Tuesday, August 26, 2014

बैलाचे कौतुक शेतकर्‍याच्या शहरी पोरांनाच जास्ती !!


                             दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 26 ऑगस्ट 2014 


ठाण्याजवळ मुलूंड उपनगरात रविवारी प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे. सकाळची गर्दीची वेळ. रविवार मुळे थोडी कमी असली तरी महानगराची ती गर्दी. रेल्वेस्टेशनच्या पादचारी पुलावरून माणसे झपाझपा इकडून तिकडे चाललेली. इतक्यात पायर्‍यांवरून गायीच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज आला. सगळे वळून पाहताहेत तोवर एका माणसाने धरलेल्या कासर्‍यासोबत एक गायही रेल्वे पुलावरील पायर्‍या चढून येत होती. आता मुंबईमध्ये या गायीचे काय काम? गायीला चारा घालण्याचे पुण्य भक्तांना भेटावे या उद्दात (!) हेतूने पलिकडच्या एका मंदिरासमोर ही गाय घेवून हा माणूस बसतो. यासाठी 300 रूपये रोजाने गाय भाड्याने मिळते. लोकांकडून पैसे गोळा करायचे. भक्तांच्या खात्यात दिवसभर पुरेसे पुण्य आणि याच्या खिश्यात पुरेसे पैसे गोळा झाले की गाय मालकाकडे वापस. 

या सगळ्या प्रकाराला काय म्हणणार? काल पोळ्याचा सण सर्वत्र साजरा झाला. शहरातदेखील हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे प्रत्यक्ष खरे जातीचे बैल असण्याचा प्रश्नच नाही. मग मातीचे बैल बाजारातून खरेदी केले जातात. (हो आजकाल घरी कोणी बैल बनवत नाही. शाळेत पोरांना हस्तकला म्हणून कौतुकानं बैल बनवायला सांगतात ती गोष्ट वेगळी.) मातीचा संबंध तुटलेली माणसे मोठ्या उत्साहाने, ‘आमच्या घरी आजही कशी बैलाची पुजा होते’ हे कौतुकाने एकमेकांना दाखवून देतात. शिवाय चुकून माकून कुणी बैलजोडी सजवून शहरात रस्त्यावरून मिरवायला आणली तर काही विचारू नका. सगळ्यांना त्या बैलांना ओवाळणे, त्यांच्या पायाखाली काकडी फोडणे, बैलाला पुरणपोळी खावू घालणे याचा नको तेवढा उत्साह येतो. 

शहराचे सोडा खेड्यात काय परिस्थिती आहे? गाय, बैल, शेळ्या आदी जनावरे सांभाळणे मोठी कटकट होवून बसली आहे. आधी चराईसाठी गायरानं असायची, माळ असायचे. आता तसे काही उरलं नाही. शिवाय जनावरे सांभाळण्यासाठी दुध काढण्यासाठी माणसं होती. चरायला न्यायला गुराखी असायचे. या जनावरांना खायला जसं बाहेर उपलब्ध होतं त्याप्रमाणेच शेतातील ज्वारीचा किंवा मक्याचा कडबा (पिकाचा कणीस सोडून उरलेला जैविक भाग- कडबा म्हणजे काय हे आजकाल सांगावं लागतं) असायचा.  लसूण गवत, कडूळ किंवा अजून काही जनावरांना उपयुक्त चारा शेतकरी आवर्जून लावायचे. पण दिवसेंदिवस शेतीची बिकट अवस्था होत चालली आहे आणि हे सगळं नाहिसं होत आहे. दुष्काळात जनावरांचे मोठे हाल होतात. परिणामी ट्रॅक्टरने शेतीची कामं झपाट्याने उरकून शेतकरी मोकळा होत आहे. जनावरांचे झेंगट त्याला परवडेनासे झाले आहे. 

मग पोळ्याचे- बैलाचे कौतुक कोणाला? शेतीसोडून शहरात येवून नोकरी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पोरांना! जसे पन्नास शंभर वर्षांपूर्वी  कोकणातील बहुतांश लोक पोटपाण्यासाठी मुंबई पुण्याला स्थलांतरीत झाले. गावच्या आठवणी त्यांच्या मनात जिवंत असायच्या.  त्यामुळे कोकणातील लेखकांनी लिहीलेली वर्णनं वाचताना त्यांना मोठं छान वाटायचं. परिणामी मराठीत कोकणातील लेखकांच्या पुस्तकांची मोठी चलती निर्माण झाली. तसं आता या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पोरांनी केलं आहे. यांनी शेती सोडली. पण शेतीचे वर्णन करणारे, काळ्या मातीचे गुणगान करणारे, बैलाचा, गायीचा लळा वर्णन करणार्‍या साहित्यकृतीचे मोठे कौतुक सुरू झाले. एकीकडे गावाकडून शहरात स्थलांतरीतांचा ओघ सुरू राहिला. शेती विकून नौकर्‍या स्विकारल्या आणि दुसरीकडे गावच्या वर्णनाचा पुर मराठी साहित्यात निर्माण झाला. हा एक विरोधाभासच होता. 

बैल हा विषय तर फार पुरातन. अगदी ऋग्वेदात गायीचे बैलाचे संदर्भ आहेत. स्वाभाविकच आहे कारण मानवी संस्कृतीची सुरवातच शेतीपासून झाली. मारून खाणारा म्हणजे शिकार करणारा माणूस पेरून खायला लागला म्हणजे शेती करायला लागला आणि हजारो लाखो वर्षांनंतर पहिल्यांदाच तो स्थिर झाला. स्थिर झाला म्हणूनच संस्कृती निर्माण झाली. वेदांतील कृषीसुक्तात 

कल्याण बैलांचे तसे माणसांचे,
कल्यण करो या शेताचे नांगर
कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत
कल्याणकारक असावा आसूड ॥

कल्याणा आमुच्या नांगरोत फाळ
नांगर्‍ये चालोत बैलांच्या संगती
कल्याण पाऊस बरसो पाण्याने
आम्हां सुख द्यावे शेतीजी-सीतने ॥ 
(वेदांतील गाणी-विश्वानाथ खैरे, पृ. 18, मंडल 4,  ऋचा 57, संमत प्रकाशन)

असे असल्यावर बैलाचे स्थान आपल्या परंपरेत असणारच. तेंव्हा बैलाची पुजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं स्वाभाविकच आहे. श्रावण अमावस्येला पोळ्याचा सण साजरा करावा. हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. पण प्रत्यक्ष खर्‍याखुर्‍या बैलाची आता उपयुक्तता किती उरली आहे? असा प्रश्न विचारला तर भले भले दचकतात. खरं तर प्रत्यक्ष कृतीतून आपण बैलाची उपयुक्तता संपली हे दाखवून दिले आहे. गायीचे बैलाचे कौतुक करणारे कोण आहेत? ज्यांनी शेती सोडली आहे किंवा ज्यांचा आता शेतीशी काही संबंध नाही ते.

आमचे एक ज्येष्ठ कवीमित्र मोठे चांगले चित्रकार आहेत. ते बांगड्याच्या तुकड्याच्या मोठ्या सुंदर कलाकृती भिंतीवर चितारतात. यात प्रामुख्याने मोर आणि बैल असतात. बर्‍याच ग्रामीण सहित्यीकांनी आपल्या घरात भिंतीवर हा बैल काढून घेतला आहे. पण प्रत्यक्षात कोणाच्याच शहरातील घरात गोठा आढळणार नाही. गायी बैलावर फार गहिवरून कोणी बोलू लागला तर त्याला फक्त इतकेच विचारावे की तुझ्या घरात आत्ता जनावरं आहेत का? फार पैसा आला तर तू गाडी घेतोस, घराला दुसरा मजला बांधतोस, पोराला महागडा मोबाईल घेवून देतोस मग जास्तीचा प्लॉट घेवून त्यावर गोठा बांधून गायी बैल का नाही सांभाळत? खरं कारण म्हणजे आता गायी बैल पाळणं सांभाळणं हा आतबट्ट्याचा व्यवहार कोणालाच नको आहे. पण तसं कोणी कबुल करत नाही. आपल्या संस्कृतीत एक विकृती आहे. ज्यावर अन्याय करायचा, ज्याला दुय्यम स्थान द्यायचं त्याचा वरवर अवास्तव वाटावा असा गौरव आम्ही करतो. स्त्रीयांना दुय्यम मानायचं आणि मातृदेवता म्हणून तिची पुजा करायची, शेतकर्‍याची शेतीची माती करायची आणि बळीराजा म्हणून त्याचं कौतुक करायचं, शहरात येवून स्थायीक व्हायचं आणि गावगाड्याची रम्य वर्णन एकमेकांना सांगायची. हे सगळं ढोंग आहे. जनावरांच्या श्रमावर आधारलेली व्यवस्था कधीच संपली आहे. यंत्रयुग आलं आहे आणि आपण त्याचा लाभ घेतो आहोत. त्या अनुषंगाने मानवाने आपली प्रगती साधली आहे. घोड्यांचे कौतुक आहे म्हणून कोणी घोडागाडी वापरत नाही. तसेच बैलाचे कौतुक आहे म्हणून त्याला नांगराला जोडणे, बैलगाडीचा वापर करणे आता शक्य नाही. ते त्रासदायक ठरतं आहे. अगदी जवळच्या गावाला जायलाही आता छोट्या गाड्यांचा वापर होतो बैलगाडीचा नाही.

माझ्या मामाची रंगीत गाडी हो 
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो 

हे फक्त लहानमुलांच्या कवितेतच उरलं आहे. 
ज्यांना म्हणून वृषभ संस्कृतीचे गोडवे गायचे असतील त्यांच्या घरातील स्वयंचालित गाड्यांची संख्या आधी मोजून घ्या. हे ढोंग आपण आता सोडून दिलं पाहिजे. पुजेत इतके सारे देव आपण पुजतो त्याप्रमाणे आता एक बैलाचीही मुर्ती करून पुजूत. ऋषी पंचमी हा सण म्हणजे बैलाचा शेतीत वापर झाला त्याच्या आधीच्या काळातील सण आहे. आपण तो आजतागायत साजरा करतो आहोत.  या दिवशी बैलाच्या श्रमाने पिकवलेले धान्य खात नाहीत. तसे आता वर्षातून एक दिवस तरी बैलाच्या श्रमाचे खायचा सण साजरा करावा लागेल. तो सण आपण कृषी पंचमी किंवा वृषभ पंचमी म्हणून साजरा करू. बाकी बैलाचे जास्तीचे गोडवे गायची काही गरज नाही  (हे वाचून कोणा बैलप्रेमी मानवाच्या भावना दुखावल्या तर मी क्षमा मागतो. बैलाच्या भावना दुखावणार नाहीत उलट त्यांना आनंदच होईल याची मला खात्री आहे !!) 
             
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575       

No comments:

Post a Comment