उरूस, 5 मे 2020
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा यांनी लोकसत्ताच्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात बोलताना एक महान सत्य सांगितले. कोरोनामुळे महाराष्ट्राला एक फार मोठी देणगी प्राप्त झाली याचा हा पुरावा. पृथ्वीराज चव्हाण यांना ज्ञानप्राप्ती झाली. ते असे म्हणाले की ‘व्यक्तीकेंद्रित राजकारणामुळे संसद कमकुवत झाली.’ अर्थात हे सर्व कधीपासून झाले? आणि हे कोण बोलत आहे?
पृथ्वीराज चव्हाण यांना बाबा या नावाने संबोधले जाते. बाबांचे हे बोल कधी उमटत आहेत? केंद्रात भाजप सरकार आल्यापासून व्यक्तीकेंद्री राजकारण भरास आले असा बाबांचा रोख आहे.
बाबा ज्या गावांतून येतात तेथील महान नेते यशवंतराव चव्हाण ज्यांच्याशी बाबांचे वडिल आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाकाकी चव्हाण यांचे कधीच पटले नाही. इंदिरा गांधी यांनी यशवंतरावांच्या विरोधात बाबांच्या घराण्याला नेहमीच वापरले. ते यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काय बोलले होते? ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’. हे महान उद्गार नेमके कोणत्या राजकारणाचे द्योतक आहे? हे उद्गार यशवंतरावांनी काढले तेंव्हा बाबा पाळण्यात अंगठा चोखत असतील असे मी गृहीत धरतो.
हेच बाबा जेंव्हा तरूण होते त्या काळात त्यांच्या पक्षाच्या महान नेत्या इंदिरा गांधी यांच्या बद्दल त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष देवकांत बरूआ काय म्हणाले होते? ‘इंदिरा इज इंडिया’. हे विधान नेमके कुठल्या प्रकारात मोडते? जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी या दोन व्यक्ती नसून राज्यापेक्षा देशापेक्षा खुप महान आहेत तेंव्हा त्यांच्याबद्दल काढलेले उदगार हे व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा भाग असू शकत नाहीत असे बाबांना सिद्ध करायचे आहे काय?
अर्थात कॉंग्रेस पक्षात कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद. पी. चिदंबरम, मनीष तिवारी, माजीद मेमन (राष्ट्रवादी) अशा तगड्या वकिलांची फार मोठी फौजच आहे. तेंव्हा उद्या जर कुणी हा प्रश्न कायद्याच्या दृष्टीने उपस्थित केला तर सिब्बल-सिंघवी सारखे वकिल हे सिद्धही करू शकतील की नेहरू इंदिरा म्हणजे साध्या सुध्या व्यक्ति नसून त्या कशा महान हस्ती आहेत. न्यायालय निकाल देईपर्यंत काही काळ धुराळा उडवून देणे आणि त्या अनुषंगाने काही माध्यमांनी ती बातमी चालविणे हे पण महानाट्य सादर होईल. हजारो ट्विट केले जातील. पॅनेल चर्चा होतील. नेहरू इंदिरा म्हणजे सामान्य व्यक्ती कशा नाहीत यावर कुमार केतकर सारखे विद्वान तातडीने मोठ्या वृत्तपत्रांत लेखही लिहीतील. अगदी वॉशिंग्टन पोस्ट न्ययॉर्क टाईम्समध्येही हा विषय छापून येईल.
याच भाषणांत बाबांनी निवडणुक आयोग म्हणजे कसा खेळ आहे याचेही उदाहरण दिले आहे. विधान परिषदेची निवडणुक निवडणुक आयोगाने पुढे ढकलली होती. त्यामुळे महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झाला होता. पण मोदींना उद्धव ठाकरे यांनी फोन करताच चक्रे फिरली आणि पुढे ढकललेली निवडणुक त्वरीत घेण्याचा निर्णय झाला. यातून निवडणुक आयोगासारख्या संस्था किती कमकुवत झाल्या आहेत हेच सिद्ध होते. असे बोल बाबांनी काढले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात आता विधानपरिषदेची निवडणुक होवून उद्धव ठाकरे आमदार होत आहेत आणि सरकारवरील घटनात्मक पेच टळला आहे याची बाबांना खंत आहे की काय?
नेहरूंच्या काळात बाबा अंगठा चोखत होते तेंव्हा तो काळ आपण सोडून देवू. 1959 मध्ये बाकी ज्येष्ठ नेत्यांना डावलून इंदिरा गांधींना कॉंग्रेसचे अध्यक्ष केल्या गेले. त्यांनी तातडीने केरळात लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले कम्युनिस्टांचे सरकार बरखास्त करण्यास नेहरूंना भाग पाडले. यातून लोकशाही किती बळकट झाली हे बाबांना माहित नसावे कारण ते पाळण्यात दुपटे ओले करत होते हे मान्य आहे. पण बाबा जेंव्हा तरूण होते तेंव्हा मध्यरात्री निर्णय घेवून देशावर आणीबाणी लादताना विविध संस्थाच कशाला तर आख्खा देश आणि देशाची लोकशाहीच किती बळकट झाली होती यावर बाबांनी एक मोठी प्रवचन मालिकाच सादर करावी. उच्च न्यायालयाचा निर्णय पूर्वप्रभावाने नाकारताना किती मोठ्या परंपरा आणि पायंडे त्यांच्या नेत्या ‘इंदिरा इज इंडिया’ यांनी सिद्ध केले हे पण एकदा सांगावे. न्यायालय, संसद, निवडणुक आयुक्त यासारख्या संस्था इंदिरा गांधी यांनी किती बळकट केल्या यावर एक पुस्तकच बाबांनी लिहावे. कुमार केतकर त्याला प्रस्तावना लिहीतील.
लोकसत्ताने ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ ऐवजी ‘लोकशाहीचे पझल.. भारताचे’ नावाचा एक इंदिरा सप्ताह घ्यावा. यात रोज सकाळी पृथ्वीराज बाबांनी लोकशाहीची पोथी वाचून दाखवावी. आणि कुमार केतकरांनी त्याचे संध्याकाळी निरूपण करून सांगावे. जनता राजवटीची मोरारजी-चरणसिंगांची अडीच वर्षे, जनता दलाची व्हि.पि. सिंग-चंद्रशेखरांची दोन वर्षे, देवेगौडा-गुजराल 2 वर्षे, वाजपेयी 6 वर्षे आणि आता मोदींची 6 वर्षे अशी जवळपास 18 वर्षे वगळता बाकी देशभरात लोकशाही कशी बळकट होती हे स्पष्ट करावे.
वसंतराव नाईक यांच्या नंतर महाराष्ट्रात एकाही कॉंग्रेसी मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कालावधी कसा पूर्ण करू दिला गेला नाही. ही महान परंपरा व्यक्ती केंद्री राजकारणा सारखी विकृती बळावू नये म्हणूनच केली गेली होती. स्वत: पृथ्वीबाबा अचानक दिल्लीतून महाराष्ट्रात कसे काय आले हे पण त्यांनी सांगावे. त्यासाठी त्यांनी कुठली निवडणुक लढवली होती? पृथ्वीबाबांनी त्यांच्या सारखंच शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे हे केंद्रिय मंत्री असताना अचानक महाराष्ट्रात मुख्यमंत्री कसे काय होतात? त्यासाठी कुठल्या निवडणुका लढवतात याचे रहस्य उलगडून दाखवावे.
महाराष्ट्रात कुणाचेच व्यक्तिस्तोम माजू नये म्हणून कॉंग्रेसचे नेतृत्व किती कष्ट घेत होते आणि महाराष्ट्रातले नेतेही किती त्याग करत होते हे पण सांगावे. महाराष्ट्रच काय पण देशभर राज्यातील मुख्यमंत्रीपद गेले की केंद्रात आणि केंद्रातून अचानक राज्यात किंवा इतर कुठल्या राज्यात राज्यपाल म्हणून कॉंग्रेस नेत्यांची वर्णी लावली जात होती. ही जी राजकारणातील रोजगार हमी योजना नेमक्या कुठल्या व्यक्ती केंद्री राजकारणाला विरोध करताना राबविली गेली यावर बाबांनी किर्तन करावे.
पृथ्वीराज बाबा केसांना डाय करणे, फेशियल करणे, ‘स्पा’त जाणे, मसाज करणे याबाबत जागृत आहेत असं दिल्लीतील पत्रकार सांगतात. तेंव्हा त्यांनी आता कॉंग्रेस पक्षालाही लोकशाहीच्या सलूनमध्ये नेवून डाय, फेशियल, बाकी काय काय सौंदर्यप्रसाधने वापरून रंगरूप द्यायचे ते द्यावे. त्यांनी कितीही रंगरंगोटी केली, केसांचा फुगा पाडला तरी राज ठाकरे सारखे नेते ‘जून्या मराठी सिनेमातील खलनायकांसारखे दिसतात’ असले टोले मारतील तर त्याला आम्ही जबाबदार नाहीत.
(लेखातील सुरवातीचे छायाचित्र जगप्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय यांचे आहे. इंडियन एक्सप्रेस मध्ये हे छायाचित्र त्या काळात प्रसिद्ध झाली तेंव्हा मोठी खळबळ उडाली होती. व्यक्तीकेंद्री राजकारणाची चर्चा पृथ्वीबाबा करत आहेत तेंव्हा त्यांना म्हणावेसे वाटते या छायाचित्राकडे ‘उघडा डोळे पहा नीट’... पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांच्या समोर उभे असलेले सर्व कॉंग्रेस दिग्गज. तेंव्हा राजकारणाचे केंद्र कुठे होते हे बाबांनी सामान्य जनतेला समजावून सांगावे. आणि आजही ते कुठे आहे हे पण विदित करावे.)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575