Tuesday, September 23, 2014

प्लॅस्टिकचा कचरा... परत वापरा !!


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 23 सप्टेंबर 2014 

एक तिशीतला तरूण मोटारसायकलवरून चालला आहे. मागे त्याची बायको बसली आहे. समोर छोटे मुल आहे. आपली गाडी तो थोड्याश्या मोकळ्या जागी थांबवतो. एक प्लॅस्टिकची खच्चून भरलेली पिशवी मोकळ्या जागेत फेकून देतो आणि वेगाने निघून जातो. या प्लॅस्टिकच्या पिशवीत काही नाही निव्वळ कचरा भरलेला असतो. एका साध्या कृतीने पुढे न सुटणारी प्लॅस्टिकच्या कचर्‍याची समस्या तयार होते हे त्या तरूणाच्या किंवा आपल्या कुणाच्याच गावी नसते.

आज जगभरात आणि विशेषत: भारतात कचरा ही एक फार मोठी समस्या होवून बसली आहे. आणि त्यातही परत प्लॅस्टिक हा विषय जास्त गंभीर आहे. पर्यावरणवादी तर प्लॅस्टिक हे नाव जरी काढले तरी डोक्याला हात लावून बसतात. या प्लॅस्टिकचे काय करावे हे भल्या भल्या माणसांना उमजेनासे झाले आहे. एकीकडे सर्वसामान्य माणसाला परवडते म्हणून त्याचा वापर वाढतो आहे हे खरे आहे. आणि दुसरीकडे या प्लॅस्टिकचे कचर्‍यात रूपांतर झाले की त्याची न सुटणारी समस्या तयार होते हेही खरे आहे. 

छोट्या गावांमध्ये त्या मानाने प्लॅस्टिकचा कचरा कमी तयार होतो. शिवाय गावची एकूण लोकसंख्या, रहदारी, सांड पाण्याचे मर्यादीत प्रवाह हे सारे पाहता कचर्‍याची समस्या तेवढी गंभीर बनतही नाही. पण शहरांमधून मात्र चित्र भयावह बनत चालले आहे. जाग-जागी कचर्‍याचे ढिग साठलेले. प्लॅस्टिच्या पिशव्यांमुळे अडून बसलेले सांडपाणी, मोठ्या नाल्यांचा प्रवाह तुंबून पाणी पुलावरून वहात आहे, नाक आणि जीव मुठीत घेवून लोक आपल्या गाड्या असल्या रस्त्यांवरून नेत आहेत. या कचर्‍यामुळे डासांचे प्रमाण वाढणार आणि डेंग्यूसारखे रोग होणार. औरंगाबादसारख्या शहरातील रूग्णालये डेंग्यूच्या रोग्यांनी तुडूंब भरली आहेत.

आपली एक साधी कृती आपल्याला भयानक समस्येच्या कडेवर नेऊन उभी करते. प्लॅस्टिकचा वापर कमी करा म्हणत सर्वचजण कानीकपाळी ओरडत असतात पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. जर वापर कमी होत नसेल तर निदान निर्माण होणारा कचरा तरी कमी करा. त्याचे नीट व्यवस्थापन करा इतकाच उपाय हाती उरतो. 

अतिशय भयानक समस्या निर्माण करणार्‍या या प्लॅस्टिकचा एक गुणधर्म म्हणजे त्याचा पुनर्वापर करता येवू शकतो. याबाबीकडे औद्यागीक विश्वाने लक्ष दिले आणि आपल्या क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा परत वापरायला सुरवात केली आहे. मोठ मोठ्या उद्योगांमधून कचर्‍याचा, भंगाराचा लिलाव केला जातो. त्याची वर्गवारी करून त्यातून प्लॅस्टिक वेगळे काढले जाते. या प्लॅस्टिकचे बारीक तुकडे केले जातात. या तुकड्यांना वितळून त्याचे दाणे बनविले जातात. या दाण्यांपासून परत प्लॅस्टिकच्या हव्या त्या वस्तू साच्याचा वापर करून बनविल्या जातात. एक्सट्रूजन (extrusion) असे नाव या प्रक्रियेचे आहे. 

सार्वजनिक पातळीवर मात्र या प्रक्रियेचा फारसा विचार केला गेला नाही. आपल्या घरातील कचरा आपण दारात नेवून ठेवतो. तो महानगर/नगर पालिका/पंचायत जसा जमेल तसा उचलते. नाही कोणी उचलला तर आपण दुसरीकडे नेवून टाकतो. कचरा उचलणार्‍या बायका/मुले अशा कचर्‍यातून आपल्या कामाचे काय सापडते याचा शोध घेतात.

कचर्‍यातील वस्तूंची कागद, धातूचे तुकडे, काच आणि प्लॅस्टिक अशी वर्गवारी केली जाते. या सगळ्याला छोटी मोठी किंमत देवून भंगार व्यापार करणारे विकत घेतात. त्यांच्यातही गट पडलेले असतात. प्लॅस्टिकचा व्यापारी, पुठ्ठ्यांचा व्यापारी, खताच्या पिशव्यांचा व्यापारी, कागदाचे व्यापारी, लवालोखंडवाले असे प्रकार आहेत.

कचर्‍याला जर किंमत आहे, त्याची खरेदी होते तर मग कुणालाही साधा प्रश्न पडेल- रस्त्यांवर कचर्‍याचे ढिग तेही विशेषत: प्लॅस्टिकच्या पिशव्या का दिसतात? याचे साधे कारण म्हणजे त्यांना लागलेली घाण. प्लॅस्टिकची भंगारमध्ये खरेदी केली जाते हे खरे आहे. पण हे अर्धसत्य आहे. स्वच्छ केलेले कोरडे प्लॅस्टिक असेल तरच ते स्विकारले जाते. खराब प्लॅस्टिक आणि तेही विशेषत: पिशव्या गोळा करून त्यांना स्वच्छ करून मग ते भंगारवाल्यांना विका इतका वेळ कचरा वेचणार्‍यांजवळ नसतो.  ते सारे झेंगट गळ्यात घेण्यापेक्षा तसेच टाकून दिलेले बरे म्हणून त्याला कोणी हात लावित नाहीत. 

यासाठी एक साधी वाटणारी पण कोणीच न करणारी गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे. आपल्या घरातील बाकीच्या कचर्‍याचे जे करायचे ते करा. तो कचरा कुजतो, त्याचे विघटन होते त्यामुळे ती समस्या तेवढी गंभीर नाही. पण प्लॅस्टिक जे आपल्या घरात आपण वापरून फेकून देतो त्याची जरा काळजी घेतली पाहिजे. विशेषत: प्लॅस्टिकच्या पिशव्या स्वच्छ कोरड्या करून घडी करून ठेवून द्याव्यात. प्लॅस्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात घरात येतात. त्याही नीट विसळून एखाद्या पोत्यात घालून ठेवल्या पाहिजेत. असा स्वच्छ आणि कोरड्या प्लॅस्टिकचा कचरा एका गल्लीमधून, अपार्टमेंटमधून, सोसायटीमधून एकत्र गोळा करण्यात यावा. हे करण्यासाठी जो माणूस काम करतो त्याचा वर्षाचा पगार निघावा इतकी किंमत वर्गवारी केलेल्या स्वच्छ कोरड्या कचर्‍याला मिळू शकते. हे सांगायची गरज आहे. कारण जोपर्यंत एखाद्या बाबीचे अर्थचक्र फिरत नाही तोपर्यंत असे उपाय तात्पुरते बनतात. एकदा का त्याचा खर्च निघावा इतका जरी पैसा मिळू लागला की तो उपक्रम आवर्जून टिकतो. साधं उदाहरण आहे. गावो-गावी, शहरो-शहरी छोटी मोठी मंदिरं उभी राहीली आहेत. त्यासाठी पैसा गोळा होतो. तिथे पुजा करायला पुजारी मिळतो, तिथे गोळा होणारे भाविक आपल्या आपल्यापरीने देणग्या देवून ही सगळी व्यवस्था चालवितात. लोकांची भावनिक अध्यात्मिक गरज आहे म्हणून मग स्थानिक पुढारीही मागे पुढे न पाहता अशा उपक्रमांमध्ये पैसे ओतायला तयार होतात. आजतागायत महाराष्ट्रातील एकही मंदिर पैसे नाहीत, पुजारी नाहीत म्हणून बंद पडलं नाही. याला जसं भावनिक कारण आहे तसेच आर्थिक कारणही आहे हे आपण नजरेआड करतो. 

याचप्रमाणे एकदा का प्लॅस्टिक कचर्‍याचे आर्थिक गणित बसले की ती समस्या सुटायला सुरवात होईल. आज प्लॅस्टिक पिशवी शिवाय इतर भंगार वस्तुंचे गणित बर्‍यापैकी बसले आहे. हे गोळा करणारी, वर्गवारी करणारी, किरकोळ आणि घावूक व्यापार करणारी आणि प्रक्रिया करणारी अशी सगळी यंत्रणा गावोगावी सिद्ध झाली आहे. आपल्या भागात कचरा भंगार गोळा करणार्‍या कुणाही फाटक्या माणसाशी किमान पाच मिनीटं बोलून पहा तूम्हाला लक्षात येईल की ही यंत्रणा कुठल्याही सरकारी मदतीशिवाय कशी सक्षमपणे काम करत आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणून स्वत:ची टिमकी गाजवून घेणार्‍या पुढार्‍यांना, नेत्यांना, बोलघेवड्यांना कल्पनाही नाही की भंगार/कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आजच्या काळात जवळपास सगळेच मुस्लिम आणि दलित आहेत. 

दलितांच्या नावानं गळे काढणारे आणि मुसलमानांना निवडणुकीच्या तोंडावर आरक्षणाचे गाजर दाखविणारे भंगार गोळा करणारे आणि त्यावर प्रक्रिया करून जनतेची सेवा करणारे यांच्यासाठी मदतीची काहीच योजना का राबवित नाहीत? मला तर उलट असे वाटते की आत्तापर्यंत सरकारने यात लक्षच न घातल्यामुळे जे काही काम चालू आहे ते व्यवस्थित चालू आहे. एकदा का यात सुट सबसिडीचा कली शिरला की याही क्षेत्राची वाट लागायला काही उशीर नाही. 

सरकारने नाही पण लोकांनी छोटे छोटे गट करून यात लक्ष देण्याची नितांत गरज आहे. निदान आपल्या घरातील कचरा व्यवस्थित वेग-वेगळा करून आणि कोरडा ठेवून आपण त्यांना मदत करू शकतो. भंगार प्लॅस्टिकवर प्रक्रिया करणार्‍या उद्योगावर लक्ष दिले गेलं पाहिजे. रिसायकल प्लॅस्टिक उद्योगाला करमुक्त करून त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. कचरा गोळा करणार्‍यांना किमान सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि हे लोकांच्या पातळीवर व्हावे, सरकारच्या नव्हे. यात जिथे कुठे सरकार अडथळा बनून पुढे येईल त्याविरूद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. 

पूर्वीच्या काळी आपल्या शेतातील करडी देवून तेल काढून आणायचे. घरातील जुने  कपडे देवून बोहारणी कडून भांडे घेतले जायचे. आताही जुने कपडे देवून संतरंजा घेतल्या जातात. तसं आता प्लॅस्टिकचा कचरा देवून एखादी वस्तू घेण्याची व्यवस्था तयार व्हायला पाहिजे. 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment