Tuesday, September 2, 2014

शरद जोशी तुमच्या वाढदिवसाच्या जाहिराती कुठे आहेत ?




                           दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 2 सप्टेंबर 2014 

आदरणीय शरद जोशी, सा.न.

उद्या (3 सप्टेंबर) तुमचा 79 वा वाढदिवस आहे. हे आमच्या लक्षातच नाही. कारण तूमच्या वाढदिवसाच्या जाहिरातींचे फ्लेक्स कुठे दिसले नाहीत. आहो गल्लीबोळातील टिनपाट पुढार्‍याचा जरी वाढदिवस असला तरी किमान पाच पंचेविस अनधिकृत फ्लेक्स झकळतात जिकडे तिकडे. साहेबांची उजळलेली म्हणजे संगणकाचा वापर करून उजवळलेली छबी चमकत असते त्या जाहिरातीमधून. ती सामान्यांच्या डोळ्यात भरते आणि लक्षात येते की हे आपले महान  समाजसेवक उर्फ पुढारी आहेत. पण तसं काहीच तुमचं दिसलं नाही. मग सांगा नं कसं कळणार?

तुमच्यावर आरोप झाला होता की तुम्ही कॉंग्रेस विरोधी असून भाजपाला धार्जिण आहात. खरं तर तुमच्या आंदोलनाची सुरवातच मुळी आणिबाणीनंतरच्या जनता राजवटीच्या काळात झाली होती. कांद्याचे भाव पडले आणि त्यावेळी व्यापार मंत्री होते मोहन धारिया. इतकंच कशाला आत्ता मोदिंचे सरकार येवून जेमतेम 100 दिवसही नाही झाले. कांद्याचे निर्यात शुल्क वाढविणे, कांदा-बटाटा यांचा समावेश जिवनावश्यक वस्तूंच्या यादीत करणं, जनुकिय बियाणांच्या चाचण्यांना विरोध करणं या केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात तूम्ही रस्त्यावर उतरलात. वयाच्या 80 व्या वर्षीही चक्क रेल्वेसमोर रूळांवर ठाण मांडून बसलात. आता तुम्हीच सांगा ही काय रीत झाली समाजसेवा करायची? आहो आजकालचे नेते तरूण वयातही रस्त्यावर उतरायला तयार नाहीत. गल्ली बोळातील का होईना सत्तेची खुर्ची मिळाली ऊब मिळाली की कशी उत्तम समाजसेवा करता येते. हे तुम्हाला कुठून आणि कसे कळणार?

तुमच्या शेतकरी संघटनेत अशी घोषणा आहे, ‘शेतकरी संघटनेचा विजय असो !’ आहो असे कुठे असते का? घोषणा कशी नेत्याच्या नावाने पाहिजे. म्हणजे ‘शरद जोशी यांचा विजय असो !’ असं जर कुणी म्हटलं असतं तर किती सोय झाली असती. एकदा का वरच्या साहेबांनी स्वत:पुढे दिवे ओवाळले की गल्ली बोळातील लहानमोठे साहेब तोच कित्ता गिरवतात. मग त्यांचाही उदो उदो स्थानिक पातळीवर होतो. किंवा स्थानिक पताळीवर त्यांचा उदो उदो व्हावा म्हणूनच ते वरच्या साहेबांचा उदो उदो करतात. आता तुमच्या संघटनेचे सगळेच उलटं. गल्ली बोळातील शेंबड्या पुढार्‍यांचा दादांचा तुम्ही फायदा करून दिला असता, त्यांचे ‘हित’ चांगल्या पद्धतीने सांभाळले असते तर त्यांनी तुमचेही फ्लेक्स गल्लीबोळात लावले नसते का?

तुमची चळवळ अर्थवादी विचारांवर आधारलेली चळवळ आहे. चळवळीची मांडणी करताना कुठलीही भावनीक भाषा तुम्ही केली नाही. शेतकर्‍याच्या जातीत तुम्ही जन्मले नाही, शेतकर्‍याचा वेष तुम्ही परिधान केला नाही, शेतकर्‍याची भाषा तुम्ही बोलत नाही. तरी शेतकरी लाखोंच्या संख्येने तुमच्यावर प्रेम करतात. ते असु द्या. पण जर कार्यकर्त्याच्या ‘अर्था’चा विचार केला नाही तर बाकी अर्थवादी विचारांचा काय फायदा हो? आहो आधी कार्यकर्त्याला सोसायटी, पंचायत समिती, झेडपी, आमदारकी, खासदारकी काही तरी भेटलं पाहिजे की नाही? मग चळवळी कशा ‘भक्कम’ होतात. 

हजारो शेतकर्‍यांनी तुमचे फोटो देवाच्या बरोबरीने आपल्या देवघरात लावले असतील. ते असू द्या हो. ते काही कामाचं नाही. गल्लीबोळात तुमचे फ्लेक्स लागणं आणि त्यावर गल्लीबोळातील नेत्यांच्या बारक्या बारक्या छब्या असणं हे जास्त महत्त्वाचे. 

तुम्ही ‘स्वतंत्र भारत पक्ष’ नावानं राजकीय पक्ष काढला. खरं तर तुम्ही तुमच्या पहिल्या अधिवेशनापासून शेतकरी चळवळीला सर्व राजकीय पर्याय खुले आहेत असं म्हणाला होता. तसे ठराव तुमच्या संघटनेच्या अधिवेशनात मंजूर झाले आहेत. लेखी स्वरूपात ते उपलब्धही आहेत. पण ते वाचतो कोण? तुम्ही म्हणाला होतात ना, ‘शेतकर्‍याच्या भावाचा प्रश्न इतर राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहिरनाम्यात घेतला आणि त्यासाठी प्राण पणाला लावले तर मला निवडणुक लढवायची गरजच नाही. अशावेळी जर मी मत मागायला आलो तर मला जोड्यानं मारा!’  इतकं मोठं वाक्य कोण लक्षात ठेवणार जोशी साहेब? आमच्या मोठ्या मोठ्या पुढार्‍यांनी जाणत्या राजांनी शेवटचं अर्धवट वाक्य उचललं आणि तुम्हाला ठोक ठोक ठोकलं. तुम्हीही पडलात सज्जन. निर्लज्जपणे त्यावर काहीतरी अर्वाच्च बोलायचं सोडून तूम्ही आपले प्रामाणिकपणे शेतकर्‍यांची बाजू मांडत बसलात. 

चार वर्षांपूर्वी तुमचा अमृतमहोत्सव शेगाव येथे साजरा झाला. ‘शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही!’  असे उद्गार तुम्ही लाखो शेतकर्‍यांसमोर काढले. शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून कुठलाही सत्कार, शाल, श्रीफळ तुम्ही कधीच  स्विकारले नाही. मग आता तरी कसे स्विकारणार? मग शेवटी सोलापुर जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी जोडप्याच्या हस्ते तूम्ही एक मानपत्र तेवढं स्विकारलं. त्या मानपत्रावर  शेतकर्‍यांची वेदना शब्दबद्ध करणारे तुमचे आवडते कवी इंद्रजीत भालेराव यांची कविता कोरलेली होती. आपल्या शब्दाला जागून उतारवयात आजारपण असताना तुम्ही शेतकर्‍यांसाठी रेल्वेच्या रूळांवर उतरलात. अशानं तुमच्या जाहिरातींचे फ्लेक्स शहरो शहरी गावो गावी कसे लागणार? 

"शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळाला पाहिजे",  असल्या शुद्ध अर्थवादी घोषणा नाही चालत आपल्याकडे. शेतकर्‍यांच्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे असली मागणी केली असती तर तुम्हाला कितीतरी राजकीय फायदा झाला असता. शेतकर्‍याला पेन्शन मिळालं पाहिजे, रेशन कार्डावर फुकट अन्नधान्य मिळालं पाहिजे, धान्य दळून मिळाला पाहिजे, ते धान्य खावून पचवून रक्त बनवून मिळाले पाहिजे, नौकर्‍या मिळाल्या पाहिजेत, अनुदान-सुट-सबसिडी मिळाली पाहिजे अशा भिकमाग्या मागण्या केल्या असत्या तर ‘आमचे भाग्यविधाते’ म्हणून तुमचे फ्लेक्स गल्ली बोळातील पंटर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लावले असते. पण तुम्ही तर ‘सुट सबसिडीचे नाही काम। आम्हाला हवे घामाचे दाम॥ असल्या घोषणा सामान्य शेतकर्‍यांना शिकवल्या. अशानं कसं होणार शरद जोशी तुमचे आणि तुमच्या संघटनेचे?

बरं नाहीतरी तुम्हाला कॉंग्रेसविरोधी म्हटलं गेलं होतंच. मग आता कॉंग्रेसविरोधातील मोदींचे सरकार सत्तेवर आले आहे. मग अशावेळी कशाला आंदोलन करण्याच्या भानगडीत पडला? शिवाय तुमचे आता वय झालेले. गप्प बसला असतात तर पाच पंचेविस जीवन गौरव पुरस्कार, एखादा पद्मश्री पद्मभुषण काही तरी पदरात पडण्याची शक्यता होती. पण तुम्ही आंदोलन करून तेही दोर कापुन टाकले.

हे बघा शेतकरी जर स्वत:च्या पायावर उभा राहिला तर मग आमच्या या जाणत्या राजांचे, शेतकर्‍यांचे कैवार घेणार्‍या पुढार्‍यांचे, शेतकर्‍याच्या पोटी जन्मुन त्याचा गळा कापणार्‍या सत्ताधार्‍यांचे कसे होणार? तेंव्हा जितका परिस्थितीने शेतकरी गांजलेला, जितका आस्मानी सुलतानीने पिडलेला, जितका तो कर्जाच्या रूपाने बँकेकडे गहाण तितके आमचे शेतकर्‍यांच्या पोटी जन्मलेले सत्ताधारी नेते महान !!

तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाडोत्री विद्वानांनी लिहीलेले लेखही कुठे दिसत नाहीत. भाडोत्री गुंड परवडले पण हे भाडोत्री विद्वान फार भयानक. पैसे घेवुन दहशत गुंडगिरी करणे सोपे आहे पण बुद्धी गहाण ठेवणे फार घातक. आता तुमचे ते भोळे भाबडे शेतकरी निष्ठावान कार्यकर्ते आपल्या सदसदविवेक बुद्धीला प्रमाणिक राहून

शरद जोशी हृदयात । 
कशाला करू जाहिरात ॥

असं म्हणताना आम्ही ऐकलं आहे. म्हणो बापडे आम्हाला काय!  फ्लेक्स दिसले नाहीत, जाहिराती नाहीत, लेख नाहीत म्हणजे तुमचे मोठेपण आम्हाला तरी माहित नाही. 

तुमचा नम्र 
एक कार्यकर्ता......

              
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

No comments:

Post a Comment