Showing posts with label Ban. Show all posts
Showing posts with label Ban. Show all posts

Wednesday, January 18, 2012

वित्तप्रवाहाचे डबके करणार काय?


-----------------------------------------
६ डिसेंबर २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------


रिटेलक्षेत्रात परकीय गुंतवणूक व्हावी की नाही यावर मोठा गदारोळ माजवला जात आहे. बरोबर 20 वर्षांपूर्वी डंकेल प्रस्तावाबाबत असाच धुराळा उडविण्यात आला होता. तेव्हा डंकेलला विरोध करणारे आज परत त्याच आवेशात एफडीआयला विरोध करत आहेत. गंमत म्हणजे राजकीयदृष्ट्या पंगू झालेले डावे आणि राजकीयदृष्ट्या नंबर एक होऊ पाहणारे उजवे, दोघेही परत गळ्यात गळे घालून या मोहिमेत आकांडतांडव करीत आहेत. खरे तर भारतीय जनता पक्षाला इतकी चांगली सुवर्णसंधी या निमित्ताने लाभली होती- या मुद्‌द्यावर कॉंग्रेसी संसदेत सहकार्य करायचं, समाजवादी पक्ष, बसपा, द्रमुक आणि इतर छोटे मोठे किरकोळ पक्ष यांना डाव्यांसोबत एकाकी पाडायचं. जेणेकरून भारताचा मुख्य राजकीय प्रवाह कुठल्या दिशेने जातो आहे हे स्पष्ट झालं असतं. थेट परकीय गुंतवणुकीचं जे सुतोवाच यशवंत सिन्हा अर्थमंत्री असताना केलं होतं. त्याच मार्गावरून आम्ही पुढे जात आहोत, असंही त्यांना म्हणता आलं असतं; पण आपल्याला बुद्धि नसल्याचा पुरावा वारंवार देणे ही संघ परिवाराची खोड भाजपलाही लागली असावी.
अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी नरसिंहराव सरकारच्या काळात मोठ्या ठामपणे खुल्या धोरणांचा पाठपुरावा केला होता. किंबहुना यासाठीच त्यांची नेमणूक झाली, असं सगळ्यांचंच मत होतं. 2004 साली इंडिया शायनिंगला पूर्णपणे अंधारात ढकलून संयुक्त पुरोगामी आघाडी तयार झाली. तेव्हा त्याच्या नेतेपदी बसविण्यासाठी मनमोहन सिंगांशिवाय दुसरं कुणी सापडलं नाही. याला कारण त्यांची ही प्रतिमाच होती. ज्या कारणासाठी त्यांना पंतप्रधानपदी बसवलं. नेमकं त्याच गोष्टींकडे त्यांनी पाठ फिरवायला सुरुवात केली. संपुआच्या पहिल्या काळात हे सगळं डाव्यांच्या नावाखाली झाकून गेलं. कॉंग्रेसचा पाठींबा काढून डाव्यांनीही भाजप आणि संघ परिवार यांच्याशी स्पर्धा करत आपलीही बुद्धि भ्रष्ट झाल्याचं जाहीर केलं. परिणामी, स्वाभाविकपणे भारतीय मतदारांनी आधी त्यांना लोकसभेत आणि नंतर त्यांच्या हक्काच्या पश्र्चिम बंगालमधूनसुद्धा हद्दपार केलं. या सगळ्याचा कुठलाही बोध घेण्याची तयारी डाव्यांची नाही.
अण्णा हजारे आणि रामदेव बाबा यांच्याबाबत काही बोलणंच मुश्किल झालं आहे. अर्थशास्त्र या विषयातलं त्यांना काहीही कळत नाही. या विषयातील अगदी ढोबल गोष्टीही त्यांना समजत नाहीत. कुठल्यातरी वरवरच्या आणि उथळ अशा लोकभावनेला हात घालण्याची एक विलक्षण खोडच त्यांना सध्या लागलेली दिसते आहे. त्यांनी भ्रष्टाचाराला हात घातला, सामान्य जनतेला हा विषय स्पर्शून गेला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद अण्णांना दिला. रामदेव बाबा काळ्या पैशांबाबत बोलायला लागले. तोही विषय सर्वसामान्यांना स्पर्शून गेल्याने सर्व लोक बाबांकडे आशेने पाहायला लागले. आजूबाजूला सत्तेच्या नशेत आकंठ बुडालेले राजकीय नेते पाहत असताना सामान्यांचा ओढा नैसर्गिकरीत्या अण्णा आणि बाबांकडे गेला. लोकांनी आपल्याला प्रतिसाद का दिला, हे समजून न घेता नको ती हवा अण्णा आणि बाबांच्या डोक्यात शिरली, परिणामी एफडीआयच्या किचकट आणि गुंतागुंतीच्या विषयातही त्यांनी हात घातला. सध्या आपली अर्थव्यवस्था मोठ्या कठीण स्थितीतून जात आहे. इतर क्षेत्रांत परकीय गुंतवणूक सुरू झालेली आहे. मग फक्त रिटेल क्षेत्रात त्याला विरोध करून नेमकं काय साधणार आहे? गेली दहा वर्षे या क्षेत्रात भारतीय कंपन्यांना (रिलायन्स, मोर, बिग बाजार) मॉल उभारण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याप्रमाणे त्यांनी विविध शहरांमध्ये असे मॉल उघडलेही; पण अजूनही या मॉलमधील उलाढालीचा एकूण रिटेल क्षेत्राशी असलेला हिस्सा दोन आकडीसुद्धा नाही. मग, ही परिस्थिती असताना वॉलमार्टसारख्या कंपन्या आल्या, तर असा कितीसा मोठा फरक पडणार आहे. मोठ्या मॉलला परवानगी देत असताना शेतमाल आणि इतर उत्पादनांसाठी मोठमोठी शीतगृहे साठवणुकीची चांगली व्यवस्था, पॅकेजींगची अद्ययावत यंत्रणा या सगळ्यांवरती किमान 50% गुंतवणूक करण्याची अट शासनाने घातली आहे. गेल्या 10 वर्षांत भारतीय कंपन्यांनी हे का केले नाही? यामुळे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला असता, त्यांच्या उत्पादनांना देशाच्या बाहेर तर सोडाच, देशांतर्गतही चांगला भाव मिळाला असता. शेतमाल खरेदीचा भारतभर पसरलेला गबाळग्रंथी कारभार पाहिला तर या गोष्टींची किती नितांत आवश्यकता आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. 2011 हे वर्ष संपत असताना खुलीकरणाचे धोरण स्वीकारून 20 वर्षे उलटली असताना गल्लीतला छोटासा दुकानदारही इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे वापरत असताना आजही कृषी उत्पन्न बाजार समितीत मात्र इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे लावले गेले नाहीत. माथाडी कायद्यासारखा अतिशय जुनाट कायदा तिथे अजुनही अस्तित्वात आहे. शेतकर्‍याने स्वत:चा शेतमाल स्वत:च्या पाठीवरून वाहून नेला तरी हमालीपोटी विशिष्ट रक्कम त्याच्या बिलातून आजही वजा होते. याबद्दल एफडीआयला विरोध करणारे का आवाज उठवत नाहीत. इंग्रजांच्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत करत असताना महात्मा फुले जळजळीतपणे असं म्हणाले होते, ‘बरं झाले, इंग्रज आले; नसता या भट-ब्राह्मणांनी आमच्या पोरांना शिकूच दिले नसते.’ याच जळजळीतपणे आज सामान्य शेतकरी वॉलमार्टचं स्वागत करायला तयार आहे. कारण, जे खुलं धोरण इतर क्षेत्रांत आलं ते शेतीमध्ये आजपर्यंत येऊ दिल्या गेलं नाही. सगळा भारत इंडिया शायनिंग करत असताना, शेतकरी मात्र अंधारातच राहावा, असं धोरण 91 नंतरच्या सगळ्या शासनांनी मन:पूर्वक राबवलं. शेवटी परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाते हे पाहून अपरिहार्यपणे मनमोहनसिंग यांना थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी लागते आहे. स्थानिक राजे-रजवाडे सामान्य जनतेला छळत होते; परिणामी परकीय आक्रमक अगदी मूठभर संख्येने का असेना आले आणि त्यांनी इथल्या राजांचा पराभव केला. त्यामागचं इंगित हेच! सर्वसामान्य शेतकरी तेव्हा आपल्या शेतातच कमरेवर हात ठेवून उभा होता. आज शेतकर्‍याला लुबाडणारी बाजारव्यवस्था, राज्यकर्ते, शेतकरी विरोधी धोरणे सगळ्याला झुगारून देण्यासाठी एक हत्यार त्याच्या हाती यायची शक्यता आहे आणि दुसरीकडून सामान्य ग्राहकही त्याला स्वच्छ, स्वस्त आणि दर्जेदार वस्तू मिळण्याची आशा करतो आहे. स्थानिक दुकानदारांच्या यंत्रणेने आजतागायत ग्राहकाच्या निवड स्वातंत्र्याचा कधीही विचार केला नाही. प्रचंड मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी आणि ग्राहकांपेक्षाही किरकोळ दुकानदार, माथाडी कामगार यांच्या बोटावर मोजता येतील इतक्या संख्येसाठी घसा कोरडा करणार्‍या डाव्या आणि उजव्यांची, अण्णा आणि बाबांची कीव करावी वाटते ती त्यामुळेच! वित्तप्रवाह खेळता ठेवला तरच देशाचं आणि पर्यायानं अरिष्टात सापडलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचं हित आहे नसता या प्रवाहाचे डबके झाल्याशिवाय राहणार नाही.

शेतकर्‍याच्या पोराला सत्तेचा जोर बापाच्या गळा आत्महत्येचा दोर

-----------------------------------------
२१ नोव्हेंबर २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------

कापसाच्या पट्‌ट्यात सुरू झालेल्या आत्महत्येच्या घटनांनी पोटात गोळा उठला आहे. कापसाचे भाव उतरले असून त्यावर कुठला उपाय करावा ते सामान्य शेतकर्‍याला कळेनासे झाले आहे. उसापाठोपाठ कापूस पट्‌ट्यातही शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू लागला आहे. ठिकठिकाणी कापूस परिषदा आणि रास्ता रोकोही झाले आहे. कापसाचा लढा तीव्र होण्याची दाट शक्यता आहे; पण यासोबतच आत्महत्यांच्या बातम्यांनी मोठी खळबळ माजवली आहे. कुठलीही उपाययोजना ही तात्पुरती ठरते हे सिद्ध झालं आहे. कायमस्वरूपी कापूस, ऊस, कांदा इतकंच नव्हे सार्‍या शेतमालासंदर्भात ठोस आणि सकारात्मक धोरणं आखण्याची गरज आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजही सरकार याबाबत गंभीर नाही. सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा कोडगेपणा असा, सर्वसामान्यांचा रोष प्रत्यक्षात झेलावा लागू नये म्हणून तेही शेतमालाला भाव देण्याची भाषा करत आहेत. सामान्य शेतकर्‍याला मग स्वाभाविकच असा प्रश्र्न पडतो- ‘‘बाबा रे, मिळू दे की आमच्या पिकाला भाव! मग रोखलंय कुणी? ही जी तुझी बडबड चालू आहे ती निर्णय घेणार्‍या तुझ्या नेत्यासमोर कर की!’’
सत्ताधारी पक्ष असो की, विरोधक असो- सामान्य जनता आपल्याला सोडणार नाही, या धसकीने आंदोलक शेतकर्‍याची भाषा आधीच करू लागले आहेत. शिवसेनेने उसाला तेहतीसशे रुपये भाव मागितला. खरं तर, शिवसेना आणि त्यांचे सगळे नेते यांना आजही साखरेचं किमान अर्थशास्त्रही कळत नाही. शेतकरी संघटनेने याबाबत अतिशय समतोल आणि शास्त्रशुद्ध भाषा करत 2100 रुपये भाव मागितला होता. इतकंच नाही. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचं मुक्त कंठाने कौतुक करत शरद जोशी यांनी 2350 रुपयांचा राजू शेट्टींचा चुकलेला हिशेबही माध्यमांमधून जाहीर सांगितला होता. शेतकरी आंदोलनाने कुठलीही अवास्तव मागणी यासंदर्भात केली नाही. कारण, शेतकरी संघटनेचं तत्त्वज्ञान हे फक्त शेतकर्‍यांच्या हितापुरतं नसून सर्वच जनतेच्या हितासाठी आहे. आजही कापसाचा जो तिढा निर्माण झालेला आहे. तो सोडवण्यासाठी निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवण्याची मूलभूत मागणी संघटना करत आहे. इतर गट फक्त भावाची गोष्ट करतात. इतकंच नाही, वर्तमान पत्रात काही विद्वान शेतकर्‍यांना पेंशन द्या, असल्या बाष्कळ मागण्या करत राहतात. शिवसेनेसारख्या उठवळांनी केलेल्या 3300 रुपये भावाच्या अनुषंगाने फुकटच कारण नसताना शेतकरी संघटना आणि एकूणच शेती आंदोलनाला झोडपून काढतात. या सगळ्यांनी शेतकरी संघटनेने अगदी आधीपासून याबाबत केलेली मागणी समजून घेतली, तर असले घोळ ते करणार नाहीत.
सत्ताधार्‍यांना सत्तेचा विलक्षण माज चढलेला आहे. फक्त तोंडदेखले ‘कापसाला 6000 रुपये भाव भेटला पाहिजे’ अशी तेही मागणी करू लागले आहेत. प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्या यांची किंगफिशर कंपनी बुडू लागली तर तिला सावरलं पाहिजे असलं निर्लज्ज विधान सत्ताधारी करतात. तेव्हा काय करावं तेच कळत नाही! आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांमध्ये उघड्यानागड्या पोरी नाचवणार्‍या विजय मल्ल्यांची शासनाला किती ही काळजी! आणि तेच अर्धपोटी उघड्यानागड्या शेतकर्‍याकडे पाहायलाही वेळ नाही. आपल्या आत्महत्येनं आपलं एकूणच आंदोलन लाल रंगात लिहून ठेवणार्‍या गरीब बिचार्‍या कुणब्याची अक्षरे सत्ताधार्‍यांच्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांना दिसतो तो विजय मल्ल्यांचा चकचकाट आणि तो मंद होऊ लागला की, यांच्या पोटात कालवाकालव सुरू होते. हातावर पोट असणारा सर्वसामान्य शेतकरी निर्यातबंदी उठवा म्हणून तळमळीने सांगतो आहे. देशाला परकीय चलन मिळावं म्हणून धडपडतो आहे. जागतिक व्यापारात आपला हिस्सा वाढावा म्हणून खस्ता खातो आहे. आपल्याला मिळणार्‍या चार पैशांसोबत देशाचंही कल्याण झालं पाहिजे ही व्यापक भूमिका ठेवतो आहे आणि तिकडे स्वत:चे शोक पुरवण्यासाठी हिडीस चाळे करणार्‍या विजय मल्ल्याच्या बुडणार्‍या कंपन्यांना मदत देण्याची भाषा चालू आहे.
शेतकर्‍यांच्या आत्महत्येने गेलं दशक गाजलं आहे. आपल्या आत्महत्येने या शासनाचं डोकं वठणीवर येत नाही, असा संदेश जर शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला तर ही पिढी आक्रमक होऊन हत्या करणार नाही, याची काय खात्री? सत्ताधार्‍यांनी आपलीच खुर्ची टिकवण्यासाठी केलेल्या खेळामुळे शेतकरी बापाच्या गळ्याभोवती आत्महत्येचा दोर आवळला जातो आहे. आता नुसती भाषा करून भागणार नाही. प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे. सगळ्या सगळ्या पॅकेजेसचा, सहकारी बँकांचा, सर्व सरकारी योजनांचा ग्रामीण भागात पूरता बोजवारा उडालेला स्पष्ट दिसतो आहे. या गाळप हंगामानंतर जवळपास अर्धेअधिक कारखाने भंगारमध्ये काढायची वेळ येणार आहे. कापूस खरेदी योजनेचा तर केव्हाच बट्‌ट्याबोळ झाला आहे. तेव्हा आता प्राप्त परिस्थितीवर उपाय म्हणून सगळ्या फालतू कल्याणकारी योजना शासनाने बंद करून स्पष्ट व स्वच्छपणे काटकसरीने प्रशासनाची व्यवस्था लावायला पाहिजे. गरिबांच्या नावाखाली स्वत:चा पोट भरण्याचा धंदा थांबल्याशिवाय सामान्य शेतकर्‍याला आणि सर्वच जनतेला दिलासा मिळणार नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पडलेले आहेत. या परिस्थितीत निर्यात खुली करून जास्त भाव भेटेल ही शक्यता नाही; पण दूरगामी विचार करता निर्यातबंदी कायमस्वरूपी हटवण्याची हीच वेळ आहे. साखर उद्योगात सहकार पुरता अडकला आहे. तोही उद्योग नियंत्रणमुक्त करायची हीच वेळ आहे. तेव्हा सत्ताधार्‍यांनी सत्तेचा जोर दाखविण्याच्या इर्षेपोटी शेतकरी बापाच्या गळ्याभोवतीचा आत्महत्येचा दोर आवळत नेऊ नये इतकीच अपेक्षा!

साखर कडू, डोळा रडू

-----------------------------------------
६ नोव्हेंबर २०११ शेतकरी संघटक मधील अग्रलेख
-----------------------------------------

पश्र्चिम महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून साखरेचं साम्राज्य उभारल्या गेलं. या साम्राज्याच्या आधारावर राजकीय नेत्यांनी आपले पक्ष वाढवले. वर्षानुवर्षे त्या माध्यमातून सत्ता उपभोगली. कायम असा देखावा उभा केला गेला की, सहकार म्हणजेच समृद्धी! गेल्या तीस-चाळीस वर्षांत जे चित्र समोर आलं आहे त्यातून हे आता निर्विवादपणे सत्य दिसत आहे- सहकार म्हणजे समृद्धी; पण ती फक्त नेत्यांची! शेतकर्‍यांची आणि एकूणच अर्थव्यवस्थेची या व्यवस्थेने मातीच केली आहे. बागायती क्षेत्राला दिलेलं पाणी सगळ्यांत जास्त उसानं पिऊन टाकलं आणि बदल्यात डोक्यावर कर्जाचे डोंगर घेऊन दबून गेलेले सहकारी कारखाने शिल्लक ठेवले. कितीही थकहमीचे सलाईने लावले तरी हे कारखाने पुन्हा जीव धरणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. एखाद्या वयोवृद्ध बिलकुल जगण्याची आशा नसलेल्या माणसाला स्वत:च्या व्यवहारिक स्वार्थासाठी मोठमोठ्या हॉस्पीटल्समधून व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. सगळ्यांना माहीत असतं आज किंवा उद्या ‘कडबा, बांबू, मडकं, पांढरं कापड’ याची तयारी करावी लागणारच आहे;  पण तरी सगळे मिळून म्हातार्‍याला वाचवतो आहोत, असा देखावा उभा करतात. त्यात जसा डॉक्टरांचा स्वार्थ असतो, तसाच पोराबाळांवरही दबाव असतो. त्यांनाही समाजात सांगता येतं की, बापासाठी आम्ही शेवटपर्यंत खूप काही केलं. आजच्या राज्यकर्त्यांची सहकारी साखर कारखान्याबाबतची भूमिका अगदी ही अशीच आहे. सहकारी साखर कारखानदारी मरून गेली आहे. हे आता वेगळं सांगायची गरज नाही. शेतामध्ये इतका प्रचंड ऊस उभा आहे आणि शरद पवार असोत, की विरोधी पक्षातले गोपीनाथ मुंडे असोत दोघेही हातात हात घालून ऊसतोड कामगारांसाठी लवाद म्हणून बसत आहेत. त्यांनाही हे स्पष्ट माहीत आहे. मजुरी तर सोडाच- ऊस तोडायला माणसंच उपलब्ध नाहीत. यंत्राशिवाय पर्याय नाही; पण घोषणा मात्र ऊसतोडणी मजुरांच्या लवादाची. लगेच तिकडून अमूक अमूक मजुरी भेटल्याशिवाय कारखाना चालू देणार नाही, असल्या गर्जना अर्धवट डोक्याचे शेतकरी नेते करत आहेत. म्हणजे आधीच वेगवेगळ्या कारणांनी शासन डबघाईला आलंच आहे, त्यात परत साखरेचं ओझं शासनावर टाकलं की झालं! जसं बुडत्याला काडीचा आधार म्हणतो, याच्या नेमकं उलट बुडत्या शासनाला साखरेची ही काडी जरी पडली तरी त्याला बुडायला आयतंच निमित्त सापडेल.
शेतकरी संघटनेने 30 वर्षांपूर्वीपासून शेतमालाच्या निर्यातबंदीबाबत अतिशय स्पष्ट, व्यवहारिक, सर्व समाजाचे हित पाहणारी भूमिका घेतली होती. साखर उद्योग नियंत्रणमुक्त करा ही भूमिका सगळ्या काळात आणि सगळ्या समाजाच्या हितासाठी तेव्हाही योग्य होती आणि आताही योग्य आहे. आज देशात आणि देशाच्या बाहेरही साखरेचे भाव पडलेले आहेत. अजून पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कारखान्यांना उसापासून साखर काढण्यापेक्षा इथेनॉल, मद्यार्क, वीज असा कुठलाही मार्ग उपलब्ध असायला हवा. किंबहुना त्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवे. उसापासून इतर गोष्टी व्हाव्यात म्हणून सहकाराचं जे भूत आमच्या मानगुटीवर बसलं आहे, ते पहिल्यांदा उतरायला हवं. ज्या ज्या क्षेत्रांतून सरकार हद्दपार झालं त्या त्या क्षेत्रांचं भलं झालं हे आपण बघतच आलो आहोत. कापसाचा एकाधिकार होता तोपर्यंत शेतकर्‍याचं फार मोठ्या प्रमाणात शोषण झालं. कापूस एकाधिकार संपला तेव्हा कुठे कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी मोकळा श्र्वास घेतला आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या. उसाच्या बाबतीत जर सहकार गेला नाही, तर ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्या व्हायला सुरुवात होईल. जे सहकारी साखर कारखाने सध्या कार्यरत आहेत. त्यांची गाळप क्षमता अतिशय कमी आहे आणि त्याच्या उलट जे कारखाने खाजगी क्षेत्रातून उभारल्या गेले आहेत. त्यांची गाळप क्षमता आणि कार्यक्षमता प्रचंड प्रमाणात जास्त आहे. इतकंच नाही, या कारखान्यांनी विजेची निर्मितीही करण्याची महत्त्वाकांक्षी धोरणे आखली आहेत- इतकंच नाही, रांजणी (जि. उस्मानाबाद) असो किंवा गंगाखेड (जि. परभणी) असो येथील कारखान्यांनी हे सिद्धही केले आहे. मुद्दा आहे राजकीय इच्छाशक्तीचा... हे जर होऊ द्यायचं नसेल तर हा सहकाराचा भस्मासूर राज्यकर्त्यांवर उलटल्याशिवाय राहणार नाही. पश्र्चिम महाराष्ट्रात शेतकर्‍यांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. त्याला कसं तोंड द्यायचं हे शासनाला अजूनही कळत नाही. शासनाला कळत नाही हे एक वेळ समजता येतं; पण उसाला दरवाढ मागणार्‍या कित्येक शेतकरी नेत्यांनाही याची काडीचीही अक्कल नसावी ही मोठी आश्र्चर्याची गोष्ट आहे. एकीकडे जागतिकीकरण म्हणायचं आणि दुसरीकडे शेतीमध्ये मात्र अजूनही चूड दाखवून शासनाच्या हस्तक्षेपाचा चोर घरामध्ये बोलावून घ्यायचा हे मोठं अजब आहे. कापूस एकाधिकार संपलेला या नेत्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी बघितला आहे. मग उसाच्या बाबतीतही सहकार पूर्णपणे हद्दपार करून शासनाला हटवण्याची भाषा शेतकरी नेते का करत नाहीत? की त्यांना हे कळत नाही? की कळून घ्यायचं नाही?
साखरेच्या आणि एकूणच शेतीमालाच्या बाबतीत निर्यातबंदी पूर्णपणे उठविण्याची स्वच्छ आणि स्पष्ट मागणी सगळ्या आंदोलनकर्त्यांनी केली पाहिजे. फक्त शरद जोशींनी 23 ऑक्टोबरच्या करमाळ्यातील ऊस परिषदेमध्ये हे धोरण काय असावं याबाबत स्पष्ट विवेचन केलेलं आहे. इतर शेतकरी नेत्यांना आजही हा प्रश्र्न कळालेला नाही आणि म्हणूनच मांडताही आलेला नाही. टॅ्रक्टरचे टायर पंक्चर कर, रस्ता अडव, कारखाना बंद पाड, असल्याच जुन्या-पुराण्या आणि गंजलेल्या शस्त्रांनी ते लढत आहेत. शासन आधीच घायकुतीला आलेलं आहे. त्याच्यावरती शेवटचा घाव घालण्याची हीच संधी आहे. खरे तर, परिस्थिती अशी आहे, प्रत्यक्ष घाव घालण्यापेक्षा घाव घालण्याचा आव आणला तरी पुरेसा आहे. तितकंच निमित्त करून यातून बाहेर पडू पाहणारे शासन लगेच बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. इतर शेतकरी नेत्यांना ही अक्कल येत नाही याला काय म्हणावे? कदाचित त्यांचे बोलविते धनी वेगळेच असावेत.