विवेक, उरूस, जून 2019
डावे पक्ष त्यांच्या सगळ्यात मोठ्या ऐतिहासिक पराभवाला सामोरे जात आहेत. अशावेळी त्यांना इतर कुणी काही सल्ला दिला तर ते ऐकण्याच्या मनस्थितीत असण्याची मुळीच शक्यता नाही. पण आता त्यांच्यामधूनच पराभवावर विचारमंथनाची प्रक्रिया चालू झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. सी.पी.आय. चे सचिव व राज्यसभेतील खासदार बिनॉय विश्वम यांनी द हिंदू मध्ये 13 जून 2019 च्या आपल्या लेखात डाव्या पक्षांचे एकत्रिकरण हा विषय छेडला आहे.
यापूर्वीही 2014 च्या पराभवानंतर सी.पी.आय.नेच या एकिकरणासाठी पुढाकार घेतला होता. सी.पी.आय.चे महासचिव सुधाकर रेड्डी यांनी एप्रिल 2015 मध्ये सी.पी.एम.चे सरचिटणीस सिताराम येच्युरी यांची भेट घेवून एकिकरणाचा विषय मांडला होता. पण सिताराम येच्युरी यांनी केवळ डावपेचासाठी एकत्र येण्यास नकार देत ज्या मुद्द्यावर फुट पडली त्यांचे संपूर्ण निराकरण झाल्याशिवाय एकी होणार नाही असे स्पष्ट केले होते.
आज कुणालाही असा प्रश्न पडेल की मुळात हे डावे पक्ष कुठल्या मुद्द्यावर विभक्त झाले होते? तसे तर किमान अर्धा डझन डावे पक्ष अस्तित्वात आहेत. पण ज्यांची किमान दखल घ्यावी, ज्यांनी राष्ट्रीय राजकारणात किंवा अगदी राज्य पातळीवर काही एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे दोनच डावे पक्ष आहेत. मुळचा असलेला कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सी.पी.आय.) भाकप आणि त्यांच्यापासून फुटून निघालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सी.पी.एम.) म्हणजेच माकप. यांच्यात फुट कशी आणि केंव्हा पडली?
चीनच्या युद्धानंतर तेंव्हाच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (स्थापना 1925) मध्ये तीव्र मतभेद उफाळून आले. देश म्हणून भारतीय बाजू लावून धरणारे आणि भारताच्या युद्ध विषयक भूमिकेच्या विरोधात असलेले असे गट पडले. भारतवादी किंवा तेंव्हाच्या कॉंग्रेसला अनुकूल असलेले मुळ पक्षात राहिले. आणि कॉंग्रसला विरोध करणारे, भारत सरकारच्या भूमिकेच्या विरोधात असलेले बाहेर पडले आणि त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (सी.पी.एम.) माकपची स्थापना केली.
1967 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तेंव्हा या माकप मधून नक्षलवादी म्हणवून घेणारे संसदीय राजकारणावर विश्वास नसलेले हिंसक मार्ग अवलंबणारे बाहेर पडले. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) असा पक्ष स्थापन केला. अर्थात हा पक्ष संसदीय राजकारणात नव्हता. हे नक्षलवादी सतत फुटत राहिले. त्यांच्या गटांचे विलय-फुट असं घडत गेलं. भाकप (एम.एल.) आणि भाकप (माओवादी) असे त्यांच्यात दोन पक्ष प्रमुख आहेत. पण ते संसदीय राजकारणात नसल्याने त्यांचा निवडणुकांच्या संदर्भात काही विचार करण्याची गरज नाही.
बिनॉय विश्वम ज्या एकिकरणाची चर्चा करू इच्छित आहेत ते भाकप आणि माकप हे दोन मुख्य पक्ष आहेत. केरळ. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या तीनच राज्यात या पक्षांनी सत्ताधारी म्हणून काही एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या शिवाय इतर राज्यांत निवडणुकांचा विचार केल्यास दखल घ्यावी अशी यांची ताकद कधीच राहिलेली नाही.
केरळ आणि पश्चिम बंगाल येथे एकूण 42+20 म्हणजेच 62 इतके लोकसभेचे मतदारसंघ आहेत. त्रिपुरात केवळ दोन मतदार संघ आहेत. म्हणजे तसा विचार केल्यास डाव्यांची ताकद 64 मतदारसंघापुरतीच मर्यादीत होती.
डाव्यांचा पराभव हा काही अचानक घडलेली घटना नाही. 2019 च्या लोकसभेत डाव्यांचे केवळ 5 खासदार निवडून आले आहेत. पण यातही शोकांतिका अशी की डाव्यांचा गढ राहिलेल्या मुख्य बलस्थान असलेल्या पश्चिम बंगालमधून एकही खासदार निवडून आलेला नाही. इतकेच नाही तर दुसर्या स्थानावरही कुणी उमेदवार नाही. केरळात केवळ एकच उमेदवार निवडून आलेला आहे. जे चार खासदार निवडून आलेले आहेत ते तामिळनाडूतील आहेत. डिएमके च्या स्टॅलिन यांनी कॉंग्रेस-डावे यांना सोबत घेवून जी आघाडी तयार केली होती तिच्या माध्यमातून डाव्यांचे चार खासदार निवडून आले आहेत. कारण या आघाडीने संपूर्ण तामिळनाडूत भाजप आघाडीचा पराभव केला आहे. म्हणजे डाव्यांचा हा विजय स्वत:च्या बळावरचा नाही. स्वत:च्या बळावर तसे पाहिले तर त्यांचा एकच खासदार केरळात निवडून आला आहे.
1952 पासून डाव्या पक्षांच्या राजकीय बळाची आकडेवारी पाहिली तर असे लक्षात येईल डाव्यांना कधीही एकत्रितपणे 11 टक्के इतकीही मते मिळवता आली नाहीत. (सोबतच्या तक्त्यात ही आकडेवारी आहे.)
लढवलेल्या जागांचा विचार केल्यास 2014 च्या निवडणुकीत डाव्यांनी सर्वोच्च 210 जागा लढवल्या होत्या. म्हणजे 543 च्या लोकसभेत आजपर्यंत जागा लढवण्याबाबत डावे कधीच 210 च्या पुढे गेले नाहीत. जिंकायचा विचार केल्यास 2004 मध्ये 61 जागा हा त्यांचा सर्वोच्च आकडा आहे. हा सगळा विचार केल्यास मुळात डावे आधी कॉंग्रेसला आणि आता भाजपला पर्याय म्हणून काही एक राजकारण करत होते हेच सिद्ध होत नाही. केवळ विचारवंत, पत्रकार, लेखक, कलाकार यांच्यावर डाव्या विचारांचा एक प्रभाव होता म्हणून यांची राजकीय पक्ष म्हणून दखल घेतल्या गेली. अन्यथा डावे कधीच भारतातील महत्त्वाची राजकीय शक्ती नव्हते. त्रिपुरा छोटे राज्य आहे. केरळात दर पाच वर्षांनी सत्ता बदलत राहिलेली आहे. केवळ पश्चिम बंगालात निर्विवादपणे 35 वर्षे त्यांचे वर्चस्व होते. त्यामुळे डाव्यांचे मुल्यमापन केवळ प्रादेशीक पक्ष म्हणून केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरात आकड्यांच्या आधारे करता येवू शकते. अन्यथा काही आधार नाही.
कॉंग्रेसला सहकार्य करायचे म्हणून आग्रह धरणारा एक गट आणि विरोध करणारा दुसरा या प्रमाणे ज्या पक्षात फुट पडली तो पक्ष 55 वर्षांनी परत कॉंग्रेस सोबत भाजप विरोधी सेक्युलर आघाडी करावी अशी मांडणी करतो याला काय म्हणावे? कॉंग्रेसला पाठिंबा देताना भाजप संघाच्या धार्मिक कट्टरवादाला विरोध करण्याचा मुद्दा डाव्यांकडून समोर केला जातो. 1964 ला कम्युनिस्टांत फुट पडली तेंव्हा भाजप म्हणजे तेंव्हाचा जनसंघ कुठेही राजकीय पटलावर महत्त्वाची किंवा दखलपात्र अशी ताकद म्हणून नव्हता. मग डावे पक्ष 1952 ते 1989 या काळात आठ लोकसभा निवडणुकांतका नाही देशव्यापी बनू शकले? यात तर कुठेच भाजपचा संघाचा अडथळा नव्हता.
साम्यवादी आणि समाजवादी यांच्या वाढीत सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे कॉंग्रेस. कॉ. श्रीपाद अमृत डांगे सारखे लोक कॉंग्रेस धार्जिण राहिले. मोहन कुमारमंगलम सारखे कट्टर कम्युनिस्ट तर सरळ कॉंग्रेसमध्येच गेले. समाजवादी असेच गोंधळात राहिले. लोहियांनी लावून धरलेली कॉंग्रेस विरोधी दिशा इतर समाजवाद्यांना मानवली नाही. स्वाभाविकच लोकशाहीत सत्ताधार्यांच्या विरोधातील सतत शिल्लक राहणारी एक मोकळा जागा असते ती हळू हळू भाजपने व्यापायला सुरवात केली. 1980 ला जनता पक्षाचा धुव्वा उडाल्यानंतर जनसंघवाले शहाणे झाले आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष नावाने स्वतंत्र स्वायत्त राजकीय पक्ष म्हणून वाटचाल सुरू केली. 1989 च्या जनता दलाच्या प्रयोगातही त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला पण आपला पक्ष विलीन करण्याची चुक केली नाही. डाव्यांनीही आपले अस्तित्व स्वतंत्र ठेंवले होते. पण गरज पडली तेंव्हा कॉंग्रेसशी जूळवून घेत आपली कॉंग्रेस विरोधी प्रतिमा स्वत: होवून मोडीत काढली. रामजन्मभुमी आंदोलनानंतर भाजपने भाजप आणि त्या विरोधी इतर सर्व अशी एक राजकीय रणनिती आखली. त्याला इतरांसोबत डावेही बळी पडत गेले. खरं तर आणिबाणी नंतर कॉंग्रेसविरोधी अशी भूमिका घेतल्यावर परत त्यांच्या सोबत जाण्याची काहीच गरज नव्हती.
भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेस वाचली पाहिजे हा एक अजब तर्क 2004 नंतर मांडला गेला. वास्तविक कॉंग्रेसला पाठिंबा देताना त्याला संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार म्हणल्यावर सरकारात सामील होवून आग्रहाने पश्चिम बंगाल व केरळाप्रमाणेच सत्ता राबवून दाखवायची होती. भाजपला विरोध करताना कॉंग्रेसला वाचवायचे राजकारण 2009 ला संपूर्ण उलटले. यांच्याच 61 जागा घटून 24 झाल्या. 2014 ला त्यावर अजून शिक्कामार्तब झाले. कॉंग्रेस तर वाचली नाहीच. पण सोबतच डावे घटून 12 वर आले. अजून या घसरणीत 2019 मध्ये तर 5 वरच आले आहेत.
बिनॉय विश्वम यांच्या मांडणीला अजून माकप मधून कुणी काही प्रतिसाद दिला नाही. माकपचे एकुण चरित्र पाहता ते काही प्रतिसाद देतील अशी शक्यता कमीच आहे.
डाव्यांवरील आपल्या पुस्तकात प्रफुल्ल बिडवई यांनी व्यक्त केलेली खंत आज खरी ठरताना दिसत आहे. बिडवई लिहीतात. ‘... डाव्यांनी दुसराच मार्ग (चुक दूरूस्ती न करण्याचा) अवलंबला, तर अर्थातच अधिक जास्त गतीने झीज सुरू राहील, परिणामी, कार्यकर्ते आणि नेत्यांचंही वाढत्या प्रमाणात नैतिक मनोधैर्य खच्ची होईल आणि निवडणुकांच्या राजकारणात डावे पक्ष अधिकाधिक प्रभावहीन होत जातील. आणि याच दिशेने गोष्टी घडत गेल्या, तर डावे हळूहळू बिनमहत्त्वाचे ठरत जातील. आणि जगभरात ठिकठिकाणी तेथील कम्युनिस्ट पक्षांच्या बाबतीत घडलं, तसं भारतीय कम्युनिस्ट पक्षांच्या बाबतीत होऊन ते इतिहासजमा होतील. चूकदूरस्तीचा मार्ग स्वीकारण्यास डावे अनिच्छुक दिसत आहेत. त्यांनी लोकशाही केंद्रीकरणावर आधारित अशी जी संघटनात्मक संस्कृती स्वीकारली आहे आणि कोणत्याही प्रकारचा विरोधाचा सूर सहन न करण्याचं जे धोरण पत्करलेलं आहे, त्यामुळे, पक्षांतर्गत खुला संवाद आणि अंतर्मुख होऊन चिंतन करण्याला पोषक असं वातावरण नाही आहे.’ (भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा, रोहन प्रकाशन, पृ, 92)
तक्ता
वर्ष भाकप माकप इतर डावे एकुण जागा (%)
1952 16 16 (03.29)
1957 27 27 (08.92)
1962 29 29 (09.94)
1967 23 19 42 (09.39)
1971 23 25 48 (09.49)
1977 07 22 16 45 (07.84)
1980 10 37 11 58 (10.82)
1984 06 22 06 34 (09.76)
1989 12 33 08 53 (10.72)
1991 14 35 08 57 (10.47)
1996 12 32 10 54 (09.61)
1998 09 31 07 48 (08.30)
1999 04 33 06 43 (07.68)
2004 09 43 09 61 (08.02)
2009 04 16 04 24 (07.61)
2014 01 09 02 12 (04.83)
2019 02 03 00 05 (02.33)
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
1952 16 16 (03.29)
1957 27 27 (08.92)
1962 29 29 (09.94)
1967 23 19 42 (09.39)
1971 23 25 48 (09.49)
1977 07 22 16 45 (07.84)
1980 10 37 11 58 (10.82)
1984 06 22 06 34 (09.76)
1989 12 33 08 53 (10.72)
1991 14 35 08 57 (10.47)
1996 12 32 10 54 (09.61)
1998 09 31 07 48 (08.30)
1999 04 33 06 43 (07.68)
2004 09 43 09 61 (08.02)
2009 04 16 04 24 (07.61)
2014 01 09 02 12 (04.83)
2019 02 03 00 05 (02.33)
श्रीकांत उमरीकर जनशक्ती वाचक चळवळ,244-समर्थ नगर, औरंगाबाद 431-001. मो. 9422878575
No comments:
Post a Comment