दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 21 ऑक्टोबर 2014
चित्रपटातील प्रसंग आहे. हेमलकसा या आदिवासी भागात मलेरियाची साथ येते. भराभर आदिवासी मृत्यूमुखी पडायला लागतात. एक आदिवासी बाई कडेवर छोटं लेकरू घेवून ‘माझ्या पोराला वाचवा’ म्हणत रडत ओरडत येते. प्रकाश आमटे तिला शांत करतात. तिच्या बाळावर उपचार चालू करतात. पोराला लावायला सलाईन नसते. आता काय करायचे असा विचार करत असताना त्यांचा सहकारी एक सलाईनची बाटली घेवून येतो. ही कुठून आणली? असा प्रश्न विचारताच तो उत्तरतो की ज्या म्हातार्याला ही लावली होती तो मेला आहे. आता हीचा त्याला काय उपयोग?
रात्रभरच्या वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत तो मुलगा वाचतो. त्याची आई पहाटे म्हणायला लागते, ‘याच्याकडे थोडावेळ लक्ष द्या. मी जरा जावून येते.’ आमट्यांचा सहकारी तिला जाऊ देत नाही. आत्ताच कुठे मुल वाचले आहे. आता तू कुठू निघालीस. पण ती बाई अस्वस्थपणे चुळबुळ करत राहते. शेवटी न राहवून ती प्रकाश आमटेंच्या टेबलापाशी येते. तेही दोन रात्रींपासून न झोपता रूग्णांची सेवा करत थकून गेले असतात. ही बाई भकास डोळ्यांनी उदास स्वरात सांगते, ‘साहेब मला जावून येवू द्या. जरा या लेकराकडे लक्ष ठेवा. माझा नवरा आधीच मेला होता. दोन लेकरं वाचावी म्हणून त्यांना घेवून पळत निघाले. एक लेकरू वाटेतच मेलं. त्याला झाडाखाली ठेवून आले. जनावरांनी खावू नये म्हणून त्याच्यावर काटे कुटे टाकून आले. आता जावून त्याला मातीआड करून येते. तोवर तूमी याकडे लक्ष द्या.’
या प्रसंगावर काय भाष्य करणार? अशाप्रसंगी व्यक्त करायची भाषा अजून जन्माला यायची आहे. आपण चित्रपट पाहतो आहोत, आजूबाजूला इतके लोक बसलेले आहेत हे सारे विसरून आपल्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वहायला लागतात. चित्रपट म्हणून या प्रसंगाची काय चिकित्सा करायची ते समीक्षक करो पण एक सामान्य प्रेक्षक मात्र या दृश्याने हादरून जातो.
‘डॉ. प्रकाश बाबा आमटे : अ रिअल हिरो’ हा चित्रपट सामान्य प्रेक्षकांना हलवून सोडतो. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता, आरडा ओरडीची भाषा न वापरता, भडकपणा न करता दिग्दर्शक समृद्धी पोरे हीने ही किमया साधली आहे.
नाना पाटेकर यांच्यावर विचित्रपणाचा, आक्रस्ताळी भाषा वापरण्याचा जो आरोप एरव्ही केला जातो तो पूर्णपणे खोडून काढत आपण कसे उच्च दर्जाचे अभिनेते आहोत हेच त्यांनी सिद्ध केले आहे. याचा उत्तम पुरावा म्हणजे चित्रपटातील एक प्रसंग. आपल्या आईवर अत्याचार करणार्या पोलिस अधिकार्याचा खुन करून सुड उगवणारा पुरू हा छोटा मुलगा आमटे दांपत्याच्या हाती लागतो. या मुलाला त्याचे आयुष्य या मार्गाने वाया जाईल म्हणून ते समजून सांगतात. आमटेंच्या घराबाहेर नक्षलवादी येवून बसतात आणि मागणी करतात की हा मुलगा आमच्या ताब्यात द्या. तो आम्हाला जगू देणार नाही. या सगळ्या प्रसंगात नाना पाटेकर केवळ एकच वाक्य बोलतो ‘समझो वा मर गया’. ते नक्षलवादी निघून जातात. पुढे हा मुलगा मोठा होतो, परदेशात मोठ्या नौकरीवर लागतो. हा सगळा प्रसंग नाना पाटेकरने एका वाक्यावर तोलला आहे.
प्रकाश आमटे यांनी हेमलकश्यात उभे केलेले काम त्यांना मॅगेसेस पुरस्कार देवून गेले. तेंव्हा इतर सर्व गोष्टींना फाटा देवून नेमकेपणाने हाच विषय परिणामकारक पद्धतीने समृद्धी पोरे यांनी चित्रपटातून समोर आणला आहे.
आदिवासींसाठी काम करण्यासाठी एनजीओ चालविणे यावर मोठी टिका बर्याचदा केली जाते. अशा एनजीओजना मिळणारा मोठा परदेशी निधी या या टिकेचा मुख्य विषय असतो. बर्याच एनजीओ बाबत हे खरेही आहे. पण प्रत्यक्षात असे काम किती अवघड आहे. एक तर पुरेसा पैसा मिळत नाहीच, शिवाय सरकारी पातळीवरही अशा कामांची कशी उपेक्षा होते, अडवणूक होते याचे फार चांगले चित्रण चित्रपटात केल्या गेले आहे.
काही अनाथ, जखमी झालेले प्राणी आमटेंच्या लोकबिरादरी प्रकल्पात गोळा होतात. त्यांचे एक अनाथालय आपसुकच तयार होते. त्याची पहाणी करायला आलेला सरकारी अधिकारी मठ्ठ शासकीय व्यवस्थेचा नमुनाच असा दाखवला आहे जे की वास्तव आहे. ज्याला डिअर म्हणजे हरिण हे स्पेलिंगही कसे माहित नसते. ज्याची भाषा कशी अरेरावीची असते हा प्रसंग फार चांगला रंगवला आहे.
आदिवासींसाठी काम करताना अनंत अडचणी येतात तसे आनंदाचे क्षणही येतात. एका जख्ख म्हातारीच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असतो. ती महिनाभरापासून उपचारासाठी चकरा मारीत असते. पण शहरातून कोणी डॉक्टर तिच्यावर उपचारासाठी येत नाही. आणि तिला बाहेर नेणे शक्य नसते. शेवटी डॉ. प्रकाश आमटे स्वत: नेत्ररोग तज्ज्ञ नसताना तिच्यावर उपचार करण्याचे धाडस करतात. तिचे ऑपरेशन होते. तिच्या डोळ्यावरची पट्टी काढताना सगळे श्वास रोखून पहात राहतात.आणि जेंव्हा ती सुरकूतल्या चेहर्याची म्हतारी दृष्टी आल्याच्या आनंदाने आपल्या हातातील लाकडी चमचा उचलून माडिया भाषेत काहीतरी उद्गार काढते तेंव्हा प्रेक्षकही त्या आनंदात सहज सामिल होवून जातात.
आजूबाजूचा निसर्ग आणि त्यात राहणारे अदिवासी यात रमणारे आमटे दांपत्यही निसर्गात मिळून मिसळून जातात. त्यांचे जे घर चित्रपटात दाखवले आहे ते फार सुंदर आणि त्यांच्या निसर्गप्रेमाची साक्ष देणारे आहे. त्यांची मुलंही पुढे यातच रमून जातात. आमटेंच्या नातवाने शाळेत पाळीव प्राणी कोणते असा प्रश्न विचारल्यावर ‘वाघ, सिंह’ असं लिहीलं आणि मास्तरांनी त्याला कसे गुण दिले नाहीत. मग आमटे यांनी शाळेत जावून सांगितलं की खरंच आम्ही हे प्राणी पाळले आहेत असं नव्हे तर ते आमच्या कुटूंबाचाच कसा भाग आहेत. हा प्रसंग मोठा मजेदार उतरला आहे.
सगळ्या चित्रपटभर प्रकाश आमटेंच्या थटेखोर स्वभावाची छाया पसरली आहे. हे श्रेय अर्थातच नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे आहे. मंदा आमटेंचे काम करताना सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या हसतमुख चेहर्याने चांगली साथ दिली आहे. सगळ्या चित्रपटभर सोनाली कुलकर्णीच्या स्वच्छ परिटघडीच्या साड्या मात्र थोड्याशा खटकतात. थंडीत कुडकुडणार्या लहान मुलाला पाहून बीनबाह्याची बंडी आणि खाली चड्डी अशा साध्या वेषातच राहण्याचा संकल्प करणार्या प्रकाश आमटेंसोबत काम करताना आणि त्यातही वीजही न पोचलेल्या हेमलकश्यात वावरताना मंदाताईंचे कपडेही मळले असतील किंवा त्यांना एक साधेपणा आपोआपच आला असणार. पण ही फार छोटी गोष्ट आहे. आमटे नदीत आंघोळ करताना त्यांच्या बरोबर वाघही आंघोळ करतो. हा वाघ खरा नसून तो ऍनिमेशनने बनवला आहे. हे लक्षात येतं. पण यानं फार काही बिघडत नाही. खरं तर या चित्रपटाकडे चिपटाचे निकष लावून पाहता येणारच नाही. आमटेंच्या जिवनाची सामाजिक बाजू प्रकर्षाने मांडण्याचा काम हा चित्रपट करतो हेच महत्त्वाचे आहे.
एरवी काही करत नाही म्हणून ज्याच्यावर टिका होते त्या महाराष्ट्र शासनाने या चित्रपटाला करमुक्त करून एक चांगले काम केले आहे. मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाला मोठी गर्दी करून आपल्या सामाजिक जाणिवांवर शिक्कामोर्तब केले आहे.
चांगले चरित्रात्मक चित्रपट मराठीत फार कमी आहेत. नुकताच जब्बार पटेल यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर आणि चंद्रकात कुलकर्णी यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सुमार दर्जाचा चरित्रपट काढून मराठी प्रेक्षकांना नाराज केले आहे. अतिशय ताकदीच्या या दिग्दर्शकांनी अपेक्षाभंग केला असताना समृद्धी पोरे या नविन तरूणीने एक अतिशय चांगला चरित्रपट द्यावा हा अनपेक्षीत सुखद असा धक्का आहे. चित्रपटात एकच गाणे आहे. लहान मुलांना शिकविण्याचा प्रयास करताना हे गाणे चित्रित झाले आहे. ही खरं म्हणजे एक प्रार्थना आहे. ती चांगली आणि समर्पक अशीच आहे. बाकी चित्रपटात गाण्यांना फारसा वावही नाही. बर्याचदा चरित्रपट कंटाळवाणे होत जातात. पण इथे तसं काही दिग्दर्शकिने होवू दिलं नाही. प्रकाश आमटे यांच्या जिवनातील निवडक प्रसंग घेवून चित्रपटाची गती चांगली ठेवली आहे.
साध्या भाषेत आदिवासींच्या प्रश्नांची दाहकता आपल्यासमोर हा चित्रपट मांडतो. नक्षलवाद्यांची समस्या अतिशय त्यांची बाजू न घेता पण त्यांच्या बाजूचा विचार करून इथे मांडली आहे. शासनाने करमुक्त केलेला हा चित्रपट मराठी प्रेक्षकांनी जरूर पहावा.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575