उरूस, विवेक, 24-31 डिसेंबर 2017
लक्ष्मीकांत देशमुख साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आले आणि त्यांना ओळखणार्या बहुतांश लोकांच्या मनात एकच प्रतिक्रिया उमटली, ‘एका साध्या सरळ मनाचा लेखक निवडून आला.’
स्वातंत्र्यानंतर कष्ट करून शिकलेल्या एका पिढीचे प्रतिनिधित्व देशमुख करतात. फारशी अनुकूलता नसलेल्या काळात आणि प्रदेशात देशमुखांचा जन्म झाला (जन्म सप्टेंबर 1954, मु.पो. मुरूम, जि. उस्मानाबाद). पण त्याचा बाऊ न करता चिवटपणे अभ्यासाने स्पर्धा परिक्षांच्या मार्गाने प्रशासकीय अधिकार्याची नौकरी त्यांनी मिळवली. या नौकरीतही इतर सर्वसाधारण अधिकार्यासारखे न वागता आपली वेगळी ओळख निर्माण केली.
प्रशासकीय किचकट जबाबदार्या पेलताना त्यांनी आपल्यातला लेखक मरू दिला नाही तर उलट तो अधिक विकसित होवू दिला. आपल्या अनुभवाचा त्यांनी आपल्या लेखनासाठी उलट उपयोगच करून घेतला. नांदेडच्या नगर परिषदेच्या राजकारणावरची त्यांची कादंबरी ‘अंधेनगरी’ यातून त्याची साक्ष मिळते. केवळ स्थानिक राजकारणच नव्हे तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपला अभ्यासही त्यांनी ‘इन्किलाब वि. जिहाद’ सारख्या बृहद कादंबर्यांमधून ललित भाषेत मांडला.
अधिकारी आणि त्यातही परत लेखक मग तर तो आपल्या कोषात अधिकच गुरफटून जातो. इथेही देशमुख अपवाद ठरले. ते परभणीला निवासी उप-जिल्हाधिकारी म्हणून होते त्या काळात परभणीच्या वाङ्मयीत चळवळीत त्यांनी आपले पद, प्रतिष्ठा बाजूला ठेवून अक्षरश: एखाद्या सामान्य कार्यकर्त्यासारखे झोकून दिले. त्यांचे निवासस्थान म्हणजे तेंव्हा सहित्य संस्थेचे अनधिकृत कार्यालयच बनले होते. 67 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करताना, त्याची आखणी करताना आणि विनाविघ्न ते पार पाडताना देशमुखांचे योगदान अतिशय मोलाचे ठरले होते.
त्यांच्या तीन वाङ्मयीन कलाकृतींचा साहित्यीक दृष्टीने विचार न करता जरा वेगळा विचार करावा लागेल. पहिली कलाकृती म्हणजे त्यांनी स्त्री भ्रृण हत्ये संदर्भात जे अतिशय मोलाचे काम कोल्हापुरला जिल्हाधिकारी असताना केले त्यावरचा कथा संग्रह ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’. स्त्री-भ्रुण हत्येबाबत जनजागृती करण्याचे मोठे काम त्यांनी केले. हे काम सरकारी पातळीवर किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर न ठेवता त्याला कलात्मक रूप दिले हे महत्त्वाचे. साहित्याचे प्रयोजन काय आहे यावर निव्वळ पुस्तकी चर्चा करणार्यांनी हे उदाहरण लक्षात घ्यायला पाहिजे.
दुसरा कथा संग्रह आहे ‘पाणी ! पाणी !!’. फार आधीपासून कदाचित शासकीय उच्चपदस्थ म्हणून काम करताना असेल पण त्यांना पाणीप्रश्नाची तीव्रता जाणवली होती. तेंव्हा आत्ता इतका पाणीप्रश्न तीव्र झालाही नव्हता. टँकर लॉबी अजून महाराष्ट्रात सक्रिय झाली नव्हती. नदिपात्रातून वाळू काढून नेणारे ‘वाळू माफिया’ माजले नव्हते. अशा वेळी काळाची पावले ओळखून त्यांनी ज्या प्रमाणे शासकीय पातळीवर कामही केले त्याच प्रमाणे या समस्येला कलात्मक रूपही दिले आणि सर्वसामान्य वाचकांसमोर ते मांडले.
तिसरी कलाकृती होती ‘प्रशासननामा’. प्रशासकीय पातळीवर येणार्या समस्या, त्यांची उत्तरे, त्यातून सामान्य माणसाला न्याय कसा मिळवून देता येईल याची शोधलेली एक अधिकारी म्हणून उत्तरे. हे सर्व त्यांनी ‘प्रशासननामा’ मध्ये नितळपणे साध्या भाषेत मांडले.
ज्या प्रमाणे मारूती चितमपल्ली यांनी आपल्या वनखात्यातील नौकरीच्या निमित्ताने पशु-पक्षी-जंगले यांचा अभ्यास-निरीक्षणे ललित भाषेतून रसिकांसमोर मांडली आणि मराठी वाङ्मयाला श्रीमंती प्राप्त करून दिली. त्याच प्रमाणे लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली प्रशासकीय कारकीर्दीच्या अनुभवांना साहित्यीक रूप देवून एक वेगळा पैलू मराठी साहित्याचा रसिकांसाठी घडवला.
‘बखर भारतीय प्रशासनाची’ ही लेखमालाच त्यांनी लिहीली होती. पुढे त्याचेच ग्रंथरूप त्याच नावाने सिद्ध झाले.
महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धा घेत असते. या स्पर्धांमध्ये तीच तीच नाटके येतात असे लक्षात आल्यावर नविन संहिता असल्या तरच प्रवेशिका ग्राह्य धरेल अशी अट घालण्यात आली. तेंव्हा याला प्रतिसाद देत ‘अखेरची रात्र’ सारखे नाटक त्यांनी लिहीलं. तेंव्हा ते हौशी कलाकारांकडून रंगभूमीवर सादरही झाले. त्याला बक्षिसही मिळाली.
‘इन्किलाब विरूद्ध जिहाद’ सारखी त्यांची अफगाण प्रश्नाचा आढावा घेणारी महा-कादंबरी अजूनही समिक्षकांनी फारशी विचारात घेतली नाही. खरं तर अशा महा-कादंबर्यांची संख्या मराठीत फारच कमी आहे. त्यातही परत विषय जेंव्हा आंतरराष्ट्रीय असतो तेंव्हा तर अशा कलाकृतीच मराठीत आढळत नाही. या पार्श्वभूमीवर देशमुखांची ही कादंबरी पहायला हवी.
ज्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत, अध्यक्षाच्या निवडीबाबत, जागतिक संमेलना बाबत आजकाल सतत टिका होत आहे त्याचे अध्यक्षपद देशमुखांना आता मिळाले आहे. तेंव्हा त्यांची ही जबाबदारी आहे की या चळवळीला काही एक वेगळे आयाम ते प्राप्त करून देतील.
देशमुख स्वत: उत्तम लेखक आहेतच पण शिवाय एक चांगले आयोजक आहेत. प्रशासकीय पातळीवर त्यांनी विविध योजना यशस्वीपणे राबवून दाखवल्या आहेतच. तसेच साहित्य संमेलनांचे नेटके आयोजन करून, त्यातून पैसे वाचवून त्या कायमस्वरूपी निधीतून वाङ्मयीन उपक्रम, दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांनी करून दाखवले आहे. हे त्यांचे वेगळेपण आहे.
मधु मंगेश कर्णिक यांनी केशवसुतांचे स्मारक मालगुंडला उभारून दाखवले त्याच धर्तीवर लक्ष्मीकांत देशमुखांनी बी. रघुनाथ यांचे देखणे सुंदर स्मारक परभणीला उभारून दाखवले. त्यासाठी शासकीय पातळीवरचे अडथळे दूर करणे, निधी मिळवणे ही सगळी कामं जिकीरीनं केली म्हणून तर ते स्मारक उभं राहिलं.
तेंव्हा आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी महाराष्ट्र पातळीवर वाङ_मयीन उपक्रमांमध्ये सुसूत्रता घडवून आणावी. साहित्य महामंडळ म्हणजे मोजक्या लोकांची संकुचित विचारांची टोळी असे स्वरूप होवून बसले आहे. या महामंडळाचा विस्तार होवून त्यात ग्रंथालये, इतर वाङ्मयीन संस्था, प्रकाशक परिषदा यांचा समावेश व्हायला हवा. सामान्य रसिक या संमेलनांपासून दूर जाताना आढळत आहे. मागच्या वषी डोंबिवली सारख्या मराठी माणसांचे आगर असणार्या महानगरात संमेलनात केवळ रिकाम्या खुर्च्यांनी गर्दी केली होती. ही नामुष्की टाळायला हवी.
देशमुखांकडे ही कल्पकता आहे. ते वाङ्मयीन संस्थांना, उपक्रमांना रसिकाभिमूख बनवू शकतात. त्यांनी प्रशासकीय पातळीवर उच्चपदस्थ म्हणून काम केले आहे. तेंव्हा साहित्य संस्था, सार्वजनिक ग्रंथालये, सांस्कृतिक सभागृहे यांचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी जे प्रशासकीय अडथळे येतात ते दूर करण्यासाठी त्यांनी काही ठोस योजना शासनाकडे मांडाव्यात अशी अपेक्षा आहे. उदा. शासन प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथ महोत्सव घेतं पण त्याच्या तारखा चुक निवडल्या जातात तसेच जागाही चुकीची असते. हे सगळं देशमुखांसारखा अनुभवी माणूस समजून घेवून त्यावर उपाय सुचवू शकतो. आणि हे सगळं प्रशासनातून कसे मंजूर करून आणावयाचे हे पण सांगू शकतो.
शासकीय मर्यादेत काम करताना उद्योजक, व्यापारी, कंत्राटदार यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेवून उपक्रम चांगला करणे याचाही अनुभव देशमुखांना आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा साहित्य महामंडळाला मिळू शकतो. महाराष्ट्रभर वाङ्मयीन उपक्रम सातत्याने व दर्जेदार रितीने होण्यासाठी काही एक योजना देशमुख आपल्या अनुभवाच्या आधाराने तयार करू शकतात.
एक वेगळा अध्यक्ष यावेळी साहित्य संमेलनाला मिळाला आहे. केवळ चार दिवसांचे संमेलनच नव्हे तर वर्षभर विविध उपक्रम त्यांच्या कल्पनेतून आखले जावो, राबविले जावो, त्यांचे स्वत:चे लिखाणही बहरत जावो अशा शुभेच्छा! त्यांच्या उपक्रमांमध्ये आमच्यासारख्या रसिकांनी आधिही सक्रिय सहभाग नोंदवला होता. आताही त्यांनी हाक द्यावी, कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी सहज उभी राहिल हा आम्हाला विश्वास आहे.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment