Thursday, October 11, 2018

सविता : सामाजिक कार्याच्या उर्जेने तळपणारा शांत सुर्य ।



सा.विवेक, ऑक्टोबर 2018

औरंगाबाद रेल्वे स्टेशनच्या पूर्वेस औद्योगीत वसाहत आहे. तीला लागूनच एक झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीतून जाणार्‍या चिंचोळ्या रस्त्याने रेल्वे पटरी ओलांडली की उजव्या हाताला एक वेगळी दिसणारी इमारत आपले लक्ष वेधून घेते. खरं तर लक्ष वेधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही. ती भव्य नाही की चकचकित नाही. उलट प्लास्टर न केलेल्या उघड्या वीटांमुळे तीचा खडबडीतपणा अधोरेखीत होतो. आणि त्यानेच कदाचित ती लक्ष वेधून घेत असावी. ही इमारत म्हणजे ‘गुरूवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र’. डॉ. दिवाकर व सौ. सविता कुलकर्णी हे दांपत्य इथे चोविस तास राहून गेली 25 वर्षे हे केंद्र चालवित आहेत. 

दिवाकरांचं व्यक्तीमत्व त्यांचा जरा खर्जातला आवाज याचा समोरच्यावर काही प्रभाव पडतो. पण सविता तर अगदी आपली आई, बहिण, वहिनी वाटावी अश्या व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांच्यासोबत  सध्या घरगुती संवादातून  त्यांच्या कार्याची व्यापकता, त्यातील भव्य सामाजिक आशय याचा जराही अंदाज येत नाही. पण त्यांना आपण बोलतं केलं तर हळू हळू ही संवादाची नदी खळाळत अशी काही वहात राहते की बघता बघता हा प्रवाह भव्यता धारण करतो. 

अंबाजोगाईच्या मामा क्षीरसागरांच्या घरात सविताचा जन्म झाला. सामाजिक क्षेत्रातलं मामांचे स्थान, त्यांची तत्त्वनिष्ठा यांचा नकळतपणे दाट असा ठसा छोट्या सवितावर झाला. घरात येणारी पूर्ववेळ प्रचारकांची व्यक्तिमत्वे तीला जवळून न्याहाळता आली. दामुअण्णा दाते, सुरेशराव केतकर, गिरीशजी कुबेर, सोमनाथजी खेडकर आदी पूर्णवेळ कार्यकर्तें यांची समर्पित वृत्ती तीच्यावर संस्कार करून गेली. 

त्यांचा ओढा सामाजिक कामाकडे आपसुकच वळला. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर पूण्याला जाउन एम.एस.डब्ल्यु. करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात सामाजिक कार्याचे विधीवत शिक्षण देणार्‍या संस्था कमी होत्या. आणि असे शिकणारेही कमीच होते. पण सविताताईंना याच क्षेत्रा काम करण्याची जिद्द बाळगली होती.   

एम.एस.डब्लू. पूर्ण करून आल्यावर अंबाजोगाईलाच दीन दयाळ शोध संस्थेच्या कामात सक्रिय भाग घ्यायला सुरवात केली. हळू हळू आदिवासी, महिला, दलित यांच्या समस्या त्यांना उमगायला लागल्या. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालूक्यात कुही गावातील वनवासी कल्याण आश्रमाचे काम पाहून आल्यावर त्यांचे या विषयाचे आकलन अजूनच विस्तारले. 


अंबाजोगाईलाच डॉ. लोहिया दांपत्यांची मानवलोक संस्था आहे. या संस्थेत काम करण्यास सविताताईंनी सुरवात केली. इथे काम करत असताना ‘अध्यात्मिक वृत्तीनं समाजसेवा करणार्‍यांचा जीवनविषयक दृष्टीकोन’ असा एक विषय घेवून त्यांनी काही संशोधनही केलं. 

या काळातच औरंगाबादला डॉ. हेडगेवार रूग्णालयाचे काम विस्तारण्यास सुरवात झाली होती. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून डॉ. दिवाकर कुलकर्णी लहुजी साळवे आरोग्य केंद्राचे काम पहात होते. हे केंद्र चालवत असताना त्यांना महिला सहकार्‍याची आवश्यकता जाणवायला लागली. नाना नवलेंना त्यांनी ही त्यांची गरज सांगितली. नानांनी त्यांच्या शैलीत सविताताईंच्या घरी अंबेजोगाईला पत्र पाठवून आणि सतत पाठपुरावा करून त्यांना इकडे बोलावून घेतले. 

औरंगाबादला डॉ. दिवाकर व सविता यांनी एकत्र काम करायला सुरवात केली पण त्यांच्याही नकळत नियतीने त्यांना एकत्र बांधायचा निर्णय घेतला. नाना नवलेंनीच पुढाकार घेवून डॉ. दिवाकर यांना सविताशी लग्न करशील का असा थेट प्रस्ताव ठेवला. इकडे सविताताईंच्या घरात या प्रस्तावाला संमती होतीच. डॉ. दिवाकर म्हणजे अजब व्यक्तिमत्व. त्यांना मूळी लग्नच करायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्यांच्यापरीने सविताला या निर्णयापासून परावृत्त करण्याचाच प्रयत्न केला.  पण सगळ्यांच्याच सदिच्छा आणि मुख्य म्हणजे सामाजिक कामात काहीतरी चांगलं घडावं ही प्रबळ इच्छा. त्यामुळे  1993 साली हे लग्न अतिशय साधेपणाने, कसलाही गाजावाजा न करता, किमान खर्चात पार पडलं. 

सविताताईंचं कुटूंब म्हणजे मुळातच चार भिंतीत मावणारं नव्हतच. लहानपणापासूनच सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालेलं. आता डॉ. दिवाकर यांच्या सोबतचा संसार त्यांना त्या पैलूने नविन नव्हताच. कारण दिवाकर यांचेही विचार  चौकोनी कुटूंबाचे नव्हतेच. पार्वतीने शंकराला वरले तसाच हा प्रकार. कारण दोघेही सारखेच. लौकिक अर्थाने निस्पृह, निष्कांचन. 


दलित गोर गरीब महिलांना आर्थिक स्वातंत्र्य नसतं हे ओळखून सविताताईंनी त्यांना पोस्टात खाते उघडणे, बचत करण्याची सवय लावली. कित्येक मुसलमान स्त्रियांनी अशी खाती उघडली. मग एक नविनच समस्या पुढे आली. इस्लामला व्याज मंजूर नाही. असा आक्षेप आल्याने या महिलांची खाती बंद करण्यात आली. त्याचे आतोनात दु:ख सविताताईंना झाले. त्या महिला तर आजही त्यांना भेटून याबद्दल खंत व्यक्त करतात. 
पुढे चालून बचत गटाची चळवळ मोठी झाली. मुस्लिमेतर स्त्रियांच्या बचत गटांनी मात्र मोठी भरारी घेतली. त्यांच्या एका एका  गटाची उलाढाल चक्क 8-9 लाखापर्यंत पोचली. यातून महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला. 

महिलांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी घरोघरी फिरण्याचे एक व्रत सविताताईंनी आधीपासूनच बाळगले आहे. त्यांच्या घरातील अबालवृद्धांशी संवाद साधण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. यातून या महिलांना ही कुणी आपल्यातलीच बाई आहे, आपली कुणी बहिणच आहे हा विश्वास वाढीला लागला. 

या सामान्य महिलांना कौशल्य विकासाचे काही एक छोटे मोठे प्रशिक्षण दिले तर त्यांना जास्त रोजगार मिळू शकतो हे ओळखून त्यांनी महिला कौशल्य विकास प्रकल्प ‘उद्यमिता’ राबवायला सुरवात केली. याचा फारच मोठा परिणाम त्या भागात दिसून आला. ज्या महिलांना तीन चार हजार रूपये महिना मिळत होता त्यांना आता त्यांनी आत्मसात केलेल्या कौशल्याच्या आधाराने सात आठ हजार रूपये महिना मिळायला लागला. साधी धुणी भांडी अशी कामे न करता त्यांना चांगली कामे मिळायला लागली. जेंव्हा सविताताई या गोरगरिब महिलांच्या घरात जातात तेंव्हा त्या बायाबापड्या त्यांना ‘सोन्याच्या पावलांनी आमच्या घरी लक्ष्मीच आली’ असं म्हणायला लागल्या. हा प्रसंग माझ्यासाठी सर्वात आनंदाचा प्रसंग होता असं त्या आजही भारावल्या स्वरात सांगतात. 

पंचेवीस वर्षात औरंगाबाद शहराच्या एका कोपर्‍यात दरिद्री झोपडपट्टी वसाहतीत स्वत: राहून आजूबाजूच्या 35 हजारांच्या लोकवस्तीसाठी निष्ठेने काम करणे ही सोपी गोष्ट नाही. एक सवर्ण स्त्री जातीपातीच्या अस्मिता नको इतक्या टोकदार होणार्‍या काळात धैर्याने दलित वस्तीत प्रत्यक्ष राहून काम करते याची वेगळी नोंद घेतली पाहिजे. दूर राहून काम करणारे आजही खुप आहेत. मौसमी काम करणारे पण खुप आहेत. 

काळाचे बदलते आयाम त्यांना चांगले कळतात. एकेकाळी साक्षरता वर्ग घेणे ही गरज होती पण आता वस्तीत येणार्‍या सुना या शिकलेल्याच असतात हे ओळखून गेली चार वर्षे लहुजी साळवे आरोग्य केंद्रात नव विवाहीत जोडप्याच्या स्वागताचा कार्यक्रम आखल्या जातो. पुरणावरणाचा स्वयंपाक केला जातो. संपूर्ण केंद्रात लग्नासारखे वातावरण असते. या जोडप्यांना एकत्र आणि मग वेगवेगळे बसवून त्यांच्या शारिरीक समस्या, इतर काही समस्या यांच्याबद्दल मार्गदर्शन केले जाते. समुपदेशन केले जाते. यातून या जोडप्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. या नविन मुलींना ब्युटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग (बुटीक) सारखी कौशल्ये शिकवली जातात.  

महिलांच्या विकासाचे प्रकल्प अजून खुप विस्तारू शकतात पण एक व्यक्ती म्हणून कामाला मर्यादा येते याची खंत  सविताताईंना जाणवते. हे काम सर्वत्र विस्तारत जायला हवे. यासाठी तळमळीनं काम करणारी तरूण पिढी उभी रहायला हवी. त्यांच्याच केंद्रात शिकलेली वंदना नावाची तरुणी जेंव्हा पुढे चालून त्यांची सहकारी म्हणून तडफदारपणे काम करायला लागली त्याचं त्यांना खुप अप्रुप वाटतं.

बेगम अख्तर यांच्या आयुष्यातला एक किस्सा आहे. त्या लहानपणी झोक्यावर बसून गाणं म्हणत होत्या. एक सैनिक रस्त्यावरून जात होता. त्यानं ते गाणं ऐकलं आणि त्याने त्यांना खुशीनं चांदीचं एक नाणं दिलं. ते नाणं बेगम अख्तर यांना कायम गाण्यासाठी कायम स्वरूपी प्रेरणा देत राहिलं. सविता ताईंनी त्यांच्या लहानपणी घरी येणारे पूर्णवेळ प्रचारक पाहिले. त्यांनी नकळतपणे यांच्यावर संस्कार केले. यांनी लहानपणी अंबाजोगाईत केलेली छोटी मोठी कामं पाहून पाठीवर हात ठेवला. ही प्रेरणा आयुष्यभर याच मार्गावर चालण्यासाठी कामी येत असावी. 

अशा वेगळ्यावाटा तुडवित असताना जोडीदार साथ देणारा भेटणे तसेच कुटूंबियही याची बूज ठेवणारे भेटणे हे एक प्रकारे भाग्यच म्हणावे लागेल. सविताताईंच्या पुढच्या कामासाठी शुभेच्छा !      

(छायाचित्र सौजन्य सा. विवेक - तिसरे छायाचित्र साविताताई, जीवन साठी डॉ. दिवाकर व मुलगा आदित्य सोबत)

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

3 comments:

  1. अत्यंत उत्कृष्ट लेख...

    आपल्या या लेखाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत कष्ट करणारे आणि मातृभूमीच्या सेवेत सर्वस्व समर्पण करणारे असे जोडपे या निमित्ताने समाजाला समजेल आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजातून अशा अनेक सविताताई आणि दिवाकर राव तयार होतील ही अपेक्षा...
    या लेखाबद्दल आपले लक्ष लक्ष धन्यवाद आणि आभार.

    ॲड. रोहित सर्वज्ञ

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. aaho me fakt lihile aahe.. tyanche kam mothe aahe

    ReplyDelete