Thursday, November 7, 2013

शरद पवार, आता तूम्हीच लाजेखातर नाही म्हणा

उरूस, गुरूवार 7 नोव्हेंबर 2013

वसमत येथे 35 वे मराठवाडा साहित्य संमेलन भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. पवारांनी होकार दिला की नाही हे माहित नाही पण निमंत्रण पत्रिकेवर त्यांचे नाव आहे. अजून काही दिवसांतच साहित्य-नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाची ‘‘सेंच्युरी’’ शरद पवार ठोकतील असे दिसते. साहित्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांना याबाबत बोलून काही होईल असे वाटत नाही. तेंव्हा आता आम्ही शरद पवारांनाच विनंती करतो की त्यांनीच लाजेखातर साहित्य संमेलनांची निमंत्रणे नाकारावीत. आपल्याकडे म्हणतात ना ‘‘करणार्‍याला लाज नसेल तर निदान बघणार्‍याने तरी लाजावे !’’ तसाच हा प्रकार आहे.
हे वारंवार का घडते ? गेली 12 वर्षे मराठवाड्यात आणि एकूणच महाराष्ट्रात साहित्य-नाट्य चळवळीत राष्ट्रवादीचीच नेते मंडळी का पुढाकार घेत आहेत? आणि या सगळ्यांना परत उद्घाटनासाठी शरद पवारांनाच का बोलवावे वाटत आहे? आतापर्यंत शरद पवारांनी ज्या ज्या साहित्य-नाट्य संमेलनांची उद्घाटने केली ती सर्व भाषणं तपासून पहा. या सगळ्यांत साहित्य विषयक काय वेगळं चिंतन आहे ते तपासण्यासाठी एखादी समिती उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमा. म्हणजे नसलेल्या चिंतनातून काही तरी अर्थ ते काढून दाखवतील.
महाराष्ट्रात तरी असे चित्र आहे की एकही राजकारणी अगदी तो गल्लीतील नगरसेवक का असेना साहित्य संस्थांच्या दारात आपणहून जात नाही. आपणहून एकही आमंत्रण साहित्य महामंडळ किंवा त्यांच्या घटक संस्थांकडे येत नाही. आमंत्रणं लावून घ्यावी लागतात हे उघड गुपित आहे. एखाद्या छोट्या मोठ्या शहरात साहित्यीक संस्थेची शाखा चांगली चालवली जाते, सतत चांगले उपक्रम आखले जातात, त्या भागात वाचन संस्कृतिची जोपासना चांगल्या पद्धतीने होत आहे मग आता तिथे साहित्य संमेलनाचा मोठा उत्सव आपण घेवूयात असं काही घडतं का?
याच्या नेमकं उलट ज्या ठिकाणचा राजकीय नेता निधी खेचून आणण्यात प्रबळ आहे तिथे साहित्य संमेलन मात्र संपन्न होताना दिसते आहे. जिथे साहित्य संमेलन झाले तिथे परत काही वाङ्मयीन उपक्रम होतात का? किंवा ते होत असतील तर त्यात कोणाचा हात आहे? म्हणजे संमेलन होणार असले की वेगळीच मंडळी पुढे येते. त्या काळात चमकत राहते. आणि संमेलन संपून गेलं की हे कुठे गायब होतात ते आजतागायत कळलेलं नाही. मग त्या भागातले लोक जे साहित्यीक उपक्रम आपल्या पद्धतीने चालवत असतात त्याला उलट धक्का बसतो. कालपर्यंत कमी पैशात, अपुर्‍या साधन सामग्रीत चालणार्‍या या चळवळी अचानक ‘‘हायफाय’’ पैसेवाल्या होवून बसतात. कालपर्यंत एखाद्या निरलस कार्यकर्त्याच्या घरात उतरणारा, घरचे जेवण करणारा पाहूणा अशा मोठ्या संमेलनानंतर ‘‘धाबेवाला’’ होवून बसतो. कार्यक्रमा नंतरच्या कार्यक्रमाला महत्त्व येते आणि कार्यक्रमाच्या खर्चापेक्षा नंतरच्या ‘‘बसण्याचा’’ खर्च प्रचंड वाढतो.
राजकीय नेते संमेलनास येणार म्हटले की त्यांच्या पक्षाचे त्या भागातले सगळे चमचे साहेबांना तोंड दाखवायला तिथे गोळा होतात. त्यांना फक्त साहेबांमध्ये रस असतो. बाकी साहित्याशी त्यांचे काहीच देणेघेणे नसते. बर्‍याचदा साहेबांचे हे चमचे विविध महामंडळांवर असतात. मग त्या महामंडळाच्या बैठका संमेलनाच्या तारखांना लागून जवळपास आयोजित केल्या जातात. आमदार खासदार किंवा मंत्री पदावर असलेले आपल्या खात्याच्या बैठका या संमेलनाच्या तारखांना लागून ठेवतात.
ही सगळी फुगवलेली गर्दी साहेब गेले की निघून जाते. मग मंडप रिकामा होवून जातो. आयोजक आमदार/खासदार/मंत्र्याचाही रस संपून जातो. नंतरच्या कार्यक्रमाला तो हजर राहिलच याची खात्री नसते. त्याच्यासाठी त्या भागात राबणारी मंडळी भरपूर असतात. ते पाहूण्यांची ‘‘सगळी’’ व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतात. आणि संमेलन ‘‘थाटात’’ पार पाडल्याचं छापून आणतात.
बरं यात साहित्यीकांचा विचार केल्यास त्याही आघाडीवर आनंदी आनंद आहे. ज्येष्ठ विचारवंत साहित्यीक नरहर कुरूंदकर कुठेही व्याख्यानाला जायचे असेल तर एस.टी. महामंडळाच्या साध्या बसने प्रवास करायचे. असा प्रवास करून जागजागीच्या व्याख्यानमालांची किर्ती त्यांनी वाढवली. इतकी व्याख्याने दिली, इतके कार्यक्रम केले पण त्यासोबतच त्यांचे लिखाण कुठेही कमी पडले नाही. आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून त्यांनी लिखाण केले. म्हणजे कुरूंदकर सांगायचे व भु.द.वाडीकरांसारखे लेखक ते लिहून घ्यायचे. आजकालचे ‘‘स्टेजबहाद्दर’’ नुसते हवेत फिरल्या सारखे महाराष्ट्र गाजवत फिरतात. त्यांचे लिखाण कुठे आहे म्हणून विचारले तर कुणालाच सांगता येत नाही.
एरव्ही निमंत्रण आले तर मागणीची भली मोठी यादी आयोजकांसमोर सादर करणारी ‘‘स्टेजबहाद्दर’’ मंडळी संमेलनाला अपुर्‍या मानधनावर येतात. त्याचं कारण विचारलं तर एक प्रसिद्ध वक्ता/कवी/विदूषक/एकपात्री प्रयोग करणारा बहाद्दर म्हणाला, ‘‘एका संमेलनात पुढची भरपूर आमंत्रणे मिळत असतात. शिवाय येतानाच मी चार ठिकाणचे कार्यक्रम करून आणि जाताना दोन ठिकाणची आमंत्रणे स्विकारून आलो आहे.’’ आता अशांच्यामुळे साहित्य संस्कृतीचे काय भले होणार आहे.
जे राजकीय नेते संमेलनात येतात त्यांना साहित्य संस्कृतीबद्दल किती आवड आहे, त्यांचे वाचन किती चांगले आहे, प्रतिभावंतांची त्यांना किती कदर आहे याची ग्वाही त्यांचे पंटर नेहमी देत असतात. साहित्य संस्कृतीबद्दल कळवळा असणारे एक मोठे राजकीय नेते या बैठका आपल्या घरी घ्यायचे. बैठकीसाठी सगळे जमले की त्यांना निरोप जायचा. ते जिन्यावरून हळू हळू उतरत खाली बैठकीत यायचे. त्यांच्या हातात नेहमी एखादे त्या त्या वेळी चर्चेत असलेले पुस्तक असायचे. मी एका वैठकीला हजर होतो. हे राजकीय नेते खाली येत होते त्या पायर्‍यांजवळच्याच खूर्चीवर मी बसलो होतो. त्यांच्या हातात नेहमीप्रमाणे पुस्तक होते. पुस्तकातल्या एका पानावर त्यांनी बोट ठेवले होते. माझ्या जवळून ते गेले तेंव्हा लक्षात आले की पुस्तक उलटे धरले आहे.
राजकारणी साहित्य संस्कृतीत रस घेत आहेत तर मग उलट आमचे साहित्यीक सामाजिक राजकीय प्रश्नांबात बाबतीत काय रस दाखवत आहेत? दिसतं असं की आजही मोठ मोठ्या सहित्यीकांना राजकीय सामाजिक प्रश्न कळत नाहीत, त्याबाबत ते भूमिका घेत नाहीत. कळालं तरी ‘कशाला साहेबांच्या विरूद्ध बोला. आपला एखादा पुरस्कार, महामंडळांवरच्या नियुक्त्या, सन्मान हुकतील ना !’ याची त्यांना काळजी असते व ते शांत बसणे पसंद करतात.
औरंगाबाद शहरात रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी सामान्य माणसे रस्त्यावर उतरली. मी स्वत: त्यात सामिल होतो. इतकंच नाही तर त्यासाठी हर्सूल तुरूंगाची हवाही खावी लागली. (30 ऑक्टोबर ‘उरूस’) हे सगळं प्रकरण संपल्यावर परवा दिवाळीत एका प्रकाशक मित्राकडे लक्ष्मीपुजनासाठी आम्ही काही साहित्यीक जमलो होतो. साहित्य क्षेत्रातील मोठी  माणसं उपस्थित होती. ‘‘ख्या ख्या खी खी’’ करण्यावर त्यांनी समाधान मानलं. एकानेही जे काही घडलं त्याबाबत अवाक्षरही काढलं नाही. उलट माझ्याशीच इतर पांचट गोष्टी करून स्वत:चे समाधान करून घेतले.
खरं तर साहित्यीकाच्या शब्दाला किती महत्त्व असते. औरंगाबाद शहरात एका राजकीय नेत्याने वर्तमानपत्रांत आपल्या कामाची स्तूती करणारी ‘‘डायरी’’ प्रकाशीत करायला सुरवात केली. त्याचा उपहास करणारी एक छोटीशी फाटकी तुटकी ‘‘डायरी’’ एका व्यंगकाराने लिहीली. मोठ मोठ्या बदनामीच्या बातम्यांने जे साधणार नाही ते काम एका साध्या उपहासाने झाले. त्या राजकीय नेत्याला ही व्यंगमालिका इतकी खुपली की त्याने व्यवस्थापनाला सांगून ती बंद पाडली. ही ताकद शब्दांची असते.
राम हनुमानाला सीतेच्या शोधात लंकेला पाठवतो. लंकेचे लखलखीत वैभव पाहून हनुमान भूलून जातो आणि तो सीतेचा शोध घ्यायच्या ऐवजी रावणाचा पाहूणचार घेत तिथेच रावणाच्या पदरी त्याचा गोंडा घोळत राहतो. असं घडलं असतं तर रामायण घडलं नसतं. मानवी व्यथा-वेदनांच्या सीतेचा शोध घेणारे आमचे साहित्य क्षेत्रातले महान लोक या राजकारण्यांच्या वैभवाला भुलून त्यांच्याच पदरी गोंडा घोळण्यात स्वत:ला धन्य मानत आहेत. कुणीही संमेलन घ्या, आम्हाला बोलवा की न बोलवा, आमचे नाव पत्रिकेत असले तर आम्ही लाळ घोटत तिथे हजर. आम्ही तर लाज सोडली आहेच.
आता पवार साहेब, तूम्हीच संमेलनाचे उद्घाटन करण्यास नकार देवून या क्षेत्राची लाज राखा.       
         
     
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

2 comments:

  1. अशा पुचाट संमेलनांना श्रोते मिळतच नसतात, शेवटी अंगणवाड्यांच्या, बचत गटाच्या, आशा गटाच्या नाही तर गेला बाजार शाळकरी मुले आणून बसवतात. साहित्यात स्वतःला चमकून घ्यायला वेगळेच साहित्य लागते हे मात्र खरे !!

    ReplyDelete