उरूस, दै. पुण्यनगरी, 2 मे 2016
जागतिक किर्तीचा नाटककार विल्यम शेक्सपिअर याचा 23 एप्रिल हा स्मृतीदिन. जगभर हा दिवस ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी त्याचा जन्म झाला आणि त्याचा मृत्यूही याच दिवशी झाला असे मानले जाते. त्याचा मृत्यू 23 एप्रिल 1616 ला झाला. म्हणजे हे वर्ष त्याच्या पुण्यतिथीचे 400 वे वर्ष आहे.
मराठी वाचकांना असे वाटू शकते की या शेक्सपिअरचे आणि आमचे काय नाते? शेक्सपिअरची नाटके भारतीय भाषांमध्ये सर्वात जास्त मराठीत रूपांतरित/अनुवादीत/प्रभावीत होउन आली. एक दोन नाही तर तब्बल 93 नाटके शेक्सपिअरच्या नाटकांवरची मराठीत आलेली आहेत. भारतीय भाषांमधला हा एक विक्रमच आहे. कदाचित जगातिल मराठी ही एकमेव भाषा असावी ज्यात शेक्सपिअरच्या नाटकांवरची एवढी नाटके आहेत.
मराठीत शेक्सपिअर यायला सुरवात 1867 ला झाली. इचलकरंजीच्या महादेव गोविंद कोलटकरांनी शेक्सपिअरचे नाटक ऑथेल्लो पहिल्यांदा मराठीत आणले. आणि तेथपासून ही परंपरा सुरू झाली. पण याहीपूर्वीचा एक संदर्भ आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नमूद केले आहे की 1857 च्या उठावात नेतृत्व करणार्या नानासाहेब पेशवे यांनी शेक्सपिअरच्या नाटकाचे मराठीत रूपांतर केल्याचा उल्लेख सापडला आहे. पण ती संहिता मात्र सापडली नाही. त्यामुळे 1867 चाच उल्लेख अधिकृत मानावा लागतो.
इतरांनी ही नाटके मराठीत आणणे याला महत्त्व आहेच पण सामाजिक सुधारणांचा आग्रह धरणारे समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनीही हॅम्लेट नाटकाचे ‘विकारविलसित’ नावाने भाषांतर 1883 साली केले आहे. यात सर्वात जास्त भाषांतरे हॅम्लेटची झाली आहेत. त्या खालोखाल किंग लियरची झाली आहेत. मराठी माणूस स्वत:ला जगाशी जोडत आला आहे याचा हा पुरावाच म्हणावा. ‘शेक्सपिअर आणि मराठी नाटक’ असे संशोधन करून प्रा.डॉ. लता मोहरीर यांनी मोठा ग्रंथच लिहीला आहे. त्यात त्यांनी या मराठी रूपांतरांचा बारकाईने अभ्यास केला आहे.
शेक्सपिअरची भाषा कळायला कठीण. अगदी ज्यांना इंग्रजी समजते त्यांनाही ते वाचायला जड जाते. नाटकाचे मुळाबरहूकूम भाषांतर करावे तर ती नाटकाची परिभाषा अवघड असल्याने सामान्य वाचकांना समजत नाही. यावर उपाय म्हणजे या नाटकांचे गोष्टीत रूपांतर करणे. प्रभाकर देशपांडे साखरेकर यांनी शेक्सपिअरच्या सर्व 37 नाटकांचे मराठीत कथा रूपांतर केले. आणि ही सर्व नाटके 5 खंडांमध्ये मराठी वाचकांसाठी कथारूपात उपलब्ध करून दिली. शेक्सपिअरचा अतिशय खोलात जावून अभ्यास करणारे प्रभाकर देशपांडे यांनी तर मॅक्बेथ नाटकाच्या दुसर्या अंकात शेतकर्यांच्या आत्महत्येचा उल्लेख दाखवून देवून आजच्या आपल्या समस्यांशी शेक्सपिअर कसा भिडतो हेही सिद्ध केले आहे.
शेक्सपिअरच्या काळात महाराष्ट्रात काय घडत होते? संत एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जिर्णाद्धार करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत सिद्ध केली (इ.स.1584). किंवा भारताच्या पातळीवर काय घडत होते? महाराणा प्रताप अकबर बादशहाशी हळदीघाटीत लढत होता (इ.स. 1574). विजयनगरचे साम्राज्य लयास गेले (इ.स.1565). शहाजी राजांचा जन्म (इ.स.1600).
शेक्सपिअरने मराठी माणसांना जवळपास 150 वर्षांपासून कसा मोह पाडला आहे याचा अभ्यासकांनी शोध घेतला आहे. शेक्सपिअरच्या नावानं ‘सर्वांसाठी शेक्सपिअर’ हा उपक्रम 16 वर्षांपासून ज्येष्ठ साहित्यीक विचारवंत कार्यकर्ते विनय हर्डीकर पुण्यात चालवतात. औरंगाबाद शहरात गेल्या दोन वर्षांपासून शेक्सपिअर महोत्सव परिवर्तन या संस्थेच्या वतीने भरविल्या जातो आहे. कलेच्या पातळीवर मराठी माणसाला जागतिक श्रेष्ठ दर्जाच्या नाटककाराशी स्वत:ला जोडून घ्यावं वाटतं आहे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.
शेक्सपिअर हा केवळ नाटक लिहून मोकळा होणारा लेखक नाही. शेक्सपिअरची नाटकं त्याच्या देखतच साजरी झाली आहेत. इतकंच नाही तर त्याने नाटकाच्या सादरीकरणासाठी ग्लोब नावाचे नाट्यगृह भागीदारीत विकत घेतले आणि यशस्वीरित्या चालवून दाखवले.
नाटककार दिग्दर्शक विजय केंकरे यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचा आपल्या इतरही नाटकांवर प्रभाव असल्याचे सोदाहरण दाखवून दिले आहे. अगदी एकच प्याला सारख्या नाटकांवरही शेक्सपिअरचा प्रभाव आहे. नुसते नाटकच नव्हे तर काही महान मराठी कविंच्या कवितांही शेक्सपिअरच्या नाटकांत घट्ट बसाव्यात अशा आहेत. बालकवींचे उदाहरण विजय केंकरे यांनी दिले आहे. यावरून शेक्सपिअरचे कालातीत असणे व सर्वव्यापी असणे सिद्ध होते.
मराठीतील चार कवींना शेक्सपिअरचा मोह पडला. पहिले कवी म्हणजे राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज. दुसरे कवी म्हणजे कुसुमाग्रज, तिसरे विंदा करंदीकर आणि चौथे मंगेश पाडगांवकर. या तिघांनीही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या शेक्सपिअरची नाटके मराठीत आणली.
शेक्सपिअर मराठीत आला पण तो मुळाबरहूकूम आला असे नाही. विजय केंकरे सारखा नाट्यकर्मी जबाबदारीने असे वक्तव्य करतो की विंदा करंदीकरांनी केलेले ‘किंग लियर’ चे भाषांतर सोडले तर इतर भाषांतरे मुळ शेेक्सपिअर जवळ पोंचत नाहीत. विनय हर्डीकर यांनीही आपल्या शेक्सपिअरच्या अभ्यासातून हाच निष्कर्ष काढला आहे. इतरांनी जोरकस प्रयत्न केले पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
विजय केंकरे अतिशय वेगळा मुद्दा शेक्सपिअरच्या 400 व्या पूण्यतिथीच्या निमित्ताने समोर आणतात. शेक्सपिअर आता मराठी झाला आहे. तेंव्हा त्याच्या नाटकाचा बाह्य आराखडा तसाच ठेवून आपण त्याचे मराठीकरण करून ही नाटके मंचावर आणली पाहिजेत.
एक खरेच विचार करण्यासारखी बाब आहे. तमाशांमध्ये आपल्याकडे वगाच्या स्वरूपात नवर्याला धोका देणारी पतिव्रता, किंवा बायकोला फसविणारा नवरा, राणीवर नजर ठेवणारा प्रधान, स्वार्थासाठी खुन करणारे जवळचेच लोक अशा कितीतरी व्यक्तीरेखा आलेल्या आहेत. वगाच्या मोकळ्या ढाकळ्या शैलीत हे सारे आपण बघितले आहे. शिवाय शेक्सपिअरचा नर्म विनोद तर आपल्याला वगात आणणे सहज शक्य आहे.
विजय केंकरे सुचवतात त्या अनुषंगाने शेक्सपिअरची कथानके घेवून त्याला आपल्या वगाच्या शैलीत सादर करण्याचा विचार करणे गरजेचे आहे.
पुणे असो किंवा औरंगाबाद असो इथे शेक्सपिअर महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद आश्चर्यकारक असा आहे. शेक्सपिअरची मराठीतील कथा रूपांतरे लोक मोठ्या आवडीने विकत घेवून वाचत आहेत. शेक्सपिअरच्या हॅम्लेटचा एकपात्री प्रयोग करण्याचेही धाडस सहस्रबुद्धे या मराठी माणसाने केले आहे.
मंचावर सादरीकरण करणार्या नटांना वेगळ्या आव्हानात्मक संहिता मिळत नाहीत. मिळाल्या तर व्यावसायिक नट छोट्या गावांमध्ये यायला तयार नाहीत. शेक्सपिअरने आपल्या काळात नुसती नाटके लिहून न थांबता नाट्यगृह खरेदी केले. तिथे नाटके होण्याची व्यवस्था केली. त्याच धर्तीवर आता मराठीतील तरूण होतकरू नट, रंगकर्मी व रसिक यांनी एकत्र होवून जागजागची रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी चळवळ उभारली पाहिजे. आपल्याकडे पूर्वी छोट्या छोट्या गावांमधून हे होत होते. मधल्या काळात टिव्हीवरच्या स्वस्त फुकट कळाहीन करमणुकीने सारे बंद पडले. लोक आता त्या पडद्याला कंटाळले आहेत. रंगभूमीसारखा जिवंत अनुभव टिव्हीचा पडदा देवू शकत नाही. तेंव्हा शेक्सपिअरच्या 400 व्या स्मरणदिनी, आपली जुनी तमाशातील वगाची परंपरा आठवून आपण मराठी रंगभुमीवर सळसळता उत्साह येईल अशी कृती करण्याचा संकल्प करू या.
श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.