Monday, March 7, 2016

समलैंगिकतेवरील चित्रपट : परदेशात पुरस्कार । भारतात तिरस्कार ।।



उरूस, दै. पुण्यनगरी, 7 मार्च 2016

सगळ्या जगभरात चित्रपट क्षेत्रात ज्या पुरस्कारांचा मोठा दबदबा आहे त्या ऑस्कर पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. ज्या चित्रपटाला उत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार घोषित झाला तो ‘स्पॉटलाईट’ हा अतिशय वेगळ्या विषयावरचा चित्रपट. अमेरिकेतील बोस्टन शहरातील चर्चमधे लहान मुलांवर लैंगिकअत्याचार होत असल्याची कुणकुण कुणा पत्रकाराला लागते. तो सातत्याने त्याचा पाठपुरावा करून हे प्रकरण उघडकीस आणतो. 2002 मध्ये बॉस्टन ग्लॉब ह्या विख्यात वृत्तपत्रानं हा लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचा विषय उजेडात आणला. पत्रकारितेमधील पुलित्झर पुरस्कारही या वार्तांकनाला प्राप्त झाला. या घटनेवर चित्रपट मात्र लवकर बनू शकला नाही. शेवटी 2015 ला हा चित्रपट तयार झाला. आणि त्याला मानाचा ऑस्कर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. 

आपण समजतो सर्व परदेशी नागरिक म्हणजे मुक्त जीवन जगणारे, धर्माचा कुठलाही दबाव न मानणारे असे, ज्याला जे हवे ते त्याला करता येते असे काही नाही. तेथेही धार्मिक दबाव आहे. त्या ठिकाणीही धार्मिक दुष्कृत्ये दाबण्याकडे, लपविण्याकडे कल असतो. पण ही सारी दडपणं बाजूला सारून कुणी निर्माता या विषयावर चित्रपट काढतो. आणि तेथील व्यवस्थाही ही आपल्या समाजातील विकृती समजून घेते. अशा चित्रपटांना पुरस्कार देवून गौरविले जाते. त्यामागे जे काही घडले ते चुक होते, पुन्हा असे होणार नाही याचा एक संदेश हा समाज देतो.

ही झाली परदेशातील गोष्ट. आता आपल्याकडे काय घडले ते पाहू या. 2009 साली अलिगढ (उत्तर प्रदेश) विद्यापीठातील एका मराठीच्या प्राध्यापकावर समलैंगिक संबंधांबाबत खटला भरल्या गेला. या प्राध्यापक म्हणजे डॉ. श्रीनिवास सिरास. त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्या मित्रासोबत असलेल्या लैंगिक संबंधांचे चित्रिकरण करण्यात आले. त्यावरून अलिगढ विद्यापीठाने त्यांना विनाचौकशी निलंबीत केले. त्याविरोधात सिरास यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाद मागितली. दीर्घकाळ लढून मोठ्या चिकाटीने त्यांनी न्याय मिळवला. शेवटी निकाल त्यांच्या बाजूने लागला. त्यांना आपल्या पदावर परत नियुक्ती देण्याचा आदेश न्यायालयाने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाला दिला. हा निकाल हाती आल्यानंतर सिरास यांनी आत्महत्या केली. ही सत्य घटना आहे. 

या सत्य घटनेवर हंसल मेहता यांनी चित्रपट बनवला ‘अलिगढ’. मनोज वाजपेयी या ताकदीच्या नटाने सिरास यांची भूमिका अप्रतिम साकारली आहे. तरूण पत्रकाराची भूमिका राजकुमार राव या नविन नटाने समरसतेने रंगवली आहे. हा चित्रपट नुकताच 26 फेब्रुवारीला भारतात सर्वत्र प्रदर्शित झाला. ज्या गावात ही घटना घडली, त्या अलिगढ मध्ये मात्र हा चित्रपट प्रदर्शित होवू दिला गेला नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील भाजपाचे खासदार आणि इतर पक्ष संघटना या सगळ्यांचा असलेला विरोध. हा विरोध का तर या चित्रपटामुळे त्या शहराची, विद्यापीठाची बदनामी होते. 

आपल्याकडे काही प्रकरणात दलित विरूद्ध सवर्ण किंवा हिंदू विरूद्ध मुस्लीम असे काही चित्र असले की सगळं कसं सोयीचं होवून जातं. बोंब मारता येते, मोठे लेख लिहीता येतात, टिव्ही चॅनेलवरून घसा कोरडा पडेपर्यंत चर्चा करता येतात. पण अशी सोयीची विभागणी नसेल तर काय करायचे? अलिगढ चित्रपटाबाबत हा एक मोठा घोळ होवून बसला आहे. प्रा. सिरास हे हिंदू ब्राह्मण आणि त्यांचा समलैंगिक जोडिदार इरफान हा मुसलमान. प्रा. सिरास हे मोठी नौकरी असलेले प्रतिष्ठीत गृहस्थ तर इरफान हा एक साधा रिक्शावाला. आता या सगळ्या प्रकरणात कुणी कुणाची बाजू घ्यायची? 

या चित्रपटात या प्रकरणाचा वेध घेणारा पत्रकार ख्रिश्‍चन दाखवला आहे. यात हिंदू-ख्रिश्‍चन-मुसलमान अशा विविध धर्माचे लोक गुंतलेले आहेत. ते सगळे मानविय पातळीवरून विचार करत आहेत. मग अशा चित्रपटाला विरोध कसा करायचा किंवा त्याला पाठिंबा तरी कसा द्यायचा? 

अख्ख्या चितत्रपटात कुठेही भडक चित्रण केलेले नाही. प्रा. सिरास यांच्यावर खटला चालविला जातो त्यासाठी ‘गे’ लोकांसाठी काम करणार्‍या संस्था पुढे येतात. त्यांची एक पार्टी चित्रपटात दाखवली आहे. त्यातही प्रा. सिरास अवघडून गेलेले आहेत. त्यांना आपली ही ओळख मुद्दाम होवून जिकडे तिकडे मांडण्यातही फार रस नाही. हे संबंध ही त्यांच्यासाठी एक अतिशय खासगी बाब आहे. सरकारी वकिल जी एक स्त्री दाखवली आहे ती अतिशय हीन भाषेत त्यांचा पाणउतारा करू पाहते. तूमच्या दोघात मर्द कोण आहे असले अभिरूचीहीन प्रश्न विचारते. पण या कशालाही सिरास उत्तर देत नाहीत. त्यांची बाजू त्यांच्या वतिने त्यांचे वकील मांडतात.

या सगळ्या प्रकरणाचा शोध घेणारा पत्रकार दिपू याला प्रा. सिरास आपले कवितेचे पुस्तक भेट देतात. ( प्रा. सिरास यांचा हा कवितासंग्रह ‘पायाखालची हिरवळ’ नावाने प्रसिद्ध आहे. पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे.) दिपूला मराठी येत नसते. तर त्यासाठी सिरास आपल्या कवितांचे इंग्रजी भाषांतर करतात. कोर्टाच्या परिसरात, खटला चालू असताना सिरास शांतपणे आपल्याच कवितांचे इंग्रजी भाषांतर करत बसलेले असतात. त्यांचे खटल्याकडे लक्षच नसते. याचे कारण म्हणजे त्यांना भोगावा लागलेला मन:स्ताप. आपण समलैंगिक आहोत हे आजूबाजूच्या लोकांना पचत नाही. ते आपल्याकडे वाईट नजरेने पाहतात. साधे रहायला घर मिळू देत नाहीत. जवळचे प्राध्यापक आपल्याला जाणिवपूर्वक या खटल्यात अडकतात. निवृत्तीसाठी अगदी दोनच महिने राहिले असताना हे मुद्दामहून घडविले जाते. याची खंत त्यांना आतल्या आत कुरतडत राहते. घरचे म्हणून काही बंध सिरास यांना शिल्लक राहिलेले नसतात. त्यांनी लग्न केलेले नसते. अशा परिस्थितीत ते एकाकी पडतात. त्यांच्या अगदी जवळ असलेले प्राध्यापक मित्रही त्यांची साथ सोडून देतात. अगदी त्यांना घरी आल्यावर जेवायलाही विचारत नाहीत. हॉटेलमध्येही राहू दिले जात नाही. न्यायालयाच्या निकालाची वाट पहात ते थांबतात. निकाल लागतो आणि सिरास आत्महत्या करून या जगाचा निरोप घेतात.

या चित्रपटाचा तिरस्कार अलिगढ मध्ये केल्या गेला. खरे तर अजूनही आपल्याकडे घटनेचे 377 वे कलम रद्द झाले नाही. त्यासाठी समलैंगिकांच्या संस्था, संघटना रस्त्यावर उतरून लढत आहेत. न्यायालयाची दारे ठोठावत आहेत. 

महाराष्ट्रात बिंदू माधव खिरे यांचे समपथिक ट्रस्ट यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यांनी काही पुस्तकेही या विषयावरची लिहीली आहेत. त्यांचा अनुभवही मोठा दाहक आहे. ही पुस्तके विक्रीस ठेवण्यासही विक्रेते तयार नाहीत. अशी भयानक परिस्थिती पुरोगामी महाराष्ट्राची आहे. मग मध्ययुगीन मानसिकता असणार्‍या अलिगढला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे. 

समलैंगिकता ही नैसर्गिक आहे. त्या बाबतचे गैरसमज दूर करणे अतिशय गरजेचे आहे. ‘अलिगढ’ सारखे चित्रपट आपण किमान समजून घेतले पाहिजेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या समलैंगिकांना धीर देण्याचे  भावनिक बळ देण्याचे महत्त्वाचे काम आपल्याला करावे लागणार आहे. आपण पुरस्कार कधी देणार ही दूरची बाब आहे पण आधी तिरस्कार तर कमी करू.

(हा लेख वाचल्यावर ज्या कुणा समलैंगिकांना आपल्या भावना व्यक्त करायच्या असतील त्यांनी जरूर फोन करावा. त्यांच्याबद्दल माहिती गुप्त ठेवण्यात येईल. ही सगळी पुस्तकं कशी उपलब्ध होतील ही माहितीही दिली जाईल.) 

श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575.


No comments:

Post a Comment