--------------------------------------------------------------
२१ मे २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-------------------------------------------------------------
उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र तापलेला असताना पावसाच्या मोठ्या सरी सर्वत्र कोसळून गेल्या. होरपळणार्या मनाला काहीसा गारवा लाभला. राजकारण्यांकडून दुष्काळाचं खेळणं केलं जातं आणि त्याचा फायदा परत ते स्वत:ची तुमडी भरून घेण्यासाठी करतात हे वारंवार सिद्ध झालं आहे. शेतकर्यांच्या आत्महत्येवर उपाय म्हणून जे पॅकेज दिल्या गेलं. त्यातून फायदा झाला तो फक्त बँकांचा शेतकर्याला काहीच भेटलं नाही. इतकंच नाही ज्या सिंचनाच्या नावाखाली महाराष्ट्राचे जाणते राजे कायमस्वरूपी बोलत असतात, त्या सिंचनाच्या भयानक आकडेवारीवरून कटूसत्य बाहेर आले आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या तोंडूनच त्यावरून हेच सत्य सिद्ध होते की, दुष्काळ योजना या सगळ्यांच्या पॅकेजेसचा फायदा नोकरशाहीला आणि राजकारण्यांनाच होतो. सर्वसामान्य शेतकर्याला नाही. गेली शेकडो वर्षे उघड्यावरची शेती आपण करत आलो, ज्या ज्या वेळी निसर्गाने साथ दिली, त्या त्या वेळी सर्वसामान्य शेतकर्याचं मन भरून आलं. त्याच्या मनात निसर्गाबद्दल अपार कृतज्ञता भरून राहिली. भरभरून आलेल्या पिकासाठी त्याने मन भरून दानधर्म केला. मंदिरं उभारली. खोट्या खोट्या देवांची पूजा केली आणि हे सगळं तुझ्या कृपेनं लाभलं म्हणून भावना व्यक्त केल्या. याच्या उलट जेव्हा केव्हा निसर्गाची अवकृपा झाली तेव्हा माणूस मुकाट राहिला. आपल्याच नशिबाला दोष देत राहिला. गेल्या जन्मीचं पाप म्हणून त्यानं स्वत:लाच बोल लावला. परत त्याच देवाकडे त्याने गार्हाणं मांडलं. निदान पुढचा हंगाम तरी चांगला येऊ दे म्हणून वर्षानुवर्षे आसमानानं पदरी घातलेल्या दानात तो समाधान मानत आला. घडो काहीही त्याने नेहमी स्वत:कडे कमीपणा घेतला आणि निसर्गाला मोठेपणा दिला. त्याच्यापुढे मान तुकवली. शेकडो वर्षांनी आता काळ बदलला असं म्हणायची प्रथा आहे. आताचं युग हे विज्ञान-तंत्रज्ञानाचं युग आहे असं चड्डी सावरता न येणारं शेंबडं पोरही म्हणतं. अस्मानाच्या संकटाला तोंड देऊन बंपर पीक घेण्याचं धाडसही हा शेतकरी करतो आणि जेव्हा त्याने पिकवलेलं मातीमोल भावाने विकावं लागतं, विकत घेतल्या जातं तेव्हा परत त्याच्या मनात प्रश्र्न उरतो. आता काय करायचं? दोष कुणाला द्यायचा? नुकत्याच हाती आलेल्या अहवालानुसार गहू-तांदळाचं फार मोठं पीक बाजारात येत आहे. जुनं धान्य ठेवायला आजही पुरेशी जागा नाही. शासकीय गोदामांमध्ये तर धान्य सडत आहेच; पण जागा न मिळाल्यामुळे अस्मानाखालच्या खुल्या चौथर्यांवर सरेआम या धान्याची कुजण्याची आणि सडण्याची मुक्त व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे अस्मानी संकटाला तोंड देऊन नवनवीन बियाणे वापरून तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणात धान्य तयार करायचं, कष्ट करून आपण जगाला पोसतो आहोत म्हणजे आपण पोशिंदे आहोत असं स्वत:लाच सांगायचं. हे तयार झालेलं धान्य बाजारात मातीमोल किमतीने विकायचं आणि त्याची खरेदी करून उघड्या चौथर्यांवर मांडून परत येणार्या पावसात शासनाने त्याची माती होऊ द्यायची. ‘माती असशी मातीत मिळशी’ हे आपलं भारतीय अध्यात्म अशा रीतीने अनुभवायचं. या सगळ्या दुष्ट व्यवस्थेला काय म्हणावे?
इतकं होऊनही वारंवार सुलतानी संकटांतून हताश झालेला शेतकरी आभाळात ढग आलेले पाहतो. अवकाळी पावसाचे थेंब अत्तरासारखे अंगावर माखून घेतो. मन उल्हासानं भरून घेतो. सगळं बळ एकवटून पेरणीच्या खटाटोपीला लागतो. त्याच्या डोळ्यांत भरलेलं असतं हिरवं स्वप्न. त्याचा आवेश असतो कोलंबससारखा.
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला (कुसुमाग्रज)
काय म्हणावे या गारूडाला. ना. धों. महानोरांनी दुष्काळी परिस्थितीवर एक मोठी दाहक कविता लिहिली आहे; पण तिची फारशी कुणाला आठवण होत नाही.
पांगलेला पावसाळा वाट भरलेली धुळीने
मोडक्या फांदीस घरटे वाळलेली शुष्क पाने
दूर गेल्या पायवाटा डोंगरांच्या पायथ्याशी
पंख मिटल्या झोपड्यांचे दु:ख कवटाळे उराशी
फाल्गुनाचे पळसओल्या रक्त झडलेल्या फुलांचे
फाटक्या काळ्या भुईला जहर डसलेल्या उन्हाचे
हे जीणे वर्षानुवर्षी काजळी काळी पिकाला
पापण्यांच्या कातळाशी खोल विझला पावसाळा
नुसतं या ओळी जरी वाचल्या तरी गलबलल्यासारखं होतं. शेतीची एक भयाण स्थिती नजरेसमोर येते. या स्थितीशी वर्षानुवर्षे शेतकरी झुंज देत आला आहे; पण असं लिहिणार्या महानोरांपेक्षा सगळ्यांना आवडतात आणि सोयीचे वाटतात, लक्षात राहतात
या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतूनी चैतन्य गावे
अशी कोणती पुण्य येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे
हे म्हणणारे महानोरच.
सगळ्यांवरती मात करून वाळून गेलेलं, पिवळं पडलेलं गवतही पावसाच्या एखाद्या शिडकाव्याने हिरवंगार होऊन जातं. सर्वत्र नजरेला भूल पाडणारा हिरवा रंग मोहकपणे पसरतो. आभाळाची निळाई अजूनच झळझळीत होते. बोरकरांसारखा कवीही त्यामुळेच लिहून जातो :
पालवती तुटलेले
पुन्हा पर्वतांचे पंख
पर्वताचेच नाही तर माणसाच्या मनाचेही तुटलेले पंख या पावसाने पुन्हा पालवतात. पुन्हा आकाशात झेप घेण्याची उभारी धरतात. वर्षानुवर्षे पडणारा हा चकवा नेमका काय आहे? हे कोडं उलगडत नाही. किंबहुना ते उलगडत नाही म्हणूनच जगाचे इतर व्यवहार सुरळीत चालू आहेत. ज्या दिवशी शेतकर्याला आपल्या या चकव्याचा उलगडा होईल. त्या दिवशी सरळ रोखठोकपणे तो काहीतरी निर्णय घेईल. हा निर्णय जास्त करून शेती सोडण्याचाच असेल हे निश्र्चित आणि मग शेतकर्या तू राजा आहेस म्हणून त्याचं कौतुक करणार्यांची त्याच्यासाठी पोवाडे गाणार्यांची, त्याच्या कष्टाला, त्याच्या श्रमाला अध्यात्माचा दर्जा देणार्यांची मोठी पंचाईत होऊन बसेल.