उरूस, 23 जून 2020
दै. लोकसत्तात दर सोमवारी संपादकीय पानावर ‘लालकिल्ला’ हे सदर प्रसिद्ध होते. नावावरून कुणाही वाचकांचा असा समज होईल की हे सदर दिल्लीतील घडामोडींबाबत आहे. ते तसे आहेही. पण याचे लेखक महेश सरलष्कर यांचा कदाचित असा समज झाला असावा की हे सदर लाल ‘चीन’च्या किल्ल्यावरून असे आहे. निदान 22 जूनचा त्यांचा लेख वाचल्यावर हा लेख ‘चीनेश’ सरलष्कर यांनी चीनची भलामण करण्यासाठीच लिहीला असावा याची खात्री पटते.
प्रस्थापित अमेरिकेन माध्यमांना गेल्या 4 वर्षांत 19 मिलियन डॉलर इतकी प्रचंड रक्कम चीनने वाटली असल्याची माहिती नुकतीच बाहेर आली आहे. (60 लाख डॉलर वॉल स्ट्रीट जर्नल, 46 लाख डॉलर वॉशिंग्टन पोस्ट, 24 लाख डॉलर फॉरेन पॉलिसी मॅगझीन, 55 हजार डॉलर न्युयॉर्क टाईम्स, व इतर). शिवाय 11 मिलियन डॉलर इतकी रक्कम छोट्या छोट्या वृत्तपत्रांना वाटली आहे. भारतात अशी किती रक्कम आली याचा अजून खुलासा झाला नाही. त्यामुळे मराठीत कुणाला किती मिळाले हेही माहित नाही. पण मराठीत यासाठी सर्वाधिक पात्र उमेदवार ‘लोकसत्ता’च असेल यात काही शंका नाही.
‘चीनेश’ सरलष्कर असं लिहीतात, ‘... पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर ‘चीनवर बहिष्कार’ या भाजपपुरस्कृत भावनिक आवाहनाचेही कौतुक केले! मग, बाकी राजकीय पक्षांनी नांगी टाकली तर नवल नव्हे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी मात्र केंद्र सरकारच्या चीन प्रकरणाच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनने घुसखोरी केली नसल्याची ‘ग्वाही’ दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. त्यामुळे संभाव्य एकमुखी पाठिंब्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा तर उडालाच वर नाहक स्पष्टीकरण देण्याची वेळ पंतप्रधान कार्यालयावर आली.’
आता ही बैठक करोडो भारतीयांनी ऐकली/ पाहिली. बैठकीचा फज्जा उडाला असे ‘चीनेश’ सरलष्कर कशाच्या आधाराने लिहीतात? याच ‘चीनेश’ सरलष्कर यांच्या लोकसत्ताने दुसर्याच दिवशी 23 जून 2020 मंगळवारी पहिल्याच पानावर चीनच्या अधिकार्यांचा हवाला देवून अशी बातमी छापली आहे की आपला अधिकारी ठार झाल्याची कबुली चीनने दिली आहे. म्हणजे कालच तूम्ही पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीचा फज्जा उडाल्याचे सांगता. चीनचे 43 सैनिक मारल्या गेल्याची बातमी खोटी असल्याचे लिहीता. भारतीय 20 जवानांच्या शहिद होण्याची टिंगल करता. आणि दुसर्याच दिवशी चीनने आपल्या नामुष्कीची कबुली दिलेली तुम्हाला पहिल्या पानावर छापावे लागते.
‘चीनेश’ सरलष्कर दोघांच्या लिखाणाचा संदर्भ आपल्या लेखात वापरतात. एक म्हणजे अजय शुक्ला. हे अगदी 2013 मध्येही असे लिहीत होते की गलवान व्हॅली हा चीनचा भाग आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एल.ए.सी.) बाबत सातत्याने धुळफेक करणारे लिखाण अजय शुक्ला करत आले आहेत. दुसरे आहेत मे.ज.(निवृत्त) एस.एच. पनाग. माध्यमांमधून चीनची बाजू घेत सातत्याने भारतीयांचा बुद्धिभेद करणारी ही काही नावं. यांचे जूने लेख, ट्विट काढून तपासा. ही माणसं सतत खोट्या बातम्या, खोटी माहिती पसरवत आहेत. आणि ‘चीनेश’ सारखे यांच्या लेखांचा संदर्भ घेत भारतविरोधी मांडणी करत आहेत.
पाकिस्तान विरोधी घोषणा करत कश्मिरातील कारवाईने देशात मुस्लिम विरोधी मानसिकता तयार करून त्याचा उपयोग निवडणुकांत भाजपकडून केला जातो असा हिणकस आरोप ‘चीनेश’ आपल्या लेखात करत आहेत. आणि वर ‘... पाकिस्तानला युद्धात हरवल्याने आपण जेते आहोतच. पण यातील एकही गोष्ट चीन विरोधात लागू पडत नाही. 1962 मध्ये चीनने भारतावर मात केली. अक्साई चीन ताब्यात घेतला. पाकिस्तानला बळ दिले. संयुक्त राष्ट्रात कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू दिले नाही. चीन सतत वरचढ राहिल्यामुळे चीनविरोधात भाजपला देशांतर्गत राजकीय लाभासाठी ‘राष्ट्रवादा’चा वापर करता येत नाही. उलट गलवान खोर्यातील चीनच्या दृष्टीने क्ष्ाुल्लक असणार्या संघर्षातून भाजपच्या आक्रमकवादाला खिंडार पाडले गेल्याची परिस्थिती आहे.’... ‘चीनेश’ सरलष्कर यांचे हे शब्द म्हणजेच चीनमधून काहीतरी मलिदा मिळाल्याचा पुरावा आहे.
याच वृत्तपत्राला दुसर्याच दिवशी चीनी नामुष्कीच्या बातम्या पहिल्या पानावर छापाव्या लागल्या आहेत. आताही जगभरची माध्यमे आणि चीनमधूनही आपल्या मृत जवानांची माहिती का दिली नाही म्हणून आवाज उठत आहे. भारतात शहिदांना सन्मान मिळतो आणि आपल्याकडे मृत जवानांची हाडं डब्यात बंद करून चुपचाप चोरी छुपे घरी पाठवली जातात याबद्दल चीनमध्ये संताप उठत आहे. आणि इकडे मात्र ‘चीनेश’ यांना भारताची नामुष्की झाल्याची दिवास्वप्ने पडत आहेत.
‘छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभानअल्ला’ असा या लेखावरचा अग्रलेखातील मजकुर आहे. आपल्या सवयीप्रमाणे गिरीश कुबेर यांनी डोनाल्ड ट्रंप यांना तडाखे लगावताना भारतासाठी चीन अधिक धोकादायक असे वर वर सांगत शेवटी काय लिहीलंय ते बघा, ‘... आपले दावे काहीही असोत, पण गलवान खोर्यात आपल्याला चीनने झटका दिला हे निश्चित. 2018 साली मोदी आणि जिनपिंग यांच्यात वुहान येथे सुरू झालेला दोस्ताना 2019 साली महाबलीपुरम येथे शहाळ्याच्या स्वादात अधिक वृद्धिंगत झाला असल्याचे सांगितले गेले. 2014 साली मोदी यांच्या राज्यारोहणानंतर साबरमती आश्रमात सूत कातण्यास जिनपिंग येण्याआधी चिनी सैन्याची आपल्या देशातील घुसखोरी वाढली आणि 2019 च्या महाबलीपुरम महाबैठकीनंतर वर्षभरात चीनने किमान 600 वेळा सीमा मर्यादाभंग केल्याचे प्रकार नोंदले.’
मोदिंचा आंधळा द्वेष करता करता देशहितही कळत नाही यांना? 2019 मध्ये 600 वेळा सीमा मर्यादाभंग केल्याचे सर्रास खोटे कशाच्या आधारावर कुबेर लिहून जातात? सैन्याच्या वतीने अधिकृतरित्या अशा आक्रमणाची माहिती दिली जाते. स्वत: कुबेरांच्या वृत्तपत्राने कितीवेळा 2019 मध्ये या बातम्या दिल्या? आणि आता अचानक अग्रलेखात हा 600 चा आकडा येतो कुठून?
भाजप मोदी यांचा विरोध लोकशाहीत आपण समजू शकतो. पण ही नीच देशविरोधी वृत्ती कशी काय समजून घ्यायची हेच माझ्यासारख्याला कळत नाहीये. मुंबईत 11 बॉंब स्फोट झाले असताना शरद पवार असे म्हणाले की 12 बॉंम्ब स्फोट झाले. शरद पवार खोटे बोलले कारण की सामाजिक स्वास्थ्य टिकून रहावे म्हणून 12 वा बॉंम्ब स्फोट मस्जिदमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व महान पत्रकारांनी चुकूनही कधी आपल्या नागरिकांना सांगितले नाही. स्वत: शरद पवारांनीच आपल्या मुलाखतीत सांगितल्यावर हे खोटं बाहेर आले. कारण काय तर देशहित.
आणि इथे पंतप्रधान, सुरक्षामंत्री, परराष्ट्र मंत्री, सैन्याचे अधिकारी, काही जबाबदार पत्रकार सर्व जी काही सत्य परिस्थिती सांगत असताना देशहित गाडून चीनहित डोळ्यासमोर ठेवून हे कुबेर, चीनेश, सोनिया, राहूल, सीताराम येचुरी व समस्त डावे, चिदंबरम, अजय शुक्ला, मे.ज.(नि.) पनाग सारखे ‘चीन-चुन-चु’ देशद्रोही मात्र त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत.
कधी वाटतं असल्या देशद्रोह्यांची दखल घेत आपण कशाला इतका विचार करतो लिहीतो ? सामान्य माणसे कशी राग आली की आई बहिणीवरून सणसणीत शिवी देवून आपल्या संतापाला वाट करून देतात तसे करता आले तर बरं होईल. कारण ही देशद्रोही वृत्ती जाणीवपूर्वक असे करते आहे. एकच आशा आहे. प्रमाणिक भारतीय नागरिक ज्याचे आपल्या देशावर नितांत प्रेम आहे, हजारो वर्षांची आक्रमणे त्याने पचवली आहेत. त्याच्या पर्यंत आपण सत्य पोचवू. आणि सत्याची ताकद इतकी असते की अंतिमत: त्याचाच विजय होतो. आपण सत्याच्याच बाजूने लढू.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575