उरूस, दै. पुण्य नागरी, 6 सप्टेंबर 2015
एखाद्या लेखकाच्या स्मृतीप्रित्यर्थ मोठ मोठे साहित्यीक सोहळे व्हावेत ही फार चांगली गोष्ट आहे. बी. रघुनाथ यांना हे भाग्य लाभले. गेली 26 वर्षे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ औरंगाबाद शहरात ‘बी. रघुनाथ स्मृतिसंध्या’ हा उपक्रम नाथ उद्योग समुह व परिवर्तन या संस्थेच्यावतीने साजरा केला जातो. एका साहित्यीकाला बी. रघुनाथ यांच्या नावाने पुरस्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जातो. हे खरोखर कौतुकास्पद आहे की गेली 26 वर्षे हा उपक्रम चालू आहे.
बी. रघुनाथांच्या नावाचा पुरस्कार भास्कर चंदनशीव, रंगनाथ पठारे, नागनाथ कोत्तापल्ले, फ.मुं.शिंदे, बाबु बिरादार, निरंजन उजगरे, ललिता गादगे, श्रीकांत देशमुख, भारत सासणे, नारायण कुलकर्णी कवठेकर, प्रकाश देशपांडे केजकर, बब्रुवार रूद्रकंठावार, राजकुमार तांगडे, रमेश इंगळे उत्रादकर यांना देण्यात आला आहे. यावर्षी हा पुरस्कार कादंबरीकार चित्रकार प्रकाशक ल.म.कडु यांच्या ‘खारीच्या वाटा’ या कादंबरीस देण्यात येणार आहे. ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
ग्रेस यांच्या कवितांवरचा ‘साजणवेळा’सारखा चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे यांनी सादर केलेला कार्यक्रम किंवा मराठी कवितांवरचा ‘रंग नवा’ हा मुक्ता बर्वे यांचा कार्यक्रम, रविंद्रनाथ टागोरांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचे दर्शन घडविणारा कार्यक्रम, अंबाजोगाईच्या वैशाली गोस्वामी यांनी सादर केलेला दासोपंतांच्या रचनांवरचा कार्यक्रम, बब्रुवान रूद्रकंठावार यांच्या उपहास लेखांचे अभिवाचन असे कितीतरी सरस सांस्कृतिक कार्यक्रम या उपक्रमात सादर झाले आहेत.
परभणीला बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चार दिवसांचा ‘बी. रघुनाथ महोत्सव’ साजरा होतो. इ.स.2002 मध्ये बी. रघुनाथ यांचे एक स्मारक परभणीत उभारल्या गेले. वैधानिक विकास मंडळाकडून मिळालेल्या निधीतून सभागृह, पुतळा व वाचनालयासाठी एक इमारत असे हे स्मारक आहे. कवी ग्रेस यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम सरकारी होता. शासनाचे पैसे आले तेंव्हा सगळ्यांना उत्साह होता. पण एकदा का उद्घाटन झाले, की सगळे मग विसरून गेले. दुसर्यावर्षी बी. रघुनाथ स्मारकाकडे फिरकायला कोणी फिरकले नाही.
परभणी शहरातील काही संस्था एकत्र येवून त्यांनी 2003 पासून ‘बी. रघुनाथ महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय घेतला. हे वर्षे नेमके बी. रघुनाथांच्या सुवर्णस्मृतीचे वर्षे होते. त्यांच्या देहांताला 50 वर्षे पुर्ण होत होती. यात शासनाची कुठलीही मदत नव्हती. फक्त जे स्मारक शासनाने 1 कोटी खर्च करून उभारले आहे त्या परिसरात हा उपक्रम व्हावा असा प्रस्ताव त्यांनी दिला. नगर पालिकेने एका वर्षी पुरतं ते मान्य केलं. परत पुढच्या वर्षी लालफितीचा कारभार आडवा यायला लागला. मग या संस्थांनी कंटाळून शासनाचा नादच सोडून दिला. परभणीला शनिवार बाजार परिसरात गणेश वाचनालय ही 114 वर्षे जूनी संस्था आहे. त्या संस्थेने बी. रघुनाथ महोत्सवाचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दाखवली. पहिल्यावर्षीच्या नियोजनातही याच संस्थेने पुढाकार घेतला होता. गणेश वाचनालयाच्या परिसरात हा उपक्रम होण्यात एक औचित्यही होते. याच परिसरात बी. रघुनाथ काम करायचे. सार्वजनिक बांधकाम विभागात एक कारकुन म्हणून काम करत असताना 7 सप्टेंबर 1953 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले ते इथेच.
ज्या परिसरात त्यांचे निधन झाले त्याच परिसरात हा महोत्सव आता होतो आहे. कविसंमेलन, व्याख्यान, चर्चा, लघुपट, संगीत अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साहित्य सांस्कृतिक जागर केला जातो.
औरंगाबादला होणारा ‘बी.रघुनाथ स्मृती संध्या’ आणि परभणीत होणारा ‘बी. रघुनाथ महोत्सव’ हे दोन्हीही कार्यक्रम लोकांनी स्वयंस्फुर्तपणे सुरू केले आणि त्यांना आजतागायत उत्स्फुर्त असा प्रतिसादही लाभला आहे. शासनाच्या मदतीने कित्येक उपक्रम एकतर ढासळत गेले आहेत, संपून गेले आहेत किंवा त्यांची रया गेलेली आहे. ते केवळ उपचार म्हणून साजरे केले जातात. पण या उलट ज्या उपक्रमांमध्ये लोकांचा सहभाग आहेत ते टिकले आहेत. त्यांच्यामुळे त्या भागातील सांस्कृतिक चळवळीला गती प्राप्त झाली आहे.
बी. रघुनाथ यांचे दूर्मिळ झालेले सर्व साहित्य (7 कादंबर्या, 60 कथा, 125 कविता, 24 ललित लेख) 1995 साली परभणीला संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशीत करण्यात आले. अभ्यासकांना हे आता उपलब्ध आहे. बी. रघुनाथांच्या वेळी गणपतीमधील मेळे म्हणजे सांस्कृतिक उत्सव असायचे. त्या मेळ्यांसाठी बी. रघुनाथ स्वत: गाणी लिहून द्यायची. गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर त्या गाण्यांना चाली देवून ही गाणी मेळ्यात सादर करायचे.
आजच्या काळात सांस्कृतिक उपक्रमांमध्ये प्रतिभावंत साहित्यीकांनी कलाकारांनी सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे. औरंगाबादला नाटककार अजीत दळवी सारखे प्रतिभावंत या उपक्रमामध्ये सक्रिय सहभागी असतात, परभणीला कवीवर्य इंद्रजीत भालेराव सक्रिय असतात ही एक चांगली बाब आहे. एरव्ही अव्वल दर्जाचे प्रतिभावंत असल्या आयोजनांपासून हातभर अंतर राखून असतात. प्रतिभावंत दूर राहिल्याने एक मोठे सांस्कृतिक नुकसान होते हे लक्षात घेतले पाहिजे.
बी. रघुनाथ सारख्या कविच्या नावाने साहित्यक मेळावे साजरे होतात त्याला अजून एक वेगळा पैलू आहे. हा लेखक केवळ आपल्याच विश्वात रमणारा नव्हता. आजूबाजूच्या परिस्थितीची अतिशय बारीक अशी जाण त्यांना होती. स्थानिकच नव्हे, देशातील आणि परदेशातीलही एकूण परिस्थितीबाबत त्यांचे आकलन अतिशय चांगले होते. दुसर्या महायुद्धानंतरच्या परिणामांवर लिहीलेली ‘म्हणे लढाई संपली आता’ सारखी कादंबरी असो की ‘आडगांवचे चौधरी’ ही वतनदारी व्यवस्था ढासळत असल्याचे चित्रण करणारी कादंबरी असो, ‘जनता लिंबे टाकळी’ सारख्या समाजजीवनाचे छेद घेणार्या कित्येक कथा असो ‘आज कुणाला गावे’ सारख्या कविता असो. हा लेखक आपली नाळ कायम समाजजीवनाशी जोडून ठेवतो हेच दिसून येते.
महायुद्ध संपले, देशाला स्वातंत्र्य मिळाले, मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. पण सामान्यांच्या जीवनात फारसा फरक पडला नाही. गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला अशीच परिस्थिती काही प्रमाणात जाणवायला लागली. तेंव्हा बी. रघुनाथ सारखा प्रतिभावंत याची लगेच नोंद घेतो. स्वातंत्र्याच्या प्राप्तीने तो हुरळून जात नाही. ‘रस्ता नागर झाला’ या कवितेत बी. रघुनाथ लिहीतात
रस्ता नागर झाला
फिरल्या वेधित प्रथम दुर्बिणी
पडझड कोठे, नवी बांधणी,
हात जाहले कितीक ओले
जमवित माल मसाला
स्तंभ दिव्यांचे समांतराने
पथीं रोविले आधुनिकाने
पण नगरांतिल रात्र निराळी
ठाउक काय दिसाला ?
गणवेशांतील पिळे मिशांचे
वाहक रक्षक सुशासनाचे !
रक्षित पथ तरि खिसेकापुंच्या
येई बहर यशाला
आताची नौकरशाही म्हणजे एकूण लेाकसंख्येच्या केवळ तीन टक्के लोक 80 टक्के महसूल खावून टाकतात शिवाय काम तर काही करतच नाहीत. पोलिसच गुन्हेगारांना सामिल असतात याचे चित्रण 60 वर्षांपूर्वी बी. रघुनाथ यांनी करून ठेवले हे किती विलक्षण म्हणावे.
7 सप्टेंबर हा बी. रघुनाथ यांचा 62 वा स्मृति दिन. आपल्या लेखणीतून त्या काळच्या समाजजीवनाचे स्पष्ट चित्रण करून ठेवणार्या, आपल्या भोवतालच्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविणार्या, अतिशय हालाखीची परिस्थिती असतानांही तिची तक्रार न करता वाङमयाची निर्मिती करणार्या या प्रतिभावंत लेखकाला अभिवादन !
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575