी मागे पडली. दिल्ली दंग्यातील आरोपी सफुरा झरगर हीची जामिन याचिका सर्वौच्च न्यायालयासमोर 6 जून रोजी सादर झाली. सफुरा गरोदर असल्याने तिचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी तिच्यावतीने वकिलांनी मागणी केली होती. शिवाय तिच्यावरची गुन्ह्याची कलमं गैर पद्धतीनं लावण्यात आली आहेत वगैरे वगैरे दावे केल्या गेले.

ही याचिका सर्वौच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सफुरा प्रमाणेच इतरही काही गुन्हेगार महिला ज्या गर्भवती आहेत, काहींची प्रसुतीही याच तुरूंगात झालेली आहे, काही अगदी लहान बाळं सांभाळण्याची त्यांच्या खेळण्याची चांगली व्यवस्था तुरूंगात कशी आहे हे सरकारी पक्षाच्या वतीने व तुरूंग प्रशासनाच्या वतीने सर्वौच्च न्यायालयाला सप्रमाण पटवून देण्यात आलं. आणि सफुरासाठीचा हा बचावाचा प्रयत्न फसला.

पण इतक्यावर शांत बसतील तर ते पुरोगामी कसले. या जमात ए पुरोगामींनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मदतीने ‘अमेरिकन बार असोसिएशन’च्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात मागणी केली की सफुरावर अन्याय झाला असून  तिला तुरूंगात टाकणे म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचा भंग आहे. तिला ताबडतोब मुक्त करण्यात यायला हवे.

अमेरिकन बार असोसिएशन ची ही मागणी कुठल्या न्यूज पोर्टलनी उचलून धरली त्यांची नावे पहा. म्हणजे हा सगळी गँग कशी एकाच सुरात सुर मिसळून काम करते ते सहजच लक्षात येईल. द क्विंट, द वायर, लाईव्ह लॉ वेबसाईट, कश्मिरवाला, सियासत दिल्ली, नॅशनल हेरॉल्ड (तोच तो कॉंग्रेसवाला पेपर ज्यावर कोर्ट केस चालू आहेत.) या सगळ्यांनी मिळून ही अमेरिकन बार असोसिएशन ची बातमी चालवली आहे.

मुळात अमेरिकन बार असोसिएशन च्या लेटर हेडवर जे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे त्याच्या शिर्षकापासूनच दिशाभूल करण्यात आली आहे. ‘प्रिलिमिनरी रिपोर्ट - द कंटिन्यू डिटेन्शन ऑफ स्टूडंटस् व्हॉलंटिअर सफुरा झरगर न्यू दिल्ली जून 2020). एक तर सफुरा ही कुठल्याही विद्यार्थी विषयक आंदोलनात काम करत असताना पकडल्या गेलेली नाही. विद्यार्थ्यांच्या हक्काची कुठलीच लढाई ती लढत नव्हती. सीएए, एनआरसी, एनपीआर हे विषय विद्यार्थी आंदोलनाचे नाहीत. शिवाय सफुरावर या आंदोलनात सहभागी आहे म्हणून गुन्हा नोंदवला गेला नाही. तर दिल्लीत जे दंगे भडकले त्यात भडकावू भाषणं करणे, महिलांना दंग्याच्या ठिकाणी आणून रस्ता रोको, मेट्रो स्टेशन बंद पाडणे, दगड चाकु दंडे यांचा वापर करून आंदोलन हिंसक करण्यासाठी प्रोत्साहन देणे असे गंभीर गुन्हे आहेत. शिवाय तिच्या भडकावू भाषणांचे व्हिडिओ आहेत.

सफुरावर युएपीए या गंभीर कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. जो की देशद्रोह्यांसाठी असतो. देशविरोधी उचापती केल्या म्हणून तीला अटक केल्या गेली आहे. आणि अशा गंभीर गुन्ह्यात अमेरिकन बार असोसिएशन पत्रक का काढत आहे? हे पत्रक बार असोसिएशनच्या मानवाधिकार समितीने तयार केले असा नमुद करण्यात आले आहे.

कॅपिटल टिव्हीच्या पत्रकारांनी या पत्रकाचा भांडाफोड केला आहे. त्यांनीच यातील बनाव उघडकीस आणला. हे पत्रक कुठल्या माहितीच्या आधाराने तयार करण्यात आले? ज्या पत्रकारांच्या लेखांचा आधार घेतला आहे त्यांची नावे या पत्रकात खाली तळटीपेत दिली आहेत. गीता पांडे (बीबीसी), अश्रफ जरगर (सीबीएस न्यूज), निहा मसी (वॉशिंग्टन पोस्ट), आकाश बिस्ट (अज जजिरा), सीमा पाशा (द वायर), अदनान भट (साउथ चॅनेल मॉर्निंग पोस्ट), गौतम भाटीया  (द स्क्रोल), जीवनप्रकाश शर्मा (आउटलूक इंडिया) ही नावे पाहिलीच की कळते की जमात ए पुरोगामींचा हा कसा कट आहे ते.

हा सगळा अहवाल तयार केल्यावर पत्रकाच्या खाली बारीक अक्षरात अशी तळटीप दिली आहे की हा अहवाल अमेरिकन बार असोसिएशनच्या नियामक मंडळाने हा अहवाल तपासलेला नाही. याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे हा अहवाल अमेरिकन बार असोसिएशनची अधिकृत भूमिका म्हणून धोरण म्हणून गृहीत धरण्यात येवू नये.

डाव्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार आम्ही म्हणतो तो हा आहे. हे पत्रक अधिकृत म्हणून ज्या ज्या न्यूज पोर्टलवर चालविण्यात आले त्यांनी बारीक अक्षरांतील या तळटीपेचा उल्लेख केला नाही. जाहिरातीत जसे मोठ मोठे दावे केले जातात आणि मग अगदी बारीक अशी एक चांदणी काढून खाली खुलासा केला असतो, ‘अटी लागू’ तसा हा प्रकार आहे. सर्रास खोटा प्रचार करायचा. सामान्य वाचकांनी दिशाभूल करायची. हे सगळे देशद्रोही म्हणजे कसे महान आहेत अशी प्रतिमा तयार करायची. त्यांच्यासाठी जोरात प्रचार चालवायचा. आणि बौद्धिकदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या कुठे अडकायची वेळ येतच असेल तर अशी तळटीप देवून निसटण्याची फट ठेवायची.
अर्बन नक्षलीं असल्याचा संशय ज्याच्यावर आहे अशा ‘महान’ ‘विचारवंत’ लेखक असणार्‍यांची गेल्या 15-20 वर्षांतील महाराष्ट्रातील प्रतिमा कशी तयार करण्यात आली होती हे आठवून पहा. आता ते तुरूंगात जावून पडले आहेत, कायद्याचा फास त्यांच्या भोवती पक्का आवळला गेला आहे तेंव्हा मात्र त्यांच्या पाठीराख्यांची पाचावर धारण बसली आहे.

सफुराच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव आहे असा बनाव करण्यात आला आणि तो उघडा पडताच तातडीने ट्विट मागे घेतल जातात, लेख न्यूज पोर्टलवरून गायब होतात. पण आजकाल तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे हे सगळं साठवून ठेवण्याचे तंत्र विकसित झाले आहे. त्यामुळे असले खोटे ट्विट, मागे घेतलेले लेख जाणकार वाचकांच्या समोर येतात आणि या तथाकथित पुरोगाम्यांचे पितळ उघडे पडते.

(यु ट्यूबवरील कॅपिटल टिव्हीच्या व्हिडिओत ही सर्व माहिती  व अजूनही खुप माहिती देणारे व्हिडिओ आहेत. जरूर पहा. मी केवळ त्यातील थोडासा भाग मराठीत लिहून तूमच्यासमोर ठेवला आहे. हे जमात ए पुरोगामींचे षडयंत्र सगळ्या देशप्रेमींनी ओळखले पाहिजे व त्यांच्याकडून घडविण्यात येणार्‍या देशविरोधी कारवायांना आपल्या आपल्या परिने कडाडून विरोध केला पाहिजे. कॅपिटल टिव्ही, ऍपइंडिया, सत्य सनातन, ओएमएच न्यूज,  यांची ऍलर्जी असणार्‍या मित्रांना परत विनंती माझ्या लिखाणाच्या वाट्याला जावू नका. तूमचे आणि तूमच्या जमात-ए-पुरोगामी मित्रांचे मन:स्वास्थ्य बिघडले तर मी जबाबदार नाही.) 
   

    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Saturday, June 20, 2020

कुमार-संजय गळा । दाटे ‘राहुल’ उमाळा ॥


उरूस, 20 जून 2020   

राहूल गांधींची 50 व्या वाढदिवसाच्या निमित्त विजय चोरमारेंनी महात्मा गांधींशी तूलना केल्यावर आता अजून दोन पत्रकार राहूल चालिसा गाण्यासाठी पुढे आले आहेत.

एक आहेत ‘ दै. दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे. आवटेंनी एक छोटी फेसबुक पोस्ट लिहीली आहे. राहुल गांधी यांच्या घराण्यात जे मृत्यू घडले त्या बाबत आवटेंनी लिहीताना ‘राहुल गांधी असणं खरंच सोपं नाही’असं लिहीलं आहे.

कुमार केतकर यांनी नॅशनल हेरॉल्ड या कॉंग्रेसच्या वृत्तपत्रात जो लेख लिहीला आहे त्याचा मराठी अनुवाद ‘राहुल गांधी- वज्रलेपी मनाचा मागोवा’ या नावाने 19 जून 2020 च्या दै. दिव्य मराठीत जाहिरातीसारखा पानाच्या तळाशी ओळखू न यावा असा छापला आहे.(शिर्षकाचा आणि लेखातील मजकुराचा दुरान्वयेही संबंध वाचकांनी शोधून दाखवावा.)

आवटेंचा तर लेख नाहीच छोटे फेसबुक टीपण आहे. पण केतकरांनीही आपल्या लेखात एकाही वाक्यात राहूल गांधी यांची राजकीय समज कशी किंवा त्यांच्या राजकारणाची वैशिष्ट्ये काय या बद्दल एका शब्दानेही काही लिहीले नाही. त्यांनी फक्त 1970 पासून म्हणजे राहुल गांधींच्या जन्मापासूनच्या भारतीय राजकारणात त्यांना सोयीच्या वाटणार्‍या इंदिरा-राजीव यांची भलावण करणार्‍या घटना नोंदवल्या आहेत. ज्यांचा राहुल गांधींशी काहीच संबंध नाही.

जयप्रकाश नारायण यांना नेहरूंनी उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली होती पण त्यांनी ती कशी नाकारली आणि मग आणीबाणी आधी मात्र ते कसे अचानक राजकारणात सक्रिय झाले असा उल्लेख केतकर करतात. केतकर आजही या विषयावर बौद्धिक धुळफेक करण्यात गुंग आहेत. आणीबाणीच्या आधीच्या आंदोलनातही जयप्रकाश हे महात्मा गांधींसारखे संपूर्ण आंदोलनामागे एक नैतिक पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणूनच होते. त्यांनी चुकुनही कुठल्या पदाचा कधीही आग्रह तर सोडाच आपल्या भाषणात कधी उल्लेखही केला नाही. आणि जनता पक्ष निवडून आल्यावरही जयप्रकाश पंतप्रधान झाले नाही. पण केतकर मात्र शिंतोंडे उडवून मोकळे.

केतकर लिहीतात, ‘जयप्रकाश यांनी देशातील पोलिस यंत्रणेस आणि लष्करास सरकारचे आदेश धुडकावण्याचे आवाहन केले आणि त्या सार्‍या खेळातील आंतरराष्ट्रीय कटाच्या सोंगट्या उघड पडल्या.’

आता मुळात या वाक्याचा राहुल गांधी यांच्या वज्रलेपी मनाचा मागोवा घेत असताना काय संदर्भ? केतकरांच्या या भयानक आरोपातून जयप्रकाश नारायण हे देशद्रोही ठरतात. मग याचा एक तरी पुरावा केतकर आज इतक्या वर्षांनी तरी देवू शकतात का? जयप्रकाश नारायण यांचा आदेश लष्कर आणि पोलिस मानत असते तर इतक्या प्रचंड प्रमाणात विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड आणीबाणीत झाली असती का? आणि इतकी जर या कटाची इत्थंभूत माहिती केतकरांना होती तर मुळात केतकर आत्तापर्यंत या कटवाल्यांच्या निशाणाच्या टप्प्यात कसे काय नाही सापडले?

केतकर आणि त्यांचे आणीबाणी प्रेम हा स्वतंत्र विषय आहे त्यावर परत कधी लिहीता येईल. आजचा विषय वज्रलेपी मनाचे राहुल गांधी हे आहेत.

पुढे केतकर आणि आवटेही संजय गांधी यांच्या मृत्यूचा उल्लेख करतात. 

संजय गांधी विमान अपघातात गेले तेंव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. राहुल गांधी फक्त 10 वर्षांचे होते. एक लहान मुल म्हणून त्यांनी हे दु:ख पचवलं हे सोपं नव्हतं हे बरोबर आहे. पण यात कुठेही राहुल गांधी यांच्यावर घराची काही जबाबदारी नव्हती. असण्याचे काहीच कारण नव्हते. 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाली तेंव्हाही राजीव गांधी यांनी घरातील कर्ता पुरूष म्हणून हे दु:ख पचवले, पक्षाचा आणि देशाचा कारभार धैर्याने हाती घेतला आणि चालवून दाखवला. यात राहुल गांधींचा वैयक्तिक दु:खाशिवाय काय संबंध येतो? याच काळात हजारो शिखांची कत्तल झाली. तेंव्हा राहुल गांधींच्याच वयाच्या कित्येक शीख मुला मुलींनी संपूर्ण घरादाराची कत्तल आपल्या डोळ्यांनी पाहिली. ही मुलं मुली नाही का उभी राहिली आयुष्यात कणखरपणे?

पुढे 1991 ला राजीव गांधी यांचीही हत्या झाली तेंव्हा राहुल गांधी 21 वर्षांचे होते. त्यांच्यावर कोसळलेले दु:ख अपार होते. पण घराची जबाबदारी सोनिया गांधींनी उचलली. त्यांनी राजकारणातून संपूर्णत: बाजूला राहण्याचा निर्णय घेतला. इथेही राहुल गांधींचा काहीच संबंध येत नाही. कुमार केतकर तर त्यांच्या सवयीप्रमाणे सरळ खोटं लिहीतात की राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी राजकारणात आल्या. प्रत्यक्षात त्या 1998 ला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे आल्या.

ज्या प्रमाणे 1984 ला इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी धैर्याने समोर आले आणि त्यांनी परिस्थिती हाताळली तसं 1991 नंतर सोनिया/राहुल यांनी केलं नाही. उलट ते राजकारणापासून दूर गेले. मग यात त्यांची राजकीय परिपक्वता कशी काय दिसून येते?

खरं तर 2004 पासून राहुल गांधी यांची खासदार म्हणून कारकीर्द सुरू होते. अपेक्षीत असे होते की कुमार केतकर किंवा संजय आवटे तिथपासून ते आजतागायतच्या राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतली. पन्नाशीच्या आतच राजकारणात मोठी पदे सांभाळणार्‍या नेत्यांशी राहुल गांधींची तुलना करतील. (जगनमोहन रेड्डी, देवेंद्र फडणवीस, अखिलेश यादव, नविन पटनायक इ.) झाले नेमके उलटेच. राहुल गांधींच्या लहानपणातील त्यांच्या कुटुंबांतील मृत्यूंचा उल्लेख करून यांनी उमाळे काढले. केतकरांनी त्या निमित्ताने आपला त्या आणीबाणी समर्थनाचा बडा ख्याल आळवून घेतला. पण राहुल गांधींच्या राजकीय वाटचालीवर भाष्य करण्यापासून पळ काढला.

या दोघांच्या लिखाणातूनच हे सिद्ध होते की राहुल गांधी एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून संपूर्णत: प्रभावहीन ठरले आहेत. कुमार केतकरांनी तर चक्क लिहीलंच आहे, ‘निवडणुकीच्या रिंगणात किंवा राजकारणाच्या गणितांमध्ये ते यशस्वी होतील की नाही माहीत नाही. ते शेवटी काही अंशी त्यांच्या सभोवतालच्या तर काही अंशी नियतीवर अवलंबून आहे. शत्रू बाहेरही आहेत आणि आतही. स्थानिक शत्रूंच्या खांद्यावर बंदून ठेवून ते आंतरराष्ट्रीय कारस्थान्यांचे लक्ष्य असू शकतात. इंदिरा आणि राजीव यांना असेच मित्र लाभले. शत्रूंची गरजच नव्हती.’

आता केतकरांच्या या लेखातील शेवटच्या पॅराचा काय अर्थ काढायचा? मोदी भाजप संघ अमित शहा यांची नावं घ्यायचीच कशाला? राहुल गांधींंना राजकीय दृष्ट्या संपवायला कॉंग्रेसवालेच समर्थ आहेत असाच विश्वास केतकर व्यक्त करत आहेत ना? आणि आंतरराष्ट्रीय कट ही काय भानगड परत परत केतकर उकरून काढतात?
केतकरांच्या या वाक्याचा पुरावा राहुल गांधींना त्यांच्या अगदी जन्मदिवशीच मिळाला. गुजरात, मध्यप्रदेश, झारखंड आणि मणिपुर या चार राज्यांमधून कॉग्रेसचे एकूण 4 उमेदवार राज्यसभा निवडणुकीत पराभूत झाले. गुजरातमध्ये तर शरद पवारांच्या आमदारानेही कॉंग्रेस उमेदवाराला मतदान केले नाही.

बाबरी मस्जिद पाडली म्हणून याच लेखात केतकरांनी हिंदुत्ववाद्यांच्या नावाने ओरड केली आहे. मग त्याच शिवसेनेला पाठिंबा देताना, ज्या राष्ट्रवादीच्या आमदाराने गुजरातेत कॉंग्रेसला मतदान केले नाही त्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसताना केतकरांना आपल्याच लेखाचा विसर पडतो की काय? का जाहिरात पुरवणी म्हणून लिहीलेला लेख वेगळा असतो आणि आपली कृती वेगळी असते असे समजायचे?

विधान परिषदेवर 12 आमदार नेमले जाईपर्यंत राहुल गांधींवर अजूनही असे काही लेख येण्याची शक्यता आहे.   
 
    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Friday, June 19, 2020

राहुल गांधी-महात्मा गांधी तूलना : विजय चोरमारेंचे बौद्धिक अध:पतन!


उरूस, 19 जून 2020 

राहुल गांधींना 50 व्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा!

त्यांना शुभेच्छा देणे, त्यांच्यावर लेख लिहीणे, त्यांच्याकडून राजकीय अपेक्षा व्यक्त करणे  आजच्या दिवशी स्वाभाविक आहे. अगदी कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्तेच कशाला कॉंग्रेसचे विरोधकही असा लेख लिहीतील. पण वाढदिवसानिमित्त एखाद्या जबाबदार पत्रकाराने राहुल गांधींची तूलना सरळ महात्मा गांधींशीच करावी याला काय म्हणावे?

महाराष्ट्र टाईम्सचे पत्रकार विजय चोरमारे यांनी राहुल गांधींवर एक लेख फेसबुकवर लिहीला आहे. तो वाचल्यावर बौद्धिक अध:पात इतकीच प्रतिक्रिया उमटते. दुसरा एक गावठी शब्द आहे शाब्दिक लाळघोटेपणा. पण विजय चोरमारे हे पण चळवळीतीलच असल्यामुळे तो वापरायचे मी टाळतो.

महात्मा गांधींशी तूलना करताना चोरमारे यांनी असा उल्लेख केला आहे की ज्या प्रमाणे आपले गुरू गोपाल कृष्ण गोखले (चोरमारे यांनी आताच्य तरूण कॉंग्रेसजनांना विचारून पहावं की महात्मा गांधींचे गुरू कोण होते, किती जण बरोबर उत्तर देतात ते त्यांनीच तपासावे.) यांच्या सांगण्यावरून भारतभ्रमण केले. अगदी रेल्वेच्या तृतिय वर्गाने प्रवास केला. भारताच्या कानाकोपर्‍यात गेले आणि त्यांनी भारत समजावून घेतला. आता चोरमारे असं लिहीत आहेत की  ‘‘...त्या नंतर नव्वद वर्षांनंतर राहुल गांधी नावाच्या तरूणानं तोच मार्ग अवलंबला. लोकांमध्ये थेट मिसळण्याचा. लोकांशी बोलण्याचा. तेही सतत मृत्युची टांगती तलवार असताना. त्यांची प्रत्येक कृती महात्मा गांधीजींच्य जवळ जाणारी आहे.’’

राहुल गांधी यांनी भारतात जितकी राज्यं आहेत त्या राज्यांतील कॉंग्रेस प्रदेशाध्यांची नावे एका दमात सांगावीत किंवा कागदावर लिहून दाखवावीत. मोबाईलचा वापर न करता. (मागे त्यांनी अगदी शोकसंदेश लिहीतानाही मोबाईलमधून कसा कॉपी करून लिहीला होता हे रजत शर्मांच्या आप की अदालत मध्ये सर्व भारतीयांनी पाहिलं आहे.) मग आपण मान्य करू की राहुल गांधी यांनी महात्मा गांधींसारखा सर्वत्र फिरून भारत समजून घेतला आहे.

किंवा राहुल गांधी यांनी एक मुलाखत अचानक निवडलेल्या एखाद्या पत्रकाराला द्यावी. त्यात कुठलाही गुंतागुंतीचा प्रश्‍न न विचारता केवळ भारतातील राज्ये, त्यांच्या भाषा, त्यातील प्रमुख नद्या, त्या त्या राज्यातील प्रमुख संत, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, इतरांच्या नसले तरी नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया पुस्तकांतील उल्लेख केलेली प्रमुख राजकीय घराणे इतक्यावरच उत्तरे द्यावीत.

विजय चोरमारे यांच्याच लेखात दिल्याप्रमाणे 2003 पासून राहूल गांधी राजकारणात सक्रिय आहे. त्यांचा राजकीय प्रवास रूढ कॉंग्रेस मानसिकतेला धक्के देणारा आहे असं चोरमारे म्हणतात. आता राजकारणात आल्या आल्या वयाच्या 34 व्या वर्षी ते अमेठीत उभे राहिले. निवडून आले. यात धक्का कसला? इंदिरा गांधी यांनाही नेहरूंनी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद त्यांच्या वयाच्या 40 मध्येच दिले होते. राजीव गांधींनाही इंदिरा गांधींनी 38 व्या वर्षीच आपल्या हयातीत पक्षाचे सरचिटणीस बनवले होते. संजय गांधी तर याहूनही तरूण वयात पक्षात सत्ताकेंद्र बनून राहिले होते. राहूल गांधी 2004 मध्ये खासदार झाले यात कॉंग्रेस संस्कृतीला धक्का कोणता? कुठलीही योग्यता सिद्ध न करता इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी यांच्या सारखेच राहूल गांधी यांनाही पदं मिळाली. अनिर्बंध अधिकार मिळाले. यात धक्का कोणता? हीच तर कॉंग्रेसी संस्कृती राहिली आहे.

तरूणांशी संवादावर राहूल गांधींनी भर दिला असे चोरमारे म्हणतात. तरूणांशी ते जवळीक साधतात. तरूणांना राजकारणाबाबत परकेपणाची भावना येवू नये असा त्यांचा प्रयास असतो. मग हेच राहूल गांधी मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगढ या राज्यात तरूणांच्या हातात राज्याचे नेतृत्व का देवू शकले नाही? या प्रश्‍नांवरून तर मध्यप्रदेशातील सत्ताच गेली. कर्नाटकातही अगदी आत्ता मल्लिकार्जून खडगे सारख्यांना वयोवृद्धांना राज्यसभेत उमेदवारी दिल्याने कर्नाटक युवक कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. राजस्थानात सचिन पायलट यांना डावलून परत जून्या अशोक गेहलोत सारख्या खोडांनाच मुख्यमंत्री केल्या गेले त्यावरून अस्वथता आहे.

महाराष्ट्रातही युवक कॉंग्रेसला जास्त उमेदवारी दिल्या गेली पाहिजे अशी सतत मागणी केली गेली होती. त्याचे काय झाले? विजय चोरमारे यांनी सध्या अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपद कुणाकडे आहे तेच सांगावे. महाराष्ट्रात युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाचे नातेवाईक आहेत? आणि हे राहूल गांधींना माहित नाही काय?  राहूल गांधी तरूणांशी संवाद साधतात म्हणजे कुणाशी? त्यांच्या पक्षातीलच तरूण काय तक्रार करतात हे एकदा चोरमारे यांनीच कान उघडे ठेवून ऐकावे.

आपण काय लिहीतो आणि ते वाचताना समोरच्याची काय प्रतिक्रिया उमटेल याचा तरी चोरमारे यांनी विचार करायला हवा होता. त्यांनीच आपल्या लेखात टीकाकारांसाठी एक कोलीत देवून ठेवले आहे. एका श्रमदान शिबीरात लोखंडी टोपल्यांत दगडमाती भरून डोक्यावरून वाहून टाकण्यासाठी युवकांची रांग लागली होती. या श्रमशिबीरात राहूल गांधीही सामील झाले. इतर सर्वांच्या डोक्यावर लोखंडी टोपली होती पण राहुल गांधींच्या डोक्यावर मात्र प्लास्टिकचे टोपले होते. हे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि त्यावरून राहूल गांधींना भयंकर ट्रोल करण्यात आले. हे कसे चुकीचे आहे असे त्यांनी लिहीले.

आता वाढदिवसाचा लेख लिहीत असताना असली आठवण सांगायची काय गरज होती? आणि ही आठवण सांगितल्यावर वाचणारा काय समज करून घेईल? ज्याला हे माहित नाही तोही आता प्लास्टिकचे टोपले लक्षात ठेवेल ना.

या लेखात एका ठिकाणी चोरमारे यिांनी लिहीले आहे. 10 ऑक्टोबर 2010 ला गोरखपूर लोकमान्य टर्मिनस रेल्वेत स्लिपर क्लासने राहुल गांधी यांनी 36 तास प्रवास केला. स्थलांतरीतांच्या प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रवासाची खबर न प्रसार माध्यमांना होती ना सुरक्ष कर्मींना ना सरकारी यंत्रणेला. तब्बल दहा दिवसानंतर याची खबर प्रसिद्धी माध्यमांना कळाली असल्याचे चोरमारे लिहीतात.

आता चोरमारे यांना हे कळतंय का की राहुल गांधींना तेंव्हा झेड दर्जाच्या वरची एसपीजी  सुरक्षा होती. अशी सुरक्षा असणार्‍या माणसाला असले धाडस महात्मा गांधींचा वारसा सांगत आजच्या काळात करता येत नाही. यातून अनेक प्रशासकीय धोके संभवतात. सुरक्षेसंबंधी धोक संभवतात. तेंव्हा महाराष्ट्रात आणि देशातही कॉंग्रसचेच सरकार होते. चोरमारे लिहीत आहेत ही बातमी खरी असेल तर अनेकांच्या नौकर्‍या जावू शकतात. आणि राहूल गांधींच्या या नादानपणाला शहाणपण कसे म्हणायचे?

महात्मा गांधींनी सांगितलेला हा मार्ग आहे का?

राहुल गांधी तरूणांशी संवाद साधत आहेत डोक्यावर प्लास्टिकचे टोपले घेवून, रेल्वेत 36 तास प्रवास करून, स्थलांतरित मजदूरांशी संवाद साधत आहेत प्लॅटर्फार्मवर बसून. हे जर खरे असेल तर मग हेच राहुल गांधी त्यांच्या घरी जेंव्हा आसामचे त्यांच्याच पक्षाचे नेते हेमंत बिस्वसर्मा भेटायला जातात तेंव्हा त्यांच्याशी न बोलता कुत्र्याला बिस्कीटं खावू घालत बसतात हे कसे काय? केवळ हेमंत बिस्वसर्माच नव्हे तर कित्येक कॉंग्रेस नेते राहूल गांधींची भेट कशी होत नाही व हात हलवत कसे दिल्लीहून कसे परतावे लागते याचे किस्से सांगतात.

आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना न बोलता कुत्र्याला बिस्कीटं खावू घालत संवाद साधावा हा संस्कार राहूल गांधींनी कोणत्या गांधींपासून घेतला हे पण चोरमारे यांनी आपल्या लेखात स्पष्ट करायला हवे होते.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा घोळ चालू होता तेंव्हा राहूल गांधी महाराष्ट्रातल्या नेत्यांशी किती आणि कसा संवाद साधत होते? किती तातडीने निर्णय घेतल्या जात होते? शिवसेना व राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांपाशी मुुंबईत बसून होते आणि इकडे कॉंग्रेंसकडून पाठिंब्याचे पत्र यायची वाट होती. शेवटी ते आलेच नाही. सरकार स्थापनेचा तो मुहूर्त टळला. ही संवादाची किमया कोणत्या दर्जाची आहे ते विजय चोरमारे यांनी राहूल गांधींनाच विचारून सांगावे. 

आजही कॉंग्रसमध्ये ‘श्रेष्ठी’ संस्कृती जोरावर आहे याचा हा पुरावाच आहे. आणि तरी चोरमारे राज्याराज्यातील सुभेदार्‍यांनी राहूल गांधी व्यथित झाले असं लिहीतात. याला काम म्हणणार?

मावळच्या शेतकर्‍यांवर गोळीबार झाला तेंव्हा राहुल गांधी आले नाहीत म्हणून टीका झाली. यावर चोरमारे असे लिहीतात की सोनिया गांधींची तब्येत खराब होती. अण्णा हजारेंचे आंदोलन दिल्लीत भरात होते. तेंव्हा राहूल गांधींना तत्काळ यायला जमले नाही हे पत्रकार, विरोधकांनी समजून घेतले नाही. पण नंतर राहुल गांधी येवून मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबांना भेटून गेले. पण त्यांनी ही भेट गुप्त ठेवली.

आता परत तीच गोरखपुर मुंबई रेल्वे प्रवासाच्या बातमी सारखीच गुप्तता. राहुल गांधींना सर्वोच्च दर्जाची अव्वल सुरक्षा असताना त्यांच्या भेटी प्रवास विदेश दौरे गुप्त ठेवले जातातच कसे? चोरमारे कुठल्या हेतूने लिहीत आहेत हे मला माहित नाही पण राहुल गांधींची ही अशी गुप्ततेची कृती अनेकांना संकटात टाकणारी ठरू शकते.

राहुल गांधी 2004 पासून संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, सरचिटणीस, उपाध्यक्ष असली पदे असो नसो सर्वच अधिकार त्यांच्या मातोश्री आणि ते यांच्यापाशीच एकवटलेले आहेत. महात्मा गांधींना असे सत्तेचे अधिकाराचे कुणा हाती एकवटणे अपेक्षीत होते का? मग विजय चोरमारे महात्मा गांधींशी तुलना का करत आहेत?

राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? याचे मुळ कारण लपवून ठेवत चोरमारे असे लिहीतात, ‘कॉंग्रेसमध्ये प्रांतोप्रांतीच्या सुभेदारांच्या सुभेदार्‍या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर या सुभेदार्‍यांचा त्यांना अनुभव आला आणि व्यथित होवून त्यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे टोकाचे पाउल उचलले.’

१९८९  पासून आजतागायत पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवता आले नाही. उत्तर प्रदेश बिहार आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू पश्चिम बंगाल सारख्या मोठ्या राज्यात पक्ष दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा नाही. महाराष्ट्रात सत्तेत छोटा वाटा आहे पण स्थान आतिशय नगण्य आहे.  पक्ष संघटनेचे संपूर्णत: बारा वाजले आहेत आणि याची बर्‍याचअंशी जबाबदारी राहूल गांधी यांचीच आहे. कारण ते पक्षाचे तरूण नेतृत्व आहे. त्यांच्यापाशी सर्वाधिकार एकवटलेले आहेत. त्यांच्या मातोश्री या आजारी आहेत आणि वयानेही थकल्या आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी राहूल गांधींचे वडिल राजीव गांधी यांनी देशाचे पंतप्रधानपद सांभाळले होते. यांनी किमान आपला पक्ष आधी सांभाळावा.

राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्विकारावे किंवा एरव्ही ते पळ काढतात तसा इटलीत बँकॉंगमध्ये काढावा हा पूर्णत: त्यांचा प्रश्‍न आहे. पण त्यांच्या अध्यक्षपदाच्या त्यागाने संपूर्ण देशाचे नुकसान झाले या विजय चोरमारे यांच्या वाक्याशी मात्र मी मुळीच सहमत नाही. सोनिया-राहूल-प्रियंका यांच्यापासून कॉंग्रेस मुक्त होईल तेंव्हाच कॉंग्रेसचे आणि देशाचेही भले होईल या मताचा मी आहे.   

राहुल गांधी बाबत चोरमारे आशावादी आहेत. त्यांनी तसा आशावाद बाळगावा. पण त्या नादात त्यांची तूलना महात्मा गांधींशी करावी हे तर फारच झाले. चोरमारे अधिकृतरित्या कॉंग्रेसचे सदस्य कार्यकर्ते नाहीत. नसता 'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे' म्हणणारे यशवंतराव चव्हाण, ‘इंदिरा इज इंडिया’ असे दिव्य उद्गार काढणारे देवकांत बरुआ यांच्यानंतर ‘राहूल गांधी यांच्यात महात्मा गांधींचे गुण दिसतात’ म्हणणारे विजय चोरमारे यांचाच नंबर लागला असता.

पत्रकार परिषदेत सरकारी अध्यादेश फाडून टाकणारे राहूल गांधी यांची तूलना परकीय इंग्रजांचा कायदा सविनय कायदेभंग करून तोडणार्‍या महात्मा गांधींशी जर अशा पद्धतीनं विजय चोरमारे करू लागले तर राहूल गांधींचा विषय राहू द्या बाजूला चोरमारे यांच्याच बौद्धिक अध:पतानाचा पुरावा समोर येतो.

राहूल गांधींना एक व्यक्ती म्हणून 50 व्या वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा!


    श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575