Sunday, November 17, 2013

या ‘सुफी’चं आता करायचं तरी काय?


उरूस, दैनिक कृषीवल, २५ नोव्हेंबर २०१२ 

मुंबईच्या प्रसिद्ध अशा हाजी आली दर्ग्याबाबत एक बातमी आली आणि एक मोठं वादळ निर्माण झालं. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन आणि नंतर कसाबची फाशी यामुळे ही बातमी सध्या जरा दबल्या गेली आहे. या दर्ग्याच्या गर्भगृहात स्त्रीयांना जाण्यास बंदी करणारा फतवा कट्टरपंथी उलेमांनी काढला. आणि या वादाला सुरूवात झाली. आयबीएन लोकमत वर या प्रश्र्नी मोठी चर्चा निखिल वागळे यांनी घडवून आणली. 
या निमित्ताने इस्लामधील पुरातन कट्टरपंथीयांनी परत जूने काही मुद्दे उगाळावयास सुरवात केली आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘सुफी’ संप्रदायाला विरोध. याची सुरवात कशी झाली? मुळ कुराण मध्ये नाच गाणे मुर्तीपूजा यांना निषिद्ध मानलं गेलं आहे. जगभरात ज्या ज्या ठिकाणी इस्लाम स्वीकारला गेला त्या त्या समाजाच्या मुळच्या काही चालीरीती होत्या. त्यात अर्थातच गाणं नृत्य आदी प्रकार होतेच. त्यांचं करायचं काय? या परंपरा कमी अधीक प्रमाणात तशाच शिल्लक राहिल्या. मग या संगीतातून देवाच्या उपासनेला काय म्हणायचं? तर त्यांनी हळू हळू ‘सुफी’ नाव धारण केलं. इस्लामच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना धर्म समजून घेताना दोन प्रकार सांगितले जातात. ते असे. इल्म सफीना म्हणजे कागदावर सांगितलेला धर्म. म्हणजे अर्थातच कुराण, हदीस आणि हजरत पैंगबरांनंतरचे चार आदर्श खलिफा यांच्या चरित्रावरून मिळालेली शिकवण हे सगळं म्हणजे इल्म सफीना. सफा म्हणजे पान. म्हणजेच कागदावर सांगितलेला धर्म. तर दुसर्‍याला म्हणतात इल्म सिना. अर्थातच सर्वसामान्य लोकांच्या हृदयात ज्या भावभावना आहेत त्यांना मूर्त करणारा तो धर्म. जर सामान्य लोकांना गावं वाटलं, नाचावं वाटलं तर काय करायचं. तर त्यांनी गायचं. आणि मग अशी व्यवस्था करून ‘सुफी’ संप्रदायाने एक सोय करून ठेवली. 
कट्टर पंथियांनी याला वारंवार विरोध केलेला आहे. पण जगभरात आणि विशेषत: भारतात हा सुफि संप्रदाय जोमाने फोफावला. कारण साधं आहे. जरी भारतात मोठ्या प्रमाणात इस्लामचा स्विकार इथल्या सामान्य जनांनी केला तरी त्यांच्या जुन्या धर्मामधील परंपरा ते विसरले नाहीत. परिणामी गाण्याची पुजेची नवसांची जी एक परंपरा होती तिचे जतन त्यांनी नव्या स्वरूपात करण्यास सुरवात केली. 
याला फार मोठ्या प्रमाणावर विरोध झाला नाही कारण अकबरासारख्या शहेनशहाने खुल्या मनाने सुफींना आश्रय दिला. इतकंच नाही, अजमेरचे सुप्रसिद्ध सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना अकबर मानायचा. ज्या औरंगजेबाला मुस्लिम कट्टरपंथी मोठा मान देतात त्या औरंगजेबाचे गुरूही सुफीच होते. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या संप्रदायातील 22वे संत ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांची समाधी खुलताबादला आहे. त्याच्याचजवळ मलाही दफन करा अशी औरंगजेबाची अंतिम इच्छा होती आणि त्याप्रमाणे औरंगजेबाची कबरही ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याजवळ बनवण्यात आली आहे. या पार्श्र्वभूमीमुळे सुफींना मोठा विरोध मनात असूनही भारतात होऊ शकला नाही. अकबराच्या काळात दक्षिण भारतात खुलताबादेत सुफींचं एक मोठं केंद्र होतं. देवगिरीच्या किल्ल्यावरील हिंदू संत चांदबोधले यांनी सुफी संप्रदायाचा स्वीकार केला. सुफींच्या कादरी परंपरेतील ते संत होते. संत एकनाथांचे गुरू संत जनार्दन स्वामी हे चांदबोधले यांचे शिष्य. तसेच त्यांचे दुसरे शिष्य म्हणजे सुप्रसिद्ध मुस्लिम मराठी संत कवी शेख महंमद. या चांदबोधले यांची कथा मोठी विलक्षण आहे. हिंदू असूनही त्यांनी सुफी वेष परिधान केलेला असायचा. ज्याचा मलंग वेष असं संबोधलं गेलेलं आहे. हे चांदबोधले दत्तावतारी पुरुष मानले गेले. एकनाथांना गुरूदत्तात्रयांनी मलंग वेषात जे दर्शन दिलं असं समजण्यात येतं. ते म्हणजे चांदबोधले यांनी दिलेलं दर्शन. ज्या ठिकाणी हे दर्शन दिलं, त्या शुलीभंजन इथे मोठं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि ज्या शिळेवर बसून एकनाथांनी तपश्र्चर्या केली ती शिळाही तेथे मोठ्या आदराने पुजिली जाते. या चांदबोधले यांचे शिष्य असलेले शेख मोहम्मद यांची जे अभंग आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे आहेत. ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायात ज्ञानाचा एका । नामयाचा तुका ही उक्ती आढळते तिलाच जोडून कबीराचा शेका असंही म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजेच शेख महंमद यांचे नाते कबीराशी जोडल्या गेलेलं आहे. शेख महंमद यांनी जन्माने मुसलमान असूनही कडव्या धर्मांधतेच्या खाणीत निपजलो असूनही शुद्ध परमार्थाची कास धरून आहोत असे स्पष्टपणे आपल्या कवितेत सांगितले आहे.
बाभळीचे झाडा । आंबे आले पाडा ।
अपरोक्ष निवाडा । शेख महंमद
याती मुसलमान । मर्‍हाष्ट्री वचने
ऐकती आवडीने । विप्र क्षुद्र
याच शेख मोहंमद यांनी देव-देवतांच्या मुर्ती ज्या फोडण्यात आल्या त्याबद्दलही अतिशय सुंदररीत्या विवेचन केलेले आहे. मूर्ती फोडणार्‍यांचा तर त्यांनी निषेध केलाच; पण त्याचबरोबर फक्त मूर्तीतच देव नाही, तर तो सर्वत्र आहे हीच शिकवण परत एकदा अधोरेखित करून आपणच खरे अद्वैतवादी वेदांती आहोत हे गौरवाने सांगितले आहे. शेख मोहम्मद म्हणतो :
मूर्ती लपविल्या । अविंधी फोडिल्या
म्हणती दैना झाल्या । पंढरीच्या
अढळ न ढळे । ब्रह्मदिका न कळे
म्हणती आंधळे । देव फोडिले
चराचरी अवीट । गुप्त ना प्रगट
ओळखावा निकट । ज्ञानचक्षे
हरी जीत ना मेले । आले ना ते गेले
हृदयात रक्षिले । शेख महंमद
शेख महंमदाचा ज्ञानचक्षू सदैव उघडा असल्यामुळे अशी रोखठोक रचना ते लिहू शकले.
या शेख महंमद यांनी आपले गुरू चांदबोधले यांची समाधी देवगिरीवर बांधली. सुफी संप्रदाय स्वीकारला म्हणून हिंदू त्या समाधीस समाधी म्हणायचा तयार नाहीत. तर जन्माने हिंदू असल्यामुळे मुसलमान त्यांना मानायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत आजही ही समाधी सुफी संप्रदायाचे भक्त दर्गा म्हणून पूजतात याला काय म्हणावे?
भारतातील विविध जाती आणि त्यांच्या रुढी-परंपरा ही मोठी विचित्र गोष्ट आहे. चांदबोधले हिंदू होते; पण त्यांनी सुफी तत्त्वज्ञान स्वीकारले. याच्या नेमके उलट अंबड तालुक्यातील (जि. जालना) शहागड येथील शहामुनी यांचा किस्सा सांगण्यासारखा आहे. या शहामुनींनी मुसलमान असून महानुभाव संप्रदाय स्वीकारला. त्यांचा सिद्धांतबोध हा ग्रंथ महानुभाव भाविक आदराने कपाळी लावतात. चातुर्मासात या ग्रंथाचे सामुदायिक वाचन होते. 
नव्हे यातीचा ब्राह्मण । क्षत्रिय वैश्य नोहे जाण
क्षुद्रा परिस हीण वर्ण । अविंध वंशी जन्मलो
ऐसे खाणीत जन्मलो । श्रीकृष्ण भक्तीसी लागलो
तुम्हा संताचे पदरी पडलो । अंगिकारावे उचित
या शहामुनींनी इ. स. 1808 मध्ये शहागड येथे समाधीचा स्वीकार केला. या समाधी मंदिराजवळ त्यांच्या वारसदार पाच मुसलमानांची घराणी राहतात. तेवढेच फक्त या समाधीला पूजतात. इतकेच नाही तर ही मुसलमान घराणी मांस, मद्य वर्ज्य मानतात. कृष्णोपासना करतात आणि महानुभाव महंतांकडून गुरूपदेश घेतात. चैत्र वैद्य सप्तमीला शहामुनींच्या पुण्यतिथीचा साजरा होतो. या उत्सवात अन्य मुसलमान भाग घेत नाहीत.
अशी कितीतरी उदाहरणं भारतभर विखुरलेली आहेत. सुफींना विरोध करणार्‍यांना भारतातली ही गेल्या सातशे-आठशे वर्षांतली उदार परंपरा समजणार आहे काय? किंवा खरं म्हणजे ही समजून घ्यावी अशी त्यांची मानसिकता आहे काय?


2 comments: