Sunday, January 14, 2018

सवाई गंधर्व महोत्सव : गर्दीसाठी की दर्दीसाठी?


उरूस, विवेक, 14-20 जानेवारी 2018

गेली 65 वर्षे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव पुण्यात भरतो आहे. शास्त्रीय संगीताचा सर्वात मोठा उत्सव असं मोठ्या अभिमानाने या महोत्सवाबाबत सांगितलं जातं. भीमसेन जोशींनी त्यांचे गुरू रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व यांच्या स्मृतीप्रित्यर्थ्य हा महोत्सव सुरू केला. भीमसेन यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नावही या महोत्सवाला जोडल्या गेले. 

महोत्सव सुरू झाला तेंव्हा भारतातील परिस्थिती अतिशय वेगळी होती. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. आत्तापर्यंत विविध क्षेत्रात होत असलेली गळचेपी दूर होवून स्वातंत्र्याची आल्हाददायक झुळूक जाणवत होती. 

शास्त्रीय संगीत क्षेत्राची अडचण अशी होती की हे संगीत पूर्वापार राजे रजवाडे जमिनदार संस्थानिक यांच्या हवेल्यांत  अडकून पडले होते. दक्षिणेत मंदिरात धार्मिक उत्सवात गाणं सादर केलं जाई. या बंदिस्त संगीताला मोकळं करण्याचे दोन मोठे प्रयत्न 20 व्या शतकाच्या सुरवातीला झाले. भातखंडे यांनी शास्त्रीय संगीताला लिपीबद्ध करण्यात यश मिळवले तर पलूस्करांनी गांधर्व संगीत विद्यालयाच्या माध्यमातून तेंव्हाच्या अखंड भारतात शास्त्रीय संगीत प्रसाराची सुरवात केली. पहिल्यांदाच संगीत शिक्षणाची वाट सामान्य गायनेच्छूसाठी मोकळी झाली. कारण तोपर्यंत मोठ्या उस्ताद गुरूंच्या मर्जीवरच हे संगीत शिक्षण अवलंबून होते. 

या पार्श्वभूमीवर भीमसेन जोशींनी तिसरे महत्त्वाचे पाऊल उचलले ते म्हणजे सर्वसामान्य रसिकांना मोठ मोठे गायक वादक कलाकार ऐकायला मिळावे अशी सोय सवाई गंधर्व महोत्सवाच्या माध्यमातून करून दिली. त्यापूर्वी संगीत महोत्सव होत होतेच. पण त्यांचे स्वरूप वेगळे होते. एखाद्या तालेवार गायकाने आपली सगळी पूण्याई पाठिशी लावून यशस्वी करून दाखवलेला हा एकमेव महोत्सव होता. 

स्वत: भीमसेन भारतभर (आणि बाहेरही) प्रचंड दौरे करत. स्वत: ड्रायव्हिंग करत त्यांनी भारत उभा आडवा पिंजून काढला होता. त्यांना जागोजागचे आयोजक, गायक-वादक, रसिक यांची चांगलीच ओळख होती. कलाकाराला येणार्‍या आडचणी, आयोजकांच्या अडचणी, प्रयोजकत्व मिळवताना होणारी दमछाक हे सगळे ते जाणून होते. या सगळ्यावर मात करत सामान्य रसिकांसमोर उत्तमोत्तम कलाकारांची कला सादर होणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले व त्या प्रमाणे स्वत:चा अनुभव पणाला लावून महोत्सवाची आखणी केली. 

आज या महोत्सवाला वाढलेली गर्दी सर्वांना दिसते पण त्यासोबतच वादक कलाकार, ध्वनीमुद्रण करणारे, वाद्य तयार करणारे कारागीर, छोटी छोटी रसिक मंडळे, संगीताचे शिक्षण देणार्‍या संस्था यांची मोठ्या प्रमाणात पुण्यात वाढ झाली हे कुणी फारसे लक्षात घेत नाही. फार कशाला संगीतकारांवर देखण्या दिनदर्शिका तयार करणारे सतिष पाकणीकर सारखे कलाकारही या महोत्सवातून रसिकांसमोर ठळकपणे आले. या महोत्सवाची ध्वनिमुद्रणे आलुरकर म्युझिक हाऊस सारख्या कंपन्यांनी बाजारात आणली. संगीतावर लिहीणारे उच्च दर्जाचे समिक्षक समोर आले. पुणे परिसरात एक सर्वांगीण अशी विकासात्मक वाढ शास्त्रीय संगीत क्षेत्राची होत असलेली आढळून येते. 

सुरवातील भीमसेन जोशी भारतभर फिरून मोठ्या नावाजलेल्या कलाकारांसोबत नव्याने गाणारे उमेदीचे कलाकार हूडकून त्यांना आगत्याने बोलवायचे. त्यांचे गाणे  जाणकार रसिकांंसमोर सादर झाल्यावर त्याला एक मान्यता मिळायची. अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे आजचे आघाडीचे गायक उस्ताद राशीद खां यांना तरूणपणीच भीमसेनांनी आपल्या राहत्या घरी बोलवून त्यांची मेहफिल जाणत्यांसमोर घडवून आणली होती. परिणामी अगदी थोड्या काळातच राशीद खां यांचे नाव या क्षेत्रात सर्वत्र पसरले. कौशिकी चक्रवर्ती यांचेही उदाहरण असेच आहे. 

पण नंतर नंतर मात्र भीमसेन यांचे दौरे वयमानपरत्वे कमी झाले तस तशी नविन कलाकार हूडकून बोलावणे यावर मर्यादा पडली. आता नविन गाणारा काय आणि कसा आहे हे त्याच्याबाबत लॉबिंग करणाराच सांगायला लागला. त्याचा एक दबाव सवाई गंधर्व महोत्सवाच्या आयोजकांवर यायला लागला. मोठ मोठे कलाकार आपल्या विशिष्ट शिष्यांनाच पुढे करायला लागले. याचा एकत्रित परिणाम म्हणजे अगदी अस्सल तेच या मंचावर सादर होईल हा विश्वास लयाला गेला. 

आता उलटी परिस्थिती झाली. या मंचावरून ज्याला संधी भेटली तो इतरत्र त्या पात्रतेवरून मिरवायला लागला.  म्हणजे एकेकाळी मोठे कलाकार आणि नवोदित पण प्रतिभावंत गुणी कलाकरांमुळे हे व्यासपीठ ओळखले जायचे आता या व्यासपीठामुळे कलाकार ओळखला जायला लागला. 

महोत्सवाला जमा होणारी प्रचंड गर्दी ही तर सगळ्यांचाच चर्चेचा विषय झाली. खरं तर भारतीय शास्त्रीय संगीताचे  स्वरूप असे हजारोंच्या जामावात सादर व्हावे असे मुळातच नाही. दोन पाचशे इतक्या मोजक्या श्रोत्यांच्या संख्येत हे संगीत फुलू शकते. रवीशंकर सारख्या मोठ्या कलाकरांनी हे लिहूनच ठेवलं आहे की नविन काही सुचलेलं सादर करायचे असेल तर अगदी छोटी मैफलच कशी लाभदायी ठरू शकते. किंवा बर्‍याचदा छोट्या मैफलीतच कश्या नविन संकल्पना सुचू शकतात. कारण त्यात रसिकांशी संवाद साधता येतो. त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव वाचता येतात. पण आता जो हजारोंचा सागर समोर पसरलेला असतो त्याच्या चेहर्‍यावरचे भाव वाचणे अशक्य आहे. शिवाय हे सर्व रसिक एकाग्रतेने गाणं ऐकतात असेही नाही. मधुनच उठणे, मोबाईलशी खेळणे, खाणे, पेपर वाचणे हे अखंड चालू असते. इतकंच काय तर काही जण मंडपात चक्क झोपा काढतात. मग अशा माहौल मध्ये ‘याद पिया की आये’ रंगणार कसे? शास्त्रीय संगीतातील बारकावे समजून घ्यायचे असतील तर कमालीची एकाग्रता कलाकाराइतकी रसिकांनाही लागते. ही एकाग्रता झुंडशाहीत साधणार कशी? 

रसिकांनी काही पथ्ये कडकपणे अशा महोत्सवात पाळायला हवीत. आपले मोबाईल बंद ठेवले पाहिजेत. खाण्याचे पदार्थ आणि लहान मुलांना सोबत नाही नेले पाहिजे. आयोजकांइतकीच ही रसिकांचीही जबाबदारी आहे. पु.ल. देशपांडे यांनी ‘पूर्वी संगीत लोकाभिमुख करण्याचा कुणी प्रयत्न करत नव्हते तर संगीताभिमूख लोकच चांगलं गाणं शोधत फिरत असायचे’ असे म्हटले आहे. त्यातील व्यंग उपहास सोडून द्या. पण रसिकांची संगीत परंपरेची तिच्या गांभिर्याची बूज ठेवायला हवी.

खरं तर शास्त्रीय संगीताचा आस्वाद सामान्य रसिकांना चांगल्या पद्धतीनं घेता यावा म्हणून काही वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजीत केले पाहिजेत. अनुजा कामत ही तरूण गायिका यु-ट्यूब वर शास्त्रीय संगीत-त्यावर आधारीत हिंदी चित्रपट गीते-पाश्चिमात्य लोकप्रिय गीते असा एक सुंदर कार्यक्रम सादर करते. तो तरूणांमध्ये लोकप्रियही आहे. या माध्यमातून संगीताचा कान तयार होण्यास हातभार लागू शकतो.  
हा महोत्सव केवळ पुण्यातच न घेता सुरवातीला महाराष्ट्रभर आणि नंतर भारतभर त्याचे आयोजन केले जावे. महाराष्ट्राचा विचार केला तर पुण्या-मुंबईच्या बाहेर पडून उत्तर महाराष्ट्रात नाशिक-जळगांव, विदर्भात अमरावती-नागपुर, मराठवाड्यात औरंगाबाद-नांदेड, पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापुर-सोलापुर असे आयोजन करण्यात यावे. पुढे मग महानगर पालिका असलेल्या शहरांमध्ये त्याची व्याप्ती वाढविली जावी. हेच भारतभर करता येईल. 

यासाठी स्वतंत्रपणे काही करायची गरज नसून ज्या संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात सर्वत्र काम करत आहेत त्यांना जोडून घेण्याचे काम करावे. ‘स्पिकमॅके’ (सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युसिक अमांग युथ्स) सारख्या संस्था आजही मोठ्या चिवटपणे शास्त्रीय संगीत तरूणांपर्यंत पोचावे म्हणून काम करतात. त्यांना बळ दिलं गेलं पाहिजे. म्हणजे भीमसेनजींचे स्वप्न खर्‍या अर्थाने साकार होवू शकेल. नसता हा महोत्सव म्हणजे  केवळ भव्य ‘इव्हेंट’ ठरेल. त्यातून शास्त्रीय संगीताच्या आणि रसिकांच्या पदरात फारसं काही पडणार नाही. 

           श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment