Tuesday, March 6, 2012

शेती अफूची नशा कुणाची?


--------------------------------------------------------------
६ मार्च २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-------------------------------------------------------------

महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, बीड, परभणी भागात शेकडो एकरांवर अफूची शेती आढळून आल्याने फार मोठा गहजब झाला, असं चित्र रंगवल्या जात आहे. ज्या पद्धतीने गावोगाव अवैधरीत्या दारूचे गुत्ते चालू असतात आणि अचानक पोलिसांनी धाड टाकली आणि अवैध दारू सापडली अशी बातमी येते, तसं काहीसं या बाबतीत झालं आहे. ही गोष्ट सुरुवातीलाच लक्षात घ्यायला पाहिजे- या प्रकरणात सगळ्यात नालायकपणा सिद्ध होतो तो पोलिस खात्याचा! शेतकरी हे पीक ‘खसखशीचं’ म्हणून घेत आहेत. आजही बोंडांपासून अफू तयार करण्याचं तंत्र शेतकर्‍याला फारसं अवगत नाही. त्यामुळे अफूची बोंडे खरेदी करणारे व्यापारी त्यापासून विविध मादक पदार्थ तयार करणारे, या व्यापारात अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार्‍या तस्करीत सामील असणारे या सगळ्यांवर सगळ्यात पहिल्यांदा गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. इतकेच नाही तर कडक कारवाई ताबडतोब केली जायला हवी. हे सगळं सोडून बळी जातो आहे तो सामान्य शेतकर्‍याचा. ज्याला या सगळ्यांतून मिळणारा वाटा अतिशय अल्प आहे. इतर पिकांपेक्षा खसखशीचे हे पीक बरे, कारण त्यातून काहीतरी नगदी रक्कम पदरात पडते.
स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतर आपण उभारलेल्या व्यवस्थेचा फोलपणा वेळोवेळी उघड पडत चालला आहे. कायदा आणि सुव्यवस्था हे शासनाचे प्रमुख काम असायला हवे; पण हे शासन नोकरदारांचे पगार करण्यात आणि ते नोकरदार हप्ते खाण्यात इतके मग्न आहेत, की त्यांना त्या पलीकडे काहीच दिसत नाही. शिक्षणव्यवस्था इतकी पोकळ झाली आहे. शाळेत नेमकी किती मुलं आहेत. त्यातली खरी किती याची मोजणी होऊनही नेमका आकडा बाहेर सांगायला शासन तयार नाही. त्यांच्यावर कारवाई करणं तर दूरच राहिलं. विविध घोटाळ्यांचे नुसते आकडे वाचले तरी डोकं गरगरायला होतं आहे. मग या घोटाळ्यांना जबाबदार असणार्‍यांवर कारवाई कशी करणार? अफूच्या या भानगडीतून अगदी ग्रामीण पातळीवर जी एक प्रशासकीय यंत्रणा आपण उभारली होती, तिचं पोकळपण परत एकदा स्पष्टपणे सिद्ध झालं आहे.
मधल्या काळात महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान, राष्ट्रसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आदी योजना वाजतगाजत सुरू केल्या होत्या. या योजनांचा अर्थच मुळी हा होता, आम्ही तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही, तुमचा तुम्ही विकास करून घ्या, तुमचे तुम्ही भांडणं मिटवून घ्या, तुमची तुम्ही स्वच्छता करून घ्या... फार तर आम्ही तुमच्यामध्ये स्पर्धा लावून तुम्हाला पुरस्कार म्हणून थातूरमातूर रक्कम देऊत. म्हणजे जुन्या काळी जो काही भलाबुरा गावगाडा चालला होता- ज्याला अगदी इंग्रजांनीही हात घातला नव्हता, तो गावगाडा आम्ही मोडून टाकला आणि आता 65 वर्षांनंतर आम्ही हे अप्रत्यक्षरीत्या कबूलच करतो आहोत, गावपातळीपर्यंत प्रशासकीय यंत्रणा राबवण्यात आम्ही पूर्णपणे नालायक ठरलो आहोत.
अफूचा उपयोग भारतामध्ये काय आणि कशापद्धतीने होतो याची चर्चा याच अंकातल्या लेखांमध्ये आम्ही दिलेली आहे, शासनाने या संदर्भात काहीएक स्पष्ट भूमिका घेऊन पारदर्शीपणे नियम तयार करावेत. त्या नियमांचे पालन करण्यास शेतकरी कटीबद्ध आहे. भारतीय समाजाची ही एक मोठी परंपरा आहे, अगदी दुष्काळाच्या काळातही अन्नधान्याची मागणी करत लोकांनी धान्याच्या गोदामासमोर प्राण सोडले, कित्येक लोक भुकेने मेले; पण लोकांनी गोदामं फोडली नाहीत. नैतिकतेची एक चाड सर्वसामान्य भारतीय माणसाला आणि त्यातही विशेषत: शेतकर्‍याला- कुणब्याला नेहमीच राहिली आहे, कारण हा जो गावगाडा आहे, तो आपल्यामुळे चालतो आहे, याचे एक सम्यक भान त्याला नेहमीच होते. गावगाडा नीट चालावा म्हणून प्राणपणाने प्रयत्न, त्या त्या वेळच्या धुरीणांनी केलेलेच होते. गावातून एखादं कुटुंब विस्थापीत होत असेल, कुणाला खायला अन्न नसेल तर त्याची वास्तपुस्त करण्याचे कर्तव्य गावचा पाटील हा नेहमीच दाखवत आला होता. सगळ्या दोषांसगट ही व्यवस्था किमान काही हजार वर्षे टिकली हे लक्षात घ्यायला पाहिजे. या व्यवस्थेतले दोष दूर करून हिला बळकटी आणता आली असती आणि गावगाड्याचा कणा असलेला कुणबी सामर्थ्यवान कसा होईल हे बघितले असते, तर आज जी अनागोंदीची परिस्थिती दिसते ती तशी दिसली नसती. आपली व्यवस्था कुठल्या दिशेनं हाकायची याचे एक उपजत ज्ञान आणि साहजिकच भानही गावगाड्यातल्या धुरीणांना होते. नवीन व्यवस्थेत सरसकटपणे ग्रामीण माणसाला अडाणी ठरवण्यात आलं. त्याच्या ज्ञानाला पूर्णपणे अडगळीत टाकण्यात आलं आणि त्या जागी बिनकामाची ऐतखाऊ अशी पांढरा हत्ती शोभणारी नोकरशाही आम्ही आणून बसवली. ही नोकरशाही हप्ते खाऊन डोळे मिटून घेते आणि मग अचानक शेकडो एकरांमध्ये अफूची शेती सापडली, ‘हे कसे काय झाले बुवा!’ असे म्हणत आश्र्चर्य व्यक्त करते. जणू काही एका रात्रीतून शेकडो एकरांमध्ये अफूची झाडे तरारून आली आहेत.
सर्वसामान्य शेतकर्‍यांची परिस्थिती काय आहे, हे सांगणंही मोठं मुश्किल होऊन बसलं आहे. आंध्रप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ पिकला, तांदळाचे भाव पडले, हा तांदूळ खरेदी करायला आणि साठवायला शासनाची क्षमताही नाही आणि मानसिकता तर मुळीच नाही. तोच तांदूळ जरा बरा भाव मिळतो म्हणून महाराष्ट्रात आणावा, तर या शेतकर्‍यांवर कायदा मोडला म्हणून कारवाई करण्यात येते. खसखशीच्या साठी पीक घ्यावं तर त्याला अफू म्हणून शिक्षा होते. परदेशामध्ये साखर विकायला न्यावी तर भाव कोसळलेले असतात, अशी मोठी बिकट परिस्थिती सध्या आलेली आहे. महाराष्ट्रातल्या निवडणुकांतून जनतेने एक फार चांगला संदेश राज्यकर्त्यांना आणि विरोध पक्षांनासुद्धा दिला होता. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सिंधुदूर्ग व लातूर जिल्हा परिषद वगळता कुठेच कुठल्याही एका पक्षाला काठावरचं का होईना; पण बहुमत जनतेने दिलेलं नाही. यातून काही एक शहाणपणाचा बोध राजकीय पक्षांनी घ्यावा अशी अपेक्षा आहे; पण ते घेतील याची शक्यता कमी आहे. शेतकर्‍यानं पिकवलेल्या खसखशीच्या पिकातून त्याला काय मिळालं हे सोडून द्या; पण आमच्या व्यवस्थेला मात्र एकूणच फार मोठी गुंगी आली आहे, असं दिसतं आहे.

1 comment:

  1. राजकारण्यांनी भ्रष्ट्राचार करावा , बलात्कार करावा , चोऱ्या कराव्यात , बेईमानी करून देशाला लुबाडावे, कायदे मंडळात बसून नेत्यांनी ब्लू फिल्म पहाव्यात असे कायदे या देशात आहेत वाटते म्हणूनच हे बेईमान उजळ माथ्याने राज्य करत आहेत. खसखस , लाखेच्या डाळीला महाराष्ट्रातच का बंदी आहे , भारतातील इतर राज्य यांना बंदी नाही ह्या मुख्य समस्ये वर मात्र कोणी बोलत नाही. नेट वर सर्व सुशिक्षित असल्या मुळे शेतकऱ्यान बद्दल इन भाषा करणारे खूप आहे. पण या अन्नदात्याच्या च्या समस्याचे का? हे बोलणे जाणीवपूर्वक टाळतात. लाखोळी डाळीवरील बंदी हटवण्यात आल्यास आणि या डाळीच्या निर्यातीला परवानगी दिली गेल्यास डाळींची टंचाई आणि प्रचंड किमती याच्या संकटातून सुटका होऊ शकेल. दुष्काळी परिस्थितीमध्ये या पिकाचे जास्त उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक संकटातून वाचू शकतो ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शांतीलाल कोठारी या कडे सरकार का लक्ष देत नाही. डॉ. कोठारी हे लाखोळी डाळीवरील विक्रीबंदी उठवावी या मागणीसाठी 90 च्या दशकापासून आंदोलन करीत आहेत. एवढयातच त्यांच्या आंदोलनाचा रौप्य महोत्सव होईल, पण प्रश्न सुटला नाही. या काळात केंद्रात व राज्यात विविध सरकारे आली पण हा प्रश्न सुटला नाही.
    लाखोळी डाळ ही विषाक्त आहे. त्याच्या अतिसेवनाने पोलिओसारखा आजार होतो, असा मध्य प्रदेशातील रिवा जवळचा एक अभ्यास आहे. त्यावरून ही बंदी घातली आहे.
    लाखोळी डाळीच्या उत्पादनावर व खाण्यावर बंदी नाही, फक्त बंदी आहे ती विक्रीवर. ही डाळ विषारी आहे, असे म्हटले तर सर्व खेडयांत कुंपणावर ही डाळ पिकते. ही डाळ तूरडाळीच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. मोठमोठया हॉटेल्समधून पिवळी डाळ म्हणून जी डाळ दिली जाते ती तूरीची नसते तर लाखोळीची असते. या लाखोळी डाळीचे वडे व भजीही खूप चविष्ट लागतात पण ती खुलेपणाने विकली जात नाही कारण त्याच्यावर बंदी आहे.हे आहे आपल्या सरकारचे धोरण .

    ReplyDelete