उरूस, 10 सप्टेंबर 2021
उसंतवाणी- 166
(बेळगांव मनपाच्या निवडणुकीत शिवसेनेने काहीच कारण नसतांना उडी घेतली. म.ए.समितीला पाठिंबा दिला. वास्तविक लोकसभेच्या पोट निवडणुकीत समितीचा उमेदवार अमानत रक्कम गमावून बसला होता. तेंव्हा आता हात पोळून घेण्याचे शिवसेनेला काहीच कारण नव्हते. पण संजय राउत यांनी विनाकारण हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आणि आपले नाक कापुन घेतले.)
बेळगांवी झाले । इलेक्शन छोटे ।
सेनेला हे मोठे । धडे दिले ॥
तोंड झाले कडू । बेळगांवी कुंदा ।
अस्मितेचा धंदा । आटोपला ॥
तोंड दावायाला । उरली ना जागा ।
संजयाचा त्रागा । माध्यमांत ॥
मराठी माणसे । येती निवडुन ।
भाजपाकडून । सुखेनैव ॥
नउपैकी सहा । इस्लामचे बंदे ।
कॉंग्रेसचे धंदे । जाणा जरा ॥
तरी संजयाला । कॉंग्रेसचा लळा ।
पुरोगामी शाळा । आवडते ॥
मराठी अस्मिता । बोथटे तल्वार ।
बदला हत्यार । कांत म्हणे ॥
(8 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी- 167
(बेळगांव निवडणुकांत भाजपला अपशकून करणे हेच धोरण शिवसेनेचे राहिले आहे. महाराष्ट्राच्या बाहेर आपली ताकद नसताना राजकीय उठाठेव सेना करत आली आहे प्रत्येकवेळी त्यांना दारूण पराभवाला तोंड द्यावे लागले. उत्तर प्रदेशची 2017 ची निवडणुक याचे सर्वात मोठे उदाहरण.)
लंडन पालिका । फडकवु झेंडा ।
सेनेचा अजेंडा । संजु म्हणे ॥
फडणविसांना । देताना दणका ।
तुटतो मणका । आपलाच ॥
नवरा मरू दे । नाही हरकत ।
रंडकी सवत । होवू दे गा ॥
मोदी भाजपचे । कापण्यास नाक ।
धावे हाकनाक । प्रवक्ता हा ॥
बेळगावी आले । 36 मराठी ।
तरी ही तुर्हाटी । मराठीची ॥
महाराष्ट्र देशी । पक्ष चतकोर ।
तरी भाषा थोर । देशव्यापी ॥
आधाराचे नव्हे । दिखाव्याचे खांब ।
जीभ सैल लांब । कांत म्हणे ॥
(9 सप्टेंबर 2021)
उसंतवाणी-168
(आज गणेश चतुर्थी. देवापाशी एकच मागणे की आमच्या नेत्यांना सद् बुद्धी दे.)
विनवितो तुला । देवा गजानना ।
बुद्धी दे नेत्यांना । आमच्याच ॥
धर किंवा सोड । अध्यक्षपदाला ।
राहूल गांधीला । सांग जरा ॥
कॉंग्रेस पाठिंबा । विरोधाचा खेळ ।
मिटव गोंधळ । पवारांचा ॥
जातींमध्ये जिची । अडकली मती ।
ऐसी मायावती । सांभाळ रे ॥
नावाने ममता । वृत्तीने अंगार ।
बंगाली संसार । नीट चालो ॥
फेकु नको फक्त । मोदीला हे सांग ।
भारताचे पांग । फेड ऐसे ॥
कांत मागतसे । लेखणीला बळ ।
अन्यायाचे वळ । मिटविण्या ॥
(10 सप्टेंबर 2021)
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment