Wednesday, October 17, 2018

युवा प्रतिभेचा उत्कट आविष्कार : प्रतिभा संगम


(संमेलनाचे उद्घाटन करताना कवयित्री सिसिलिया कार्वलो )
सा.विवेक, ऑक्टोबर 2018

गेली दोन दशके प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांसाठीचे असलेले साहित्य संमेलन महाराष्ट्रात विविध गावांमध्ये संपन्न होते आहे. 17 वे प्रतिभासंगम नुकतेच लातुर मध्ये (29-30 सप्टेंबर) संपन्न झाले.

या संमेलनात सादर झालेल्या काही कवितांत प्रगल्भ सामाजिक जाणीव दिसून आली. शामल दिपा शंकर ही जळगांवची मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थीनी. आपल्या ‘स्वप्नातही आजकाल’ या कवितेत असं लिहीते

स्वप्नातीही आजकाल
दगड उचलले जातात 
तेही रंगांवर
क्षितीजावरचा ‘निळा’ यांना दिसत नाही
मावळतीचा ‘भगवा’ ते पहात नाही
माळरानातला ‘हिरवा’ त्यांना नकोसा वाटतो
आणि आता तर ‘पांढर्‍या’ रंगावरही आक्षेप
असे दगड खावे लागतील म्हणून
कदाचित सगळीकडे
हवा आणि पाणी 
रंगहीन आहेत

इतकी प्रगल्भता या अगदी 18-19 वर्षाच्या मुलीकडे येते हे फार आाशादायी चित्र आहे. याच कवितेला या वर्षी पहिला क्रमांक प्राप्त झाला. कविता आणि गाणं यातील फरक सांगणारी एक गोड कविता गिरीश पाटील या जळगांवच्याच तरूणाने सादर केली. 

कर्म म्हणून यमक जुळवलं तर गाणं
मर्म म्हणून यमक जुळवलं तर कविता
काहीतरी सुचलं म्हणून लिहीलं तर गाणं
काहीतरी साचलं म्हणून लिहीलं तर कविता

अशी गोड मांडणी करत हा तरूण शेवटी लिहीतो

तळहातांवर घे सप्तरंग
डोळे मिटून उधळून टाक दाही दिशांत
डोळे उघडून न्याहाळ
तळहातांच्या रेषांवर 
उरलेल्या रंगांची नक्षी म्हणजे गाणं
दाही दिशांत 
उधळलेल्या रंगांचे पक्षी म्हणजे कविता

अतिशय तरल अशी भावना हा तरूण व्यक्त करतो. या कवितेला दुसरा क्रमांक प्राप्त झाला.

तरूणांनी सामाजिक आशयाची किंवा निसर्गाच्याच कविता सादर केल्याअसे नाही. निखळ विशुद्ध अशी प्रेमाची भावना उत्कटतेने तरूणांच्या कवितेत येणारच. नितीन लोहार या तरूणाला आपली प्रेम भावना व्यक्त करताना असाच शब्दांचा आधार घ्यावा वाटला. तो उत्कटपणे लिहीतो

अशा पडत्या पाण्यात 
धीर जातोय जरासा
तूझ्या भिजल्या केसाला 
गंध मातीचा जरासा
तू गवताची पात
तूझ्या ओठात कात
तूझ्या डोळ्यात जागते
एक उबदार रात
तू पावसाची सर
काळजाच्या देशात
अन् मी उगतो मातीत
हिरव्या वेशात
तू गुलाबाची कळी
पावसात चिंब
तुझ्या मोकळ्या केसात 
मी ओघळता थेंब

ही निखळ प्रेमभावना व्यक्त करणारी कविता तिसर्‍या क्रमांकाला पात्र ठरली.

उत्तेजनार्थ बक्षिस मिळवणार्‍या गणेश गायकवाड या तरूणाने स्त्रीचे सनातन दु:ख आपल्या कवितेत मांडले होते.

दिल्या घरी तू सुखी रहा
असा आईनं शब्द दिला म्हणून ती
गिळत राहिली आयुष्यभर
न पचणारा घास ही..
उसासारखं आयुष्य सोलून निघालं तरी
नाही सोडलं तीनं
साखरेसारखं गोडपण

कवितेचा शेवट करताना गणेश लिहीतो

पण आता तिला एल्गार  करावाच लागेल
करपून गेलेल्या वावरात
नव्यानं उगवावंच लागेल
मग ते बी आता आपण पेरूयात
त्याला खतपाणी घालूयात
आणि माणुस होवूयात..
 
या साहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे साहित्य प्रकारानुसार गटचर्चा घेतल्या जातात. कविता, कथा, वैचारिक लेख, अनुदिनी (ब्लॉग लेखन) यांच्या गटचर्चा यावेळी घेतल्या गेल्या. ज्या मुलांनी कविता लिहून आणल्या त्यांचे गट करून मान्यवर लेखकाला या कविता ऐकवल्या जातात. हे मान्यवर त्यांच्याशी त्या कवितांवर चर्चा करतात. त्यातील उणीवा बलस्थानं दाखवून देतात. या चर्चेतून ज्यांची कविता सादर करण्याजोगी आहे असे निवडक कवी आणि मान्यवर कवी असे एक अतिशय दर्जेदार कविसंमेलन सादर केलं जातं.

एकूण प्राप्त कवितांचा सगळा आढावा घेवून (सादरीकरणाचा विचार न करता) केवळ साहित्य गुणांवर कवितेसाठीचे क्रमांक काढले जातात. याच पद्धतीनं इतरही साहित्य प्रकारांबाबत केलं जातं. 

तरूणांच्या एकणुच सळसळत्या साहित्य उर्जेला इथे मोकळी वाट सापडते. आज विद्यापीठ पातळीवर युवक संमेलनं होत आहेत. त्यांच्यामधूनही अशीच उर्जे उसळत असलेली दिसते. 

एक विचार मोठ्या गांभिर्याने केला गेला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या युवक महोत्सवात असे चांगले वाटणारे लेखक कवी निवडुन त्यांना एकत्र केलं गेलं पाहिजे. याची एक कार्यशाळा घेतली जावी. त्यासाठी मान्यवर साहित्यीक तेथे निमंत्रीत केले जावे. या मुलांमधील प्रतिभा हेरून चांगलं साहित्य वाचकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न केले जावे. 

महाविद्यालयीन पातळीवर वाचक मंच, वाङ्मय मंडळं सक्रिय केली गेली पाहिजेत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र  न करता ज्यांना किमान गोडी आहे असे विद्यार्थी निवडून त्यांचाच समावेश यात केला जावा. सरधोपट सर्वच्या सर्व विद्यार्थी निवडले की त्याचे व्यवस्थापन कठीण जातं. या निवडलेल्या विद्यार्थ्यांना चांगली पुस्तकं वाचायला दिली गेली पाहिजेत. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांवर त्यांना छोट्याशा गटात बोलतं केलं पाहिजे. काही जणांनी आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर सविस्तर लिहून आणावं. अशा लेखांचं सर्वांसमारे वाचन व्हावं. 

आज घडीला महाराष्ट्रात 10 विद्यापीठं आहेत. शिवाय चार कृषी विद्यापीठं आहेत. तंत्रज्ञान विद्यापीठ, वैद्यकीय विद्यापीठ, विधी विद्यापीठ यांचाही यात समावेश केला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं या विद्यापीठांमधून चांगले लिहीणारे शोधून त्यांना एकत्र केलं गेलं पाहिजे. साधारणत: प्रत्येक विद्यापीठांतील दहा ते वीस विद्यार्थी निवडून अशा दोनशे तीनशे जणांचे जर काही एक संमेलन आपण घेणार असू तर तो खरा प्रतिभेचा शोध ठरेल. आणि त्यासाठी घेतलेले श्रम कारणी लागतील. 

प्रतिभा संगमच्या माध्यमातून विद्यार्थी परिषदेने पुढाकार घेवून काही एक पायवाट तयार करून ठेवली आहे. आता या पायवाटेचा हमरस्ता बनविण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी परिषदेच्या खांद्यावर जास्तकाळ हे ओझं न ठेवता स्वतंत्रपणे युवा प्रतिभेचा शोधणे, तिचे संवर्धन होण्यासाठी कष्ट घेणे, या युवा प्रतिभेचा आविष्कार समाजासमोर घडवून आणणे यासाठी दीर्घकालीन धोरण आखावे लागेल. 

ज्ञानेश्वरांच्या सप्तशताब्दीचे औचित्य साधून तरूणांमधले ज्ञानेश्वर शोधण्याची सुरवात ‘प्रतिभा संगम’ ने अंमळनेर या साने गुरूजींच्या भूमीतून केली होती. आता याच वाटेवरचा पुढचा मुक्काम सर्व विद्यापीठांमधून युवा प्रतिभा शोधणे आणि तीचे संवर्धन करणे. 

प्रतिभा संगम मध्ये सादर झालेल्या व क्रमांक मिळविलेल्या कवितांचे एक चांगले पुस्तक तयार होवू शकते. त्यासाठी पण प्रयत्न झाले पाहिजेत.  

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, October 14, 2018

वेमुलाच्या हैदराबाद विद्यापीठात डावे का हारले?


उद्याचा मराठवाडा, रविवार 14 ऑक्टोबर 2018

 रोहित वेमुलाचे नाव आता कुणी काढत नाही. जे वेमुलाच्या नावाने उर बडवून रडत होते ते पण आता वेमुलाला विसरून गेले आहेत. वेमुलाच्या रूदाल्या सहानुभूती मिळवत भारतभर आरडा ओरडा करत होत्या. खरं तर वेमुलाने आत्महत्या केली पण असा आव आणला गेला होता की जणू त्याचा खुनच करण्यात आला आहे. यासाठी जबाबदार धरल्या गेले होते ते भाजप आणि अभाविप. 

वेमुला कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या एस.एफ.आय. चा सदस्य होता. त्याने आपल्या कार्यकारिणी पदाचा राजीनामा देत प्रश्‍न उपस्थित केला होता की कम्युनिस्ट पॉलिटब्युरोत दलितांना स्थान का नाही? या सगळ्या अस्वस्थतेवर पांघरूण टाकत डाव्यांनी रोहितच्या दुर्दैवी आत्महत्येनंतर जोरात आरडाओरडा सुरू केला. डाव्यांच्या आधीन गेलेल्या माध्यमांनी पण भरपूर प्रसिद्धी केली. लहान मुलांच्या भांडणात ज्यानं मारलं तोच आधी ओरडायला सुरवात करतो. तसाच हा प्रकार आहे. रोहित आणि डाव्या विद्यार्थी संघटना यांचे ताणले गेलेले संबंध लपवून ठेवण्यात आले. वेमुलाने उपस्थित केलेले प्रश्‍नही बाजूला टाकल्या गेले. 

हे सगळं परत आठवायचं कारण म्हणजे नुकतेच रोहित वेमुला ज्या विद्यापीठाचा विद्यार्थी होता त्या हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुका पार पडल्या. अध्यक्ष पदासोबत इतर प्रमुख पाचही जागी दहा वर्षानंतर अभाविपने विजय संपादन केला आहे. 

अध्यक्षपदी अभाविपची आरती नागपाल (मते 1663) निवडुन आली आहे तर  दुसर्‍या क्रमांकावर एस.एफ.आय. चा ई. नविनकुमार (मते 1329) हा आहे. तिसर्‍या स्थानावर दलित विद्यार्थी संघटनेची जी. श्रीजा वास्तवी (मते 842) ही आहे. 

आता परत रोहितने उपस्थित केलेला प्रश्‍न समोर येतो. डाव्यांची विद्यार्थी संघटना व दलित विद्यार्थी संघटना एकमेकांच्या विरोधात का लढल्या? भाजप-संघाच्या जातीयवादी राजकारणाविरूद्ध धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) आघाडी स्थापन करण्याची घोषणा सतत केली जाते. पण प्रत्यक्षात मात्र अशी कुठलीही आघाडी वास्तवात समोर येत नाही. 

हैदराबाद विद्यापीठ आणि नंतर चेन्नई आय.आय.टी. मधील दलित विद्यार्थ्यांच्या मानहानीचे प्रकरण यातून असे चित्र निर्माण केले गेले होते की सध्याचे मोदी सरकार दलित विरोधी आहे. प्रत्यक्षात हैदराबाद म्हणजेच तेलंगणा राज्य व चेन्नई म्हणजेच तामिळनाडू इथे कुठेही भाजप सत्तेवर नाही. तरीही आरोप मात्र भाजपवरच केल्या गेला. 

मग अशा परिस्थितीत हैदराबाद विद्यापीठात निवडणुका झाल्यावर भाजपची विद्यार्थी संघटना असलेली अभाविप कशी काय निवडुन येते? ज्या दलित गोर-गरीबांची आपण बाजू घेतो असा दावा डावे करतात त्यांना या दलित विद्यार्थी संघटनेसोबत युती का नाही करता आली? दलित विद्यार्थी संघटनेच्या आघाडीत निदान कॉंग्रेसवाले तरी सामिल झाले होते. पण डाव्यांची विद्यार्थी संघटना दलितांना का दूर ठेवते आहे? 

गेली दहा वर्षे अभाविप विद्यापीठातील या निवडणुका जिंकू शकलेली नव्हती. त्यातच रोहिला वेमुला प्रकरण घडले. मग असे असतानाही यावेळी अभाविप का निवडून यावी? अभाविप-भाजप-संघ यांच्यावर आरोप होतो की ते मनुस्मृतीला  प्रमाण मानतात. मनुस्मृतीमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान दिलं आहे. मग या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अभाविपने एका तरूणीला उभे केले आणि निवडूनही आणले. याचे काय उत्तर पुरोगाम्यांकडे आहे? 

दुसरा एक मुद्दा गांभिर्याने विचार करण्यासारखा आहे. सध्या प्रत्यक्ष पदावर जो माणूस बसलेला आहे त्याची जात शोधली जाते. एकेकाळी भाजप संघात उच्चवर्णीयांचा भरणा जास्त प्रमाणात होता. त्यातही परत ब्राह्मणांचा. म्हणून या पक्षाला शेटजी भटजीचा पक्ष असे हिणवले जायचे. आता या निवडणुकीत जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते कोण आहेत? अध्यक्षपदासोबतच अमीतकुमार (उपाध्यक्ष) , धीरज संगोजी (सचिव), प्रविण चौहान (सहसचिव), अरविंद कुमार (क्रिडा सचिव),  निखील राज (सांस्कृतिक सचिव) या सर्वच जागा अभाविपने जिंकून घेतल्या. अभाविपने ओबीसी विद्यार्थी संघटनेशी युती केली होती. दलितांना आपल्या उमेदवारांत स्थान दिल्या गेले होते.  (पुरोगामी मित्रांना आवाहन आहे त्यांनी अभाविप च्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या जाती शोधाव्यात आणि मग टीका करावी.. इतकेच नाही तर अकबरोद्दिन ओवैसीविरुद्ध भाजप एका तरूण मुस्लीम मुलीला उभे करत आहे विधान सभेसाठी. तिला आता पासूनच मुस्लीम महिला उघडपणे पाठींबा देत आहेत.)

भाजप संघावर सकारण टीका करणं समजून घेता येतं. पण चुक पद्धतीनं सतत टीका का केली जाते हे उलगडत नाही. मग यामागे कांही तरी षडयंत्र असल्याचा वास येत राहतो. एकाएकीच सर्वत्र रोहित वेमुलाच्या प्रश्‍नावर रान उठवल्या गेलं. अचानकच दलित विद्यार्थी म्हणजे संघ भाजपचे शत्रू आहेत असे चित्र समोर आलं. रोहितच्या आईला एल्गार परिषदेत आमंत्रित केल्या गेलं. त्याच्या आईनं बौद्ध धम्माचा स्विकार केला. हे सगळं आधी का नाही घडलं? 

रोहित वेमुलाला डाव्या विद्यार्थी संघटनेत मानाचे स्थान का नाही दिल्या गेले?

जेएनयु च्या निवडणुकांत डाव्या विद्यार्थी आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून आले. ते तसे पूर्वीही आले होते. तिथेही दलित विद्यार्थी संघटना विरूद्ध लढल्या होत्या. आता हैदराबादला तर त्यांनी विरूद्ध लढून मतविभाजन घडवून आणून डाव्यांचा सपशेल पराभवच घडवून आणला. याला कोण जबाबदार आहे? कन्हैय्याकुमारची जात उपस्थित करत दलित विद्यार्थी संघटनांनी जेएनयु मध्ये आपला उमेदवार उभा केला होता. आताही या विद्यार्थी संघटना डाव्यांच्या विरूद्धच लढल्या आहेत. पण सगळे पुरोगामी हे वास्तव झाकून आरोप मात्र भाजप संघावर ठेवतात. 

प्रत्यक्षात झालं असं अगदी नेहरूंच्या काळापासून डाव्या चळवळींना आपल्या पंखाखाली घेण्याचं धोरण कॉंग्रेसने आखले होते. त्याचा दुष्परिणाम असा झाला की एकेकाळी तळागाळात सातत्याने काम करणारे, चळवळ करणारे कार्यकर्ते हळू हळू सरकारी नौकरांसारखे सुस्तावत गेले. नियमित मिळणार्‍या अनुदानातून एक निब्बरपणा समाजवादी चळवळीला येत गेला. गेली साडेचार वर्षे केंद्रातून आणि बहुतांश राज्यांतूनही कॉंग्रेसची सत्ता गेल्यावर या संस्थांची अनुदानं बंद झाली कमी झाली. यांच्या चौकश्या सुरू झाल्या. जनसामान्यांत जावून तळमळीनं काम करणं विसरल्यामुळे यांना आता नविन परिस्थितीशी जूळवून घेणं जड जात आहे. याचीच छाया विद्यार्थी चळवळीवरही पडली आहे. 

हैदराबाद विद्यापीठांतील डाव्यांचा पराभव हा त्यांच्या ढोंगीपणाचा पराभव आहे. जेएनयु मध्ये विजय टिकवताना  दमछाक होते आहे. पूर्वी मिळालेला विजय आता पराभवात परिवर्तीत होताना दिसत आहे. 
मायावतींनी कॉग्रेसशी संबंध तोडत स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचे घोषित केले आहेच. दलित विद्यार्थी संघटनांना पूढे चालून मायावतींचे पाठबळ मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. मायावतींनी कॉंग्रेसला दूर ठेवले त्या बरोबरच डाव्यांनाही दूर ठेवले हे लक्षात घेतले पाहिजे. कर्नाटकात भले सीताराम युच्युरी मायावतींसोबत हातात हात घालून मंचावरून मिरवत होते पण प्रत्यक्षात कर्नाटक असो की गुजरात इथे मायावतींनी डाव्यांसोबत युती केली नाही. आता ज्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथेही त्यांनी डाव्यांना दूरच ठेवले आहे. 

भाजप संघाला नावं ठेवत असताना प्रत्यक्षात त्यांचा विजय होतो आहे आणि दलित दूर जात आहेत याचे कसलेच भान डाव्यांना अजून आलेले दिसत नाही. 

एल्गार परिषदेच्या निमित्ताने आणि पुढे भीमा कोरेगांव प्रकरणांत दलित कम्युनिस्ट अशी शक्ती एकवटताना दिसल्याचा भास तयार केला गेला होता. प्रकाश आंबेडकरांसारखे दिग्गज या जाळ्यात अडकले. पण काही दिवसांतच हा रंग फिका पडला. भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवाराविरूद्ध कम्युनिस्टांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जाहिर पाठिंबा देवून आंबेडकरांना तोंडघशी पाडले. पालघर पोटनिवडणुकीतही डाव्या पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे राहून चळवळ क्षीण करताना दिसले. कर्नाटक, गुजरात विधानसभा निवडणुकांत डाव्यांची कॉंग्रेस तर सोडाच पण इतर निधर्मी म्हणवून घेणार्‍या पक्षांसोबतही युती केली नव्हती. विद्यापीठ पातळीवरील निवडणुका देशाच्या मानाने फारच किरकोळ आहेत. पण स्वत: डाव्यांनीच जेएनयु मधील निवडणुका आणि कन्हैय्या सारखे नेते यांना महत्त्वाचे मानत प्रकाशात आणले होते. कन्हैया तर आता कम्युनिस्टांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा अधिकृत सदस्य आहे. तेंव्हा आता हैदराबाद विद्यापीठातील पराभवाचे विश्लेषण डाव्या विचारांच्या पुरोगामी पत्रकारांनी मांडून दाखवावे.   

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, October 11, 2018

सविता : सामाजिक कार्याच्या उर्जेने तळपणारा शांत सुर्य ।



सा.विवेक, ऑक्टोबर 2018

औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस औद्योगीत वसाहत आहे. तीला लागूनच एक झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतून जाणार्‍या चिंचोळ्या रस्त्याने रेल्वे पटरी ओलांडली की उजव्या हाताला एक वेगळी दिसणारी इमारत आपले लक्ष वेधून घेते. खरं तर लक्ष वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही. ती भव्य नाही की चकचकित नाही. उलट प्लास्टर न केलेल्या उघड्या वीटांमुळे तीचा खडबडीतपणा अधोरेखीत होतो. आणि त्यानेच कदाचित ती लक्ष वेधून घेत असावी. ही इमारत म्हणजे ‘गुरूवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र’. डॉ. दिवाकर व सौ. सविता कुलकर्णी हे दांपत्य इथे चोविस तास राहून गेली 25 वर्षे हे केंद्र चालवित आहेत. 

दिवाकरांचं व्यक्तीमत्व त्यांचा जरा खर्जातला आवाज याचा समोरच्यावर काही प्रभाव पडतो. पण सविता तर अगदी आपली आई, बहिण, वहिनी वाटावी अश्या व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांच्यासोबत  सध्या घरगुती संवादातून  त्यांच्या कार्याची व्यापकता, त्यातील भव्य सामाजिक आशय याचा जराही अंदाज येत नाही. पण त्यांना आपण बोलतं केलं तर हळू हळू ही संवादाची नदी खळाळत अशी काही वहात राहते की बघता बघता हा प्रवाह भव्यता धारण करतो. 

अंबाजोगाईच्या मामा क्षीरसागरांच्या घरात सविताचा जन्म झाला. सामाजिक क्षेत्रातलं मामांचे स्थान, त्यांची तत्त्वनिष्ठा यांचा नकळतपणे दाट असा ठसा छोट्या सवितावर झाला. घरात येणारी पूर्ववेळ प्रचारकांची व्यक्तिमत्वे तीला जवळून न्याहाळता आली. दामुअण्णा दाते, सुरेशराव केतकर, गिरीशजी कुबेर, सोमनाथजी खेडकर आदी पूर्णवेळ कार्यकर्तें यांची समर्पित वृत्ती तीच्यावर संस्कार करून गेली. 

त्यांचा ओढा सामाजिक कामाकडे आपसुकच वळला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर पूण्याला जाउन एम.एस.डब्ल्यु. करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात सामाजिक कार्याचे विधीवत शिक्षण देणार्‍या संस्था कमी होत्या. आणि असे शिकणारेही कमीच होते. पण सविताताईंना याच क्षेत्रा काम करण्याची जिद्द बाळगली होती.   

एम.एस.डब्लू. पूर्ण करून आल्यावर अंबाजोगाईलाच दीन दयाळ शोध संस्थेच्या कामात सक्रिय भाग घ्यायला सुरवात केली. हळू हळू आदिवासी, महिला, दलित यांच्या समस्या त्यांना उमगायला लागल्या. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालूक्यात कुही गावातील वनवासी कल्याण आश्रमाचे काम पाहून आल्यावर त्यांचे या विषयाचे आकलन अजूनच विस्तारले. 


अंबाजोगाईलाच डॉ. लोहिया दांपत्यांची मानवलोक संस्था आहे. या संस्थेत काम करण्यास सविताताईंनी सुरवात केली. इथे काम करत असताना ‘अध्यात्मिक वृत्तीनं समाजसेवा करणार्‍यांचा जीवनविषयक दृष्टीकोन’ असा एक विषय घेवून त्यांनी काही संशोधनही केलं. 

या काळातच औरंगाबादला डॉ. हेडगेवार रूग्णालयाचे काम विस्तारण्यास सुरवात झाली होती. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून डॉ. दिवाकर कुलकर्णी लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे काम पहात होते. हे केंद्र चालवत असताना त्यांना महिला सहकार्‍याची आवश्यकता जाणवायला लागली. नाना नवलेंना त्यांनी ही त्यांची गरज सांगितली. नानांनी त्यांच्या शैलीत सविताताईंच्या घरी अंबेजोगाईला पत्र पाठवून आणि सतत पाठपुरावा करून त्यांना इकडे बोलावून घेतले. 

औरंगाबादला डॉ. दिवाकर व सविता यांनी एकत्र काम करायला सुरवात केली पण त्यांच्याही नकळत नियतीने त्यांना एकत्र बांधायचा निर्णय घेतला. नाना नवलेंनीच पुढाकार घेवून डॉ. दिवाकर यांना सविताशी लग्न करशील का असा थेट प्रस्ताव ठेवला. इकडे सविताताईंच्या घरात या प्रस्तावाला संमती होतीच. डॉ. दिवाकर म्हणजे अजब व्यक्तिमत्व. त्यांना मूळी लग्नच करायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्यापरीने सविताला या निर्णयापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न केला.  पण सगळ्यांच्याच सदिच्छा आणि मुख्य म्हणजे सामाजिक कामात काहीतरी चांगलं घडावं ही प्रबळ इच्छा. त्यामुळे  1993 साली हे लग्न अतिशय साधेपणाने, कसलाही गाजावाजा न करता, किमान खर्चात पार पडलं. 

सविताताईंचं कुटूंब म्हणजे मुळातच चार भिंतीत मावणारं नव्हतच. लहानपणापासूनच सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालेलं. आता डॉ. दिवाकर यांच्या सोबतचा संसार त्यांना त्या पैलूने नविन नव्हताच. कारण दिवाकर यांचेही विचार  चौकोनी कुटूंबाचे नव्हतेच. पार्वतीने शंकराला वरले तसाच हा प्रकार. कारण दोघेही सारखेच. लौकिक अर्थाने निस्पृह, निष्कांचन. 


दलित गोर गरीब महिलांना आर्थिक स्वातंत्र्य नसतं हे ओळखून सविताताईंनी त्यांना पोस्टात खाते उघडणे, बचत करण्याची सवय लावली. कित्येक मुसलमान स्त्रियांनी अशी खाती उघडली. मग एक नविनच समस्या पुढे आली. इस्लामला व्याज मंजूर नाही. असा आक्षेप आल्याने या महिलांची खाती बंद करण्यात आली. त्याचे आतोनात दु:ख सविताताईंना झाले. त्या महिला तर आजही त्यांना भेटून याबद्दल खंत व्यक्त करतात. 
पुढे चालून बचत गटाची चळवळ मोठी झाली. मुस्लिमेतर स्त्रियांच्या बचत गटांनी मात्र मोठी भरारी घेतली. त्यांच्या एका एका  गटाची उलाढाल चक्क 8-9 लाखापर्यंत पोचली. यातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. 

महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी घरोघरी फिरण्याचे एक व्रत सविताताईंनी आधीपासूनच बाळगले आहे. त्यांच्या घरातील अबालवृद्धांशी संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. यातून या महिलांना ही कुणी आपल्यातलीच बाई आहे, आपली कुणी बहिणच आहे हा विश्वास वाढीला लागला. 

या सामान्य महिलांना कौशल्य विकासाचे काही एक छोटे मोठे प्रशिक्षण दिले तर त्यांना जास्त रोजगार मिळू शकतो हे ओळखून त्यांनी महिला कौशल्य विकास प्रकल्प ‘उद्यमिता’ राबवायला सुरवात केली. याचा फारच मोठा परिणाम त्या भागात दिसून आला. ज्या महिलांना तीन चार हजार रूपये महिना मिळत होता त्यांना आता त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्याच्या आधाराने सात आठ हजार रूपये महिना मिळायला लागला. साधी धुणी भांडी अशी कामे न करता त्यांना चांगली कामे मिळायला लागली. जेंव्हा सविताताई या गोरगरिब महिलांच्या घरात जातात तेंव्हा त्या बायाबापड्या त्यांना ‘सोन्याच्या पावलांनी आमच्या घरी लक्ष्मीच आली’ असं म्हणायला लागल्या. हा प्रसंग माझ्यासाठी सर्वात आनंदाचा प्रसंग होता असं त्या आजही भारावल्या स्वरात सांगतात. 

पंचेवीस वर्षात औरंगाबाद शहराच्या एका कोपर्‍यात दरिद्री झोपडपट्टी वसाहतीत स्वत: राहून आजूबाजूच्या 35 हजारांच्या लोकवस्तीसाठी निष्ठेने काम करणे ही सोपी गोष्ट नाही. एक सवर्ण स्त्री जातीपातीच्या अस्मिता नको इतक्या टोकदार होणार्‍या काळात धैर्याने दलित वस्तीत प्रत्यक्ष राहून काम करते याची वेगळी नोंद घेतली पाहिजे. दूर राहून काम करणारे आजही खुप आहेत. मौसमी काम करणारे पण खुप आहेत. 

काळाचे बदलते आयाम त्यांना चांगले कळतात. एकेकाळी साक्षरता वर्ग घेणे ही गरज होती पण आता वस्तीत येणार्‍या सुना या शिकलेल्याच असतात हे ओळखून गेली चार वर्षे लहुजी साळवे आरोग्य केंद्रात नव विवाहीत जोडप्याच्या स्वागताचा कार्यक्रम आखल्या जातो. पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. संपूर्ण केंद्रात लग्नासारखे वातावरण असते. या जोडप्यांना एकत्र आणि मग वेगवेगळे बसवून त्यांच्या शारिरीक समस्या, इतर काही समस्या यांच्याबद्दल मार्गदर्शन केले जाते. समुपदेशन केले जाते. यातून या जोडप्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या नविन मुलींना ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग (बुटीक) सारखी कौशल्ये शिकवली जातात.  

महिलांच्या विकासाचे प्रकल्प अजून खुप विस्तारू शकतात पण एक व्यक्ती म्हणून कामाला मर्यादा येते याची खंत  सविताताईंना जाणवते. हे काम सर्वत्र विस्तारत जायला हवे. यासाठी तळमळीनं काम करणारी तरूण पिढी उभी रहायला हवी. त्यांच्याच केंद्रात शिकलेली वंदना नावाची तरुणी जेंव्हा पुढे चालून त्यांची सहकारी म्हणून तडफदारपणे काम करायला लागली त्याचं त्यांना खुप अप्रुप वाटतं.

बेगम अख्तर यांच्या आयुष्यातला एक किस्सा आहे. त्या लहानपणी झोक्यावर बसून गाणं म्हणत होत्या. एक सैनिक रस्त्यावरून जात होता. त्यानं ते गाणं ऐकलं आणि त्याने त्यांना खुशीनं चांदीचं एक नाणं दिलं. ते नाणं बेगम अख्तर यांना कायम गाण्यासाठी कायम स्वरूपी प्रेरणा देत राहिलं. सविता ताईंनी त्यांच्या लहानपणी घरी येणारे पूर्णवेळ प्रचारक पाहिले. त्यांनी नकळतपणे यांच्यावर संस्कार केले. यांनी लहानपणी अंबाजोगाईत केलेली छोटी मोठी कामं पाहून पाठीवर हात ठेवला. ही प्रेरणा आयुष्यभर याच मार्गावर चालण्यासाठी कामी येत असावी. 

अशा वेगळ्यावाटा तुडवित असताना जोडीदार साथ देणारा भेटणे तसेच कुटूंबियही याची बूज ठेवणारे भेटणे हे एक प्रकारे भाग्यच म्हणावे लागेल. सविताताईंच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा !      

(छायाचित्र सौजन्य सा. विवेक - तिसरे छायाचित्र साविताताई, जीवन साठी डॉ. दिवाकर व मुलगा आदित्य सोबत)

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Sunday, October 7, 2018

ये कैसी ‘माया’ है ?


उद्याचा मराठवाडा, रविवार 7 ऑक्टोबर 2018

पंचेवीस वर्षांपूर्वी ‘माया मेमसाब’ नावाचा केतन मेहतांचा एक चित्रपट आला होता. त्यात हृदयनाथ मंगेशकर यांनी कुमार सानूच्या आवाजात एक गाणं दिलं होतं, ‘इक हसीन निगाह का सबपे साया है, जादू है जूनून है ये कैसी माया है’. हे तेंव्हाचे बर्‍यापैकी लोकप्रिय झालेलं गाणं. गांधी जयंतीच्या दुसर्‍या दिवशी मायावतींनी जी पत्रकार परिषद घेत महागठबंधनवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला त्यावेळी हेच गाणं डोक्यात आलं ‘ये कैसी माया है?’

मायावतींच्या या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्यांनी अतिशय स्वच्छपणे कुठलीही नि:सदिग्धता न ठेवता कॉंग्रेसवर तिखट आरोप करत महागंठबंधन संकल्पना मोडीत काढली आहे. 
मायावतींच्या या खेळीचा कुणाला फायदा होईल, कुणाला तोटा होईल ही वेगळी गोष्ट. पण या निमित्ताने कॉंग्रेस विरोधाच्या राजकीय मुद्द्याचा भाजपा शिवाय विचार करण्यास सगळ्यांनाच भाग पाडले आहे. 

1967 ला पहिल्यांदा कॉंग्रेसच्या विरोधात राम मनोहर लोहिया यांनी विरोधकांच्या युतीची संकल्पना मांडली आणि ती 9 राज्यांच्या विधान सभा जिंकत यशस्वी करून दाखवली. पण या सोबतच हे पण सिद्ध झाले की अशा आघाड्या या कचकड्याच्या असतात. त्या टिकत नाहीत. मग पुढे आणीबाणी नंतरची जनता पक्षाची आघाडी, नंतर 1989 ची व्हि.पी.सिंह यांना पंतप्रधान बनविणारी जनता दल नावाची आघाडी आणि पुढेही हाच खेळ चालू राहिला. 

आघाड्या अगदी शुल्लक कारणांने फुटत राहिल्या. 2004 मध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने केवळ 144 जागा मिळवल्या होत्या. पण त्यांना डाव्यांनी पाठिंबा दिला व मनमोहन सरकार सत्तेवर आले. हा पाठिंबाही मुदत पूर्ण होण्याच्या आतच अणु कराराचे निमित्त करून काढून घेण्यात आला. पण बहुमताची कसरत कशीबशी सांभाळत मनमोहन सरकारने तो कालावधी पूर्ण केला. पण ही आघाडी निवडणुकी नंतरची सत्तेसाठीची होती.  भाजपा विरोधाची होती. 

निवडणुकपूर्व आघाड्या तर टिकलेल्याच नाहीत. केवळ डाव्या पक्षांनी केरळ व पश्चिम बंगालात हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. तसेच भाजपाने अकाली दल व शिवसेने सोबत दीर्घ काळ निवडणुकपूर्व आघाडी यशस्वी करून दाखवली.  पण या शिवाय  काही किरकोळ उदाहरणे वगळता निवडणुक पूर्व आघाडी दीर्घकाळ टिकली असे घडले नाही. 

कॉंग्रेसच्याबाबत तर निवडणुकपूर्व आघाडी असे कुठलेच ठळक उदाहरण नाही (अपवाद केरळ).   या पक्षाला आपल्या एकुणच शक्तिबद्दल जास्तीचा गर्व राहिला आहे. परिणामी अशी आघाडी त्यांनी केली नाही. 

2019 साठी असे काही ‘महागठबंधन’ होणार अशा वावड्या भाजप संघ विरोधी पत्रकार विचारवंतांनी बसल्या जागीच उठवल्या होत्या. त्याला कारणीभूत ठरले ते कर्नाटकातील निकाल. खरे तर तेंव्हाही कॉंग्रेसने कुठल्याही महत्त्वाच्या पक्षासोबत निवडणुक पूर्व आघाडी केली नव्हती. पश्चिम बंगाल मध्ये किंवा उत्तर प्रदेशात अशी आघाडी विधानसभेसाठी केली होती पण त्याला यश मिळू शकले नाही. आणि परत ती आघाडी टिकलीही नाही. 

कर्नाटकाशिवाय उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकांत अशी आघाडी यश मिळवू शकते असे समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला तेंव्हा सगळ्यांनी मानायला सुरवात केली होती. पण या निवडणुकांत कॉंग्रेसने आपला उमेदवार फुलपुर (जो की जवाहरलाल नेहरूंचा मतदार संघ होता) उभा केला होता. भाजपचा पराभव होताच पत्रकार विचारवंत इतके आंधळे बनले की ते कॉंग्रेसने स्वतंत्र निवडणुक लढवली हे विसरूनच गेले. 

मायावतींनी कॉंग्रेसवर आघात करताना कॉंग्रेस सोबतच्या पक्षांनाच संपवायला बसला असा गंभीर आरोप केला आहे. खरे तर निवडणुका या आपल्या पक्षाची ताकद सिद्ध करण्यासाठीच असतात. लोकांचा पाठिंबा आहे हे दाखवले तरच तो राजकीय पक्ष शिल्लक राहू शकतो. निवडणुका न लढवता केवळ वैचारिक पातळीवर पक्ष म्हणून राहू असे जर कोणी म्हणत असेल तर त्याची फारशी दखल वास्तवात कुणी घेत नाही. त्यासाठी लोकांसमोर आपला पक्ष आणि पक्षाचे चिन्ह राहील हे पहावेच लागते. याला पर्याय नाही. डावे पक्ष जेंव्हा असे लंगडे समर्थन करतात की आम्ही विचार म्हणून लोकांसमोर आहोत. सर्व जागा आम्ही लढवूच असे नाही. तेंव्हा ते राजकीय दृष्ट्या आत्महत्याच करत असतात. पण आपल्याकडे डावीकडे झुकलेले पत्रकार असा काही आव आणतात की सामान्य वाचकांना केवळ 9 खासदार असलेले डावे पक्ष म्हणजे काही एक मोठी राजकीय ताकद आहे असा भास होत राहतो. 

मायावती तशा वास्तववादी आहेत. आज त्यांच्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत नाही. अगामी निवडणुकीत आपले जास्तीत जास्त उमेदवार उभे करणे आणि त्यातील काहींना निवडुन आणणे या शिवाय पर्याय नाही हे त्या ओळखतात. या लोकसभेची रंगीत तालीम विधान सभेतून होणार आहे. तेंव्हा त्यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मधील निवडणुका गांभिर्याने घेण्यास सुरवात केली. 

कॉंग्रेसची मुख्य अडचण ही आहे की त्यांचे अध्यक्ष राहूल गांधी हे अर्धवेळ राजकारणी आहेत. त्यांना राजकीय विषयांचे वेळेचे गांभिर्य कळत नाही. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांत समाजवादी पक्षाशी युती करण्यास त्यांनी इतका वेळ लावला की तो पर्यंत गंगेतून कितीतरी पाणी वाहून गेले होते. आताही ज्या तीन राज्यांत निवडणुका होणार आहेत तर त्यासाठी पक्षाचे धोरण तातडीने ठरवणे आणि त्या प्रमाणे कामाला लागणे आवश्यक होते. पण ते पडले अर्धवेळ राजकारणी. त्यांना परदेश दौर्‍यातून वेळ मिळणार तेंव्हा ते निर्णय घेणार. इकडे मोदींच्या परदेश दौर्‍यावर टीका करणारे हे विसरतात की भाजपकडे अमित शहा सारखा पूर्णवेळ पक्षाध्यक्ष जो की प्रत्येक निवडणुकीचा कस्सुन अभ्यास करतो आणि त्या प्रमाणे कार्यकर्ते कामाला लावतो. त्याच्याशी जर सामना असेल तर आपणही त्या प्रमाणे मेहनत घेवून काम करावे लागेल. 

मायावती यांना कुणाच्या नादाला न लागता आपल्या पक्ष वाढीसाठी काय करावे हे जास्त चांगले माहित आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर ओवैसीच्या सोबत युती करतात पण कॉंग्रेसला जागा वाटपासाठी इशारे करणे थांबवत नाहीत. असली संदिग्धता मायावती ठेवत नाहीत. विरोधी पक्षाची म्हणून एक मतांची जागा नेहमीच भारतीय राजकारणात राहिलेली आहे. ही जागा मुख्यत: कॉंग्रेसविरोधी मतांची आहे. ही मते 1967 पासून 1990 ची बाबरी मस्जिद पडेपर्यंत विरोधी पक्ष म्हणून जे काही प्रयोग चालू होते त्यांनी मिळवली. त्यातून बाजूला होवून ही मते अधिक स्वत:ची मते असा एक मोठा वाटा भाजपने बळकावला. सगळे टक्के टोणपे खात भाजपने आपले संघटन मजबूत केले. सतत निवडणुका लढवल्या. स्वत:च्या जीवावर स्पष्ट बहुमत मिळवण्याचा पराक्रमही 2014 मध्ये करून दाखवला. 

भाजपला विरोध करतच कॉंग्रेसला विरोध केला नाही तर हा विरोधी मताचा एक गठ्ठा अलगदच भाजप सारख्या किंवा इतर कुठल्याही कॉंग्रेस विरोधी पक्षाकडे निघून जातो हे वास्तव आहे. भाऊ तोरसेकर सारख्या ज्येष्ठ पत्रकाराचा अपवाद वगळता कोणीच ही बाब ठळकपणे अधोरेखीत केली नाही. मायावतींनी आपल्या पत्रकार परिषदेत असे एक वाक्य वापरले आहे की कॉंग्रेसचा भ्रष्टाचार सामान्य मतदार अजून विसरायला तयार नाही. याचा अर्थ असा होतो की कॉंग्रेस सोबत गेल्याने आपला तोटा होतो. जास्त काळ भाजपची भिती दाखवून कॉंग्रेस इतर पक्षांना ‘धर्मनिरपेक्ष’ म्हणून सोबत येण्यास मजबूर करत राहिला तर त्याचा तोटा या पक्षांना होतो (उदा. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा आणि पश्चिम बंगालात डाव्या पक्षांचा कॉंग्रेस सोबत जाण्याने झालेला दारूण पराभव). या पेक्षा आपण भाजप सोबतच कॉंग्रेसलाही कडाडून विरोध करू. जी काही आपली हक्काची मते असतील ती आणि कॉंग्रेस विरोधी असलेली मते अशा आधाराने आपली एक मतपेढी घट्ट बनवू. 

भाजप संघाची भिती दाखवून कॉंग्रेस ज्या कुणाला आपल्याकडे खेचत आहे त्यांचा राजकीय दृष्ट्या तोटाच होण्याचा संभव आहे. ममता, शरद पवार, चंद्रशेखर राव, जगमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू हे एकेकाळचे कॉंग्रेसचेच नेते होते. यांचे कॉंग्रेस सोबत जाणे स्वत:ची राजकीय ताकद संपवणे किंवा तीला मर्यादा घालून घेणे आहे. मायावतींनी हे ओळखून कॉंग्रेससोबत जाण्यास नकार दिला आहे. या खेळीमुळे भलेही भाजपचा फायदा होवो. पण जर कॉंग्रेस अजून क्षीण होणार असेल तर त्यात आपला दूरगामी फायदाच होईल हे ओळखण्याचा चतूरपणा मायावतींना आहे. त्यासाठी तात्पुरता कुठलाही फायदा (जो शरद पवारांसारख्यांनी नेहमी करून घेतला आणि आपली राजकीय ताकद मर्यादीत करून ठेवली) नाकारण्याची त्यांची  खेळी आहे. भाजप सोबतच कॉंग्रेसलाही कडाडून विरोध करत आपण भविष्यातील मोठी राजकीय ताकद बनू शकतो हे त्या दाखवून देवू पहात आहेत. शरद पवारांसारख्यांना अजून ही हिंमत होत नाही. नविन पटनायक, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव, जगमोहन रेड्डी यांच्यासारखी स्पष्ट कॉंग्रेस विरोधी भूमिका घेणे ते टाळत आले आहेत. खरं तर आज मायावती जी भूमिका घेत आहेत ती जर शरद पवारांनी घेतली असती तर तिसरी आघाडीची मोठी शक्ती महाराष्ट्रातही उभी राहिली असती. देशभर अशी काही ताकद उभी करत मोरारजी देसर्इा, व्हि.पी.सिंग, देवेगौडा, गुजराल या चौघांनी पंतप्रधानपद मिळवलं. ही संधी शरद पवारांना होती. पण त्यांनी तत्कालीन छोट्या फायद्यासाठी दूरगामी लाभ सोडून दिला. 

भाजप कॉंग्रेस विरोधी तिसर्‍या आघाडीचा चेहरा सध्यातरी मायावती बनल्या आहेत हे वास्तव आहे.  

             श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Wednesday, October 3, 2018

उसापासून सरळ इथेनॉलच काढू द्या ।


उरूस, सा.विवेक, ऑक्टोबर 2018

गणपती संपले की नेहमी चर्चा सुरू होते ती उसाचा गळीत हंगाम कधी सुरू होणार याची. सध्या साखरेचा बाजार संपूर्णपणे पडलेला आहे. जास्तीच साखर शिल्लक आहे. परदेशी बाजारपेठही कोसळलेली असल्याने साखर निर्यात करणे म्हणजे आतबट्ट्याचाच व्यवहार आहे. 

महाराष्ट्र शासनाने 20 ऑक्टोबरपासून उसाचा गळीत हंगाम सुरू करण्याची घोषणा केली आहे. पण मोठं संकट हे आहे की अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न मिटवायचा कसा? दुसरा गंभीर प्रश्‍न असा आहे की मागच्यावर्षी गाळप केलेल्या साखरेचे एकूण 8 हजार कोटी रूपयांची देणी शिल्लक आहेत. थोडक्यात मागील उधारीच पूर्ण केली गेली नाही तर नविन खरेदी कुठून आणि कशी करायची?

साखर उद्योगातील किचकट आकडेवारी, गाळप हंगामाचे शास्त्र, शासकीय धोरणं हे सगळं बाजूला ठेवूया. एक सामान्य माणूस ज्याचा शेतीशी आणि शेतमाल उद्योगाशी फारसा संबंध येत नाही त्याला एक साधा बालीश वाटावा असा प्रश्‍न पडतो. की इतर कुठलाही उद्योग केंव्हा सुरू करावा, किती उत्पादन काढावे यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत नाही. किती मोटारसायकल तयार कराव्यात यासाठी मंत्रालयात बैठक होत नाही. कारचा कारखाना किती दिवस चालवावा याचा निर्णय कुठले मंत्रिमंडळ घेत नाही. इतकेच काय तर कच्च्या शेतमालावर प्रक्रिया करणारे इतर उद्योग आहेत त्यांच्याबाबतही सरकार निर्णय घेत नाही. लोणच्याचे उत्पादन किती व्हावे, कैर्‍या काय भावाने खरेदी कराव्यात, या लोणच्याची निर्यात करायची असेल तर काय सरकारने कोटा ठरवून दिला असं काही काही होताना दिसत नाही. मग साखर ही अशी काय गोष्ट आहे की जीच्यावर सगळी बंधनं लादली जातात. आणि इतकं होवूनही न शेतकर्‍याला समाधान ना कारखाने नफ्यात, ना सरकार खुष (कारण आंदोलने उभी राहतात नेहमी).

या सगळ्याचे  मुळ आहे आवश्यक वस्तू कायद्यात. साखर उद्योग हा संपूर्णत: सरकारी बंधनात जखडून गेलेला आहे. साखर हे उत्पादन आवश्यक वस्तु कायदा (इसेन्शीयन कमोडिटी ऍक्ट- पूर्वीचे अतिशय चुकीचे भाषांतर म्हणजे जीवनावश्यक वस्तु कायदा) अंतर्गत येते. परिणामी यावर शासनाचा लगाम आवळलेला राहतो. 

सध्याची परिस्थिती एका उलट्या अर्थाने या उद्योगाला अतिशय पोषक अशी आहे.  साखरेचे भाव पडलेले आहेत आणि पेट्रोलचे भाव प्रचंड चढले आहेत. एक टन (हजार किलो) उसाचे गाळप केले तर त्यापासून तयार होणार्‍या साखरेचे प्रमाण आहे 100 किलो. या साखरेचा भाव होतो 30 रूपय दराप्रमाणे 3000 रू. पण तेच या साखर कारखान्यांमध्ये  एक छोटीशी तांत्रिक दुरूस्ती केली तर हाच कारखाना इथेनॉल निर्मीतीसाठी वापरता येवू शकतो. एक टन उसापासून  70 लिटर इथेनॉल तयार होते. या इथेनॉलचा सध्याचा भाव आहे 60 रू. म्हणजेच 70 लिटरचे झाले 4,200 रूपये. केवळ एक साधी तांत्रिक दुरूस्ती केली तर हे सगळे कारखाने साखर कारखाने न राहता इथेनॉल निर्मिती कारखाने बनतात. यामुळे तयार होणार्‍या उत्पादनाला जास्त भाव मिळू शकतो. 

सध्या भारतभर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण अधिकृत रित्या 5 ते 10 टक्के आहे. हेच प्रमाणे तातडीने कुठलीही फारशी तांत्रिक दुरूस्ती न करता 20 टक्क्यांपर्यंत करता येवू शकते. तंत्र शास्त्राचे अभ्यासक अभियंते हे सगळे तर ब्राझिलच्या धर्तीवर 40 टक्के इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळता येवू शकते असे सांगतात. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या साखर कारखान्यांना त्यांच्या एकूण गाळप क्षमतेपैकी अर्धी क्षमता निव्वळ इथेनॉल तयार करण्यासाठी सांगितली तर साखरेचे उत्पादन निम्मे होईल. अतिरिक्त असलेली साखर आणि आता तयार होणारी साखर यांची बेरीज करून आपली सध्याची गरज आरामात भागते. आणि उरलेला अर्धा ऊस हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जावू शकतो. 

आज पेट्रोलचे भाव प्रचंड वाढले आहेत. सोबतच यासाठी अमुल्य असे परकिय चलन खर्ची पडत आहे. मग जर हाच ताण हलका करून यामध्ये इथेनॉलचा वापर वाढवला तर किंमतीही काही प्रमाणात नियंत्रणात येवू शकतात. शिवाय परकिय चलन वाचू शकते. 

हे जर इतके सोपे आहे तर केले का जात नाही असाच प्रश्‍न सर्वसामान्यांना पडतो. खरे म्हणजे महाराष्ट्रातील बहुतांश साखर उद्योग हा राजकारण्यांच्या मांडीखाली दबला आहे. जूने कॉंग्रस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुतांश नेते या कारखान्यांचे संचालक आहेत. त्यामुळे साखरविषयक धोरणे बदलणे आत्तापर्यंत कठीण बनले होते. यातील न सांगीतली जाणारी दुसरी एक गंभीर बाब म्हणजे साखर कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने न चालविणे हे दोन नंबरच्या व्यवहारासाठी फायदेशीर होते. उदा. कमी साखर उतारा असणार्‍या कारखान्यांच्या मळीत अल्कोहलचे प्रमाण जास्त असायचे. परिणामी ही मळी खरेदी करून त्यापासून दारू तयार करणार्‍यांचा फायदा व्हायचा. ह्या डिस्टलरी आणि साखर कारखाने यांचे साटेलोटे कुणी उघड करून सांगत नाही. जगभरात मळीपासून दारू हा प्रकार चालत नाही. तिथे धान्यांपासून, फळांपासून दारू तयार केली जाते. पण भारतात मात्र अकार्यक्षम साखर कारखान्यांच्या मळीच्या जीवावर आपला दारूचा प्रचंड मोठा डोलारा उभा आहे. तेंव्हा हे कारखाने असेच बुडीत राहण्यात त्यांचे हितसंबंध अडकले आहेत.

जर उसापासून इथेनॉल काढल्या गेले तर स्वाभाविकच शिल्लक रहाणार्‍या चोथ्यात अल्कोहलचे प्रमाण जवळपास शुन्यच असेल. म्हणजे दारूवाल्यांना दारूसाठी अन्नधान्यावर अवलंबून रहावे लागेल. तसेही आपल्याकडे धान्य जास्तीचेच आहे. 

केवळ ऊसच नाही तर ज्वारीचेही नविन वाण ज्या पासून इथेनॉल चांगल्या प्रमाणात तयार करता येवू शकते हे विकसित केले गेले आहे. या ज्वारीला तर उसाच्या दसपट कमी पाणी लागते. जट्रोफा लागवडीचे प्रयोगही काही वर्षांपूर्वी पासून सुरू झाले आहेत. या जट्रोफापासूनही इथेनॉल तयार करता येवू शकते. 

खरं तर मुळ मागणी शेतकरी चळवळीने सातत्याने पुढे आणली आहे ती म्हणजे साखर उद्योग निर्बंध मुक्त करावा. आजा पेट्रोल महाग आहे म्हणून उसापासून साखरेऐवजी इथेनॉल काढूत पण उद्या जर पेट्रोलचे भाव जगभरात पडले तर आम्ही साखरच बनवू. साखरेचेही भाव पडले तर त्यापासून वीज तयार करून. म्हणजे ऊस ही एक बायोएनर्जी आहे. त्यापासून काय बनवायचे हे आम्ही बाजाराची काय परिस्थिती आहे त्याप्रमाणे ठरवू. त्यासाठी शासनाने हस्तक्षेप करू नये. 

स्कुटर बनविणारे आता नंतर मागणी वाढली तशी मोटार सायकल बनवायला लागले, परत मागणी वाढली की स्कुटी सारखी वाहने बनवायला लागले. बाजारात जशी मागणी असेल त्या प्रमाणे उत्पादन केले जाण्याचे स्वातंत्र्य कारखान्यांना असले पाहिजे. तर ते कारखाने टीकतील. नसता त्यांचा नाश अटळ आहे. 

आज जे सहकारी साखर कारखाने आहेत त्यांची गाळप क्षमता, त्यांची जूनी यंत्रणा, त्यांची कार्यक्षमता, त्यांचे अदूरदर्शी व्यवस्थापन हा सगळा गबाळग्रंथी कारभार का टीकवायचा? हे सगळं करदात्यांचे पैसे खर्च करून अनुदान देवून का जगवायचे? हे मरत असेल तर याला खुशाल मरू द्या. 

कार्यक्षम पद्धतीने उसापासून इथेनॉल, साखर, वीज, गुळ पावडर ज्याला मागणी असेल ते बनविणारे कारखाने विकसित झाले तर त्याचा फायदा सामान्य शेतकर्‍यांनाच मिळणार आहे. भाव मिळण्यासाठी शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरण्याची गरजच पडणार नाही. ‘ऊस नाही काठी आहे । कारखानदारांच्या पाठी आहे ॥ अशा घोषणा निर्माणच होणार नाहीत. उलट जास्तीच जास्त कार्यक्षमतेने कारखाना चालवून त्यापासून जास्तीत जास्त भाव मिळतो तो पदार्थ तयार होत असेल तर कारखान्यांमध्येच स्पर्धा लागेल जास्तीत जास्त भाव देवून ऊस खरेदी करण्याचा. हे आधुनिक कारखानदार ऊस शेतकर्‍याच्या बांधावर जावून खरेदी करतील. तिथेच काटाकरून त्याला पैसे देण्याची व्यवस्था होईल. 

आजही गुळ पावडर तयार करणारे कारखानदार शेतकर्‍याच्या प्रत्यक्ष शेतात जावून खरेदी करत आहेत. (असा कारखाना नांदेड जिल्ह्यात सध्या कार्यरत आहे. आणि तयार झालेली सगळी गुळ पावडर विकल्या जाते. मोठ्या प्रमाणात निर्यातही होते.) असे झाले तर शासनाचे साखर आयुक्तालय नावाचा पांढरा हत्ती बंद करून टाकता येईल. शासनाला कुठलेच निर्यण घेण्याचा ताण पडणार नाही. शेतकर्‍यांना आंदोलनाचा ताण पडणार नाही.

नविन तंत्रज्ञान युक्त आधुनिक जगात जूनाट विचार करून भागणार नाही. साखर कारखाने जुन्या विचारांपासून मुक्त केले पाहिजेत. आधुनिक उत्पादनांासाठी सज्ज केले पाहिजेत.  

(वाचकांना कळावी म्हणून सगळी तांत्रिक माहिती ढोबळपणाने मांडली आहे. यातील तांत्रिक अडचणी समजून घेणे आणि त्यावर मात करणे ही फारशी अवघड गोष्ट नाही. इच्छूक  लोकांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करावी.)

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

Friday, September 28, 2018

कविता तुझ्या आठवणीत तुझीच - ग्राफिटी वॉल




कविता महाजन 27 सप्टें 2018


तू हसायचीस खळखळून
बोलयचीस भरभरून
भांडायचीस कडकडून
सगळं कसं रसरशीत
उसळून आलेलं
आतून
मग तास संपायच्या आधीच
घंटा वाजायच्या आतच
का गेलीस निघून?
ही कुठली बंडखोरी?

तूला श्रद्धांजली तरी कसे म्हणू?
आम्ही सगळेच तर थोडे थोडे
गेले आहोत तूझ्यासोबत मरून...

आता हे तूझेच शब्द तूलाच...

कादंबरी आणि कविता हे दोन महत्त्वाचे वाङ्मयप्रकार समर्थपणे हाताळत असतांना कविता महाजन यांना  सदर लेखन करावंसं वाटलं. आजूबाजूला जे काही घडत असतं त्याचे परिणाम लेखकावर होत असतात. त्यांना तोंड देतांना त्यातून छोट्या आवाक्याची साहित्य निर्मिती होते. प्रसंग घटना यांचा आवाका छोटा असला तरी त्यांची ताकद मोठी असते. ती ओळखून त्यावर यथायोग्य टिपणी करणं हे आव्हान लेखकासमोर असते. आपल्या या सदर लिखाणात येणारे विषय, त्यावर व्यक्त होणारी वाचकांची प्रतिक्रया याची अतिशय स्पष्ट जाणीव लेखिकेला आहे. सदरातील शेवटच्या लेखात ती लिहून जाते

खरं आणि स्पष्ट लिहिण्या-बोलण्यात त्रास असतो. पण खोटं बोलण्याच्या, अर्धवट बोलण्याच्या, आडपडदे ठेवण्याच्या आणि मुस्कटदाबीच्या त्रासाहून तो निश्‍चितच कमी असतो. म्हणून मला पारदर्शक असंण आवडतं आणि तुलनेत परवडतंदेखील. 

इतकी भूमिका स्वच्छ असल्यावर लेखन आपोआपच एका दर्जापर्यंत पोंचलेलं असंतं हे सांगायला समिक्षकाची गरज नाही. सदरातील चाळीस लेख या पुस्तकांत समाविष्ट आहेत.  आदिवासींचे प्रश्‍न, शेतकर्‍यांचे प्रश्‍न, वाङ्मयीन संस्कृती, सामाजिक जीवनात येणारे विविध प्रसंग या सगळ्यांना सारख्याच साधेपणानं सामोरं जात लेखिकेनं टिपलं आहे. शब्दांचा फुलोरा टाळून अनुभवांना साध्या शब्दांत मांडणं हे अवघड आहे.
काही विवाद्य विषयावर लिहितांना (उदा. ‘कविता आणि काण्डॉम’, ‘पुरुषवेश्या ाणि गिर्‍हाईक बायका’, ‘आतल्या दुनियेतले अनुभव’) गांभिर्याची कसोटीच लागते. ही कसोटी कविता महाजन यांनी उत्तम निभावली आहे. आणि हे विषय मांडत असतांना स्वत:चा दृष्टिकोनही जपला आहे.

कवितेला ‘श्‍वास घ्यायची जागा’ संबोधून आपल्या संवेदनांची जातकूळीच या लेखिकेनं सांगितली आहे. कवितेची इतकी नेमकी जागा एखाद्या समिक्षकालाही  करता येणार नाही. स्त्री-पुरूष असा भेद वाङ्मयीन क्षेत्रात केला जातो आणि ते लेखिकेला खुपत जातं. त्याबद्दलची मतं तीनं तीव्रतेनं व्यक्त केली आहेत. केवळ स्त्री म्हणून बोलावण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून ही बोलवा ही भूमिका तर तकलादू स्त्री-वादी चळवळीच्याही सीमा ओलांडून जाणारी आहे. शेतकरी महिला आघाडीच्या चांदवडच्या अधिवेशनात 1986 साली एक घोषणा दिली गेली होती ‘स्त्री शक्तीच्या जागरणात स्त्री-पुरूष मुक्ती’. या पद्धतीनं कविता महाजन आपली भूमिका व्यक्तीच्या पातळीवर पोंचवतात तेंव्हा साहजिकच त्याला एक उंची प्राप्त होते. त्यांच्या खास महाजनी शैलीत त्यांनी लिहीलंय

‘स्त्री-पुरूष भेद हे आजतरी साहित्यात करण्याची गरज राहिलेली नाही. तो फारफार तर टॉयलेटमध्ये करावेत, कारण तिथं बांधकाम वेगळं करावं लागतं, इतकंच.’

कविता महाजन यांचे बहुतांश लेख हे लेखक म्हणून समाजात वावरत असतांना आलेल्या अनुभवांवर आधारलेले आहेत. आणि ते स्वाभाविकच आहेत. सामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया, ज्येष्ठ लेखक मित्रांच्या प्रतिक्रिया, वाङ्मयीन उपक्रमांच्या आयोजनातलं राजकारण, वाचक-लेखक संबंध, लेखक-प्रकाशक संबंध असे अनेक विषय यात आलेले आहेत. मौज प्रकाशन गृह, साहित्य अकादमी, राजहंस प्रकाशन, तुला प्रकाशन अशा विविध प्रकाशकांशी कविता महाजन यांचे लेखक म्हणून संबंध आले. या सगळ्यातून लेखन-वाचन-प्रकाशन याबाबतची एक निकोप दृष्टि त्यांना असल्याचं लिखाणातून आढळतं.

सगळ्या लेखनात ‘टाकलेली माणसं’ हा लेख मला नितांत आवडला. सत्कार समारंभानंतर लेखिका एकटीच कमी वर्दळीच्या आणि रिकाम्या गल्ल्यांमधून फिरते. तीला एक म्हातारी भिकारीण दिसते. ती तीला ‘मुली’ असं संबोधते आणि लेखिकेच्या मनातील तार हलते. तीला देतायेण्यासारखं काहीच नसतं. ती स्वत:जवळची एक पन्नास रूपयाची नोट तीला देते. हे सगळंच वर्णन फारच अप्रतिम आहे. भिकारणीच्या निमित्ताने सगळ्याचंच एकटेपण लेखिकेनं अधोरेखित केलं आहे.

विदर्भातले साहित्यिक आत्महत्या का करत नाहीत? असं उपरोधिक शिर्षक असलेला एक चांगला लेख या पुस्तकात आहेत. चंद्रकांत देवतालेंच्या कवितेवर आधारित ‘थोडीशी मुलं आणि बाकी मुलं’ हा पण एक खूप चांगला लेख आहे. सामाजिक पातळीवर काम करणार्‍या संस्था, शासकीय धोरण, राज्यकर्ते-साहित्यीक यांच्या ढोंगी भूमिका या सगळ्याचा यथोचित उहापोह काही लेखांमधून केला गेलेला आहे.

आपण लिहितो म्हणजे काय, लिखाण कशासाठी असतं, लेखक म्हणून काय जबाबदार्‍या असतात यांचं फार चांगलं भान लेखिकेला आहे म्हणूनच विविध विषयांवरचे हे लेख वाचनिय तर झाले आहेतच पण त्यांना एक गंभीर भान आहे. आपल्या लेखनाबद्दल शेवटच्या लेखात लेखिका लिहिते

‘वेगळ्या विषयांवरचं लेखन छापण्याचं धाडस दाखवणारे वृत्तपत्र-मासिकांचे संपादक आणि पुस्तकांचे प्रकाशक मला भेटले आहेत. ज्यांना माझा प्रामाणिकपणा, माणसांविषयीचा कळवळा आणि या जगातली अनेक जगं पाहण्याचं माझं कुतूहल कळलं आहे. अशी नितळ, निखळ विचारांची माणसंही मला माझ्या हयातीतच भेटली आहेत ही निश्‍चितच मला पाठबळ देणारी गोष्ट आहे.’

मोठा लेखन प्रकार हाताळणार्‍या कविता महाजन यांनी सदरा सारख्या छोट्या लेखन प्रकारातही जान ओतली हे विशेष.

ग्राफिटी वॉल/ लेखिका: कविता महाजन/ पृष्ठे: 200/ किंमत 225/-, प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे
  

Tuesday, September 25, 2018

‘गीत गोपाल’- गदिमांची आठवण रसाळ ॥


उरूस, सा.विवेक, सप्टेंबर 2018

गदिमांची जन्मशताब्दि चालू आहे. त्यांच्या आठवणींत महाराष्ट्रभर कार्यक्रम होत आहेत. पण गदिमांच्या एका रचनेची मात्र फारशी आठवण काढल्या जात नाही. ती म्हणजे कृष्ण कथेची गदिमांनी केलेली रसाळ मांडणी ‘गीत गोपाल’. ‘गीत रामायणा’ला प्रचंड लोकप्रियता लाभली. तशी ‘गीत गोपाल’ला लाभली नाही. 

गदिमांनी कृष्ण कथेची 35 गीतं लिहीली. यातील 17 गाण्यांना सी.रामचंद्र यांनी मधुर स्वरसाज चढवला. ही गीतं 1967 मध्ये पहिल्यांदा पुस्तक रूपात प्रसिद्ध झाली. लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांनी आपल्या ‘केसरी प्रकाशना’च्या वतीने हे प्रसिद्ध केलं. अनंत सालकरांनी त्याची सुंदर अशी सजावट केली आहे. 

या जन्माष्टमीला ‘गीत गोपाल’ वर एक सुंदर कार्यक्रम औरंगाबादला सुप्रसिद्ध गायक पं. विश्वनाथ दाशरथे आणि श्रद्धा जोशी यांनी सादर केला. लक्ष्मीकांत धोंड यांनी याची आखणी केली होती. त्या निमित्त ‘गीत गोपाल’च्या आठवणी परत जागविल्या गेल्या.

कृष्ण गोकुळ सोडून गेल्यावर राधिका एकाकी झाली आहे. कदंबतळी बसून ती आसवे ढाळत कृष्णाची आठवण काढत आहे. या प्रसंगावर गदिमांनी लिहीलेलं गीत होतं

शरच्चंद्रिका मूक हुंकर देते
वनी राधिका गीतगोपाल गाते
जगा विस्मरे गोपिका कृष्णवेडी
स्मृतींनी सख्याचें चरिच्चित्र काढी
सुगंधापरी वाहती भावगीतें 

स्वत: सी. रामचंद्र यांनीच हे गीत गायलं आहे. गदिमांनी जे लिहीलं तसंच ‘सुगंधापरी वाहती भावगीतें’ अशी ही सगळी मधुर गीतं आहेत. 

कृष्ण गोकुळात वाढत असताना ‘दिवस मास चालले, बाळकृष्ण वाढतो । समय-पुरुष भूवरी, स्वर्ग-चित्र काढतो’ अशा शब्दांत गदिमांनी वर्णन केलं आहे. या गाण्याला सी.रामचंद्र यांनी गुजराती लोकसंगीतातील गरब्याची सुरावट योजली आहे. 

‘आई तू गोरी, बाबा गोरे, मी गोरा मग हा कृष्णच का काळा?’ असा एक बालीश प्रश्‍न छोट्या बलरामाला पडतो. आणि  यावर एक अतिशय गोड गाणं गदिमांनी लिहीलं. ‘दूद नको पाज्यूं हलीला, काल्या कपिलेचे । काला या मनती आइ ग पोल गुलाख्याचे’ काळ्या कपिलेचे दूध पिल्याने हा काळा झाला असा निरागस गोड तर्क गीतांतून मांडला आहे. याला चालही  बालगीताची सुंदर लावली आहे. राणी वर्मा यांच्या आवाजात हे गाणं आहे. 

औरंगाबादला हा कार्यक्रम चालू असतांना चित्रकार सरदार जाधव हे चित्र रेखाटत होते. प्रत्यक्ष मंचावर सर्व प्रेक्षकांच्या साक्षीने कोर्‍या कॅनव्हास वर रंगांची उधळण चालू होती. हळू हळू चित्र आकार घेत होते. आधी त्यांनी पिवळा रंग कडेकडेने फासून घेतला. मधल्या मोकळ्या जागेला हळू हळू कृष्णाचा आकार येत गेला. 

‘प्रलय घन दाटले, चहुदिशी अंबरी । जलनिधी पालथे होति जणु भूवरी’ असे घनगंभीर आवाजातील गीत विश्वनाथ दाशरथे यांनी सुरू केले आणि सरदार यांनी कॅनव्हासवर वरच्या बाजूला निळे काळे पावसाळी रंग ब्रशनी पसरावाला सुरवात केली. त्याचे काही ओघळ अपसुकच खाली आले. आणि त्यातून एक सुंदर अशी आकृती कोसळणार्‍या पावसाची तयार झाली. 

एकीकडे गाणं आणि दुसरीकडे कॅनव्हासवर रंगांची उधळण अशी जूगलबंदी रसिकांना अनुभवायला येत होती. 

‘सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही, अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही’ हे गाणं गदिमांनी प्रसादिकपणे लिहीलं. हे गाणं स्वत: सी.रामचंद्र यांनीच गायलं आहे. हे गाणं चालू असताना सरदार जाधव यांनी चित्राच्या मधल्या मोकळ्या जागेच्या तळाशी यमुनेचा प्रवाह आणि त्यात सर्पफणी अशी योजना ब्रशच्या फटकार्‍यात केली. आणि जेंव्हा गाणं संपत आलं तेंव्हा ब्रशच्या एका फटकार्‍यात त्यावर नाचणारी कृष्णाची आकृती प्रकट झाली. 


‘गीत गोपाल’ मध्ये कोजागिरीच्या चांदण्यावर एक अप्रतिम गीत आहे. ‘शरदामधल्या संध्याकाळी, शांती नांदे उभ्या गोकुळी । निळ्या नभाच्या भाळावरती, पूर्ण चंद्र साजतो । पावा वनिं वाजतो ॥ हे गाणं श्रद्धा जोशीच्या सुरेल आवाजात  सादर झाले. हे गाणं चालू असताना चित्रकार सरदार यांनी कृष्णाच्या हृदयस्थानी थोडे खाली निळसर रंगांच्या छटा काढल्या आणि अचानक ब्रश खाली ठेवला. आणि रंगांच्या त्या ओघळांमधून अंगठ्याच्या साहाय्याने चंद्राची कोर रेखली. व्हिन्सेंट व्हॅन गॉग याच्या बद्दल अशी दंतकथा सांगितली जाते. की ‘गव्हाच्या शेतावरील कावळे’ या चित्राच्या प्रसंगी शेतात उघड्यावर तो चित्र रेखाटत असताना आभाळ दाटून आले. व्हॅन गॉग ने त्वरीत ब्रश टाकून दिला. आणि  पेस्ट तशाच कॅनव्हासवर पिळून बोटांनी त्या रंगाला आकार दिले. ही आठवण सरदार यांनी बोटाच्या आधाराने चंद्रकोर रेखली तेंव्हा रसिकांना आली असावी. आणि गाण्याला दाद द्यावी तशी त्या चंद्रकोरीलाही दाद मिळाली. 

‘गीत गोपाल’ मधील शेवटचे गीत म्हणजे एक प्रकारे भैरवीच आहे. राधा खिन्न एकटी बसलेली आहे आणि तीला सगळं आठवत आहे अशी सुरवात आहे. मग हीच राधिका अशी अपेक्षा व्यक्त करते आहे की
‘माझ्यासाठी तरी एकदा । गोकूळि येउन जाइ मुकूंदा ॥ या गाण्यामध्ये एक आर्त कडवं गदिमांनी असं काही लिहीलं आहे की कुणाच्या डोळ्यात अश्रु दाटून यावा. 

पाजिलेंस तू अमृत पार्था
एक अश्रू दे मजला आर्ता
एकवार दे दृढालिंगना
तीच घटी मज ठरो मोक्षदा ॥

गदिमांच्या या रसाळ रचनेची आठवण औरंगाबादकरांनी  गोपाळकाल्याच्या दिवशी जागविली. या गाण्यांवर कथ्थक शैलीतील नृत्यही सादर झाले. कथ्थक नृत्यांगना प्रीती विखरणकर आणि त्यांच्या शिष्यांनी चार गाण्यांवर नृत्य सादर केलं. ‘सर्पफणीवर कृष्ण नाचला’ या गाण्यात गोपी यमुना तटावरती खेळ खेळत आहेत असा एक प्रसंग आहे. त्यांच्या हातात चेंडू त्या उडवतात आणि झेल घेतात. ही झेला झेली नृत्य करताना बासरीच्या सुरावर अतिशय अप्रतिम अशी रसिकांसमोर नृत्य करताना सादर केल्या गेली. ‘काजळ कसले रंग रात्रीचा नेत्री मी भरते । भेटते स्वप्नी श्रीहरीते ॥ या गाण्यावरचे नृत्यही सुंदर होते. यातील गोपीची भावना कथ्थक मुद्रांमधून नजाकतीनं पेश झाली.  

गदिमांची आठवण जागविताना सी. रामचंद्र यांच्या सांगितीक प्रतिभेचाही अनुभव रसिकांना येत होता. शब्द-सुर यांची तर जुगलबंदी होतीच. पण यासोबत नृत्याच्या रूपाने घुंगरांचीही जुगलबंदी पहायला मिळाली.

शेवटच्या गाण्यात श्रद्धा जोशी हीचा आर्त सुर लागला होता आणि तेंव्हाच चित्रकार सरदार जाधव यांनी चित्राच्या खालच्या बाजूला जिथे पौर्णिमेच्या निळ्या नभाचे ओघळ कृष्णाच्या हृदयापासूनच जणू येत आहेत असे भासणारे त्यांच्या छायेत विरहदग्ध राधा रंगवायला सुरवात केली. भैरवी संपली तेंव्हा राधेचेही चित्र पूर्ण झाले होते. 

दोन तासांच्या कार्यक्रमात कोर्‍या कॅनव्हासवर बघता बघता ‘गीत गोपाल’ चे रंग उमटले होते. त्यात यमुनातटीच्या गायी होत्या, गोवर्धन पर्वत होता, रास खेळणार्‍या गोपी होत्या, दही घुसळण्याठी डेरा होता, प्रेमाची भाषाच असलेली राधा होती आणि सगळ्याच्या मध्ये अलवारपणे कृष्णाची आकृती उमटून आली होती. (हे चित्र सोबत जोडले आहे.) 

या चित्राचा शेवटी लिलाव केल्या गेला. व कार्यक्रमाची सर्व रक्कम केरळ पुरग्रस्त निधीसाठी देण्यात आली. 

हा पण कार्यक्रमाचा एक वेगळाच पैलू जो की नावाजला गेला पाहिजे. ‘ए मेरे वतन के लोगो’ हा कार्यक्रम युद्धनिधीसाठी मदत म्हणून सादर झाला होता. अशी आठवण नेहमी सांगितली जाते.  भारतात कलाकार आपली सामाजिक बांधिलकी नेहमीच जपत आले आहेत. केरळच्या पुरग्रस्त निधीसाठी गायक, वादक, चित्रकार, नृत्यांगना, नट हे एकत्र येतात आणि एक अप्रतिम स्वर-नृत्य-चित्र अविष्कार सादर करतात हे विशेष. 

आकाशवाणी कलाकार लक्ष्मीकांत धोंड यांनी काही कविता वाचून दाखवल्या. त्यातील शब्दकळेचे सौंदर्य त्यांच्या प्रभावी वाचनाने रसिकांच्या मनात जोमदारपणे ठसले. 

कृष्णाची गाणी आणि बांसरी नाही असे होवूच शकत नाही. पावा वनी वाजतो सारखे गाणे तर केवळ बासरीचेच. तरूण बासरीवादक गिरीश काळे यांनी आपल्या दमदार फुंकरीने कृष्णाचाच आभास जणू सभागृहात उत्पन्न केला. बासरी हे अगदी आद्य असे वाद्य समजले जाते. लक्ष्मीकांत तांबोळी यांची एक रचना निवेदन करताना सांगितली गेली. राधा असं म्हणते आहे कृष्णाला

ओढाळ गुरे हाकाया । मी दिली तूला जी काठी
तू केला त्याचा पावा । या तूझ्या राधिकेसाठी

या ओळी खरंच अप्रतिम आहेत. एक साधी काठी पण कृष्णानं त्याची बांसरी बनवली आणि जगाला कलेची अप्रतिम अशी देणगी मिळाली. राधेला उत्तर देताना कृष्ण असं सांगतो आहे

तू गीत दिले मज बाई । मी केली त्याची गीता
कान्हाच होऊनी काना । गीतेत अडकला आता 

गीत आणि गीता यातील सुक्ष्म फरक कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी अतिशय नेमका असा आपल्या शब्दांत मांडला आहे.

औरंगाबादकर रसिकांना एक अतिशय कलासमृद्ध असा अनुभव या कार्यक्रमाच्या रूपाने पहायला मिळाला. 

एकीकडे समाजात असहिष्णुतेचे वातावरण आहे असं आपण म्हणतो. पण दुसरीकडे दहीहंडीचा आरडा ओरडा बाजूला ठेवून कुणी सुरेल अशी संगीतसाधना करतो आहे. कुणी त्या सुरांवर आपल्या कोर्‍या कॅनव्हासवर रंग भरतो आहे. कुणी त्याला बासरीचा अप्रतिम सुर देवून स्वर्गीय संगीताचा भास निर्माण करतो आहे. कवी आपल्या शब्दांनी रसिकांना बांधून ठेवत आहेत. आणि रसिक त्याला भरभरून दाद देत आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उदार अंत:करणाने देणग्या दिल्या. ही सगळी मदत केरळ पुरग्रस्तांसाठी करण्यात आली. हे सगळं फारच महत्त्वाचं आणि सकारात्मक असं आहे. 
( दूसरे चित्र म्हणजे गोपाल कार्यक्रमाची पत्रिका.. या पत्रिकेवर गीत गोपाल पुस्तकाचे जे मुखपृष्ठ वापरले आहे.)

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575