(तेलंगणा मधील किन्नरी वीणा वादक दर्शनम मोगुलैया )
(दै. सामना संस्कृती पुरवणी २३ जानेवारी २०१८)
काळ बदलत आहे त्या प्रमाणे सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांचे स्वरूपही बदलत चालले आहे. पण याची दखल ज्या प्रमाणात घेतली जायला हवी ती तशी घेतली जात नाही.
महाराष्ट्रात एके काळी व्याख्यानमाला अतिशय प्रसिद्ध होत्या (आजही त्या काही ठिकाणी आहेत). पण आता व्याख्यानमालांसोबतच मंचावरून सादरीकरणाचे वेगळे प्रयोग होत आहेत. विंदा करंदीकर-पाडगांवकर-कुसुमाग्रज यांच्या कवितांचे प्रत्ययकारक पद्धतीचे सादरीकरण होत आहे. प्रकाश नारायण संत-ल.म.कडू- बब्रूवान रूद्रकंठावर-भालचंद्र नेमाडे यांचे गद्य लिखाण अभिवाचनाद्वारे रसिकांपर्यंत उत्कटपणे पोचवले जात आहे. कविता-संगीत यांचे एकत्रिकरण करून काही प्रयोग केले जात आहेत.
शाहू पाटोळे सारखा एक लेखक दलित-ग्रामीण खाद्य संस्कृतीवर ‘अन्न हे अपूर्ण ब्रह्म’ असं पुस्तक लिहून वाचकांसमोर एक वेगळाच अस्सल झणझणीत प्रयोग ठेवत आहे. बब्रवान रूद्रकंठावार सारख्या लेखकाची ग्रामीण मराठी व इंग्रजी यांच्या मिश्रणातून तयार होणारी ‘इंग्राम’ भाषा समिक्षकांसमोर आव्हान म्हणून उभी आहे.
उर्दू साहित्यावरचा ‘सुखन’ हा प्रयोग ओम भूतकर सारखे तरूण रंगकर्मी मोठ्या जामाने सादर करत आहेत. त्याला तरूणांचा मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन कालातील भाषा व संस्कृतीवर आधारीत ‘गाहा सत्तसई’ हा प्रयोग अधीश पायगुडे-लक्ष्मीकांत धोंड सारखे रंगकर्मी मोठ्या ताकदीने रंगमंचावर उभा करत आहेत.
साहित्य संमेलनांची एक अतिशय मोठी अशी 140 वर्षांची परंपरा मराठीला आहे. (पहिले साहित्य संमेलन 1878 ला संपन्न झाले होते) ही परंपरा अजूनही चालू आहेच. पण या सोबत ‘लिट-फेस्ट’ च्या नावाने साहित्य संमेलने वेगळ्या आणि आकर्षक पद्धतीनं तरूण वाचकांसमोर येत आहेत. कबीराचे दोहे तर कित्येक वर्षांपासून वाचले जात आहेतच पण आता हाच कबीर ‘कबीर बँड’च्या माध्यमांतून तरूणांसमोर येतो तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. अजून काही दिवसांनी मराठी संतांच्या रचनाही मराठी तरूण गिटावर मांडताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.
वाचनाचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. कुणी कितीही टिका करो पण अजूनही मराठीत छापील वृत्तपत्रे मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध होत आहेतच. पण सोबतच आता ब्लॉग लिहीणार्यांची संख्याही वाढत चालली आहे. या ब्लॉग लिखाणाला मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रविण बर्दापूरकर, निळू दामले यांचे ब्लॉग फार मोठ्या प्रमाणात वाचले जातात. भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग तर 5 लाखाचा वाचक टप्पा पार करून गेला आहे.
हिंदी-मराठी चित्रपटांवर वेगळ्यापद्धतीनं लिहीणारी तरूण लेखक मंडळी सध्या तरूणांमध्ये लोकप्रिय होत आहेत. अमोल उदगीरकर, गणेश मतकरी, जितेंद्र घाटगे यांचे चित्रपटविषयक लिखाण जरूर ध्यानात घेतले पाहिजे.
मंचावरून सादर होणार्या नाटक-एकांकिका यांचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. पुण्यात फिरोदिया करंडक मध्ये विविध कलांचे मिश्रण करून सादर होणार्या प्रयोगाला प्रोत्साहन दिले जाते. यात नृत्य-अक्षरलेखन-चित्रकला-संगीत-कठपुतली-लोककला यांचा जास्तीत जास्त उपयोग केला तर जास्त गुण मिळतात व त्या प्रयोगाला बक्षिस दिले जाते. सादत हसन मंटोच्या कथेवर अश्या सादरीकरणाला मागच्याच वर्षी बक्षिस मिळाले होते.
व्याख्यानमालांमध्ये व्याख्याते आता भाषणाला डिजीटल सादरीकरणाची जोड देत आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून विषय अजून परिणामकारकरित्या रसिकांसमोर येतो आहे. शिल्पकलेवर बोलणारे आशुतोष बापट, चित्रपटांवर बोलणारे प्रा. अभिजीत देशपांडे, पर्यावरणावर बोलणारे अभिजीत घोरपडे, पाणीप्रश्नावर तळमळीनं मांडणी करणारे प्रा. प्रदीप पुरंदरे हे अशा तंत्रज्ञानाचा मोठ्या कुशलतेने आपल्या व्याख्यानात वापर करून घेतात.
शास्त्रीय संगीतातसुद्धा अभिनव पद्धतीनं सादरीकरण होते आहे. वादकांची जुगलबंदी तर पूर्वीपासून चालूच होती. वादक आणि गायक यांची जुगलबंदीचेही प्रयोग आता सादर होत आहेत. पण या सोबतच अजून एक प्रयोग केला जात आहे. तो म्हणजे व्याख्यान आणि सादरीकरण यांचे एकत्रिकरण करून काही मांडणी केली जात आहे. ज्येष्ठ गायक सत्यशील देशपांडे आपल्या व्याख्यानात याचा वापर करून घेतात. संगीताचे गाढे अभ्यासक लेखक विनय हर्डीकर हे शास्त्रीय संगीतावर बोलताना काही कलाकारांना सोबत घेवून सादरीकरणाच्या माध्यमातून विषय उलगडून दाखवतात.
औरंगाबादला महागामी गुरूकुल गेली 8 वर्षे शारंगदेव समारोह भरवते आहे. यात जुन्या दूर्मिळ भारतीय वाद्यांचे सादरीकरण केले जाते, या कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते. नविन अत्याधुनिक साधनांद्वारे परंपरा जतनाचा एक वेगळा प्रयोग केला जातो आहे. संगीतातील जून्या नोंदी नव्याशी ताडून पाहिल्या जात आहेत. त्याप्रमाणे आजच्या काळात सादरीकरण शक्य आहे का हे पण तपासले जात आहे. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे कोलकत्त्यातील पियल भट्टाचार्य यांच्या कलाकार समुहाने ‘संकिर्ण भाणक’चा प्रयोग मोठ्या जोरकसपणे सादर करून रसिकांना खिळवून ठेवले आहे.
अनुजा कामत ही तरूण कलाकार यु ट्यूब च्या माध्यमातून शास्त्रीय संगीताबाबत एक वेगळाच कार्यक्रम सादर करते. ती हिंदी चित्रपटांतील गाण्यांची उदाहरणं देत त्यांच्यावर असलेला विविध रागांचा प्रभाव स्पष्ट करून सांगते. तसेच अगदी पाश्चिमात्य संगीतावर असलेला शास्त्रीय संगीताचा त्यातील संकल्पनांचा प्रभाव दाखवून देते. हा कार्यक्रम तरूणांमध्ये मोठा लोकप्रिय आहे.
‘कोर्ट’, ‘कासव’, ‘लेथ जोशी’ हे केवळ नविन काळाचे चित्रपट आहेत असे नसून त्यांची भाषा, त्यांचे सादरीकरण, त्यांची हाताळणी हे पण वेगळे आहे. आधीच्या मराठी चित्रपटांचे संवाद, कॅमेराची हाताळणी यापेक्षा आताच्या चित्रपटांचे संवाद-हाताळणी यात मोठा फरक असलेला स्पष्टपणे दिसून येतो. लेथ जोशी या चित्रपटाचे संगीत सारंग कुलकर्णी या तरूण सरोद वादकाने केले आहे. त्याच्या सरोदचे पार्श्वभूमीवर वाजत राहणारे तुकडे चित्रपटाला एक वेगळाच आशय प्राप्त करून देतात. मनोज जोशी-चेतन ताम्हाणे-सचिन कुंडलकर हे नवे दिग्दर्शक वेगळी चित्रभाषा घेवून आले आहेत.
नाटकांच्या सादरीकरणातही आता बदल झालेला दिसतो आहे. रावबा गजमल हा ग्रामीण भागातील रंगकर्मी प्राण्यांची निसर्गाची वेगळी परिभाषा घेवून एकांकिका सादर करतो आहे.
साहित्य-संगीत-कला यांतून एक वेगळेपण समोर येत आहे. अगदी सामाजिक प्रश्नांवर भिडतानाही लेखक-कलावंत मंडळी वेगळं काही करू पहात आहेत. समलिंगी विषयांवरील चित्रपटांचा वेगळा महोत्सव ‘कशिश’ गेली 7 वर्षे मुंबईला भरत आहे. पुण्यातही असे चित्रपट महोत्सव आता होत आहेत. त्यात पुलकित खन्नासारखे नृत्य कलाकार कलेच्या माध्यमांतून समलिंगी संबंधाचा नाजूक विषय उत्कटपणे मांडत आहे.
कौशल इनामदार जेंव्हा ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ सारखं गाणं या तरूणांच्या ओठांवर ठेवतो तेंव्हा त्यांचे भान हरखून जाते हे महाराष्ट्राने बघितले आहे. हे प्रयोग अजून जास्त प्रमाणात झाले पाहिजेत. अजय अतूलच्या हलगीचा अस्सल मर्हाठी ठेका उभ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर समस्त भारतीय रसिकांनी डो़क्यावर घेतला आहे. आणि यात बहुतांश तरूणांचाच समावेश आहे.
लघुपटांची एक वेगळी चळवळ आता मराठीत रूजू पहात आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून लघुपट तयार करणारे तरूण पुढे येत आहे. ज्या ज्या समाज घटाकांतून ते येत आहेत तेवढे विषयाचे वैविध्य या लघुपटांतून दिसत आहे.
हे सगळं वेगळेपण आपल्याला समजून घ्यावं लागेल. अजूनही जून्याच पद्धतीनं सादर होणारे कार्यक्रम आणि त्यांना मिळणारा अत्यल्प प्रतिसाद बघितला की सगळे अशी टिका करतात की आता मराठी भाषेचं कसं होणार? मराठी संस्कृतीचं कसं होणार? त्यांनी ह्या नविन प्रयोगांकडे डोळसपणे बघायला हवे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक पर्यावरण बदलत आहे. आपण या बदलाला पोषक असे वातावरण करून दिले पाहिजे.
मो. 9422878575
No comments:
Post a Comment