Sunday, November 11, 2018

दिवाळी पहाट : नेत्यांनी लावली वाट । परभणीच्या तरूणांचा आदर्श वस्तुपाठ ॥



दिवाळी पहाट नावाने जे कांही संगीताचे कार्यक्रम सध्या होत आहेत त्यांचे स्वरूप पाहिले की डोक्यावर हात मारून घ्यायची वेळ येते. राजकीय नेत्यांनी केलेली घुसखोरी तर ठळकपणे जाणवत आहेच पण यात संगीताची पण वाट लागत आहे हेही जाणवत आहे. सुगम संगीताच्या नावाने दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील तरूण तथाकथित सेलिब्रीटी गायक  निवडायचे, निवेदनासाठी असेच तरूण अभिनेते निवडायचे, गवातल्या बुजूर्ग संगीत क्षेत्रातील मान्यवराला शाल पांघरून सत्कार करून गुदमरून टाकायचे. पत्रकार मित्रांना हाताशी धरून त्याची जाहिरात करून घ्यायची, शहराच्या चौका चौकात होर्डिंग्ज लावून धमाका उडवून द्यायचा असा एक फॉर्म्युलाच होवून बसला आहे.

दूरदर्शनमुळे गायकांची झब्बे जाकिटवाली एक प्रचंड मोठी जमातच तयार झाली आहे. यांची सुरांची जाण जराही जाणवत नाही पण पोशाखाची जाण मात्र अति उत्तम. निवेदन करणारे तर ‘मोकाट सुटलेली जनावरे’ याच श्रेणीत मोडतात. एक निवेदक कबीराच्या भजनाचे निवेदन करताना म्हणाला, ‘कबीराचा एक शेर ऐकवतो..’ आता अशांना काय बोलावे आणि काय सांगावे?

राजकीय नेत्याचे छायाचित्र आवर्जून बॅनरवर झळकत असते. त्या नेत्याच्या हितसंबंधातील काही रसिक या नावाखाली कार्यक्रमाला आमंत्रित केले जातात. त्यांचा संगीताशी बापजन्मी कधी काही संबंध आलेला नसतो. त्यांचे स्वागत किंवा त्यांनी राजकीय नेत्याचे केलेले स्वागत हा कार्यक्रम बिनदिक्कत गाणं चालू असतानाच मंचासमोर किंवा काही वेळा चक्क मंचावरच चालू असतो. त्यांना आडवलं तर ‘..हा आमचा सत्कार महत्त्वाचा आहे. तूमचं गाणंच याला अडथळा येत आहे..’ असे महान भाव त्यांच्या चेहर्‍यावर असतात. 

महानगर पालिका असलेल्या मराठवाड्यातील एका शहरात तर शास्त्रीय गायकाने जराशी आलापी सुरू केली की एक मोठे नेते कुटूंब कबिल्यासह कार्यक्रमस्थळी अवतरायचे. गायकाला थांबवून आयेाजक सत्कार समारंभ उरकून घ्यायचे. तो पर्यंत गायकाचा मूड पार उतरून गेलेला असायचा. शास्त्रीय संगीतासाठी एकाग्रतेने गायक आपली तंद्री जूळवत आणत असतो. त्याच्या मनात गायनाविषयी विचार आकार घ्यायला सुरवात झाली असते. पूढच्या संपूर्ण दोन एक तासांचा आराखडा त्याच्या मनात साकार व्हायला सुरवात झाली असते की लगेच त्याचा असा हिरमोड केला जातो.

काही ठिकाणी एखादी स्पर्धा पूर्वी घेतलेली असते. त्याचा बक्षिस वितरण समारंभ याच कार्यक्रमात उरकून घेतला जातो. ज्येष्ठ नागरिक संघासारख्या काही संस्था तर त्या महिन्यात ज्या सदस्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे पण याच संगीत कार्यक्रमात उरकून घेतात.

म्हणजे ‘दिवाळी पहाट’ या नावाने जे काही रूजू पहात आहे ते म्हणजे ‘वरून संगीत आतून तमाशा’ असाच प्रकार म्हणावा लागेल. तरूण रसिक किंवा इतरही रसिक जे चांगले ऐकू इच्छितात त्यांना या दिवाळी पहाट कार्यक्रमांचा वीट यावा अशी परिस्थिती आहे. रेकॉर्डेड गाणे पण ऐकवायचा अट्टाहास कशासाठी? कराओके वर गाणं ऐकविणार्‍यांना काय म्हणणार? दिवाळीत गाणं म्हणजे परंपरेने जे चालत आले आहे ते जतन करण्याचा प्रयत्न असायला हवा. त्यासाठी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमच संयुक्तिक आहेत.

या पार्श्वभूमीवर काही संस्था/व्यक्ती आवर्जून प्रयत्न करून दिवाळी पहाटच्या निमित्ताने शास्त्रीय संगीताला व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्या कार्यक्रमांतून रसिक घडविण्याची एक मोठी किचकट प्रक्रियाही राबविली जात आहे गेली 27 वर्षे परभणी शहरात ‘सूरधनत्रयोदशी’ नावाने शास्त्रीय संगीताची एक मैफल टाकळकर परिवारा तर्फे घेतली जाते. एका चांगल्या तबलावादकाचा सोलो आणि नंतर गायन असे साधारण याचे स्वरूप राहिलेले आहे. 1991 मध्ये सुरमणी  डॉ. कमलाकरराव परळीकर यांचे शिष्य असलेले रेणुकादास टाकळकर, चंद्रकांत लाटकर आणि तबला वादक प्रा. अण्णा भोसले व शशांक शहाणे या चार मित्रांनी मिळून दिवाळीत सुरधनत्रयोदशी ची सुरवात परभणी शहरात केली. पार्वती मंगल कार्यालयाचे प्रभाकरराव देशमुख आणि वैष्णवी मंगल कार्यालयाचे सराफ बंधु यांनी जागा उपलब्ध करून पाठबळ पुरवले. यासाठी कुठलेही प्रवेशशुल्क रसिकांना आकारले जात नाही. आपणहून लोक पैसे गोळा करतात आणि कार्यक्रम घडवून आणतात.

गेली दहा वर्षे पं. राम देशपांडे यांचा शिष्य असलेला तरूण गायक पंकज लाटकर देशपांडे हा उपक्रम घडवून आणत आहे. रेणुकादास टाकळकर आणि अण्णा भोसले यांच्या दु:खद निधनानंतर ही धुरा तरूण पिढीने हाती घेतली आहे. पत्रकार मल्हारीकांत देशमुख, हार्मोनिअम वादक मंगेश जवळेकर, तबला वादक समीर अण्णा भोसले, गायक संगीतकार लेखक अष्टपैलू व्यक्तीमत्व असलेला डॉ. यशवंत पाटील, सिंथवादक श्रीकांत कुलकर्णी, तरूण गायक नरेंद्र जोशी, रेणुकादास टाकळकरांचा मुलगा प्रा. आकाश टाकळकर ही मंडळी पंकजला जीवाभावाने साथ देताना दिसून येतात.

केवळ शास्त्रीय संगीतासाठीच चालू असलेला उपक्रम म्हणून याला महत्त्व आहे. या वर्षी तरूणांचा लाडका असलेला नव्या दमाचा तबला वादक ओजस आढीया आणि कलकत्ता येथील सुप्रसिद्ध गायक कुमार मर्डूर यांना या सुरधनत्रयोदशी कार्यक्रमात आमंत्रित केले होते. नांदेडचा तरूण हार्मोनियम वादक पं. प्रमोद मराठ्यांचा शिष्य अभिनय रवांदे साथीला होता.  परभणीची नविन पिढीची गायक मंडळी निलेश खळीकर, श्रीपाद लिंबेकर जी की आता मराठवाड्याच्या बाहेर आहेत ती समोर बसून श्रद्धेने गाणं ऐकत होती. नांदेडहून प्रशांत गाजरे सारखा उमदा तबलावादक स्वरेश देशपांडे आणि इतर सात आठ मित्रांना मुद्दामहून ओजस आढीया याचे तबलावादक ऐकायला घेवून येतो ही सकारात्मक अशी बाब आहे.

शास्त्रीय संगीत समजणारे, गाणारे, वाजवणारे यांची संख्या तशी मर्यादीतच असते. पण आश्चर्य म्हणजे परभणी, नांदेड, सेलू, माजलगांव अशा गावांत ही समज असणार्‍यांची मोठी संख्या आहे. घरात एखादे वाद्य असणे सहज आहे. परंपरेने चालत आलेला गळा किंवा गाण्याची समज ही घरोघरी आढळते. हे सगळं जतन करायचे असेल तर पंकज लाटकर देशपांडे सारख्या तरूण गायक कलाकाराची धडपड समजून घेतली पाहिजे. त्या प्रमाणे छोट्या मैफीलींचे आयोजन सातत्याने केले गेले पाहिजे.

नांदेडला शास्त्रीय संगीताच्या छोट्या मैफिलींसाठी ‘नादोपासक’ नावानं उपक्रम सुरू झाला असून गेली 11 महिने सातत्याने चालू आहे. औरंगाबादला गजानन केचे यांनी अशा मैफीलींची परंपरा सुरू केली आहे.

लातूर, अंबाजोगाई, उमरगा इथेही शास्त्रीय संगीताचे अतिशय पोषक असे वातावरण आहे. जालन्याला दिवाळी पहाटचा कार्यक्रम आता नियमित झाला आहे. पण तो सुगम संगीताचा असतो. थोडेफार प्रयत्न केले तर तिथेही शास्त्रीय संगीत रूजू शकते. अंबडला गोविंदराव जळगांवकर यांनी सुरू केलेली दत्त जयंती संगीत महोत्सवाची परंपरा फार मोठी आहे. या महोत्सवात नियमितता आणण्याची गरज आहे.

विविध मंदिरांमध्ये गायनाची परंपरा रूजविणे याचा पण गांभिर्याने विचार केला गेला पाहिजे. परभणीलाच पारदेश्वर शिव मंदिरात पाडव्याच्या दिवशी उस्ताद शाहीद परवेज यांचे शिष्य असलेल्या सारंग अर्धापुरकर या तरूण सतारवादकाची छोटी मैफल संपन्न झाली. या मंदिरातही दिवाळीच्या निमित्ताने संगीत सभा नियमित होवू शकते.

औरंगाबादला नवरात्रात डॉ. श्रीरंग देशपांडे आपल्या घरी शास्त्रीय संगीताची मैफल नऊ दिवस घेतात. औरंगाबादला देवीच्या मंदिरांमध्ये नवरात्र संगीत सभेचे आयोजन केले जाते. पण ते भक्तीगीतांपुरते मर्यादीत राहते. काही ठिकाणी शास्त्रीय गायनही होते. पण मुख्य हेतू शास्त्रीय संगीत हा नसतो. जर अशा मंदिरांमधून संगीताच्या मासिक सभा आयोजीत केल्या तर त्याचीही एक मोठी चांगली परंपरा निर्माण होवू शकेल.
गणपती मंदिरं जिथे आहेत तिथे चतुर्थीच्या दिवशी अशा संगीत बैठकांचे आयेाजनही केले जाते. परभणीला असा उपक्रम काही दिवस सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांनी चालवला होता. ते दरवर्षी पलूस्कर भातखंडे पुण्यतिथीचा कार्यक्रम घेत असतात.

शास्त्रीय संगीत आपला फार मोठा संपन्न उज्ज्वल असा सांगितीक ठेवा आहे. त्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. पुण्या मुंबईकडे काय होते याची चर्चा करत बसण्यापेक्षा आपल्या प्रदेशात आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातील नविन शास्त्रीय संगीत उपासकांना गायक वादकांना कांही एक उपक्रम करावेसे वाटतात, त्यासाठी ते धडपडतात, स्वत:च्या कलेसोबतच इतर चांगले प्रतिभावंत शोधून त्यांची कला या प्रदेशातील रसिकांसमोर सादर करण्यासाठी शक्ती खर्च करतात हे फार महत्त्वाचे आहे.

नांदेडलाही यावर्षी दिवाळी पहाट मध्ये ओंकार दादरकरचे गाणे झाले. लातूरला-बीडला जयतीर्थ मेवूंडी गावून गेले. औरंगाबादला मंजिरी कर्वे आलेगांवकर आणि सुनील कुलकर्णी गायले. या मैफिली या प्रदेशातील शास्त्रीय संगीत रसिकत्वाची साक्ष देतात. मराठवाड्यात धनंजय जोशी,  विश्वनाथ दाशरथे, सचिन नेवपुरकर, अभिजीत अपस्तंभ, वैशाली देशमुख, गजानन देशमुख, शोण पाटील सारखे चांगले गायक वादक स्वत: पुढाकार घेवून अशा मैफिली घडवून आणतात हे विशेष. ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक शशांक मक्तेदार दरवर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शास्त्रीय संगीताची मैफल औरंगाबादला घडवून आणतो आहे.

मराठवाड्यातील शास्त्रीय संगीत चळवळीत आता तरूण गायक सक्रिय होताना दिसत आहेत हे आशादाशी चित्र आहे. आता गरज आहे ती त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची. या मैफिलींमध्ये संगीत क्षेत्रातील दिग्गज म्हणविणारे बर्‍याचदा पाठ फिरवतात हे फार वाईट चित्र आहे. काही गायक आपल्या शिष्यांना कार्यक्रमांना जावूही देत नाहीत. एकेकाळी चांगलं गाणारे आता कौटूंबिक जबाबदार्‍या पार पडल्यानंतरही घरात बसून राहतात आणि सांगितीक चळवळीसाठी कसलेही योगदान देत नाहीत हे घातक आहे. स्वत:चे गाणे वाजवणे तर सोडाच पण मैफिलींना उपस्थितीही दर्शवत नाहीत.

गोदावरीच्या काठाने मराठवाड्यात संस्कृती रूजली. हा प्रदेश शेतीच्या दृष्टीने सुपीक होता इतकेच नसून सांस्कृतिक दृष्टीनेही हा प्रदेशी सुपीक राहिलेला आहे. देवगिरीच्या किल्ल्यावर तेराव्या शतकात शारंगदेवाने ‘संगीत रत्नाकर’ या महान ग्रंथाची रचना केली. गोपाल नायक सारखा महान गायक इथे होवून गेला. वेरूळ अजिंठा इथले संदर्भ सगळे देतात. पण औरंगाबाद  शहरात मकबर्‍याच्या पाठीमागे असलेल्या लेण्यांमध्ये आम्रपालीचे शिल्प आहे. गायन वादन नृत्य दर्शविणारी ही लेणी भारतातील पहिला शिल्पांकित संगीत संदर्भ आहे हे फारसे कुणाला माहित नसते.

पार्वती दत्ता या विख्यात उडिसी कथ्थक नृत्यांगना गेली 21 वर्षे औरंगाबादला शारंग देवाच्या भूमीत ‘महागामी गुरूकुल’चालवत आहेत. शारंगदेवाच्या नावाने संगीत महोत्सव भरवला जातो. वर्षभर विविध सांगितिक उपक्रम निष्ठेने घेतले जातात.

शारंगदेवाच्या या पवित्र भूमित शास्त्रीय संगीत रूजविण्यासाठी धडपड करणार्‍यांच्या पाठीशी उभा राहण्याचा संकल्प दिवाळीच्या पवित्र सणानिमित्ताने इतरांनी करायला हवा. 
 
                     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575 

2 comments:

  1. श्रीकांतजी आपला लेख संपुर्ण वाचला व आवडला देखील
    नांदेडच्या पं.धनंजय जोशींचा उल्लेख आपल्या लेखात कुठेच नाही याचे आश्चर्य वाटते.
    धनंजय जोशींनी तीन वर्षांपूर्वी स्वरसभा,नांदेड हा न्यास काही मित्र व दर्दी रसिकांसमवेत स्थापन केला असुन त्याव्दारे ते दर तीन महिन्यातुन एकदा ताज्या दमाच्या शास्त्रिय सांगितातील गायकाला नांदेडकरांसमोर आपली कला प्रस्तुत करण्याची संधी देतात.संस्कार भारती नांदेड समिती देखील डाॅ प्रमोद देशपांडे डाॅ जगदिश देशमुख यांच्या सहकार्याने मासिक संगित सभेचे आयोजन करत असते

    ReplyDelete
  2. अहो माझ्या लिखाणाला मर्यादा आहेत.. शिवाय हा आढावा घेणारा लेख नाही... तरी पण तूमची सुचना योग्यच आहे... मी दूरूस्ती करतो.. धनंजयचे नाव विसरले.. त्याचा समावेश करतो..

    ReplyDelete