Thursday, September 11, 2014

उंडणगाव : रसिकता जपणारे गाव !

दै. पुण्यनगरी, उरूस, गुरुवार ११ सप्टेंबर २०१४ 


अजिंठ्याच्या डोंगरातील जगप्रसिद्ध लेण्या तर सर्वांनाच माहित आहेत. त्या डोंगररांगांमध्ये इतरही काही रम्य ठिकाणं आहेत हे मात्र बर्‍याच जणांना माहित नाही. अंतूर, वाडी, जंजाळा असे ऐतिहासिक किल्ले आहेत. रूद्रेश्वर सारखी सुंदर पुरातन मंदिरं आहेत. हळद्याचा निसर्ग सुंदर घाट आहे. याच परिसरात टुमदार संपन्न गावं वसलेली आहेत. या परिसरातील पाच गावं पाच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. पालोद राजकारणासाठी, भराडी व्यापारासाठी, अन्वा शेतीसाठी, सोयगाव नाटकासाठी आणि पाचवं गाव उंडणगाव. ते प्रसिद्ध आहे रसिकतेसाठी. कला साहित्य संस्कृतीची जोपासना या गावानं मोठ्या रसिकतेनं केली आहे. साहित्यक्षेत्रातील ना.धो.महानोर, अनुराधा पाटील, भगवानराव देशमुख, सरदार जाधव  नाट्य क्षेत्रातील गुरूवर्य असे कमलाकर सोनटक्के ही सगळी माणसं याच परिसरातील. मराठवाड्यातील पहिले एफ.आर.सी.एस. डॉक्टर म्हणून नावाजल्या गेलेले डॉ. शांताराम महाजन याच गावचे. नांदेडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एम.नाईक असो की प्रा. अविनाश महाजन, पत्रकार सुधीर महाजन असो ही सगळी विद्वान मंडळी याच गावची.   

बारा तेरा हजार लोकवस्तीचं उंडणगाव मोठं समृद्ध असं गाव आहे. या गावातील महाजनांचे जुने सागवानी वाडे अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत. आख्खी घोड्याची बग्गी आत यावी अशा उंच कमानी आणि बग्गीतुन घरात सरळ उतरता यावे असे उंच ओटे या वाड्यांना आहेत. 

गावातील तीनशे वर्षांच्या पुरातन बालाजी मंदिरात गणपतीच्या काळात व्याख्यानमाला चालते. मोठ मोठ्या शहरांमधुनही आजकाल सांस्कृतिक उद्बोधनपर कार्यक्रम घेणं मुश्किल होवून बसलं आहे. अशावेळी जुनी रसिकतेची परंपरा पुढे नेत या गावाने ‘मित्रसंघ गणेश मंडळा’च्या माध्यमातून आपली रसिकता जपली आहे. 2007 साली याच गावाने मराठवाडा साहित्य संमेलन मोठ्या झोकात भरवून दाखवले. अखिल भारतीय संमेलनास शोभावी अशी गर्दी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी केली होती. 

मंदिराच्या ओवर्‍यातच एका बाजूला रंगमंच केला जातो. समोरच्या मोकळ्या जागेत, बाजूच्या ओवर्‍यांवर, मागच्या ओट्यावर गावकरी बाया बापडे बसतात. कविसंमेलन, व्याख्यान, कथाकथन अशा कार्यक्रमांना मोठा बहर या ठिकाणी येतो. भगवानराव देखमुख सारखा गोष्टीवेल्हाळ कथाकार, कवी जो की याच परिसरातला आहे त्याच्या वाणीला मोठा बहर या मंचावर उभं राहिला की येतो. तासं न् तास भगवानराव लोकांना खिळवून ठेवतात. आता प्रकृती फारशी साथ देत नसल्यामुळे त्यांचे येणे होत नाही. आता मंदिराचा जिर्णोद्धार होतो आहे. नविन स्वरूपात मंदिर नव नविन सांस्कृतिक आवष्किारासाठी सज्ज होते आहे. 

लोटू पाटीलांनी सोयगावला जी नाट्यचळवळ चालवली त्याचं मोठं कौतुक या गावाला आहे. या परिसरातही नाटकं साजरी व्हायची. अगदी पार 1949 ला साजर्‍या झालेल्या नाटकाची तेंव्हाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात आजही सार्थक खुल्लोडकर सारख्या तरूण कार्यकर्त्याने मोठ्या उत्साहात जपून ठेवली आहे.

या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव थकतच नाही. जुनी लोकं बाजूला बसून सल्ला देतात आणि नविन पिढी पुढे येते. या प्रक्रियेतून उपक्रमांची परंपरा पुढे चालू राहते. जुन्या काळातील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवावी म्हणून 1982 साली ‘मित्रसंघ गणेश मंडळाची’ स्थापना करण्यात आली. रमेश नाईक, कमलाकर खोंडे, भगवान तबडे, सुधीर दाणेकर, डॉ. सतिष खुल्लोडकर या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी हे रोपटे वाढावे म्हणून अपार मेहनत घेतली. त्यावेळपासून काम करणारे प्रकाशराव कुलकर्णी आजही त्या आठवणी सांगतात आणि तरूणाच्या उत्साहाने कार्यक्रमांत वावरतात. पुढे 1998 मध्ये रमेश नाईकांच्या दुर्देवी निधनानंतर त्यांचे नाव या व्याख्यानमालेला देण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला. ऍड. किरण नाईक, मिलींद महाजन, अनिल लांडगे आणि अनिरूद्ध नाईक या तरूणांनी मागच्या पिढीपासून प्रेरणा घेत व्याख्यानमालेची धुरा पुढे चालविली. डॉ. खुल्लोडकर दरवर्षी शाडुच्या मातीची गणेशमुर्ती स्वत: तयार करतात. अजूनही डॉक्टरांचा उत्साह टिकून आहे. महानोरांसारख्या मोठ्या कवीने इथे हाजेरी लावण्यात नेहमीच धन्यता मानली आहे. या मातीमुळे माझ्यातल्या कवीची निकोप वाढ झाल्याचा सार्थ अभिमान त्यांनी इथेच प्रकट केला. 

वास्तुरचनाकार असलेल्या अनरिूद्ध नाईक यांनी एक वेगळा प्रयोग या परिसरात केला आहे. डोंगरात जमीन घेवून तेथे एक कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. गणपतीच्या मुर्तीची स्थापना करून यास परिसराला गणेशवाडी हे नाव दिले आहे. उंडणगावला भेट देणार्‍या कवी साहित्यीक कलाकारांना बालाजी मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमाइतकीच गणेशवाडीची ओढ लागून राहिलेली असते. धनंजय चिंचोलीकर सारखा लेखक आवर्जून आपल्या बागेत जोपासलेले रामफळाचे झाड इथे लावण्यासाठी घेवून येतो. रमेश इंगळे उत्रादकरसारखा मोठा कवी पाहुणा म्हणून बोलावून सन्मान केलात त्यापेक्षा झाड लावण्याचा सन्मान मोठा वाटतो हे मन:पुर्वक सांगतो.

गेली तीन वर्षे एक पायंडा या गावाने पाडला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे मुळ रहिवासी असलेल्या साहित्यीक कलावंत ज्यांचा इतरत्र पुरस्कार देवून गौरव केला गेला त्यांना बोलावून ‘माहेरचा आहेर’ इथे दिला जातो. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीचे असलेले धनंजय चिंचोलीकर यांना बी. रघुनाथ पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना पहिला माहेरचा आहेर सन्मान देवून गौरविण्यात आले. दुसर्‍या वर्षी फुलंब्री तालुक्यातील जळगाव (मेटे) गावचे रवी कोरडे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. त्यांचा गौरव करण्यात आला. यावर्षी फुलंब्री मधीलच गणोरीचे पद्मनाभ पाठक यांची निवड करण्यात आली. व्यावसायिक नाट्य निर्माता संघाने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील स्पर्धेत दासू वैद्य लिखीत ‘रिअल इस्टेट’ या दीर्घांकासाठी पद्मनाभ पाठक यांना दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक मिळाले. प्रसिद्ध नाटककार अजीत दळवी यांच्या हस्ते हा ‘माहेरचा आहेर’ सन्मान पद्मनाभ पाठक यांना प्रदान करण्यात आला.

उंडणगावचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच गावकरी हा आपला कार्यक्रम आहे, हा आपला पाहुणा आहे अशा रितीने निमंत्रीत पाहुण्यांची बडदास्त ठेवत असतात. गणेशवाडीत मुक्कामाला असलेल्या कवीला पहाटे वयस्क बापुकाका नाईक मोठ्या उत्साहाने आपल्या हातचे चविष्ट मक्याचे वडे करून घावू घालतात. त्यात एक जिव्हाळा दडलेला असतो. 

विजय नाईक, सार्थक खुल्लोडकर या तरूण मुलांनी मोठ्या उत्साहाने ही धुरा आता आपल्या खांद्यावर घेतली आहे.

हा सगळा परिसर मोठा नयनरम्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी कलाकारांनी अजिंठा लेणी निर्माण केली ती केवळ इथे चांगला दगड सापडला म्हणून नाही. या परिसराचे गारूड त्यांच्यावर निश्चितच झाले असणार. म्हणून तर ही लेणी इतकी सुंदर रंगवली गेली. याच मातीतील सरदार जाधव सारख्या चित्रकाराने आपल्या चित्रातून हा परिसर जिवंत करण्याची गरज आहे. 

इथले किल्ले दुर्लक्षीत राहिले आहेत. त्यांची किमान डागडुजी केली पाहिजे. वाडिच्या किल्याच्या टोकावरून कमानीमधून दिसणारे दृश्य हा एक विलक्षण अनुभव आहे. या परिसरातील तळे तर अप्रतिम सौंदर्याने नटलेले आहेत. निळी, जांभळी, लालसर पिवळी अशी सुंदर गवत फुलं गणेशवाडीच्या पठारावर आहेत. मोर फार मोठ्या संख्येने या परिसरात आहेत.मागच्यावर्षी वाडीच्या किल्ल्याजवळ एका वस्तीत आम्हाला कोंबड्यांसोबत मोर पाळलेला आढळून आला. माणसाळलेल्या या मोराने अप्रतिम असे नृत्य करूत आपल्या डौलदार पिसार्‍याचे मनोहारी दर्शन घडविले. दासू वैद्य सारखा लोकप्रिय कवी, शशांक जेवळीकर सारखा उच्चपदस्थ अभियंता, श्रीकृष्ण उमरीकरसारखा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार आपली व्यवधानं बाजूला सारून या परिसरात गुुंगून जातात. या परिसरातील सौंदर्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.  

या परिसरातील रसिकता गावकरी मोठ्या निष्ठेने जपत आहेत. गरज आहे ती साहित्यीक कलाकारांनी त्यांना प्रतिसाद देण्याची.
              
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

1 comment:

  1. उत्तम. वाचून, या ठिकाणास भेट देण्याची ओढ लागली आहे.

    ReplyDelete