Tuesday, September 16, 2014

बी. रघुनाथांची सरकारी उपेक्षा !


                         दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 16 सप्टेंबर 2014 

ज्येष्ठ मराठी लेखक बी. रघुनाथ यांचा 7 सप्टेंबर हा स्मृतिदिन. गेल्या वर्षी त्यांची जन्मशताब्दि साजरी झाली. गेली 12 वर्षे परभणी शहरात गणेश वाचनालय ‘बी. रघुनाथ महोत्सव’ साजरा करीत  आहे. गेली 25 वर्षे औरंगाबाद शहरात ‘नाथ संध्या’ साजरी केली जाते आहे. बी रघुनाथ यांच्या नावे साहित्य पुरस्कार दिला जातो आहे. बी. रघुनाथ यांच्या मृत्यूनंतर लगेच तीनच वर्षात परभणी शहरात सामान्य नागरिकांनी त्यांची आठवण जपण्यासाठी 1957 साली बी.रघुनाथ हॉल बांधला. या वेळी त्यांचे सुरेख तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार त्र्यंबक वसेकर यांनी काढले होते. कार्यक्रमासाठी ते नांदेडहून आणायचे तर चित्राचे रंग ताजे होते. मग थोर विचारवंत नरहर कुरूंदकर यांनी दुसर्‍या कुणाच्या हाती ते न सोपवता स्वत: ओल्या रंगांना जपत नांदेडहून परभणीला आणले आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात त्याचे अनावरण झाले. 

परभणीला 1995 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले. बी. रघुनाथांचे दुर्मिळ झालेले सर्व साहित्य  सव्वाशे कविता, एकोणसाठ कथा आणि सात कादंबर्‍या तीन खंडांत प्रकाशित करण्यात आल्या. मग बी. रघुनाथांच्या सहित्यावर एक परिसंवाद घेवून मराठीतील मान्यवर समिक्षकांकडून लेख लिहून घेण्यात आले. त्या सर्वाचे एक संदर्भ पुस्तकही तीन वर्षांनी प्रकाशित झाले. परभणी शहरात बी रघुनाथ यांच्या नावे महाविद्यालय स्थापन करण्यात आले आहे. 

बी. रघुनाथ मेळ्यांसाठी गाणी लिहून देत. गानमहर्षि अण्णासाहेब गुंजकर त्याला चाली लावून देत. ही गाणी परभणी परिसरात मोठी लोकप्रिय होती. आजही सुरमणी कमलाकरराव परळीकर यांनी बी. रघुनाथांच्या कवितांना दिलेल्या चाली  परभणीचे गायक मोठ्या उत्साहाने गातात. 

हे सगळं घडले आणि पुढेही घडत राहिल ते सामान्य रसिकांनी आपल्या काळजात बी. रघुनाथांना स्थान दिले म्हणून.  म्हणजे बी. रघुनाथांना या रसिकांनीच खर्‍या अर्थाने जतन करून ठेवले. पण शासकीय पातळीवर काय घडले? 

2002 साली बी. रघुनाथ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कोटी रूपये खर्च करून भव्य स्मारक उभारण्यात आले. बी. रघुनाथांचा पुतळा, त्या भोवती आकर्षक बाग, कारंजे, छोटेखानी सभागृह आणि वाचनालयासाठी इमारत अशी रचना करण्यात आली होती. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन झाले होते. ज्या दिवशी उद्घाटन झाले त्या दिवशी अमावस्या होती. बी. रघुनाथ गेले त्या दिवशीही अमावस्याच होती. कवी बा.भ.बोरकर यांनी आपल्या एका कवितेत लिहीले होते

मी विझल्यावर त्या जागेवर
नित्याच्या जनरिती प्रमाणे
विस्मरणाची थंड काजळी
उठेल थडगे केविलवाणे

मी विझल्यावर त्या जागेवर
पण कोण्या अवसेच्या रात्री
धुळीत विखुरल्या कविता माझ्या
धरतील चंद्रफुलांची छत्री

बी. रघुनाथ यांच्या स्मारकावर धुळीत विखुरल्या त्यांच्या कवितांनी चंद्रफुलांची छत्री धरली असे चित्र 7 सप्टेंबर 2002 साली होते. आता मात्र परिस्थिती बिकट झाली आहे. पुतळ्या मागच्या भिंतीच्या फरश्या निखळुन पडल्या आहेत. कारंजे तर केंव्हाचेच बंद पडले आहे. ज्या इमारतीत वाचनालय व्हावे असे अपेक्षित होेते तिथे आजतागायत एकाही पुस्तकाला कुठल्याच निम्मित्ताने प्रवेश मिळाला नाही. पहिले वर्ष स्थानिक संस्था आणि प्रकाशक यांनी एक पुस्तक प्रदर्शन त्या इमारतीत भरवले होते. आजही एक कायमस्वरूपी प्रदर्शन त्या परिसरात चालू आहे. पण ते पार्किंगच्या चिंचोळ्या गैरसोयीच्या जागेत. 

सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिळत नाही कारण सरकारी बैठका तिथे होतात. तारीख रिकामी असेल तर जागेचे भाडे सांस्कृतिक उपक्रमांना परवडणे शक्य नाही. स्वत: महानगरपालिकेने काही उपक्रम घ्यावा तर राजकीय इच्छाशक्तिचा पूर्णपणे अभाव. महापौर किंवा कुणीतरी सरकारी प्रतिनिधी 7 सप्टेंबरला आठवण झाली तर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात. जे कोणी सोबत त्यांचे सगे सोयरे दोस्त मंडळी असतील त्यांना चहा पाजविला जातो. इतर राजकीय कार्यक्रमाच्या घाईने आणि ओढीने महापौर किंवा इतर कुणी राजकीय नेते निघून जातात. बी. रघुनाथांवर प्रेम करणारे मोजके साहित्यप्रेमी आपले काही तरी हरवले असावे अशा अविर्भावात पुतळ्या भोवती काही काळ रेेंगाळत राहतात. शेवटी उन चढत जाते तशी माणसे पांगतात. त्या परिसरातील शिपाई मुख्य दरवाजा लावून घेतो. परत बी. रघुनाथ वाळत चाललेल्या हिरवळीकडे पहात विमनस्कपणे बसून राहतात. नाही तरी त्यांनीच आपल्या कवितेत लिहीले होते

राउळी जमतो भाविक मेळा
गुरवाचा गांजावर डोळा
त्यातही डोळे किती निराळे
भक्त कुणा समजावे
आज कुणाला गावे

बी. रघुनाथांना केवळ मठ मंदिरांमधील भक्त अपेक्षित नव्हते. साहित्याचा मंदिरातील भक्तही अपेक्षीत होते. आणि त्यांचेही वर्तन आज तसेच आढळते.

बी. रघुनाथांचे शासनाच्या साहित्य पुरस्काराला देण्यात आले होते. नंतर पुरस्कारांची संख्या कमी झाली. तसे ते नावही उडाले. बी. रघुनाथांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा जन्मशताब्दि वर्षात परभणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली होती. आता तीचाही सोयीस्कर विसर सगळ्यांना पडला. बी. रघुनाथांच्या कन्या सुधा नरवाडकर यांनी साहित्य परिषदेला काही देणगी उपक्रमासाठी दिली होती. त्याचेही पुढे काय झाले कळायला मार्ग नाही. 

मराठवाड्यात दोन विद्यापीठं अस्तित्वात आहेत. 1995 नंतर बी. रघुनाथ यांचे समग्र साहित्य चांगल्या स्वरूपात उपलब्ध झाले. नंतर 2005 साली नांदापुरकरांचे साहित्य उपलब्ध झाले. पण एकाही विद्यापीठाला ते अभ्यासक्रमाला लावावे वाटले नाही. आता अभ्यासक्रमाला जे काही लावले गेले आहे ते पाहता जे झाले ते बरेच झाले म्हणावयाची पाळी आहे. 

या सरकारी अनास्थेच्या उलट सामान्य रसिकांच्या पाठिंब्यावर आजही बी. रघुनाथ महोत्सव साजरा होतो आहे. एक चांगला पायंडा या निमित्ताने पडला आहे त्याचा विचार केला पाहिजे. साहित्यकी सांस्कृतिक उपक्रमांमधील राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवून निखळ वाङ्मयीन स्वरूपात साधेपणात हे उपक्रम साजरे केले पाहिजेत. महाराष्ट्रभर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अ वर्ग वाचनालय आहेत. किंवा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कृपेने महाविद्यालयांच्या इमारती बर्‍यापैकी अवस्थेत आहेत. या ठिकाणी जिल्ह्याभरच्या साहित्यप्रेमी रसिकांच्या आश्रयाने हे उत्सव, उपक्रम साजरे होवू शकतात. यासाठी लागणारा निधीही सामान्य रसिकांमधून, प्रस्थापित संस्थांमधून सहज उभा राहू शकतो. प्रत्येकवेळी मोठ मोठ्या रकमा उभ्या करायच्या. त्या खर्चाच्या ओझ्याने साहित्यीक कार्यकर्ते बाजूला पडतात. आणि भलतेच उपटसुंभ पुढे येतात. ते मग त्या उपक्रमाचा काय बट्ट्याबोळ करतात हे परत वेगळे सांगायची गरज नाही. खरं तर कुठलाच राजकीय पुढारी साहित्यीक संस्थांच्या दाराशी येवून लुडबूड करू इच्छित नसतो. साहित्य क्षेत्रातील सामान्य कुवतीचे साहित्याची खरी जाण नसणारे गणंगच राजकीय नेत्यांच्या दाराशी पडून असतात. मग स्वाभाविकच या क्षेत्राचा वापर करण्याची राजकीय नेत्यांची वृत्ती बळावते. यात त्यांचा दोष कमी आणि साहित्यीकांचा दोष जास्त आहे.

साधेपणाने साजरा होणार्‍या बी. रघुनाथ महोत्सवाने एक आदर्श समोर ठेवला आहे. त्याचे डोळसपणे अवलोकन या क्षेत्रातील मान्यवरांनी रसिकांनी करावे ही अपेक्षा.    

   


     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Thursday, September 11, 2014

उंडणगाव : रसिकता जपणारे गाव !

दै. पुण्यनगरी, उरूस, गुरुवार ११ सप्टेंबर २०१४ 


अजिंठ्याच्या डोंगरातील जगप्रसिद्ध लेण्या तर सर्वांनाच माहित आहेत. त्या डोंगररांगांमध्ये इतरही काही रम्य ठिकाणं आहेत हे मात्र बर्‍याच जणांना माहित नाही. अंतूर, वाडी, जंजाळा असे ऐतिहासिक किल्ले आहेत. रूद्रेश्वर सारखी सुंदर पुरातन मंदिरं आहेत. हळद्याचा निसर्ग सुंदर घाट आहे. याच परिसरात टुमदार संपन्न गावं वसलेली आहेत. या परिसरातील पाच गावं पाच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. पालोद राजकारणासाठी, भराडी व्यापारासाठी, अन्वा शेतीसाठी, सोयगाव नाटकासाठी आणि पाचवं गाव उंडणगाव. ते प्रसिद्ध आहे रसिकतेसाठी. कला साहित्य संस्कृतीची जोपासना या गावानं मोठ्या रसिकतेनं केली आहे. साहित्यक्षेत्रातील ना.धो.महानोर, अनुराधा पाटील, भगवानराव देशमुख, सरदार जाधव  नाट्य क्षेत्रातील गुरूवर्य असे कमलाकर सोनटक्के ही सगळी माणसं याच परिसरातील. मराठवाड्यातील पहिले एफ.आर.सी.एस. डॉक्टर म्हणून नावाजल्या गेलेले डॉ. शांताराम महाजन याच गावचे. नांदेडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.एम.नाईक असो की प्रा. अविनाश महाजन, पत्रकार सुधीर महाजन असो ही सगळी विद्वान मंडळी याच गावची.   

बारा तेरा हजार लोकवस्तीचं उंडणगाव मोठं समृद्ध असं गाव आहे. या गावातील महाजनांचे जुने सागवानी वाडे अख्ख्या पंचक्रोशीत आपल्या कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहेत. आख्खी घोड्याची बग्गी आत यावी अशा उंच कमानी आणि बग्गीतुन घरात सरळ उतरता यावे असे उंच ओटे या वाड्यांना आहेत. 

गावातील तीनशे वर्षांच्या पुरातन बालाजी मंदिरात गणपतीच्या काळात व्याख्यानमाला चालते. मोठ मोठ्या शहरांमधुनही आजकाल सांस्कृतिक उद्बोधनपर कार्यक्रम घेणं मुश्किल होवून बसलं आहे. अशावेळी जुनी रसिकतेची परंपरा पुढे नेत या गावाने ‘मित्रसंघ गणेश मंडळा’च्या माध्यमातून आपली रसिकता जपली आहे. 2007 साली याच गावाने मराठवाडा साहित्य संमेलन मोठ्या झोकात भरवून दाखवले. अखिल भारतीय संमेलनास शोभावी अशी गर्दी आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी केली होती. 

मंदिराच्या ओवर्‍यातच एका बाजूला रंगमंच केला जातो. समोरच्या मोकळ्या जागेत, बाजूच्या ओवर्‍यांवर, मागच्या ओट्यावर गावकरी बाया बापडे बसतात. कविसंमेलन, व्याख्यान, कथाकथन अशा कार्यक्रमांना मोठा बहर या ठिकाणी येतो. भगवानराव देखमुख सारखा गोष्टीवेल्हाळ कथाकार, कवी जो की याच परिसरातला आहे त्याच्या वाणीला मोठा बहर या मंचावर उभं राहिला की येतो. तासं न् तास भगवानराव लोकांना खिळवून ठेवतात. आता प्रकृती फारशी साथ देत नसल्यामुळे त्यांचे येणे होत नाही. आता मंदिराचा जिर्णोद्धार होतो आहे. नविन स्वरूपात मंदिर नव नविन सांस्कृतिक आवष्किारासाठी सज्ज होते आहे. 

लोटू पाटीलांनी सोयगावला जी नाट्यचळवळ चालवली त्याचं मोठं कौतुक या गावाला आहे. या परिसरातही नाटकं साजरी व्हायची. अगदी पार 1949 ला साजर्‍या झालेल्या नाटकाची तेंव्हाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात आजही सार्थक खुल्लोडकर सारख्या तरूण कार्यकर्त्याने मोठ्या उत्साहात जपून ठेवली आहे.

या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाव थकतच नाही. जुनी लोकं बाजूला बसून सल्ला देतात आणि नविन पिढी पुढे येते. या प्रक्रियेतून उपक्रमांची परंपरा पुढे चालू राहते. जुन्या काळातील सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवावी म्हणून 1982 साली ‘मित्रसंघ गणेश मंडळाची’ स्थापना करण्यात आली. रमेश नाईक, कमलाकर खोंडे, भगवान तबडे, सुधीर दाणेकर, डॉ. सतिष खुल्लोडकर या तळमळीच्या कार्यकर्त्यांनी हे रोपटे वाढावे म्हणून अपार मेहनत घेतली. त्यावेळपासून काम करणारे प्रकाशराव कुलकर्णी आजही त्या आठवणी सांगतात आणि तरूणाच्या उत्साहाने कार्यक्रमांत वावरतात. पुढे 1998 मध्ये रमेश नाईकांच्या दुर्देवी निधनानंतर त्यांचे नाव या व्याख्यानमालेला देण्याचा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी घेतला. ऍड. किरण नाईक, मिलींद महाजन, अनिल लांडगे आणि अनिरूद्ध नाईक या तरूणांनी मागच्या पिढीपासून प्रेरणा घेत व्याख्यानमालेची धुरा पुढे चालविली. डॉ. खुल्लोडकर दरवर्षी शाडुच्या मातीची गणेशमुर्ती स्वत: तयार करतात. अजूनही डॉक्टरांचा उत्साह टिकून आहे. महानोरांसारख्या मोठ्या कवीने इथे हाजेरी लावण्यात नेहमीच धन्यता मानली आहे. या मातीमुळे माझ्यातल्या कवीची निकोप वाढ झाल्याचा सार्थ अभिमान त्यांनी इथेच प्रकट केला. 

वास्तुरचनाकार असलेल्या अनरिूद्ध नाईक यांनी एक वेगळा प्रयोग या परिसरात केला आहे. डोंगरात जमीन घेवून तेथे एक कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. गणपतीच्या मुर्तीची स्थापना करून यास परिसराला गणेशवाडी हे नाव दिले आहे. उंडणगावला भेट देणार्‍या कवी साहित्यीक कलाकारांना बालाजी मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमाइतकीच गणेशवाडीची ओढ लागून राहिलेली असते. धनंजय चिंचोलीकर सारखा लेखक आवर्जून आपल्या बागेत जोपासलेले रामफळाचे झाड इथे लावण्यासाठी घेवून येतो. रमेश इंगळे उत्रादकरसारखा मोठा कवी पाहुणा म्हणून बोलावून सन्मान केलात त्यापेक्षा झाड लावण्याचा सन्मान मोठा वाटतो हे मन:पुर्वक सांगतो.

गेली तीन वर्षे एक पायंडा या गावाने पाडला आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे मुळ रहिवासी असलेल्या साहित्यीक कलावंत ज्यांचा इतरत्र पुरस्कार देवून गौरव केला गेला त्यांना बोलावून ‘माहेरचा आहेर’ इथे दिला जातो. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजीचे असलेले धनंजय चिंचोलीकर यांना बी. रघुनाथ पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना पहिला माहेरचा आहेर सन्मान देवून गौरविण्यात आले. दुसर्‍या वर्षी फुलंब्री तालुक्यातील जळगाव (मेटे) गावचे रवी कोरडे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. त्यांचा गौरव करण्यात आला. यावर्षी फुलंब्री मधीलच गणोरीचे पद्मनाभ पाठक यांची निवड करण्यात आली. व्यावसायिक नाट्य निर्माता संघाने आयोजित केलेल्या राज्य पातळीवरील स्पर्धेत दासू वैद्य लिखीत ‘रिअल इस्टेट’ या दीर्घांकासाठी पद्मनाभ पाठक यांना दिग्दर्शनाचे दुसरे पारितोषिक मिळाले. प्रसिद्ध नाटककार अजीत दळवी यांच्या हस्ते हा ‘माहेरचा आहेर’ सन्मान पद्मनाभ पाठक यांना प्रदान करण्यात आला.

उंडणगावचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच गावकरी हा आपला कार्यक्रम आहे, हा आपला पाहुणा आहे अशा रितीने निमंत्रीत पाहुण्यांची बडदास्त ठेवत असतात. गणेशवाडीत मुक्कामाला असलेल्या कवीला पहाटे वयस्क बापुकाका नाईक मोठ्या उत्साहाने आपल्या हातचे चविष्ट मक्याचे वडे करून घावू घालतात. त्यात एक जिव्हाळा दडलेला असतो. 

विजय नाईक, सार्थक खुल्लोडकर या तरूण मुलांनी मोठ्या उत्साहाने ही धुरा आता आपल्या खांद्यावर घेतली आहे.

हा सगळा परिसर मोठा नयनरम्य आहे. शेकडो वर्षांपूर्वी कलाकारांनी अजिंठा लेणी निर्माण केली ती केवळ इथे चांगला दगड सापडला म्हणून नाही. या परिसराचे गारूड त्यांच्यावर निश्चितच झाले असणार. म्हणून तर ही लेणी इतकी सुंदर रंगवली गेली. याच मातीतील सरदार जाधव सारख्या चित्रकाराने आपल्या चित्रातून हा परिसर जिवंत करण्याची गरज आहे. 

इथले किल्ले दुर्लक्षीत राहिले आहेत. त्यांची किमान डागडुजी केली पाहिजे. वाडिच्या किल्याच्या टोकावरून कमानीमधून दिसणारे दृश्य हा एक विलक्षण अनुभव आहे. या परिसरातील तळे तर अप्रतिम सौंदर्याने नटलेले आहेत. निळी, जांभळी, लालसर पिवळी अशी सुंदर गवत फुलं गणेशवाडीच्या पठारावर आहेत. मोर फार मोठ्या संख्येने या परिसरात आहेत.मागच्यावर्षी वाडीच्या किल्ल्याजवळ एका वस्तीत आम्हाला कोंबड्यांसोबत मोर पाळलेला आढळून आला. माणसाळलेल्या या मोराने अप्रतिम असे नृत्य करूत आपल्या डौलदार पिसार्‍याचे मनोहारी दर्शन घडविले. दासू वैद्य सारखा लोकप्रिय कवी, शशांक जेवळीकर सारखा उच्चपदस्थ अभियंता, श्रीकृष्ण उमरीकरसारखा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त छायाचित्रकार आपली व्यवधानं बाजूला सारून या परिसरात गुुंगून जातात. या परिसरातील सौंदर्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.  

या परिसरातील रसिकता गावकरी मोठ्या निष्ठेने जपत आहेत. गरज आहे ती साहित्यीक कलाकारांनी त्यांना प्रतिसाद देण्याची.
              
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575    

Tuesday, September 2, 2014

शरद जोशी तुमच्या वाढदिवसाच्या जाहिराती कुठे आहेत ?




                           दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 2 सप्टेंबर 2014 

आदरणीय शरद जोशी, सा.न.

उद्या (3 सप्टेंबर) तुमचा 79 वा वाढदिवस आहे. हे आमच्या लक्षातच नाही. कारण तूमच्या वाढदिवसाच्या जाहिरातींचे फ्लेक्स कुठे दिसले नाहीत. आहो गल्लीबोळातील टिनपाट पुढार्‍याचा जरी वाढदिवस असला तरी किमान पाच पंचेविस अनधिकृत फ्लेक्स झकळतात जिकडे तिकडे. साहेबांची उजळलेली म्हणजे संगणकाचा वापर करून उजवळलेली छबी चमकत असते त्या जाहिरातीमधून. ती सामान्यांच्या डोळ्यात भरते आणि लक्षात येते की हे आपले महान  समाजसेवक उर्फ पुढारी आहेत. पण तसं काहीच तुमचं दिसलं नाही. मग सांगा नं कसं कळणार?

तुमच्यावर आरोप झाला होता की तुम्ही कॉंग्रेस विरोधी असून भाजपाला धार्जिण आहात. खरं तर तुमच्या आंदोलनाची सुरवातच मुळी आणिबाणीनंतरच्या जनता राजवटीच्या काळात झाली होती. कांद्याचे भाव पडले आणि त्यावेळी व्यापार मंत्री होते मोहन धारिया. इतकंच कशाला आत्ता मोदिंचे सरकार येवून जेमतेम 100 दिवसही नाही झाले. कांद्याचे निर्यात शुल्क वाढविणे, कांदा-बटाटा यांचा समावेश जिवनावश्यक वस्तूंच्या यादीत करणं, जनुकिय बियाणांच्या चाचण्यांना विरोध करणं या केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात तूम्ही रस्त्यावर उतरलात. वयाच्या 80 व्या वर्षीही चक्क रेल्वेसमोर रूळांवर ठाण मांडून बसलात. आता तुम्हीच सांगा ही काय रीत झाली समाजसेवा करायची? आहो आजकालचे नेते तरूण वयातही रस्त्यावर उतरायला तयार नाहीत. गल्ली बोळातील का होईना सत्तेची खुर्ची मिळाली ऊब मिळाली की कशी उत्तम समाजसेवा करता येते. हे तुम्हाला कुठून आणि कसे कळणार?

तुमच्या शेतकरी संघटनेत अशी घोषणा आहे, ‘शेतकरी संघटनेचा विजय असो !’ आहो असे कुठे असते का? घोषणा कशी नेत्याच्या नावाने पाहिजे. म्हणजे ‘शरद जोशी यांचा विजय असो !’ असं जर कुणी म्हटलं असतं तर किती सोय झाली असती. एकदा का वरच्या साहेबांनी स्वत:पुढे दिवे ओवाळले की गल्ली बोळातील लहानमोठे साहेब तोच कित्ता गिरवतात. मग त्यांचाही उदो उदो स्थानिक पातळीवर होतो. किंवा स्थानिक पताळीवर त्यांचा उदो उदो व्हावा म्हणूनच ते वरच्या साहेबांचा उदो उदो करतात. आता तुमच्या संघटनेचे सगळेच उलटं. गल्ली बोळातील शेंबड्या पुढार्‍यांचा दादांचा तुम्ही फायदा करून दिला असता, त्यांचे ‘हित’ चांगल्या पद्धतीने सांभाळले असते तर त्यांनी तुमचेही फ्लेक्स गल्लीबोळात लावले नसते का?

तुमची चळवळ अर्थवादी विचारांवर आधारलेली चळवळ आहे. चळवळीची मांडणी करताना कुठलीही भावनीक भाषा तुम्ही केली नाही. शेतकर्‍याच्या जातीत तुम्ही जन्मले नाही, शेतकर्‍याचा वेष तुम्ही परिधान केला नाही, शेतकर्‍याची भाषा तुम्ही बोलत नाही. तरी शेतकरी लाखोंच्या संख्येने तुमच्यावर प्रेम करतात. ते असु द्या. पण जर कार्यकर्त्याच्या ‘अर्था’चा विचार केला नाही तर बाकी अर्थवादी विचारांचा काय फायदा हो? आहो आधी कार्यकर्त्याला सोसायटी, पंचायत समिती, झेडपी, आमदारकी, खासदारकी काही तरी भेटलं पाहिजे की नाही? मग चळवळी कशा ‘भक्कम’ होतात. 

हजारो शेतकर्‍यांनी तुमचे फोटो देवाच्या बरोबरीने आपल्या देवघरात लावले असतील. ते असू द्या हो. ते काही कामाचं नाही. गल्लीबोळात तुमचे फ्लेक्स लागणं आणि त्यावर गल्लीबोळातील नेत्यांच्या बारक्या बारक्या छब्या असणं हे जास्त महत्त्वाचे. 

तुम्ही ‘स्वतंत्र भारत पक्ष’ नावानं राजकीय पक्ष काढला. खरं तर तुम्ही तुमच्या पहिल्या अधिवेशनापासून शेतकरी चळवळीला सर्व राजकीय पर्याय खुले आहेत असं म्हणाला होता. तसे ठराव तुमच्या संघटनेच्या अधिवेशनात मंजूर झाले आहेत. लेखी स्वरूपात ते उपलब्धही आहेत. पण ते वाचतो कोण? तुम्ही म्हणाला होतात ना, ‘शेतकर्‍याच्या भावाचा प्रश्न इतर राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहिरनाम्यात घेतला आणि त्यासाठी प्राण पणाला लावले तर मला निवडणुक लढवायची गरजच नाही. अशावेळी जर मी मत मागायला आलो तर मला जोड्यानं मारा!’  इतकं मोठं वाक्य कोण लक्षात ठेवणार जोशी साहेब? आमच्या मोठ्या मोठ्या पुढार्‍यांनी जाणत्या राजांनी शेवटचं अर्धवट वाक्य उचललं आणि तुम्हाला ठोक ठोक ठोकलं. तुम्हीही पडलात सज्जन. निर्लज्जपणे त्यावर काहीतरी अर्वाच्च बोलायचं सोडून तूम्ही आपले प्रामाणिकपणे शेतकर्‍यांची बाजू मांडत बसलात. 

चार वर्षांपूर्वी तुमचा अमृतमहोत्सव शेगाव येथे साजरा झाला. ‘शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही!’  असे उद्गार तुम्ही लाखो शेतकर्‍यांसमोर काढले. शेतकरी संघटनेच्या व्यासपीठावरून कुठलाही सत्कार, शाल, श्रीफळ तुम्ही कधीच  स्विकारले नाही. मग आता तरी कसे स्विकारणार? मग शेवटी सोलापुर जिल्ह्यातील वयोवृद्ध शेतकरी जोडप्याच्या हस्ते तूम्ही एक मानपत्र तेवढं स्विकारलं. त्या मानपत्रावर  शेतकर्‍यांची वेदना शब्दबद्ध करणारे तुमचे आवडते कवी इंद्रजीत भालेराव यांची कविता कोरलेली होती. आपल्या शब्दाला जागून उतारवयात आजारपण असताना तुम्ही शेतकर्‍यांसाठी रेल्वेच्या रूळांवर उतरलात. अशानं तुमच्या जाहिरातींचे फ्लेक्स शहरो शहरी गावो गावी कसे लागणार? 

"शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव मिळाला पाहिजे",  असल्या शुद्ध अर्थवादी घोषणा नाही चालत आपल्याकडे. शेतकर्‍यांच्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे असली मागणी केली असती तर तुम्हाला कितीतरी राजकीय फायदा झाला असता. शेतकर्‍याला पेन्शन मिळालं पाहिजे, रेशन कार्डावर फुकट अन्नधान्य मिळालं पाहिजे, धान्य दळून मिळाला पाहिजे, ते धान्य खावून पचवून रक्त बनवून मिळाले पाहिजे, नौकर्‍या मिळाल्या पाहिजेत, अनुदान-सुट-सबसिडी मिळाली पाहिजे अशा भिकमाग्या मागण्या केल्या असत्या तर ‘आमचे भाग्यविधाते’ म्हणून तुमचे फ्लेक्स गल्ली बोळातील पंटर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लावले असते. पण तुम्ही तर ‘सुट सबसिडीचे नाही काम। आम्हाला हवे घामाचे दाम॥ असल्या घोषणा सामान्य शेतकर्‍यांना शिकवल्या. अशानं कसं होणार शरद जोशी तुमचे आणि तुमच्या संघटनेचे?

बरं नाहीतरी तुम्हाला कॉंग्रेसविरोधी म्हटलं गेलं होतंच. मग आता कॉंग्रेसविरोधातील मोदींचे सरकार सत्तेवर आले आहे. मग अशावेळी कशाला आंदोलन करण्याच्या भानगडीत पडला? शिवाय तुमचे आता वय झालेले. गप्प बसला असतात तर पाच पंचेविस जीवन गौरव पुरस्कार, एखादा पद्मश्री पद्मभुषण काही तरी पदरात पडण्याची शक्यता होती. पण तुम्ही आंदोलन करून तेही दोर कापुन टाकले.

हे बघा शेतकरी जर स्वत:च्या पायावर उभा राहिला तर मग आमच्या या जाणत्या राजांचे, शेतकर्‍यांचे कैवार घेणार्‍या पुढार्‍यांचे, शेतकर्‍याच्या पोटी जन्मुन त्याचा गळा कापणार्‍या सत्ताधार्‍यांचे कसे होणार? तेंव्हा जितका परिस्थितीने शेतकरी गांजलेला, जितका आस्मानी सुलतानीने पिडलेला, जितका तो कर्जाच्या रूपाने बँकेकडे गहाण तितके आमचे शेतकर्‍यांच्या पोटी जन्मलेले सत्ताधारी नेते महान !!

तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाडोत्री विद्वानांनी लिहीलेले लेखही कुठे दिसत नाहीत. भाडोत्री गुंड परवडले पण हे भाडोत्री विद्वान फार भयानक. पैसे घेवुन दहशत गुंडगिरी करणे सोपे आहे पण बुद्धी गहाण ठेवणे फार घातक. आता तुमचे ते भोळे भाबडे शेतकरी निष्ठावान कार्यकर्ते आपल्या सदसदविवेक बुद्धीला प्रमाणिक राहून

शरद जोशी हृदयात । 
कशाला करू जाहिरात ॥

असं म्हणताना आम्ही ऐकलं आहे. म्हणो बापडे आम्हाला काय!  फ्लेक्स दिसले नाहीत, जाहिराती नाहीत, लेख नाहीत म्हणजे तुमचे मोठेपण आम्हाला तरी माहित नाही. 

तुमचा नम्र 
एक कार्यकर्ता......

              
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, August 26, 2014

बैलाचे कौतुक शेतकर्‍याच्या शहरी पोरांनाच जास्ती !!


                             दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 26 ऑगस्ट 2014 


ठाण्याजवळ मुलूंड उपनगरात रविवारी प्रत्यक्ष घडलेला प्रसंग आहे. सकाळची गर्दीची वेळ. रविवार मुळे थोडी कमी असली तरी महानगराची ती गर्दी. रेल्वेस्टेशनच्या पादचारी पुलावरून माणसे झपाझपा इकडून तिकडे चाललेली. इतक्यात पायर्‍यांवरून गायीच्या गळ्यातील घंट्यांचा आवाज आला. सगळे वळून पाहताहेत तोवर एका माणसाने धरलेल्या कासर्‍यासोबत एक गायही रेल्वे पुलावरील पायर्‍या चढून येत होती. आता मुंबईमध्ये या गायीचे काय काम? गायीला चारा घालण्याचे पुण्य भक्तांना भेटावे या उद्दात (!) हेतूने पलिकडच्या एका मंदिरासमोर ही गाय घेवून हा माणूस बसतो. यासाठी 300 रूपये रोजाने गाय भाड्याने मिळते. लोकांकडून पैसे गोळा करायचे. भक्तांच्या खात्यात दिवसभर पुरेसे पुण्य आणि याच्या खिश्यात पुरेसे पैसे गोळा झाले की गाय मालकाकडे वापस. 

या सगळ्या प्रकाराला काय म्हणणार? काल पोळ्याचा सण सर्वत्र साजरा झाला. शहरातदेखील हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे प्रत्यक्ष खरे जातीचे बैल असण्याचा प्रश्नच नाही. मग मातीचे बैल बाजारातून खरेदी केले जातात. (हो आजकाल घरी कोणी बैल बनवत नाही. शाळेत पोरांना हस्तकला म्हणून कौतुकानं बैल बनवायला सांगतात ती गोष्ट वेगळी.) मातीचा संबंध तुटलेली माणसे मोठ्या उत्साहाने, ‘आमच्या घरी आजही कशी बैलाची पुजा होते’ हे कौतुकाने एकमेकांना दाखवून देतात. शिवाय चुकून माकून कुणी बैलजोडी सजवून शहरात रस्त्यावरून मिरवायला आणली तर काही विचारू नका. सगळ्यांना त्या बैलांना ओवाळणे, त्यांच्या पायाखाली काकडी फोडणे, बैलाला पुरणपोळी खावू घालणे याचा नको तेवढा उत्साह येतो. 

शहराचे सोडा खेड्यात काय परिस्थिती आहे? गाय, बैल, शेळ्या आदी जनावरे सांभाळणे मोठी कटकट होवून बसली आहे. आधी चराईसाठी गायरानं असायची, माळ असायचे. आता तसे काही उरलं नाही. शिवाय जनावरे सांभाळण्यासाठी दुध काढण्यासाठी माणसं होती. चरायला न्यायला गुराखी असायचे. या जनावरांना खायला जसं बाहेर उपलब्ध होतं त्याप्रमाणेच शेतातील ज्वारीचा किंवा मक्याचा कडबा (पिकाचा कणीस सोडून उरलेला जैविक भाग- कडबा म्हणजे काय हे आजकाल सांगावं लागतं) असायचा.  लसूण गवत, कडूळ किंवा अजून काही जनावरांना उपयुक्त चारा शेतकरी आवर्जून लावायचे. पण दिवसेंदिवस शेतीची बिकट अवस्था होत चालली आहे आणि हे सगळं नाहिसं होत आहे. दुष्काळात जनावरांचे मोठे हाल होतात. परिणामी ट्रॅक्टरने शेतीची कामं झपाट्याने उरकून शेतकरी मोकळा होत आहे. जनावरांचे झेंगट त्याला परवडेनासे झाले आहे. 

मग पोळ्याचे- बैलाचे कौतुक कोणाला? शेतीसोडून शहरात येवून नोकरी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पोरांना! जसे पन्नास शंभर वर्षांपूर्वी  कोकणातील बहुतांश लोक पोटपाण्यासाठी मुंबई पुण्याला स्थलांतरीत झाले. गावच्या आठवणी त्यांच्या मनात जिवंत असायच्या.  त्यामुळे कोकणातील लेखकांनी लिहीलेली वर्णनं वाचताना त्यांना मोठं छान वाटायचं. परिणामी मराठीत कोकणातील लेखकांच्या पुस्तकांची मोठी चलती निर्माण झाली. तसं आता या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पोरांनी केलं आहे. यांनी शेती सोडली. पण शेतीचे वर्णन करणारे, काळ्या मातीचे गुणगान करणारे, बैलाचा, गायीचा लळा वर्णन करणार्‍या साहित्यकृतीचे मोठे कौतुक सुरू झाले. एकीकडे गावाकडून शहरात स्थलांतरीतांचा ओघ सुरू राहिला. शेती विकून नौकर्‍या स्विकारल्या आणि दुसरीकडे गावच्या वर्णनाचा पुर मराठी साहित्यात निर्माण झाला. हा एक विरोधाभासच होता. 

बैल हा विषय तर फार पुरातन. अगदी ऋग्वेदात गायीचे बैलाचे संदर्भ आहेत. स्वाभाविकच आहे कारण मानवी संस्कृतीची सुरवातच शेतीपासून झाली. मारून खाणारा म्हणजे शिकार करणारा माणूस पेरून खायला लागला म्हणजे शेती करायला लागला आणि हजारो लाखो वर्षांनंतर पहिल्यांदाच तो स्थिर झाला. स्थिर झाला म्हणूनच संस्कृती निर्माण झाली. वेदांतील कृषीसुक्तात 

कल्याण बैलांचे तसे माणसांचे,
कल्यण करो या शेताचे नांगर
कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत
कल्याणकारक असावा आसूड ॥

कल्याणा आमुच्या नांगरोत फाळ
नांगर्‍ये चालोत बैलांच्या संगती
कल्याण पाऊस बरसो पाण्याने
आम्हां सुख द्यावे शेतीजी-सीतने ॥ 
(वेदांतील गाणी-विश्वानाथ खैरे, पृ. 18, मंडल 4,  ऋचा 57, संमत प्रकाशन)

असे असल्यावर बैलाचे स्थान आपल्या परंपरेत असणारच. तेंव्हा बैलाची पुजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं स्वाभाविकच आहे. श्रावण अमावस्येला पोळ्याचा सण साजरा करावा. हे मानवी स्वभावाला धरूनच आहे. पण प्रत्यक्ष खर्‍याखुर्‍या बैलाची आता उपयुक्तता किती उरली आहे? असा प्रश्न विचारला तर भले भले दचकतात. खरं तर प्रत्यक्ष कृतीतून आपण बैलाची उपयुक्तता संपली हे दाखवून दिले आहे. गायीचे बैलाचे कौतुक करणारे कोण आहेत? ज्यांनी शेती सोडली आहे किंवा ज्यांचा आता शेतीशी काही संबंध नाही ते.

आमचे एक ज्येष्ठ कवीमित्र मोठे चांगले चित्रकार आहेत. ते बांगड्याच्या तुकड्याच्या मोठ्या सुंदर कलाकृती भिंतीवर चितारतात. यात प्रामुख्याने मोर आणि बैल असतात. बर्‍याच ग्रामीण सहित्यीकांनी आपल्या घरात भिंतीवर हा बैल काढून घेतला आहे. पण प्रत्यक्षात कोणाच्याच शहरातील घरात गोठा आढळणार नाही. गायी बैलावर फार गहिवरून कोणी बोलू लागला तर त्याला फक्त इतकेच विचारावे की तुझ्या घरात आत्ता जनावरं आहेत का? फार पैसा आला तर तू गाडी घेतोस, घराला दुसरा मजला बांधतोस, पोराला महागडा मोबाईल घेवून देतोस मग जास्तीचा प्लॉट घेवून त्यावर गोठा बांधून गायी बैल का नाही सांभाळत? खरं कारण म्हणजे आता गायी बैल पाळणं सांभाळणं हा आतबट्ट्याचा व्यवहार कोणालाच नको आहे. पण तसं कोणी कबुल करत नाही. आपल्या संस्कृतीत एक विकृती आहे. ज्यावर अन्याय करायचा, ज्याला दुय्यम स्थान द्यायचं त्याचा वरवर अवास्तव वाटावा असा गौरव आम्ही करतो. स्त्रीयांना दुय्यम मानायचं आणि मातृदेवता म्हणून तिची पुजा करायची, शेतकर्‍याची शेतीची माती करायची आणि बळीराजा म्हणून त्याचं कौतुक करायचं, शहरात येवून स्थायीक व्हायचं आणि गावगाड्याची रम्य वर्णन एकमेकांना सांगायची. हे सगळं ढोंग आहे. जनावरांच्या श्रमावर आधारलेली व्यवस्था कधीच संपली आहे. यंत्रयुग आलं आहे आणि आपण त्याचा लाभ घेतो आहोत. त्या अनुषंगाने मानवाने आपली प्रगती साधली आहे. घोड्यांचे कौतुक आहे म्हणून कोणी घोडागाडी वापरत नाही. तसेच बैलाचे कौतुक आहे म्हणून त्याला नांगराला जोडणे, बैलगाडीचा वापर करणे आता शक्य नाही. ते त्रासदायक ठरतं आहे. अगदी जवळच्या गावाला जायलाही आता छोट्या गाड्यांचा वापर होतो बैलगाडीचा नाही.

माझ्या मामाची रंगीत गाडी हो 
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो 

हे फक्त लहानमुलांच्या कवितेतच उरलं आहे. 
ज्यांना म्हणून वृषभ संस्कृतीचे गोडवे गायचे असतील त्यांच्या घरातील स्वयंचालित गाड्यांची संख्या आधी मोजून घ्या. हे ढोंग आपण आता सोडून दिलं पाहिजे. पुजेत इतके सारे देव आपण पुजतो त्याप्रमाणे आता एक बैलाचीही मुर्ती करून पुजूत. ऋषी पंचमी हा सण म्हणजे बैलाचा शेतीत वापर झाला त्याच्या आधीच्या काळातील सण आहे. आपण तो आजतागायत साजरा करतो आहोत.  या दिवशी बैलाच्या श्रमाने पिकवलेले धान्य खात नाहीत. तसे आता वर्षातून एक दिवस तरी बैलाच्या श्रमाचे खायचा सण साजरा करावा लागेल. तो सण आपण कृषी पंचमी किंवा वृषभ पंचमी म्हणून साजरा करू. बाकी बैलाचे जास्तीचे गोडवे गायची काही गरज नाही  (हे वाचून कोणा बैलप्रेमी मानवाच्या भावना दुखावल्या तर मी क्षमा मागतो. बैलाच्या भावना दुखावणार नाहीत उलट त्यांना आनंदच होईल याची मला खात्री आहे !!) 
             
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575       

Tuesday, August 19, 2014

कहा ले चले हो ‘गुलजार’ हमे बावरा बनाईके ॥



                                   दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 19 ऑगस्ट 2014 


संपुर्णसिंग कालरा यांचा जन्म 18 ऑगस्ट 1936 रोजी झेलम जिल्ह्यातील दिना या गावी झाला. हे गाव पाकिस्तानातील पंजाब प्रांतात आहे. फाळणीनंतर हे कुटूंब भारतात स्थलांतरित झाले. अशी माहिती दिली तर तूम्हाला फारसा काहीच बोध होणार नाही. कोणातरी स्थलांतरित शीख कुटूंबातील माणसाची ही माहिती आहे असं तूम्ही समजाल. पण हेच फक्त ‘गुलजार’ एवढं लिहीलं तर तूम्हाला बाकी फारसं काहीच सांगायची गरजच पडणार नाही. ‘गुलजार’ या नावाची मोहिनीच तेवढी जबरदस्त आहे. चित्रपटांची श्रेयनामावली वाचताना संगीत-अमूक ढमूक, गायक- अमूक ढमूक असं वाचता वाचता गीत-गुलजार असं पडद्यावर दिसायचं. मला लहानपणी खुप वेळा असं वाटायचं की गीत आणि गुलजार हे दोन्ही शब्द जोडूनच येतात म्हणजे ते एकच आहेत की काय. त्यामुळे ‘गुलजार’ ला नुसतं गुलजार न समजता मी नेहमीच 'गीत गुलजारच' समजत आलो. लहानपणी झालेली ही चुक नसून खरेच अशी परिस्थिती आहे हे आता मोठेपणी कळत आहे.

बरोबर पन्नास वर्षांपूर्वी बंदिनी चित्रपटात गुलजार नी पहिलं गाणं लिहिले. सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ते गोड गाणं होतं ‘मोरा गोरा अंग लई ले । मोहे श्याम रंग दई दे ॥ याच गाण्यातील शेवटच्या कडव्यात गुलजार यांनी जे लिहून ठेवलं आहे ते आजही हिंदी रसिकांना जसंच्या तसं लागू पडतं. गुलजार ने लिहीलं होतं

कुछ खो दिया है पाईके
कुछ पा लिया गवाईके
कहा ले चला है मनवा
मोहे बावरी बनाईके ॥

ही जी ‘बावरी बनाईके’ अवस्था आहे ती हिंदी गाणी ऐकणार्‍या रसिकांची गुलजारने करून ठेवली आहे. त्यामुळे गुलजारचेच शब्द घेवून गुलजारला म्हणावेसे वाटते

कहा ले चले हो गुलजार
हमे बावरा बनाईके ॥

खरं तर चित्रपट गीतांमुळे अफाट प्रसिद्धी लाभलेल्या गुलजार यांना आपल्या या यशाचे अतोनात समाधान वाटायला हवे होते. अगदी या पहिल्या गाण्यापासून ते अगदी अलिकडच्या ‘बीडी जलाइले’ पर्यंत लोकप्रियतेचा, व्यावसायिकतेचा  गुलजारचा आलेख चढताच राहिला आहे. हिंदी चित्रपटांमधे दर्जेदार प्रतिभावंत गीतकारांची एक मोठी परंपरा आहे. साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, शैलेंद्र, शकिल बदायुनी, हसरत जयपूरी, राजा मेहंदी अली खान, राजेंद्र कृष्ण, कैफी आझमी. या परंपरेतील शेवटची दोन नावं म्हणजे गुलजार आणि जावेद. त्यानंतर इतके प्रतिभावंत आणि प्रभावशाली गीतकार झाले नाहीत. चित्रपट क्षेत्रात सर्वोच्च समजाला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार आत्तापर्यंत 61 जणांना देण्यात आला. त्यात गीतकार असलेले केवळ तीनच आहेत. मजरूह सुलतानपुरी -1993,  प्रदीप ('ए मेरे वतन के लोगो' लिहीणारे) 1997 आणि गुलजार-२०१३ . 

एवढ्या पुरस्कारानेही गुलजार मधला कवी मात्र अस्वस्थच राहिला. पहिला पुरस्कार पटकावणार्‍या मजरूह ने दस्तक चित्रपटात अतोनात सुंदर गजल लिहून कलाकाराची वेदना मांडली आहे. मदन मोहन यांची ही रचना लता मंगेशकरने गायली आहे. 

हम है मता ऐ कुचा ओ बाजार की तरहा
उठती है हर निगाह खरीददार की तरहा |

गल्लीबोळातील दुकानात मांडून ठेवलेल्या वस्तूंसारखे आम्ही आहोत. कारण प्रत्येक नजर ग्राहक असल्यासारखी आमच्यावर रोखलेली आहे. असं व्यावसायिकतेचं दु:ख मजरूहने मांडलं होतं. गुलजार यांनाही हीच बाब अस्वस्थ करत राहते. 

‘जय हो’ गाण्यासाठी जागतिक चित्रपट क्षेत्रातील सर्वात मोठा, प्रतिष्ठेचा ऑस्कर पुरस्कार गुलजार यांना मिळाला. त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गुलजार यांना निमंत्रित केल्या गेले. त्यासाठी ज्या अटी संयोजकांनी घातल्या होत्या त्या वाचून गुलजार अचंबित झाले. त्या प्रसंगी विशिष्ट प्रकारचे कपडे घालणे (टाय, कोट, बुट) अनिवार्य होते. गुलजारमधला कवी अस्वस्थ झाला. त्यांनी कधीच हे कपडे घातले नव्हते. त्यांनी नम्रपणे कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासच नकार दिला. हा पुरस्कार वितरण सोहळा चालू असताना गुलजार आपल्या घरीच दिवाणखान्यात गालिबच्या पुतळ्यापाशी बसून राहिले. याचं कारण म्हणजे व्यावसायिक गीतकार म्हणून प्रसिद्धी पैसा लोकप्रियता मिळाली तरी गुलजार खरे कवी आहे. आपण जे लिहीतो आहोत ते केवळ रसिकांसाठी. त्यानं दाद दिली, दखल घेतली तर ती खरी पावती. तो खरा पुरस्कार. आपल्या एका कवितेत गुलजार यांनी ही भावना फार सोप्या शब्दांत आणि फार परिणामकारकरित्या लिहून ठेवली आहे.

उम्मीद भी है
घबराहट भी है
कि अब लोग क्या कहेगे
और 
इससे बडा डर यह है
कही ऐसा ना हो
कि लोग कुछ भी न कहे

गुलजार यांच्या चित्रपट गीतांवर भरपूर लिहील्या गेलं आहे. त्याची दखलही घेतल्या गेली आहे. पटकथा लेखक, दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी  गौरविल्या गेली आहेत. पण कवी म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. याचे दु:ख खुद्द गुलजार यांनाही असावे. त्यांचा अगदी अलिकडे प्रकाशित झालेला कविता संग्रह ‘पन्द्रह पाच पचहत्तर’ याची साक्ष आहे. हा संग्रहाचे हस्तलिखीत त्यांनी हिंदीचे प्रसिद्ध कवी समिक्षक अशोक वाजपेयी यांना दाखवले. त्यांनी आक्षेप घेतल्या त्या कविता वगळल्या. अशोक वाजपेयींनी याला छोटीशी प्रस्तावना लिहीली तेंव्हाच हा लोकप्रिय, जागतिक पुरस्कार प्राप्त कवी काहीसा समाधान पावला. 

अशोक वाजपेयींनी गुलजार यांच्या कवितेबाबत लिहीलं आहे, ‘गुलजार के यहां बहुत ज्यादा कहने की उतावली नही है । उनका आग्रह उतना ही कहने पर है जितना जरूरी हो, जो सटीक बैठे । गुलजार की कविता, एक बार फिर, हमे यह भरोसा दिलाती है  कि आज की दुनिया और समय में कविता हमारे साथ है और अपनी दुनिया की कई सुंदरताऐ, उलझने और बिडम्बनाऐं कविता के सहारे बेहतर समझ सकते है ।’

अशोक वाजपयेंनी या ओळी 2010 मध्ये लिहील्या आहेत. पण काय आश्चर्य या संग्रहात नसलेली आधीची एक गुलजार यांची कविता नेमकी शेवटच्या ओळींशी मिळती जुळती आहे. 

कन्धे झुक जाते है जब बोझ से इस लंबे सफर के
हॉंप जाता हूं मैं जब चढते हुऐ तेज चढाने
सांसे रह जाती है जब सीने मे एक गुच्छा-सा हो कर
और लगता है 
कि दम टूट ही जायेगा यही पर

एक नन्हीसी मेरी नज्म मेरे सामने आ कर
मुझसे कहती है मेरा हाथ पकड कर
मेरे शायर
ला, मेरे कन्धों पर दख दे
मैं तेरा बोझ उठा लूं ।

गुलजारच्या छोट्याशा ‘नज्म’ने केवळ त्यांचे ओझं उचललं आहे असं नसून समस्त  रसिकांचे ओझं आपल्या डोक्यावर उचलून धरलं आहे म्हणून तर हे रूक्ष जगणं सुसह्य आहे. वाढदिवसाच्या गुलजार यांना लाख लाख शुभेच्छा ।  
             
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, August 12, 2014

शेतकर्‍याचा 15 ऑगस्ट कवा हाय ?

दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 12 ऑगस्ट 2014 


आजपासून बरोबर 3 दिवसांनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावतील. आणि जनतेला संबोधित करतील. 68 वेळा ही कवायत केल्या गेली. विविध पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. सध्याचे पंतप्रधान कॉंग्रेसेतर पहिले पंतप्रधान आहेत ज्यांना स्वत:च्या बळावर पूर्ण बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेसशिवाय कुणालाही हे भाग्य लाभले नव्हते. पण सर्व पंतप्रधानांमध्ये शेतकरी विरोधाचे सूत्र मात्र समान आहे.  ‘शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचे धोरण’ अशी घोषणाच शेतकरी चळवळीने दिली होती. सर्व शेतकर्‍यांना मोठी आशा होती की हे नविन मोदी सरकार तरी ही घोषणा खोटी ठरवेल. पण याही सरकारने कांदा, बटाटा यांना जिवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकूले. कांद्याचे निर्यात मुल्य वाढविले, जनुकीय बियाण्यांच्या चाचण्या घेण्यास का-कू करून आपण काही फार वेगळे नाही हे दाखवून दिले. 

दिल्लीच्या सरकारचा अन्याय कमी पडला म्हणून की काय मुंबईचे सरकारही आपल्या कडून होईल तो अन्याय करून आपणही मागे नाही हेच दाखवून देत आहे. पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर परभणीच्या शेतकर्‍यांवर मुंबईच्या सरकारने गुन्हे नोंदवून तुरूंगात टाकण्याची तयारी चालविली आहे. हे शेतकरी नक्षलवादी आहेत का? हे दहशतवादी आहेत का? काही आतंकवादी कारवाया यांनी केल्या आहेत का? कुठे बलात्कार करण्यात यांचा पुढाकार आहे का? काही चोरी खुन लाच लुचपत अशी काही प्रकरणे आहेत का? तर तसे काहीच नाही. कारण असे काही करणार्‍यांना पकडण्याचा पुरूषार्थ सरकार दाखवित नसते. या शेतकर्‍यांनी जो गुन्हा केला आहे तो सरकारच्या दृष्टीने फारच भयानक गुन्हा आहे. या शेतकर्‍यांनी आपल्या पडिक शेतात पेरणी करण्याचा घोर अपराध केला आहे. तेंव्हा त्यांना तुरूंगात टाकणे सरकारचे आद्य कर्तव्यच नाही का?

गोष्ट तशी फार मोठी नाही आणि समजायलाही फार अवघड नाही. परभणीला कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय झाला. परिणामी विद्यापीठासाठी म्हणून दहा हजार एकर जमिन (चार हजार हेक्टर) शेतकर्‍यांकडून संपादित करण्यात आली. 1972 ते 1976 या काळात हे संपादन पूर्ण झाले. शेतकर्‍यांकडून जमिनी घेताना त्यांचे पुनर्वसन आणि घरटी एक नौकरी असे आश्वासन देण्यात आले. जमिनीच्या बदल्यात शेतकर्‍यांना मिळालेला मोबदला मामुली होता. 

प्रत्यक्षात काय घडले? शेंद्रा, बलसा, सायाळा या गावच्या जमिनी संपादित केल्या गेल्या पण या शेतकर्‍यांचे पुनर्वसन झालेच नाही. शिवाय नौकर्‍यांचे आश्वासनही नुसते कागदोपत्रीच राहिले. विद्यापीठाने ही जमिन 1990 सालापर्यंत जवळपास 14 वर्षे वहित केली. शेतीच्या उत्पन्नावर विद्यापीठाचा खर्च चालावा अशी संकल्पना होती.  विद्यापीठाच्या लक्षात आले की शेतीतून फायदा होणे तर दूरच उलट खर्चच होतो. मग विद्यापीठाने सरकारकडे हात पसरले. अनुदानाचा ओघ सुरू झाला. शेती पडिक राहिली. शेवटी 2001 साली विद्यापीठाने जाहिर केले की 'एकूण जमिनीपैकी 2380 हेक्टर जमिन म्हणजे सहा हजार हेक्टर जमिन अतिरिक्त आहे. आम्ही ती कसू शकत नाही.' ज्या शेतकर्‍यांची ही जमिन होती ते इतरत्र मजूरी करून आपली गुजराण करत होते.  

ज्या कामासाठी सरकाने जमिनी संपादित केल्या ते काम झाले नाही किंवा ते उद्दीष्ट सफल झाले नाही तर त्या जमिनी मुळ मालकाला परत द्याव्या अशी नियमाप्रमाणे तरतूद आहे. त्याप्रमाणे ही अतिरिक्त पडिक जमिन आपली आपल्याला परत द्यावे अशी मागणी शेतकर्‍यांनी सरकारकडे केली. सरकारने त्याकडे अर्थातच लक्ष दिले नाही. मग ही जमिन निदान कसू द्या अशी मागणी शेतकर्‍यांनी केली.त्याकडेही सरकारने फारसे लक्ष दिले नाही. काही शेतकर्‍यांनी 2002 सालापासून या जमिनीची मशागत सुरू केली. सर्व शेतकर्‍यांनी ही मशागत करून पेरणी केली नव्हती. बारा वर्षे वाट पाहण्यात गेली तेंव्हा अजून काही शेतकर्‍यांनी असे ठरविले की आपणही आपले पडिक  शेत मशागतीने सुधारू आणि जमेल तसा पेरा करू. एरव्ही जमिन पडिक ठेवणार्‍या विद्यापीठ प्रशासनाला 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच जाग आली. आणि त्यांनी यावेळी शेतकर्‍यांना धडा शिकवायची तयारी चालू केली. सरकारने चालविलेल्या दडपशाहीचे चटके बसण्यास सुरूवात होताच सर्व शेतकर्‍यांनी मिळून शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली. शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क केला. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा एक मेळावा घेण्याचे ठरविले. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी आमदार वामनराव चटप यांना आमंत्रित केले. हा मेळावा होण्याच्या दोन दिवस आधी शेतकर्‍यांना धडा शिकविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने वहित जमिनीवर केलेला पेरा ट्रॅक्टर लावून मोडून काढला. दिवसा ढवळ्या आपलेच शासन आपल्याच शेतात आपण केलेली मेहनत मातीमोल करताना शेतकरी डोळ्यात पाणी आणून पहात राहिले. 

शेतकर्‍यांच्या मेळाव्यात आजारपणामुळे शरद जोशी उपस्थित राहू शकले नाहीत. पण गुणवंत पाटील हंगरगेकर, माजी आमदार वामनराव चटप, गोविंद जोशी आणि ऍड. अनंत उमरीकर यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून शांततेच्या मार्गाने अहिंसक पद्धतीने लढा उभारण्याचे सांगितले. शंतकर्‍यांनी हे शांतपणे एैकून घेतले. शेतकरी घरी परतले पण प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवून त्यांना तुरूंगात डांबण्याचे उद्योग शासनाने सुरू केले. लढा उभारणारे तरूण नेतृत्व किशोर ढगे याच्यावर गुन्हे नोंदवले गेले आहेत. उद्या पंधरा ऑगस्ट आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍याला तुरूंगाचा आहेर देण्याची योजना शासनाने आखली आहे. 

कृषी विद्यापीठातूनच एकेकाळी शेतकरी चळवळीचे वादळ उठले होते. तेंव्हा विद्यार्थी असलेले शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते लातूरचे प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांची एक कविता त्या काळात फार गाजली होती. पंधरा ऑगस्टच्या पार्श्चभूमीवरील शेषराव यांची कविता ‘आमचा 15 ऑगस्ट कवा हाय?’ असा प्रश्न इतर सामान्य जनतेला विचारीत होती. आजही हीच परिस्थिती पाहून शेषराव यांनी याहून काय वेगळे लिहीले असते..

आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय?

जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा
तवा माय माझी 
अंगावरले फाटके कपडे टाचायची
नवे कपडे नाहीत म्हणून
बापावर राग काढायची
कर्मावर बोटं मोडाची
तवा बाप माझा
कोपर्‍यातल्या दिव्या जवळ बसून
पायातले काटे काढायचा
तिथं मेण लावून जाळायचा
ओठावर ओठ गच्च दाबून
डोळ्यातून टिपं गाळायचा
जवा उद्या पंधरा ऑगस्ट असायचा

पण 
अलिकडे अलिकडे
पंधरा ऑगस्ट आला की
माझा बाप बिथरल्यावानी करतोय
कुळवाचं रूमणं हातात घेतोय
आणि नाशिकात निपाणीत
सांडलेल्या रक्ताच्यान
आमचा पंधरा ऑगस्ट 
कवा हाय मनतोय.

आमचा पंधरा ऑगस्ट कवा हाय?
                     
                   - शेषराव मोहिते

तेंव्हा नाशिक निपाणीत शासनाने केलेल्या गोळीबारात शेतकर्‍यांचे रक्त सांडले होते. आता तीस वर्षे उलटून गेली. तेहतीस शेतकरी शासनाच्या गोळीबारात शहीद झाले. पण परिस्थिती तीच आहे. नौकरी मिळत नाही आणि स्वत:ची पडिक जमिन कसायला गेलं, परत मागायला गेलं की मायबाप सरकार तुरूंगात टाकतंय, उद्या गोळ्याही झाडायला कमी करणार नाही. पंधरा ऑगस्ट तूमचा आहे. मग आमचा पंधरा ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन कवा हाय? असं म्हणत आर्त टाहो फोडणार्‍या शेतकर्‍याचा आवाज आम्हाला कधी ऐकू येणार?           
    
     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575

Tuesday, August 5, 2014

किशोरकुमारसाठी रफी गातो तेंव्हा...


दै. पुण्यनगरी, उरूस, मंगळवार 5 ऑगस्ट 2014 

वाचकांना कदाचित असे वाटेल की शिर्षक चुकले आहे. दिलीपकुमारसाठी रफी गातो तेंव्हा..., देव आनंदसाठी रफी गातो तेंव्हा... किंवा शम्मी कपुरसाठी रफी गातो तेंव्हा... असे शिर्षक योग्य आहे. कारण या नायकांसाठी मोहम्मद रफीचा आवाज आपल्या मनात ठसून आहे. पण किशोरकुमार जो की स्वत:च एक चांगला गायक होता त्यासाठी मोहम्मद रफीचा आवाज... पण हे खरं आहे. 31 जूलै ही रफीची पुण्यतिथी तर 4 ऑगस्ट ही किशोरची जयंती.  

कल्पना करा मस्तीखोर किशोरकुमार छब्बा जाकिट धोतर घालून व्यवस्थित भांग पाडून हाती तंबोरा घेवून मांडी घालून बसला आहे. समोर नटखट मधुबाला किंवा मुमताज किंवा शुभा खोटे कोणी नसून शास्त्रीय नृत्यांत निपूण असलेली पदमिनी सारखी सौंदर्यवती आहे. किशोरकुमार तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडातून मोहम्मद रफीचे सूर बाहेर पडतात. शास्त्रीय रागदारीवर आधारीत ‘मन मोरा बावरा’ हे गाणं किशोरकुमारसाठी रफीने गायले आहे. 1958 ला आलेल्या ‘रागिणी’ या चित्रपटातील हे गीत आहे. अजून एक आश्चर्य म्हणजे या गाण्याचा संगीतकार कुणी शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध असलेला संगीतकार नाही. तर मस्तीखोर चालीसाठी टांग्याच्या ठेक्यासाठी प्रसिद्ध असलेला ओ.पी.नय्यर हा या गाण्याचा संगीतकार आहे. नुसता रफीच नाही तर तेंव्हाचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक  फतेह अली, अमानत अली आणि उस्ताद अमीर खान यांचेही आवाज किशोरकुमारसाठी ओ.पी.नय्यरनी यात वापरून कमाल केली आहे. ‘ललत’ रागातील अमीर खां यांची प्रसिद्ध बंदिश ‘जोगिया मोरे घर आये’ ही याच चित्रपटात आहे. सध्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खां ही बंदिश अप्रतिम गातात. पण याही चित्रपटाच्या आधी १९५६ मध्ये "भागम भाग" नावाचा किशोरकुमार भगवान दादा यांचा चित्रपट आला होता. त्यालाही संगीत ओ पी नय्यर यांचेच होते. "चले हो कहा करके जी बेकरार" असे एक गोड गाणे रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात आहे. पडद्यावर शशिकला आणि किशोरकुमार आहेत. यात खरे तर किशोर रफी अशी दोन गाणी आहेतही. याच चित्रपटात अजून एका गाण्यात किशोरकुमार साठी एस. डी. बतीश यांचा आवाज वापरला आहे. ( दिल दिया दौलत को- रफी व एस डी बतीश)    

शंकर जयकिशनने किशोरकुमारचा वापर फार थोडा केला असा समज आहे. गंमत म्हणजे मुकेशच्या बरोबरीनेच किशोरकुमारची गाणी शंकर जयकिशनकडे आहेत. रागिणीनंतर दुसर्‍याच वर्षी 1959 मध्ये ‘शरारत’ नावाच्या शंकर जयकिशनच्या चित्रपटात किशोरकुमारच्या तोंडी रफीचे गाणे आहे. ‘अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी । कभी हसा दिया रूला दिया कभी ॥ असे या गाण्याचे साधे पण नितांत सुंदर बोल हसरत जयपूरीने लिहीले आहेत. हे खरंच अजब आहे की मस्तीखोर किशोरकुमार शांतपणे पियानोवर बसून मीनाकुमारी समोर हे गाणं सादर करतो आहे. शंकर जयकिशनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शैलेंद्र व हसरत जयपूरी सोडून कुणाचीच गाणी कधी वापरली नाहीत. बी.आर.चोप्रा यांनी विविध संगीतकारांना आपल्या चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी बोलावले. पण गीतकार म्हणून साहिर त्यांनी कधी सोडला नाही. एकदा त्यांनी शंकर जयकिशनला आमंत्रित केलं. सर्व अटी दोघांनाही मान्य झाल्यावर गीतकारासाठी त्यांनी साहिरच्या नावाचा आग्रह धरला. साहिर तसा चित्रपटसृष्टीतील फार मोठा प्रतिभावंत गीतकार. पण शंकर-जयकिशनने शैलेंद्र आणि हसरत जयपूरीशिवाय संगीत देणार नाही म्हणत करार मोडून टाकला. ज्याच्यासाठी शंकर जयकिशन आग्रही होते तो हसरत जयपूरी एक साधा बस कंडक्टर होता. 

चौथ गाणं रफीने किशोर कुमारसाठी गायलं ते ‘बागी शहजादा’ (1964) या चित्रपटासाठी. किशोरकुमार आणि कुमकुमवर हे गाणं चित्रित झालं आहे. रफीसोबत आहे सुमन कल्याणपूर. बीपीनदत्त या अनोळखी संगीतकाराने हे गाणं गावून घेतलं आहे. गाण्याचे बोल फारच मधूर आहेत. ‘मै इस मासूम  चेहरेको अगर छू लू तो क्या होगा?’ असा प्रश्न रफीने केल्यावर त्याला सुमन कल्याणपूर तशाच हळव्या आवाजात उत्तर देते, ‘अरे पागल वो ही होगा जो मंजूर ए खुदा होगा.’ रफी-सुमन कल्याणपूर ही जोडी फार काळ टिकली. त्याचं कारणही मोठं गंमतशीर आहे. गाण्याची रॉयल्टी घेण्यावरून लता मंगेशकरने पहिल्यांदा आवाज उठवला. गाण्याच्या रेकॉर्ड जशा खपल्या जातात तशी जास्त रॉयल्टी आपल्याला भेटली पाहिजे असा लताचा आग्रह होता. त्याला रफीने दिलेले उत्तर फार तात्विक आणि त्याची स्वच्छ नितळ मानसिकता सांगणारे आहे. रफीचे म्हणणे होते की चित्रपटासाठी गाताना आपण आपले एक मानधन सांगितलेले असते. आणि ते आपल्याला निर्माता देतो. चित्रपट पडला तर आपण आपल्याकडून पैसे परत देतो का? मग चित्रपटाची गाणी चालली तर आपल्याला जास्त पैसे मागायचा काय हक्क आहे? परिणामी लता-रफी यांच्यात बेबनाव झाला. मग रफीसोबत कोण गाणार? अशावेळी सुमन कल्याणपुरचा आवाज संगीतकार रफीसोबत वापरायला लागले. सुमन कल्याणपुरने आपल्या गोड आवाजात या संधीचं सोनचं केले आहे.

पाचवे गाणे ‘प्यार दिवाने’ (1972) चित्रपटातील आहे. हे गाणे मात्र अगदी किशोरकुमारला शोभावं असेच मस्तीखोर आहे. खरं तर हे गाणे त्याने स्वत:च का गायले नाही कळत नाही. समुद्रकिनार्‍यावर नटखट मुमताजच्या मागे लागलेल्या किशोरकुमारच्या तोंडी ‘अपनी आदत है सबको सलाम करना, हुस्नवालो को हसके कलाम करना, क्या खबर थी की आप बुरा मानेंगे’ हे शब्द खरंच शोभून दिसले असते. रफीनेही या गाण्याला योग्य न्याय देत आपणही ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’ आवाजाचे आहोत हे दाखवून दिले आहे. या गाण्याला लालासत्तार या अनोळखी संगीतकाराचे संगीत आहे.

‘आराधना’ या चित्रपटासाठी रफीच्या आवाजात दोन गाणी सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केली. (बागो मे बहार है, गुन गना रहे भवरे) पण नंतर ते आजारी पडले. मग त्यांचा मुलगा राहुलदेव बर्मन याने रफीऐवजी किशोरकुमारला घेवून बाकी गाणी संगीतबद्ध केली. त्या गाण्यांनी किशोरकुमार बघता बघता पहिल्या क्रमांकाचा पार्श्वगायक बनला. रफीनेच किशोरकुमारसाठी गायलेल्या ‘अजब है दास्ता तेरी ऐ जिंदगी’ प्रमाणेच इथेही घडले. ज्या आर.डी.बर्मनने रफीऐवजी किशोरकुमारचा आवाज वापरला त्याच आर.डी.बर्मनने एक सुंदर गाणे ‘क्या हुआ तेरा वादा’ (हम किसीसे कम नही 1977) रफीला दिले. रफीला याच गाण्यासाठी त्याच्या आयुष्यातले एकमेव राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. 

त्या काळातील चार महत्त्वाचे आवाज रफी, किशोर, लता आणि मुकेश अमर अकबर अँथनी साठी लक्ष्मीकांत प्यारेलालने वापरले. ते गाणे होते ‘हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे’. नंतर परत कधीच इतके आवाज एकत्र ऐकायला मिळाले नाही. 

हिंदी चित्रपट संगीतात 1949 (शंकर जयकिशनच्या ‘बरसात’ चित्रपटापासून) ते 1966 (राहूल देव बर्मन यांच्या ‘तिसरी मंझिल’पर्यंत) चे युग म्हणजे सुवर्ण युग आहे. या काळातील पाच आवाज सर्वात जास्त प्रभावी ठरले. लता, रफी, किशोर, गीता आणि आशा. कारण हे आवाज अष्टपैलू होते. सर्व भावभावना या आवाजात समर्थपणे व्यक्त करण्यात संगीतकार यशस्वी ठरले. इतर आवाज मन्ना डे, शमशाद, मुकेश, तलत, हेमंतकुमार यांचा एक विशिष्ट बाज होता. त्या पलीकडे ते फारसे जावू शकत नव्हते. यांचा प्रभाव निश्चतच होता पण त्यांच्याकडे अष्टपैलूत्व नव्हते. 

या काळात एक निकोप स्पर्धा होती. त्यामुळे शैलेंद्र या गीतकाराने स्वत: चित्रपट काढला (तिसरी कसम) तेंव्हा त्यातील  सर्व गाणी स्वत: न लिहीता त्याने हसरत जयपूरीलाही दिली. हेमंतकुमार या गायक संगीतकाराने इतर गायकांना आपल्याकडे सन्मानाने गायला लावले. गीता दत्त आणि लता मंगेशकर यांच्याबद्दल खर्‍याखोट्या अफवा लोक उठवतात. पण गीता दत्त गेल्यावर तिला श्रद्धांजली म्हणून लतानेच तिच्या गाण्याचा कार्यक्रम आपल्या आवाजात सादर केला हे कोणी सांगत नाही. 

1949 ते 1966 या काळातील संगीताने आपले कान समृद्ध केले आहेत. त्यातील दोन महत्त्वाचे पुरूषी आवाज रफी -किशोर यांच्या पुण्यतिथी व जयंती निमित्ताने आपण त्यांच्याच स्वरांतून त्यांना आठवूया.


किशोरची अजून काही  गाणी या विषयावर अभ्यास करताना सापडत गेली.. खाली अशा गाण्यांची यादी दिली आहे..(दि. २० जून २०१८)
किशोर कुमार साठी इतर गातात तेंव्हा

1. बाप रे बाप (1955)- ओ.पी.नय्यर- जाने भी दे छोड ये बहाना-आशा
2. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- चले हो कहां करके जी बेकरार- रफी/आशा
3. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- आंखो को मिला यार से- रफी/बातीश
4. भागम भाग (1956)- ओ.पी.नय्यर- हमे कोई गम है- आशा रफी
5. पैसा ही पैसा (1956)- अनिल विश्वास-  ले लो सोने का लड्उू - किशोर/रफी
(एक कडवे रफीचे किशोरवर चित्रित आहे)
6. बेगुनाह (1957)-शंकर जयकिशन-  दिन अलबेले प्यार का मौसम- मन्ना/लता
7. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- मन मोरा बावरा- रफी
8. रागिणी (1958)- ओ.पी.नय्यर- छेड दिये दिल के तार - अमानत अली (उपशास्त्रीय)
9. शरारत (1959)- शंकर जयकिशन- अजब है दास्ता तेरी ए जिंदगी- रफी
10. शरारत (1959)- शंकर जयकिशन- लुस्का लुस्का लुई लुई शा तू मेरा कॉपी राईट- रफी/लता
11. करोडपती (1961)- शंकर जयकिशन-  पहले मुर्गी हुयी थी के अंडा- मन्ना
12. करोडपती (1961)- शंकर जयकिशन- आप हुये बलम मै तेरी हो गयी- मन्ना/लता
13. नॉटी बॉय (1962)- सचिन देव बर्मन - हो गयी श्याम दिल बदनाम-रफी/आशा 
14. बागी शहजादा (1964)- बिपीन दत्त- मै इस मासुम चेहरे को- रफी/सुमन
15. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- जब दो दिल हो बेचैन- आशा/शमशाद
16. अकलमंद (1966)- ओ.पी.नय्यर- ओ बेखबर तुझे क्या खबर- दुर्रानी/महेंद्र/ भुपेंद्र
17. अकलमंद (1966) - ओ.पी.नय्यर बालमा साजना दुनिया भूला दी-आशा/उषा 
18. प्यार दिवाने (1972)- लाला सत्तार- अपनी आदत है सबको सलाम- रफी
19. दुनिया नाचेगी (1967) - की जो मै होता हवा का झोका-मन्ना/आशा
20. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- जानेमन जानेमन तूम-मन्ना/उषा खन्ना
21. हाय मेरा दिल (1968)- उषा खन्ना- काहे जिया की बात- मन्ना 

     श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575