Tuesday, September 30, 2014

संगीत बारी - ‘ती’ची कथाच न्यारी

 
दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 30 सप्टेंबर 2014 

मोहनाबाई म्हाळंग्रेकर, सानिया श्रीराम कोलते पाटील, इरफान अब्दूल सत्तार पठाण ही तीन नावं वेगवेगळी आहेत असं कुणालाही वाटू शकेल. प्रत्यक्षात मोहनाबाई या आईच्या पोटी जन्मलेले सानिया आणि इरफान ही सख्खी भावंडं आहेत. दोघांचेही वडिल एकच आहेत. असं सांगितलं तर ऐकणारा बावचळून जातो. पण हे वास्तव आहे. बीनकामी नवर्‍याला धिक्कारून स्वत:च्या जिवावर पोरं मोठं करणार्‍या, आपल्यासोबत कितीतरी नाचणार्‍या मुलींना पोटपाण्याला लावणार्‍या कळवातणी समाजात जन्मलेल्या मेहरून्नीसा उर्फ मोहनाबाई म्हाळंग्रेकर या लावणी कलावंतीणीची ही कहाणी भूषण कोरगांवकर या व्यवसायानं चार्टर्ड अकौंटंट असलेल्या तरूणानं तळमळीनं लिहीली. त्या निमित्तानं मोहनाबाई कार्यरत असलेल्या ‘संगीत बारी’ या कलाक्षेत्राबद्दल इतरही माहिती गोळा केली. कित्येक लावणी कलावंतीणीना ते भेटले. त्यांचे अनुभव शब्दबद्ध केले. या सगळ्यातूनच ‘संगीत बारी’ या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध केले आहे.

मोहनाबाईंच्या निम्मीताने भूषण कोरगांवकर यांनी संगीत बारीची सविस्तर वस्तुनिष्ठ माहिती मराठी वाचकांना दिली आहे. लावणी, तमाशा, वेश्या व्यवसाय यांत नेहमीच गोंधळ घातला जातो. तमाशात नाचणारी बाई ही नक्कीच वेश्या व्यवसाय करणारी असणार असा समज सर्वत्र पसरलेला आहे. या स्त्रीयांनाही घरदार आहे, त्यांच्या जातीत (कळवातू, भातू कोल्हाटी, डोंबारी आदी..) त्यांना इज्जत आहे.  त्यांचे त्यांचे म्हणून काही नितीनियम आहेत (उदा. डोंबारी समाजातील मुलींना लग्न करता येते पण ते डोंबारी जातीतील माणसाशीच करावे लागते) हे फारसे कुणाला माहित नाही.

‘‘संत कान्होपात्रा, मस्तानी या सार्‍यांचे आम्ही वंशज, आम्ही कळवात समाजातले. आम्ही धर्मानं मुसलमान असलो तरी हिंदू धर्माचे सगळे रीतिरिवाज पाळतो. रोजची देवपुजा, श्रावणातली पुजा, गणपती सगळं करतो सोबत दर्ग्यात जावून नमाज बी पढतो. नऊवार नेसून टिकली लावून नाचतो. दर 7-8 हिंदू मुलीमागं एक आमची मुलगी आहे. पण आमच्यात तसे भेदभाव नाहीत. ’’ मोहनाबाईंच्या या साध्या शब्दांमध्ये मोठ मोठ्या समाजसुधारकांना जे व्यक्त करता आलं नाही ते सांगायची ताकद आहे. 

आपले वडिल अब्दूल सत्तार पठाण यांनी कव्वाली शैलीत बांधलेली गझल मोहनाबाई सादर करतात

मुझे फुंकने से पहले 
मेरा दिल निकाल लेना
ये किसी और की है अमानत 
कही साथ जल ना जाये..

श्रोत्यांना वाहवा, माशाअल्लाह अशी दाद देताच त्या थांबतात, ‘‘मला जाळणार नाहीत, दफनच करणार हैत, तरीसुद्धा तूम्हाला सांगते..’’

संगीत बारी म्हणजे स्वत: गाऊन त्यावर नाच करणे. आर्यभुषण थिएटर, पुणे येथे मोहनाबाईंची पार्टी नियमित नाचण्यासाठी असायची. तेथे वेगवेगळ्या संगीत पार्ट्या आपली कला सादर करतात. तिकीट काढून येणार्‍या सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी जशी ही कला खुली आहे तशीच छोट्या बैठकासुद्धा येथे होतात. त्यासाठी ठराविक रक्कम मोजली जाते. त्या बैठकी मर्यादित लोकांनाच प्रवेश असतो. या सगळ्या प्रकारात कुठेही शरिरविक्रीचा व्यवसाय केला जात नाही. शिवाय एखादा ‘मालक’ ठेवला तर त्याशिवाय दुसर्‍या कुठल्याही पुरूषाशी त्या स्त्रीचा संबंध येत नाही. अशा कितीतरी स्त्रियांनी आपल्या आपल्या पुरूषासोबत संबंध ठेवून आपली कला जपली आहे. 
लावणी नृत्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागते. कुठल्याही कलाकाराला रियाजासाठी जे काही करावं लागतं तसंच लावणीसाठीही करावं लागतं. मोहनाबाईंनी आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना लालबागच्या हनुमान थिएटरच्या आठवणी सांगितल्या आहेत. ‘‘त्या काळी कलेला किंमत होती. त्यामानाने रूपाला कोणी फारसे मोजीत नव्हते. मधु कांबीकरचा अपवाद वगळात या क्षेत्रातील बाकी स्त्रीया यमुनाबाई, ताराबाई, लक्ष्मीबाई, सरोजाबाई, शोभाबाई या काही फार सुंदर वगैरे नव्हत्या. पण एकदा का त्या गायला, नाचायला उतरल्या की त्यांचं रूपच पालटून जायचं.’’

नाचणार्‍या मुली म्हणजे स्वत:ची काळजी घेत नाहीत, काहीही खातात, त्यांना कसलेली रोग होतात आणि त्या हलाखीत मरून जातात असे एक चित्र रंगवलेले असते. याला  कोरगांवकरांच्या लिखाणाने तडा दिला आहे. त्वचा, केसांची निगा या मुली कशा उत्तम घेतात, वैयक्तिक स्वच्छता उत्तम राखतात हे त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा हवाला देवून लिहीलं आहे. भाकरी, चपाती, भात, डाळ, दोन भाज्या, उसळी, कोशिंबिर, चटणी असं चारीठाव साधं पण सकस जेवण या मुली नियमित घेतात. अन्यथा दारू, मांसाहार, तिखट आणि मसालेदारच त्या खात असतील असा गैरसमज पसरलेला आहे.

नाचगाणी करणार्‍या मुलींची लग्न होतात का? त्यांचे संसार सुखाचे होतात का? असला प्रश्न सामान्य माणसांना नेहमीच पडतो. वर्षा संगमनेरकर यांचे ठसठशीत उदाहरण या पुस्तकात सांगितलं आहे. सीआयडी ऑफिसरचा मुलगा असलेला पराग चौधरी या युवकाशी त्यांचे प्रेम जुळले. त्याने घरच्यांशी वर्षाबाईंशी लग्न करण्याचा निश्चय सांगितला. त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभं रहायचं ठरवलं. गेली पंचेवीस वर्षे वर्षाताई वैवाहिक आयुष्य जगत आहेत शिवाय कलेची सेवाही करत आहेत. 

लावणी कुठे कुठे सादर केली जाते? संगीत बारी, ढोलकी फडाचा तमाशा, बॅनर शो आणि टीव्ही-चित्रपटात अशा चार ठिकाणी लावणी सादर होते. ढोलकी फडाचा तमाशा हा सर्वात जुना प्रकार. त्याला एक मोठी परंपरा आहे. शहरी प्रेक्षकांसाठी बॅनर शो हा सोयीचा प्रकार आहे. जगदीश खेबुडकरांनी गावरान मेवा नावाने बंदिस्त सभागृहात लावणीचे कार्यक्रम सुरू केले 1970 मध्ये. त्यातूनच बॅनर शो हा प्रकार सुरू झाला. मीना नेरूरकर यांनी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या नावाने लावणीचे भरपूर प्रयोग करून लावणी लोकप्रिय केली. ‘नटरंगी नार’, ‘सोळा हजारात देखणी’, ‘ढोलकीच्या तालावर’ अशा कार्यक्रमांतून सुरेखा पुणेकर, माया जाधव यांना अफाट लोकप्रियता मिळाली. 

या क्षेत्रातील मुली आता कलाक्षेत्रात स्थिरावू लागल्या आहेत. लावणी म्हणजे गायन आणि नृत्याचे अप्रतिम मिलन.  नुसतं गाणं येवून किंवा नुसता नाच येवून भागत नाही. पण आजकाल गाणं आणि नृत्य वेगवेगळं होवू पहात आहे. नाचणार्‍या मुलींना चांगली प्रतिष्ठा मिळू लागली आहे. आरती अंकलीकर सारख्या शास्त्रीय संगीतातील प्रतिष्ठीत गायिका ‘उगवली शुक्राची चांदणी’ म्हणतात तेंव्हा लावणीच्या प्रतिष्ठेत भरच पडते असे निरिक्षण कोरगांवकर यांनी नोंदवले आहे.

संगीत बारी पुस्तकात पारंपरिक लावण्यांची काही उदाहरणं दिली आहेत. मारूबिहाग रागावर आधारीत 

पाहूनिया चंद्रवदन 
मला साहेना मदन
ओळखली खचित खचित 
खूण तुमच्या नेत्राची

किवा मिश्र पिलू रागावर आधारलेली साध्याभोळ्या मराठा शिपायाचं वर्णन करणारी ही लावणी

पंचबाई मुसाफिर अलबेला
भरजरी पोषाख हातामधी भाला
शिपाई सजला, रंगिला फाकडा, 
शोभे गुलाबी पटका

शाहिर परशुराम यांची अध्यात्मिक लावणीही यात दिलेली आहे. 

दहा शिंदळक्या करीन परंतु 
एक लग्नाचा नको नवरा 
माहेरी माझे चितमन रमले
माहेरचा नलगे वारा

कोरगांवकर यांनी पारंपरिक लावण्यांसोबत आधुनिक लावण्याही आवर्जून दिल्या आहेत. 
कुठलीही शब्दबंबाळ भाषा न वापरता अतिशय वस्तुनिष्ठपणे कोरगांवकर यांनी संगीत बारी मराठी वाचकांसमोर शब्दांतून उभी केली आहे. अकलूजची लावणी स्पर्धा या क्षेत्रात मोठी मानाची समजली जाते. मंदाकिनीबाई डिंगोरेकरांनी आपल्या या कलेबद्दल एक मोठी सुंदर लावणीच सादर केली होती. 

मराठमोळी कला ही न्यारी
बिचकून जाऊ नका
लावणी विसरू नका हो पाव्हणं
लावणी विसरू नको

मराठी माणूस लावणी कला विसरणार नाही याची खात्री या क्षेत्रातील नविन कलाकारांना पाहून वाटते असे निरिक्षण भूषण कोरगांवकरांनी मांडले आहे. संगीत बारी हे पुस्तक वाचून लक्षात येते, ‘संगीत बारी... ‘ती’ची कथाच न्यारी !’

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

1 comment:

  1. एका उपेक्षित समाज घटकाला न्याय दिल्याबद्दल भूषण कोरेगावकर यांचे आणि भूषण यांचे लिखाण आमच्या पर्यंत पोहचविणा-या श्रीकांत उमरीकर यांचे अभिनंदन... तमाशा व्यवसाय आणि त्यातील कलावंतीनि बद्दल कमालीचे अद्न्यान असणा-या सर्व सामान्य लोकांच्या डोळ्यात झण झणीत अंजन घालणारे पुस्तक. .

    ReplyDelete