Saturday, May 5, 2012

अबब! पवार साहेब काय बोललात हे...


--------------------------------------------------------------
६ मे २०१२ पाक्षिक शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-------------------------------------------------------------

महाराष्ट्राच्या राजकारणाची ज्यांना नसन्‌नस माहीत आहे, थोरल्या साहेबांनंतरचे (यशवंतराव चव्हाण) जे थोरले साहेब आहेत (त्यांच्या नंतरचे धाकटे साहेब आपल्या टगेगिरीच्या कर्तृत्वानं दादा म्हणून घेतात.) जाणते राजे, प्रतिभापती (महाराष्ट्रातल्या भल्या भल्या प्रतिभावंतांचं पानही (पत्ता) ज्यांच्याशिवाय हलत नाही किंवा ज्यांच्याशिवाय या प्रतिभावंतांना कोणी ‘पत’ही देत नाहीत), जगाला वेड लावणार्‍या क्रिकेटला ज्यांनी वेडं केलं असे कायमस्वरूपी पंतप्रधान पदाच्या प्रतिक्षेतील शूरवीर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब पुण्यात एका कार्यक्रमात बोलले. हे जाणते राजे असं म्हणाले की, गेली 45 वर्षे ऊस आणि साखरेसाठी मी काम केलं; पण ऊस आणि साखरवाले परवा माझ्या दारात येऊन बसले आणि तेव्हापासून मी असं ठरवलं की, यापुढे ऊस आणि साखरेसाठी शब्द खर्च करणार नाही. अरे बाप रे, काय घडले हे? जुन्या नाटकांच्या भाषेत बोलायचे तर मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? सूर्य पश्र्चिमेला तर उगवला नाही ना?’ पवार साहेब आणि साखर यांचा संबंध नाही म्हणजे काय? सहकाराचं एवढं मोठं साम्राज्य म्हणजे कारखाने नाही म्हणत आम्ही; या कारखान्यांचे जे मालक आहेत त्यांच्या जीवावर उभारलेलं साम्राज्य म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे मालक म्हणजे पवार साहेब आणि तेच असं म्हणतात की, मी आता साखरेसाठी शब्द टाकणार नाही. काय हे?
बरं कार्यक्रम कुठला तर ब्राझील आणि भारताच्या साखर उद्योगाची तुलना करणार्‍या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ. पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जे की सध्या कॉंग्रेसमध्ये आहेत. हे यासाठी सांगायचं की युतीच्या काळात ते अपक्ष होते आणि मंत्रीही होते. तर ते असो. याच कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी सहकार मजबूत करण्याची गरज व्यक्त केली म्हणजेच सहकारी कारखान्यांचे मालक मजबूत करा, म्हणजेच पर्यायाने पक्ष मजबूत करा आणि पवार साहेब तर म्हणतायत, मी साखरेसाठी शब्द टाकणार नाही. आता काय करा?
शेतकर्‍यांसाठी चळवळ करणारे सगळेच असं म्हणतात. पवार साहेबांच्या शब्दांमुळे साखर उद्योगाचे हे हाल झाले म्हणजे आता पवार साहेब जर साखरेत लक्ष घालणार नसतील (त्यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ काढण्याचा वेडेपणा केला तर...) तर साखर उद्योगाचं आता होणार काय? पुढे बोलताना पवार साहेब असं म्हणाले, ‘बाजरी आणि ज्वारी पिकवणार्‍या छोट्या शेतकर्‍यांसाठी आंदोलन का करत नाही?’ त्यांचा रोख कुणाकडे होता हे महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोरालासुद्धा कळतं. कॉंग्रेसी नेत्यांच्या चिथावणीवरून माननीय खासदार राजू शेट्टी उठले आणि पदयात्रा घेऊन बारामतीत धडकले. ही ठसठस आजही पवार साहेब विसरायला तयार नाहीत. या पदयात्रेच्या रस्त्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचंही गाव होतं; पण मात्र कुठलेही आंदोलन राजू शेट्टींनी केले नाही. हेही साहेबांच्या ठसठशीचं कारण. त्याही आधीचं कारण जरा वेगळंच आहे. 2009 सालच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्ट्रातल्या पवार साहेबांच्या गडामध्ये प्रचंड पडझड झाली. कोल्हापूरला सदाशिवराव मंडलिक, इचलकरंजीला राजू शेट्टी, सांगलीला प्रतीक पाटील असे खासदार निवडून आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नामोनिशाण राहिले नाही. या भागांमध्ये कॉंग्रेसवाल्यांनी जे पोस्टर्स लावले होते त्यावर प्रतीक पाटलांचा फोटो आणि खाली राजू शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिकांचे फोटो आणि वाक्य होतं, एकावर दोन फ्री. ही जी एकावर दोन फ्रीची स्कीम होती त्यामध्ये राष्ट्रवादीचा कचरा झाला. ती ठसठस अजूनही साहेबांच्या मनात असावी. या सगळ्या पार्श्र्वभूमीवर साहेब परवा बोलले. बरं दुसरी एक भानगड लगेचच उत्पन्न झाली- या मागे ज्यांचा हात होता ते पतंगराव कदम त्यांची कॉंग्रेस पक्षात घुसमट होते आहे, त्यांनी योग्य ती दिशा धरून कृती करावी, असं एक विधान साहेबांनी केलं आणि अपेक्षेप्रमाणे पूर्ण गोंधळ उडवून दिला. आता उद्या पतंगराव राष्ट्रवादीमध्ये आले तर मग आर. आर. पाटील, जयंत पाटील कंपनीचं कसं? यात पुन्हा एक भानगड म्हणजे पतंगराव कदमांच्या दिवट्या चिरंजीवांनी युवक कॉंग्रेसची निवडणूक जिंकल्यावर आपल्या पंखांत प्रचंड शक्ती आल्याचा आव आणत एक विधान राष्ट्रवादीबद्दल ठोकून दिलं. राष्ट्रवादी कॉंग्रेसने घड्याळ हे चिन्ह बदलून खंजीर हे चिन्ह घ्यावं, कारण धोका देणे ही राष्ट्रवादीची वृत्ती आहे. आणि त्याच दिवट्या चिरंजीवांच्या वडलांना पवार साहेब खुणा करून आपल्याकडे बोलवत आहेत. सांगा पवार साहेब, तुमच्या बोलण्याचे काय अर्थ काढायचे. गेली 45 वर्षे तुम्ही साखरेसाठी शब्द टाकलात. साखरेचं काय झालं सांगायची गरज नाही. तुमचेच अनुयायी असलेले धाकल्या साहेबांचे जवळचे नातेवाईक असलेले उस्मानाबाद नरेश, उस्मानाबादचे सम्राट, उस्मानाबादचे भाग्यविधाते माननीय खासदार पद्मसिंह पाटील यांच्याच गावात शेतकर्‍यांनी उभा ऊस पेटवून दिला ही आताची घटना आहे. पवार साहेब तुमच्याच वृत्तपत्रात या बातम्या सक्काळी सक्काळी उभ्या महाराष्ट्राने वाचल्या आणि महाराष्ट्र आडवा झाला. हे सगळं नुकतंच घडलंय आणि तुम्ही सांगताहात साखरेबद्दल मी आता शब्दही टाकणार नाही.
ज्वारी आणि बाजरीच्या शेतकर्‍यांबद्दलची भाषा तुमच्या तोंडून बाहेर पडली आणि सगळेच अवाक्‌ झाले. एरवी ज्वारी, बाजरी, मक्यापासून मद्यनिर्मिती करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मागणी होत होती, त्याला खोडते घालण्याचं काम तुम्हीच केलंत आणि जे परवाने दिले तेही राजकीय पार्श्र्वभूमीच्या लोकांनाच. मग सांगा ना पवार साहेब, ज्वारी, बाजरीसाठी कोण आणि काय आंदोलन करणार? साहेब तुमचं आता वय झालं, असं तुम्हीच सांगत फिरता. लोकसभेची निवडणूक लढवायची नाही, असंही तुम्हीच म्हणत फिरता मग तुम्हीच करा ना आंदोलन. असंही तुम्ही शेतकर्‍यांसाठी मे महिन्यात आंदोलन करण्याचं घोषीत केलंच आहे. फार चांगली गोष्ट आहे. जो मंत्री शेतीविषयक धोरणं ठरवतो, ज्याच्या धोरणांनी लाखो शेतकरी आत्महत्या करतात, करोडो शेतकरी आत्महत्येच्या कड्यावर उभे राहतात, करोडो शेतकरी हलाखीचे जीवन जगतात आणि तोच आता म्हणतो आहे- शेतकर्‍यांसाठी आंदोलन करायचं. क्या बात है! एक उर्दु शेर आहे :
क्या खूब रंग बदल दिया है इन्किलाब ने गुलिस्तॉं का
फूल मुरझा गए और कॉंटो में बहार आ गयी
असंच काहीतरी घडताना दिसत आहे. आता राज्यकर्तेच आंदोलन करणार म्हणे! करो बापडे! आमच्या त्यांना शुभेच्छा. पण पवार साहेब हे तुम्ही खरंच बोललात ना? नाहीतर उद्या परत तुम्हीच सांगायचे, मी असं बोललोच नाही!

No comments:

Post a Comment