Tuesday, September 25, 2018

‘गीत गोपाल’- गदिमांची आठवण रसाळ ॥


उरूस, सा.विवेक, सप्टेंबर 2018

गदिमांची जन्मशताब्दि चालू आहे. त्यांच्या आठवणींत महाराष्ट्रभर कार्यक्रम होत आहेत. पण गदिमांच्या एका रचनेची मात्र फारशी आठवण काढल्या जात नाही. ती म्हणजे कृष्ण कथेची गदिमांनी केलेली रसाळ मांडणी ‘गीत गोपाल’. ‘गीत रामायणा’ला प्रचंड लोकप्रियता लाभली. तशी ‘गीत गोपाल’ला लाभली नाही. 

गदिमांनी कृष्ण कथेची 35 गीतं लिहीली. यातील 17 गाण्यांना सी.रामचंद्र यांनी मधुर स्वरसाज चढवला. ही गीतं 1967 मध्ये पहिल्यांदा पुस्तक रूपात प्रसिद्ध झाली. लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांनी आपल्या ‘केसरी प्रकाशना’च्या वतीने हे प्रसिद्ध केलं. अनंत सालकरांनी त्याची सुंदर अशी सजावट केली आहे. 

या जन्माष्टमीला ‘गीत गोपाल’ वर एक सुंदर कार्यक्रम औरंगाबादला सुप्रसिद्ध गायक पं. विश्वनाथ दाशरथे आणि श्रद्धा जोशी यांनी सादर केला. लक्ष्मीकांत धोंड यांनी याची आखणी केली होती. त्या निमित्त ‘गीत गोपाल’च्या आठवणी परत जागविल्या गेल्या.

कृष्ण गोकुळ सोडून गेल्यावर राधिका एकाकी झाली आहे. कदंबतळी बसून ती आसवे ढाळत कृष्णाची आठवण काढत आहे. या प्रसंगावर गदिमांनी लिहीलेलं गीत होतं

शरच्चंद्रिका मूक हुंकर देते
वनी राधिका गीतगोपाल गाते
जगा विस्मरे गोपिका कृष्णवेडी
स्मृतींनी सख्याचें चरिच्चित्र काढी
सुगंधापरी वाहती भावगीतें 

स्वत: सी. रामचंद्र यांनीच हे गीत गायलं आहे. गदिमांनी जे लिहीलं तसंच ‘सुगंधापरी वाहती भावगीतें’ अशी ही सगळी मधुर गीतं आहेत. 

कृष्ण गोकुळात वाढत असताना ‘दिवस मास चालले, बाळकृष्ण वाढतो । समय-पुरुष भूवरी, स्वर्ग-चित्र काढतो’ अशा शब्दांत गदिमांनी वर्णन केलं आहे. या गाण्याला सी.रामचंद्र यांनी गुजराती लोकसंगीतातील गरब्याची सुरावट योजली आहे. 

‘आई तू गोरी, बाबा गोरे, मी गोरा मग हा कृष्णच का काळा?’ असा एक बालीश प्रश्‍न छोट्या बलरामाला पडतो. आणि  यावर एक अतिशय गोड गाणं गदिमांनी लिहीलं. ‘दूद नको पाज्यूं हलीला, काल्या कपिलेचे । काला या मनती आइ ग पोल गुलाख्याचे’ काळ्या कपिलेचे दूध पिल्याने हा काळा झाला असा निरागस गोड तर्क गीतांतून मांडला आहे. याला चालही  बालगीताची सुंदर लावली आहे. राणी वर्मा यांच्या आवाजात हे गाणं आहे. 

औरंगाबादला हा कार्यक्रम चालू असतांना चित्रकार सरदार जाधव हे चित्र रेखाटत होते. प्रत्यक्ष मंचावर सर्व प्रेक्षकांच्या साक्षीने कोर्‍या कॅनव्हास वर रंगांची उधळण चालू होती. हळू हळू चित्र आकार घेत होते. आधी त्यांनी पिवळा रंग कडेकडेने फासून घेतला. मधल्या मोकळ्या जागेला हळू हळू कृष्णाचा आकार येत गेला. 

‘प्रलय घन दाटले, चहुदिशी अंबरी । जलनिधी पालथे होति जणु भूवरी’ असे घनगंभीर आवाजातील गीत विश्वनाथ दाशरथे यांनी सुरू केले आणि सरदार यांनी कॅनव्हासवर वरच्या बाजूला निळे काळे पावसाळी रंग ब्रशनी पसरावाला सुरवात केली. त्याचे काही ओघळ अपसुकच खाली आले. आणि त्यातून एक सुंदर अशी आकृती कोसळणार्‍या पावसाची तयार झाली. 

एकीकडे गाणं आणि दुसरीकडे कॅनव्हासवर रंगांची उधळण अशी जूगलबंदी रसिकांना अनुभवायला येत होती. 

‘सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही, अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही’ हे गाणं गदिमांनी प्रसादिकपणे लिहीलं. हे गाणं स्वत: सी.रामचंद्र यांनीच गायलं आहे. हे गाणं चालू असताना सरदार जाधव यांनी चित्राच्या मधल्या मोकळ्या जागेच्या तळाशी यमुनेचा प्रवाह आणि त्यात सर्पफणी अशी योजना ब्रशच्या फटकार्‍यात केली. आणि जेंव्हा गाणं संपत आलं तेंव्हा ब्रशच्या एका फटकार्‍यात त्यावर नाचणारी कृष्णाची आकृती प्रकट झाली. 


‘गीत गोपाल’ मध्ये कोजागिरीच्या चांदण्यावर एक अप्रतिम गीत आहे. ‘शरदामधल्या संध्याकाळी, शांती नांदे उभ्या गोकुळी । निळ्या नभाच्या भाळावरती, पूर्ण चंद्र साजतो । पावा वनिं वाजतो ॥ हे गाणं श्रद्धा जोशीच्या सुरेल आवाजात  सादर झाले. हे गाणं चालू असताना चित्रकार सरदार यांनी कृष्णाच्या हृदयस्थानी थोडे खाली निळसर रंगांच्या छटा काढल्या आणि अचानक ब्रश खाली ठेवला. आणि रंगांच्या त्या ओघळांमधून अंगठ्याच्या साहाय्याने चंद्राची कोर रेखली. व्हिन्सेंट व्हॅन गॉग याच्या बद्दल अशी दंतकथा सांगितली जाते. की ‘गव्हाच्या शेतावरील कावळे’ या चित्राच्या प्रसंगी शेतात उघड्यावर तो चित्र रेखाटत असताना आभाळ दाटून आले. व्हॅन गॉग ने त्वरीत ब्रश टाकून दिला. आणि  पेस्ट तशाच कॅनव्हासवर पिळून बोटांनी त्या रंगाला आकार दिले. ही आठवण सरदार यांनी बोटाच्या आधाराने चंद्रकोर रेखली तेंव्हा रसिकांना आली असावी. आणि गाण्याला दाद द्यावी तशी त्या चंद्रकोरीलाही दाद मिळाली. 

‘गीत गोपाल’ मधील शेवटचे गीत म्हणजे एक प्रकारे भैरवीच आहे. राधा खिन्न एकटी बसलेली आहे आणि तीला सगळं आठवत आहे अशी सुरवात आहे. मग हीच राधिका अशी अपेक्षा व्यक्त करते आहे की
‘माझ्यासाठी तरी एकदा । गोकूळि येउन जाइ मुकूंदा ॥ या गाण्यामध्ये एक आर्त कडवं गदिमांनी असं काही लिहीलं आहे की कुणाच्या डोळ्यात अश्रु दाटून यावा. 

पाजिलेंस तू अमृत पार्था
एक अश्रू दे मजला आर्ता
एकवार दे दृढालिंगना
तीच घटी मज ठरो मोक्षदा ॥

गदिमांच्या या रसाळ रचनेची आठवण औरंगाबादकरांनी  गोपाळकाल्याच्या दिवशी जागविली. या गाण्यांवर कथ्थक शैलीतील नृत्यही सादर झाले. कथ्थक नृत्यांगना प्रीती विखरणकर आणि त्यांच्या शिष्यांनी चार गाण्यांवर नृत्य सादर केलं. ‘सर्पफणीवर कृष्ण नाचला’ या गाण्यात गोपी यमुना तटावरती खेळ खेळत आहेत असा एक प्रसंग आहे. त्यांच्या हातात चेंडू त्या उडवतात आणि झेल घेतात. ही झेला झेली नृत्य करताना बासरीच्या सुरावर अतिशय अप्रतिम अशी रसिकांसमोर नृत्य करताना सादर केल्या गेली. ‘काजळ कसले रंग रात्रीचा नेत्री मी भरते । भेटते स्वप्नी श्रीहरीते ॥ या गाण्यावरचे नृत्यही सुंदर होते. यातील गोपीची भावना कथ्थक मुद्रांमधून नजाकतीनं पेश झाली.  

गदिमांची आठवण जागविताना सी. रामचंद्र यांच्या सांगितीक प्रतिभेचाही अनुभव रसिकांना येत होता. शब्द-सुर यांची तर जुगलबंदी होतीच. पण यासोबत नृत्याच्या रूपाने घुंगरांचीही जुगलबंदी पहायला मिळाली.

शेवटच्या गाण्यात श्रद्धा जोशी हीचा आर्त सुर लागला होता आणि तेंव्हाच चित्रकार सरदार जाधव यांनी चित्राच्या खालच्या बाजूला जिथे पौर्णिमेच्या निळ्या नभाचे ओघळ कृष्णाच्या हृदयापासूनच जणू येत आहेत असे भासणारे त्यांच्या छायेत विरहदग्ध राधा रंगवायला सुरवात केली. भैरवी संपली तेंव्हा राधेचेही चित्र पूर्ण झाले होते. 

दोन तासांच्या कार्यक्रमात कोर्‍या कॅनव्हासवर बघता बघता ‘गीत गोपाल’ चे रंग उमटले होते. त्यात यमुनातटीच्या गायी होत्या, गोवर्धन पर्वत होता, रास खेळणार्‍या गोपी होत्या, दही घुसळण्याठी डेरा होता, प्रेमाची भाषाच असलेली राधा होती आणि सगळ्याच्या मध्ये अलवारपणे कृष्णाची आकृती उमटून आली होती. (हे चित्र सोबत जोडले आहे.) 

या चित्राचा शेवटी लिलाव केल्या गेला. व कार्यक्रमाची सर्व रक्कम केरळ पुरग्रस्त निधीसाठी देण्यात आली. 

हा पण कार्यक्रमाचा एक वेगळाच पैलू जो की नावाजला गेला पाहिजे. ‘ए मेरे वतन के लोगो’ हा कार्यक्रम युद्धनिधीसाठी मदत म्हणून सादर झाला होता. अशी आठवण नेहमी सांगितली जाते.  भारतात कलाकार आपली सामाजिक बांधिलकी नेहमीच जपत आले आहेत. केरळच्या पुरग्रस्त निधीसाठी गायक, वादक, चित्रकार, नृत्यांगना, नट हे एकत्र येतात आणि एक अप्रतिम स्वर-नृत्य-चित्र अविष्कार सादर करतात हे विशेष. 

आकाशवाणी कलाकार लक्ष्मीकांत धोंड यांनी काही कविता वाचून दाखवल्या. त्यातील शब्दकळेचे सौंदर्य त्यांच्या प्रभावी वाचनाने रसिकांच्या मनात जोमदारपणे ठसले. 

कृष्णाची गाणी आणि बांसरी नाही असे होवूच शकत नाही. पावा वनी वाजतो सारखे गाणे तर केवळ बासरीचेच. तरूण बासरीवादक गिरीश काळे यांनी आपल्या दमदार फुंकरीने कृष्णाचाच आभास जणू सभागृहात उत्पन्न केला. बासरी हे अगदी आद्य असे वाद्य समजले जाते. लक्ष्मीकांत तांबोळी यांची एक रचना निवेदन करताना सांगितली गेली. राधा असं म्हणते आहे कृष्णाला

ओढाळ गुरे हाकाया । मी दिली तूला जी काठी
तू केला त्याचा पावा । या तूझ्या राधिकेसाठी

या ओळी खरंच अप्रतिम आहेत. एक साधी काठी पण कृष्णानं त्याची बांसरी बनवली आणि जगाला कलेची अप्रतिम अशी देणगी मिळाली. राधेला उत्तर देताना कृष्ण असं सांगतो आहे

तू गीत दिले मज बाई । मी केली त्याची गीता
कान्हाच होऊनी काना । गीतेत अडकला आता 

गीत आणि गीता यातील सुक्ष्म फरक कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी अतिशय नेमका असा आपल्या शब्दांत मांडला आहे.

औरंगाबादकर रसिकांना एक अतिशय कलासमृद्ध असा अनुभव या कार्यक्रमाच्या रूपाने पहायला मिळाला. 

एकीकडे समाजात असहिष्णुतेचे वातावरण आहे असं आपण म्हणतो. पण दुसरीकडे दहीहंडीचा आरडा ओरडा बाजूला ठेवून कुणी सुरेल अशी संगीतसाधना करतो आहे. कुणी त्या सुरांवर आपल्या कोर्‍या कॅनव्हासवर रंग भरतो आहे. कुणी त्याला बासरीचा अप्रतिम सुर देवून स्वर्गीय संगीताचा भास निर्माण करतो आहे. कवी आपल्या शब्दांनी रसिकांना बांधून ठेवत आहेत. आणि रसिक त्याला भरभरून दाद देत आहेत. या कार्यक्रमाला रसिकांनी उदार अंत:करणाने देणग्या दिल्या. ही सगळी मदत केरळ पुरग्रस्तांसाठी करण्यात आली. हे सगळं फारच महत्त्वाचं आणि सकारात्मक असं आहे. 
( दूसरे चित्र म्हणजे गोपाल कार्यक्रमाची पत्रिका.. या पत्रिकेवर गीत गोपाल पुस्तकाचे जे मुखपृष्ठ वापरले आहे.)

                        श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

1 comment:

  1. धन्यवाद!

    माझ्या चुलत-वहिनीच्या, म्हणजे दया डोंगरेच्या, विनवणीनुसार मी गदिमांच्या गीत गोपाल बद्दल मजकूर शोधत होतो तो इथे मिळाला!

    फारच छान लेख आहे!

    ReplyDelete