Tuesday, June 4, 2019

सार्वकालिक सत्याचा पुनश्च शोध : 'माझी गीता'


अक्षर मैफिल, जून २०१९ 

देवदत्त पटनायक हे नाव आता भारतीय आणि मराठी वाचकांना चांगलेच परिचित झाले आहे. पुराणविषक, आर्ष महाकाव्य विषयक त्यांच्या ग्रंथांना चांगला वाचक वर्ग लाभला. त्यांच्या जवळपास सर्वच महत्त्वाच्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाले आहेत. 

त्यातही महाभारतावर त्यांनी लिहीलेल्या ‘जय’ पुस्तकाचा ऍड. अभय सदावर्ते यांनी केलेला अनुवाद विशेष उल्लेखनिय आहे. उल्लेखनिय यासाठी की सदावर्ते यांनी पटनायक यांचे भाषावैभव मराठीत संपूर्ण न्याय देत आणले. आताही गीतेवरचे देवदत्त पटनायक यांचे ‘माझी गीता’ हे पुस्तकही सदावर्ते यांनीच अनुवादले आहे. 

पटनायक यांनी त्यांच्या गीतेवरच्या पुस्तकाला ‘माझी गीता’ असं नाव दिले नसते तरी त्याला त्यांची गीता असंच समजले गेले असते. कारण आत्तापर्यंत ज्या ज्या वेळी गीतेवर भाष्य लिहील्या गेले तेंव्हा तेंव्हा त्या प्रतिभावंताचा एक दृष्टीकोन त्याला प्राप्त झालाच. त्यामुळे अगदी शंकराचार्यांपासून ते मराठीतील ज्ञानेश्वरांपर्यंत अगदी लोकमान्य टिळकांपासून ते विनोबा भाव्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी गीतेवर लिहीले त्याला त्या त्या व्यक्तिमत्वाचा रंग प्राप्त झाला आहे. 

पटनायक यांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आधुनिक काळात लिहीत असताना नविन वाचकांना, नविन पिढीला आपल्या लोभस साध्या पण आकर्षीत करून घेणार्‍या ओघवत्या शैलीत बांधून ठेवले आहे. केवळ नविन पिढीच नव्हे तर आत्तापर्यंत जो वाचकवर्ग या विषयांकडे वळत नव्हता असा एक आधुनिक वर्गही पटनायक यांनी खेचून घेतला आहे. मराठीपुरतं म्हणायचे झाले तर वारकरी संप्रदाय किंवा इतर धार्मिक संप्रदायांच्या संतांनी अभ्यासकांनी भरपूर ग्रंथ निर्मिती करून ठेवली आहे. पण त्याचा वाचकवर्ग त्यांच्या प्रभावातील शिष्यांच्या बाहेर दिसत नाही. 

स्वातंत्र्यानंतर एक आधुनिक असा वाचकवर्ग संपूर्ण भारतभर तयार झाला. त्याच्या परिभाषेत त्याला समजेल अशा पद्धतीने हे विषय मांडण्याची गरज होती. पटनाक यांनी ही गरज काही प्रमाणात दूर केली. 
पहिल्याच प्रकरणात गीतेविषयी आपली वेगळी भूमिका पटनायक यांनी कमी शब्दांत पण नेमकेपणाने मांडली आहे. गीतेतील श्लोकांचा आधार घेत मानवी शरिराला नऊ छिद्र आहेत. प्रकृती आणि पुरूष असे दोन मिळून ही संख्या 18 होते. गीतेचे अध्याय अठराच आहेत. महाभारतातील पर्वही अठराच आहेत. या अनुषंगाने मांडणी करत गीताही तपस्व्यांपेक्षाही गृहस्थांसाठीच कशी आहे अशी एक ठसठशीत गृहस्थधर्म अधोरेखीत करणारी मांडणी पटनायक हे करतात. 

दुसर्‍या प्रकरणात लेखकाने गीतेआधीच्या व्याधगीतेचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख फारच कमी ठिकाणी केल्या गेला आहे. पांडवांच्या विजनवासातील ही कथा आहे. एका तपस्व्याला एका पारध्याने केलला उपदेश म्हणजेच ही व्याधगीता होय. गीतेशी या व्याधगीतेचा धागा जोडताना पटनायक यांनी दोन्हीची पार्श्वभूमी कशी हिंस्र होती हे तर नोंदवले आहेच. पण आपल्या मूळ गृहस्थाधर्मी विचाराकडे आणताना, ‘या दोन्ही गातोपदशांमध्ये भौतिक जगाकडे पाठ फिरवून रानावनातील एकांतात संन्यस्त आयुष्य कंठण्यापेक्षा समाजात राहून गृहस्थाधर्माचे आचरण करणे हेच श्रेष्ठ आहे, असे सांगितलेले आढळते.’ (पृ. 16,17). 

याच प्रकरणात एका रेखाचित्राद्वारे वेदकाळापासून ते आगमांच्या मंदिर कालखंडापर्यंतची एक मांडणी नेमक्यापद्धतीने आली आहे. गीतेच्या निमित्ताने पटनायक आपल्या संस्कृतिचा एक आख्खा पटच उलगडून दाखवू पहात आहेत. हे मला फार महत्त्वाचे वाटते. शिवाय इतिहासाकडे पाहण्याचा पाश्चात्यांचा आणि आपला दृष्टीकोन अशी एक तूलना करतही त्यांनी या विषयाला समकालीन वास्तवापर्यंत आणून ठेवले आहे. 
जे रेखाचित्र या प्रकरणात आले आहे ते असे आहे. कालक्रमाने हे टप्पे लेखक नोंदवत जातो. 

ऋग्वेद (ऋचा/स्तोत्रे)- सामवेद (नादमधुर सुरावटी)- यजुर्वेद (कर्मकांड)-उपनिषदे (तर्कविलास)-गीता (गाणे)- पुराणे (कथा)-आगम (मंदिर). केवळ एक कालपट्टीवर या गोष्टी ठेवत बर्‍याच वैशिष्ट्यांचा उलगडा लेखकाने केला आहे.

गीतेवर भाष्य करणारे अभ्यासक यांच्यावर लिहीताना पाच टप्प्यांचा उल्लेख केल्या गेला आहे. इस्लामचे भारतातील आगमन आणि पहिली मशिद पैगंबरांच्याच हयातीत स्थापन झाली तो काळ आणि लगेच त्याच केरळात आदी शंकराचार्यांनी गीतेवर केलेले भाष्य हा संदर्भ जोडून एक वेगळाच पैलू पटनायक समोर आणतात. एकेश्वर वादी धर्म भारतात यायल्या लागल्यानंतर गीतेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आणि त्याचा वेगळा अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न आठव्या शतकात आदिशंकराचार्य सारख्यांनी केला. त्यांच्या नंतर अकराव्या शतकातील तमिळनाडूतील रामानुजाचार्य, तेराव्या शतकातील कर्नाटकातील मध्वाचार्य यांनी गीतेवरील भाष्ये लिहीली. या तिघांनाही परमेश्वराचे स्वरूप आणि त्याचे माणूसकिचे असणारे नाते समजून घेण्याची गरज होती.

दुसरा टप्पा लेखक जो नोंदवतो तो प्रादेशीक भाषांतील गीतेवरील रचनांचा आहे. ज्यात सगळ्यात जूनी रचना मराठीतील ज्ञानेश्वरांचीच आहे. निरमण पण्णीकर (तमिळ-14 वे शतक), पेदा तिरूमलाचार्य (तेलगू-15 वे शतक), बलरामदास (ओरिया-15 वे शतक), गोविंद मिश्रा (असामी-16 वे शतक), दासोपंत (मराठी-17 वे शतक) अशी यादीच दिली गेली आहे. ही सगळी निरूपणे कविंनी लिहीलेली असल्याने ती रसाळ व भक्तीगीतांसाठी पोषक व सोयीची आहेत. 

तिसरा टप्पा हा युरोपातील गीतेच्या भाषांतराचा व त्या अनुषंगाने मांडणी करणार्‍यांचा आहे. चौथा टप्पा भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडातील आहे. योगी अरविंद, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांनी गीतेवर केलेली भाष्ये यात पटनायकांनी गृहीत धरली आहेत. 

पाचवा टप्पा हा जगाच्या पुनर्रचनेचा कालखंड आहे असे समकालीन आकलन लेखकाने मांडले आहे. गीतेची सध्या तीन हजार भाषांतरे जगातील 50 भाषांत उपलब्ध आहेत. 

या सगळ्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेताना प्रकरणाच्या शेवटी लेखक म्हणतो, ‘सार्वकालिक सत्याचा पुनश्च एकदा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘माझी गीता’ होय !

इथून पुढे पटनायक यांनी ‘तू’ आणि ‘मी’ हा संवाद मांडत अठरा प्रकरणे दिली आहेत. त्यांची रचना काहीशी विषानुरूप आहे. ती गीतेच्या अठरा अध्यायांप्रमाणे नाही. मागचे पुढचे श्लोक एकत्र करून एक विषय अर्थाप्रमाणे मांडत जाण्याची एक विलक्षण अशी वेगळी रचना इथे केलेली आढळते. त्याचा सामान्य वाचकाला आकलनासाठी अतिशय चांगला उपयोग होतो. उदा. पहिल्याच प्रकरणाचे शिर्षक ‘तू आणि मी न्यायधीश होण्याची गरज नाही’ असे आहे. ख्रिश्‍चन किंवा इस्लाम प्रमाणे जजमेंट डे किंवा कयामत ही संकल्पना हिंदू धर्मात नाही. त्यामुळेच कृष्ण हा निवाडा करणार्‍याच्या न्यायाधिशाच्या भूमिकेत नाही. तो कुणाकडेही बळी म्हणून पहात नाही. आयुष्य म्हणजे या रंगभूमीवरचा प्रवेश आहे. इतरांच्या आनंदात आपण आनंद मानायचा आहे. अशी अवघड तत्त्वज्ञानाची सुलभ मांडणी पटनायक यांनी केली आहे. दुसर्‍या प्रकरणांत पुनर्जन्माचा विचार मांडला आहे. अशी अठरा प्रकरणे विषयानुरूप दिली आहेत. 

या सगळ्या मांडणीत महाभारत रामायण काळातील गोष्टी लेखकाने सुलभतेने पेरल्या आहेत. त्यामुळे अर्थ बोध होण्यासाठी सामान्य वाचकाला मदत होते. अकराव्या प्रकरणात हनुमंताची आणि भीमाच्या गर्वहरणाची गोष्ट येते आणि त्यासोबतच , ‘आपल्या आजूबाजूला असणार्‍या कुणाच्याही सुप्त सामर्थ्याला कमी लेखू नकोस असा कानमंत्रही भीमाला दिला.’ असे वाक्य येवून जाते (पृ. 197).

बाराव्या ‘तू आणि मी जूवळून घेवू शकतो’ या प्रकरणांत गीतेनंतर जवळपास एक हजार वर्षांनंतर भक्तिसंप्रदाय कसा विकसित होत गेला हे सांगताना भक्तिमार्गाला दोन वाटा फुटल्याचे निरीक्षण लेखक नोंदवतो. या दोन वाटा पुरूषी आणि स्त्री वृत्तीचे प्रतिनिधीत्व करतात. आपल्या उपास्य देवतेपुढे शरणागती, ब्रह्मचर्य आणि संयम याचे मूर्तरूप म्हणजे हनुमंत. तर ममत्त्व, विषयासक्ती आणि अपेक्षा या स्त्री भावनेचे प्रतिनिधीत्व म्हणजे यशोदा व राधा. याच्यापुढे एक वेगळा मुद्दा येतो. भक्तीच्या तत्त्वज्ञानातील पुरूषी मार्ग हा हिंदू मठवासियांनी निवडला. तर भक्तीच्या स्त्रीभावनेला प्राधान्य देणारा मार्ग देवदासी, देवळातले नर्तक आणि नर्तिका यांनी अनुसरला. कलेच्या बाबतीत ही मांडणी कुणीतरी पहिल्यांदाच ठळकपणे केली आहे. 

भक्तिसंप्रदायात कृष्ण कसा महत्त्वाचा ठरतो हे सांगताना शिव तपस्वी भूकेपासून मुक्त होतो तर राम त्राता भूक भागवतो. पण कृष्ण  प्रेमिक आणि जिवलग बनून भूक भागवतो आणि अन्नही मागतो. शिव व राम एकतर्फी आहेत तर कृष्ण दुतर्फी आहे अशी एक विलक्षण मांडणी पटनायक करतात. 

अठराही प्रकरणांत फार वेगळ्या पद्धतीनं, विज्ञानाच्या मार्गानं काही आलेख रेखाचित्र मांडत, सारणीचा प्रयोग करत (टेबल) विषय प्रतिपादन करण्याची पटनायक यांची पद्धत मोहक आहे. 

समारोपात गीतेत सांगितलेले एक महान सत्य पटनायक आजच्या काळातील वाचकाला पटावे असे सोप्या आणि संयुक्तिक पद्धतीनं मांडतात. ही सगळी परिभाषा अगदी आजच्या काळाला लागू पडते. 

गीतेतील तीन मार्ग सांगताना पटनायक लिहीतात, ‘... कर्मयोगाचा अवलंब केल्याशिवाय आपल्याजवळ इतरांना देण्यासारखे किंवा आपण अन्य कुणाकडून काही घेण्यासारखे असणार नाही.  आयुष्यात भक्तियोग नसेल तर आपले एखाद्या यंत्रात रूपांत होईल. यंत्रांना जसे इतरांबद्दल काहीही वाटत नाही तशी आपलीही अवस्था होईल. ज्ञानयोगाची उपासना नसेल तर, आपले मूल्य शुन्यावर येईल, आपले आयुष्य अर्थहीन होईल, कुठलेही उद्दिष्ट डोळ्यांसमोर नसल्यामुळे ते भरकटेल.’

इतक्या मोजक्या ओळीत गीतेचे सार पटनायक समोर ठेवतात तेंव्हा वाचकाच्या मनात समाधानाची उत्तरे मिळाल्याची भावना निर्माण होते. हे फार मोठे श्रेय लेखकाचे आहे. रेखाचित्रांचा वापर तर वैशिष्ट्यपूर्ण आहे. असा वापर पूर्वी कधी झाल्याचे आढळत नाही. इतिहासाकडे पाहण्याचा पुरूषी दृष्टीकोन सांगण्यासाठी उलट सुलट त्रिकोण एकमेकां समोर ओळीने ठेवले आहेत. पण स्त्री दृष्टीकोन मांडताना एकमेकांच्या केंद्राशी जूळलेली वतुळे काढत अतिशय नेमका अर्थ समोर ठेवला आहे. 

हा अनुवाद करताना नेमके शब्द हूडकून त्यांचा वापर सदावर्तेंनी केला आहे. त्यामुळे या अनुवादाला एक मराठमोळा पेहराव प्राप्त झाला आहे. आता आत्मा हा शब्द वापरत असताना त्याऐवजी ‘मन’, ‘चैतन्य’, ‘प्राण’, ‘देही’, ‘ब्रह्मन’, ‘पुरूष’ असे शब्द कसे येतात हे सगळं भाषांतराच अगदी अचुक सदावर्ते घेतात हे विशेष. मुळ इंग्रजी शब्दांसाठी सदावर्तेंनी प्रयत्न पूर्वक निवडून हे शब्द घेतले आहेत. अशी अनेक उदाहरणे पुस्तकात विखुरली आहेत. एक फार महत्त्वाचे पुस्तक मराठीत आणले म्हणून अनुवादकाला विशेष धन्यवाद. गीतेवरची सगळ्यात पहिली प्रादेशीक भाषेतील टीका मराठीतच उपलब्ध आहे. या आपल्या महान परंपरेत अनुवादकानेही आपले योगदान दिले आहे.

पुस्तकाची बांधणी साधी आणि अक्षरांची रचना, वापरलेला टंक याबाबत जास्त सौंदर्यपूर्ण विचार व्हायला हवा होता. पण अर्थात हा प्रकाशकाशी संबंधीत विषय आहे. किंवा पुस्तकाची पेपर बॅक आवृत्ती व डिलक्स आवृत्ती असेही करता आले असते.  

(माझी गीता- देवदत्त पटनायक, पॉप्युलर प्रकाशन मुंबई, पृ. 322, किं. 375.)
                   
श्रीकांत उमरीकर  जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575

No comments:

Post a Comment