उरूस, सा.विवेक, 16-22 जानेवारी 2018
48 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात नोव्हेंबर 2017 ला पार पडला. पुण्याचा चित्रपट महोत्सव सुरू आहे. औरंगाबादला 18 ते 21 जानेवारीत होत आहे. नागपुर-सोलापुरला पण चित्रपट महोत्सव रूजले आहेत. मुंबईत स्थापन झालेले ‘प्रभात चित्र मंडळ’ आता आपला सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. 5 जूलै 1968 ला या फिल्म सोसायटीची स्थापना झाली.
बर्याचजणांना असे वाटते की आपल्याला डोळे आहेत. तेंव्हा चित्रपट पाहणे यासाठी वेगळं काही करण्याची गरजच काय? तसाही भारतात सिनेमा हे अतिशय लोकप्रिय माध्यम राहिलं आहे. चित्रपट तुफान चालतात. नायक-नायिकांना अतोनात पैसे मिळतात. रसिकांचे प्रेम मिळते. मग या सगळ्यात फिल्म सोसायटी काढून महोत्सव भरवून वेगळं असं सांगण्याची काय गरज?
आधी चित्रपट पाहायचा तर टॉकिजवर जावे लागायचे. आता टिव्ही मुळे तो आपल्या घरात शिरला आहे. इतकेच काय मोबाईलमुळे आता तर तो अगदी हाताच्या मुठीतच आला आहे. मनोरंजन म्हणून चित्रपटाकडे पाहणार्यांचा काही प्रश्नच नाही. त्यांना काही म्हणून प्रश्न पडतच नाहीत. दोन एक तास फुल्ल करमणुक झाली की विषय संपला. वर्षातून असे निदान पाच दहा चित्रपट तरी हिंदीत निघतातच. बाकी हॉलिवूडला तर गल्लाभरू चित्रपटांची भरमसाठ संख्या असते. बिनडोक करमणुकवाल्यांची गरज भागते.
पण या शिवाय चित्रपट ही एक कला आहे. जागतिक पातळीवर या कलेकडे गांभिर्याने पाहणारे लोक आहेत. विविध प्रयोग जगभर निर्माते दिग्दर्शक करत आहेत. गेल्या शंभर दिडशे वर्षांपासून जगभर चित्रपटांचा प्रवास चालू आहे. हे चित्रपट पाहताना त्यातील कलात्मकता काही लोकांच्या लक्षात यायला लागली. मग चित्रपट कसा पहावा? त्याची म्हणून वेगळी चित्रभाषा असते ती कशी समजून घ्यावी? अभिजात चित्रपट कसा असतो? हे प्रश्न जास्तच तीव्रतेने पडायला लागले आहेत. यासाठी जगभर ‘फिल्म सोसायटी’ची चळवळ वाढीस लागली. मुंबईत आणि तेही परत मराठी माणसांच्या पुढाकाराने ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापन झाले.
सत्यजीत राय यांचे नाव सर्वांना माहित असते. त्यांच्या चित्रपटांची माहिती असते. त्यांचे काही चित्रपट पाहिलेलेही असतात. त्यांच्या चित्रपटांवर चांगले लिखाण अगदी मराठीतही आता आले आहे. पण याच सत्यजीत राय यांनी बंगालीत चित्रपट सोसायट्यांची मोठी चळवळ राबविली याची फारशी माहिती नसते.
महाराष्ट्रात जी विभागीय केंद्र शोभावीत अशी मोठी गावी आहेत निदान तिथे तरी चित्रपट सोसायटी ‘फिल्म क्लब’ स्थापन झाले पाहिजेत. वर्षभर विविध चित्रपट, त्यांच्यावर चर्चा, तज्ज्ञांची भाषणे, माहिती मिळाली पाहिजे चिकित्सा झाली पाहिजे. वर्षभर अशा उपक्रमांची परिणीती म्हणजे मग त्यातून एक वार्षिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला गेला पाहिजे.
बर्याचजणांना वाटते की चित्रपट काय कुठेही पहायला मिळतात. पण तसे होत नाही. अजूनही बरेच चांगले दर्जेदार चित्रपट यु ट्यूब वर किंवा इतरत्र कुठेच उपलब्ध नाहीत. शिवाय चांगल्या चित्रपटांची माहितीही उपलब्ध होत नाही. खरे तर आता जी संपर्काची साधने आहेत त्यांचा वापर करून चांगल्या चित्रपटांची सविस्तर माहिती रसिकांपर्यंत पोचवता येते.
चित्रपट महोत्सवात केवळ नवेच चित्रपट दाखविले जातात. त्यातील बरेच चित्रपट तर पुढे प्रदर्शित होतही नाहीत किंवा कुठे/केंव्हा प्रदर्शित होतात हेही कळत नाही. मग असे चांगले चित्रपट गोळा करून ते चित्रपट सोसायट्यांच्या माध्यमांतून दाखवता येऊ शकतात.
असाही आरोप केला जातो की आजकालची तरूण पिढी चांगले दर्जेदार चित्रपट पहातच नाही. त्यांना काहीतरी अश्लील बिभत्स हाणामारी पाहण्यातच रस असतो. औरंगाबादला मागच्या वर्षी उद्घाटनाच्या सत्रात ‘रऊफ’ हा तुर्की भाषेतला चित्रपट दाखवला गेला. एका 12 वर्षाच्या मुलाचे मोठ्या मुलीशी असलेले एकतर्फी प्रेम आणि पार्श्वभूमीवर त्या प्रदेशातील युद्धजन्य परिस्थिती असा गंभिर विषय होता. पण त्याला तरूणांनी प्रचंड प्रतिसाद दिला. इतकंच नाही तर सगळ्यांनी आग्रह करून संयोजकांना या चित्रपटाचा अजून एक खेळ ठेवण्यास भाग पाडले.
चित्रपट साक्षरता असा एक शब्दप्रयोग या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. त्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. अगदी अलीकडे मराठीतसुद्धा ‘कोर्ट’, ‘कासव’, ‘लेथ जोशी’ सारखे वेगळी चित्रभाषा असलेले चित्रपट येत आहेत. हे कुठल्याच रूढ अर्थाने मराठी चाकोरीबद्ध चित्रपट नाहीत. ‘लेथ जोशी’ या अजूनही प्रदर्शित न होवू शकलेल्या चित्रपटात पार्श्वसंगीतासाठी सारंग कुलकर्णी या तरूण कलाकाराच्या सरोद वादनाचे तुकडे अप्रतिम रित्या चपखल असे वापरले आहेत. तरूण दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी संपूर्ण चित्रपटाची हाताळणी अतिशय वेगळी केली आहे. (हा चित्रपट अगदी अलीकडचा आहे म्हणून हा उल्लेख केला.)
जागतिक पातळीवर मुव्ही, म्युझिक, मॅथेमॅटिक्स या तीन ‘3 एम‘ ची भाषा आंतरराष्ट्रीय म्हणून ओळखल्या जाते. आपल्याकडे संगीत आणि गणित यांची फार मोठी परंपरा आहे. पण तसे चित्रपटांच्या बाबतीत मात्र म्हणता येत नाही. खरं तर भारतीय चित्रपटांची जननीच आपला महाराष्ट्र आहे. भारतीय चित्रपट सृष्टीचे पितामह म्हणून दादासाहेब फाळके या मराठी माणसाची ओळख आहे. परेश मोकाशी यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्ट्री’ हा अतिशय सुंदर चित्रपट फळक्यांवर बनवला आहे. पण हा अजूनही फारसा पाहिला गेला नाही.
दादासाहेब फळक्यांवर जया दडकरांनी अतिशय मोलाचा ठरावा असा चरित्र ग्रंथ लिहीला आहे. ‘दादासाहेब फाळके : काळ आणि कर्तृत्व’ या नावाचा हा ग्रंथराज मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे. पण आपण अजूनही हा ग्रंथ सर्वत्र पोचविण्यात अपुरे पडलो आहोत. (पहिली आवृत्ती 22 डिसेंबर 2010).
चित्रपट संस्कृती म्हणत असताना त्यात चित्रपट सोसायट्या, चित्रपट महोत्सव, चित्रपटांवरील चांगले लिखाण, चित्रपटांवर चर्चा, मोठ्या प्रयोगशील दिग्दर्शकांशी संवाद, चित्रपट विषयक मासिके या सगळ्यांचा आतंरभाव आहे. विष्णुपंत दामल्यांवर ‘दामले मामा’ (लेखिका मंगला गोडबोले, आवृत्ती जून 2013) हे अतिशय चांगले महत्वाचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. असे लिखाण अजून कितीतरी चित्रपट क्षेत्रात काम करणार्या व्यक्तिमत्वांवर होणे गरजेचे आहे.
‘वास्तव रूपवाणी’ या नावाने चित्रपट विषयक एकमेव मराठी नियतकालीक (संपादक प्रा.अभिजीत देशपांडे) प्रभात चित्रमंडळाच्या वतीने प्रसिद्ध होते आहे. करोडोंची उलाढाल असलेल्या या चित्रपट व्यवसायात चित्रपट महोत्सव, चित्रपट सोसायट्या, चित्रपट विषयक नियतकालिके अशा उपक्रमांसाठी मात्र पैसे नसतात ही एक शोकांतिका आहे. ‘वास्तव रूपवाणी’ चालविण्यासाठी साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान घ्यावे लागते. अजूनही ते दर महिन्याला ‘मासिक’ स्वरूपात निघू शकत नाही. ही गोष्ट आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहिर करते. प्रभाकर पेंढारकर यांनी ‘दो आंखे बारा हाथ’ चित्रपटाच्या निर्मितीवरच एक पुस्तक लिहीले आहे. अशा प्रयत्नांना आपण किती पाठबळ देतो?
या सगळ्याचा विचार करता चित्रपट महोत्सवांची संस्कृती रूजविणे म्हणजेच चित्रपट साक्षरता वाढविणे. अजूनही आपण चित्रपटांना अस्मितेचा विषय बनवून विरोध करतो, चित्रपट न पाहताच आपल्या अस्मितेच्या तलवारी उपसल्या जातात, तळपू लागतात. समलैंगिकतेवर चित्रपट आला की आपण त्याला बंदी घालतो. (अलिगढ या चित्रपटाचे प्रदर्शन या गावातच रोकल्या गेले.) याला काय म्हणावे?
बदलत्या काळात खुप वेगळ्या प्रकारचा चित्रपट समोर येतो आहे. जागतिक पातळीवर त्याची एक भाषा बनत चालली आहे आणि जगभरचे रसिक त्याला प्रतिसाद देत आहेत. इराण, तुर्की, चिनी, भारतीय सिनेमाला जगभरातून प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे. तेंव्हा आपण सगळ्यांनी मिळून एक सकारात्मक प्रयत्न ही संस्कृती रूजविण्यासाठी करायला हवा.
श्रीकांत उमरीकर, जशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575