उरूस, दै. पुण्यनगरी, 4 जूलै 2016
कराचीचे कव्वाल अमजद फरिद साबरी यांची 22 जून रोजी पाकिस्तानात भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांचा गुन्हा काय होता? इस्लामला गाणं बजावणं मंजुर नाही. अमजद साबरी यांच्या घराण्यातच सुफी कव्वालीची मोठी परंपरा आहे. ते आपल्या परंपरेचे इमान पाळत गात राहिले. मग हे कट्टर पंथियांना कसे मंजूर होणार? त्यातही परत साबरी यांच्या घराण्याची अतिशय गाजलेली कव्वाली ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद, लौटकर मै ना जाऊंगा खाली’ हीच्यावरच कट्टरपंथियांचा आक्षेप होता. जे काही मागायचे ते केवळ अल्लाला मागायचे. मग या कव्वालीत मोहम्मद पैगंबरांपाशी मागणी करायचे काय कारण? या पूर्वी अमजद साबरी यांना धमकी देण्यात आली होती. पण साबरी यांनी आपल्या कलेपुढे या धमकीला भीक घातली नाही. याचा परिणाम म्हणजे त्यांना शेवटी आपले प्राण गमवावे लागले. तेही अर्ध्या आयुष्यात (43 वर्ष)
प्रसिद्ध पत्रकार लेखक विल्यम डार्लिंपल (व्हाईट मोगल्स या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक) यांनी अमजद साबरी यांच्या हत्येवर लिहीताना एक विदारक सत्य आपल्या शब्दांत मांडले आहे. ते लिहीतात, ‘पाकिस्तानात स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा केवळ 245 मदरसे होते. आता ही संख्या 6870 इतकी प्रचंड झाली आहे. या मदरश्यांना सौदीमधून पैसा पुरवला जातो. यातून कट्टरपंथी इस्लामची शिकवण लहान मुलांना दिली जाते. कबरीपाशी जाऊन प्रार्थना करणे, संगीत सादर करणे, नाचणे इस्लाम विरोधी आहे हे लहानपणापासूनच मुलांना इथे शिकवले जाते. सरहद्द प्रांतात बाबा रहमान यांचा दर्गा आहे. सुफी संगीताचे हे एक मोठेच केंद्र आहे. मदरश्यात शिकणारे विद्यार्थी या ठिकाणी येवून गाणार्यांना त्रास देतात. इतकेच नाही तर त्यांची वाद्यं तोडून टाकतात. हजरत निजामोद्दीन यांच्यासारखेच बाबा रहमान हे एक सुफी संत म्हणून या प्रदेशात प्रसिद्ध आहेत. पख्तूनी भाषेतील त्यांच्या रचना सुफी गायक मोठ्या आदराने गातात.’ चांदण्या रात्रीत या दर्ग्यात बसून सुफी गायकांच्या तोंडून बाबा रहमानींच्या रचना एैकणे स्वर्गीय आनंद असल्याचे विल्यम डार्लिंपल यांनी लिहीले आहे. भारतात हैदराबादला राहून विल्यम डार्लिंपल यांनी दखनी परंपरेचा अभ्यास केला आहे. पुस्तके लिहीली आहेत.
परदेशी पत्रकार ज्या पद्धतीने हे विदारक सत्य मांडतात ते तसे मांडण्याची आपल्याकडे हिंमत नाही आणि पुरोगामी तर हे काही असे आहे म्हणून मानायला तयारच नसतात.
ज्या कराचीमध्ये अमजद साबरी यांची हत्या करण्यात आली त्याच कराचीमध्ये फरिद्दुद्दीन अय्याज नावाचे कव्वाल आहेत. आपल्या पारंपरिक कव्वालीच्या शैलीत त्यांनी गायलेला कबीर अतिशय लोकप्रिय आहे. इस्लामला अद्वैत मंजूर नाही. सामान्य माणूस आणि अल्ला (परमेश्वर) कधीही एक होवू शकत नाही यावर इस्लाम ठाम आहे. तर कबीर जे निर्गुण मांडतो त्यात अद्वैत तत्त्वज्ञान ठासून भरलेले आहे. फरिद्दुद्दीन अय्याज कबीर गाताना सांगतात
कबीरा कुवा एक है
पानी भरे अनेक
भांडा ही मे भेद है
पानी सबमे एक
आता ही अद्वैताची मांडणी आपल्या गाण्यांमधून मांडली तर कट्टरपंथियांच्या अंगाची लाही होणारच. मग याचा परिणाम म्हणजे कलाकाराला आपले प्राण गमवावे लागणार.
अमजद साबरी यांची हत्या करणारे हे विसरतात की भारतीय उपखंडात (पाकिस्तान बांग्लादेशासह) जे म्हणून शासक राज्य करून गेले त्या सर्वांवर इथल्या वातावरणाचा प्रभाव पडला. गुरू परंपरा इथल्या मातीचा विशेष. सुफी मध्येही हिंदूप्रमाणे गुरू परंपरा आहे. इतकेच नाही तर सम्राट अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब या सगळ्यांनी सुफी गुरू केले होते. अजमेरचे प्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती, दिल्लीचे अमीर खुस्रोचे गुरू हजरत निजामोद्दीन चिश्ती, आगर्याचे सलिमोद्दीन चिश्ती आणि औरंगाबाद जवळ दौलताबाद येथे असलेल ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती हे सगळे मोगल सम्राटांचे गुरू होते. ज्या सम्राट औरंगजेबाच्या कट्टरपणाचे पुरावे नेहमी दिले जातात त्याने आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर आपले सुफी गुरू जैनोद्दीन चिश्ती यांच्या बाजूला दफन करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे या सुफी संताच्या शेजारी उघड्यावर औरंगजेबाची कबर बांधण्यात आली. तिला छत केले गेले नाही.
फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेले कित्येक कलावंत तातडीने परत भारतात आले कारण त्यांच्या लक्षात आले की पाकिस्तानात आपल्या कलेची कदर होणार नाही. मूळ इस्लामची शिकवण काहीही असो पण त्याचा अतिशय चुक अर्थ सध्या कट्टरपंथिय लावत आहेत. अशा पद्धतीने कलेवर आघात करण्यात आले तर कला टिकणार कशी? तिचा विकास होणार कसा? माणूस हा मारून खाणारा इतर प्राण्यांसारखाच प्राणी होता. तो दाणे पेरून आपले अन्न तयार करायला शिकला. आणि मारून खाणारा हा प्राणी पेरून खाणारा सुसंस्कृत मनुष्य झाला. याच माणसाने पुढे कला शोधून काढली. कलेचे विविध अविष्कार निर्माण केले.
मूळचे भारतातील पंजाबचे असलेले साबरी घराणे फाळणीच्यापूर्वी कराचीला स्थलांतरीत झाले. अमजद साबरी यांचे वडिल गुलाम फरिद साबरी आणि काका मकबुल अहमद साबरी यांनी हे घराणे नावारूपाला आणले. कव्वालीला आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. 1975 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत न्युयॉर्क येथे त्यांनी आपल्या सहकार्यांसह कव्वाली सादर केली. तेंव्हापासून कव्वालीला परदेशात महत्त्वाचे स्थान मिळाले. गाताना मधूनच ‘अल्ला’ म्हणण्याची त्यांची लकब या घराण्याचे वैशिष्ट्य बनली. ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद’, ‘साकिया और पिला और पिला’, ‘ताजेदार ए हरम’ या त्यांच्या कव्वाली भरपुर लोकप्रिय झाल्या. पाकिस्तानी चित्रपटांमधुन त्यांच्या कव्वालींना मोठी लोकप्रियता लाभली.
अमजद साबरी यांनी आपल्या लहानपणीची एक आठवण सांगितली आहे. वडिल गुलाम साबरी त्यांना रियाजासाठी पहाटे चारलाच उठवायचे. सकाळी उठणे लहान अमजदच्या मोठे जिवावर यायचे. त्याची आईही त्याची बाजू घेवून वडिलांना विरोध करायची. पण वडिलांनी काही एक न ऐकता छोट्या अमजदला असल्या कठोर मेहनतीने तयार केले. पहाटे राग भैरवचा केलेला रियाज आयुष्यभर उपयोगी पडला अशी आठवण अमजद साबरी यांनी नोंदवून ठेवली आहे.
बाविस वर्षांपूर्वी गुलाम फरिद साबरी यांचा मृत्यू झाला तेंव्हा त्यांच्या अंत्ययात्रेत चाळीस हजार लोक सहभागी झाल्याची नोंद आहे. आत्ताही अमजद साबरी यांच्या अंत्ययात्रेला बंदी तोडून हजारो रसिक सहभागी झाले. ही अफाट उपस्थिती बघूनच कट्टरपंथी समजून चुकले की सर्वसामान्य लोकांच्या मनात कोणती भावना आहे.
सामान्य नागरिक कधीच कट्टर पंथियांना पाठिंबा देत नाही. काही काळ तो घाबरतो. पण आणिबाणीचा प्रसंग आला तर लोक मोठ्या हिमतीने रस्त्यावर उतरतात आणि असल्या कट्टर पंथियांना आपल्या साध्या कृतीने ठोस आणि ठाम उत्तर देतात. सर्व जग कट्टरपंथियांच्या विरूद्ध जात आहे हे सिद्ध झाले आहे. कट्टरपंथियांना सुरवातीला जी सहानुभूती भेटली होती ती त्यांची खरी ताकद होती. पण त्यांनी ज्या अतिरेकी पद्धतीने वागायला सुरवात केली त्याने आता त्यांचा रस्ता विनाशाकडे नेला आहे. ख्रिश्चनांविरूद्ध, ज्युविरूद्ध, बुद्धीस्टांविरूद्ध, हिंदूविरूद्ध आणि आता खुद्द इस्लामच्या अनुयायांविरूद्धच... नेमके कुणा कुणाच्या विरोधात इस्लामच्या कट्टरपंथियांना लढायचे आहे? पत्रकार तवलीन सिंगचा मुलगा आतिश तासिर (पिता पत्रकार सलमान तासीर) याने आपल्या ‘इतिहासाचा अनभिज्ञ यात्री’ या पुस्तकात (अनुवाद शारदा साठे, मौज प्रकाशन) असे लिहीले आहे की ‘इस्लामच्या कट्टरपंथियांचा संघर्ष आधुकनिकतावादाशी आहे’. आतिश तासीर (जो स्वत: मुसलमान आहे) चे वाक्य नीट समजून घेतले तर या प्रश्नाचे आकलन होण्यास मदत होईल.
कश्मीरमध्ये मुलींच्या वाद्य समुहाला असाच विरोध कट्टरपंथियांनी केला होता. कट्टरपंथियांना हे कोण समजावून सांगणार ‘गाणार्याचा गळा दाबल्याने गाणे मरत नसते !’ सुफी संगीत अमर आहे. ते नेहमीच टिकून राहिल.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.
No comments:
Post a Comment