उरूस, पुण्यनगरी, 19 सप्टेंबर 2016
महाराष्ट्रात अभियंता दिन साजरा होत असतानाच एक दु:खद बातमी आली. महाराष्ट्रातील पहिल्या पिढीचे अभियंता मध्यप्रदेश शासनाचे तंत्रशिक्षण सचिव, इन्सटिट्यूट ऑफ इंजिनिअरचे सन्मानिय सदस्य सखाराम बीडकर यांचे वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले.
एक वयोवृद्ध माणूस आपले आयुष्य संपवून निजधामास निघून गेला इतका मर्यादित अर्थ या घटनेला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात जेंव्हा की शिक्षणाच्या संधी जवळपास नव्हत्याच, त्या काळात मराठवाड्याचा एक तरूण शिक्षणासाठी हैदराबादला जातो. अभियांत्रिकीची पदविका नाही तर पदवी मिळवतो. केवळ आपले करिअर नव्हे तर देशाच्या उभारणीच्या काळात महत्त्वाचे योगदान देतो हे विलक्षण आहे. म्हणून त्यांच्या निधनाची दखल घेवून काही एक चिंतन या क्षेत्रासंदर्भात आवश्यक आहे.
सखाराम बीडकर यांचा जन्म 16 ऑक्टोबर 19015 चा. मूळचे बीडचे असलेले हे घराणे केंव्हातरी परभणीला स्थलांतरीत झाले. सखाराम बीडकरांचे वडिल रामराव यांना एकूण पाच मुले झाली. सखाराम हे त्यातले सर्वात मोठे. त्यांच्या पाठीवर तुकाराम, मधुकर, गणपत व नारायण ही भावंडं होती. शालेय शिक्षण परभणीला पूर्ण करून छोटा सखाराम पुढच्या शिक्षणासाठी हैदराबादला गेला. तेंव्हा त्याला कुणाचेही मार्गदर्शन नव्हते. परभणी सारख्या छोट्या गावात आपल्याला फारसं काही करता येणार नाही हे त्याला अगदी छोट्या वयात लक्षात आलं हे विशेष. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत असलेलं मुद्गलेश्वराचे मंदिर गोदावरीच्या काठावर आहे. गोदावरीच्या पात्रातील मंदिराचे स्थापत्य आणि काठावरील मंदिराचे उंच उंच लाकडी खांबांवर तोललेले मंदिर पाहून लहानपणीच त्याच्या मनात अभियांत्रिकीचे आकर्षण निर्माण झाले असावे. त्या ओढीने त्याने हैदराबादला धाव घेतली.
कुठलेही पाठबळ नाही, ओळखीचे कोणी नाही. तुलजाभवन धर्मशाळेत ते उतरले. हातातली ट्रंक तिथे टेकवून बाहेर पडले तर वांगीकर नावाचा मित्र भेटला. त्याने आपल्या खोलीवर त्यांना नेले. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी गेले असता मुलाखत घेण्यासाठी सेतू माधवराव पगडी हे सनदी अधिकारी होते. त्यांनी या मुलाची चमक हेरली. त्याला नाव विचारले. प्रवेश मिळाला पण शिकायचे कसे? पण आपली फीस व रहायची सोय परस्पर झाल्याचे पाहून सखारामला आश्चर्य वाटले. तेंव्हा त्याला मुलाखत घेणार्या सेतु माधवराव पगडींनी नंतर सांगितले की सखारामचे वडील रामराव बीडकर हे कळमनुरीला असताना त्यांनी पगडींना उर्दू शिकवले होते. मोठी मदत तेंव्हा केली होती. त्याची परतफेड म्हणून त्यांच्या मुलाला आपण शिक्षणासाठी मदत करू ही भावना त्यांची होती. पुढे हिंमतीने आत्मप्रेरणेने त्याने शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकीचा अवघड अभ्यासक्रम 1942 मध्ये पूर्ण केला. याच काळात वंदे मातरम् चळवळ हैदराबाद संस्थानमध्ये सुरू झाली. सखाराम ने त्यात सक्रिय भाग घेतला. त्यामुळे शिक्षण काही काळ स्थगित झाले. या चळवळीतील मराठवाड्याच्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्याला सल्ला दिला. तू अभियांत्रिकी सारखे फार वेगळे आणि आधुनिक भारताच्या उभारणीत कामाला येणारे शिक्षण घेत आहेस. तेंव्हा हे शिक्षण पूर्ण करणे आणि या क्षेत्रात काम करणे हीच तूझ्यासाठी सर्वोत्तम देशसेवा आहे.
ज्येष्ठांचा सल्ला मानून सखारामने अभियांत्रिकी क्षेत्रात पूर्णपणे झोकून दिले. उस्मानिया विद्यापीठांतून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी प्राप्त केली. 12 वर्षे त्याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. एव्हाना भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. देशभरात उत्साहाचे वारे वहात होते. प्रत्येक प्रदेशात अभियांत्रिकी पदविका आणि पदवी शिक्षणासाठी महाविद्यालये उघडण्यास सुरवात झाली. यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तरूण पदवीधारक अभियंत्यांची एक मोठी फळीच हाताशी धरली. त्यात सखाराम बीडकरांचा समावेश होता.
भोपाळच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी 1956 पासून काम पाहण्यास सुरवात केली. अल्पावधीतच या महाविद्यालयाने देशभरात नावाजलेले शिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळवली. पुढे मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी आणि रेवा अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थापक प्राचार्य म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
जबलपुरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ते प्राचार्य असताना मध्यप्रदेश शासनाने त्यांना तंत्रशिक्षण सचिव या मानाच्या आणि महत्त्वाच्या सर्वोच्च पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले. 1974 मध्ये निवृत्त होईपर्यंत ते तंत्रशिक्षण सचिव पदावर कार्यरत होते.
भारतातल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा पाया ज्यांनी रचला आणि पुढच्या शिक्षणासाठी आदर्श निर्माण करून ठेवला अशा मोजक्या व्यक्तींमध्ये सखाराम बीडकर यांचा समावेश होतो.
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या दोघांनीही सखाराम बीडकर यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना देश पातळीवर पुरस्कार देवून सन्मानित केले. इन्सटिट्युट ऑफ इंजिनिअरने सन्मानिय सदस्य म्हणून त्यांचा गौरव केला.
अमेरिका व युरोप मध्ये भारताच्या अभियांत्रिकी पथकाचे शिष्टमंडळ पाठविण्यात आले तेंव्हा दोन वेळा त्याचे नेतृत्व सखाराम बीडकरांनी केले होते.
स्वातंत्र्य भारतातील अभियंत्यांची ही पहिली पिढी अतिशय तत्त्वनिष्ठ होती. ज्या महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते त्याच महाविद्यालयात त्यांचा मुलगा विद्यार्थी होता. रोज त्यांना नेण्यासाठी महाविद्यालयाची शासकीय गाडी यायची. पण आपल्या मुलाला त्यांनी कधीही गाडीत नेले नाही. मुलगा स्वतंत्रपणे सायकलवर महाविद्यालयात जायचा.
मराठवाड्यातून हैदराबाद किंवा पुढे मध्यप्रदेश तसेच बिहार इथे काम करत असताना त्यांनी कधीही प्रादेशिक विचार केला नाही. आपले अभियांत्रिकी क्षेत्र वैश्विक आहे याचे भान त्यांना नेहमीच होते. मराठी माणूस बाहेरच्या प्रदेशात मोकळ्या मनाने वावरत नाही. तो कायम आपल्या गावाकडे लक्ष ठेवून असतो. सखाराम बीडकर असे संकुचित नव्हते. त्यांनी निवृत्तीनंतर मध्यप्रदेशची राजधानी असलेले भोपाळ हेच शहर आपल्या वास्तव्यासाठी आणि कार्यकर्तृत्वासाठी निवडले. मध्यप्रदेश सरकारच्या कितीतरी योजनांवर मानद सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. भोपाळच्या शैक्षणिक क्षेत्रात मनोभावे निवृत्तीनंतरही काम केले.
बरीच मोठी माणसे आपल्या करिअरच्या नादात घर संसाराकडे लक्ष देत नाहीत. पण सखाराम बीडकरांसारखा माणूस याला अपवाद राहिला. त्यांनी तीन मुलं आणि तीन मुली उच्च शिक्षीत आहेत.
सखाराम बीडकर यांचे लहानपण अतिशय कष्टात गेले. आईचे लवकर निधन झाले. लहान भावंडांचे सगळे करणे वडिलांना शक्य व्हायचे नाही. तेंव्हा घरची सगळी कामं ते करायचे. अगदी स्वयंपाक करण्यापासून. साध्या वातावरणात वाढूनही कुठलाही कर्मठपणा त्यांच्यात आला नाही. पुढे मुलीने/मुलाने आंतरजातीय/धर्मिय/प्रांतिय विवाह केला तरी त्यांनी कुठलाही विरोध केला नाही उलट आनंदाने स्वागतच केले. मुलांनाच नाही तर मुलींनाही चांगले उच्चशिक्षीत केले.
साध्या घरातला एक मराठी माणूस कुठलेही पाठबळ नसताना स्वत:च्या हिंमतीवर स्वातंत्र्यपूर्व काळात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो, स्वातंत्र्यानंतर या क्षेत्रात मोठे योगदान देतो, महाराष्ट्राच्या बाहेर जावून तिथल्या जनजिवनात मानाचे स्थान मिळवतो हे मोठे विलक्षण आहे. सखाराम बीडकर यांचे 12 सप्टेंबर 2016 रोजी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या चरणी विनम्र श्रद्धांजली.
श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575
No comments:
Post a Comment