Thursday, May 28, 2020

सावरकर विरोधकांचा वैचारिक आडमुठपणा !


विवेक, उरूस, फेब्रुवारी 2019

महात्मा गांधींच्या हत्येला 70 वर्षे होवून गेली. या हत्येच्या कटात सावरकरांचा सहभाग होता असा आरोप करण्यात आला. विशेष न्यायालयात त्यांच्यावर रीतसर खटला दाखल झाला आणि सावरकर त्यातून निर्दोष सुटले. सावरकरांची सुटका अजूनही त्यांच्या विरोधकांना पचलेली नाही.

सावरकर विचाराचे अभ्यासक  मा. श्री. शेषराव मोरे यांनी हा विषय धसाला लावण्याचे ठरवले. त्यांनी आधी ‘सावरकरांचा बुद्धीवाद’, ‘सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग’ अशी पुस्तके लिहीली होती. पण गांधीहत्येच्या प्रकरणाला हात लावला नव्हता. सावरकरांचा मृत्यू 1966 ला झाला. तेंव्हा पासून ते 1998 ला अटल बिहारी वाजपेयी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एन.डी.ए.) सरकार केंद्रात सत्तेवर येईपर्यंत सावरकर विरोधक शांत होते. पण वाजपेयी सरकारच्या काळात अंदमान येथील पोर्ट ब्लेअर विमानतळाचे नामकरण ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळ’ असे करण्यात आले.  शिवाय संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते 26 फेब्रु. 2003 मध्ये करण्यात आले. 

या दोन ठळक प्रसंगानंतर सावरकर बदनामीला विरोधकांना जोर आला असा शेषराव मोरे यांनी साधार आरोपच आपल्या पुस्तकात केला आहे. तिस्ता सेटलवाड यांच्या ‘कम्युनॅलिझम कॉंबॅट’ नावाच्या मासिकात इ.स. 2000 मध्ये गांधीहत्येवरील गुजराथी व मराठी पुस्तकांचे संपादित अनुवाद प्रसिद्ध करण्यात आले.  मणिशंकर अय्यर यांनी 2002 मध्ये इंडियन एक्स्प्रेस मध्ये लेख लिहीला. 2004 च्या आऊटलूक च्या अंकात राजेश रामचंद्रन, सबा नक्वी व स्मृती कोप्पियर यांचेही लेख आहेत. मनिनी चटर्ज़ी (एक्स्प्रेस 2004) प्रफुल बिडवई (नवहिंद टाईम्स 2004),  अनिल नौरिया (द हिंदू 2004) अशी एक यादीच मोरे यांनी आपल्या पुस्तकात दिली आहे. 

सावरकरांच्या बदनामीचे मुळ आरंभक व प्रचारक अब्दुल गफूर नुराणी हे आहेत. पोर्ट ब्लेअर विमानतळाचे नामकरण झाल्यानंतर त्यांनी ‘सावरकर अँड हिंदुत्व : गोडसे कनेक्शन’ या नावाचे दोनशे पानाचे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. बहुतांश पत्रकारांनी नुरानी यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेत आपले लिखाण केले आहे. 

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे 2007 मध्ये ‘लेट्स किल गांधी’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. तिस्ता सेटलवाड यांनी आपल्या लेखाचे संकलन असलेले पुस्तक ‘बिआउंड डाऊट- ए डोझायर ऑन गांधीज ऍसॅसेनेशन’ जानेवारी 2015 मध्ये प्रसिद्ध केले. काही मराठी पत्रकारांनीही यावर लेख लिहीले आहे. सुनील तांबे सारखे पत्रकार यांनी ‘सावरकर यांच्यावरील गांधी हत्येचा कलंक पुसणे केवळ अशक्य’ असे लेखकही लिहीले (मिडीया वॉच दिवाळी 2015). 

शेषराव मोरे यांनी आपल्या पुस्तकात अशा लेख आणि पुस्तकांचा सविस्तर आढावा घेतला आहे. ही सगळी माणसे ज्या कपुर आयोगाचा आधार घेतात त्याचीच चिकित्सा पहिल्यांदा मोरेंनी केली आहे. मुळात सावरकरांना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर परत त्यांच्यावर संशय ज्यांना होता त्यांनी वरच्या न्यायालयात खटला का नेला नाही? आयोग हा काही न्यायालयाचा निकाल परत तपासून पाहण्याची जागा नाही. आयोगाला तेवढा अधिकारही नाही. मग हा आयोग नेमलाच का गेला? 

हा एक असा नेमका मुद्दा आहे की जिथे हे सगळे सावरकर विरोधक मूग गिळून गप्प बसतात. नुराणी सारखे लेखक तर ‘न्या. कपुर यांना गांधी हत्या कारस्थानाची संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले होते’ असे सर्रास खोटं लिहीतात.

1964 मध्ये गोपाळ गोडस, विष्णु करकरे व मदनलाल पाहवा हे जन्मठेपेची शिक्षा भोगून बाहेर आले. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या चाहत्यांनी  सार्वजनिक सत्यनारायण पुजेचा कार्यक्रम आखला होता. त्यात भाषण करताना लोकमान्य टिळकांचे नातू ‘केसरी’ व ’तरूण भारत’चे संपादक राहिलेले ग.वि.केतकर असे बोलून गेले की गांधीहत्या होणार हे त्यांच्या कानावर होते. आणि ही माहिती त्यांनी मध्यस्थामार्फत तत्कालीन मुख्यमंत्री बा.गं. खेर यांना दिली होती. 

केवळ हा एकच मुद्दा केंद्रभागी ठेवून निवृत्त न्या. जीवनलाल कपुर आयोगाची स्थापना केल्या गेली. कपुर आयोगाला जे तीन मुद्दे चौकशीसाठी दिले होते त्यांचा सारांश असा 

1. ग.वि.केतकर किंवा अन्य कुणाला गांधीहत्येच्या कटाची पूर्व माहिती होती का?
2. जर असेल तर त्यांनी ती सरकारला कळवले का? 
3. कळवले असेल तर सरकारने काय कारवाई केली?

म्हणजे मुळात कपुर आयोगाच्या कक्षा काही मुद्द्यांपूरत्या सिमीत आहेत. तसे असतनाही नुराणी सारखे लोक धादांत खोटे लिहीतात. आणि नुराणींचा संदर्भ घेवून बाकीही बदनामीचा उद्दोग करतात. 

कपूर आयोगाने आपल्या निष्कर्षात कुठेही सावरकरांचा उल्लेख केला नाही.समारोपाच्या एका परिच्छेदात काहीही संदर्भ नसताना सावरकरांचा ते उल्लेख करतात. आणि त्या आधारावर नुराणीपासून सर्व सावरकर विरोधक आरोपांचा पर्वत उभा करतात. 

शेषराव मोरे यांचे ‘गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी’ हे पुस्तक 28 मे 2018 ला प्रसिद्ध झाले. आता अपेक्षीत असे होते की सावरकर विरोधकांनी त्यावर आपले म्हणणे सविस्तर मांडावे. शेषरावांनी सावरकरांवरील आरोपांचे जे खंडन सविस्तर केले आहे त्याचा अभ्यास करून आपली पुढील मांडणी करावी. पण आता नऊ महिने उलटून गेलेत.  पण या विरोधकांनी शेषरावांच्या पुस्तकावर कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. 

सुनील तांबें सारखे पुरोगामी पत्रकार तर अशी जाहिर भूमिका घेत आहेत की मी शेषराव यांचे पुस्तक मी वाचणार नाही. हा निव्वळ वैचारिक आडमुठपणा झाला. तूम्ही काही पुस्तकांचा आधार घेवून सावरकरांवर आरोप करता. त्याची चिकित्सा कुणी केली तर तूमचे काम आहे की तूम्ही ते वाचून त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी. 

यातही एक मुद्दा असा आहे की न्यायालयीन बाबी, सार्वजनिक जिवनातल्या सावरकरांसारख्या उत्तूंग नेत्यांच्या विषयीची काही मते ही वैचारिक मतभेदापुरती मर्यादीत असू शकत नाहीत. एकदा न्यायालयाने निकाल दिल्यावर तो जर तूम्हाला मान्य नसेल तर त्याच्याही वरच्या न्यायालयात दाद मागावी लागते. तिथेही मिळालेला न्याय समाधान देणारा नसेल तर सर्वौच्य न्यायालयात जावे लागते. कुठल्याही न्यायालयाच्या निकालाला आयोग हा पर्याय नसतो. शिवाय इतकं करूनही कपुर आयोगातील प्रचंड त्रुटी शेषरावांनी आपल्या पुस्तकांत दाखवून दिल्या आहेतच. 

77 पुस्तके वाचून कायद्याचा सखोल अभ्यास करून (शेषराव मोरे हे मूलत: अभियंते आहेत. त्यांनी कायद्याची पदवी नंतर प्राप्त केली) मोरे यांनी सदर लिखाण केले आहे. त्यांच्या लिखाणीतील त्रुटी कुणीही सविस्तर दाखवून द्याव्यात. 

आपल्या वैचारिक लिखाणाचा कुणी प्रतिवाद करणार असेल तर मोरेंनी त्याचे स्वागतच केले आहे. फाळणीवरच्या त्यांच्या पुस्तकावर मतं व्यक्त करणार्‍या लेखांचेपण एक पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. त्यात विरोधी मतेही आहेत. पण याच्या नेमकं उलट सावरकर विरोधी पुरोगामी विचारवंत पत्रकार मात्र संकुचित भूमिका घेत आहेत. समोर सत्य आलेलं असताना  ते नाकारण्याची भूमिका अनाकलनीय आहे.

एकीकडे ‘व्हेअर आर द राईट इंटेलेक्चुअल्स’ असा उद्धट प्रश्‍न पुरोगामी डाव्या विचारवंत पत्रकारांकडून केला जातो.  पण प्रत्यक्षात डावा नसलेला (उजवा म्हणूनही शिक्का नसलेला) तटस्थ शेषराव मोरेंसारखा कुणी एक अभ्यासू लेखक सविस्तर मोठे पुस्तक लिहीत आहे. त्याला उत्तर देण्याऐवजी ‘आम्ही नाही वाचणार जा... ’ असा बालीश आग्रह पुरोगामी धरणार असतील तर याला काय म्हणावे? यापूर्वी शेषराव मोरे यांच्या अंदमान येथील अध्यक्षीय भाषणावर असाच आडमुठा आग्रह पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांनी धरला होता. मी शेषराव मोरे यांचे वाचतच नाही असे डोळेंचे म्हणणे होते. जर डोळे वाचणारच नसतील तर मग टीका तरी कशाला करता? 

खंडन मंडनाची एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. आपल्या विरोधी मतवाल्याचीही दखल घेण्याची उदारता आमच्याकडे आहे. मग हे सगळं पुरोगामी विसरून जाणार आहेत का? आणि तसे असेल तर यांना ‘पुरोगामी’ म्हणायचेच कशाला? हे तर मध्ययुगीत सरंजामी मानसिकतेचे प्रतिगामी आहेत. यांची वैचारीक ताकद संपून गेली आहे असंच म्हणावं लागेल.  
(लेख ६ फे. २०१९ मध्ये पोस्ट केला होता. पण तांत्रिक कारणाने नीट दिसत नाही म्हणून परत पोस्ट केला आहे.)

                              श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, May 26, 2020

शाहिनबागचे भूत पुरोगाम्यांच्या मानगुटीवर


उरूस, 26 मे 2020

आपली पापं आपला पिच्छा सोडत नाहीत असं म्हणतात. जमात-ए-पुरोगामींना याचा चांगलाच अनुभव आता येतो आहे. शाहिनबाग, जामिया मिलीया, जेएनयु, दिल्ली दंगे या सर्व प्रकरणात पुरोगामी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करण्यात पुढे होते. आपण कशाचे समर्थन करत आहोत हे त्यांना चांगलेच माहित होते. पण आपण कायदा आणि सुव्यवस्था, संविधान याच्या जाळ्यात आपण अडकू असे मात्र त्यांना अपेक्षीत नव्हते.

नुकतेच जे.एन.यु.च्या दोन विद्यार्थिनी नताशा नरवाल आणि देवांगना कालिता यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघी ‘पिंजरातोड’ या डाव्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत. 2015 पासून ही संघटना कार्यरत आहे. नताशाने या पूर्वी ‘द वायर’ मध्ये भडक भाषेत लेखही लिहीले आहेत. जाफराबाद प्रदर्शनांच्या ठिकाणी ही हजर होती. तीने लोकांना भडकावणारे भाषण केल्याचे पुरावे समोर आले आहेत. मेट्रोस्टेशन जवळचा रस्ता बंद करण्याचे आवाहन हीने केले होते.

मूळात हे रस्ता रोको आंदोलन शाहिनबागेपासून जाफराबाद इथे नेण्यात एक मोठा कट होता. कारण शाहिनबाग ही जागा केवळ मुस्लिम बहुल लोकसंख्यंची आहे. या उलट जाफराबाद येथे हिंदू मुसलमान दोन्ही वस्ती आहे. तेंव्हा दंगलीत ‘हिंदू मुसलमान’ करणे शक्य आहे. म्हणून हिंसाचार घडवुन आणण्यात आला असे पोलिस तपासात समोर येते आहे.

या सोबत दुसरा जो गंभीर मुद्दा समोर येतो आहे तो आर्थिक उलाढालीचा. पी.एफ.आय. या कट्टरपंथी मुस्लिम संघटनेच्या सदस्यांच्या खात्यावर शाहिनबाग आंदोलन काळात मोठ्या प्रमाणात पैसे आले. हे पैसे शाहिनबाग परिसरांतील एटीएम मधून काढल्या गेले. या आर्थिक उलाढालीचा खुलासा खातेदारांना मागितला तर त्यांना चौकशीत याची उत्तरे देता आलेली नाहीत.

या बातम्या बहुतांश माध्यमे दाबून टाकत आहेत. केवळ रिपब्लिक टिव्ही, टाईम्स नाऊ आणि झी न्यूज सारख्या वाहिन्या दाखवत आहेत. बाकीच्या माध्यमांनी आळीमिळी गुपचिळी धोरण बाळगले आहे. कॅपिटल टिव्ही, व्हि.के. न्युज सारखे छोटे युट्यूब चॅनेल यावर आपल्यापरीने प्रकाश टाकत आहेत. पण त्यांची पोच मर्यादीत आहेत.

शाहिनबाग प्रकरण दाबून टाकणे हेच  जमात-ए-पुरोगामींच्या दबावात लष्कर-ए-मिडीयाचे आता मुख्य धोरण बनले आहे. कारण यात मोठ्या प्रमाणात डाव्या चळवळीतील कार्यकर्तेही अडकत चालले आहेत. वर उल्लेख केलेल्या दोन्ही विद्यार्थिनी या डाव्या चळवळीतल्या आहेत.

शहरी नक्षलवाद, दलित चळवळीतील अस्वस्थ कार्यकर्ते, कट्टरवादी मुस्लीम संघटना, आझाद कश्मीर चळवळ, हिंसावादी डाव्या संघटना हे सगळे बिंदू जोडत गेलं की संविधान विरोधी, लोकशाही विरोधी कटाचे चित्र स्पष्ट होत जाते.

यांचे समर्थन करणारी एक पत्रकार-कलाकार-लेखक-अभिनेते अशी फळी आहे. नुकतेच घडलेले पुलित्झर पुरस्काराचे प्रकरण आठवून पहा. कॉंग्रेस सारखे पक्ष याचे राजकिय भांडवल करायला टपलेले आहेतच. स्थलांतरीत मजूरांचे खोटे फोटो कसे ट्विट केले जातात ते पहा. किंवा एनडिटिव्ही वरती सैन्याच्या विरोधात खोट्या बातम्या दिल्या जातात. आणि हे खोटं असल्याचे समोर आले की मौन बाळगले जाते. कुणीही जाहिर खुलासा करत नाही किंवा माफी मागत नाही.

सफुरा झरगर प्रकरणांत सबा नकवी सारखी पत्रकार आकांडव तांडव करते आणि यातील सत्य समोर आले की मात्र गायब होते. खरं तर या प्रकरणांत सुरवातीला कुणीही सफुराच्या गर्भारपणाचा उल्लेख केला नव्हता. हे प्रकरण सबा सारख्यांनीच उकरून काढलं. आताही ज्या दोन विद्यार्थीनींना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावर लगेच बोंब सुरू झाली. या दोघींवर 2015 पासूनच पोलिसांचे कसे लक्ष होते, त्यांच्या विरोधात खुप आधीपासूनच पुरावे आहेत हे समोर आल्यावर मात्र जमात-ए-पुरोगाम्यांची दातखिळी बसते.

राम मंदिर प्रकरणांतही हाच अनुभव येतो आहे. उत्खननात जून्या मंदिराचे अवशेष सापडले. त्यावर टिप्पणी करताना ‘भाजप संघाच्या लोकांनी हे 1992 ला तिथे नेउन ठेवले असतील’ असली हास्यास्पद विधाने पुरोगामी करत आहेत.

जी नावं जेएनयु, जामिया मिलीया प्रकरणांत पुढे आली होती त्यातील बहुतेकांवर कायदेशीर कारवाईचा दंडूका उगारला गेला आहे. आणि हे सगळं कायद्याच्या चौकटीतच चालू आहे. ज्या ‘संविधान बचावो’ चे आंदोलन हे पुरोगामी करत होते त्याच संविधानातील कायद्यांचा फास यांच्या गळ्याभोवती आवळला जात आहे.

केवळ शाहिनबगाच नाही, राम मंदिर स्थळीच्या उत्खननातून लक्षात येत आहेत की यांच्या सर्वच पापांची भूते यांच्याच मानगुटीवर बसू लागली आहेत. रोमिला थापर, इरफान हबीब सारखे इतिहासकार बाबरी मस्जिद समतल भूमीवर बनली असे शपथपूर्वक न्यायालयात सांगत होते. आता यांच्या या खोटेपणासाठी त्यांच्यावर खटले दाखल केले पाहिजेत.

1974 लाच बी.के.लाल यांच्या नेतृत्वाखालील उत्खनन करणार्‍या अभ्यासकांनी बाबरी मस्जिदीखाली पुरातन मंदिराचे अवशेष असल्याचे प्रतिज्ञापूर्वक सांगितले होते. त्यातील एक तज्ज्ञ मा. के. के. मोहम्मद हे आजही मंदिर असल्याचे पुरातत्वीय पुराव्याच्या आधाराने सांगत आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याचा अहवालही हेच सांगतो आहे. पण असले पुरावे जमात-ए-पुरोगामी यांना चालत नाहीत. त्यांना सर्वोच्च न्यायालय मंजूर नाही. त्यांना शासकीय संस्थांचे अधिकृत अहवाल मंजूर नाहीत. त्यांना रोमिला थापर आणि इरफान हबीब यांचे खोटे निष्कर्षच मंजूर आहेत.

कुठल्याही पत्रकाराने दाखविलेले सत्य पुरोगामींच्या लेखी सत्य नाहीच. पण रविश कुमार आणि त्यांच्या सहकार्‍याने दाखवलेली कुठलीही खोटी बातमी यांच्यासाठी ब्रह्मसत्याच्या पदापर्यंत पोचते. स्थलांतरित मजूराच्या मुलीला गहू जमिनीवर सांडायला लावणे आणि मग ते गहू वेचतानाचा व्हिडिओ तयार करून मजूरांची करूण कहाणी सांगणे हे पुरोगामी सत्य असते. पण कुणी त्या मुलीला गाठून सत्य समोर आणले तर हे पुरोगामी पाठ फिरवून बसतात.

कुंभमेळ्यासाठी उभ्या असलेल्या बस प्रियंका गांधींच्या 1000 बस आहेत म्हणून त्यांचा फोटो एनडिटिव्हीचा पत्रकार  सर्रास दाखवतो. आणि खोटेपणा समोर आल्यावर तो फोटो कसा प्रतिकात्मक आहे अशी सारवा सारव केली जाते.

एक छोटा अर्धनग्न मुलगा आपल्या छोट्या भावाला मिठीत घेवून फुटपाथवर बसलेला असतो हा फोटो शबाना आझमी ट्विटरवर शेअर करतात आणि ‘हार्टब्रेकिंग’ असे त्यावर लिहीतात. आता साहजिकच सध्याची परिस्थिती पाहता कुणालाही हे करूण दृश्य स्थलांतरीत मजूरांच्या बाबतचे वाटू शकेल. त्याचा तपास केल्यावर हे दृश्य पाकिस्तानातील असल्याचे समोर येते आणि तेही मागच्या जानेवारी 2019 मधले. शबाना आझमींना जाब विचारल्यावर त्यांचे शहाजोग उत्तर असते मी कुठे कुणाचे काही नाव घेतले होते. मी तर केवळ हार्टब्रेकिंग इतकाच शब्द वापरला होता.

काय म्हणावे या वृत्तीला?

आता तर एका नविनच दुखण्याची लागण जमात-ए-पुरोगामीत झाली आहे. राजदीप सरदेसाई आणि बरखा दत्त यांनी  संघ परिवारातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या लढाईत कसे उतरून काम करत आहेत हे दाखवायला सुरवात केली आहे. आपल्याच भाउबंदांचे हे उद्योग बघून प्रचंड पोटशूळ, मस्तकशुळ, अजून कसला कसला शुळ जमात-ए-पुरोगाम्यांना उठला आहे. मोदी-संघ-अमितशहा-भाजप (एम.एस.ए.बी.) वर टीका हा एक कलमी कार्यक्रम राबवायचा सोडून त्यांचे सरळ सरळ कौतूक? बाप रे हे केवढे पाप आहे !! आता जमात-ए-पुरोगामींचे जे कुणी इमाम असतील ते फतवा काढून राजदीप आणि बरखा यांना जमातीतून बहिष्कृत करतील अशी शक्यता आहे.

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, May 24, 2020

पवित्र मजला आणिक गहिवर, माणुसकीचा, माणुसकीचा!


काव्यतरंग, दै. दिव्यमराठी, रविवार २४ मे २०२० 

पवित्र मजला जळजळीत ती
भूक श्रमांतुन पोसवणारी
पवित्र मजला दगडी निद्रा
दगडाची दुलई करणारी

पवित्र मज यंत्राची धडधड
समाजहृदयातिल हे ठोके
पवित्र मजला सत्यासाठी
धडपडणारे स्वतंत्र डोकें

पवित्र सुखदु:खाची गाणी
वेदांतिल सार्‍या मंत्रांहुन
पवित्र साधा मानवप्राणी
श्रीरामाहुन, श्रीकृष्णाहुन

पवित्र मज पोलादी ठोसा
अन्यायाच्या छातीवरचा
पवित्र मजला आणिक गहिवर
माणुसकीचा माणुसकीचा
-विंदा करंदीकर, (विंदा करंदीकर यांची समग्र कविता, पॉप्युलर प्रकाशर,  पृ. 31)

करंदीकरांची ही कविता 1949 सालातली आहे. स्वातंत्र्यानंतर जो एक उत्साह भारतीय जनतेत जाणवत होता त्या खुल्या मोकळ्या वातावरणातील ही कविता आहे. अजून एक पार्श्वभूमी या कवितेला आहे. दुसर्‍या महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकीवरच्या भयानक अणुहल्ल्यात लाखो माणसे मारली गेली. त्यानंतर सगळ्या युद्धखोरांचे डोळे उघडले. सर्वांनाच तीव्र जाणीव झाली की मनुष्य संहार फार मोठा कलंक आहे. माणसाला सर्वात जास्त ओढ आहे ती माणसाचीच.

आज कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपणही हा अनुभव घेत आहोत. सगळेच जखडले गेले आहेत जागजागी. त्यामूळे तीव्रतेने दूरवरच्या आपल्या माणसांची आठवण येते आहे. जे जवळ आहेत त्यांचे मोल आणखीच जाणवते आहे. आठवून आठवून नातेवाईकांना मित्रांना फोन केले जात आहेत.

विंदा करंदीकरांच्या प्रतिभेची झेप पहा. 1949 मध्ये ते यंत्रयुगाचे स्वागत करत असताना श्रमाचे महत्त्व नाकारत नाहीत. उलट ‘पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी’ म्हणत श्रमाचा गौरवच करत आहेत. आज सगळे घरांत अडकून पडले असताना किमान जरा चालून तरी येवू म्हणून जवळपास फिरू पहात आहेत. घरांतली कामं करू पहात आहेत. श्रमांची पण गरज असते हे जास्तच तीव्रतेने जाणवत आहे. जे श्रमिक पायपीट करत आहेत त्यांची वेदनेला काळजाला भिडत आहे.

कारखाने बंद आहेत. एरव्ही आपल्याला या यंत्राचे महत्त्व लक्षात येत नाही. पण आता यंत्राची धडधड, समजाहृदयातील ठेाके असल्याचे लक्षात येते आहे.

दुसर्‍या युद्धानंतर ज्या पद्धतीनं जगभरातील देश स्वतंत्र झाले आणि तेथे आधुनिक पद्धतीची शासन व्यवस्था सुरू झाली. सर्वांनाच माणूसकीचे महत्त्व जास्तच पटू लागले. पिकासोचे गाजलेले चित्र आहे ‘द ब्रेड’ नावाचे. एका खोलीत मानवी अवयवांचा खच पडला आहे. त्यातून उठून एक हात ओट्यावरील बशीत असलेल्या ब्रेडकडे झेपावत आहे. माणसाची ही जी चिवट जीवन लालसा आहे ती तीव्रतेने अशा भयंकर प्रसंगातून ठळकपणे समोर येते.

मर्ढेकरांची ‘अजून येतो वास फुलांना’ ही कविता दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरचीच आहे. आणि त्यात शेवटी जी ओळ येते ती, ‘तरीही येतो वास फुलांना, तरीही माती लाल चमकते’ अशीच आहे.

माणसाचे इहलोकावर विलक्षण प्रेम आहे. इथल्या सुखदु:खातच त्याचा जीव अडकला आहे हे खरे आहे. बोरकरांनी जे लिहीले आहे

स्वर्ग नको सुरलोक नको
मज लोभस हा इहलोक हवा
तृप्ती नको मज मुक्ती नको
मज येथील हर्ष नी शोक हवा

‘पवित्र सुखदु:खाची गाणी’ असं करंदीकर म्हणतात ते याच दृष्टीने. कोरोनात आपल्या लक्षात येतं दूरवर मृत्यू पावलेल्या नातेवाईकासाठी जागेवरच आपले डोळे पाझरत आहेत. आठवणींचे लोटच्या लोट मनी उसळत आहेत. आपले लक्ष गेले नसते एरव्ही पण आपल्याच इमारतीच्या वॉचमनचे नुकतेच जन्मलेले गोंडस मुल झोके घेत मजेत अंगठा चोखत आहे, झोका देणार्‍या त्याच्या छोटूकल्या बहिणीचा गोड आवाज आपल्या कानात भरून राहिला आहे.

खरंच आहे माणसाला माणसाच्या सुखदु:खा शिवाय पवित्र दुसरं काहीच नाही.

कोरोना संकट काळात हजारो मजूर पायपीट करत निघाले आहेत. त्यांच्या वेदनेला पारावार नाही. पण याही स्थितीत त्यांना खावू घालणारे मदत करणारे हात पुढे येत आहेत. जागजागी लोकांनी अन्नदान चालवले आहे. उत्स्फुर्तपणे संकट काळातही लोक आपल्या अडचणीवर मात करून भुकेल्यांच्या पोटी अन्न घालत आहेत.
शासनाने केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी या काळात सामान्य कष्टकर्‍यांसाठी केली आहे. करंदीकरांच्या ओळीचा प्रत्यय ‘पवित्र मजला आणिक गहिवर, माणूसकीचा माणूसकीचा’ क्षणोक्षणी जागजागी दिसून येतो आहे.

आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, पोलिस, कार्यकर्ते काम करत आहेत. यातील कित्येकांना कोरोनाची बाधा झालीही आहे. काहींचे प्राणही गेले आहेत. पण माणूस माणसासाठी तळमळतो आहे हे खरं आहे.

सम्राट अशोकाला युद्धातील रक्तपात पाहून शांतीचा मार्ग पत्करावा वाटला आणि त्याने युद्ध नाकारून बुद्ध स्विकारला. हा बुद्ध आपल्या मनात नेहमीच वसत आला आहे. तो धर्मात, राजकारणात, समाजकारणात, कलेत, साहित्यात सर्वत्रच आहे. सम्राट राजे महाराजेच कशाला अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांच्या मनांतही तो घर करून बसला आहे. या बुद्धाने सांगितलेल्या करूणेलाच ‘माणूसकीचा गहिवर’ म्हणतात.  जग कितीही आधुनिक होत जावो, कितीही तंत्रज्ञान प्रगत होत जावो ‘पवित्र मजला माणुसकीचा गहिवर’ हाच खरा मानवी संस्कृतीचा सारांश आहे.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Saturday, May 23, 2020

भाउ तोरसेकरांची 50 हजारी मनसबदारी!


उरूस, 23 मे 2020

एक पंच्याहत्तरीला पोचलेला वृद्ध पत्रकार डिजिटल माध्यमाचा वापर करून एक ब्लॉग सुरू करतो. त्याला कधीच  माध्यमांच्या मुख्य प्रवाहानं सामावून घेतलेलं नसतं. त्याच्यापाशी कसलीही साधनं नसतात. सामान्य वाचकांची नाडी त्याला समजते आणि त्याचे हेतू शुद्ध असतात इतक्या किमान भांडवलावर त्याची पत्रकारिता सुरू आहे. अशा या भाउ तोरसेकर नावाच्या वृद्ध पत्रकाराला सामान्य वाचक/श्रोते/दर्शक यांनी डोक्यावर घेतले आहे.

भाउंनी 2012 मध्ये ‘जागता पहारा’ नावाचा ब्लॉग सुरू केला. आज त्याला भेट देणार्‍यांचा आकडा 1 कोटी 73 लाख 89 हजार, 29 इतका आहे (सकाळी 11.21 वाजेपर्यंत, शनिवार दिनांक 23 मे 2020). मराठीतील किती पत्रकारांनी ब्लॉग चालवले? (अपवाद प्रवीण बर्दापूरकर).  लॉकडाउनच्या काळात भाउंनी ‘प्रतिपक्ष’ नावाचा यु ट्यूब चॅनेल सुरू केला. त्याला केवळ 50 दिवसांत 50 हजार सदस्य मिळाले.

आपल्याला मिळालेल्या या प्रतिसादाबद्दल भाउंनी सामान्य वाचकांपोटी कृतज्ञता व्यक्त करून सगळे श्रेयही या सामान्य वाचकांनाच दिले आहे.

लॉकडाउनच्या काळात पत्रकारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. छापील स्वरूपातील वृत्तपत्रे संकटात सापडली आहे. बहुतांश वृत्तपत्रांनी पाने कमी केली आहेत, कर्मचार्‍यांना नारळ दिला आहे, जिल्हा कार्यालये बंद केली आहेत, आवृत्त्या बंद केल्या आहेत.  मूळात जी काही पत्रकारीता कोरोनाच्या आधीपर्यंत चालू होती ती सामान्य वाचकांशी कितपत बांधीलकी राखून होती? भाउ आरोप करतात तशी ही अजेंडा पत्रकारीताच होती. मग आता कोरोनाच्या धक्क्यात या पत्रकारितेची पडझड होत असेल तर त्याची खंत कशाला.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणारे यातील किती लोक आणीबाणीत तुरूंगात होते? भाउंनी आदराने उल्लेख केला आहे ते दै. मराठवाड्याचे संपादक अनंत भालेराव यांचा खणखणीत अपवाद वगळता कोणता मोठा संपादक आंदोलन करून तुरूंगात गेला होता? मोठा संपादक तर सोडाच मूळात किती पत्रकार या आंदोलनात तुरूंगात गेले?

इतरांचे घोटाळे उघडकीस आणणारे पत्रकार स्वत:च्या क्षेत्रातील घोटाळे उघड करतात का? निखील वागळेंच्या निमित्ताने भाउंनी उपस्थित केलेल्या या जळजळीत वास्तवाला उत्तर द्यायला कुणी पत्रकार तयार नाही. अगदी आत्ताची ताजी घटना आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे लेखन चौर्य उघडकीस आल्यावर किती पत्रकारांनी त्यावर टीका केली?

भाउंचे यश या पार्श्वभूमीवर समजून घेता येवू शकते. सामान्य वाचक/दर्शक/श्रोता यांना प्रस्थापित माध्यमांतून त्यांच्या अवतीभवतीचे वास्तव-विश्लेषण- खरी माहिती मिळेनाशी झाली आहे. म्हणून या लोकांना भाउंसारखा पत्रकार आपलासा वाटतो जवळचा वाटतो. त्याच्यावर त्यांचा विश्वास बसतो.

2014 च्या मोदींच्या लोकशाहीच्या मार्गाने मिळवलेल्या यशावर 2019 च्या अजूनच उज्ज्वल यशानंतरही जमात-ए-पुरोगामी टिकेचे शिंतोडे उडवत राहतात तेंव्हा हा सामान्य वाचक भाउ सारख्यांकडेच आशेने पाहतो. तो काही मोदींचा भक्त नसतो. त्याला फक्त वास्तव समजून घ्यायचे असते. पण बातमी देण्यापेक्षा बातमी दाबण्याला महत्त्व आल्याने सामान्य वाचकांचा/दर्शकांचा प्रस्थापित माध्यमांवरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे त्यांना आता समाज माध्यमं (सोशन मिडिया) जवळची वाटू लागली आहेत. अजूनही याचे भान प्रस्थापित पत्रकारितेला आले नाही.

टिव्हीवरच्या चर्चेत कोण लोक बोलावले जातात? वर्तमानपत्रांत कुणाचे लेख सतत छापले जातात? हे सगळं सामान्य माणूस डोळसपणे पहात असतो ऐकत असतो. कालपर्यंत त्याला प्रस्थापित माध्यमांशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. आता त्याला समाज माध्यमांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. भाउंसारखे अजून पत्रकार समोर यायला हवेत. केवळ याच क्षेत्रात नव्हे तर इतरही क्षेत्रात प्रस्थापितांची दादागिरी बाजूला सारून नविन मंडळी पुढे येताना आता दिसू लागली आहेत. याचं एक मोठं श्रेय आधुनिक तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाची भाषा जाणणार्‍या नविन पिढीला द्यावे लागेल. त्यांनी प्रस्थापितांचे किल्ले सुरूंग लावून परास्त केले आहेत. (उदा. म्हणून गावाकडच्या गोष्टी ही मराठी वेब मालिका किंवा इंदूरीकर महाराजांवरचे टिक टॉक व्हिडिओ पहा.)
सुरेश भटांच्या शब्दांत सांगायचे तर

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही

फक्त यात जरासा फरक करून साधी माणसे म्हणजे श्रोते/वाचक/प्रेक्षक. पण जे प्रतिभावंत आहेत, बुद्धीमान आहेत ज्यांना या व्यवस्थेने दाबले होते ते तशा अर्थाने ‘साधे’ नाहीत. त्यांना हा एक मोठा मंच उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आता ‘अजेंडा’ पत्रकारिता किंवा आपल्या गावठी भाषेत सांगायचे तर ‘सुपारी’ पत्रकारिता गोत्यात आली आहे.

भाउंनी अजून एक सणसणीत थप्पड प्रस्थापित पत्रकारिता व्यवस्थेवर लावली आहे ती कुणी समजून घ्यायला तयार नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पत्रकारिता करणारा सोडून व्यवस्थापनाच्या नावाखाली भलत्याच माणसांना महत्त्व प्राप्त होवून बसले होते. संपादक म्हणजे त्या त्या वर्तमानपत्राचा चेहरा असं वर्णन एकेकाळी केले जायचे. आणि आता काय परिस्थिती आहे? जाहिरात विभागाला आतोनात महत्त्व आले. मार्केटिंग विभागाचा माज सुरू झाला. प्रत्यक्ष लिहीणारा आणि तो वाचणारा या दोघांनाही दुय्यम तिय्यम ठरवल्या जावू लागले. जसं की शेतीत झालं. पिकवणारा आणि सामान्य ग्राहक दोन्ही बिनमहत्त्वाचे ठरून मधलीच माणसे मोठी होत गेली. साहजिकच यामूळे विकृती तयार झाल्या.

हेच पत्रकारितेत घडत आहे. विविध स्किमला महत्त्व आलं, जाहिरातदारांच्या हितासाठी बातमीचा बळी सुरू झाला,  चांगल्या मजकुराला जागा मिळेनाशी झाली, वाचक हाच मूळात महत्त्वाचा उरला नाही. मग हा पोकळ डोलारा टिकणार कसा? मूळात ज्या वाचकांसाठी पत्रकारिता सुरू झाली होती तोच नकोसा वाटू लागला की काय?

आज कुठल्याही चांगल्या मजकुराला सोशल मिडियावर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. आपली मतेही वाचक व्यक्त करतात. फार मोठा संवाद लेखक वाचकांत प्रस्थापित होतो. पण हे सगळं प्रस्थापित वर्तमानपत्रांत होताना दिसत नाहीत. चॅनेलवरच्या चर्चांत निव्वळ बाष्कळपणा सुरू झाल्यावर दर्शक आता त्यांना हव्या त्या छोट्या युट्यूब चॅनेलकडे वळताना दिसत आहेत. अर्बन नक्षलवाद प्रकरणांत प्रस्थापित माध्यमांनी बोटचेपेपणा केल्यावर दर्शक कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्या शांत वक्तव्यानं भरलेल्या यु ट्यूब चॅनेलकडेच वळणार ना? जे सत्य तूम्ही लपवून पहात आहेत ते दुसरं कुणी शांतपणे तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कमी खर्चात (जवळपास शुन्यच) दाखवत असेल तर लोक ते पाहतीलच ना? आणि ही आधुनिक माध्यमं खर्‍या अर्थानं लोकशाहीवाली आहेत. इथे कुणालाही व्यक्त होण्यास बंधन नाही.

सोशल मिडियाचे नेमकं हेच बलस्थान भाउंनी ओळखलेलं आहे.

भाउंपासून प्रेरणा घेवून महाराष्ट्रातील सत्याची चाड असलेल्या विद्वान पत्रकारांनी या माध्यमात प्रवेश करावा. सामान्य वाचकांना आजही चांगला मजकूर हवा आहे. चांगलं काही पहायचे आहे. कसलाही पूर्वग्रह न बाळगता विविध विषय समजून घ्यायचे आहेत.

ही सुपारी पत्रकारिता आपल्या मरणाने मरत असेल तर तीला मरू द्या.

जूने जावू द्या मरणा लागोनी
जाळूनी अथवा पुरून टाका
सावध ऐका पुढल्या हाका

असे केशवसुतांन म्हणून ठेवलेच आहे. भाउंनी हे ऐकले यासाठी त्यांना धन्यवाद! त्यांच्या चॅनेलला अजून मोठा प्रतिसद मिळो. भाउंसोबत त्यांच्या पत्नी स्वाती तोरसेकर आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांवर अतिशय सुंदर नेमके मोलाचे विश्लेषण करतात. त्यांचाही आदराने उल्लेख करावा लागेल. त्यांचाही स्वतंत्र ब्लॉग आहे. त्यांचे जास्त व्हिडीओ इथून पुढे अपेक्षीत आहेत. (छायाचित्र सौजन्य नेट)     

   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

Friday, May 22, 2020

मजूरांच्या प्रश्‍नांवर कॉंग्रेसी नौटंकी !


उरूस, 22 मे 2020

अजीत नेनन याचे एक गाजलेले व्यंगचित्र आहे. खेडेगावात झोपडीसमोर एक एनजीओवालं जोडपं उभं आहे. झोपडीतला पोरगा बापाला विचारत आहे
‘हे काय करतात?’
‘ते गरिबांसाठी काम करतात.’
‘अशानं काय होतं?’
‘त्यांची गरिबी दूर होते..’

त्या खेडूत बापाच्या या एका उत्तरात इंदिरा गांधींपासूनच्या कॉंग्रेसी राजकारणाचे सार दडलेले आहे. गरिबीचे भांडवल करून राजकारणी आणि नौकरशहा, स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते यांनी आपली गरिबी दूर करून घेतली. गरिबी दूर करण्यात यांना काडीचाही रस नाही.

लॉक डाउनमध्ये आता स्थलांतरित मजूरांच्या नावाने गळे काढणे सुरू झाले आहे. तो याच ‘गरिबी हटाव’ नाटकाचा एक अंक आहे. आधी सोनिया गांधींनी मजूरांच्या तिकीटाचे पैसे कॉंग्रेस देईल असे सांगितले. नंतर राहूल गांधी स्वत: दिल्लीच्या फुटपाथवर स्थलांतरीत मजूरांसोबत जावून बसले. आणि आता प्रियंका गांधी यांनी हे ‘बस’कांड चालवले आहे.  यांचे हे ढोंग लगेच उघडे पडले. त्यावर भरपूर माहिती उपलब्ध झाली आहे.

या मागचे कारण समजून घेणे गरजेचे आहे. शेतीविरोधी धोरणे राबविण्यातून आपण ग्रामिण भारत शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करतो आहोत हे नेहरू काळात समाजवादी पांघरूण घालून लपविले गेले. शहरांचे, उद्योगांचे फाजिल लाड केल्या गेले. अनुत्पादक अशा सगळ्य व्यवस्था मोठ्या केल्या गेल्या. त्यांना सगळ्या सोयी सवलती पुरविणे त्यांना सगळ्या संधी अग्रक्रमाने उपलब्ध करून देणे औद्योगिक धोरणाच्या नावाने चालविले गेले.

शेतीची उपेक्षा होत गेली, कृषी उत्पादनातील नफा संपून भांडवल खावून जगणे सुरू झाले तसे तसे या स्थलांतराने वेग पकडला. 1960 नंतरचे औद्योगिकीकरण याला कारणीभूत ठरले. 1990 नंतरच्या जागतिकीकरण पर्वात सर्व क्षेत्र खुले करत असताना शेतीला मात्र जखडून ठेवल्या गेले. परिणामी मजूरांच्या स्थलांतराने अजूनच गती पकडली.

आज कोरोना महामारीत केवळ दोन/तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये या शहरी व्यवस्थेचे पितळ उघडे पडले. इतकी वर्षे ज्यांच्या श्रमावर आपण आपले इमले उभे केले त्या मजूरांना सांभाळण्यात खावू घालण्यात शहरं अपशयी ठरली.

आणि याही संकटाच्या काळात सर्वांना पुरेल एवढं अन्नधान्य पुरवून शेतकर्‍यांनी हे सिद्ध केले की इतकी उपेक्षा झाली तरी आम्ही आमच्या बाजूने कसलीही कसर सोडली नाही. आमची नैंतिक जबाबदारी पार पाडली आहे. आजही आपल्या आपल्या जागी मजूर शांत बसून राहीले तर कुणीही भूकं राहणार नाही इतकं अन्न धान्य देशात उपलब्ध आहे. अस्वस्थतेतून हे मजूर स्थलांतर करत आहेत. त्यांना समजावून सांगणे त्यांना थोपवून ठेवणे हे आपले सर्वांचे काम आहे.

प्रियंका गांधी यांचे नाटक या पार्श्वभूमीवर समजावून घेतले पाहिजे. खरं तर शांतपणे संयमाने हा विषय हाताळला तर बहुतांश मजूरांना हवे तिथे पोचवता येणे शक्य आहे. कॉंग्रेस आणि इतरही विरोधी पक्षांनी त्यांच्या अखत्यारीतील राज्यांमध्ये स्थलांतरित मजूरांच्यासाठी एखादी योजना बनवून यशस्वीरित्या राबविण्याची गरज होती. महाराष्ट्रातून राजस्थानात, पंजाबातून केरळात, महाराष्ट्रातून पश्चिम बंगालात अशी वाहन व्यवस्था करून भाजपेतर राज्यांनी आदर्श समोर ठेवायला पाहिजे होता. सामान्य जनतेपर्यंत हा एक चंागला संदेश पोचला असता.

पण असे काहीच सोनिया-राहूल-प्रियंका यांनी केले नाही. महात्मा गांधींना एकदा पत्रकारांनी विचारले होते, ‘गरिबी दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे?’ गांधींनी दिलेले उत्तर आजच्या या नकली गांधींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. महात्मा गांधी म्हणाले होते, ‘गरिबी दूर करण्यासाठी काहीच करू नका. आधी गरिबांच्या छातीवर बसला अहात ते उठा.’ मूळात नेहरूंचे समाजवादी धोरण हाच  गरीबी तयार करणारा सगळ्यात मोठा कारखाना आहे. आजही हे धोरण कमीजास्त प्रमाणात राबविले जाते. हा कारखाना आधी बंद पडला पाहिजे.

पायपीट करणार्‍या मजूरांचे फोटो भरपूर किंमतीत माध्यमांना विकले जात आहेत. मजूरांच्या फोटोच्या नावाखाली दूसर्‍या देशातले फोटो वापरले जात आहेत. इतकेच काय पण प्रियंकांच्या या ‘बस’कांडात एनडिटिव्हीचा पत्रकारही सामील झाला. योगी सरकारने कुंभ मेळ्यासाठी वापरलेल्या बसच्या रांगांचा फोटो प्रियंकांच्या 1000 बस म्हणून यांनी वापरला. नेपाळमधील फोटो सुरजेवालांनी वापरले. पाकिस्तानातल्या, बांग्लोदशाच्या फोटोंचा वापर मजूरांच्या वेदनेचे भांडवल म्हणून करण्यात आला.  म्हणजे या मजूरांच्या वेदनांचाही बाजार कॉंग्रेसवाले आणि जमात-ए-पुरोगामी यांनी सुरू केला आहे.

आज तातडीने काय केले पाहिजे हे सर्वजण विचारत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शक्य तेवढ्या मजूरांना जागेवरच रोकून धरले पाहिजे. लॉकडाउन उघडून सारं परत सुरू करावं लागणार आहे. त्यासाठी मजूरांची नितांत गरज आहेच. तेंव्हा मजूरांची अडचण जाणून त्यावर मात करून उपाय शोधून त्यांना आपल्यातच सामाविष्ट करून घेणे शहरी व्यवस्थेची नैतिक जबाबदारी आहे. दूसरं म्हणजे याउपरही ज्यांना जायचेच आहे त्यांच्यासाठी वाहन व्यवस्था करून दिली पाहिजे.

तिसरे जे काम तातडीने करावयाचे आहे ते म्हणजे शेती धोरण अमुलाग्र बदलावे लागणार आहे. 70 वर्षात आपण केलेले नाटक ढोंग उघडे पडले असून शेतीच जास्तीत जास्त माणसांना सांभाळू शकते, रोजगार देवू शकते. 13 टक्के इतकाच देशाच्या जीडिपीत हिस्सा असताना ही शेती 60 टक्के जनता सांभाळत आहे.  तेंव्हा शेतीच्या मार्गातील अडथळे दूर केलेच पाहिजेत. आवश्यक वस्तू कायदा सारख्या जूलमी कायद्यात बदल करून  मोदी सरकारने  आशावाद जागवला आहे. याच्या पुढे जावून जमिन धारणा, जमिन अधिग्रहण सारखे कालबाह्य कायदे रद्द बादल झाले पाहिजेत. घटनेच्या 9 व्या परिशिष्टाचा फास शेतीच्या गळ्याभोवती पडला आहे. तो सोडवला पाहिजे. तंत्रज्ञान स्वातंत्र्य आणि बाजारपेठेचे स्वातंत्र्य या दोन बाबींवर तातडीने विचार झाला पाहिजे.

सोनिया-राहूल-प्रियंका (एस.आर.पी.) या तिन तिघाडा काम बिघाडापासून कॉंग्रेसची सुटका झाली तर विरोधी पक्ष म्हणून काही एक चांगले चित्र देशासमोर येईल. अन्यथा कॉंग्रेसचा नाद पूर्णत: सोडून इतर विरोधी पक्षांनी स्वतंत्र सक्षम अशी आघाडी उभारली पाहिजे. आताच्या गांधी घराण्याची ही ‘आंधी’ म्हणजे वादळ नसून आंधी म्हणजे आंधळेपणाने  चालवलेला कॉंग्रेसचा पक्षाचा खड्ड्यात जाणारा प्रवास आहे. त्यातून कपाळमोक्षच होणार हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही. कॉंग्रेसवाल्यांनी यांना दूर करावं तरच पक्षाला भवितव्य आहे. विरोधी पक्षांनी यांचा नाद सोडला तरच उत्तम.

बाकी सामान्य देशवासियांनी सत्ताधार्‍यांवर शेतीविरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी दबाव वाढवला पाहिजे. तरच आपण या मजूरांच्या गंभिर समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधू शकू.

जमात-ए-पुरोगाम्यांची पायाचे, सायकलवरून जाणार्‍या मजूर कुटूंबाचे, म्हातार्‍या आईला पाठीवर घेतलेल्या मुलाचे हवे तेवढे फोटो कुठून कुठून आणून ढापून छापावेत त्याने काहीच फरक पडणार नाही. बाकी समाजवादी पद्धतीनं हा प्रश्‍न कितीही सोडवायचा प्रयत्न करा त्यातून ‘त्यांची गरिबी दूर होते’ गरीबी हटत नाही हेच कटू सत्य समोर येत जाणार आहे. 
 
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Monday, May 18, 2020

युट्यूब- टिकटॉक वादात गे, मुसलमान कशासाठी?


उरूस, 18 मे 2020

गेली काही दिवस नेटवर यु-ट्यूब आणि टिकटॉक कलाकरांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. युट्यूबचा स्टार कॅरि मिनाटी (खरे नाव अजय नागर) आणि टिकटॉक स्टार अमीर सिद्दीकी यांच्यातील हे भांडण शिवीगाळ गलिच्छ भाषेत सुरू आहे. यातील काही व्हिडिओ या समाज माध्यमांनी उडवून टाकले आहेत. पण तरी यांचे समर्थक आपसांत घाणेरड्या भाषेत वाद करतच आहेत. अगदी मुलीसुद्धा अश्‍लिल बिभत्स भाषा वापरत आहेत त्यावरून हा मुद्दाम केलेला बनाव आहे की काय अशी पण शंका येते. कोरानाच्या काळात सगळेच रिकामे बसून आहेत. त्यातल्या त्यात या कलाकरांचे चाहते असलेली तरूण पिढी (वय वर्षे 14 ते 30) यांना भरपूर वेळ आहे आणि हातात मोबाईल आहे. बाकी काही नसले तरी सध्या नेटवर्क चंागले उपलब्ध आहे. म्हणूनच ही शंका येते की हा वाद जाणिवपूर्वक उफाळून आणला गेला आहे की काय?

ज्यांना या विषयाचे बाकी बारकावे समजून घ्यायची उत्सूकता आहे त्यांनी नेटवर जरासा शोध घ्यावा. शेकडो व्हिडीओ उपलब्ध आहेत. सामजिक दृष्ट्या आक्षेपार्ह असे काही उल्लेख या वादांत समोर आले आणि ते माझ्या दृष्टीने घातक आहेत. तेवढ्यापुरतेच मी लिहीतो आहे.

यातला पहिला संदर्भ येतो तो इस्लामचा. टिकटॉकचे जे कलाकार आहेत जे या वादात ट्रोल होत आहेत ते मुसलमान आहेत. त्यांनी एके ठिकाणी तबरेज अन्सारीच्या झुंडबळीचा (मॉब लिंचिंगचा) उल्लेख केला.  पुढे चालून त्याचा मुलगा मोठा होवून सूड उगवेल तर त्यावेळी ‘मुसलमान अतिरेकी असतात’ असं म्हणून नका असे सांगितले. शिवाय वारंवार रमझानचा महिना असल्याने शिवीगाळ आम्ही करणार नाही असं म्हणत शिव्याही देवून घेतल्या आहेत.

दुसरीकडे युट्यूबच्या कॅरिमिनाटीच्या पाठिराख्यांनी या टिकटॉक कलाकरांना रोस्टींग (हा खास इंग्रजी शब्द टर्र उडवणे मजा घेणे चिडवणे यासाठी वापरल्या जात आहे) करताना ‘गे’, ‘छक्का’, ‘मिठा’, ‘दिदी’, ‘लौंडी’ अशी विशेषणं वापरून नामोहरम करण्याचा प्रकार केला आहे.

व्यवसायासाठी या कलाकारांचा वापर करून घेतला जात आहे हे तर उघडच आहे. यांना यासाठी जे काही पैसे मिळत असतील हा त्यांचा त्यांचा प्रश्‍न आहे. काही कलाकारांना स्वत:ला ‘रोस्ट’ करून घेण्यात रस आहे कारण आपल्याला रोस्ट करा असा आग्रहच हे कलाकार उघडपणेच करत आहेत त्यावरून लक्षात येतेच.

पण यात कारण नसताना इस्लामला कशाला ओढल्या जाते आहे? मुळातच इस्लामला प्रतिमा महिमा मंजूर नाही. कलाकाराचा चेहरा सतत लोकांसमोर येत राहतो, यातील बहुतांश टिकटॉक व्हिडीओत गाण्यांचा वापर केला जातो जेंव्हा की इस्लामला संगीतच मंजूर नाही, मग हे टिकटॉक कलाकार जे स्वत:ला स्टार मानतात ते इस्लामच्या आड का लपत आहेत?  तसेही ते आधीपासूनच इस्लमाबाह्य कृत्य करत आले आहेत.
आता त्यांच्यावर टिका करणार्‍या यु-ट्यूब कलाकारांनी या टिकटॉक कलाकारांवर ‘गे’ असण्याचे आरोप करत गलिच्छ बिभत्स अश्‍लिल भाषा वारंवार वापरण्याचे काय कारण?

ज्या मुख्य टिकटॉक कलाकारांना टार्गेट केले जात आहेत ते आमीर सिद्दीकी, फैजल शेख, रियाज, आवेज, अदनान हे सर्वच मुसलमान आहेत. इस्लामला समलैंगिकता मंजूर नाही. तशी ती कुठल्याच धर्माला मंजूर नाही. पण इस्लामिक देश या बाबत कट्टर आहेत.

भारतीय कायद्याने नुकतेच 377 कलम शिथिल करून या संबंधांना गुन्हेगारी कलम लावले जाणार नाही असं घोषित केले आहे. मग अशा वातावरणात जेंव्हा की एल.जी.बी.टी. समुदायाने एक मोकळा श्‍वास नुकताच घेतला आहे. त्यांच्या हक्कासाठी काही सामाजिक संस्था, संघटना, व्यक्ती  मोठ्या कष्टाने चिवटपणे चळवळ चालवित आहेत या सगळ्यांना अशा वादांमुळे किती हानी पोचत आहे याचा विचार झाला पाहिजे.

कोरोनाच्या या भयानक संकटाला तोंड देताना औरंगाबादेतील तृतियपंथी, गे, लेस्बियन यांना अन्नधान्य मिळायची मारामार झाली. गैरसमजातून एका कॉलनीतल्या लोकांनी यांच्यावर बहिष्कारच टाकला. मी स्वत: या संघटनांसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना इतर काही सामाजिक संस्थांशी जोडून दिले. या लोकांना धान्य मिळून त्यांची उपासमार थांबली. जिल्हाधिकारी, शांतिगिरी महाराज यांनी यात लक्ष घालून आणखी काही मदत मिळवून दिली.

म्हणजे एका साध्या कृतीने समाजात या समुदायाबाबत तेढ निर्माण होते. ती दुरूस्त करायला इतरांना किती कष्ट करावे लागतात हा माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याचा ताजा अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर यु-ट्यूब कलाकारांकडून ‘गे’वर गलिच्छ टिप्पणी दुखावून जाते. मजा करणे चिडवणे टर्र उडवणे वेगळे आणि किमान सभ्यतेचा पायाच उखडून टाकणे वेगळे.

सामान्य मुसलमान या संकटात होरपळून निघाला आहे. तबलिगींमुळे सगळ्यात मोठा धोका मुसलमांनानाच झाला आहे. या वातावरणात कलेच्या वादात नाहक हिंदू-मुसलमान तेढ निर्माण करून आापण किती मोठे नुकसान देशाचे करतो आहोत याचा अंदाज तरी या कलाकारांना आहे का?

अशा व्हिडिओजना डिस्लाईक करून तूम्ही त्यांची तक्रार करू शकता. त्यामुळे हा वाद वाढणार नाही. तसेही जाणकार लोकांमुळे यातील बहुतांश व्हिडिओ काढून टाकल्या गेले आहेतच.

तृतियपंथि कलाकारांना ‘किन्नर’ संबोधून आपल्या समाजाने हजारो वर्षांपासून व्यवस्थेत समाविष्ट करून घेतले आहेच. शिवाय त्यांना एक विशिष्ट स्थानही दिल्या गेले आहे. कुंभमेळ्यातही आता लक्ष्मी त्रिपाठी हिला महामंडलेश्वर बनवून ‘किन्नर’ आखाड्याला मान्यता देवून आपल्या समाजाने उदारतेचा परिचय दिला आहे. दिशा शेख सारख्या किन्नरला वंचित बहुजन आघाडीने आपला प्रवक्ता नेमून सामाजिक अभिसरणाला मोठीच मदत केली आहे.

वाद कलेच्या पातळीवरच रहावेत. समाजात हिंदू विरूद्ध मुसलमान, स्टे्रट विरूद्ध गे अशा छटा उमटू नयेत.
टिकटॉक हे चायनीज ऍप आहे. त्याचा विरोध करोनाच्या पातळीवर होतो आहे आणि तो योग्यच आहे. काही देशांत टिकटॉक बॅन झाले आहेच. आपल्याकडेही हे बॅन झाले पाहिजे. आणि आता चीनला नामोहरम करायच्या धोरणाचा भाग म्हणून तर जरूरच या प्रस्तावाचा विचार झाला पाहिजे.     
 
   श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Sunday, May 17, 2020

वैशाखाच्या फांदीवरती आषाढाची गाजरपुंगी !


काव्यतरंग, 17 मे रविवार 2020 दै. दिव्यमराठी

अभ्रांच्या ये कुंद अफुने,
पानांना ह्या हिरवी गुंगी
वैशाखांतिल फांदीवरती
आषाढाची गाजर-पुुंगी

मिटून बसली पंख पाखरे
पर्युत्सुक नच पीसहि फुलते
मूक गरोदर गाईची अन्
गळ्यांतली पण घंटा झुरते

तिंबून झाली कणीक काळी
मऊ मोकळी ह्या रस्त्याची
उष्ट्या अन्नामध्ये थबकली
चोंच कोरडी बघ घरीची

ब्रेक लागला चाकांवरती
श्वासहि तुटला आगगाडीचा
ऊन उसासा धरणीच्या अन्
उरांत अडला इथे मघाचा

शिरेल तेंव्हा शिरो बिचारे
हवेत असल्या पाऊस-पाते
जगास तोंवर वैशाखाच्या
मृगाविनाही मृगजल चढते !

-बा.सी. मर्ढेकर, (मर्ढेकरांची कविता, मौज प्रकाशन, आ.1 पुनर्मुद्रण 1991, पृ. 78)

हे दिवस नेमके वैशाखाचे आहेत. मर्ढेकरांनी हे जे वर्णन केलं आहे ते कविता निर्मिती प्रक्रियेबाबत आहे असं एक वेगळं महत्त्वाचं विश्लेषण विनय हर्डिकर यांनी ‘कारूण्योपनिषद्’ या मर्ढेकरांच्या कवितेवरील पुस्तकांत केले आहे. अनिलांची ‘श्रावणझड बाहेरी मी अंतरी भिजलेला, पंखी खुपसून चोंच एक पक्षी निजलेला’ या ओळीही कविता निर्मितीची गोष्ट सांगतात. 

वैशाखा नंतर येणारा ज्येष्ठ जेंव्हा मृगाचा पाउस येतो. पण हा पाउस नियमित पडतो असे नाही. आषाढाचा पाउस मात्र हक्काचा नियमित पडणारा असा मानला जातो. कालिदासाने आपला निरोप सांगण्यासाठी ज्येष्ठाच्या ढगांवर विश्वास नाही ठेवला. आषाढाच्या पहिल्या दिवशी जो ढग दिसतो जो पाण्याने पूर्ण भरलेला आहे आणि जास्त अंतर कापू शकतो, हक्काने पाउस पाडू शकतो. त्यामुळे मर्ढेकरही वैशाखाच्या फांदीवरती ज्येष्ठाची गाजरपूंगी असं म्हणत नाहीत. आषाढाचीच म्हणतात.

हे वर्णन लॉकडाउनच्या दिवसांनाही लागू पडतं. सगळं ठप्प आहे. वैशाखातील हे जे वातावरण आहे ते सामाजिक पातळीवरही तसेच आहे. सगळा व्यवहार ठप्प होवून बसला आहे. कुणाला काहीच सुचत नाहीये. पुढे काय होणार काहीच कळत नाहीये. ‘शिरेल तेंव्हा शिरो बापडे हवेत असल्या पाउसपाते’ ही जी विलक्षण ओळ मर्ढेकरांच्या कवितेत आली आहे तशीच सगळ्यांची मानसिकता होवून बसली आहे. काही तरी बदल होवो. तो जेंव्हा होईल तेंव्हा होवो पण तोवर ‘मृगाविनाही मृगजळ चढते’ अशीच स्थिती आहे.

कवितेचा एक साधासा अर्थ आहे. जमिन तयार होवून पावसाची वाट पहाते आहे. पेरणी होण्यासाठी आधीची जी मशागत करावी लागते ती झाली आहे. ‘तिंबून झाली कणिक काळी’ यातून निर्मिती आधीच्या सगळ्या त्रासातून जातो आहे हे सुचित होते. एक विलक्षण तगमग या काळात अनुभवायला येते आहे. 

‘ब्रेक लागला चाकांवरती अन् श्वासही तुटला आगगाडीचा’ या ओळींतून आता घरंगळत काही जात नाही. सगळं थांबलं आहे. एरव्ही पुढे काहीच घडणार नाही हा निराशावाद असता तर हे थांबणं शक्य नव्हतं. या थांबण्यातूनच पुढचं काही घडण्याची शक्यता सिद्ध होते आहे. या कवितेला लागून पुढची कविता ‘आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने, प्यावा वर्षा ऋतू तरी’ ही आहे कारण निर्मिती घडून गेल्यानंतरचा जो आनंद आहे त्याची आहे असे अप्रतिम विवेचन विनय हर्डीकर यांनी केले आहे.

विविध समिक्षकांनी मर्ढेकरांची ही आणि इतर अशाच कविता खुप चांगल्या पद्धतीने उलगडून दाखवल्या आहेत. या कवितेचा एक लोभसपणा तिच्या सहज लक्षात येणार्‍या साधेपणात आहे. जो कुणाही रसिकांना एकदम आपलासा वाटतो. खुप मोठा अर्थ लक्षात येण्याआधी कुणालाही एखादं काही घडण्यापूर्वीची विलक्षण तगमग यात दिसते. काही वेळेला आपल्या हातात काहीच नसते. आपण मग शांतच बसून रहातो. ‘पर्युत्सूक नच पिसही फुलते’ अशी ती अवस्था असते. आताही कोराना काळात सगळेच अस्वस्थपणे शांत बसून आहेत. काय करावे काहीच सुचत नाही. काही करताही येत नाही. एक आशावाद तेवढा मात्र आहे की कधीतरी हा होईना पाउस यईल, उशीरा येईल पण येईल नक्की. 

मर्ढेकर सहजपणे भारतीय मानस या कवितेतून मांडत आहेत. उकिरड्याचे पण पांग फिटतात, दिवस पालटतात, दू:ख काही घर बांधून रहात नाही, आपण दू:ख दळून खाणारी माणसं आहोत असे कितीतरी दाखले आयाबायांच्या बोलण्यातून आढळून येतात. जात्यावरच्या ओव्यांतूनही हा आशावाद आपण जपलेला आहे.

कुखू राहू दे कपाळी, मान राहो आहेराला
ऊन तापता इखारी, सावली दे माहेराला

कोरोनाच्या उदास काळातही गुलमोहर फुलला आहे, पिंपळाची कोवळीलूस पानं वैशाखी पौर्णिमेला चांदण्यात चमचमत आहेत, बहाव्याच्या पिवळसर फुलझुंबरांनी डोळ्यात, मोगऱ्याच्या गंधाने  श्वासात, कोकळीच्या स्वरांनी कानांत चैतन्य निर्माण केले आहे. 

‘ब्रेक लागला चाकांवरती, श्‍वासही तुटला आगगाडीचा’ यातून एक वेगळा अर्थ या कोरोनाच्या काळात निघतो आहे. सगळं मानवनिर्मित यांत्रिक जग कोरोनासमोर ठप्प झालं आहे. एकदम ब्रेकच लागला आहे. आणि आशा दिसते आहे ती निसर्गातूनच. 
(छायाचित्र श्रीकृष्ण उमरीकर)
   
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575