Tuesday, November 19, 2013

हे शहाणपण ‘शहाणी’ माणसे दाखवतील ?

उरूस, दैनिक पुण्यनगरी, मंगळवार 19 नोव्हेंबर 2013

शेतकरी संघटनेच्या अधिवेशनातील प्रसंग आहे. एक मळकट कपड्यातला फाटका म्हातारा शेतकरी पुस्तकांच्या स्टॉलवर आला. वीस रूपयांचे नवीन छोटे पुस्तक त्याने खरेदी केले. आधीची सगळी पुस्तके त्याच्याकडे आहेत असं त्याचं म्हणणं होतं. शेतकरी संघटक पाक्षिकाची 200 रूपयांची वार्षिक वर्गणी त्याने भरली. आणि एक त्याच्याकडे नसलेले मोठे पुस्तक हातात घेऊन चाळू लागला. त्याने ते खाली ठेवले. परत हाती घेतले. परत थोडावेळाने खाली ठेवले. तोपर्यंत दुसर्‍या एका माणसाने इतर पुस्तके घेता घेता ते पुस्तकही घेतले, पैसे दिले निघूनही गेला. हा म्हातारा तसाच उभा. शेवटी मी न राहवून विचारले, ‘‘काका, काय झाले? काय पाहिजे तूम्हाला?’’. तो कसंनुसं हसत म्हणाला, ‘‘गावाकडं जायपुरतेच पैसे आहेत. ही शेगांवची स्मरणिका पाहिजे होती.’’ मी म्हणालो, ‘‘काही हरकत नाही. तूम्ही घेवून जा. पैसे नंतर पाठवा. तूमच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे. माझा तूमच्यावर विश्वास आहे.’’ त्याचे डोळे उजळले. पण नेमक्या त्या स्मरणिकेच्या प्रती संपल्या होत्या. आता मलाच हळहळ वाटायला लागली. तरी मी त्याला म्हणालो, ‘‘तूमचा पत्ता द्या. मी पोस्टाने पाठवून देतो.’’ त्याने उत्साहाने 'अरूणभाऊ भांबुरकर, मु.पो. बिहीगाव बुद्रूक, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती 444705' हा आपला पत्ता चांगल्या अक्षरात मला लिहून दिला. औरंगाबादला येताच आठवणीनं त्याला पुस्तक पोस्टाने पाठवून दिले. आश्चर्य म्हणजे त्याच दिवशी त्याची मनीऑर्डरही आली.
हा बर्‍याचवेळा आलेला अनुभव आहे. अतिशय सामान्य असलेले दहावी पास नापास शेतकरी आवर्जूृन पुस्तकं वाचतात, त्यावर चर्चा करतात. काही खेड्यांमध्ये मी पाहिलं आहे की आढ्याला तारेला टोचून 'शेतकरी संघटक' चे जूने अंक या शेतकर्‍यांनी जपून ठेवले आहेत. ही सामान्य दिसणारी माणसं विचाराने इतकी श्रीमंत कशी? ज्याला परत जायला जेमतेम पैसे आहेत तो शिल्लक थोड्याशा पैशातून पुस्तकं घेवू पहातो आहे याला काय म्हणावे?
लहान मुलांच्या बाबतीतला एक अनुभव असाच मोठा विलक्षण आहे. परभणीला शालेय मुलांसाठी एक प्रदर्शन 14 नोव्हेंबरला बालदिनाच्या निमित्ताने आम्ही भरविले होते. ‘नॅशनल बुक ट्रस्टचे’ सापांवरचे एक छोटे पुस्तक आमच्या प्रदर्शनात होते. त्याच्या मोजक्याच प्रती शिल्लक राहिल्या होत्या. एका मुलाने पुस्तकांच्या ढिगात बरीच शोधाशोध केली. त्याला ते सापडेना. त्यानं आमच्याकडे त्या पुस्तकाची मागणी केली. आम्हालाही ते सापडेना. मी त्याला सांगितले की तू उद्या ये, रात्री आवरताना ते सापडले तर आम्ही वेगळे काढून ठेवतो. रात्री पुस्तके आवरताना ते आम्हाला सापडले नाही. दुसरे दिवशी प्रदर्शन उघडण्यापूर्वीच एक दुसरा मुलगा आधीपासून बंद दरवाज्यापाशी पायरीवर येवून बसला होता. प्रदर्शन उघडताच तो आत शिरला व दोन मिनीटात ते पुस्तक घेवून काउंटरवर आला. आम्ही चकितच झालो. जे पुस्तक काल त्या मुलाला सापडले नाही, आम्हाला सापडले नाही ते या पोराला कसे काय सापडले. मी त्याला विचारताच तो म्हणाला, "मला माहित होते हे संपून जाईल म्हणून. मी टेबलावरच्या चादरीखाली ते लपवून ठेवले होते."
सामान्य शेतकरी असो की लहान मुलं असो यांचा आजही अक्षरांवर/ पुस्तकांवर जीव आहे. आणि याच्या उलट तथाकथित मोठी माणसे, मराठीचे प्राध्यापक, लेखक हे पुस्तकांचे  शत्रू बनलेले निदर्शनास येते. 
आम्ही प्रकाशन सुरू केल्यावर महाराष्ट्रातील मान्यवरांची यादी केली आणि त्यांना पुस्तके अभिप्रायार्थ पाठवायला सुरवात केली. 80 पैकी फक्त 7/8 मान्यवर पुस्तके मिळाल्याचे सांगायचे. क्वचित कोणी त्यावर प्रतिक्रिया द्यायचे. एका मान्यवर लेखकाने तर स्पष्टच कळवले तूमची पुस्तके पाठवत जावू नका म्हणून.
एका कवीमित्राच्या घरी गेल्यावर मी त्याला आमचे नविन पुस्तक सप्रेम भेट दिले. त्याने ते घेतले आणि टेबलावर ठेवून दिले. त्याच्याकडची इतर पुस्तके न्याहाळत असताना ते आमचे पुस्तक तिथे मला दिसले. हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी त्याला पोस्टाने आलेले होते. पण त्याने ते तर कळवले नाहीच. शिवाय आत्ता मी देत असताना त्यानं हे सांगायचेही सौजन्य दाखवले नाही.
औरंगाबादच्या एका मान्यवर संस्थेला वाङ्मयीन पुरस्कार द्यायचे होते. त्यांनी दोघा साहित्यीकांची समिती नेमली. आता पुरस्कार जाहिर करायची वेळ आली पण यांनी काही अहवाल दिलाच नाही. त्यातील एकजण माझ्याकडे आले आणि म्हणाले, की ही आलेली पुस्तके आम्ही काही वाचलीच नाहीत. तूम्ही वाचली आहेत का? असली तर कुणाला पुरस्कार द्यायचा ते सांगाल का? मी तयार झालो. त्याप्रमाणे त्यांना पुस्तक निवडून दिलेही. परत ते म्हणाले, जर कोणी यावर बोला म्हणाले तर काय करायचे? मी म्हणालो, मी बोलायला तयार आहे. शिवाय याच पुस्तकाला का पुरस्कार दिला ते सांगायलाही तयार आहे,
माझ्याकडे एका कादंबरीचे हस्तलिखीत आले. ही कादंबरी कशी छापण्यालायक नाही हे मी त्या उत्साही लेखकाला समजावून सांगत होतो. त्यानं मला सांगितले, ‘‘पण मी अमूक अमूक मान्यवर साहित्यीकाकडे हे पाठवले होते. तेंव्हा त्यांनी तर याची स्तूती केली. शिवाय छापा म्हणून सांगितले. त्यांनी मला तसे पत्रही पाठवले.’’ मी त्या मान्यवरांशी संपर्क साधला. त्यांना विचारले, ‘‘अहो या सामान्य संहितेची तूम्ही कशी काय शिफारस करता?’’ तर ते मला म्हणाले, ‘‘अहो मी ती वाचलीच नाही.’’
मी सुरवातीच्या काळात स्वत: पुस्तकांचे गठ्ठे घेवून महाविद्यालयांमध्ये जायचो. मराठी विभागातील सर्व प्राध्यापकांना भेटायचो. त्यांना पुस्तके दाखवायचो. ते घ्यायचे नाहीत ही गोष्ट वेगळी. पॉप्युलर प्रकाशनाने साहित्यीकांचा माहिती कोश प्रकाशीत केला होता. त्याचे खंड मी त्या विभागप्रमुख मान्यवर साहित्यीकाच्या हातात दिले. त्यांनी ते सगळे चाळले. आणि हे काम किती फालतू झालं आहे म्हणून टिका केली. मला कळेचना इतकं चांगलं काम हे फालतू का म्हणताहेत. कारण उशीरा कळाले. त्यात त्यांची माहितीच समाविष्ट नव्हती. मग ते ही पुस्तके घेतील कशाला?
म्हणजे ही मोठी माणसे वाचणार नाही, शिवाय इतरांनी केलेली मोठी आणि महत्त्वाची कामं निव्वळ वैयक्तिक स्वार्थी दृष्टीकोनातून तपासणार. याला काय म्हणावे?
‘म.पैगंबर आणि जात्यावरच्या ओव्या’ या लेखावर एका प्राध्यापक मित्राचा फोन आला, की हे फार महत्त्वाचे आहे. यावर एक लेख सविस्तर तूम्ही लिहून द्या. आमच्याकडच्या एका मासिकात मी तो छापतो. मी आवाक झालो. डॉ.ना.गो.नांदापुरकर हे मराठीचे विद्वान प्राध्यापक. त्यांनी केलेले हे संशोधन 70 वर्षांपूर्वीचे आहे. ते प्रकाशितही आहे. सामान्य वाचकांसाठी म्हणून मी तो लेख लिहीला होता. पण ज्यांचा हा अभ्यासाचा विषय आहे त्या मराठीच्या प्राध्यापकांनी डॉ. नांदापुरकरांचे काम वाचले नसेल तर कसं होणार?
आज मराठी ग्रंथव्यवहारात जी विचित्र परिस्थिती आलेली दिसते आहे त्याला पूर्णपणे हे 6 व्या वेतन आयोगावर गब्बर झालेले बांडगुळी प्राध्यापक जबाबदार आहेत. मराठीत जी वाङ्मयीन पुस्तके येत आहेत त्याची किमान नोंद घेणे, त्यांचे परिचयात्मक परिक्षण लिहीणे, नंतर महत्वाच्या पुस्तकांवर चर्चा घडवून आणणे, विशिष्ट कालखंडातील महत्त्वाच्या पुस्तकांच्या याद्या तयार करणे हे कोणाचे काम आहे?
एका साध्या शेतकर्‍याला कळते आहे की आपण आंदोलनाचा विषय समजून घेण्यासाठी पदराला खार लावून वाचले पाहिजे. एका छोट्या मुलाला कळते आहे की आपण खाऊचे पैसे वाचवून वाचले पाहिजे. 6 डिसेंबर व 14 एप्रिलचा अनुभव आहे की नागपुर व मुंबईला आंबेडकरी साहित्य मोठ्या प्रमाणात विकले जाते. छोट्या छोट्या पुस्तिका मोठ्या आत्मियतेने दलित जनता घरी घेवून जाते. याच्यापासून काहीच बोध आम्ही घेणार नाही का?
एक निवृत्त प्राध्यापक आमच्या ग्रंथव्यवहारातील मित्राला नियमितपणे फोन करून नविन आलेली पुस्तके आणुन देण्यास सांगायचे. सुरवातीला आमचा मित्र उत्साहाने नेवून द्यायचा. नंतरच्या काळात तो त्यांचा फोन आला की पुस्तकच नाही, मला येणं शक्य नाही अशी काहीतरी कारणं सांगायला लागला. एकदा माझ्यासमोर त्यांचा फोन आला आणि त्यानं पुस्तक नसल्याचे सांगितले. पुस्तक समोरच पडलेले होते. मी म्हणालो अरे काय झाले? पुस्तक तर आहे ना. तो म्हणाला कोण हमाल्या करणार? यांना पुस्तके फुकट हवी असतात. कधीच खरेदी करत नाहीत. मी नेवून देणे बंद करून टाकले आहे. 
  आपण ज्यांना तथाकथित मोठी माणसं म्हणतो तीच पुस्तकांची खरी शत्रू आहेत असं खेदाने म्हणावे वाटते. पुस्तकाबाबतचे शहाणपण वेड्या कमी शिकलेल्या पागल माणसांना असते पण तथाकथित शहाण्या माणसांना बर्‍याचदा नसते हेच खरे.         
     
      श्रीकांत अनंत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद. मो. 9422878575.

4 comments:

  1. "आज मराठी ग्रंथव्यवहारात जी विचित्र परिस्थिती आलेली दिसते आहे त्याला पूर्णपणे हे 6 व्या वेतन आयोगावर गब्बर झालेले बांडगुळी प्राध्यापक जबाबदार आहेत."

    पूर्णपणे नाही, कदाचित. ही प्राध्यापक मंडळी पण एका आखीव, बंदिस्त अशा चौकटीत वागत आहेत. नोकरीधंद्याच्या बाबतीत कला क्षेत्राला जी नगण्य किंमत आहे ती काय प्राध्यापकांनी नेमून दिलेली? ते जिथे काम करतात ती महाविद्यालये पण धंदा म्हणून काढलेली, तिथे ज्ञानापेक्षा कमाईला महत्त्व. त्या महाविद्यालयात नेमलेले ग्रंथपाल वाशिल्यावर लागलेले. त्यात पुस्तक खरेदी हा मुद्दा अनुदान, पुस्तकांची संख्या, किती फायदा होईल, किंवा खर्च किती कमी करता येईल याचा विचार करून केलेली. विद्यार्थ्यांना कुणी कधी याची जाणीवच करून नाही की पुस्तके वाचण्यात आनंद आहे, फायदा आहे. मग मुले खुरटलेली राहतात, आणि खुरटलेला समाज बनवतात. राजकारणी मग आपले साम्राज्य उपभोगत खुरटलेल्या पिकाची खुरटी सुगी साजरी करत राहतात!

    जर खरा दोष द्यायचा तर एका बुद्धिप्रधान समाजाचे एका मिळकतप्रधान खुरट्या समाजात रुपांतर करणाऱ्या, आणि काँग्रेस गवतासारख्या सर्वत्र पसरलेल्या राजकारण्यांच्या साम्राज्याला द्यावा लागेल.

    ReplyDelete
  2. आतिशय खरे आहे. आपण सारेच याला जवाबदार आहोत

    ReplyDelete
  3. pustak pradarshanat mulanche ase khup anubhav yetat.3 mitrat milun ghetlele agnipankh he pustak,tumhala madat karto ani pustak hi vachto ase manhnara mulaga...ase ++++

    ReplyDelete
    Replies
    1. आसे अनुभव जरूर सांग. आपण त्यावर एक चांगला लेख करुत. खरे तर माझ्या डोक्यात एक पूर्ण पुस्तकच आहे. मराठवाडा ग्रंथ यात्रेची सुरुवात तुमच्या अंबेजोगाई पासून झाली होती. त्याचे तर खूप अनुभव आहेत

      Delete