उरूस, दै. पुण्यनगरी, 18 जूलै 2016
गेल्या दोन महिन्यात दोन घटना देशात आणि परदेशात घडल्या. या दोन्ही घटना समलिंगी लोकांशी संबंधीत होत्या. एक सांस्कृतिक तर दुसरी हिंसक. जूनमध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात ओरलँडो येथे समलिंगी क्लब मध्ये ओमर मतीन या तरूणाने बेछुट गोळीबार करीत पन्नासपेक्षा जास्त लोकांना ठार केले. कारण केवळ इतकेच की ते सर्व समलिंगी होते. आणि इस्लामला असे संबंध मान्य नाहीत. म्हणून या लोकांचा जगण्याचाच अधिकाराच हिरावून घेतला.
हे सगळं पुढारल्या म्हणविल्या गेलेल्या अमेरिकेत घडले. आणि त्याच्या एकच महिना आधी भारतात काय घडलं? तर जगभरातील समलिंगी चित्रपटांना मुंबईत सन्मानाने आमंत्रित करण्यात आले. त्यांचा एक मोठा महोत्सव ‘कशिश 2016’ नावाने भरविल्या गेला. थोडे थोडके नाहीत तर जगभरातील 53 देशांमधील 182 चित्रपट या महोत्सवात 5 दिवस दाखविले गेले.
या महोत्सवाचा उद्देश केवळ चित्रपट दाखविणे इतका मर्यादित नाही. या निमित्ताने देशभरातील समलिंगी एकत्र जमा होतात. खरेतरे या समलिंगींना समदु:खी असंही म्हटलं पाहिजे कारण अजूनही कायद्याने भारतात या संबंधांना मान्यता नाही. परिणामी एक सामाजिक प्रतिष्ठा मिळविण्यासाठी त्यांना धडपडावं लागतं. कुटूंब, समाज, मित्र कुणीच त्यांना फारसे समजून घेत नाही हे या लोकांचे दु:ख आहे. त्यामुळे समलिंगी-म्हणजे समदु:खी असे समिकरण सध्या भारतात होवून बसले आहे.
सात वर्षांपूर्वी मुंबईत अतिशय थोड्या लोकांच्या उपस्थितीत श्रीधर रंगायन यांनी हा उपक्रम सुरू केला. यात समलिंगी मित्रांनी एकत्र जमणे, एकमेकांना समजून घेणे, विचारांची देवाणघेवाण असा स्वच्छ हेतू होता. त्याला निमित्त म्हणून चित्रपट एकत्र बघणे असा प्रस्ताव समोर आला. हे चित्रपट एरव्ही चित्रपटगृहात लागत नाहीत. आता इंटरनेटच्या माध्यमाने हे चित्रपट पाहण्याची चांगली सोय केली आहे. अगदी नुकताच भारतात प्रदर्शित झालेला ‘अलिगढ’ हा गे संबंधांवरील चित्रपट प्रत्यक्ष अलिगढ या गावात प्रदर्शित होवू शकला नाही.
या चित्रपट महोत्सवाला श्याम बेनेगल सारख्या चित्रपट महर्षींने पाठिंबा दिला. सेलिना जेटली सारख्या सेलिब्रिटी नायिकेने याचा पुरस्कार केला. यामुळे समलिंगी लोकांसाठी काम करणार्या संस्थांना नैतिक बळ मिळाले. समलिंगींसाठी काम करणार्या ‘हमसफर’ संस्थेनेही या महोत्सवाचे सह-आयोजकत्व स्विकारले होते. अशोक रावकवी जे की सातत्याने या प्रश्नावर भारतात आवाज उठवत आहेत ते यात सक्रिय सहभागी होते.
या महोत्साच्या बातम्या मराठी वृत्तपत्रांमध्ये अतिशय तुरळक छापून आल्या. त्या मानाने इंग्रजी वृत्तपत्रांनी या उपक्रमाची चांगली दखल घेतली. एकिकडे परदेशात समलिंगीवर गोळीबार होतो आहे आणि भारतात त्यांचा एकत्र मेळावा जमून काही चांगली कलात्मक सांस्कृतिक चळवळ रूजविण्याचा प्रयत्न होतो आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
या चळवळीला सर्व समाजाने खुल्या मनाने पाठिंबा दिला पाहिजे. हे सर्व उपक्रम मोठ्या शहरात चालतात, मोठी वृत्तपत्रे त्यांच्या बातम्या छापतात. छोटी शहरे, छोटी गावे किंवा खेडेगावात असे काहीच घडत नाही. जणू काही तिथे समलिंगी व्यक्ती राहतच नाहीत असा आपला समज असतो. पण सध्या महाराष्ट्रात सर्वत्र अनौपचारिकरित्या समलिंगी व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येवून छोटे छोटे गट बनवित आहेत.
औरंगाबाद शहरात अशा काही तरूणांशी आम्ही संपर्क केला. औरंगाबादेत समलिंगीसाठी काम करणार्या संस्था नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अधून मधून हे मित्र एकमेकांशी भेटतात. आपल्या भावना एकमेकांजवळ बोलून दाखवतात. केतन (खरे नाव सांगायला तयार झालेला तरूण), नितीन, रोहित, अविनाश, तौसिफ, अकबर (नावे बदलली) हे विविध ठिकाणी काम करणारे, शिकणारे तरूण आहेत. त्यांच्या मनात समलिंगी असण्याबद्दल कुठलाही गोंधळ नाही. आम्हाला समाजाने स्विकारावे इतकीच त्यांची अपेक्षा आहे. केतनने तर त्याच्या घरात आपला लैंगिक कल काय आहे हे उघड सांगितले आहे. पण बाकिच्यांची मात्र अजून कुचंबणा चालूच आहे.
रोहित बँकेत चांगली नौकरी करतो. त्याच्या लग्नाची तयारी घरच्यांनी चालू केली आहे. त्याच्यासमोर पेच आहे की आता घरच्यांना कसे सांगायचे आणि त्यांना ते पचेल का? न सांगावे तर ज्या मुलीशी लग्न होईल तिच्या आयुष्याचा खेळ कसा होवू द्यायचा? तो ज्या लहान गावात नौकरी करतो तिथे त्याला या बाबत बोलायलाही कुणी मित्र नाहीत. मग तो सुट्टी असली की औरंगाबादला येवून केतन, रोहित, नितीन, अकबर यांच्यासोबत मिसळतो. सुट्टी घालवतो.
खरे तर समलिंगी म्हटलं की त्यांना तृतिय पंथी समजण्याची चुक सरसकट केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नावर नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल देवून केंद्र शासनाला फटकारले आहे. समलिंगी आणि तृतिय पंथी यांच्यात गल्लत न करण्याच्या स्पष्ट सुचनाच देवून टाकल्या आहेत. स्त्री-स्त्री संबंध म्हणजे लेस्बीयन, पुरूष-पुरूष संबंध म्हणजे गे, स्त्री आणि पुरूष दोघांशीही लैंगिक संबंध म्हणजे बायसेक्शुअल, तृतिय पंथी म्हणजे ट्रान्सजेंडर अशा सगळ्यांना मिळून एल.जी.बी.टी. संबोधले जाते. याची माहिती इतर सामान्य माणसांना बर्याचदा नसते. यामुळे आमच्याकडे संशयाने बघितले जाते अशी खंत अविनाश ने व्यक्त केले.
बर्याच स्वयंसेवी संस्था अशा लोकांसाठी काम करायचे म्हणजे केवळ कंडोम वाटप करणे अशा गैरसमजात आहेत. याच्या पलिकडे जावून या सर्वांना एक व्यक्ती म्हणून समाजाचा घटक म्हणून सन्मानाने जगता यावे, प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. या व्यक्ती दडपणामुळे स्वत: पुढे येवू शकत नाहीत. येत नाहीत. आणि दुसरीकडून समाज रूढी परंपरेत अडकला असल्याने तो आपणहून पुढाकार घेवून यांच्यासाठी काही करायला तयार होत नाही. असा विलक्षण पेच समलिंगीं बाबत तयार झाला आहे.
कालपर्यंत असे संबंध गुन्हा समजल्या जात होते. पण सर्वोच्च न्यायालयाने प्रौढ व्यक्तींमधील समलिंगी संबंधांना गुन्हा ठरविणे रद्द केल्याने मोठा दिलासा यांना मिळाला आहे. आता समलैंगिकतेला कायद्याने मान्यता मिळावी म्हणून विविध संस्था/व्यक्ती न्यायालयात झटत आहेत.
महाराष्ट्रात बिंदू माधव खिरे यांची ‘समपथिक’ संस्था एल.जी.बी.टी.साठी मोठ्या तळमळीने आणि निष्ठेने काम करीत आहे. त्यांनी या विषयावरील पाच पुस्तके प्रकाशित केली आहेत. खिरे यांची पुस्तके दुकानात ठेवून घ्यायलाही दुकानदार तयार नव्हते. औरंगाबाद मध्ये ही पुस्तके आता उपलब्ध आहेत.
ज्या पद्धतीने एक मोठा चित्रपट महोत्सव मुंबईला भरविला जातो आहे, त्याच धर्तीवर काही एक सांस्कृतिक उपक्रम छोट्या गावांमध्येही संपन्न झाले पाहिजेत. एल.जी.बी.टी. लोकांना त्यात सहभागी होता आले पाहिजे अशी अपेक्षा केतनने व्यक्त केली. जर कायद्याचा अडसर दूर झाला तर बहुतांश लोक उजळ माथ्याने समोर येवून आपली समलैंगिक ओळख जगाला सांगू शकतील आणि आपल्या आवडत्या व्यक्तीशी आयुष्यभरासाठी अधिकृतरित्या लग्न करून खुशीने राहू शकतील.
(या विषयावर कुणीही समलिंगी व्यक्तींनी संपर्क केला तर त्यांची ओळख गुप्त राखली जाईल. एक सामाजिक संस्था यासाठी पुढाकार घेवून काम करतआहे. इच्छा असेल त्या समलिंगी व्यक्तींना त्यांच्याशी जोडून घेतले जाईल.)
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.