Thursday, September 23, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ६०



उरूस, 22 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 178

(किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. त्यावर उलट त्यांच्यावरच कोल्हापुर जिल्हाबंदीचा आदेश लागू करण्यात आला. )

रोज पोलखोल । आणतोय झीट ।
सोमय्या किरीट । महाराष्ट्री ॥
कोल्हापुरामध्ये । प्रवेशाला बंदी ।
आरोपाची बुंदी । रोज पाडे ॥
पन्नास शंभर । कोटींचे आरोप ।
बदनामी खुप । होत आहे ॥
हजारो कोटींत । आमचा नंबर ।
पन्नास शंभर । शोभेची ना ॥
एकट्याच्या नको । उखाळ्या पाखाळ्या ।
पकडा महाळ्या । मुख्य तोची ॥
सेना राष्ट्रवादी । आरोपात बाजी ।
प्रकटे नाराजी । कॉंग्रेसची ॥
सत्ता म्हणजेच । भ्रष्टाचार गंगा ।
हर एक नंगा । कांत म्हणे ॥
(20 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 179
(राजस्थानमध्ये मुस्लिम जमावाने दलित तरूणांची मारहाण करून हत्या केली. यावर आता सर्व पुरोगामी चुप्प आहेत. पंजाबमध्ये दलित चेहरा मुख्यमंत्रीपदी बसवला म्हणून स्वत:ची पुरोगामी आरती ओवाळणारे याच कॉंग्रेसची राजवट असलेल्या राजस्थानमध्ये दलितांच्या ‘लिंचिंग’बद्दल मौन बाळगतात हा दुट्टप्पीपणा आहे.)

राजस्थानमध्ये । दलिताची हत्या ।
पंजाबात सत्ता । देखावा तो ॥
दलित वापरू । इलेक्शन तोंडी ।
बाकी त्यांची कोंडी । सदोदीत ॥
जगजीवनांना । सदा वापरले ।
नाही बसवले । उच्च पदी ॥
निवडणुकीत । सुशील कुमार ।
निकाला नंतर । देशमुख ॥
हरियाणामध्ये । शैलजा कुमारी ।
सत्तेची पायरी । दुय्यमच ॥
कॉंग्रेस धोरण । बाबासाहेबांना ।
भारतरत्न ना । कधी दिले ॥
कांत राजकिय । वेशीच्या बाहेर ।
मानाचा आहेर । दलितां ना ॥
(21 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-180

(सेनेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार हे कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसणारे आहेत. ते आमचे नेते कसे काय होवू शकतील? असा सवाल करून मोठा गदारोळ उठवून दिला आहे. आम्ही बाळासाहेबांचे निष्ठावंत असा सुर त्यांनी आपल्या भाषणात लावला होता.)

गीतेमुळे तेंव्हा । अर्जून पेटला ।
शत्रुला खेटला । जोरदार ॥
‘गीते’मुखी आता । शब्दबाण सुटे ।
सैनिक हा पेटे । मनोमन ॥
खुपसून ज्यांनी । पाठीत खंजीर ।
सत्तेचा अंजीर । मिळविला ॥
आमुचा तो नेता । कशास म्हणता ।
राजा हा जाणता । म्हणो कुणी ॥
बाळासाहेबांचे । आम्ही निष्ठावंत ।
नाही सत्ताजंत । लाचार जे ॥
‘अनंत’मुखाने । प्रगटली वाणी ।
विद्रोहाची गाणी । ‘गीते’तुनी ॥
कांत सत्तेसाठी । असंगाशी संग ।
उडू लागे रंग । आघाडीचा ॥
(22 सप्टेंबर 2021)


श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment