Showing posts with label cotton export ban. Show all posts
Showing posts with label cotton export ban. Show all posts

Tuesday, March 20, 2012

बंदी लावू बंदी काढू शेतकर्‍याला मातीत गाडू


--------------------------------------------------------------
२१ मार्च २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-------------------------------------------------------------

गेली 32 वर्षे शेतकरी संघटना सातत्याने असं सांगत आली आहे, ‘शेतकर्‍याचे मरण हेच शासनाचे धोरण’ पण हे कोणाला विशेषत: डाव्या विचारवंतांना फारसे पटत नव्हते. परवाच्या कापूस निर्यातबंदीच्या हप्ताभराच्या खेळीने सगळ्यांसमोरच परत एकदा जुनीच गोष्ट स्पष्टपणाने आली आहे. मान्य करायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्र्न आहे. प्रचंड प्रमाणात विरोध आणि असंतोष जाणवताच घातलेली बंदी काढण्याचं नाटक व्यापार मंत्री आनंद शर्मा यांनी केलं. इथून पुढे जी काही चौकशी व्हायची ती होत राहील. जे काही आरोप, प्रत्यारोप व्हायचे ते होत राहतील; पण या निमित्ताने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची नियत स्वच्छपणे समोर आली आहे. ‘आम आदमी’चं नाव घेत चालवल्या जाणार्‍या सगळ्या योजना या प्रत्यक्षात ‘आम आदमी’ला खड्‌ड्यातच घालणार्‍या आहेत. हे वेगळं सांगायची गरज नाही. कापूस निर्यातबंदीच्या खेळामुळे परत एकदा हा विचार करण्याची गरज आली आहे. शासकीय हस्तक्षेप असावा की नसावा, खरे तर हा आता प्रश्र्नच उरलेला नसून शासकीय हस्तक्षेप पूर्णपणे हद्दपार झाला पाहिजे, याच निष्कर्षाला सगळे येऊन ठेपले आहेत. किंबहुना परिस्थितीही तशीच आहे; पण तसं मान्य न करता काहीतरी उचापती करून विकासाच्या गाड्याला खिळ घालायची आणि आपलं अस्तित्व सगळ्यांच्या नजरेस आणून द्यायचं, असला कारभार नोकरशाहीने आणि स्वाभाविकच त्यांच्या बोलवत्या राजकीय धुरीणांनी दाखवून दिला आहे. महाराष्ट्रातील निवडणुका आणि उत्तरप्रदेश पंजाबातील निवडणुकांनीही सर्वसामान्य जनतेचा कल कॉंग्रेसविरोधी असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय म्हणवून घेणार्‍या कॉंग्रेस आणि भाजपला फक्त जागाच नव्हे, तर मतांच्या टक्केवारीनेही धोबीपछाड देऊन जनतेने गप्प केले आहे. पण यापासून कुठलाही बोध घ्यायची तयारी या सरकारची आहे, असे दिसत नाही. नसता कापसाच्या निर्यातबंदीचा खेळ करण्याची उठाठेव सरकारने केलीच नसती. यावरून शेतीविषयक धोरणांमध्ये शेतकर्‍यांच्या विरोधातील सूत्र जाणवल्याशिवाय राहात नाही. म्हणजे एकीकडे अन्नधान्य सुरक्षा विधेयकाची चर्चा करायची आणि दुसरीकडे शेतकरी जगूच नये, अशी व्यवस्था करायची. ग्रामीण रोजगार योजनांसारख्या शेतीच्या मुळावर उठणार्‍या योजना राबवायच्या आणि दुसरीकडे शेतकर्‍यांचं आम्ही भलं करतो आहोत म्हणत अनुदानांची खैरात उधळायची ही खैरात शेतकर्‍यांच्या पदरी पडू नये, याची मात्र पुरेपूर काळजी घ्यायची. प्रश्र्न इतकाच आहे, असला खेळ किती दिवस चालणार? हे वारंवार सिद्ध झालेलं आहे- इतर कुठल्याही उत्पादनांपेक्षा शेती उत्पादनाच्या माध्यमातून परकीय बाजारपेठ आपण ताब्यात घेऊ शकतो. यातून आपली निर्यात वाढून परकीय चलन काही प्रमाणात मिळू शकते. ज्या आयटी क्षेत्राचा गवगवा मागच्या दशकात करण्यात आला होता, त्या क्षेत्राचं पितळ आता उघडं पडत चाललं आहे. पायाभूत उद्योग सुधारलेच नाहीत, तर नुसते सेवाक्षेत्र विस्तारून चालत नाही. त्याचबरोबरीने उद्योगांना कच्चा माल किंबहुना एका अर्थाने भांडवलच पुरवणारे शेतीक्षेत्र मागास ठेवून जमत नाही. कामगारांच्या शोषणावर उद्योगी भांडवलाची निर्मिती होते हे मांडणारी विचारसरणी मुळातच कच्चा माल जो मिळतो तो शेतीच्या शोषणातूनच मिळतो हे सांगत नाही. बाकी सर्व मोठमोठ्या गोष्टी करत असताना सगळ्यांच्या मुळाशी असलेल्या शेती उद्योगाबाबत आम्ही उदासिनता दाखवतो. त्याच्या जिवाशी खेळ होईल असे डावपेच आखतो. याचाच परिणाम म्हणजे गेल्या सत्तर एक वर्षांत हे क्षेत्र उजाड होत गेले. लोकांचे स्थलांतर झाले. तरीही शेतीवरची लोकसंख्या बरीचशी शिल्लक आहे. जिच्या कल्याणासाठी इतकंच नव्हे, एकूणच सगळ्या देशाच्या कल्याणासाठी तिची उपेक्षा थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. खुली व्यवस्था आल्याच्या नंतर शेतीला खुलेपणाचा वारा लागेल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र तसं काही, घडलं नाही. वेगवेगळ्या निमित्ताने शेतीभोवती कुंपणं घालणं चालूच आहे. ‘खुल्या व्यवस्थेमध्ये काही खरं नाही हे आम्ही तुम्हाला सांगतच होतो,’ असे बाष्कळ उद्गार डावे विचारवंत बर्‍याचदा काढताना आढळतात. त्या सगळ्यांची तोंडं आता गप्प का आहेत? गेल्या सात दिवसांतल्या निर्यातबंदीची कारणमीमांसा हे डावे विचारवंत काय म्हणून करणार आहेत? जर जागतिक पातळीवरती व्यापार खुला राहिला, तर त्याचा फायदा इतर कशापेक्षाही शेतीला नेहमीच होतो, हे सिद्ध झालेलं आहे. जेव्हा जेव्हा कृत्रिमरीत्या हस्तक्षेप केल्या जातो, तेव्हाच ही बाजारपेठ नासते आणि शेतकर्‍याचे प्राण कंठाशी गोळा होतात. आता एकदा या सगळ्यांचा विचार करून शेतमालाच्या व्यापारविषयक निश्र्चित धोरण ठरविण्यात यावे. खरे तर आंतरराष्ट्रीय दबाव अशा तर्‍हेने कार्यरत आहे. दिल्लीच्या सरकारला मनात असूनही असले छचोर चाळे फार काळ करता येणार नाहीत. मागचं अख्खं दशक युद्ध, शीतयुद्ध आणि युद्धखोर कारवाया यांनी गाजलं. त्याने संपूर्ण जगाला वेठीस पकडलं. मोठमोठ्या अर्थव्यवस्थांचा डोलारा साफ कोसळला. ज्याचाच परिणाम म्हणजे 1991 नंतर खुलेपणाची चर्चा करणं सर्वांनाच भाग पडलं. हे शतक व्यापार आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीचं आहे. ही अर्थव्यवस्था जिला बाजारू अर्थव्यवस्था म्हणून कितीही हिणवलं तरी, तीच पुढे नेणारी ठरणार आहे. हे निश्र्चित आहे. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना तेव्हाचे प्रस्थापित नोकरदार असं हिणवायचे, ‘अरे इंग्रज इतका बलवान आहे, तो तुमच्या या पोरकट चाळ्यांनी, खादीच कपडे वापरल्याने, चरख्यावर सूत कातल्याने स्वातंत्र्य द्यायला मूर्ख थोडाच आहे.’ पण आश्र्चर्य म्हणजे असं म्हणणारेच मूर्ख ठरले. खादी घालणारे आणि चरख्यावर सूत काढणारे शतकाचा उंबरठा ओलांडून स्वातंत्र्याच्या वाटेने कितीतरी पुढे निघून गेले. आजपरत हीच परिस्थिती आहे. वेगवेगळ्या मार्गाने बंदी घालणारे अडथळे आणणारे स्वत:ला शहाणे समजत आहेत; पण उद्याचा काळ हा सर्व बंधनांतून मुक्त होऊन जागतिक पातळीवर एका वेगळ्या स्वातंत्र्याचा प्रत्यय मिळण्याचा काळ आहे. व्यापारातील ही क्षूद्र बंधने गळून पडतील आणि सगळ्यांनाच विशेषत: शेतकर्‍याला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होईल.