Monday, September 6, 2021

उसंतवाणी - राजकीय उपहास- भाग ५४

 

उरूस, 4 सप्टेंबर  2021 

उसंतवाणी- 160

(थोरले बाजीराव पेशवे व मस्तानीबाईसाहेब यांचे वंशज आज इंदोरात आहेत. त्यांना आपण अजूनही स्विकारलेले नाही याची त्यांना खंत आहे.)

पेशव्यांचा वंश । इंदोरी जिवंत ।
रक्त जातीवंत । अस्सल ते ॥
आम्ही विसरलो । त्यांची आठवण ।
मस्तानीचा वण । मिटेचीना ॥
मराठा गादीशी । दावुनिया निष्ठा ।
जपली प्रतिष्ठा । स्वराज्याची ॥
मस्तानीचा वंश । नाव ‘बहादूर’ ।
जपले सुदूर । नाते त्यांनी ॥
मराठी नावांना । अजुनी ठेवती ।
राउंचा जपती । अभिमान ॥
बांद्याचे नवाब । पेशवे भावकी ।
प्रेमाची मालकी । द्यावी त्यांना ॥
कांत आपलाच । सारा गोतावळा ।
पांघरू जिव्हाळा । स्नेहभावे ॥
(2 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी- 161

(सय्यद शाह गिलानी याचा 92 व्या वर्षी मृत्यू झाला. हुरियतचा हा नेता पाकिस्तानवादी होता. त्याच्या मृत्यूवर पुरोगाम्यांनी बोंब केली. त्याची अंत्ययात्रा का काढू दिली नाही वगैरे..)

वयोमाने मेला । सय्यद गिलानी ।
सुरू रडगाणी । सेक्युलर ॥
पाकिस्तानचा हा । कश्मिरी एजंट ।
गद्दार करंट । रक्तामध्ये ॥
कुटुंबा समक्ष । दफनला त्याला ।
नाही बोलबाला । होवू दिला ॥
ना कुठे आवाज । नाही बँडबाजा ।
नमाजे जनाजा । काही नाही ॥
त्यामुळे उठली । बोंब पुरोगामी ।
वृत्तीने हरामी । देशद्रोही ॥
कश्मिरी मारले । काय त्यांचा गुन्हा ।
तेंव्हा नाही पान्हा । फुटे यांना ॥
कांत म्हणे मरो । गद्दार सुखाने ।
मनाने मुखाने । शोक नको ॥
(3 सप्टेंबर 2021)

उसंतवाणी-162

(अनिल देशमुख प्रकरणांत त्यांच्या वकिलालाच अटक झाली. एक धक्कादायक वळण त्या प्रकरणाला भेटले आहे.)

वकिल जेलात । आरोपी फरार ।
नविन थरार । राज्यामध्ये ॥
समन्स समन्स । पडला पाऊस ।
देशमुखा हौस । लपण्याची ॥
ईडीचे वळण । किती नागमोडी ।
घरांवर धाडी । जागजागी ॥
करून पाहिला । क्लीन चीट ड्रामा ।
उलटे हंगामा । स्वत:वर ॥
कोर्टातल्या फेर्‍या । आषाढी कार्तिकी ।
झाले ना सार्थकी । काहीसुद्धा ॥
साथीला ना कुणी । अ‘जाणते’ राजे ।
स्वप्नी राज वाझे । भिववितो ॥
कांत म्हणे वाके । सोयीने कायदा ।
स्वत:चा फायदा । होण्यासाठी ॥
(4 सप्टेंबर 2021)

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 





No comments:

Post a Comment