Saturday, March 28, 2015

गोविंद देशपांडे स्मृती सोहळा : सामाजिक ऋणाची उतराई


दैनिक महराष्ट्र टाईम्स शनिवार २८ मार्च २०१५ 

औरंगाबादच्या जाहिरात क्षेत्रात सुपरिचित असलेले गोविंद देशपांडे यांना जावून आता 8 वर्षे उलटून गेली. काकांची आठवण आजही सर्वांना येत राहते ते त्यांनी विविध लोकांना निरपेक्षपणे केलेल्या मदतीमुळे. काकांना लौकिक अर्थाने कुठलाही वारस नाही. त्यांचे नाव मागे रहावे म्हणून काकांच्या स्मृती प्रित्यर्थ काहीतरी करावे असे माधुरी गौतम, अनिल पाटील, श्रीकांत उमरीकर, नामदेव शिंदे, धनंजय दंडवते यांना वाटले. त्या तळमळीतून ‘‘गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्या’’चा जन्म झाला.  कुठलेही नाते गोते नसताना, कुठलाही स्वार्थ नसताना, कुठल्याही लाभाची अपेक्षा नसताना एकत्र आलेल्या या मंडळीच्या धडपडीला लोकांनी साथ दिली म्हणूनच ‘‘गोविंद देशपांडे स्मृती सोहळा’’ औरंगाबाद शहरात सामाजिक ऋणाच्या उतराईचे प्रतिक म्हणून ओळखला जातो आहे. 
मूळचे हिंगोली जिल्ह्यातील साखरा या गावचे असलेले गोविंद देशपांडे यांनी औरंगाबादला गरूड ऍड या जाहिरात संस्थेची स्थापना विलास कुलकर्णी यांच्या सहकार्याने केली. अल्पावधीतच नैतिकतेने चालणारी विश्वासार्ह जाहिरात संस्था म्हणून गरूडचे नाव औरंगाबादच्या जाहिरात विश्वात निर्माण झाले. काकांची नैतिकता इतकी की त्यांचे सहकारी विलास कुलकर्णी यांचे निधन झाल्यावरही त्यांच्या कुटूंबियांना नफ्याचा अर्धा वाटा ते शेवटपर्यंत पोंचवत राहिले. एका जाहिरात संस्थेचे संचालक इतकी मर्यादीत त्यांची ओळख नव्हती. विविध क्षेत्रात धडपडणार्‍या तरूणांना, गरजूंना हक्काचे ठिकाण, विश्रांतीची जागा अशी त्यांची खरी ओळख होती. समर्थ नगर मधील त्यांचे कार्यालय म्हणजे एक ‘अड्डा’च होता. साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रातील तसेच वर्तमानपत्रांच्या क्षेत्रातील कित्येक मान्यवर आपला मोठेपणा विसरून या अड्ड्यावर गप्पा मारायला येवून बसायचे. आमच्यासारख्या पोरासोरांनाही तेथे मुक्त प्रवेश असायचा. डॉ. सोमण हे गोविंदकाकांचे जवळचे मित्र. ते तिथे येवून सिगारेट पीत मस्त गप्पा मारत बसायचे. एकदा त्यांच्याशी गप्पा मारत असताना अचानक काका उठले. माझ्यासोबतच्या जीवन कुलकर्णीला गाडीवर घेवून आत्ता येतो म्हणून तत्काळ बाहेर पडले. मी, डॉ. सोमण, त्यांचे एक कलाक्षेत्रातील मित्र, काकांची सहकारी माधुरी गौतम आम्ही गप्पा मारत होतो. दहाच मिनीटांत काका स्वत: हातात  थर्मासमध्ये चहा घेवून आले. मी आवाकच झालो. सर्द होवून त्यांना म्हणालो, ‘‘काका असे काय केलेत. मला सांगायचे. मी गेलो असतो चहा आणायला.’’ ते म्हणाले, ‘‘अरे आमचा पोरगा नाही आला आज. शिवाय तूमच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. तू चांगला मुद्दा मांडत होतास. तूम्हाला कशाला डिस्टर्ब करू.’’ 
3 जूलै 2007 ला काकांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. काकांचे सहकारी असलेले माधुरी गौतम, नामदेव शिंदे त्यांच्याकडे सदैव जाणारा मी, जीवन कुलकर्णी, दत्ता जोशी या आम्हा तरूणांना काय करावे हेच कळेना. अतिशय सैरभैर अशी आमची अवस्था झाली. काका नात्याने आमचे कोणीच नव्हते. माझी ऑफिसची जागा खरेदी करणे असो, जीवन कुलकर्णीचे लग्न असो, अनिल पाटीलची नौकरी असो, माधुरी गौतम आणि नामदेव यांना तर त्यांनी जीवनातच उभे केलेले असे कित्येक जणांना त्यांनी निरपेक्षपणे मदत केली होती. त्यांच्या अंत्यविधीच्यावेळी शेवटपर्यंत मला मान वरती करता आलीच नाही. 
हळू हळू जळत गेलात
तूम्ही झालात धूर
गोत्राविना गोतावळ्याच्या
डोळ्यामध्ये पूर
अशी आमची अवस्था झाली होती. काकांचे स्नेही गजानन पाठक, राम भोगले, माजी आमदार कुमुदताई रांगणेकर डॉ. सोमण यांनी आम्हाला धीर दिला आणि गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्याची कल्पना उचलून धरली. काकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हीच योग्य कृती आहे असे आम्हाला समजावले. 
काकांना श्रद्धांजली म्हणून तीन महिन्यांनी 3 सप्टेंबर 2007 रोजी त्यांच्या ‘अशी माणसं’ या पुस्तकाचे प्रकाशन आम्ही केले. सोबतच त्यांच्या कादंबरीतील काही भागाचे अभिवाचनही केले. याच श्रद्धांजली कार्यक्रमात स्मृती सोहळ्याची घोषणा कुमूदताई रांगणेकर यांनी केली.
काका एक उत्कृष्ठ लेखक होते. गढी (कादंबरी), राजबंदी क्रमांक अठरातेवीस (आणिबाणीच्या काळातल्या तुरूंगवासातील आठवणी), अशी माणसं (व्यक्तिचित्रे), राधा-गिरीधर (कविता), स्वर्ग धरेचे व्हावे मिलन (कविता) ही त्यांची ग्रंथसंपदा त्याची साक्ष आहे. 
गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्याची सुरवात 28 मार्च 2008 पासून झाली. 28 मार्च हा काकांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीदिनी हा सोहळा आपण साजरा करू असे काकांच्या स्नेहीमंडळीने ठरविले. प्रसिद्ध कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. ‘तिफणसाज गोफणगाज’ कृषी संस्कृतीचा साहित्यातून मागोवा घेणारे भाषण इंद्रजीत भालेराव यांनी या प्रसंगी केले होते. दुसर्‍या वर्षी प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अतुल देऊळगांवकर यांनी ‘जागतिकीकरणाचा वेध’ आपल्या भाषणातून मांडला. तिसर्‍या वर्षी शिक्षण क्षेत्रात आपल्या मुलभूत अभ्यासाने खळबळ उडवून देणारे तळमळीचे कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ‘आपली मुले खरेच शिकतात का?’ या भाषणातून शिक्षणाचे भयानक वास्तव श्रोत्यांसमारे ठेवले. बदलत्या काळातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऍड. दिनेश शर्मा यांनी स्वतंत्रतावादाची मांडणी चौथ्या वर्षीच्या आपल्या भाषणात केली होती. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी पत्रकारितेचे आजचे स्वरूप अतिशय सोप्या पण मार्मिक भाषेत पाचव्या वर्षीच्या या सोहळ्यात विषद केले होते. सहाव्या वर्षीपासून व्याख्यानांशिवाय इतर कलांचा समावेश सोहळ्यात करावा असे ठरविण्यात आले. त्या अनुषंगाने कवी बी. रघुनाथ व वा.रा.कांत यांच्या जन्म शताब्दि वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम संजय जोशी यांनी सादर केला. सातव्या वर्षी मराठवाड्यातील उमदे अभिनेते किशोर पुराणिक यांचा ‘मोगलाई धमाल’ हा एकपात्री प्रयोग या सोहळ्यात सादर झाला. 
गोविंद देशपांडे स्मृती सोहळ्याचे हे आठवे वर्ष आहे. सुप्रसिद्ध हिंदी लेखक असगर वजाहत यांच्या गोडसे गांधी. कॉम या नाटकाचे अभिवाचन यावेळी सादर होणार आहे. भारतीय ज्ञानपीठाने या नाटकाचे प्रकाशनही केले आहे. या नाटकाचे भाषांतर अनंत उमरीकर यांनी केले असून लक्ष्मीकांत धोंड यांनी अभिवाचन रंगावृत्ती तयार केली आहे. विश्वनाथ दाशरथे, गिरीश काळे यांनी या नाटकास संगीत दिले असून लक्ष्मीकांत धोंड, मोहन फुले, पद्मनाभ पाठक, सुजाता पाठक, मणीराम पवार, अदिती मोखाडकर हे कलाकार अभिवाचनात सहभागी होणार आहेत.
गोविंद सन्मान 

आठव्या वर्षापासून एक नविन उपक्रम सुरू करण्यात येतो आहे. गरूड परिवारातील अनिल पाटील यांनी गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एखादा पुरस्कार असावा अशी कल्पना मांडली होती. ती सगळ्यांनाच आवडली. त्या अनुषंगाने पहिला गोविंद सन्मान ज्येष्ठ पत्रकार मा. गोपाळ साक्रिकर यांना जाहिर झाला आहे. रोख अकरा हजार रूपये, शाल, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मरावाड्यातील साहित्य, संगीत, कला, राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या ज्येष्ठ व्यक्तीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
इंद्रजीत भालेराव यांनी एका कवितेत असे लिहून ठेवले होते


ओझे फेडायचे नाही
ऋण राहू देत शिरी
असे कोण कोणासाठी
हात देतो घरी दारी
गोविंद देशपांडे यांचे आमच्यावर आणि समाजावरच असलेले ऋण हे न फिटणारेच आहे. त्यांची किंचितशी उतराई म्हणून हा सोहळा साजरा होतो आहे. 
श्रीकांत उमरीकर, संयोजक, गोविंद देशपांडे स्मृति सोहळा, औरंगाबाद.    

No comments:

Post a Comment